संभाजी राजांचा उदय
मराठी राज्याचा पाया घालणारा स्वातंत्र्यसुर्य ३ एप्रिल १६८० ला अस्तंगत झाला. पोर्तुगीजाना महाराजांची एवढी भीती होती की त्यानी महाराजांच्या ताब्यात असलेल्या मुलखावर कधीही सरळ हल्ला चढवला नाही. कोकण आणि गोव्यातल्या नद्या, जंगलं, दर्या, डोंगरांनी भरलेल्या दुर्गम प्रदेशात महाराजांचे गनिमी काव्याचे तंत्र अतिशय यशस्वी ठरले. त्याना थोडा अवधी मिळाला असता तर त्यांनी पोर्तुगीजांना गोव्यातून उखडून काढलं असतं हे निश्चित. पोर्तुगीज दप्तरात, महाराजांनी पोर्तुगीजांना जरब बसवण्यासाठी लिहिलेली तसेच पोर्तुगीज महाराजांना किती घाबरत असत हे दाखवणारी पत्रे उपलब्ध आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पोर्तुगिजांना समाधान वाटत असले तरी ते समाधान फारसे टिकले नाही. छत्रपती संभाजी राजे म्हणजे बाप से बेटा सवाई या म्हणी प्रमाणे पोर्तुगिजांनी अनुभवले. शहजादा अकबर या औरंगजेबाच्या लहान बंडखोर मुलास संभाजीराजांनी डिचोली येथे आश्रय दिला, तेव्हा मोगल या भागात आक्रमण करून संभाजीराजांना अडचणीत आणणार याचा फायदा पोर्तुगीजांनी घेण्याचे ठरविले, पण पोर्तुगिजांचा हा डाव मात्र त्यांच्यावरच उलटला. स्वत:चा कसाबसा बचाव करत त्यांनी आपली अब्रू सांभाळली. संभाजीराजे आणि पोर्तुगीज यांच्या संघर्षाचा इतिहास फार रोमांचकारी आणि मोठा आहे. त्याने एक मोठा ग्रंथच तयार होऊ शकतो. छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यामुळे पोर्तुगीजांच्या राजकीय आणि धर्मांध महत्वाकांक्षांना हाती पायी बेड्या पडल्या. पुढे संभाजी राजांच्या बलिदानानंतर झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीतही पोर्तुगीज फारसे डोके वर काढू शकले नाहीत.
छत्रपति संभाजी महाराज
छत्रपति संभाजी महाराज
महाराजांचा काळ झाल्यानंतर एक वर्ष काहीसं गोंधळाचं गेलं. संभाजी राजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला. त्यांच्या अटकेचा आदेश काढला गेला आणि रायगडावर घाईघाईने लहानग्या राजारामाचा राज्याभिषेक झाला. या घटनांचं कारण म्हणजे अष्टप्रधानांपैकी काहीजण सोयराबाईला पुढे करून आपल्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालत असावेत असं वाटतं. तसंच नवीन राज्य स्थापन करण्याच्या हेतूने संभाजी राजांनी दिलेरखानाच्या छावणीत सामिल होणं आणि शिवाजी महाराजांनी प्रयत्नपूर्वक त्यांना परत आणणं, यात महाराजांना झालेला प्रचंड मनस्ताप, यातूनच प्रधानमंडळांपैकी काहींचा संभाजी राजांवरचा विश्वास उडाला, हेही एक कारण असावं. संभाजी राजे आणि सोयराबाई यांच्या वादात सोयराबाईचे भाऊ सरनौबत हंबीरराव मोहिते यानी संभाजी राजे हेच राज्य चालवायला योग्य आहेत आणि अभिषिक्त युवराज आहेत या भूमिकेतून संभाजी राजांची बाजू घेतली. सरनौबतांच्या मदतीमुळे इ.स. १६८१ मध्ये संभाजी राजे छत्रपती झाले. त्यानी प्रथम स्वतःच्या गुन्हेगाराना कठोर शिक्षा दिल्या. पंतप्रधान मोरोपंत पिंगळे याना मात्र माफी मिळाली आणि त्यानी नंतर राजांबरोबर मोहिमेत भाग घेतला.
राज्याभिषेक होताच अवघ्या १५ दिवसात हा २३ वर्षांचा राजा मोहिमेवर निघाला. बरोबर पेशवे मोरोपंत आणि सरनौबत होते. त्यानी बुर्हाणपूरवर हल्ला करून २ कोटी रुपयांची लूट मिळवली. यावेळेला एका अरबी व्यापार्याकडून राजांनी घोडे विकत घेतले असा उल्लेख आहे. हा व्यापारी एवढा घाबरला होता की तो ते घोडे फुकट द्यायला तयार झाला होता म्हणे! पण सामान्य जनतेला त्रास देऊ नये हे शिवाजी राजांचं तत्त्व संभाजी राजांनीही अंगिकारलं असावं. यापूर्वीच म्हणजे इ.स. १६८० मधे शिवाजी महाराजांचा मृत्यु होताच औरंगजेब ५ लाख सैन्य आणि ४ लाख जनावरे घेऊन स्वतः महाराष्ट्रात दाखल झाला होता, मराठी राज्य सहज चिरडून टाकू अशा हिशेबाने तो आला असेल पण आपली गाठ कोणाशी आहे याची त्याला जराही कल्पना नव्हती! नाशिकजवळच्या रामशेजच्या एका किल्ल्यासाठी मुघल सैन्याला पाच वर्षं लढावं लागलं! तसंच पुढच्या ९ वर्षात नाव घेण्यासारखा एकही विजय मुघल सैन्याला मराठ्यांसमोर मिळवता आला नाही. संभाजी राजांच्या काही सैन्याने औरंगजेबाच्या सैन्याला गनिमी काव्याने सळो की पळो करून सोडले तर स्वतः राजे कोकणात उतरले. त्यानी प्रथम पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला पण पोर्तुगीजांनी मुघलांना मदत करणे पसंत केलं. आता राजांनी पोर्तुगीजांना संपविण्याचा निर्धार केला. मर्दनगडाची डागडुजी करून तिथे आणि भतग्राम (डिचोली) इथे सैन्याचे भक्कम तळ उभारले.
वयाच्या १६ व्या वर्षापासून संभाजी राजांनी थोरल्या महाराजांबरोबर गोव्याच्या आणि इतर मोहिमांमधे भाग घेतला होता, त्यावेळेला महाराजांचं युद्धतंत्र त्यांच्या पूर्ण अंगवळणी पडलं असावं. तसंच गोव्याच्या भूमीची संभाजी राजांना पूर्ण माहिती झाली होती. यामुळेच गोव्यात राजांचा सर्वत्र सहज संचार होत असे. इ.स. १६८३ मधे राजांनी चौल पोर्तुगीजांकडून घेतले तर ११ डिसेंबर १६८४ ला बार्देशवर हल्ला केला. बार्देशातील थिवी, चोपडे हे किल्ले जिंकले. साळशेत (मडगाव) घेतले. म्हैसूरच्या चिक्कदेवरायाचा पराभव केला आणि शिवाजी महाराजानी स्थापन केलेल्या राज्याचा आणखी विस्तार केला. राजे अवघ्या १ लाख सैन्यानिशी ५ लाखाचे मुघल सैन्य, जंजिर्याचा सिद्दी, गोव्यातले पोर्तुगीज आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय एवढ्या आघाड्यांवर एकाच वेळी लढत होते. पैकी गोव्यात त्यानी बराच काळ वास्तव्य केलं. गोव्यातलं त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यानी पोर्तुगीजांना पायबंद घातला आणि धर्मांतरित झालेल्याना परत शुद्धिकृत करून हिंदू करून घेण्याचं शिवाजी महाराजांचं कार्य त्यांच्या या पुत्रानेही पुढे चालू ठेवलं.
गोव्यामध्ये बिचोलीम नावाचे गाव आहे, ज्याचे ऐतिहासिक नाव “डिचोली” होते. इथे आपले शंभूराजे मोहिमेवर असताना काही दिवस वास्तव्यास होते. औरंगजेबाचा चौथा पुत्र अकबर जेव्हा संभाजी राजांच्या आश्रयास आला तेव्हा याच गावात त्याला एक वाडा बांधून दिला होता.
संभाजी महाराजांचे अस्सल फर्मान
गोव्याच्या पोर्तुगीजांना समजावून सांगूनही त्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मग मात्र संभाजी महाराजांना स्वतःच गोव्यावर चाल करून जावे लागले. पोर्तुगीज गोव्यावर गेली एक शतक राज्य करत होते. त्यांनी गोवा शहराच्या ( सध्याचा ओल्ड गोवा ) सभोवती मजबूत तटबंदी उभी केली होती. गोव्याचा गव्हर्नर “काउंट दि अल्वोरे” याने बऱ्याचश्या तोफा स्वसंरक्षणासाठी सज्ज ठेवल्या होत्या. त्यामुळेच संभाजी महाराजांना माहित होते कि गोव्यात शिरून पोर्तुगीजांवर आक्रमण करणे फार मोठे धाडस होईल. त्यामुळेच या गव्हर्नरला गोव्याच्या बाहेर काढून त्याच्यावर हल्ला करण्याचा बेत संभाजी राजे आखत होते. गोव्याजवळील फोंडा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. संभाजी राजांनी ठरवले कि गोव्याच्या पोर्तुगीजांना याच किल्ल्यावर येणे भाग पाडायचे.
ठरलेल्या बेतानुसार शंभूराजांनी स्वतःच्या माणसांकडून गोव्यात अफवा पसरवण्यास सुरुवात केली कि “गोव्या जवळील फोंडा किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी ५ कोटींचा खजिना आणून ठेवला आहे, त्याच बरोबर बराचसा दारुगोळा हि जमा करून ठेवला आहे.” या वेळी संभाजी महाराज रायगड किल्ल्यावर होते. यासाठी संभाजी महाराजांनीच दोन शिकाउ हेर विजरईकडे पाठविले.गव्हर्नरला हि बातमी माहित होती. गव्हर्नरला माहित होते कि फोंडा किल्ल्याची तटबंदी मजबूत नाहीये. आणि किल्ल्यावर जास्त सैन्य सुद्धा नाहीये. त्याने विचार केला कि फोंडा किल्ल्यावर थोडेच मावळे आहेत, आणि मराठ्यांचा छत्रपती पण जवळ नाहीये. त्यामुळेच त्याला जोर आला आणि तो फोंडा किल्ल्यावर आक्रमण करायला निघाला. गव्हर्नर संभाजी राजांच्या गनिमी काव्यात बरोबर अडकला. त्याने आपल्या बरोबर ३२०० लढाउ लोक, २५ घोडेस्वार आणि चार तोफा असे पोर्तुगीजी सैन्य घेतले आणि १ नोव्हेंबर १६८३ रोजी फोंडा किल्ल्यावर आक्रमण केले.
गव्हर्नर आपले पोर्तुगीजी सैन्य घेवून किल्ल्याजवळ पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. अंधार पडला होता. पण त्याने ठरवले कि सकाळ पर्यंत वाट बघायची नाही, रात्रीच किल्ल्यावर आक्रमण करायचे. त्याने रात्रीच किल्ल्यावर चढाई केली. किल्ल्यावर कृष्णाजी कंक आणि येसाजी कंक हे पिता पुत्र किल्लेदार होते. पोर्तुगीजांनी किल्ल्यासमोरच्या एका टेकडीवर तोफा चढवल्या. या फिरंगी तोफा लांब पल्ल्याच्या होत्या. या टेकडी वरूनच ते मराठ्याच्या फोंडा किल्ल्यावर तोफ तोळे डागत होते. त्याच बरोबर पोर्तुगीजी सैनिक गोळ्या सुद्धा चालवत होते.
दुसऱ्या दिवशी पर्यंत हा मारा सुरु होता, त्या मार्याने फोंडा किल्ल्याच्या तटबंदीचा एक बुरुंज ढासळला होता. ते पाहून गव्हर्नर खुश झाला. त्याने आपल्या सैन्याला किल्ल्यामध्ये शिरण्याचा हुकुम दिला. पण किल्ल्यावरून होणाऱ्या मराठ्यांच्या माऱ्यापुढे एकही पोर्तुगीजी सैनिक पुढे सरकायला तयार नव्हता. पण गव्हर्नरच्या रेट्यापुढे त्याचे काही चालेना. मग काही पोर्तुगीज पुढे झाले आणि किल्ल्याजवळ आले. किल्ल्यावरून दगडांचा मारा झाला. मग मात्र पोर्तुगीज मागे हटले.
पण तरीही सलग ४ दिवस त्या टेकडीवरून किल्ल्यावर तोफांचा मारा चालू होता. खरी परिस्थिती अशी होती कि अजून एखाद्या दिवसात किल्ला पोर्तुगीजांच्या हातात जाणार होता. पोर्तुगिजांचा गव्हर्नर तर याच खुशीत वेडा झाला होता. त्याला तर फोंडा किल्ल्यावर पोर्तुगिजांचा झेंडा दिसू लागला होता. किल्ल्यावरचे मावळे येसाजी कंक यांच्या हुकुमाप्रमाणे प्राणांची शर्थ करून किल्ला लढवत होते.
आणि इतक्यात…. दुरून, काही अंतरावरून धुळीचे लोट दिसू लागले, ललकाऱ्या ऐकू येवू लागल्या, “हर हर महादेव, शिवाजी महाराज कि जय, संभाजी महाराज कि जय”. फोंडा किल्ल्यावरचे सगळे मावळे तटबंदीवर आणि बुरुंजावर उभे राहून तिकडे पाहू लागले… क्षणा क्षणाला तो आवाज वाढत होता. खुद्द शंभू राजे येसाजी कंकांच्या मदतीसाठी आले होते. ते पाहून किल्ल्यावारूनही त्यांना प्रतिसाद दिला गेला, किल्ल्यावरून घोषणा उठू लागल्या, “संभाजी महाराज कि जय ||” .राजापुरात मुक्कामाला असलेले संभाजी राजे योग्य समयास पावले होते. संभाजी महाराज, त्यांचे घोडदळ, पायदळ, सारी सेना आली होती फोंडा किल्ला राखायला, पोर्तुगीजांना पराभवाची धूळ चाखवायला. पोर्तुगीजांना पण हे लक्षात आले, मग मात्र त्यांचे धाबे दणाणले, भीतीने त्यांची गाळण उडाली. विशेष म्हणजे ६०० शिपाई ८०० घोडेस्वार पोर्तुगीजांच्या देखतच फोंड्याच्या किल्ल्यात गेले, त्यांना थोडाही विरोध करायची पोर्तुगीजांना छाती झाली नाही. आत्ता पर्यंत गव्हर्नरने संभाजी महाराजांचे पराक्रमाचे किस्से फक्त ऐकले होते, आज साक्षात त्यांनाच समोर बघून गव्हर्नर पूरता घाबरून गेला, खचून गेला. त्याने लगेच आपल्या सैन्याला मागे फिरण्याचा आदेश दिला. पोर्तुगीजी सैन्य देखील याच आदेशाची वाट बघत होते, आदेश मिळताच तेही पाठीला पाय लावून पळत सुटले. किल्ल्यावरील मावळे हे दृश्य पाहून फारच आनंदित झाले.गोव्याचा गव्हर्नर काउंट दि अल्वोरे ( Count De Alwore ) याला मराठ्यांनी जेरीस आणून सोडले होते. याचा दिनांक आहे १२ नोव्हेंबर १६८३.
लगेच २४ नोव्हेंबर १६८३ च्या संभाजी राजांनी जुवे बेटावरच्या जुवे किल्ल्यावर ( सांत ईस्तेव्हांव ) हल्ला केला आणि बेसावध पोर्तुगीजांना काही समजायच्या आतच जुवे किल्ला ताब्यात आला. यामुळे मध्ये फक्त मांडवी नदी आणि पलीकडच्या तीरावर राजधानी गोवे शहर अशी आणीबाणीची परिस्थिती पोर्तुगीजांवर आली. दुसर्या दिवशी २५ नोव्हेंबरला सकाळी पोर्तुगीज प्रतिकारासाठी जुवे किल्ल्यापाशी आले, पण नेहमीच्या गनिमी काव्याने मराठ्यांनी त्यांना चकवून कचाट्यात पकडले. पोर्तुगीजांची ईतकी वाईट अवस्था झाली कि ३०० सैनिकांपैकी एकही सैनिक धड अवस्थेत नव्हता. स्वतः विजरई मरायचाच , तो वाचला. पोर्तुगीज पळत सुटलेत हे पाहून गोवे शहर ताब्यात घ्यावे म्हणून, संभाजी राजांनी मांडवी नदी पार करून पोर्तुगीजांवर हल्ला करण्यासाठी नदीच्या पात्रात घोडे घातले, पण उधाण आलेल्या प्रवाहात घोड्याचा पाय घसरला आणि राजे वाहून जाऊ लागले. या वेळेला खंडो बल्लाळाने राजांना वाचवले अशी कथा स्थानिक लोकांच्या सांगण्यात येते. काही मराठी सैन्य साळशेतमधे ठाण मांडून बसले तर स्वतः राजांनी वेळ न गमावता साष्टी आणि बारदेशवर हल्ला केला आणि तीन बाजूंनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाला घेरले. आता फक्त तिसवाडीच पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिली होती.
दुसर्या दिवशी राजे स्वतः गोवा शहरावर हल्ला करणार हे पोर्तुगीजांनी जाणले. आताच्या ओल्ड गोवा येथून जुवे बेट दिसते. तिथल्या सैन्याच्या हालचाली पाहून पोर्तुगीज घाबरले. त्यांनी चर्चमधलं सेंट फ्रान्सिस झेवियरचे शव बाहेर काढलं. व्हाईसरॉय काउंट डी अल्वारिसने आपला राजदंड त्याच्या शवपेटीवर ठेवला आणि "सायबा, तूच आमचं रक्षण कर" अशी करुणा भाकली. पोर्तुगीजाना हा सायब पावला की नाही माहित नाही, पण मुघल मात्र मात्र पावले! सुमारे १ लाखाचे मुघल सैन्य घेउन शाह आलम कोकणात उतरल्याची खबर आली आणि जिंकत आलेली गोव्याची मोहीम अर्धवट टाकून संभाजी राजाना परत जावं लागलं.
गव्हर्नर आधीच गोवा शहर सोडून गेला होता, त्याला खात्री होती कि संभाजी महाराजांना पराभूत करणे अश्यक्य आहे. त्याला भीती होती कि शंभूराजे एक न एक दिवस पूर्ण गोवा जिंकून घेतील. म्हणूनच त्याने ठरवले कि संभाजी महाराज यांच्या बरोबर तह करून आपला जीव वाचवायचा. यासाठीच गव्हर्नरने आपला वकील शंभू राजे याच्याकडे पाठवला होता. यानंतर काही दिवसातच संभाजी राजे यांनी पोर्तुगिजांबरोबर तहाची बोलणी केली. आणि ते रायगडला परत आले.
संभाजी महाराज यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी गोवेकर पोर्तुगीजांची केलेली वाताहत पाहून गोव्यातील मराठी लोक खूप आनंदित झाले. गोव्यातील कित्येक लोक वर्षानुवर्षे पोर्तुगिजांचा जाच, त्रास छळ आणि अत्याचार सहन करत होते. कित्येक वर्षानंतर आज ते स्वातंत्र्याचा आनंद घेत होते.
इ.स. १६८४ मधे संभाजी राजांनी पोर्तुगीजांबरोबर तह केला. त्या अनुसार मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले गोव्याचे ३ तालुके त्याना सोडून दिले. तर पोर्तुगीजानी चौल इथे कर देण्याचं मान्य केलं. पण या तहाची पूर्ण अमलबजावणी झाली नाहीच! बार्देशमधले किल्ले मराठ्यांनी परत केले नाहीत. आता औरंगजेबाची वक्रदृष्टी गोव्याकडे वळली. पण पोर्तुगीजांनी गोव्यातल्या मराठा देसायांबरोबर तह केला आणि मुघल सैन्याच्या हाती काही लागले नाही. मराठा सैन्य आणि पोर्तुगीज यांच्या चकमकी सुरूच राहिल्या. पण संभाजी राजे पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी परत गोव्यात येऊ शकले नाहीत. ते जर झालं असतं तर आज गोवा महाराष्ट्राचा एक जिल्हा राहिला असता!
शिवाजी महाराजांच्या गोवा मोहिमेत इथल्या स्थानिक राणे, देसाई वगैरे मंडळीनी त्याना विरोधच केला होता. पण त्यांची मदत मिळवण्यात संभाजी राजे मात्र यशस्वी ठरले. असोळणा, कुंकोळी इथल्या मराठ्यांनी आणि साखळीच्या राणे घराण्याने राजांना खुल्या दिलाने मदत केली आणि त्यांचं राज्य स्वीकारलं. समाजातून बहिष्कृत झालेल्या राण्यांना संभाजी राजानी पंक्तिपावन करून घेतले आणि राणे राजांचे ऋणी झाले.
आणखी सतत ४ वर्षे मुघलाना हुलकावण्या देत जेरीला आणणारा हा शूर छत्रपती १ फेब्रुवारी १६८९ ला कपटाने कैद झाला. त्यांच्या सख्या मेव्हण्याने, गणोजी शिर्क्याने विश्वासघात केला आणि नंतर तब्बल ४० दिवस हालहाल करून शेवट औरंगजेबाने ११ मार्च १६८९ ला राजांचा वध केला. पण एवढे हाल होत असतानाही या छाव्याने औरंगजेबाचा कोणताच प्रस्ताव मानला नाही आणि वीराचे मरण पत्करले. महाराष्ट्राच्याच नाही तर गोव्याच्या इतिहासात या राजाचं स्थान अद्वितीय आहे. त्याच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा झुंजण्याचा निर्धार आणखीच पक्का झाला आणि नंतर एकजुटीने पण निर्नायकी अवस्थेत मराठ्यांनी मुघलांना जी झुंज दिली तिला इतिहासात तोड नाही. पराक्रमात बापसे बेटा सवाई असलेल्या या तरूण राजाने अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात विजेसारखं थोड्या काळासाठी लखलखून आत्मार्पण केलं आणि सामान्य शेतकर्यांना औरंगजेबाशी भांडण्याचं पहाडाचं बळ दिलं. गोव्यात पोर्तुगीजांना बसलेला दणका एवढा प्रचंड होता की त्या ३ तालुक्याच्या पलिकडे आणखी प्रदेश आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्नसुद्धा त्यानी नंतर केला नाही. एवढ्या सततच्या धामधुमीतही 'बुधभूषण' आणि इतर काही संस्कृत रचना करणार्या या तेजस्वी राजाच्या नावावरून 'वास्को द गामा' शहराचं नाव 'संभाजीनगर' करावं असा प्रस्ताव काही काळापूर्वी आला होता, पण...
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा गोवा मधील शिलालेखाची माहिती,,
पणजी येथील गोवा राज्य संग्रहालयाला भेट दिल्यानंतर हा शिलालेख नजरेस पडतो. मराठी भाषा, शके १६१० (सन १६८८) आणि मूळ जागा फोंडा तालुक्यातील हडकोळण येथील. येवढीच त्रोटक माहिती शिलालेखाच्या जवळ आहे.
शके १६१० ह्या कालगणनेमुळे हा लेख छत्रपती संभाजी महाराजांचा हे कळायला मदत झाली. हा शिलालेख वाटसरूंना 'अंगभाडे' नावाचा कर द्यावा लागे त्या संदर्भातील आहे. या लेखात संभाजी राजांना 'क्षत्रियकुळावतंस' असे म्हटले आहे. त्याचबरोबर शिलालेखातील 'आता हे हिंदुराज्य जाहाले' हे वाक्य महत्त्वाच आणि अर्थपूर्ण आहे.
शिलालेखाच्या शिळेची लांबी 36" व रुंदी अंदाजे १०" ते १२" आहे. लेखात एकूण २० ओळी असून शेवटच्या दोन ओळी शिळेच्या खालच्या जागेत लिहिल्या आहेत. लेखाच्या वरच्या भागात 'श्रीरामाय' असे कोरले आहे. पण ते पटकन वाचता येत नाही. नंतर सूर्य, चंद्र आणि अष्टदल कमळ कोरले आहे. लेखाच्या शेवटी दोन्ही बाजूंना गाईची चित्रे असून त्यांच्या मधोमध 'शुभं भवतु' कोरले आहे. हे पण बरेच अस्पष्ट झाले आहे.
श्रीगणेशायनम:
श्री लक्ष्मी प्रसन्न|| स्वस्ति श्री नृपशाळीवाहन शके||
१६१० वर्ष | वर्तमान विभवनाम संवत्सर चैत्र शुध्द
प्रतिपदा गुरुवासर गोमंतक प्रांत अनंतउर्ज देश
क्षत्रियकुळावतंस राजा शंभुछत्रपति यांचे आज्ञानुव-
र्ती राजश्री धर्माजी नागनाथ मुख्य देशाधिकारी प्रां-
त मामले फोंडा याप्रति तिमनायकाचे पुत्र सा-
मनायक याहीं विनंती केलि जे पूर्वि मुसलमाना-
च्या राज्यामध्यें तरि अनंतउर्जेसि लोकास आंगभा-
डें घेत नव्हते. तेणेंकरून व्यावहारीक लोके सुखें
. तेणेंकरुन राजगृहिं हासिल होय. आता हे
हिंदुराज्य जाहालेपासोन आंगभाडें घेउं लागले तेणेंकरुनी राजगृहिं
हासिलासी धका बैसला. त्यासी ते कृपाळु होउन आगभाडें उरपासि जाव
दुडूवा अर्धकोसी चौदा दुडू घेत आहेति मना करावे पण काहि राजा-
गृहिं आदाय होईल ऐसि विज्ञापना केलि ते प्रमाण जाणुन
भाणस्तरि व पारगावि व मांदुस कुडैचि येथिल आंगभाडें सोडी
लें. पुढें या प्रमाणें सकळांहि चालवावे सहसा धर्मकृत्यास नाश क
रुं नये करतिल त्यांसि महापातक आहे|| श्लोक|| श्वकृत वा परे
णापी धर्मकृत्यं कृतं नर:|| यो नश्यती पापात्मा स यती
नरकान् बहून् ||१|| लोभान्मत्सरतो वापि धर्मकार्यस्य
दुस्यक: || यो नर: स महापापी विष्ठायां जायते कृमि ||२||
दानपाळनयोर्मध्ये दानात् स्त्रेयोनुपाळनं
|| दानात् स्वर्गमवा
प्नोति पाळणादच्युतं पदं|| या धर्मकार्या समस्तिं मान देवावे
या शिलालेखातील "अनंतउर्ज" म्हणजे आजचे अंत्रुज. धर्माजी नागनाथ याने नदीवरील मालासाठी अंगभाडे व्यापाऱ्यांच्या हितार्थ माफ केलेले होते. अंगभाडे कर बसवल्यास मालाची ने-आण कमी होते. पण अंगभाडे सोडल्यापासून मालाच्या ने-आणीला प्रोत्साहन मिळते. कर माफ केल्याने लोकांना दिलासा मिळतो. तसेच धर्मकृत्यास नाश करू नये यातून संभाजी महाराजांची स्वधर्मावरील धर्मनिष्ठा दिसून येते.
राजाराम महाराजांचा कालखंड
राजाराम महाराजांनी अस्थिर राजकारणात स्वराज्य टिकविण्यासाठी जहागिरी देण्याचे धोरण स्विकारले. त्यांचा फायदा घेत कुडाळचे सावंत आणि सौधेचे वडियार सौंधेकर यांनी राजाराम महाराज आणि नंतर छत्रपती शाहू महाराजांशी चांगले संबंध प्रस्थापित करीत पेडणे , डिचोली , सत्तरी हे तालुके सावंत वाडकरांनी आणि फोंड्यासह दक्षिण गोवा सौधेकरांनी वार्षिक २५ हजार होन याप्रमाणे जहागीर म्हणून घेतला.
छत्रपती संभाजीच्या वधानंतर महाराणी येसूबाईने राजारामाला रामचंद्रपंत अमात्यांच्या हाती सोपवून प्रतापगडावर पाठवले. रायगडावर सूर्याजी पिसाळ फितूर झाला आणि येसूबाई आणि शाहू मुघलांच्या हाती लागले. खंडो बल्लाळ राजारामाला महाराष्ट्रातून सुखरूप जिंजीला घेऊन गेला. तिथे ९ वर्षं वेढ्यात काढून गणोजी शिर्केच्या मदतीने राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परत आला. इ.स. १७०० साली राजारामाच्या मृत्यूनंतर ताराबाईने राज्याची सूत्रे हातात घेतली. आता सावंतवाडी इथे लखम सावंताचा धाकटा भाऊ फोंड सावंत याची सत्ता होती. ताराबाईच्या प्रदेशाला लागून असल्याने त्याने ताराबाईचे वर्चस्व मान्य केले. तर ताराबाईने त्याला कुडाळ, बांदा, पेडणे, साखळी, डिचोली आणि मणेरी या ६ तालुक्यांचा मोकासा लिहून दिला.
फोंड सावंताचा मुलगा खेम सावंत हे गोव्याच्या आणि सावंतवाडीच्या इतिहासातलं मोठं मजेशीर प्रकरण आहे. त्याची कारकीर्द बरीच मोठी म्हणजे इ.स. १६७५ ते इ.स. १७०९ पर्यंत. त्यानेच 'सुंदरवाडी' अर्थात 'सावंतवाडीचा' पाया घातला. त्यापूर्वी सावंतांचं प्रमुख ठाणं कुडाळ होतं. या काळात त्याने प्रथम ताराबाई नंतर शाहू महाराज, म्हणजे ज्या कोणाचं वर्चस्व दिसेल त्याची प्रभुसत्ता बिनतक्रार मान्य केली. शाहू राजानी त्याला या ६ तालुक्यांचं वतन दिलं. म्हणजेच, छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांच्या काळात बंद झालेली वतनाची पद्धत शाहूच्या काळात परत सुरू झाली होती आणि हे छोटे वतनदार आपापल्या मुलुखात आपापल्या पद्धतीने सत्ता चालवीत होते. मूळ कर्नाटकातील शिरसीजवळचे, पण गोव्यात फोंडा इथे स्थायिक झालेल्या सोंदेकरांबरोबर खेम सावंताचा ३६ चा आकडा होता. जमेल तेव्हा सोंदेकरांच्या कुरापती काढण्याचे उद्योग त्याने आयुष्यभर चालू ठेवले. जिथे यश मिळणार नाही असं दिसलं तिथे सरळ माघार घेतली. मराठ्यांचं पारडं हलकं होतंय असं वाटलं की पोर्तुगीजांची मदत घेतली. हेतू साध्य होताच परत पोर्तुगीजांना अंगठा दाखवला. या सोंदेकरानीही वेगवेगळ्या वेळी मुघल, पोर्तुगीज, मराठे यांच्याबरोबर आपल्या रक्षणासाठी तह केलेले आढळून येतात. गोव्यातल्या सध्याच्या पक्षबदलांच्या राजकारणाची सुरुवात फार पूर्वी झालेली होती असं दिसतंय!
फोंड्याच्या मर्दनगडासाठी या काळात दरवर्षी एक लढाई लढली गेली. आणि किल्ल्याची मालकी आलटून पालटून कधी खेम सावंत, तर कधी सोंदेकर, कधी मराठे तर कधी मुघल अशी बदलत राहिली. पोर्तुगीजाना मराठे किंवा मुघलांसारखे प्रबळ शत्रू सीमेवर नको होते, त्यामुळे त्यानी खेम सावंत आणि सोंदेकर याना आपल्या सीमेवर राहू दिले. आणि शक्य तितके आपसात झुंजत ठेवले. अर्थातच फोंडा, डिचोली हे भाग अप्रत्यक्षपणे मराठ्यांच्याच ताब्यात राहिले.
साधारण इ.स. १७०० ते इ.स. १७०९ या ९ वर्षात खेम सावंताने गोव्यात अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याने पोर्तुगीज जहाजांवर हल्ले करून लूटमार सुरू ठेवली. त्याने संधी मिळतच बार्देश, फोंडा वळवई या भागात छापे मारून लुटालूट, जाळपोळ करणे, किल्ले ताब्यात घेणे यांचे सत्र सुरू ठेवले. किल्ल्यांच्या आश्रयाने शत्रूवर हल्ला करण्याचे शिवाजी महाराजांचे तंत्र खेम सावंताने वापरले. पोर्तुगीजानी या प्रकाराला वैतागून आमोणा, डिचोली, वळवई इथले किल्ले आपल्या ताब्यात येताच पाडून टाकले. डिचोलीचा किल्ला पाडल्यानंतर पोर्तुगीज व्हॉईसरॉयने असे उद्गार काढले की,"खेम सावंताला दुसरा शिवाजी होऊ देणार नाही!" तरी खेम सावंताचे उपद्व्याप सुरूच होते. शेवटी इ.स. १७०९ साली खेम सावंत मरण पावला. त्याला ३ मुलीच होत्या. त्यामुळे त्याच्या मागून त्याचा पुतण्या फोंड सावंत गादीवर आला. यानेही खेम सावंताप्रमाणेच पोर्तुगीजांबरोबर कधी मैत्री, कधी भांडण चालू ठेवले. कान्होजी आंग्रेंच्या आरमाराबरोबर त्याच्या चकमकी सतत चालू असत. इ.स. १७२९ मधे कान्होजींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा सेकोजी याने पोर्तुगीज आणि फोंड सावंताबरोबर लढाया चालू ठेवल्या.
पेशवेकालात मराठा आणि गोव्याची स्थिती
इ.स. १७२० नंतर बाजीराव पेशव्यांच्या सरदारानी उत्तर गोव्यात हल्ले चालू ठेवले. आता फोंड सावंत बाजीरावाच्या बाजूने पोर्तुगीजांवर हल्ले करू लागला. बाजीराव आणि चिमाजी, पोर्तुगीजांविरुद्ध वसई आणि गोव्याच्या दोन्ही आघाड्यांवर लढत होते. पोर्तुगीजांनी वसईला गोव्यातून मदत पाठवू नये म्हणून इ.स. १७३९ साली दादाजी भावे नरगुंदकर, वेंकटेशराव घोरपडे आणि जिवाजी शिंदे यांनी गोव्यावर पुर्या ताकदीने हल्ला चढवला. राशोल आणि मार्मुगोव्याचा किल्ला सोडून उरलेला साळशेत तालुका मराठ्यांच्या ताब्यात आला. तर फोंड सावंतानंतर गादीवर आलेला त्याचा नातू रामचंद्र याने बारदेश तालुका घेतला. मराठ्यांनी फोंडा, सुपे आणि सांगे तालुके ताब्यात घेतले. संभाजी राजांनंतर परत एकदा पोर्तुगीजांच्या ताब्यात फक्त तिसवाडी राहिली. आता पोर्तुगीजांनी बाजीरावाकडे तहाची याचना केली. बाजीरावाने इन्क्विझिशन बंद करा, हिंदूंचा छळ बंद करा या आणि आणखी मागण्या पोर्तुगीजांपुढे ठेवल्या. इ.स. १७४० मध्ये चौल आणि कोर्लाईचा किल्ला देऊन पोर्तुगीजानी गोव्यात आपलं अस्तित्त्व कसंबसं राखलं. मराठ्यांनी कुंकोळी आणि असोळणा परत केले, पण रामचंद्र सावंताने बार्देश मात्र परत केला नाही! रामचंद्र सावंत आणि मराठे विरुद्ध पोर्तुगीज अशा चकमकी सुरूच राहिल्या. सोंदेकर आणि राणे यानी या वेळेला पोर्तुगीजाना मदत करायचं मान्य केलं.
इ.स. १७५६ साली पोर्तुगीज व्हॉईसरॉय कॉण्डे डी अल्वाने मराठ्यांच्या ताब्यातील मर्दनगडावर हल्ला केला. या लढाईत स्वतः व्हॉईसरॉय मरण पावला! गोंधळाचा फायदा घेत सावंतांनी पेडणे, सांगे आणि मणेरी तालुके घेतले. २४ डिसेंबर १७६१ ला तह झाला आणि पोर्तुगीजांनी सावंतांच्या ताब्यात असलेल्या सर्व प्रदेशावर सावंतांचा हक्क मान्य केला. याच सुमाराला पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि पेशवाई दुबळी झाली. याचा फायदा घेत पोर्तुगीजांनी इ.स. १७६३ मध्ये मर्दनगड जिंकून सोंदेकरांच्या ताब्यात दिला. पण एवढ्यात म्हैसूरच्या हैदर अलीने सोंदेकरांवर हल्ला केला. सोंदेकर पळून गोव्यात पोर्तुगीजांच्या आश्रयाला आले. आता कसलीच जबाबदारी नको म्हणून सोंदेकरानी फोंडा, केंपे आणि काणकोण तालुके पोर्तुगीजांच्या हवाली केले. इ.स. १७७१ साली सोंदेकरानी गोव्यातल्या त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावरचा हक्क सोडून दिला. इ.स. १७८५ साली कोल्हापूरच्या छत्रपतीनी सावंतांवर हल्ला केला. आता घाबरून सावंतानी पोर्तुगीजांकडे मदत मागितली आणि त्या मदतीची परतफेड म्हणून पेडणे तालुका पोर्तुगीजांच्या हवाली केला.
अशा प्रकारे इ.स. १७८८ मध्ये पूर्ण गोवा पोर्तुगीजांच्या सत्तेखाली आला. पोर्तुगीजांनी इ.स. १५६० साली जिंकलेल्या तिसवाडी, बार्देश आणि साळशेत (साष्टी) तालुक्याना 'जुन्या काबिजादी' तर इ.स. १७७१ आणि इ.स. १७८८ मध्ये ताब्यात आलेल्या उरलेल्या प्रदेशाला 'नव्या काबिजादी' हे नाव मिळालं.
शाहू छत्रपतींचा वरदहस्त
शाहू छत्रपतींच्या काळात हिंदवी साम्राज्य चारही दिशांनी वाढले. अनेक गोमंतकीय लोक दरबारात मोठ्या पदावर दिसू लागले. नारो राम मंत्रा (रेगे) रामचंद्र सुखटणकर हे मंत्रिमंडळातील प्रमुख लोक. यांच्या काळात शाहू छत्रपतींच्या आशीर्वादाने गोव्यातील कवळे, शांतादुर्गा, मंगेशी इत्यादी मंदिरे दिमाखदारपणे उभी राहिली. पोर्तुगिजांना वसई आणि गोव्यातून उखडून काढण्यासाठी थोरल्या बाजीरावाचा भाऊ चिमाजीअप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसईची इतिहासप्रसिद्ध मोहीम झाली. दोन वर्षे चाललेल्या त्या रक्तरंजित मोहीमेत असंख्य मराठे वीरांनी प्राणांची आहुती देत वसईतून आणि उत्तर कोकणातून पूर्णपणे उखडून टाकले, तसेच गोव्यात साष्टी, बार्देश ताब्यात घेऊन जीव कंठाशी आणला, परंतु आमच्या चांगल्या इतिहासाबरोबर आमचा भ्रष्ट इतिहासही आहे. गोव्यात वसईच्या मोहिमेची जबाबदारी असणार्या दादाजीराव नरगुंदकर भावे आणि व्यंकटराव घोरपडे यांनी बत्तीस हजार असुर्वी लांच खाऊन पोर्तुगीजांची गोव्यातील हकालपट्टी वाचवली. वसई मोहिमेनंतर पोर्तुगीजांची बोलतीच बंद झाली. ते आपली अब्रू कशीबशी संभाळून राहिले, पण त्यांना एक मोठा धडा मिळाला.
पोर्तुगिजांना कायमचा धाक
छत्रपती शिवरायांनी गोमंतभूमीवर परकीय धर्मांध शक्ती विरूद्ध रोवलेल्या संघर्षाच्या बिजांना छत्रपती संभाजीराजांनी आपल्या धाडसी पराक्रमांनी वाढविले, तर शाहू छत्रपती आणि चिमाजीअप्पा यांनी तो संघर्ष पूर्णत्वाला नेला. स्वराज्यातील अंतर्गत भांडणाचा फायदा घेत सन १७६३ ते ८५ च्या दरम्यान अनुक्रमे सावंत वाडकर आणि सौंधेकर यांच्याकडून आजच्या गोव्यातील नव्या काबीजादींचा भाग पोर्तुगिजांनी पुन्हा ताब्यात घेतला. मात्र, तेथे आपले जुने धर्मांध धोरण राबवले गेले नाही. तिथे तेथील स्थानिक देसायांना विश्वासात घेऊन तुमच्या धर्माला आणि मंदिरांना हात लावणार नाही असा जाहीरनामा काढून सर्वत्र जाहीर दवंडी पिटवून सांगितला गेला.
पोर्तुगिजांनी नव्या काबीजादीचा भाग ताब्यात जरी घेतला तरी त्यावर थोरले माधवराव पेशवे यांची करडी नजर होती आणि त्याहूनही जास्त काळजी महादजी शिंद्यांना होती, कारण महादजी शिंद्यांचे असंख्य कारभार हे गोवा आणि सिंधुदुर्गातील होते. या कारभार्यांची कुलदेवता गोव्यात होती. जिवबादादा केरकर, लखबादादा लाड, सुखटणकर, वागळे, दळवी, गुळगुळे इत्यादी मोठे अधिकारी हे मूळ गोव्यातील होते. त्यांच्या हाती शिंदे-होळकरांचा उत्तर हिंदुस्थानातील कारभार होता. सन १७८५ च्या दरम्यान शांतादुर्गा, कवळे या मंदिराच्या जमिनीचे उत्पन्न पोर्तुगीज सरकारने रोखून धरले, तेव्हा उत्तर हिंदुस्थानातून पोर्तुगीजांना जाब विचारून हे उत्पन्न परत मंदिरास चालू करावे अशी आज्ञा करणारे पत्र गोव्याच्या पुराभिलेखात आढळते.
समाप्त
माझे सर्व लेखन तुम्ही इथे एकत्रित वाचु शकता.
भटकंती सह्याद्रीची
संदर्भ ग्रंथ सूची
१) पोर्तुगेज मराठे संबंध – लेखक – पां. स. पिसुर्लेकर, प्रकाशन – पुणे विद्यापीठ.
२) पोर्तुगेज मराठे संबंध – लेखक – पां. स. पिसुर्लेकर, प्रकाशन – महाराष्ट्र राज्य सांस्कृतीक मंडळ. सं. शं. देसाई भाग१,२,३
३) शिवचरीत्र पत्रसार संग्रह भाग १,२,३ प्रकाशन – भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे. संपादन – शिवचरीत्र कार्यालय, पुणे.
४) शिवशाही पोर्तुगेज कागदपत्रे – लेखक – स. शं. देसाई. प्रकाशन – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
५) शिवपुत्र संभाजी- डॉ. सौ. कमल गोखले
६ ) राजा शिवछत्रपती – लेखक – ब. मो. पुरंदरे, प्रकाशक – पुरंदरे प्रकाशन
प्रतिक्रिया
3 Dec 2020 - 2:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
संभाजी राजंच्या गोवा मोहीमेची माहिती रोचक आहे
इवलेसे गोवा पण त्या करता किती राजकारण झाले
पैजारबुवा,
3 Dec 2020 - 6:14 pm | आनन्दा
अर्धवट संपवलित असे वाटतेय..
तरीही माहितीपूर्ण आहेच।
4 Dec 2020 - 11:12 am | दुर्गविहारी
प्रतिसादाबध्दल धन्यवाद ! खरतर गोव्याचा पुर्ण इतिहास कथन करणारी मालिका यापुर्वीच टिम गोवाने मि.पा.वर लिहीलेली आहे,त्यामुळे पुन्हा पुर्ण मालिका लिहीणे कदाचित योग्य होणार नाही.तरीही मिसळपाव प्रशासनाने परवानगी दिली तर काही भाग विस्तारीत रुपात लिहीणे शक्य आहे.पाचवा भाग गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या दृष्टीने महत्वाचा होता,पण मला ती माहिती अपुरी वाटली म्हणून हे दोन भाग लिहीले.ज्यामुळे यापुढे अभ्यासकांना सर्व माहिती उपलब्ध होउ शकेल.
आधीचा इतिहास आणि यानंतरचा इतिहास वाचायचा असेल तर खालील दुव्यावर टिम गोवाच्या लिखाणाचे भाग उपलब्ध आहेत.
आजपासून गोव्यातील किल्ल्यांवर मालिका सुरु करणार आहे,त्यात आणखी काही इतिहासाचे पैलु उलगडत जातील आणि मि.पा.चे जाणकार सदस्य आणि वाचक त्याचा आनंद घेतील अशी आशा करतो.
3 Dec 2020 - 7:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह ! अभ्यासपूर्ण, योग्य संदर्भ आणि उत्तम विवेचन असलेली लेखमालिका.
वाचनखूण साठवली आहे, असेच उत्तम लेखन करीत राहावे.
-दिलीप बिरुटे
3 Dec 2020 - 10:50 pm | टवाळ कार्टा
भारी
4 Dec 2020 - 7:50 am | तुषार काळभोर
इतक्या वेळा इतक्या हाता तोंडाशी येऊन महाराष्ट्रात येता येता राहिलेला प्रदेश.
नशीब खरंच पोर्तुगीज लोकांच्या बाजूने असलं पाहिजे.
दोनच भाग असेल तरी उत्तम दर्जेदार माहितीपूर्ण मालिका.
धन्यवाद!
4 Dec 2020 - 9:05 am | टर्मीनेटर
दोन्ही भाग खूप माहितीपूर्ण!
पुढील लेखनास शुभेच्छा 👍
4 Dec 2020 - 10:37 am | साहना
काहीही असो गोआ महाराष्ट्रांत नाही ह्यात गोवेकरांचे बघाय आहे नाहीतर दळिद्री कोंकण प्रांतात ह्याचा समावेश झाला असता !
4 Dec 2020 - 10:37 am | साहना
भाग्य*
4 Dec 2020 - 11:13 am | दुर्गविहारी
टिम गोवाच्या लिखाणाचे सर्व भाग येथे उपलब्ध आहेत.
आमचें गोंय - समारोप - आजचा गोवा
4 Dec 2020 - 12:59 pm | सोत्रि
माहितीपूर्ण आढावा, मस्त!
- (गोवाप्रेमी) सोकाजी
4 Dec 2020 - 2:28 pm | बाप्पू
अत्यंत सुंदर आणि माहितीपूर्ण लेखन.
खूप खूप धन्यवाद दुर्गविहारी जी. मी याआधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही youtube चॅनेल सुरु करा. अफाट माहिती आणि अभ्यास आहे तुमच्याकडे..