हाक फोडी चांगुणा..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
18 May 2020 - 5:38 pm

आज सकाळी उठल्या उठल्याच रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी कळली आणि सुन्न व्हायला झालं. कालच म्हणजे "सतरा मे"ला रात्री साडेअकराच्या सुमारास ते गेले. ज्येष्ठ साहित्यिक,नाटककार,रंगकर्मी,राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक अशी त्यांची बहुरंगी ओळख होती. सेवन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. इतके दिवस बातम्यांत ऐकू येणारा कोरोना आता परिचिताला झाला होता.

मी तरुण वयात होते. एका दिवाळी अंकात त्यांची "पावसातला पाहुणा" ही कथा छापून आली होती. विलक्षण सुंदर गूढकथा होती ती! मला-आमच्या घरातल्या सर्वांनाच-आवडली होती.
तीवर आम्ही खूप चर्चा केली. आणि माझ्या मनात रत्नाकर मतकरी हे नाव पक्कं रुतून बसलं. त्यानंतर दिवाळी अंकात त्यांच्या कथा वाचण्याचा नादच लागला. ते अधिकाधिक आवडू लागले. त्यांचा "खेकडा"हा गूढकथासंग्रह आला आणि तरुण पिढीला, खरंतर सर्वांनाच तो आवडून गेला. रत्नाकर मतकरी वाचकांच्या गळ्यातला स्यमंतक मणि बनले.

मग मी त्यांचे अनेक कथासंग्रह लायब्ररीतून आणून आणि स्वतः विकत घेऊनही वाचले. निजधाम,फाशीबखळ, आणि कितीतरी. त्यांनीच गूढकथा हा कथाप्रकार मराठी वाङमयात रुढ केला. लोकप्रिय केला. त्यांनी चित्रपटही लिहिले. नाटकंही लिहिली. फक्त गूढकथाच लिहिल्या असं नव्हे तर सामाजिक आशय असलेल्या कथाही लिहिल्या. नाटकंही लिहिली.

"जौळ"ही कादंबरी त्याचं ठळक उदाहरण. "माझं काय चुकलं", "लोककथा ७८", "दुभंग", "अश्वमेध", "जावई माझा भला", "चार दिवस प्रेमाचे", "घर तिघांचं हवं", "खोल खोल पाणी", अलिकडच्या काळातील "इंदिरा" पुनरुज्जिवित अलबत्या गलबत्या, आरण्यक ही नाटकं ह्या अजोड कलाकृती आहेत. त्यांच्या "इन्व्हेस्टमेंट" या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांना साहित्य अकादमी आणि संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला.

त्यांचं अलबत्या गलबत्या नाटक मी रेडिओवर ऐकलंय. त्यात दिलीप प्रभावळकरांनी चेटकिणीची भूमिका केली होती. नवं अलबत्या गलबत्या रंगमंचावर पाहिलं.जुन्या श्राव्य नाटकाचा प्रभाव ते पुसून टाकू शकलं नाही.

मी आकाशवाणीवर ३१ वर्षे नोकरी केली. तीत मी रेडीओवर मतकरींच्या तीन नभोनाट्यांची निर्मिती केली. त्यातलं एक नाटक होतं "हाक फोडी चांगुणा" (माझं मन आज टाहो फोडतंय) हेच शीर्षक मी ह्या लेखाला दिलंय.

त्यातल्या तीनपैकी एका नाटकात निशिगंधा वाडने काम केलं होतं. मी तेव्हा रेडिओसाठी मराठी नाटकांच्या वाटचालीवर एक रुपक मालिका केली होती. त्या मालिकेसाठी मी रत्नाकर मतकरींच्या घरी त्यांची मुलाखत घ्यायला गेले होते. त्यांचं घर मला आवडलं. मतकरींनी आणि प्रतिभाताईंनी माझं अगत्यानं स्वागत केलं. घर नीटनेटकं. मोजक्याच वस्तूंनी सजवलेलं. मतकरींनी बाल रंगभूमीसाठीचं त्यांचं योगदान सविस्तरपणे सांगितलं. ते म्हणाले,"लहान मुलांसाठी लिहिणं खूप अवघड आहे."

मतकरी एक चांगले वक्तेही आहेत.(सॉरी, होते.) त्यांची मुलगी सुप्रिया विनोद त्यानंतर मला एका रेडिओवरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटली, आणि आमच्यांत चांगली मैत्रीही झाली. तिचं "इंदिरा"नाटक पाहायला मी गेले होते. आता मात्र भेटीअभावी ही मैत्री पुसट झाली आहे. खूप काळ झाला अर्थात.

पण मतकरींच्या घरी जाऊन त्यांची मुलाखत घ्यायचं भाग्य मला लाभलं, आणि त्यांची तीन नभोनाट्यं निर्मित करायची संधी मला मिळाली, त्यानिमित्तानं त्यांच्याशी चर्चा करण्याचा योग आला, याचंच मला खूप अप्रूप वाटतं.

मतकरींचं सर्व साहित्य मी वाचलेलं,ऐकलेलं,पाहिलेलं आहे. त्यांनी लिहिलंय आणि मी वाचली नाही, अशी एकही ओळ शिल्लक नाही.मीही किंचित् लेखिका आहे. माध्यमात काम केल्याने बऱ्यापैकी लेखन झालंच. माझ्या सुरुवातीच्या लेखनावर त्यांच्या शैलीचा प्रभाव होता.(कॉपी हो!) हे मी कबूल करते.

माझ्या आवडत्या लेखकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

नाट्यसमाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 May 2020 - 5:56 pm | प्रचेतस

एकदम उत्कट लिहिलंय.

माझंही तुमच्यासारखंच, त्यांचं लेखन एकूण एक वाचलंय. अर्थात नाटकं सोडून, ती आवड मला नाही.

लेखक जातो पण त्याने लिहिलेलं 'अक्षर 'असतंच.

वामन देशमुख's picture

18 May 2020 - 6:04 pm | वामन देशमुख

माझ्यापण आवडत्या लेखकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

गामा पैलवान's picture

18 May 2020 - 6:09 pm | गामा पैलवान

रत्नाकर मतकरींना शांती लाभो. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
-गा.पै.

गणेशा's picture

18 May 2020 - 6:12 pm | गणेशा

स्मृतीस विनम्र अभिवादन
तुमची भावना कळते आहे शब्दात.... वाईट वाटले.

अनिंद्य's picture

18 May 2020 - 7:49 pm | अनिंद्य

मतकरींचा संचार, त्यांची प्रतिभा अनेकांगी होती.
तुम्ही लिहिल्याप्रमाणे लहान मुलांसाठी लिहिणे खरच कठिण आहे, आणि यात मतकरींनी मोठेच काम मागे ठेवले आहे.

चांगल्या स्मृतिलेखांकाबद्दल आभार

मतकरींची खूप पुस्तकं पुलंच्या पुस्तकांप्रमाणे अनेक घरांमध्ये संग्रही असतात. एकदम ट्विस्ट देणाऱ्या भयकथा प्रथम त्यांच्याच पुस्तकांमध्ये वाचल्या गेल्या. अलबत्या गलबत्या नाटक लहानपणी बघितलं होतं. केवळ नॉस्टॅल्जिया म्हणून नवीन संचात हेच नाटक नुकतंच बघितलं गेल्या वर्षी.

त्यांना आदरांजली.

सॅम's picture

19 May 2020 - 11:35 pm | सॅम

मस्त लिहिलेस आजी. रत्नाकर मतकरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

अभिप्रायांना उत्तर द्यायला उशीर झालाय त्याबद्दल सुरुवातीलाच माफी मागते.

प्रचेतस-"एकदम उत्कट लिहिलंय"ही तुमची प्रतिक्रियाही उत्कट वाटली.मतकरी होतेच ग्रेट.ते मला भेटले तेव्हा माझा आवडता लेखक मला भेटला याचा मला आनंद नक्कीच झाला.पण माझीही तेव्हा पन्नाशी उलटली असल्याने कोणतेही"भारावलेपण"नव्हते. त्यांच्या लिखाणात मी काही बदल सुचवले तेही त्यांनी मोठ्या मनाने करुन दिले.

वामन देशमुख,गामा पैलवान,गणेशा : आपण रत्नाकर मतकरी यांच्या स्मृतीस अभिवादन केलंयत. प्रतिसादांबद्दल आभार.

अनिंद्य-"एक चांगला स्मृतिलेखांक" ह्या तुमच्या अभिप्रायासाठी धन्यवाद.

गवि-"पुलं प्रमाणे मतकरींची पुस्तकंही घरोघरी संग्रही ठेवलेली असतात.एकदम ट्विस्ट देणाऱ्या भयकथा त्यांनी लिहिल्या" ह्या तुमच्या अभिप्रायाशी सहमत.

सँम-"मस्त लिहिलेस आजी" - थँक्यू सँम.