एका खेळियाने - स्वयमेव मृगेंद्रता |

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
24 Aug 2020 - 5:15 pm

ये दौडेगा तो पुजारा को उसीके लिय रखा है, ताली बजानेके लिये नहीं है

पहली बॉल तेज डालना - ये आगेसे खेलेगा

जड्डू जाग के जरा... उसका पैर जैसे हिल रहा है.. उसके हिसाबसे अँटिसिपेट कर

इशांत - अगर चौका गया तो मेरा रिस्क है... तू बिंदास डाल

एक बार बोला है बार बार नहीं बोलूंगा - पैर पे खिलाना है तो पैर पे खिलाना है

भारतीय क्रिकेटनी अशी वाक्यं कधी ऐकली नव्हती. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः म्हणतात खरे. पण आमच्याकडे रणजींपासून ते विराट कोहलीपर्यंत कितीतरी अतिरथी महारथी अर्जुन होऊन गेले तरी भारतीय क्रिकेटला असा "सारथी" कधी मिळाला नव्हता! एकतर आमचे कॅप्टन कधी स्टम्पच्या मागे उभे राहायचे नाहीत. आणि इतक्या थंड अधिकारवाणीतले शब्द आम्ही फारसे ऐकले नाहीत. केवळ क्रिकेटच्या खेळाचंच नाही तर परिस्थितीचं, सहकार्‍याच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्यादेखील strengths आणि weaknesses चं अचाट reading, इतकं अफाट आकलन असणारा कर्णधार भारतीय क्रिकेटनी बघितलेला नव्हता.

भारतीय क्रिकेटमध्ये नेहेमीच भारताच्या आणि भारतीयांच्या बदलणार्‍या अ‍ॅटिट्यूडचं, मानसिकतेचं प्रतिबिंब दिसलं आहे. आम्हाला समोरच्याच्या नजरेला नजर भिडवायला शिकवलं ते सुनील गावसकरनी . कपिलनी जीवतोड प्रयत्न करायला शिकवलं तर दादानी आमच्यात जगात कुठेही जिंकण्याचा आत्मविश्वास जागवला. पण तरीही कुठेतरी तो व्यावसायिक मुत्सदीपणा कमी पडत होता. भावनांच्या भरात वाहावत न जाता थंड डोक्याने, धूर्तपणे डाव रचून, खिंडीत गाठून मोक्याच्या क्षणी वर्मी घाव घालून शत्रूला ठोकायला शिकवणारा आमचा पहिला कप्तान होता - महेंद्रसिंग पानसिंग धोनी. धोनी भारतीय क्रिकेट ह्या पब्लिक लिमिटेड कंपनीचा पहिला सीईओ होता. देशाच्या मागास भागातून आलेल्या ह्या कलंदराने त्याच्या कंपनीला क्रिकेटविश्वाच्या मार्केटमध्ये टॉपला नेऊन ठेवलं.

MSD1

ह्या माणसानी आम्हाला काय शिकवलं?

अपना टाईम आएगा - धोनीच्या कर्णधारपदाचं पहिलं झळाळतं यश म्हणजे अर्थातच २००७ चा टी - २० वर्ल्डकप. पण त्या विजयापेक्षादेखील मोठं statement धोनीनी केलं ते त्यानी कप्तानी केलेल्या पहिल्या टेस्ट नंतर. २००८ च्या त्या मोसमात चेन्नईची पहिली कसोटी अनिर्णित राहिलेली तर अहमदाबादेतली दुसरी आफ्रिकेनी तब्बल एक डाव आणि ९० धावांनी जिंकलेली. कर्णधार अनिल कुंबळे जखमी झाल्यामुळे शेवटच्या do or die कानपूर कसोटीमध्ये धोनीला संघनायकाची जबाबदारी देण्यात आली. भारताने ती कसोटी ८ विकेट्सनी जिंकली आणि पारितोषिक वितरणाच्या वेळी मालिकेची ट्रॉफी घ्यायला म्रॅएम स्मिथबरोबर सामन्यातला विजयी कर्णधार धोनी यायच्या ऐवजी आला तो मालिकेचा कर्णधार अनिल कुंबळे! धोनीचं पाणी दिसतं त्यापेक्षा खूप जास्त खोल असल्याची ही चुणूक होती. त्याला तेव्हाच माहिती होतं की अश्या ट्रॉफी उंचावण्याच्या अनेक संधी त्याला मिळणार आहेत. आत्ता घाई करायची काहीच गरज नाही. त्या दिवशीच खात्री पटली की भारतीय क्रिकेटला कॅप्टन म्हणून एक "लंबी रेसका घोडा" मिळालेला आहे.

When the going gets tough the tough gets going meaning
- प्रतिकूल परिस्थितीमध्ये हातपाय गाळणं तर सोडाच, पण ह्याच्या कामगिरीला जास्त धार चढायची. विकेट्स गेलेल्या... दात-ओठ खाऊन तुटून पडणारे बोलर्स.... भुकेल्या लांडग्यांसारखी झडप घालायला उत्सुक असलेल्या फील्डर्सच्या गराड्यात धोनी त्या हातघाईच्या प्रसंगात देखील आपली योजना आखायचा. वाटेल ते करून सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत घेऊन जायचा. आणि मग ११ विरुद्ध १ अश्या लढतीचं एकदम बोलर विरुद्ध धोनी असं द्वंद्व व्हायचं. बोलरच्या पाठीशी १८-२० धावा असल्या तरी पारडं जड असायचं ते धोनीचंच. आणि १० मधल्या ८ वेळा तो सामना काढून द्यायचा.

MSD

चुका त्या माझ्या, यश माझ्या टीमचं - एखाद्या पराभवानंतर पत्रकारांच्या प्रश्नांच्या फैरींना धीराने तोंड देणारा धोनी विजयानंतरच्या जल्लोषापासून मात्र दूर राहायचा. त्याच्या नेतृवाखाली जिंकलेल्या कित्येक मालिका आणि स्पर्धांच्या फोटोमध्ये धोनी कप हातात घेऊन मधोमध नाही, तर टीमच्या सपोर्ट स्टाफच्यादेखील बाजूला एका कोपर्‍यात उभा असलेला दिसला. छोट्याश्या यशाचं देखील श्रेय घ्यायची चढाओढ करणार्‍या आपल्याला, आयपील जिंकल्यानंतर बाकी टीमचा दंगा चालू असताना एका बाजूला आपल्या मुलीबरोबर खेळणारा धोनी एक खूप मोठा धडा देऊन गेला.

विशिष्टम् सर्व भूतेषु किमात्मानम् न सज्जसे
- "तू स्पेशल आहेस, तू हे करू शकतोस" म्हणत धोनी टीममधल्या प्रत्येक हनुमानासाठी जाम्बुवंत झाला. मोक्याच्या क्षणी त्यानी आपल्या सहकार्‍यांना आपल्या मर्यादा ओलांडून अद्भुत कामगिरी करायला प्रेरित केलं. मग ते २००७ च्या वर्ल्डकप मध्ये श्रीशांतनी हेडनला टाकलेलं निर्धाव षटक असो किंवा जोगिंदर शर्मानी टाकलेली फायनलची शेवटची ओव्हर. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध इशांत शर्मानी टाकलेली ओव्हर असो वा युवराजनी ब्रॉडवर केलेला हल्ला. प्रत्येक आगीत पहिली ठिणगी टाकणारी मशाल एकच होती - महेंद्रसिंग धोनी.

On National Duty - भारतासाठी क्रिकेट खेळताना त्याचा देशाभिमान त्याच्या कृतीतून जाणवायचा. त्यासाठी त्याला राष्ट्रगीताच्या वेळी डोळे पुसायची नाटकं करावी लागली नाहीत. जिथे देशाभिमान मिरवायचा तिथे त्यानी तो ठासून मिरवला. मग ती टीमने आर्मी कॅप घालून खेळण्याची कल्पना असो वा ग्लव्हजवरचं "Territorial Army Parachute Regiment" चं खंजीराचं निशाण. मैदानावर धावलेल्या चहात्याच्या हातचा तिरंगा जमीनीवर पडायच्या आत उचलणारा धोनी हा माझ्यासाठी वर्ल्डकप उंचावणार्‍या धोनीपेक्षा महान होता.

MSD2

विक्रमार्जितसत्वस्य, स्वयमेव मृगेंद्रता - धोनीचं नेतृत्व हे फक्त त्याच्या डावपेचांचं, त्याच्या क्रिकेटच्या ज्ञानाचं किंवा संघातल्या इतरांना प्रेरणा देणार्‍या नेत्याचं नव्हतं तर विजेच्या चपळाईने स्टंपिंग करणार्‍या, अफाट anticipation च्या मदतीने झेल घेणार्‍या किंवा बॉल अडवणार्‍या कसलेल्या विकेटकीपरचं आणि प्रतिस्पर्ध्याच्या उरात धडकी भरू शकणार्‍या आणि जगातल्या कुठल्याही गोलंदाजीच्या चिंधड्या उडवण्याचं कसब असणार्‍या दमदार बॅट्समनचं होतं. त्याच्या पराक्रमामुळे आणि बाहुबलानी त्यानी ते नेतृत्व मिळवलं होतं.

धोनी रिटायर झालाय खरा पण तो नक्की दिसेल - अर्थातच आयपील खेळेल, कदाचित आर्मी युनिफॉर्ममध्ये काही करताना दिसेल, कदाचित कधीतरी टीमचा "strategist" म्हणून दिसेल. पण कुठल्या ना कुठल्या रूपात नक्की दिसेल. अरे गेली १४-१५ वर्षं डझनावारी सिल्व्हर आणि गोल्डन ज्युबिली देणारा आमचा "थाला" असा निवृत्त थोडाच होतो? हा माणूस असा आहे की शेवटच्या ओव्हरपर्यंत वाटत राहील की "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!"

तर लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनी, तुमच्यातलं क्रिकेट जेव्हा संपेल तेव्हा संपेल, पण तुमच्यातल्या कॅप्टन कधीच संपणार नाही. तेव्हा तुमची इनिंग चालू राहूदे. आम्ही बघत आहोतच!

© - आशुतोष थत्ते

क्रीडाविचारसद्भावनाशुभेच्छाआस्वादलेख

प्रतिक्रिया

नीलस्वप्निल's picture

24 Aug 2020 - 5:30 pm | नीलस्वप्निल

सुन्दर ... द्वारकानाथ स॑जगिरी शैली जानवली

वामन देशमुख's picture

24 Aug 2020 - 5:52 pm | वामन देशमुख

क्रिकेटमधलं काही समजत-आवडत नसलं तरी तुमचा लेख आणि लेखनशैली आवडली.

गणेशा's picture

24 Aug 2020 - 5:59 pm | गणेशा

पुन्हा एक अप्रतिम लेख..

महिंद्रसिंग धोनी अतिशय उत्क्रुष्ट कर्णधार होता..
मला त्याची सर्वात जास्त विकेटकिपरींग आवडायची..
एक ना अनेक किती स्टंपिंग डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या होत्या..

धोनी आणि दादा कायम कंप्यारीझन व्हायची, हे खेळात चालुच असते, पण प्रत्येक जन वेगळा असतो, आपल्याला दादा पण आवडायचा आणि महेंद्रसिंग धोनी सुद्धा.

धोनी मला test cricket मध्ये पण आवडायचा.. पण खरी मज्जा त्याने आणली one day आणि t20 मध्ये..

तुमचे लेख खुप मस्त असतात...

राघव's picture

24 Aug 2020 - 6:33 pm | राघव

खरं सांगू का? खूप खूप आवडते खेळाडू आहेत क्रिकेट मधे. पण धोनी म्हणजे वीक पॉईंट आहे ब्वॉ.

मॅच गेली असं सगळ्यांना वाटत असतांना हा माणूस तेवढ्याच शांतपणे लढा समोरच्या टीमच्या गोटात घेऊन जायचा. त्यात तो बर्‍याचदा यशस्वी व्हायचाच. आणि यदाकदाचित नाही ना झाला, तरी जिंकणार्‍या टीमला जिंकल्यासारखं वाटणारच नाही इतका दणका देऊन जायचा. त्या प्रयत्नांवरच आम्ही फिदा! ती विजिगिषु वृत्ती दादानं जागवली आणि धोनीनं रुजवली.

दादावरून आठवलं, जसा कुंबळेचा किस्सा तुम्ही मांडलात तसंच - दादाच्या शेवटच्या टेस्ट मॅचच्या शेवटच्या सत्राची Captaincy धोनीनं दादाला करायला दिलेली. कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पद्धत फार आवडून गेली. साध्या साध्या कृतींतून हा माणूस असा आवडत जातो.

माईंड गेम्स मधेही हा महाबिलंदर माणूस आहे. कुणी एकदा त्याला कमी बॉल्स मधे जास्त रन्स काढायचे असतील तर काय स्ट्रॅटेजी वापरतोस असं विचारलं तर हा म्हणाला की - तसे अनेक मार्ग आहेत. उदा, जेव्हा असे शेवटचे ओव्हर असतात, तेव्हा त्या ओव्हरच्या पहिल्या वा दुसर्‍या बॉलला कडक चौकार/षटकार पडायला हवा. नुसता पडायला नको तर शॉट मारतांना त्या शॉटचा आवाज त्या बॉलरच्या कानांत वाजायला पाहिजे. [त्यामुळे बॉलरचे लक्ष विचलित होऊन त्याचे] पुढचे १-२ बॉल्स चुकण्याची शक्यता वाढते!

मला स्टीव्ह वॉ चं एक वाक्य आठवतं. भावार्थ असा -
We are a special team. Others will have to do something special to defeat us!
हा जो स्वॅगर होता ना त्या वाक्यात, त्या स्वॅगर पर्यंत भारतीय टीमला नेऊन ठेवण्याचं काम धोनीनं केलंय.

Alas, the most powerful number [7] has retired from the Game! Hats Off Captain!

बेकार तरुण's picture

24 Aug 2020 - 7:13 pm | बेकार तरुण

नेहमीप्रमाणे लेख आवडला...

सिरुसेरि's picture

24 Aug 2020 - 8:36 pm | सिरुसेरि

लेख आवडला . कठीण प्रसंगी तळाच्या फलंदाजांना हाताशी धरुन शांतपणे एकेरी , दुहेरी धावा , फटकेबाजी यांचा ताळमेळ साधत संघाला जिंकुन देण्याची किमया माहिने अनेकदा केली आहे . " ये आडा मारेगा " असे गोलंदाजाला सांगणारा धोनी लक्षात आहे . क्रिकेटमधे सुरु झालेली डीआरएस पद्धत आणी धोनीचे अचुक सफाईदार निरिक्षण याचा संघाला अनेकदा फायदा झाला आहे . Thats the way , Mahi way .

फारएन्ड's picture

24 Aug 2020 - 9:43 pm | फारएन्ड

आवडला!

आनन्दा's picture

24 Aug 2020 - 9:59 pm | आनन्दा

धोनी हा धोनी होता..
आपल्यासाठी तो बेवन होता असे मी म्हणतो.

तो आल्यामुळे भारताची वरची फळी चांगले काम करायला लागली, करण त्यांची जोखीम घेण्याची क्षमता वाढली.. 6व्या क्रमांकवरती धोनी आणि बऱ्याच वेळेस हार्दिक सारखा एखादा अर्धवेळ फलंदाज मॅच काढून द्यायला लागले, worst case मध्ये.. त्यामुळे मधल्या फळीचा खेळ सुधारला..

धोनी निवृत्त झाल्याची खूप हळहळ वाटली आहे, अगदी सचिन पेक्षा पण!!

नावातकायआहे's picture

11 Sep 2020 - 12:01 pm | नावातकायआहे

धोनी निवृत्त झाल्याची खूप हळहळ वाटली आहे, अगदी सचिन पेक्षा पण!!
+११११११११११११

तुषार काळभोर's picture

25 Aug 2020 - 6:52 am | तुषार काळभोर

द्रविड नंतर ज्यासाठी मॅच बघावी असा धोनीच होता.
फिल्डर कडून येणाऱ्या थ्रो ला किंचित डिफ्लेक्ट करून स्टंप कडे पाठवणारा, बॉलर कडून आलेला बॉल हातात घेऊन अलगद, एकच बेल स्टंपला किंचितही धक्का ना लावता उडवणारा, स्टंप च्या मागे उभा राहून ससाण्यासारख्या नजरेने मैदानाचा वेध घेणारा, खराब बॉल टाकल्यावर नजरेने बॉलर ला उभा फाडणारा, धावपट्टीवर बोल्ट वाटणारा अन सहा बॉल मध्ये बारा रन करायचे असताना अन बरोबर अकरावा फलंदाज असताना सुद्धा आपल्या आशा जिवंत ठेवणारा ... एम एस धोनी!

उत्कृष्ट खेळाडूवर तितकाच तोलामोलाचा लेख.

धोनी रिव्यू सिस्टीम
drs

स्टंपिंग चा राजा
.

रन आउट चा बादशाह
1

रंनिंग बिट्विन द विकेट्स
1

आणि..
1

चांदणे संदीप's picture

26 Aug 2020 - 1:08 pm | चांदणे संदीप

आणि राघव, पैलवान यांचे प्रतिसाद आवडले.
धोनीबद्दल काय आवडतं ते सांगायचं झाल्यास, तो एक उत्तम माणूस आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन यशाची सर्व शिखरे पादाक्रांत करून ते यश डोक्यात जाऊ न देणारा असा व्यक्ती विरळच. धोनीच नाव घेतलं की हात नकळत कानपाळीला स्पर्श करायला जातो.

सं - दी - प

मैदानावर धावलेल्या चहात्याच्या हातचा तिरंगा जमीनीवर पडायच्या आत उचलणारा धोनी हा माझ्यासाठी वर्ल्डकप उंचावणार्‍या धोनीपेक्षा महान होता.
मस्तच लेख..