सप्टेंबर १९३९ वॉर्सा रेडिओ स्टेशन. स्पिलमन पियानो वादनात मग्न होता. लाईव्ह रेकॉर्डिंग सुरु असतानाच अचानक रेडिओ स्टेशन बॉंम्बस्फोटाच्या आवाजाने हादरून जाते. काही कळायच्या आत दुसऱ्या तिसऱ्या धमक्यात सर्व काही उध्वस्त. आरोळ्या आणि धावाधाव. स्पिलमनच्या डोक्याला छोटीशी जखम होते तशातच तो घरी जातो. घरची मंडळी घाशा गुंडाळण्याचा तयारीत होती. BBC वरून ब्रिटिश गव्हर्नमेंटने नुकतीच नाझी जर्मनी विरोधात युद्ध पुकारलयायाची घोषणा केली होती आणि लवकरच परिस्थिती अटोक्यात येईल असे वचनही दिले. पण हा आनंद फार काळ टिकत नाही आणि वॉर्सा नाझी जर्मनीच्या ताब्यात जाते.
दुसऱ्या महायुद्धावर विशेषतः नाझी जर्मनी आणि ज्युंवरील अत्याचार यावर आधारीत अनेक साहित्यकृती आणि चित्रपट आहेत. त्यामध्ये निवडक असे 'लाइफ इज ब्युटिफुल', 'शिंडलर्स लिस्ट', डंकर्क , 'द डार्केस्ट आवर' हे बघावेतच. यातलाच एक पण केवळ युद्ध आणि त्यानंतरचे परीणाम येवढाच विषय मर्यादीत नसलेला सत्य कथेवर आधारीत 'द पियानिस्ट' (The Pianist) पाहिला. केवळ जिवंत राहण्यासाठी लाचार झालेल्या एका संगीतकाराची हि कथा......
द पियनिस्ट - ✒️ प्रमोद मदाल
जर्मन आणि सोव्हिएत दोन्ही सैन्याने एकाच वेळी वेगवेगळ्या आघाड्यांवर पोलंडवर आक्रमण केले होते. महिन्याभराच्या युद्धानंतर पोलंड नाझी जर्मनीच्या नियंत्रणात जातो. स्पिलमनचे वृद्ध वडील, त्याचा भाऊ, दोन बहिणी आणि आई असे सर्वजण जवळ असलेली तुटपुंजी रक्कम कुठे लपवून ठेव्यायची याची चर्चा करत असतात. स्पिलमन मात्र शांत होता. वृत्तपत्रातून ज्यूंना शहर सोडून जाण्याचा सरकारी आदेश आलेला असतो. सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास ज्यूंना बंदी केली जाते. ज्यूंसाठी शहराबाहेर वेगळ्या वस्तीची (वॉर्सा घेट्टो) सोय केली होती. लवकरत लवकर सर्वांना सक्तीने तिथे स्थलांतरित व्हायचे होते. घरात खाण्याची तारांबळ झालेल्या स्पिलमनच्या कुटुंबावर सर्व मौलवान वस्तू विकून अखेर त्याचा पियानो विकण्याची वेळ येते.
३१ ऑक्टोबर १९४० - ज्यूंचे जथ्थे शहरबाहेर पडतात. रस्त्या रस्त्यावर ज्यूंची गर्दी जमते. राहण्याची अगदीच कशीबशी व्यवस्था केलेल्या 'वॉर्सा घेट्टो' मध्ये एका घरात स्पिलमनचे कुटुंब उतरते. उदरनिर्वाहासाठी सर्वांची धडपड चालू होती पण कालांतराने हे व्यवसायही बंद केले जातात. सर्वत्र अन्नपाण्याची तारांबळ होते. लहान मुले भुकेने व्याकुळ झाली आहेत. SS गार्डस ज्यूंवर वाट्टेल तसे अत्याचार करत आहेत, त्यांच्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्यांची शिकार झालेले मृतदेह रस्त्यावर तसेच पडले आहेत. हळू हळू लोकं एकमेकांपासून वेगळी होत होती. वस्तीशी संपर्क बंद करण्यासाठी जर्मन आणि घेट्टो यामध्ये भिंत बांधण्याचे काम सुरु होते. परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली होती.
१६ ऑगस्ट १९४२. स्पिलमनला ओळखीने एका रेस्टोरंटमध्ये पियानो वादनाचे काम मिळते पण फार काळ टिकत नाही आणि एक नवीन आदेश निघतो. सर्व ज्यूंना एका ट्रेन मध्ये जबरदस्तीने कोंबले जाते. ऑपरेशन रेइनहार्डचा भाग म्हणून त्यांना बिनापरतीच्या प्रवासाला, ट्रेबलिंका छळछावणीकडे पाठवले जाते. गर्दीमध्ये एका पोलीस मित्रामुळे स्पिलमन कुटुंबापासून वेगळा होतो आणि वाचतो. इथूनच सुरु होतो स्पिलमनच्या जिवंत राहण्याचा संघर्ष. इथंपर्यंतचा चित्रपट कानाला हेडफोन्स लावून आपण चिप्स खात खात बघू शकतो पण इथून पुढे मात्र हातातले चिप्सचे पाकीट नकळत आपल्याकडून गळून पडेल अशी अवस्था होते.
रोमान पोलान्स्की दिग्दर्शित 'द पियानिस्ट' २००२ साली प्रदर्शित झाला. 'व्लादिस्ला स्पिलमन' या एका पोलिश-ज्युईश ने लिहिलेल्या त्याच्याच 'पियानिस्ट' या आत्मचरित्रामक पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. १९३९ साली सुरु झालेल्या दुसऱ्या महायुद्धाच्याने चित्रपटाची सुरुवात होते. फक्त युद्ध आणि त्याचे परिणाम एवढ्यापुरताच मर्यादित न राहता त्या पलीकडे जाऊन स्वतः मधला कलाकार जिवंत ठेवून जगण्यासाठी झालेली मानसिक आणि शारीरिक वाताहत दाखवणारा हा चित्रपट आहे.
चित्रपटात काही प्रसंग इतके ह्वदयद्रावक आहेत कि बघताना डोळ्यांच्या कडा कधी पाणावतात हेही कळत नाही. एका प्रसंगात भिंतीच्या पलीकडून खाण्याच्या वस्तूंची काही गाठोडी फेकली जातात ती घेताना एक लहान मुलगा भिंतीच्या खाली अर्धा अडकलेला दखवला आहे. स्पिलमन त्याला कसाबसा बाहेर ओढून काढतो जिवाच्या आकांताने कळवळणारा तो मुलगा अखेर बाहेर येऊन स्पिलमनच्या हातांवरच प्राण सोडतो. दुसऱ्या एका प्रसंगात एक बाई आपल्या लहान मुलाला हातात घेऊन पाण्याच्या थेंबासाठी आक्रोश करत फिरत असते पण कोणीही तिची मदत करू शकत नाही. असे अनेक प्रसंग आहेत ज्यामध्ये आपल्याकडचे असुर सुद्धा एवढे क्रूर नव्हते असे वाटल्याशिवाय राहत नाही. जरा सुद्धा संशय आला तरी त्याची खैर नाही. एका वृद्ध म्हाताऱ्याला व्हील चेअर वरून उभे राहता येत नाही म्हणून चक्क गॅलरीतून खाली फेकले जाते. हि सर्व दृश्य बघताना अंगावर काटा उभा राहतो. बरेच प्रसंग आपल्या अपेक्षेप्रमाणे नसून किंवा आपण आत्तापर्यंत पाहत आलेल्या बॉलीवूड स्टाइल नसून दिग्दर्शकाने हे सर्व प्रसंग अतिशय तटस्थपणे मांडले आहेत.
कुटुंबापासून वेगळा झालेला स्पिलमन गुलाम मजूर होतो. एके दिवशी त्याला ज्यूंचा बंडखोरीबद्दल कळते. यामधे तोही सामील होवून अन्नधान्य ने आण करण्याच्या पोत्यांमधून शस्त्रे तस्करी करण्यास मदत करतो. हे करताना एकदा एका रक्षकाकडून तो पकडला जाता जाता वाचतो. अखेरीस तेथून मित्राच्या मदतीने पळ काढण्यात तो यशस्वी ठरतो आणि आपला मित्र आंद्रेज बोगुकी आणि त्याची पत्नी जेनिना यांच्याकडे आश्रय घेतो. इथून त्याच्या उत्तरार्ध सुरु होतो. कुठल्याही ठिकाणी त्याला फार काळ लपून राहता येत नाही. राहायला जागा मिळते पण खायला अन्न नाही. अन्न मिळलेच तर सडके तर कधी कचऱ्यातल्या बादलीत फेकलेले सुद्धा खाण्याची वेळ त्याच्यावर येते. दुर्दैव असे की एकदा त्याच्यावर अश्या खोलीत राहण्याची वेळ येते जिथे एक पियानोसुद्धा असतो. तीव्र ईच्छा होऊनही तो त्याला वाजवता येत नाही यावेळी फक्त हवेत बोटे फिरवून कल्पनाशक्तीवर संगीत अनुभवणाऱ्या स्पिलमनचे दृश्य बघण्यासारखे आहे.
पुढे त्याला मित्राच्या मदतीने कशी बाशी खायची सोय होत होती ती ही बंद होते आणि एक वेळ अशी येते घरात अन्न नाही, पाणी नाही आणि घर बाहेरून बंद. शरीर भूकेने पिसाटलेले असतानाच आजारपण ग्रासते आणि बस्स आता हाच आता आयुष्याच्या शेवट असे होते. परंतु याही आजारातून तो डोरोटा या एके काळी त्याच्याबरोबर रेडिओ स्टेशन मध्ये काम करणाऱ्या मैत्रिणीच्या मदतीमुळे बरा होतो. आजारातून बरा होतो पण नाझींच्या बंदुकीचा नेम कधी बसेल हे सांगता येत नव्हते. इथले दृश्य बघताना आपणही जीव मुठीत घेऊनच स्प्लिपमन बरोबर एकरूप होऊन चित्रपट बघतो.
ऑगस्ट १९४४ साली पोलंडच्या काही भागांमध्ये भूमिगत झालेल्या सेनेने (आर्मिया क्राझोव्हाने) नाझी जर्मनी विरोधात बंड पुकारले होते. सुमारे महिनाभर चकमकी चालू होत्या. स्पिलमन एका इमारतीच्या खिडकतून रोज वॉर्साचा हा विद्रोह बघत असे. एक दिवस अचानक या सस्त्यावर टँक आणला जातो आणि इमारतींवर दारूगोळे फेकले जातात. स्लिपमनला आता बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता. बंदुकीच्या गोळ्या चुकवत, आगीच्या आणि धुराच्या लोटात असंख्य वेदना सहन करत आपले जीर्ण झालेले शरीर तो बाहेर फेकून देतो. वॉर्सा नष्ट झालेले होते. इमारतींच्या अवशेषांमध्ये स्पिलमन एकटा उरलेला आहे. अन्नाच्या शोधात कचऱ्याचा ढिगाऱ्यात अक्षरशः उंदीर फिरतात तसे तो राहतो. शेवटच्या प्रसंगात एका घरात त्याला लोणच्याचा कॅन सापडतो तो फोडण्याच्या प्रयत्नात चक्क एका जर्मन अधिकाऱ्यासमोरच जातो. बस्स साक्षात मृत्यूच समोर. मारण्याआधी होसेनफिल्ड स्प्लिमनला काही प्रश्न विचारतो आणि त्याला कळते तो कि तो एक पियानोवादक आहे. होसेनफिल्ड त्याला त्या घरात असलेला पियानो वाजवायला सांगतो. स्पिलमन आपली थरथरती बोटे पियानो वर ठेऊन वाजवण्यास सुरवात करतो. त्या संगीताने हळू हळू होसेनफेल्डचे हृदय द्रवते आणि चमत्कार घडतो. तो जर्मन अधिकारी स्पिलमनला जीवनदान देतो. त्याला तिथेच लपायला मदत करतो एवढेच नाही तर रोज त्याच्यासाठी अन्नाची पाकिटेही आणून देतो.
चित्रपटात आपल्यासमोर स्पिलमनची चित्तथरारक कथा एड्रीअन ब्रॉडी या अभिनेत्याने मांडली आहे. ब्रॉडीने स्पिलमन फक्त साकारला नसून अक्षरशः स्पिलमनचा आत्मा शरीरात घेतला आहे असे वाटते. चित्रीकरणा दरम्यान दिवसातील चार तास त्याने पियानो वर घालवले आहेत.
ब्रॉडीने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे स्पिलमनला एवढे मूर्त स्वरूप दिले आहे कि पुढचे एक वर्ष तो विचलित होऊन नैराश्यात गेला होता. आयुष्यात त्याने दुःख सहन केले होते पण त्याच्यावर उपासमारीची वेळ येईल असे वाटले नव्हते. तब्बल ३० पौंड वजन त्याने कमी केले होते असे तो म्हणतो.
अर्थातच ब्रोडीला या अभिनयासाठी साठी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पॉलिंस्कीला सर्वोत्तम दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला तसेच फ्रांस मधील सर्वोत्तम आणि अतिशय महत्वचा समजला जाणारा 'पाम डॉर' हा पुरस्कार 'पियानिस्ट' साठी मिळाला. तीन ऑस्करसह अनेक आंतरराष्टीय पुरस्कार या चित्रपटाने पटकावले आहेत.
जानेवारी १९४५ मध्ये स्टॅलिनच्या रेड आर्मी कडून जर्मन माघार घेतात आणि युद्धाची सांगता होते. स्पिलमन पियानो वादक म्हणून नाव कमवतो. होसेनफिल्ड युद्धकैदी बनतो. स्पिलमन त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो पण त्याला अपयश येते. १९५२ साली होसेनफिल्ड चा मृत्यु होतो. स्पिलमन ८८ वर्षाचे प्रदीर्घ आयुष्य जगाला आणि २००० साली त्याला मृत्यु आला. उत्तम चित्रीकरण, दर्जेदार अभिनय आणि एका कलाकरापासून ते जगण्यासाठी लाचार झालेला दयनीय प्रवास बघण्यासाठी चित्रपट अवश्य बघावा.
- ✒️ प्रमोद मदाल
प्रतिक्रिया
28 Aug 2020 - 8:03 am | कंजूस
छान.
28 Aug 2020 - 8:41 am | शा वि कु
पियानिस्ट पहिला नाहीये ! वाचून बघावासा वाटतोय.
28 Aug 2020 - 8:48 am | प्रमोद मदाल
माझ्याकडे आहे किंवा मी लिंक देतो त्यावर आहे बघा.
https://t.me/c/1254377679/341
28 Aug 2020 - 5:17 pm | शा वि कु
बघतो.
28 Aug 2020 - 2:41 pm | नीलस्वप्निल
तु नलिवर आहे का ?
28 Aug 2020 - 4:01 pm | प्रमोद मदाल
म्हणजे... कळले नाही.
28 Aug 2020 - 2:53 pm | अनय सोलापूरकर
या मूवीला. सग्रहणीय - मस्त एकदम. उत्तम अभिनय.
28 Aug 2020 - 3:23 pm | टर्मीनेटर
छान ओळख करून दिलीत “द पियानिस्ट” ची.
कसा कोण जाणे पण बघायचा राहीला आहे हा चित्रपट.
धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा!
28 Aug 2020 - 4:03 pm | प्रमोद मदाल
धन्यवाद
28 Aug 2020 - 3:53 pm | सुमो
ओळख छान करुन दिली आहे असेच म्हणतो.
इंटरनेट आर्काइव्ह वर आहे हा चित्रपट. आज रात्री बघेन.
28 Aug 2020 - 4:18 pm | मराठी_माणूस
लिंक वर जाउन पाहीले, बराच वेळ नुसतेच एक वर्तुळ फिरत होते .
28 Aug 2020 - 5:33 pm | सुमो
जिओ वापरतोय मोबाईलवर. ४८ सेकंदात लोड झाला व्हिडिओ.
.
28 Aug 2020 - 5:55 pm | मराठी_माणूस
युट्युब वर चा चित्रपट पाहताना काही समस्या येत नाही. इथे मात्र ५ मिनटे वाट बघुन सुध्दा एकही फ्रेम पुढे सरकली नाही. (आय एस पी व्होडा)
28 Aug 2020 - 4:17 pm | सुधीर कांदळकर
पाचसहा वर्षांपूर्वी पाहिला होता. पण त्यात बरीच काटछाट असावी. वर सुरुवातीला उल्लेखलेले क्रौर्याचे बरेच प्रसंग त्यात नव्हते. राक्षसाच्या अंगचा कलाप्रेमाचा, दयेचा अंश असे काहीसे वाटले होते. पण चित्रपट पाहता पाहता अलिप्तता आपल्याला सोडून जाते आणि आपण आपले राहात नाही. औदासिन्य आलेच.
छान लेखाबद्दल धन्यवाद.