"चैत्र"

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in जनातलं, मनातलं
20 Nov 2008 - 1:22 am

कै. जी ए कुलकर्णी हे नाव मराठी वाचकांना एक महत्त्वाचे कथालेखक म्हणून चांगले परिचित आहे. त्यांनी लिहीलेल्या सुमारे शंभरेक मराठी कथा हा , आजही वाचक आणि अभ्यासकांकरता वाचनाचा , चिंतनाचा , अभ्यासाचा, विषय आहे.

जीएंनी त्यांच्या सुरवातीच्या काळात लिहिलेली एक कथा म्हणजे "चैत्र". या कथेवर बनविलेला एक छोटासा चित्रपट बघण्याचा योग अलिकडे आला. या चित्रपटाबद्दल थोडे आपल्या मित्रमैत्रिणिंना सांगावे म्हणून या लिखाणाचा प्रपंच. सुरवातीला मूळ कथेबद्दल.

पुढील परिच्छेदांमधे आणि त्यानंतरच्या विवेचनामधे कथानक आणि त्याचे प्रमुख धागेदोरे उघड करत आहे. ज्याना हा चित्रपट पहायचा असेल आणि पहाताना रसभंग होऊ द्यायचा नसेल त्यानी वाचू नये.

जीएंच्या , प्रसंगी लघुकादंबर्‍यांइतक्या मोठ्या आकाराच्या आणि खोलीच्या कथांच्या मानाने ही कथा खूपच छोटी आहे. आधी म्हण्टल्याप्रमाणे, कथालेखक म्हणून आपल्या संपूर्ण शक्तिनिशी लिहिण्याचा काळ अजून यायचा होता. त्या काळातली ही कथा. आयुष्यभर आपल्या लिखाणातून जी एंनी आपल्या आयुष्याबद्दल, त्याच्या अर्थाबद्दल , माणूस म्हणून जगताना भोगाव्या लागलेल्या दु:ख-वेदनांबद्दल लिहीले. लेखक म्हणून सुरवातीच्या काही वर्षांनंतर त्यांच्या कथांचे स्वरूप गुंतागुंतीचे होत गेले, त्यातील दु:खाच्या छटा जास्त जास्त गडद होत गेल्या. आणि , नियती म्हणा , भागधेय म्हणा, त्याच्या वरवंट्याखाली पिचतानाही आपला अभिमान , आपले सत्त्व न हरवणारी माणसे त्यांनी रंगवली. प्रस्तुत कथेतील कथानक हे , त्यांच्या पुढील प्रवासाच्या पाऊलखुणा दाखविणारेच आहे.

कथेचा निवेदक आहे एक साताठ वर्षांचा , गावातल्या एका गरीब (बहुदा ब्राह्मणी) कुटुंबात वाढणारा एका मुलगा. काळ : बहुदा आजपासून सत्तरेक वर्षांपूर्वीचा. कुटुंबात माणसे तीनच. आई-वडील आणि हा छोटा मधू. कथा सुरु होते तेव्हा चैत्र महिना चालू आहे आणि घराघरांमधून हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू आहेत. रोज कुठे ना कुठे कार्यक्रम असतो. या छोट्याशा गावातलीच एक बाई घराघरांमधे जाऊन "आजचे हळदीकुंकू कुलकर्ण्यांकडे , आजचे हळदीकुंकू नाईकांच्या वाड्यावर" अशी दवंडी पिटत जाते. रोज संध्याकाळी सवाष्णी एकमेकांच्या घरी आपापल्या पोरांना घेऊन जातात.

छोटा मधूही नाईकांच्या वाड्यावर आईबरोबर जातो. हा भला थोरला वाडा. मोठी मोठी जाजमे, हंड्या-झुंबरे , अत्तरांचा आणि वेण्यांचा घमघमाट. इतर बायकांबरोबर मधुची आई ओटी भरवून घ्यायला बसते. थोरामोठ्यांकडचा मोठा समारंभ. गर्दी. या गर्दीत इतर पोरांबरोबर खेळतानाही मधूचे लक्ष आईकडे आहे. नाईकबाई एका नोकराणीबरोबर फिरत सगळ्यांची ओटी भरतात. मधूच्या आईची ओटी भरायची वेळ आल्यावर त्यांना वगळून पुढे जातात. मधूची आई वाटा पाहाते आणि शेवटी मालकीण बाईंकडे जाते नि त्याना आठवण करून देते. मालकीण बाईंचा समज झालेला असतो की यांची ओटी भरलेली असतानाही , थोडे आणखी धान्य मिळण्याकरता ही बाई परत पदर पसरून बसली. ती मधूच्या आईचा अपमान करते. एक अवाक्षर न बोलता आई इतकेच म्हणते , की ओटी म्हणजे सवाष्णीचा मान आहे. तो राखण्याकरता तरी ओटी भरा - वाटले तर एक दाणा टाका. न राहवून नाईकबाईची सासूही तसे करायला आपल्या सुनेला विनविते. पण शेवटी मधू आणि आई रिक्तहस्ते घरी परततात.

घरी आल्यावर रात्री एकही शब्द न बोलता आई मधू आणि त्याच्या वडिलांना जेवायला घालते. दुसर्‍या दिवशी ती आपले काही दागिने काढून मधुच्या वडिलांना देते आणि त्याचे पैसे करून एका मोठ्या हळदी कुंकवाची तयारी करायला सांगते. वडील काहीही न विचारता हो म्हणतात. आई त्यांना विचारतेही : "तुम्हाला का असा प्रश्न नाही पडला ?" वडील शांतपणे म्हणतात : "स्वतःकरता कधीही काहीही न मागणारी तू काहीतरी करायला सांगते आहेस. त्यामागे नक्की काहीतरी आहे. मी कशाला विचारू ? उद्या तू म्हणालीस की निखार्‍यावरून चालत जा तर तेही करेन." हे सारे मधू पहातो , नोंदवतो.

दुसर्‍या दिवशी मधूकडे आजवर झाले नसेल इतके मोठे हळदीकुंकू. गावभर दवंडी गेलेली असते - नाईकांकडेही. समारंभ खूप वेळ चालतो. एरवी घराचे मालक असणारे मधूचे बाबा त्या संध्याकाळपुरते घराबाहेर. मधूची आई सगळ्यांची रितीने ओटी भरते , विचारपूस करते. सगळ्या बायकांच्या नजरेत तिच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे. आईची एक नजर अर्थातच दाराकडे. सगळ्या येऊन गेल्या ; पण नाईक बाई नाहीत. शेवटी खूप उशीरा सासू नि सून आपल्या बग्गीतून हजर होतात. मधूच्या छोट्याशा घरातल्या सजावटीने , आदबशीर , घरंदाज आतिथ्याने भारल्यासारख्या होऊन जातात. भरपूर मोठी ओटी भरून घेताना नाईक सूनबाई इतकेच म्हणते "तुमच्याकडे होते होय हळदीकुंकू ? मला कल्पना नव्हती." दोघी निघतातच.

बग्गीत सून बसलेली असताना सासू क्षणभर आईपाशी येते नि म्हणते : बाई, मनात तळपट धरू नकोस. आता माझं राज्य नाही घरात. नवीन माणसं आली. मी झाल्या प्रकाराने लाजलेले आहे. जमेल तेव्हा याची भरपाई करेन.
यावर मधुची आई जे म्हणते ते अगदी साधेच - पण सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे. ते सांगते : " मी तर झाला प्रकार केव्हाच विसरले. मला त्याचे काहीच महत्त्व नाही. पण त्यावेळी माझा मुलगा समोर होता. त्याला झालेल्या प्रसंगाची आठवण नेहमी राहील. हा हळदीकुंकू सोहळा त्याच्यासाठी. " दूर अंधारात मधू हे सर्व पहातो. बग्गी हलते.

वर्ष उलटते. पुन्हा चैत्र येतो. मधूच्या घरासमोर एके दुपारी बग्गीचा आवाज आल्यावर आई पटकन आत जायला वळते. मधूला सांगते : "नाईकबाई येतील. त्यांना सांग मी न्हाणीघरात आहे. जे सांगतील ते फक्त ऐक. जाताना फक्त करंडा दे कुंकवाचा त्यांना. " मिनिटाभरात सासूबाई दारात येतातच. मधू त्यांना ठरल्याप्रमाणे सांगतो. त्या आलेल्या असतात हळदीकुंकवाचे निमंत्रण द्यायला - जातीने , सर्वात पहिल्या घराचा मान द्यायला. निरोप देतात , कुंकू लावून निघून जातात.

मधू आत येतो. आई त्याला म्हणते : "मधू , आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी. " मधूला काही उमगत नाही. माजघराच्या अंधारात उभ्या आईला म्हणतो : "म्हणजे आपले बाबा गेले हे त्यांना कळू द्यायचे नव्हते होय ?" आणि इतका वेळ आपल्या गंभीर , ताठ चेहर्‍याने वावरणार्‍या आईला हुंदका येतो.
कथानक भाग संपूर्ण

हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे क्रांती कानडे यांनी. आईची भूमिका केली आहे सोनाली कुलकर्णी यांनी. नाईक सासूचे काम लालन सारंग यांचे.

संपूर्ण चित्रपटाची हाताळणी मूळ कथेशी इमान राखणारी , त्या कथेच्या घरंदाजपणाशी इमान राखणारी झाली आहे. कुठेच भडक, बटबटीतपणा नाही. झालेला अपमान , त्याची केलेली भरपाई , साताठ वर्षाच्या मुलावर नकळत घडलेले संस्कार या सगळ्या गोष्टी उत्तम रीतीने टिपल्यात. आई वडीलांमधील शालीन , घरंदाज स्नेहाचे चित्रण , कोसळलेल्या संकटाला धीराने सामना देताना इतरांवर आणि स्वतःवर "चिखल उडू न देण्याची " घेतलेली काळजी आणि हे यच्च्यावत टिपणारे एक बालमन. सत्तर वर्षांपूर्वीच्या ब्राम्हणी घरातले वातावरण , पेहराव , हंड्या-झुंबरे. एकही सैल , अनावश्यक संवाद नाही. मी कानडे यांना सलाम करतो. पालेकरांनी त्यांच्याकडून खूप शिकावे अशातली गत. सोनाली कुलकर्णी यांच्याबद्दल मला थोडी शंका होती. बट शी हॅज नेल्ड द रोल.

हा , केवळ ३० मिनिटांचा चित्रपट दृष्ट लागण्यासारखा झाला आहे.

कथानाट्यवाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

20 Nov 2008 - 2:29 am | लिखाळ

चैत्र या नव्या चांगल्या चित्रपटापदद्दल कळवलेत म्हणून आभार.

चित्रपट लवकरच पहायला मिळेल अशी आशा असल्याने मधले वर्णन वाचले नाही. आपण आधीच तसे सूचित केल्याबद्दल आभार. चित्रपट पाहिला की येथे लिहिनच.
-- लिखाळ.

आजानुकर्ण's picture

22 Nov 2008 - 2:34 am | आजानुकर्ण

हा प्रतिसाद येथे देण्याचे कारण तो पहिल्या पानावर राहावा एवढेच आहे. लिखाळ यांच्या वरील प्रतिसादाशी त्याचा संबंध नाही.

आपला,
(क्षमस्व) आजानुकर्ण

आधी म्हण्टल्याप्रमाणे, कथालेखक म्हणून आपल्या संपूर्ण शक्तिनिशी लिहिण्याचा काळ अजून यायचा होता. त्या काळातली ही कथा.

ही कथा जीएंनी कधी लिहिली आहे याचा तपशील माझ्याकडे सध्या उपलब्ध नसला तरी, कुसुमगुंजा हा जीएंच्या शेवटच्या संग्रहांपैकी एक असावा. ह्या संग्रहाचे कामही पुरूषोत्तम धाक्रस आणि आप्पा परचुरे यांनी केलेले आहे. असे लिहिण्याचे कारण हे की त्यावेळी जीएंनी [बिघडलेल्या तब्येतीमुळे(?)] या कामात सहभाग घेतला नव्हता. या संग्रहाचे व त्यातील कथांचे उल्लेख जीएंच्या पत्रांमध्येही फारसे नाहीत (म्हणजे तो बराच नवीन आहे.) कुसुमगुंजानंतर मला वाटते हातकणंगलेकरांनी संपादित केलेला डोहकाळिमा - ज्यात कोणत्याही नव्या कथा नाहीत - आणि सोनपावले - ज्या कथा बहुधा जीए गेल्यानंतरच प्रकाशित करण्यात / करता आल्या, हे दोनच स्वतंत्र कथासंग्रह आहेत. (बिम्मची बखर आणि मुग्धाची रंगीत गोष्ट बद्दल काहीच आठवत नाही.)

'सोनपावले'मधील कथा ह्या जीएंच्या सुरूवातीच्या कथा म्हणता येतील, त्या तशा जाणवतातही. कुसुमगुंजातील कथा ह्या तशा संपूर्ण (किंवा शक्तिनिशी वगैरे) आहेत. त्यात कोणताही नवखेपणा जाणवत नाही. विशेषतः 'निरोप' आणि 'एक मित्र एक कथा 'यांचा ह्या संग्रहातील समावेश पाहिला असता जीएंनी फार नंतर लिहिलेल्या या कथा आहेत हे स्पष्ट समजून येते.

आपला,
(जीएप्रेमी) आजानुकर्ण धाक्रस

चू.भू.दे.घे.

मुक्तसुनीत's picture

22 Nov 2008 - 2:36 am | मुक्तसुनीत

"कुसुमगुंजा" हा शेवटी प्रसिद्ध झालेल्या पैकी एक ही खरी गोष्ट. पण कुसुमगुंजातील कथा, त्यांची भाषा , प्रकृती, त्यांचे विषय पहाता , "सोनपाऊले" सारख्याच याही संग्रहात त्यांच्या जुन्याच कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत असे मला वाटते. माझ्या अंधुक आठवणीप्रमाणे तसे कुठेतरी वाचल्याचे मला स्मरते ; पण अर्थातच संदर्भ जवळ नाही. "निरोप" ही कथा , तुम्ही म्ह्ण्टल्याप्रमाणे एकदम म्च्युअर्ड आहे ; परंतु "एके मित्र एक कथा" किंवा "चैत्र" या सार्‍यावर जी एंच्या पूर्वायुष्याची छाया पडली आहे. एकूण या सगळ्या तेव्हापर्यंत असंपादित असलेल्या कथा होत्या ; त्यात नव्या-जुन्याचे मिश्रण असू शकते. पण "चैत्र" मधे कुठेच वर्षानुवर्षांनी ज्यांची लेखणी धारदार , जास्त जास्त गडद चित्रे रंगवाणारी बनली ते जी ए दिसत नाहीत.

एकूण हा मामला थोडा धूसर बनला आहे .

आजानुकर्ण's picture

22 Nov 2008 - 3:10 am | आजानुकर्ण

'एक मित्र एक कथा'चा उल्लेख येथे करण्याचे कारण असे की या कथेत जीएंनी घेतलेल्या चित्रपटांची, दिग्दर्शकांची नावे ही तशी नवी आहेत. माझ्या अंदाजानुसार जीएंनी लेखन वयाच्या २०व्या वर्षाच्या आसपास सुरु केले. त्यावेळी हे चित्रपट (द लोनली रोड ऑन द पाईन??? वगैरे) आलेले नव्हते. कथेत असलेली लेखकांची, व पुस्तकांची नावे पाहता ते त्या वयात शक्यही नव्हते. (सुरूवातीला जीए बेळगांवला होते नंतर ते कर्नाटक विश्वविद्यालयात धारवाडला आले - ज्यानंतर त्यांचा ग्रंथालयांशी जवळचा संबंध आला.

मात्र हा संग्रह असॉर्टेड स्वरुपाचा असला तरी सोनपावलेतील आणि कुसुमगुंजातील कथांमध्ये लक्षणीय फरक आहे हे नमूद करावेसे वाटते. अर्थात माझ्याकडे दोन्हीही कथासंग्रह आता उपलब्ध नाहीत त्यामुळे हे अंधारात तीर मारण्यासारखे आहे.

आपला,
(अनेक संकेतस्थळे एक सदस्य) आजानुकर्ण

परंतु "एके मित्र एक कथा" किंवा "चैत्र" या सार्‍यावर जी एंच्या पूर्वायुष्याची छाया पडली आहे.

मला नेमके आठवत नाही परंतु जीए एक वाक्य नेहमी लिहीत असत . मी एकच गोष्ट वारंवार सांगत आहे. मात्र प्रत्येक वेळी मी दुःखाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे अशा आशयाचे ते काहीसे वाक्य होते. केवळ चैत्रच नव्हे तर कैरी, माणूस नावाचा बेटा, बऱ्याच प्रमाणावर राधी या कथाही पूर्वायुष्यावरच आधारित आहेत असे वाटते.

मी फार जास्त बोलत आहे. कमीजास्त झाल्यास माफ करावे.

आपला,
(जीए कोळून प्यालेला) आजानुकर्ण

मुक्तसुनीत's picture

22 Nov 2008 - 3:12 am | मुक्तसुनीत

मी फार जास्त बोलत आहे. कमीजास्त झाल्यास माफ करावे.

अरे वर जे बोलतो आहेस त्याबद्दल नि तसे बोललास तर जितके बोलशील तितके कमी आहे रे ! :-)

आजानुकर्ण's picture

22 Nov 2008 - 3:16 am | आजानुकर्ण

आणि 'रात्र झाली गोकुळी'तील घर हे जीएंचे धारवाडमधले घर. तुतीमधील आबाही जीएंचे वैयक्तिक आयुष्य.

आपला,
(अवांतर) आजानुकर्ण

मुक्तसुनीत's picture

22 Nov 2008 - 3:19 am | मुक्तसुनीत

"कैरी" हा "तुती" या कथेचा दुसरा भाग मित्रा !

आजानुकर्ण's picture

22 Nov 2008 - 3:25 am | आजानुकर्ण

तेच म्हणणार होतो. (गोड खायला मिळणार बघा आता).

आरभाट आणि चिल्लर, कैरी, तुती आणि माणूस नावाचा बेटा हे शेजारी शेजारी ठेवले तर हत्तीला चाचपडणाऱ्यांसमोर एक संपूर्ण प्रतिमा उभी राहील.

आपला
(चिल्लर) आजानुकर्ण

एक कूटप्रश्नः जीएंच्या कथांमधील नायकाचे नाव हे अनेकदा मधू-माधव असे असते व नायिकेचे कमल-कमळी असे हे लक्षात आले आहे का?

आपला,
(कर्ण म्हणे आता उरलो कोड्यांपुरता) आजानुकर्ण

कोलबेर's picture

22 Nov 2008 - 3:37 am | कोलबेर

जीएंच्या कथांमधील नायकाचे नाव हे अनेकदा मधू-माधव असे असते व नायिकेचे कमल-कमळी असे हे लक्षात आले आहे का?

हे नव्हते लक्षात आले!

त्याचबरोबर आई ही नेहमी अतिशय सात्विक साने गुरुजींच्या कथेप्रमाणे असते, बहीण बर्‍याचदा छळ सहन करते, वडील हतबल आणि बायको मात्र बदचलन असते.

आजानुकर्ण's picture

22 Nov 2008 - 3:39 am | आजानुकर्ण

जीएंचे आयुष्य पाहता यामागील कार्यकारणभाव समजण्यासारखा आहे. किंबहुना आई-बहीण-मावशी वगळता इतर सर्व बायकांचे त्यांनी जनरलायझेशन केले आहे

आपला
(निष्पक्ष) आजानुकर्ण

नंदन's picture

22 Nov 2008 - 4:22 am | नंदन

'शॅलो पीपल डिमांड व्हरायटी - बट आय हॅव बीन रायटिंग द सेम स्टोरी थ्रूआऊट माय लाईफ, इच टाईम ट्राइंग टू कट निअरर द एकिंग नर्व्ह' हे ते जीएंचे आवडते वाक्य. बाकी सोनपाऊले घरी आहे, एखादा संदर्भ हवा असेल तर शोधून सांगू शकेन.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सर्किट's picture

22 Nov 2008 - 4:25 am | सर्किट (not verified)

शॅलो पीपल डिमांड व्हरायटी

मागे कुणीतरी आम्हालाही वैविध्यपूर्ण लिहिण्याचा आग्रह करीत होते. त्यावेळी जी एंचे हे वाक्य माहिती असते, तर ?

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

आजानुकर्ण's picture

22 Nov 2008 - 5:16 am | आजानुकर्ण

नंदनशेठ ये हुई ना बात. हेच ते वाक्य. आमच्या दातात अडकलेली पेरूची बी काढण्यात नंदनशेठ नेहमी मार्गदर्शन करतात.

'सोनपाऊले' सोनपावले मध्ये शेवटी जीएंच्या समग्र साहित्याचा कालखंड दिला आहे. त्यात चैत्र बाबत काय म्हटले आहे?

आपला,
(सनावळी) आजानुकर्ण

सोनपावले की सोनपाऊले? माझ्या मते सोनपावले.

आजानुकर्ण's picture

22 Nov 2008 - 5:27 am | आजानुकर्ण

वरील यादीत जीएंच्या इतर कथाही देता येतीलच. पण यात लक्षणीय म्हणजे अंजन ही कथा. जीए फारसे कोणाशी बोलत नसत मात्र कॉलेजच्या एका शिपायाशी त्यांच्या नेहमी गप्पा होत असत. त्या गप्पा आणि जीएंचे स्वतःचे गूढकथांचे असलेले वाचन यावर आधारित असलेल्या अंजन या कथेचे नाव घ्यावेच लागेल. या शिपायाच्या व्यक्तीमत्त्वाबाबत 'उघडझाप' या पुस्तकात म.द.हातकणंगलेकर यांनी विस्ताराने लिहिले आहे.
स्वतः जीएंनी स्मशानात व घरामध्ये काही प्रयोग केल्याचे/पाहिल्याचे वाचले आहे.

आपला
(जीएभक्त) म. द. आजानुकर्ण

नंदन's picture

22 Nov 2008 - 9:40 am | नंदन

'सोनपावले'च्या शेवटी दिलेल्या सूचीत सापडलेला जी.एं.च्या कथांचा आणि पुस्तकांचा प्रकाशनक्रम असा -

निरोप - ५७ [पारवा]
माणूस नावाचा बेटा - ५९ [हिरवे रावे]
रात्र झाली गोकुळी - ५९ [पारवा]
तुती - ६१ [हिरवे रावे]
चैत्र -- ?? - मराठवाडा दिवाळी अंक [कुसुमगुंजा]
राधी - ६५ [रक्तचंदन]
अंजन - ६७/६८ [काजळमाया]
कैरी - ७३ [पिंगळावेळ]
एक मित्र एक कथा - ८७ [कुसुमगुंजा]

डोहकाळिमा - ८७
अरभाट आणि चिल्लर - ८८
कुसुमगुंजा (कुसुम्बगुंजा हे अभिप्रेत नाव) - ८९
सोनपावले - ९१

* 'एक मित्र एक कथे'चा लेखनकाल सापडला नाही. १९८७ हे तिचे प्रकाशनवर्ष झाले. 'सोनपावले'च्या प्रस्तावनेत जी. एं.च्या कपाळवाटा आणि वहाणा सारख्या (तोवर) अप्रकाशित कथांचा उल्लेख आहे, परंतु या (एक मित्र एक कथा) कथेचा किंवा तिच्या लेखनकालाचा नाही. चैत्र आणि फेड या कथांचेही प्रकाशनवर्ष सूचीत दिलेले नाही, पण मराठवाडा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या जी.एं.च्या इतर कथांचा प्रकाशन कालावधी पाहता त्या ५९-६२ या कालावधीत प्रसिद्ध झाल्या असाव्यात, असा एक किरकोळ अंदाज बांधता येऊ शकेल.

** सोनपावलेतली सर्वात पहिली कथा (जुना कोट) १९४० सालातली (म्हणजे वयाच्या १७ व्या वर्षी लिहिलेली) आहे. आता 'चैत्र'मुळे लागलेला वैशाखवणवा विझल्यासारखा वाटतो आहे तेव्हा त्या कथेतले शेवटची २-३ वाक्ये उद्धृत करण्याचे धाडस करतो :). ऐन बहरात असलेल्या खांडेकरांचा जीएंच्या ह्या सुरूवातीच्या काळातल्या (कदाचित पहिल्या) कथेवर पडलेला स्पष्ट प्रभाव जाणवला, एवढेच ही वाक्ये येथे देण्यामागचे कारण. त्यांची पुढची वाटचाल, अर्थातच यापेक्षा पूर्ण निराळी आहे. (लताबाई आणि नूरजहाँ यांचे उदाहरण येथे समांतर ठरावे.)

मी बाहेर पाहिले!
लिंबाच्या साली उन्हात चमकत होत्या. जणो म्हणत होत्या,
"बाबारे, जीवनसर्वस्व त्यागात आहे, स्वार्थात नव्हे."
शीला आरशात पाहून कुंकू लावून घेत होती !!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आजानुकर्ण's picture

22 Nov 2008 - 4:47 pm | आजानुकर्ण

नंदनशेठ,

कालक्रमाबद्दल धन्यवाद. एक मित्र एक कथा ही फार उशीराची आहे यात शंका नव्हतीच. चैत्रही बरीच नंतरची आहे. (जीएंच्या शब्दांत सांगायचे तर हिरवट दिवसांनंतरची)

सोनपावलेतल्या खांडेकरी छापाबद्दल तुम्हाला माहितीच असेल की खांडेकरांच्या कथांचा सुरूवातीच्या काळात असलेला प्रभाव याबद्दल जीएंनी फार ठिकाणी लिहिले आहे.

वैयक्तिक त्यांना खांडेकर प्रिय असले तरी त्यांची लेखनशैली-लेखन प्रिय नव्हते. त्याबाबतचे अनेक बोचरे, औपरोधिक सूचक उल्लेख कथांमध्ये तर "हरीभाऊंनी मराठी साहित्यात आणून टाकलेल्या सामाजिक गाठोड्यांचा शेवटचा फेरीवाला" असे थेट उल्लेख पत्रांमध्ये सापडतील. (अर्थात घरातील एखादा वयोवृद्ध, बुजुर्ग गृहस्थ असावा असे मला त्यांचे प्रेमळ अस्तित्तव वाटते असेही खांडेकरांबाबत जीएंनी म्हटलेले आहेच)

लक्षणीय बाब म्हणजे सोनपावलेतील कथा जीए गेल्यानंतरच प्रकाशित करणे शक्य झाले. स्वतःचे काही कमअस्सल (तुलनात्मक अर्थाने - इतर कथांचा दर्जा पाहता यातील कथा नवख्या आहेत हे सहज कळते) प्रसिद्ध व्हावे हे त्यांनी मान्य केले नसते.

आपला
(तौलनिक) आजानुकर्ण

मुक्तसुनीत's picture

20 Nov 2008 - 2:38 am | मुक्तसुनीत

हा सिनेमा "आवर्तन" नावाच्या डीवीडी माध्यमातील दिवाळी अंकात आहे. डिव्हीडी विकत घ्यायची असल्यास "बहुगुणी" या अमेरिकास्थित सदस्यास संपर्क करावा. किंमत १५ डॉलर्स.
"आवर्तन"बद्दल थोडे लिहायचे होतेच. कदाचित वेगळ्या धाग्यात लिहीन.

आवर्तन बद्दल जरूर लिहा.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Nov 2008 - 12:44 pm | बिपिन कार्यकर्ते

खूप आधी वाचलेली होती, अर्थात आवडलेली होतीच. पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. आता परत एकद वाचायची इच्छा होते आहे. मिळवून वाचली पाहिजे.

जीएंच्या कथेवर आणि तो सुद्धा ३० मिनिटाचा लघुपट काढणे हे आव्हानात्मकच आहे. अमेरिकेबाहेर कसा बघता येईल हा चित्रपट?

इथे खाली बर्‍याच लोकांची मूळ कथेबद्दलची मतं वाचली. एखाद्या कथेच्या आशयाबद्दल किंवा त्यात मांडलेल्या विचारांबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात. पण जीएंच्या भाषेबद्दल, शब्दकळेबद्दल दुमत असायचे कारण नाही. वाचकाच्या मनाची पकड घेणारी, विलक्षण प्रवाही अशी भाषा मला तरी आवडते.

बिपिन कार्यकर्ते

आनंदयात्री's picture

20 Nov 2008 - 4:14 pm | आनंदयात्री

इथे खाली बर्‍याच लोकांची मूळ कथेबद्दलची मतं वाचली. एखाद्या कथेच्या आशयाबद्दल किंवा त्यात मांडलेल्या विचारांबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात. पण जीएंच्या भाषेबद्दल, शब्दकळेबद्दल दुमत असायचे कारण नाही. वाचकाच्या मनाची पकड घेणारी, विलक्षण प्रवाही अशी भाषा मला तरी आवडते.

असेच म्हणतो. सहमत.
मुक्तसुनितांचे धन्यवाद.

समिधा's picture

26 Feb 2009 - 10:12 am | समिधा

हा चित्रपट apalimarathi.com वर आहे .मी बघितला खरच सुंदर आहे.
बिपीन भाऊ तुम्हाला हा चित्रपट बघता येइल.

धनंजय's picture

20 Nov 2008 - 2:41 am | धनंजय

आईकडचे स्त्रीधनही गेले, हा बारीक तपशील चराचरा चिरून जातो. इतक्या कंगोर्‍यांचे कारुण्य वाचताना हालहाल करते.

सुवर्णमयी's picture

20 Nov 2008 - 2:45 am | सुवर्णमयी

मुक्तसुनीत,
मी ही कथा वाचलेली आहे. अतिशय छोट्या कथानकात खूप काही सांगण्याची कला.. जी ए यांच्या लेखनातील मार्मिकता वेगळी सांगायलाच नको. चित्रपट नक्की बघेन.

(कोणतीही टोकाची, विकृत वाटेल इतपत वर्णनाची भूमिका न घेता जी ए यांनी ज्या काही मोजक्या कथा लिहिल्या असे मला वाटते... त्यापैकी ही एक कथा आहे.- त्यांच्या कथा पुन्हा पुन्हा वाचतांना काही तरी नवीन सापडते. त्यांच्या उपमा, रूपके, प्रतिमा यावर वेळा विचार करण्यात अनेकदा कथा बाजूला राहते असे सुद्धा होते. पण मला वाटते तसेच वाटावे असा माझा आग्रह नाही.. )

आजानुकर्ण's picture

20 Nov 2008 - 7:49 am | आजानुकर्ण

कुसुमगुंजातील सर्वच कथा सटल आहेत. त्यातल्या त्यात 'एक मित्र एक कथा' मध्ये जीएंनी त्यांचे स्वतःचे पूर्वग्रह सुंदरपणे कथेत सादर केले आहेत.

आपला,
(अल्पाक्षरी) आजानुकर्ण

कोलबेर's picture

20 Nov 2008 - 2:48 am | कोलबेर

'चैत्र' आणि 'फेड' ह्या साधारण एकाच बॅकड्रॉपवरच्या दोन उत्कृष्ट कथा!!

हा चित्रपट मिळवुन बघायलाच हवा!!

मागे अमोल पालेकर कैरी वरती चित्रपट बनवणार म्हंटल्यावर अशीच उत्सुकता ताणली गेली होती. पण कैरीतील मूळ लहान मुलाचे पात्र बदलुन मुलगी घेतल्याने (ते वर्ष 'बालिका वर्ष' की असले काही असल्याने सरकार दरबारी पुरस्काराच्या अपेक्षेने केले होते म्हणे) पालेकरांविषयीचा आदर खूप कमी झाला आणि चित्रपट कधीच बघीतला नाही.

चैत्र मात्र प्रॉमिसिंग वाटतो आहे.

सर्किट's picture

20 Nov 2008 - 2:54 am | सर्किट (not verified)

मुलाचे पात्र बदलून मुलीचे घेतले तरी कैरी हा एक सुंदर चित्रपट होता. अतुल कुलकर्णीचे काम अतिशय सुंदर होते त्यात.

बघ एकदा.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

आजानुकर्ण's picture

20 Nov 2008 - 7:38 am | आजानुकर्ण

कैरी हा फालतू चित्रपट होता.

कथेच्या एक हजारांशाच्या निम्मे सुद्धा चित्रपटात आले नव्हते. कैरी ही कदाचित पिंगळावेळ मधील (माझ्या मते स्वामी वगळता) जीएंची सर्वोत्कृष्ट कथा आहे. कथा वाचताना किती वेळा घसा चोंदला जातो हे सांगायला नको. पालेकरांचा कैरी पाहताना कितीदा असे वाटले बॉ.

आपला
(कैरीप्रेमी) जी.ए. आजानुकर्ण

सर्किट's picture

20 Nov 2008 - 12:01 pm | सर्किट (not verified)

एखादी कथा चित्रीकरणासाठी योग्य असते, एखादी नसते. जी एंची कैरी वाचताना अनेकदा, ह्यावर चित्रपट कसा होईल, हा विचार मनात येऊन गेला. माझ्या अपेक्षेपेक्षा हा चित्रपट खूपच छान होता, म्हणून मला आवडला. तुम्ही ह चित्रपट बनवला असता तर कसा केला असता ?

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

आजानुकर्ण's picture

20 Nov 2008 - 7:06 pm | आजानुकर्ण

जीएंच्या कथेवर चित्रपट बनवणे हे फारच अवघड काम आहे. मात्र कैरी शक्य नाही.

(कदाचित राधी आणि बळी या कथांवर चित्रपट बनवता आला असता. तोदेखील कथेतील नाट्यमय प्रसंगांमुळे. मात्र तेदेखील बटबटीत झाले असते असे वाटते.)

किंबहुना कैरीच्या चित्रपटरूपांतरासाठी अमोल पालेकरांची निवड ही जीएंनी मान्यता दिल्यानंतर झाली होती हे याबाबतीत नमूद करण्यासारखे आहे. जीएंचा चित्रपट या माध्यमाचा(ही) किती मोठा अभ्यास होता हे त्यांच्या पत्रांवरून कळेलच. जीएंनी त्यांच्या कथांमध्ये किंवा आत्मचरित्रमय वाटावे अशा 'आरभाट' मध्येही चित्रपटांबाबत फारसे लिहिलेले नाही. मात्र मुक्तसुनीत यांनी ज्या 'कुसुमगुंजा' संग्रहातील कथेबाबत येथे लिहिले आहे त्या संग्रहात असलेल्या 'एक मित्र एक कथा' या कथेत जीएंच्या चित्रपटप्रेमाची व या माध्यमातील बारकाव्यांच्या माहितीची एक झलक पाहायला मिळते. (मला वाटते जीएंची हातकणंगलेकर आणि आचवलांशी चित्रपटगृहातच ओळख झाली.)

कैरीबाबत पालेकरांशी होत असलेल्या जीएंच्या पत्रव्यवहारात कैरीतील तुळसा या पात्राच्या व्यक्तीरेखेबद्दल एक प्रसंग आहे. (ज्यांनी कैरी वाचली नाही त्यांनी माफ करावे). चित्रपटाच्या पटकथेत तुळसाचा प्रवेश होतो तेव्हा अंगणात खेळत असलेल्या कथानायकाला ती 'काय रे काय करतोयेस' अशी विचारेल असे पालेकरांनी लिहिले होते. मूळ कथेत हा प्रसंग नाही. चित्रपट माध्यमाच्या संकेतांनुसार चित्रपट रटाळ होऊ द्यायचा नसेल म्हणून पालेकरांनी हा संवाद टाकला असावा. मात्र यावर जीएंनी नेमका आक्षेप घेतला आहे. एक तर तुळसाला त्या मुलाबद्दल काडीचेही प्रेम नाही. आणि पालेकरांच्या सांगितलेल्या संवादातून तिला मुलाबद्दल काहीतरी वाटत आहे हे सूचित होते. जे कथेच्या मूळ गाभ्याशी अप्रामाणिक आहे. तसाच प्रसंग बागेत मोर दिसतात तेव्हा. 'वो तो यूं आते है और चुटकीमे चले जाते है' हा प्रसंग फारच बाळबोध.

अर्थात हे तर केवळ काहीच प्रसंग आहेत. कैरी चित्रपटाची प्रगती होत असताना जीए कदाचित शेवटचे आजारी पडले आणि सुदैवाने चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते नव्हतेच हीच काय ती एक चांगली गोष्ट असे उपरोधाने म्हणावेसे वाटते.

शांताराम बापूंनी 'चानी'चे जे केले त्यापेक्षा थोडे कमी वाईट पालेकरांनी 'कैरी'चे केले असे म्हणता येईल.

आपला,
(चित्रपटसमीक्षक) आजानुकर्ण कणेकर

आजानुकर्ण's picture

22 Nov 2008 - 2:59 am | आजानुकर्ण

फक्त माझेच प्रतिसाद उडवण्याबरोबरच इतर हिणकस प्रतिसादही उडवावेत असे सफाईकामगारांना मी जाहीर आवाहन करतो.

आपला
(मिपावरचा पूर्वाश्रमीचा सफाईकामगार) आजानुकर्ण

कोलबेर's picture

22 Nov 2008 - 3:02 am | कोलबेर

तसेच माझ्या प्रतिसादात नक्की हिणकस (वैयक्तिक शेरेबाजी) काय होते ते देखिल इथले संपादक मंडळ कळवेल का?

आजानुकर्ण's picture

20 Nov 2008 - 7:44 am | आजानुकर्ण

ज्यामध्ये गावात सर्कस आलेली असते ती कथा. फार सुरेख. मात्र कुसुमगुंजा मधली पत्रातून उलगडणारी कथा आणि 'एक मित्र एक कथा' या अप्रतिम.

कुसुमगुंजातील निरोप, आणि लाल डोळ्यांचा पक्षीही सुंदर.

आपला,
(समीक्षक) आजानुकर्ण

सर्किट's picture

20 Nov 2008 - 2:48 am | सर्किट (not verified)

जी एंची मला अतिशय आवडणारी ही कथा. (मागे बहुधा संजोपरावांनी कुठेतरी टंकली होती.)

चित्रपट पहायलाच हवा.

सोनाली कुलकर्णी ही अतिशय गुणी अभिनेत्री आहे.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

चतुरंग's picture

20 Nov 2008 - 2:51 am | चतुरंग

पण चित्रपट नक्कीच बघायचा आहे आणि त्यानंतर कथा वाचावी असे मनात आहे.

चतुरंग

एका मराठी मालिकेत बघीतली होती ही कथा ..त्याला आता खुपच वर्ष झाली.

अर्ध्या तासात नीटनेटकेपणाने ही कथा उभी केली होती. आईची भुमिका आशा काळेनी सशक्तपणाने साकारली होती.

खादाडमाऊ

नंदन's picture

20 Nov 2008 - 4:51 am | नंदन

रसग्रहण. दूरदर्शनवर फार पूर्वी (१९९०-९२ चा सुमार असेल), उत्तम कथांचे चित्रीकरण करणारी एक मालिका लागायची. मोकाशींची 'आता आमोद सुनासि आले' आणि जी.एं.ची ही चैत्र कथा - खादाडमाऊ म्हणतात तसे - तेव्हा पाहिल्याचे आठवते. फक्त आईच्या भूमिकेत आशा काळे नव्हत्या, तर गोट्या मालिकेत गोट्याच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री होती.(स्मरणशक्ती दगा देत नसल्यास)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश's picture

20 Nov 2008 - 12:50 pm | स्वाती दिनेश

गोट्या मालिकेत गोट्याच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री - मानसी मागीकर ?
सुनीतराव,
रसग्रहण आवडले. कथा खूप वर्षांपूर्वी वाचली होती पण आता हा चित्रपट मिळवून पहावाच लागणार असे दिसते आहे.
स्वाती

घाटावरचे भट's picture

20 Nov 2008 - 2:52 pm | घाटावरचे भट

>>गोट्या मालिकेत गोट्याच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री - मानसी मागीकर ?

बरोबर.

रामदास's picture

20 Nov 2008 - 6:59 am | रामदास

आभारी आहे. इकडे सिडी मिळाली तर नक्कीच बघेन हा चैत्रपट.
अर्थात जी.एं.च्या गोष्टीवर सिनेमा बनवायचा हे एक मोठे आव्हानच.
तीस मिनीटाची लांबी आहे म्हणजे कथेला जरापण धक्का न लावता बनवलेला असावा.

प्राजु's picture

20 Nov 2008 - 10:01 pm | प्राजु

खूप छान परिक्षण लिहिले आहे.
चित्रपट पहावाच लागेल असं वाटतं आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2008 - 7:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रपट पाहणे जेव्हा होईल तेव्हा होईल. आपण मात्र डोळ्यासमोर चलचित्र उभे केले.
कथेचे रसग्रहण आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज's picture

20 Nov 2008 - 7:34 am | सहज

गरीबी आली तरी मोठे सण करा, माणुस मेला तरी कळु द्यायचे नाही??/ व्हॉट क्रॅप?? हे म्हणजे १७ वर्षाच्या शरद्चंद्राने देवदास लिहावा व सगळ्यांनी वाहवा करावी तशीच बालीश कथा...

असो.

>आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी.

आणि म्हणे त्यांनी जी ए कोळुन प्यायला. त्यांना समजला. बी. एस.

अवांतर - चैत्रपेक्षा, जुन्या काळातील कथानक असलेला वास्तुपुरुष मला तरी जास्त बरा वाटला. त्यातली आई योग्य ते व तसे संस्कार देउन मोठे करते मुलाला.

मुक्तसुनीत's picture

20 Nov 2008 - 8:23 am | मुक्तसुनीत

सहजरावांचा अभिप्राय रोचक आहे. केवळ त्यांनी कथेच्या (त्यांना कळलेल्या) आशयाला "काय मल-सदृष !" असे वर्णिल्यामुळे मी हे म्हणत नाही ; तर माझा कथानक पोचवण्याचा प्रयत्न किती तोकडा होता हे त्यातून दिसले म्हंणून. जी एंच्याच भाषेत संगायचे तर एखाद्या अस्सल कथेचा सारांश देणे म्हणजे एखाद्या कुलवंत घोड्याचा किंवा अमीर खाँ साहेबांच्या एखाद्या ख्यालाचा सारांश देण्यासारखे आहे :-)

असो. कुठल्याही नाटकृतीचा/कादंबरी/चित्रपट कृतीचा आस्वाद घेताना त्या काळाचा पर्स्पेक्टीव्ह असणे आवश्यक ठरते. "गरीबी आली तरी मोठे सण करा, माणुस मेला तरी क ळू द्यायचे नाही" वगैरे सारख्या गोष्टी आपल्याला आता क्रॅप वाटतात ; परंतु ही मूल्ये ७५ वर्षांपूर्वीची आहेत हे वाचक/प्रेक्षक लक्षात घेईल तर कदाचित त्याला त्या कृतीकडे किंचित जास्त सहानुभूतीने पहाताही येईल.

असो. प्रामाणिक अभिप्रायाकरता मी माझ्या या मित्राचे विशेष आभार मानतो. (यात उपहास नाही. प्रामाणिक अभिप्राय दिला म्हणूनच विशेष आभार. पटले नसतानाही तोंडदेखले "साधु साधु" म्हणणे फार वाईट.)

सहज's picture

20 Nov 2008 - 9:30 am | सहज

>माझा कथानक पोचवण्याचा प्रयत्न किती तोकडा होता हे त्यातून दिसले म्हंणून.
असहमत. अजिबात नाही. मुक्तसुनित यांनी ओळख अतिशय छान करुन दिली आहे व तरी मला काही ते कथानक पसंत नाही पडले म्हणून व केवळ मुक्तसुनित यांनी लिहले आहे म्हणुन प्रतिसाद दिला. मुक्तसुनित "नकारात्मक" प्रतिसाद योग्यरित्या हाताळु शकतात हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. मराठी आंतरजालावर ह्याची नितांत गरज आहे.

कर्णाने दुवा दिलेल्या "फेड" चे कथानक जास्त चांगले तरी ते फक्त चैत्रच्या तुलनेत असेच म्हणेन. अर्थात वैयक्तिक आवडीचा भाग मोठा. जे पटले नाही, ते का पटले नाही इतकेच सांगीतले. एखाद्याला आवडले नाही म्हणुन ती व्यक्तिच वाईट किंवा गाढव-गुळ हे वर्गीकरण स्वयंघोषीत समिक्षकाचे काम.

आधी हाकलले तरी परत परत जादा प्रेक्षक दिसलेल्या घोळक्यात घुसुन टिमकी वाजवु पहाणारे बालिश पोर व त्याची भंपक मतं / आवड यांना देखील इथे वाव दिला जातो. हे मिपाचे वैशिष्ट्य.

...जास्त सहानुभूतीने पहाताही येईल.

तेच तर चालू आहे. जुन्या गोष्टीच नव्हे तर नव्या चाळ्यांकडे देखील सहानुभूतीनेच पहावे लागते. :-)

बहुगुणी's picture

20 Nov 2008 - 7:45 am | बहुगुणी

मंडळी,

वरती उल्लेखलेल्या आवर्तन च्या २ डिव्हीडींचे सेट्स कोणाला अमेरिकेत हवे असल्यास मला व्य. नि. ने mailing address कळवा. पाठवायची व्यवस्था करेन.

आजानुकर्ण's picture

20 Nov 2008 - 7:52 am | आजानुकर्ण

आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी.

सुरेख. संस्कारांची खरी ओळख असणाऱ्या व्यक्तींना वरील वाक्यातील संवेदनशीलता आणि सुसंस्कृतपणा जाणवल्याशिवाय राहणार नाही.

आपला,
(सुसंस्कृत) आजानुकर्ण

कोलबेर's picture

20 Nov 2008 - 8:21 am | कोलबेर

अरेच्या!! इथला बिरुटे सरांचा प्रतिसाद कुठे गेला?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2008 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>अरेच्या!! इथला बिरुटे सरांचा प्रतिसाद कुठे गेला?
आमचा प्रतिसाद उडवलेला दिसतो.
चलो, कोयी बात नही ! :)

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2008 - 6:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख. संस्कारांची खरी ओळख असणाऱ्या व्यक्तींना वरील वाक्यातील संवेदनशीलता आणि सुसंस्कृतपणा जाणवल्याशिवाय राहणार नाही.

सहमत

अवांतर : जीए आणि जीएंच्या कथेंवर एक्सपर्ट लोकांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत
असा लिहिलेला माझा प्रतिसाद संपादकांनी उडवला. अर्थात हे विषयांतर असेल तर विषयाच्याच निमित्ताने याच चर्चेत इतर प्रतिसादात भरपूर विषयांतर आहे.सदरील प्रतिसाद ज्या संपादकांनी उडवला त्या संपादकांना माझाही जरासा खूलासा. :)
जीएंच्या बद्दल आणि जीएंच्या कथांवर मराठी संकेतस्थळांवर भरभरुन बोलणारे  मोजकी मंडळी आहेत त्यांना उद्देशून माझा प्रतिसाद होता. त्यांनी काही लिहावे याच उद्देशाने तसे लिहिले होते.  यात लपवण्यासारखे काही नाही, पण यात उडवण्यासारखे काय होते हे मला अजूनही कळले नाही.
संस्काराच्या निमित्ताने असे वाटले होते की, जीएंबद्दल असे म्हटल्या जाते की, 'अश्रद्धा' हा त्यांच्या जीवनाचा मूलाधार होता.याला काही लोक चिकित्सकपणाही म्हणतात. जीएंच्या कथांमधले वातावरण, पात्रांचे जीवन, जीवन जगण्याच्या माणसाच्या वेगवेगळा तर्‍हा, त्यांचे संघर्ष आणि त्यातून मानवी जीवनाचा एक अर्थ असे चित्र बर्‍याचदा जीएंच्या कथा वाचतांना दिसतो आणि जीएंना त्याच गोष्टीचे आकर्षण होते. आपल्या जे वाट्याला आले आहे, त्याला नियती जवाबदार आहे त्यापासून सूटका नाही  त्या दृष्टीने मी  'मधूच्या  आईकडे' पाहतो.

"म्हणजे आपले बाबा गेले हे त्यांना कळू द्यायचे नव्हते होय ?"

माणूस गेल्यानंतर गावातल्या लोकांना कळू नये, वगैरे, हे आपले वाचकांचे तर्क आहेत. लेखकाला ओढ आहे ती नियतीवादाची.  नियतीपुढे मानव शरण जातो. आपल्या नशिबातले चुकत  नाही. असा काहीसा बोध त्यांच्या कथा वाचतांना होत असतो, समाजविषयक चिंतन हा त्यांचा विषय कधीच नव्हता असा जीएंच्या एक फुटकळ वाचक (उपरोधाने लिहित नाही) म्हणून मला वाटते.

म्हणून जीएंबद्दलच्या एक्सपर्ट वाचकांची काही वेगवेगळी मते यानिमित्ताने यावे, असे वाटले होते. यात उडवण्यासारखे काय होते.
असो, मिपाचालकांनी कोणत्याही संपादकाच्या लेखन/प्रतिसादाबद्दल कोणत्याच कार्यात कधीच कोणताच हस्तक्षेप केला नाही. एक संपादक म्हणूनही मीही काही विचारणार नाही. पण एक मिपाचा सदस्य म्हणून विचाराल तर त्यात उडवण्यासारखे काहीच नव्हते त्याबाबतीत लिहिण्या-बोलण्याचे 'सदस्य' म्हणून माझे स्वातंत्र्य आबाधित आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

21 Nov 2008 - 9:09 am | विसोबा खेचर

आपण काय लिहिलं होतंत हेदेखील मी पाहिलं नव्हतं, त्यामुळे मी ते उडवण्याचा प्रश्नच येत नाही..

इतर कुणा संपादकाने उडवलं असेल तर ते मला माहीत नाही..

मात्र एक गोष्ट तेवढीच खरी की बिरुटेसाहेब स्वत:ही एक मिपाचे जबाबदार संपादक आहेत तेव्हा अन्य कुणा संपादकाने त्यांचं लेखन काढून टाकल्यास निदान त्यामागचं कारण तरी त्यांना कळवायला हवं होतं असं वाटतं!

तात्या.

चित्रा's picture

20 Nov 2008 - 7:57 am | चित्रा

बघायला हवा चैत्र.

मनिष's picture

20 Nov 2008 - 11:24 am | मनिष

इथे कुठे मिळेल? की क्रांतीलाच विचारावे वशिला लावून? ;)

- मनिष

विसोबा खेचर's picture

20 Nov 2008 - 12:15 pm | विसोबा खेचर

श्रीमंती-गरीबी, मान-अपमान, वगैरे वगैरे सानेगुरुजी टाईप कथा..

गेल्या चैत्रात मधुच्या आईला आपल्या घरात हळदीकुंकू मिळालं नाही म्हणून कदाचित आपला पती वारला असं त्या नाईकबाईला वाटू नये म्हणून मधुच्या आईचे न्हाणीघरात लपणे व मधुच्या हस्ते घरी आलेल्या बाईस कुंकवाचा करंडा देणे वगैरे वगैरे.. सगळं ठीकच वाटलं बुवा!

हळदीकुंकवासारख्या फुटकळ प्रसंगाची मोठ्या प्रमाणात शोबाजी करण्याकरता दागिन्यांसारखा स्त्रीधन असलेला, अत्यंत महत्वाचा ऍसेट विकायच्या ७० वर्षांपूर्वीच्या आंधश्राद्धिक मानसिकतेचे चित्रंण करणार्‍या चित्रपटाचे आजच्या काळातले प्रयोजन समजले नाही..

यावर मधुची आई जे म्हणते ते अगदी साधेच - पण सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे. ते सांगते : " मी तर झाला प्रकार केव्हाच विसरले. मला त्याचे काहीच महत्त्व नाही. पण त्यावेळी माझा मुलगा समोर होता. त्याला झालेल्या प्रसंगाची आठवण नेहमी राहील. हा हळदीकुंकू सोहळा त्याच्यासाठी. "

ह्यात सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे नक्की काय, हे कळले नाही..

पण त्यावेळी माझा मुलगा समोर होता. त्याला झालेल्या प्रसंगाची आठवण नेहमी राहील. हा हळदीकुंकू सोहळा त्याच्यासाठी. "

??

स्वत:च्या खिशात/नवर्‍याकडे दमड्या नसताना घरातले दागिने विकून हळदीकुंकू समारंभ पार पाडणे या कृतीतून आईला स्वत:च्या मुलाला नक्की काय दाखवून द्यायचे आहे ते कळले नाही...

असो,

मुक्तरावांचे परिक्षण वाचून हा चित्रपट का आणि कश्याकरता पाहायचा हा प्रश्न मला पडला आहे, तरीही एकदा पाहीन म्हणतो.. सोनाली कुलकर्णी ही नटी गुणी आहे याबद्दल वाद नाही परंतु त्या आईच्या भूमिकेकरता तिची निवड कितपत योग्य आहे हे चित्रपट पाहूनच कळेल...

असो, हा चित्रपट नक्की बघेन परंतु मुक्तरावांनी लिहिलेलं सदर चित्रपटाचं एकंदरीत कथानक/परिक्षण वाचता, या चित्रपटापेक्षा ५०-७० वर्षांपूर्वीच्याच काळातलं चित्रण करणारे स्मृतीचित्र, वास्तुपुरुष, किंवा ध्यासपर्व हे चित्रपट कितीतरी अधिक सरस आणि वास्तववादी आहेत असे वाटते..

आपला,
(चित्रपटप्रेमी) तात्या.

सर्किट's picture

20 Nov 2008 - 12:21 pm | सर्किट (not verified)

तात्या,

कथेचा सारांश खालीलप्रमाणे लिहिला तर तुम्हाला कदाचित अधिक आवडेल. (काहीही झालं तरी आपल्या माणसांनी लिहिलेलं अधिक आवडतं, नाही का ?)

'चैत्र' ही मला आवडलेली अशीच एक कथा. कथानायक परत एक छोटासा मुलगा. लहानशा खेड्यात रहाणारे त्याचे कुटुंब. घरी आई आणि बाबा. आर्थिक परिस्थिती बेताचीच. या खेड्यातल्या ज्येष्ठ इनामदारीणबाई त्यांच्या वाड्यावर चैत्राचं हळदीकुंकू ठेवतात. सगळ्या गावातल्या सवाष्णींना आमंत्रण जाते. इनामदार बाईंची नवी सून तिच्या दृष्टीने हलक्यासलक्या या अशा बायकांना बोलवायला नाखूशच असते. हा छोटा मुलगा आणि त्याची आई पन्हं-कोशिंबीर घ्यायला उभे असताना चारचौघात ती सून त्यांना म्हणते "हे काय, मगाशी येऊन गेलात ना तुम्ही? पन्ह्यासाठी किती हावरटपणा करायचा बाई माणसानं?"
या मुलाची आई शांतपणे देवापुढचं हळदीकुंकू उचलते आणि मुलाच्या हाताला धरून घरी येते. ती फारसे बोलत काहीच नाही, पण तिचे मन अगदी विस्कटून गेलेले असते. दुसरे वर्ष येते. आई आपले सगळे दागिने, घरातले किडूकमिडूक काढून बाबांसमोर ठेवते. म्हणते "हे सगळं विकावं लागलं तरी चालेल, पण मला सगळ्या गावाला हळदीकुंकवाला बोलवायचं आहे". त्याप्रमाणे तसे ती करतेही. इनामदार बाई आणि त्यांची सून दोघीही आलेल्या असतात. इनामदार बाई त्यांचा कापरा हात आईच्या पाठीवर ठेवतात "हे बघ, माझे आता फार दिवस राहिले नाहीत. माझ्यासाठी म्हणून काही काही मनात ठेवू नकोस". आई त्यांना समाधानाने वाकून नमस्कार करते.
त्याही पुढचा चैत्र येतो. इनामदार बाई स्वतः हळदीकुंकवाचं बोलावणं करायला येतात. त्यांची चाहूल लागताच आई न्हाणीघरात आंघोळीला जाते. "नक्की यायचं बरं का..." असं सांगून इनामदार बाई देवासमोर हळदीकुंकू ठेवून निघून जातात.
आई बाहेर येते. "बिचाऱ्या इतक्या प्रेमानं इथपर्यंत आल्या, म्हटलं मुद्दाम कशाला त्यांच्यासमोर यावं?" ती मुलाला जवळ घेऊन म्हणते." आणि आज ना उद्या त्यांना कळणारच.."

आणि मग अर्धवट अजाण, अर्धवट जाणता असा तो मुलगा कावराबावरा होऊन विचारतो
"म्हणजे गेल्या वर्षी बाबा वारले, हे त्यांना सांगायचं नव्हतं होय?"

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विसोबा खेचर's picture

20 Nov 2008 - 12:38 pm | विसोबा खेचर

हम्म! ही ष्टोरी थोऽऽऽडी बरी वाटली..

अर्थात, दोन्ही ष्टोर्‍यात अजून एक महत्वाचा फॉल्ट शिल्लक राहतोच...

मुक्तराव म्हणतो त्याप्रमाणे कथा ५०-७० वर्षांपूर्वीची आहे.. शिवाय एका गावातली आहे...

आमची आई सांगते त्याप्रमाणे ५०-७० वर्षांपूर्वी ठाण्यासारख्या गावातलीदेखील बरीचशी माणसं एकमेकांना ओळखत असत त्यामुळे या बाईचा नवरा खपला आहे, (हळदीकु़कवकरता दागिने विकण्याची बायकोची दिवाळखोरी पाहून बिचारा खपेल नायतर काय! ;) ) हे त्या बड्या घरच्या बाईला कळलंच नाही, हे थोडं भाबडं वाटतं!

बरं धरून चालू की कळलं नसेल, तरीही जेव्हा प्रत्यक्षात ती बड्या घरची बाई हळदीकुंकवाचं बोलावणं करायला ऍक्च्युअल येते तेव्हातरी तिला नक्की कुणीतरी आधी गाठून यांच्या घरच्या मयताची बातमी द्यायला हवी होती तीही कुणी दिलेली दिसत नाही! ५०-७० वर्षांपूर्वी एखाद्या गावात त्या बड्या बाईला, अगदी मयताच्या घरात पाऊल टाकेस्तोवर हे कळूच नये हे थोडं आश्चर्यकारक वाटत!

असो,

आपला,
(तपशीलात शिरणारा चोखंदळ चित्रसमिक्षक!) तात्या.

सर्किट's picture

20 Nov 2008 - 12:40 pm | सर्किट (not verified)

तात्या,

जरा खाजगी प्रश्न विचारतो. तुला गूळ आवडतो का ?

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विसोबा खेचर's picture

20 Nov 2008 - 12:52 pm | विसोबा खेचर

गूळ आवडत नाही, तरीही स्मृतिचित्र, ध्यासपर्व यांसारख्या उत्तम चित्रपटांची चव मला नक्की माहीत आहे! :)

असो,

मुक्तरावाच्या परिक्षणावर आणि आपल्या सुधारीत कथेवर मी माझं मत मांडलं आहे, त्याबाबत प्रश्नार्थक अथवा कोडं घातल्यासारखे प्रतिसाद न देता सरळ साध्या शब्दात काही टिप्पणी कराल तर माझ्याकडून हा संवाद सुरू ठेवणं मला शक्य होईल..

तात्या.

कपिल काळे's picture

20 Nov 2008 - 7:44 pm | कपिल काळे

समोरच्याने आपला मुद्दा व्यवस्थित मांडला असता, त्याला गूळ आवडतो का हे विचारणं म्हणजे युक्तिवादात हरत आलेल्या वकिलाने भरकोर्टात समोरच्या वकिलाच्या अंगावर धाउन जाण्यासारखे आहे. असे बिलो द बेल्ट वार करण्यापेक्षा लिहूच नका.

ही कथा मी खूप वर्षांपूर्वी वाचली होती तेव्हा मला सुद्धा हाच प्रश्न पडला होता. की ७० वर्षांपूर्वीच्या एका गावात, एक माणूस मयत झालेला दुसरयांना समजत कसा नाही.

तात्यांचे बाकीचे म्हणणेसुद्धा पटण्यासारखे आहे, की ह्या चित्रपटातून आताच्या काळात काय सांगायचं आहे? त्या कथेचा ह्या कालात काय रिलेव्हन्स आहे?

नानाची कविता म्हणजे लिहिण्यासाठी लिहिलेली आणि काव्याच्या दॄष्टीने कचरा,
तात्यांनी वस्तुनिष्ठ आणि योग्य शंका काढली की ते गूळाची चव न समजणारे प्राणी.

आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही, आवडली नाही की आपण जसे प्रतिसाद देतो तसे आपल्यालाही मिळतीलच. ते सुद्धा सहन करावे लागतील

हे म्हणजे मॄदंग मुखलेपोभ्य करोति मधुरं ध्वनी अशे दुतोंडी मानसिकता झाली.

http://kalekapil.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

20 Nov 2008 - 7:50 pm | मुक्तसुनीत

कपिल यांच्याशी याबाबतीत मी सहमत आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र अशा भावना असतील (मग त्या आपुलकीच्या असोत की विरोधाच्या) त्याच्या विरुद्ध प्रकाराचे मत कुणी मांडले - आणि विशेषतः योग्य रीतीने , व्यक्तिगत पातळीवर न घसरता मांडले - तर त्यावर पेजोरेटीव्ह टर्म्स मधे (मराठी शब्द ?) प्रतिवाद करणे अयोग्य आहे. सर्कीट यांच्यासारख्या माहीतगार , उत्तम विनोद करणार्‍या नि समजणार्‍या ज्येष्ठ सभासदाने , याबाबत नक्की विचार करावा.

कोलबेर's picture

22 Nov 2008 - 3:05 am | कोलबेर

इथे मुक्तसुनित ह्यांना एक +२ म्हणून प्रतिसाद दिला होता. त्यात उडवण्या सारखे होते? कृपया कळावे!

विसोबा खेचर's picture

21 Nov 2008 - 1:08 am | विसोबा खेचर

अरे कपिल, जाऊ दे रे बाबा, तू का वाद घालतो आहेस माझ्याकरता?

माझ्या प्रतिसादानंतर सर्किटने काहीच प्रतिसाद दिला नाही त्याचे खालील पैकी एखादे कारण असू शकते..

१) माझा मुद्दा त्याला पटला असावा आणि तो गप बसला असावा..

२) माझा मुद्दा त्याला पटला नसावा परंतु त्याला हा विषय पुढे वाढवायचा नसावा किंवा पुढे काही लिहिण्यास वेळ मिळाला नसावा..

३) इत्यादी इत्यादी...!

असो,

तात्या.

विजुभाऊ's picture

20 Nov 2008 - 12:52 pm | विजुभाऊ

एका उत्तम रसग्रहणा बद्दल मुक्तसुनित्भौना धन्यवाद

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

मेघना भुस्कुटे's picture

20 Nov 2008 - 2:29 pm | मेघना भुस्कुटे

सिनेमा पाहिलेला नाही. पाहायलाच हवा. मुक्तसुनीत यांचे परीक्षणाबद्दल आभार. सोनाली कुलकर्णी चांगली अभिनेत्री आहेच, पण ती अभिनय सोडून जे काही करते, त्याबद्दल मात्र डोक्यात तिडीक आहे.

विसोबा खेचर's picture

20 Nov 2008 - 5:33 pm | विसोबा खेचर

सोनाली कुलकर्णी चांगली अभिनेत्री आहेच, पण ती अभिनय सोडून जे काही करते, त्याबद्दल मात्र डोक्यात तिडीक आहे.

माझ्या मते आपला मतलब फक्त तिच्या अभिनयाशी असावा, आपली जी काही टिकाटिप्पणी असेल ती तिच्या अभिनयाबदल असावी, कारण आपली-तिची ओळख फक्त एक अभिनेत्री म्हणूनच तिच्याशी आहे..!

अभिनयाव्यतिरिक्त तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल काही टिप्पणी करणे हे रेषेवरच्या अक्षरांना धरून होणार नाही..!

तात्या.

मेघना भुस्कुटे's picture

20 Nov 2008 - 9:04 pm | मेघना भुस्कुटे

अभिनय सोडून सार्वजनिक ठिकाणी तिचे लाडे लाडे बोलणे, ठिकठिकाणी 'आपण म्हणजे निरागसपणाचा मानदंडच' या प्रकारे वावरणे, नृत्याच्या कार्यक्रमात आपल्या भावनांचे जाहीर प्रदर्शन करणे - हे पाहून माझ्या मस्तकात तिडीक जाते.

हे अभिनयात अंतर्भूत नसले, तरी सार्वजनिक ठिकाणी होते, तेव्हा त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. खेरीज वरच्या प्रतिक्रियेत हा भाग अवांतर असल्यामुळे मी तो निराळ्या फिक्या रंगातही लिहिला आहे. त्याबद्दल तात्या, तुम्हांला नक्की काय आक्षेप आहे?

शिवाय 'रेषेवरच्या अक्षरांना' धरून होणार नाही, म्हणजे नक्की कशाला धरून होणार नाही, तेही कळले नाही. 'रेषेवरची अक्षरे' म्हणजे काही संस्थळांवर कशा प्रतिक्रिया लिहाव्यात हे सांगणारी मार्गदर्शक पुस्तिका नाही. समजा, ती तशी आहे असे क्षणभर गृहित धरले तरी, ती मला बंधनकारक कशी काय ठरू शकते? संपादक म्हणून एखाद्या माणसाचे अधिकार आणि इतर ठिकाणी त्याने व्यक्त केलेली मते, यांच्यात भूमिकेचा काही फरक असतो की नाही?

आनंदयात्री's picture

21 Nov 2008 - 9:11 am | आनंदयात्री

सहमत आहे. असेच म्हणतो.

बाकी जीएंच्या कथांबद्दल छान गप्पाटप्पा झाल्या !

राघव's picture

20 Nov 2008 - 3:26 pm | राघव

छान लिहिलेत दादा :)
जीए आणि वपु मला स्वत:ला खरे तर वाचवत नाहीत. म्हणजे ते लिहितात इतके जबरा की आपण तटस्थपणे वाचूच शकत नाही. डोके पार भणाणून जाते. त्यांच्या २-३ कथा सलग वाचल्या आहेत असे कधी मला जमलेच नाही.
पण जीएंची एक कथा मला फार आवडते. अश्वत्थाम्याची. अगदी क्लास लिहिलेली आहे. नाव माहीत नाही कथेचे. पण सांजशकुन या त्यांच्या संग्रहात ही कथा होती.
वपुंचीही एक ठाव घेणारी कथा आहे, नाव आठवत नाही तिचेही :( पण जबरा अन् सुंदर! थेटरातले नाटकासाठीचे पडदे रंगवण्याचे काम करणार्‍या आजोबांचीही कथा आहे.
असो.
धन्यवाद,
मुमुक्षु

लिखाळ's picture

20 Nov 2008 - 4:13 pm | लिखाळ

जीए आणि वपु यांची नावे सोबत पाहून मला अंमळ मजा वाटली.
हे माझे वैयक्तिक मत. जीए प्रेमीला सुखावण्यासाठी अथवा वपु प्रेमीला दुखावण्यासाठी नव्हे.
-- लिखाळ.
दारातल्या तोरणारा आंब्याची पाने आणि बेगड लावलेला चकचकित नारळ असतो. कुणाला काय आकर्षक दिसते हे व्यक्तिसापेक्ष आहे.

अभिज्ञ's picture

20 Nov 2008 - 4:19 pm | अभिज्ञ

हेच म्हणतो.
अभिज्ञ.

राघव's picture

20 Nov 2008 - 4:19 pm | राघव

हाहाहा..
मी अगदी सहज लिहून गेलो हो... :)
मुमुक्षु

नीधप's picture

21 Nov 2008 - 11:09 am | नीधप

जीएंचा एवढा मोठा अपमान कोणी केला नसेल.. :)

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

परिकथेतील राजकुमार's picture

20 Nov 2008 - 7:06 pm | परिकथेतील राजकुमार

अप्रतिम ! अतिशय सुंदर अशा कथेवरील तेव्ह्डाच सुंदर चित्रपट

++++ प्रसाद ++++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/

यशोधरा's picture

21 Nov 2008 - 1:19 am | यशोधरा

चैत्र कथेवर बनवलेल्या चित्रपटाची करुन दिलेली ओळख आणि कथानक अतिशय आवडले, धन्यवाद.

"मधू , आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी. "

+१

दिपोटी's picture

21 Nov 2008 - 7:07 am | दिपोटी

मुक्तसुनीत,

नेहमीप्रमाणेच आपले लेखन (व याबाबतीत परीक्षण / रसग्रहण) नेमके व रसपूर्ण झाले आहे. आपले परीक्षण वाचून 'चैत्र' नक्कीच पहावा अशी खूणगाठ बांधून ठेवली आहे - बघू केव्हा आणि कसे जमते ते.

सोनाली कुलकर्णी ही अतिशय गुणी अभिनेत्री आहे.
सोनाली कुलकर्णी चांगली अभिनेत्री आहेच, पण ती अभिनय सोडून जे काही करते, त्याबद्दल मात्र डोक्यात तिडीक आहे.

सोनाली कुलकर्णीच्या वैयक्तिक / व्यक्तिगत आयुष्याशी मला काहीही देणे-घेणे नाही. ती जेव्हा चित्रपटांत काम करु लागली, तेव्हा प्रथम मी सुद्धा तिच्याबद्दल थोडासा साशंकच होतो, पण नंतर 'घाशीराम कोतवाल' मध्ये तिचे घाशीरामच्या दुसर्‍या बायकोच्या भूमिकेतील काम पाहिले तेव्हा तर तिच्या अभिनय-कौशल्याला दाद दिल्याशिवाय रहावले नाही. माझ्या मते ती एक अत्यंत सशक्त व संवेदनशील अभिनेत्री आहे ... तिची अभिनयाची समज फार वरच्या पातळीची आहे.

- दिपोटी

नीधप's picture

21 Nov 2008 - 11:13 am | नीधप

>>पण नंतर 'घाशीराम कोतवाल' मध्ये तिचे घाशीरामच्या दुसर्‍या बायकोच्या भूमिकेतील काम पाहिले तेव्हा तर तिच्या अभिनय-कौशल्याला दाद दिल्याशिवाय रहावले नाही. <<
काहीतरी गफलत होतेय का?
घाशीराम मधे सोनाली? आणि घाशीरामची दुसरी बायको?
तपशीलात जबरदस्त गोंधळ होतोय.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मुक्तसुनीत's picture

21 Nov 2008 - 11:16 am | मुक्तसुनीत

त्यांना सखाराम म्हणायचे असावे .
(मी सोनालीबाईंचे कुठलेच नाटक पाहिले नाही. हा माझा केवळ अंदाज आहे )

दिपोटी's picture

21 Nov 2008 - 2:04 pm | दिपोटी

अज्जुका,

तपशीलात चांगलाच घोळ झालेला आहे. अर्थातच मला 'सखाराम बाइंडर' म्हणायचे होते. दिलगीर आहोत !

DVD आवृत्तीसाठी 'सखाराम'चा जो प्रयोग झाला होता (ज्यात सयाजी शिंदे यांनी सखारामची भूमिका साकार केली होती) त्यात लक्ष्मीच्या भूमिकेतील सोनालीचा सहजसुंदर अभिनय लक्षात ठेवण्याजोगा होता.

- दिपोटी

नीधप's picture

21 Nov 2008 - 2:45 pm | नीधप

होतात असे गोंधळ..
मला आपलं वाटलं मलाच माहित नाही की काय...

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नीधप's picture

21 Nov 2008 - 11:22 am | नीधप

अचानक इतक्या जुन्या चित्रपटाबद्दल एवढी मोठी चर्चा आणि चिखलफेकीचा खेळ बघून आश्चर्य वाटले.
'चैत्र' क्रांतीची डिप्लोमा फिल्म होती. फिल्म इन्स्टिट्युट मधील शिक्षण संपवून बाहेर पडत असताना विद्यार्थ्यांना एक अर्ध्या तासाची शॉर्ट करायची असते. त्याला डिप्लोमा फिल्म म्हणतात. ही फिल्म माझ्या माहितीप्रमाणे क्रांतिनी २००० मधे केली होती आणि त्यानंतर ती बर्‍याच फेस्टिव्हल्समधे गेली होती. बर्‍याच ठिकाणी नावाजलीही गेली होती.
असो. आता मला ती पाहून खूप वर्ष झाली. पण फिल्म म्हणून खूपच चांगली होती.

पण इथली तपशीलाबद्दलची चर्चा मात्र जाम विनोदी आहे. कथा न वाचता वा फिल्म न बघता दोन्ही वाईट आहेत असं म्हणणं जामच गमतीशीर.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विसोबा खेचर's picture

21 Nov 2008 - 6:49 pm | विसोबा खेचर

कथा न वाचता वा फिल्म न बघता दोन्ही वाईट आहेत

कथा न वाचता वा फिल्म न बघता 'वाईट' हा शब्द निदान मी तरी वापरलेला नाही! :)

तात्या.

नीधप's picture

21 Nov 2008 - 9:05 pm | नीधप

माझ्या पोस्टमधे तुमचं नाव मला तरी कुठे दिसत नाही. किंवा कुणाचंच.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

चित्रा's picture

21 Nov 2008 - 8:19 pm | चित्रा

सहज यांचा एक प्रतिसाद आणि त्याला धरून आलेले काही प्रतिसाद हे मी नुकतेच काढले आहेत. याआधीचे जे प्रतिसाद उडले आहेत असे काही प्रतिसादांवरून कळते आहे ते मी काढलेले नाहीत एवढे मात्र स्पष्ट करते.

सर्व सदस्यांना सल्ला : व्यक्तींची नावे न घेता लेखणीने केलेले वारही टोचतच असतात. काही प्रतिसाद व्यक्तीगत रोख स्पष्ट होत नसल्याने काढलेले नाहीत. पण व्यक्तीगत रोख म्हणजे काय मानावे यासंबंधीच्या सीमारेषा धुसर आहेत याची सर्व सदस्यांनी जाणीव ठेवावी आणि वातावरण गढूळ करू नये ही विनंती.

धन्यवाद,

चित्रा

मुक्तसुनीत's picture

21 Nov 2008 - 8:33 pm | मुक्तसुनीत

दिलेल्या स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद ! माझा थोडा गोंधळ उडालेला होता ; अचानक प्रतिसादांची संख्या कमीकमी कशी होत जाते आहे हे पाहून.

लिखाळ's picture

21 Nov 2008 - 8:38 pm | लिखाळ

खरंच आहे.. दिलेल्या प्रतिसादांची संख्या कमी होताना पाहून मला वाटले की नुकतीच आलेली बोधकथा वाचून, न स्विकारलेले प्रतिसाद लोक परत घेत आहेत की काय ! :)

-- (बुद्धाचा शिष्य) लिखाळ.

अथांग सागर's picture

26 Feb 2009 - 8:17 am | अथांग सागर

'चैत्र' येथे पहावयास मिळेल...
--अथांग सागर

संदीप चित्रे's picture

26 Feb 2009 - 10:50 pm | संदीप चित्रे

मला सोनाली कुलकर्णी अभिनेत्री म्हणून खूप आवडते.
ही चित्रपट बघायलाच हवा ...
माहितीबद्दल धन्स.

कालच हा लघुपट अचानक तुनळी वर दिसला आणि पहिला गेला. थोडी उत्सुकता लागून होती कि या वर काही लिहिले आहे का किंवा याची मुळ गोष्ट कुठे वायाचायला मिळाली तर बघू या. अस शोधात असताना हा लेख मिळाला.
हा लघुपट इथे देत आहे:

या चित्रपटात काही प्रश्न अनुत्तरीत राहतात किंवा मुद्दामून सोडले आहेत असे. असा उगीच फक्त सोनाली (म्हणजे तिने साकारलेल पात्र) चाच अपमान करण्याचा काय हेतू. म्हणजे तिचा आणि या नवीन नाईक वाड्यातल्या सूनेच काहीतरी पूर्वीच भांडण आहे कि काय अशी शंका आली पण त्या बद्दल पुढे चित्रपट काहीच सांगत नाही.

आणि शेवटी अचानक नवरा गेलेला आहे एव्हढंच दाखवलं आहे. कुठतरी तो जातो त्याचा काही या वरच्या घटनेशी संबंध दाखवायचा होता कि काय असं वाटून जात.

किंवा ही काहीशी बोधकथा म्हणून फक्त बघायची आहे का? म्हणजे तुमच कोणी कितीही वाकड केल तरी त्याच्यावर शक्यतो काही संकट येईल असं आपण वागू नये असा काहीसा संदेश देणारी.

सिरुसेरि's picture

29 Apr 2017 - 2:11 pm | सिरुसेरि

श्री . आत्माराम भेंडे यांनी जी . ए. यांच्या कथांवर आधारीत एक सुंदर मालिका बनवली होती . "चैत्र" या कथेच्या भागामधे मानसी मागीकर यांनी मधुच्या आईची भुमिका केली होती .