रात्रीची येळ , जेवण खावन आटपून आमी, नऊ, दहाच्या दरम्यान झोपलो असणं. मायावर, निद्रादेवी लयच खुश असायची, एकदा का मी गादीवर पडलो, की मले बातच ढोरावाणी झोप लागे. झोपाच्या बाबतीत कुम्भकर्णानंतर मायाच नंबर लागत असणं. अजून दुसरा माया याटम म्हणजे, झोपीत असतांना मले जर कोणी मला आवाज दिला, त जरी म्या डोळे मिचकावले, तरी समोरचा कोण, कायच्यासाठी, काय बोलून रायला मले, हे सगळं समजायले, अन होश मदे याले, कमीतकमी दोन चार मिनटं त लागताच असे. त्यातच,
"श्रीकांत , श्रीकांत " , "अनुप , अनुप " मच्छरान, कानापाशी येऊन भिनभिन, करावं तशे आवाज याले लागले.
"हा ...हू" करत म्या नुसता कड बदलला असण.
वापस "अबे श्रीकांत, श्रीकांत" दबक्या आवाजात, अन एक रागीट अनोळखी आवाज "उठ बे दिसत नाही काय?"
कशेबशे डोळेचोळत, मी जागा झालो. काय चालू हाय, मले समजून नॊत रायल.
बनेन घातलेला मन्या, खाली मान टाकून एक साईड ले उभा होता. माया दुसऱ्या बाजूले राहुल्या पण तशाच अवतारात होता. आन, दोन अनोळखी पोट्टे, पोट्टे कायचे हे त भूतच, म्हणजे सिनिअर्स. त्याले कसा काय आमच्या रूमचा पत्ता लागला बे? काही समजून नॊत रायल. आता म्या पण खाली टाकून , उभा झालो होतो.
"काबे , सिनिअर्स सोमर झोपा काढतो बे? काही लाज लेका?"
"सॉरी सर"
"तुम्ही तिघेही रॅगिंग देत नाई म्हणे."
"नाई सर , असं काई नाई"
मन्याकडे पाहत "काबे लम्बु, जास्त हुशार समजत का बेटा स्वतःले? न्या लागते वाटते हॉस्टेलवर."
मन्या "नाही सर, मले बर नाई वाटून रायल, आत्ताच गोळी खाऊन झोपलो होतो”, खरकट्या मेसच्या डब्याकडे बोट दाखवत, “पाहा सर, जेवण पण नाई केलं बरोबर आज."
बोललो होतोना, हा मन्या म्हणजे लय डॅम्बीस कॅरेक्टर, तो त्याचा सुप्तगुण कधी अन कुठे वापरेन, कोणाले कशी टोपी घालणं, याचा काहीच भरवसा नोता. त्याचंकडे दुस्याले कस गंडवाच, ह्याच रामबाण औषध तयारच असे, ते फक्त, कोणावर अन कधी वापरायच ते, त्यालेच बरोबर माहित होत.
"बर बर बस."
दुसरीकडे दुसरा भूत राहुल्याची काय मारतो, हे समजाच्या आधीच, पहिल्या भुतान मन्याले सोडून आता माया नरड्याचा घोट घेण्यासाठी मायाकडे पायल.
"काबे ..चल इंट्राडक्शन दे."
"सर..... माझे नाव"
"अबे , इंग्लिश मध्ये देणं माकडा, इंजिनेरींगला आहे ना तू?"
"एस सर "
हा जसा काई, इंग्लिशचा लय मोठा गुरू. उठता, बसता, नुसता काय इंग्लिशच झाडतो काय? पण आता इलाज नाई. माया परत एकदा, इज्जतीचा भाजीपाला होणार, असं मले दिसले लागलं होत.
जे काही तुटुक,मुटुक घोपाटून ठेवले होत, ते आता ओकायचे होत.
Sir, myself Shrikant Harne.
"काबे, बाप नाही काय?"
"सॉरी सर" आदीच मले इंग्रजी बोलाच टेन्शन येऊन रायल होत, अन या भामट्या न मदातच माई गाडी थांबविली होती. म्हणजे, जे घोकमपट्टी करून ठेवली होती, त्यात पण आता माई बोंब लागणार होती.
Sir, Myself Shrikant Vinayakrao Harne, My native is Amravati. I am student of first year civil branch, Shri Shivaji Engineering Collage, Akola.
फुस्स, झाल र बा एकदाच इंट्राडक्शन, सुटलो बा याच्या कचाटातन, अस मले वाटल. पण कायच
"हम्म... चल नॅशनल अँथम म्हणून दाखव."
नॅशनल अँथम? माया ट्यूबलाईट, त्या टाईमाले काही पेटतच नोता. अन त्याले माझ्यावर कुरघोडी करण्याचा एक चान्स मिळाला होता.
"अबे जण, गण , मन म्हणून दाखव ना."
झाल सुरु "जन, गणं, मन, अधिनायक, जय है ..." माई गाडी मस्त सुरु होती, पण ही गाडी, कुठ पंक्चर होईन , हे मलाही माहीत नव्हते, कुठे तरी तालात गाण म्हणण्यात, चुकला ना ताल. “जलधितरंग , जलधित , जलधित."
“पुढ काय?”
अरे यार आठवतच नव्हते. आई शपथ!! अरे काय झाले मला कळतच नोते. मनाची कॅसेट, परत रिवाइंड करतो, तरी “जलधित रंग, जलधित रंग“ तेथेच येऊन अडकत होती.
झाला, भुताले आपला डाव साधाले चान्सच भेटला. “काबे? राष्ट्रगीत येत नाही?"
"सर"
हा भूत, दुसऱ्या भूताकडे पाहात "न्या लागते रे याले हॉस्टेलवर."
झाली, टरकली ना माई, पण अचानक, काय त, शरीरातील सगळ्या पेशी एकवटल्या, त्यातच बाल्या दादाचे बोल
"अन्या, कॉलेज मध्ये रॅगिंग वगैरे झाली त सांगायच. फोडून काढू एका एकाला” कानावर पडल.
अन निघाला तो निडर शब्द माया तोंडातून "येत नाही सर."
"काय? काय बोलतो बे, सिनियर सोबत खेटे घेतो का?"
मी खाली मान घालून जरी होतो, तरी पूर्ण अंगात ताकत आली होती. अचानक कसेकाय हे सगळं घडलं मले समजलच नाही .
तेवढ्यात दुसरा भूत, "ये जाऊ दे रे, खूप उशीर झाला, कोणी येईल, चल निघू."
जातांना " तुले पाहून घेईल बेटा” म्हणत दोघेही भुते निघून गेली.
पुढे काय होणार? काय माहित. पण आत्ताच संकट टळल होत.
दुसऱ्या दिवशी, रात्री घडलेली सगळी कहाणी, मी बाल्या दादाले सांगितली, बाल्या दादा बोलला, “जा काळजी करू नको.” नंतर ते सिनियर आम्हा तिघाले कधीच भेटले नाही. आमच्या कॉलेजचे काही लेक्चरर, बाल्यादादाचे ओळखीचे होते, त्याच्या कडूनच त्या दोघा सिनिअर्स ले काय तो निरोप द्यायचा तो बाल्या दादान देला होता. म्हणतात ना "देव तारी त्याला कोण मारी" सांगायचं झाल्यास आमचा पण कोणी तरी वाली होताच.
हुळहुळ, अमरावतीचे पोट्टे रॅगिंग देत नाही, ही गोष्ट वनव्या सारखी पेट घेत होती. अन मंग तो दिवस पण उजाडला, ज्या दिवशी थर्ड डिग्री आमची वाट पाहत होती.
प्रतिक्रिया
4 Jun 2020 - 10:18 pm | गणेशा
मस्त
6 Jun 2020 - 4:10 pm | श्रीकांतहरणे
धन्यवाद
5 Jun 2020 - 11:25 pm | वीणा३
पु. भा. प्र. (शेवटी क्रमश: राहिलं का ?)
6 Jun 2020 - 4:10 pm | श्रीकांतहरणे
हो आज पुढला भाग प्रकाशित करतोय
6 Jun 2020 - 4:22 pm | श्रीकांतहरणे
लॉकडाऊन सुरु आहे - भाग १ ते ५ आहेत.