सुगी संपली आणि ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला. सालाबादप्रमाणे गावोगावचे मजूर ऊसतोडीसाठी निघाले. आमच्या गावातील काहीजण दूरदूरपर्यंत जायचे.त्यांच्या नेण्याआणण्याची आणि रोजंदारीची व्यवस्था शेजारच्या गावातील काही जण करायचे. त्यांना मुकादम म्हणतात. आठ दहा टोळ्या त्यांच्या हाताखाली असतात. कामगारांची ने आण करायला तेव्हा ट्रक नव्हते. या टोळ्या रबरी टायरची चाके लावलेल्या बैलगाड्यांमधून उसाची वाहतूक करीत. अशा टोळ्या आमच्या गावावरून निघाल्या कि त्यांची ती भलीमोठी रांग पाहायला भारी मजा यायची. बैलांच्या गळ्यातील घुंघरमाळांची ती कलकल ऐकून कितीतरी वेळा भान हरपून जाई. आजही तिचा आवाज माझ्या कानांमधे घुमतो.
एखाद्या तालेवार शेतकऱ्याकडे क्वचित ऊस न्यायला ट्रक येई. तो ट्रक पहायला सगळा गाव जाई. अशावेळी मालकाचाच काय पण त्या ट्रकमधे उसाच्या मोळ्या टाकणाऱ्या मजूरांचादेखील रुबाब औरच असायचा.
आमच्या गावातील ऊस तोडणार्या मजुरांनी यावेळी दुसर्या मुकादमाच्या टोळीत सामील व्हायला नकार दिला. त्याचं कारण आमच्या गावातील पुढारी हिंदूराव. त्यानं आपली स्वतःची टोळी बनवली आणि स्वतः मुकादम बनला. सारे मजूर जमा करून गावातील ऊस पहिल्यांदा तोडला. मग आसपासच्या गावांतून ऊसतोडणीसाठी जायला लागला. हा हिंदूराव म्हणजे एक अजबच व्यक्ती होता. पेशवाईत असता तर साडेतीन ऐवजी चार शहाणे असं म्हणाले असते. आधीचे साडेतीन आणि हा अर्धा शहाणा. बरं हा अर्धा शहाणा तरी नीट होता का, तर नाही! याची बायको लोकांच्या शेतावर मजुरी करायला जायची. आणि हा गावातल्या पारावर बसून पत्ते खेळायचा. एका रात्रीत लक्षाधीश होण्याची स्वप्ने बघायचा. त्याच नादाने मटका, लॉटरीची तिकीटे विकणे हेही करायचा. घरात बायकोचा मार खायचा आणि बाहेर जाऊन गावातील भांडणं सोडवायला पुढं असायचा. निवडणूका म्हणजे तर हिंदूरावची दिवाळी! विद्यमान आमदाराच्या आणि भावी इच्छुक आमदारांच्या पुढे जाऊन त्यांना नानातर्हेने आपलं वजन दाखवून पैसे उकळायचा. गावातील सिमेंट रोडची आणि गटारांच्या बांधकामाची कंत्राटे मिळवणं आणि त्यात पैसे खाणं हा त्याचा आचारधर्म होता. तरीही लोक त्याच्या मागे जात.
अशा या हिंदूरावनं मुकादम म्हणून कामाला सुरूवात केली. मग गावातील सारे मजूर त्याच्या टोळीत गेले. चांगलं काम करून त्यांनी लौकिकही मिळवला. सारेजण त्यांची वाहवा करायचे. हिंदूरावनंही मजुरांना पैसे देताना गडबड घोटाळा केला नाही. सारे आनंदी होते.
एकेदिवशी सकाळी शेजारील गावचा मुकादम आमच्या गावात आला आणि त्यानं हिंदूरावला एका ठिकाणी टोळी घेऊन जायला सांगितलं. त्याची टोळी सध्या दूरपर्यंत गेल्यामुळे आणि ऊस तातडीनं तोडायचा असल्यानं त्यानं हिंदूरावला ही अॉफर दिली. हिंदूरावनंही त्याला होकार दिला आणि एडवान्स घेऊन आपली टोळी घेऊन लगेच निघाला. कुणाचीतरी सेकंडहँड कमांडर जीप होती. तीमधे बसून सारेजण जात असत. रात्री उशीरा त्या गावात ही टोळी पोहोचली. त्यांना शेतावर मुक्काम करायचा होता.
गावच्या पाटलांचा पाच एकरातील ऊसाचा फड बघून भरपूर मजुरी मिळणार या आशेनं ते सारेजण खूश झाले. "कितीजण हायसा तुमी? "पाटलांनी मिशीवरून हात फिरवत विचारलं.
"आमी समदेजणं मिळून सोळा जण हावोत जी. "
" पाच एक्कर ऊस हाय, किती दिसात तोडणार? "
"व्हयील कि मालक, दोन-तीन दिसात!"
"दोन का तीन? का चार दिस लावणार? "
पाटलाचा दरारा बघून सारेच गपगार झाले. आता माघार घेता येत नव्हती. शेवटी जे व्हायचे ते होईल असा विचार करून हिंदूराव म्हणाला, "मालक, दोन दिसात पार करतु !"
"भले शाब्बास! तुमी दोन दिसात जर ऊस पार केला तर रातीचं जेवण माझ्याकडून. लागा कामाला! "
पाटलानं अॉफर दिली आणि सगळेजण उत्साहानं कामाला लागले.
बघता बघता दुसरा दिवस बुडत आला. हिंदूराव आणि त्याच्या टोळीने सगळा ऊस तोडून ठेवला होता.रात्रीची जेवणे करून रातोरात तो ऊस ट्रकमधून भरून कारखान्यात पाठवायचा होता.
रात्रीचे आठ वाजायला आले तरी अजून पाटलाकडून येणार्या जेवणाची काहीच खबर नव्हती. पाटलाकडची कोंबडी खायला मिळणार म्हणून पक्या तर नाचायला लागला होता. सर्वजण आतुर झाले होते. साडेआठला पाटलाचा गडी डोक्यावर एक गाठोडं घेऊन आला. पक्यानं घाईघाईनं त्याच्या समोर जात त्याच्या डोक्यावरील ओझं खाली घेतल. ओझं ठेवून गडी निघाला. मागोमाग पाटील आले.
" गड्यानू, काम तर बेश्ट झालंय! आता जेवण करून घ्या अन् रातोरात ऊस तेवडा भरून द्या. "
"व्हय जी मालक, आज रातच्याला भरून देताव."
मजुरीचे पैसे हिंदूरावच्या हातात देऊन पाटील निघून गेले आणि उत्साहात सारेजण गाठोड्यावर तुटून पडले. पाटलानं पाठवलेली कोंबडी खायला सारेजण आतुर झाले होते. ईसानं गाठोडं उघडलं आणि पालथी मूठ तोंडावर आपटत एकच बोंब ठोकली.
"आरं काय झालं? "हिंदूराव पुढं झाला आणि पक्यानं गाठोडं उघडून सर्वांना दाखवलं.
एक मोठं पातेलं भरून भाकरीचं पीठ आणि अर्धा चिरलेला दुधी भोपळा!
कोंबडी खाण्याच्या आशेने जमलेले ते सर्वजण हवा गेलेल्या फुग्याप्रमाणे चेहरे करून एकमेकांच्या तोंडाकडे पहायला लागले.
"च्या आयला ह्या पाटलाच्या..! भिकारी समजला काय आम्हाला..? "पक्यानं शेलक्या शब्दात पाटलाचा उद्धार सुरू केला.
शेवटी रात्री दहाच्या सुमारास तयार केलेल्या भाकरी आणि भोपळ्याची भाजी खाता खाता ईसानं पक्याला डिवचले, "कारं पक्या, कशी काय वाटली पाटलाचा कोंबडी? आवडली का? "
त्याच्याकडं रागानं बघत पक्या म्हणाला, "पाटलाची कोंबडी लै मस्त हाय! आता बघ तू फक्त कसा ह्या कंजूष पाटलाला घोडा लावतो..! "
"मायला, बोकड राहीला कमीतकमी कोंबडीतरी खाऊ घालंल म्हणून दिसभर राबलो, पण बेन लै चिकट निघालं. आता ह्याला आपला हिसका दाखवलाच पायजे..! "हिंदूरावनं निर्णय घेतला.
सुमारे साडेअकराच्या सुमारास कारखान्याचा ट्रक आला आणि पेट्रोमॅक्सच्या दोन बत्त्या आणि ट्रकचे हेडलाईन एवढ्या प्रकाशयोजनेवर ऊस भरायचं काम सुरू झालं. नाही म्हणायला टिपूर चांदणं पडलेलं होतं आणि इकडं हिंदूरावनं टोळीचे दोन भाग केले. दोघांना जबाबदारी वाटून दिली आणि काम सुरू झालं. पहाटे चार साडेचारच्या सुमारास काम संपलं आणि ऊसानं भरलेला ट्रक कारखान्याकडं रवाना झाला. आपला पसारा आवरून लगबगीनं जीपमधून बसून हिंदूराव आणि कंपनी गावाकडं निघून गेली.
सकाळी सहाच्या सुमारास पाटील ऊसाच्या फडात आले. ऊसाचा फक्त एकच ट्रक भरला हे ऐकल्यावर ते चक्रावून गेले. असं कसं झालं? ऊस तर दोन ट्रक होईल असा अंदाज होता मग एकच ट्रक कसा भरला आणि मग बाकीचा ऊस कुठं गेला?
विहीरीच्या दिशेनं त्यांचा गडी बोंबलत पळत आला. काय आहे म्हणत पाटील विहीरीकडे गेले आणि समोरचं दृश्य बघून उभ्याउभ्याच चक्कर येउन कोसळले. पाटलांची प्रचंड मोठी विहीर ऊसाने काठोकाठ भरली होती.
प्रतिक्रिया
24 Aug 2020 - 7:32 am | Gk
छान
24 Aug 2020 - 8:09 am | प्रमोद देर्देकर
मस्त हो गोविंदराव गावरान कथा आवडली.
मिपावर स्वागत.
येऊ द्या तुमच्या गावरान कथा अजून.
आम्हाला मराठवाडा, विदर्भ येथे अजून प्रत्यक्ष भेट देता आलेली नाही ती तुमच्या गोष्टीच्या रूपानं ओळख होईल की.
24 Aug 2020 - 8:50 am | गणेशा
छान..
लिहीत रहा.. वाचत आहे..
24 Aug 2020 - 10:32 am | Bhakti
कथा छान आहे.
24 Aug 2020 - 3:28 pm | टर्मीनेटर
कथा आवडली.
24 Aug 2020 - 3:48 pm | वामन देशमुख
कथेच्या शेवटचा किंचितसा अंदाज आला होता आणि मग शेवटचे वाक्य वाचून मस्त हसलो. कथा आवडली.
अशी कामे करणाऱ्या, पक्यासारख्या माणसाला मराठवाड्यात इपितर म्हणतात.