।। मुंगूसाची गोष्ट ।।
' गोष्ट ' हा शब्द ऐकल्यावर कान टवकारले जात नाहीत; नीट सरसावून बसत नाही; भुवया आभाळापर्यंत उंचावून उत्सुकता चेहऱ्यावरून सांडत नाही; आपण ज्यांच्याशी गप्पा छाटत होतो त्यांनाच गप्प करत "जरा ऐकू दे रे." असं म्हणत नाही, आहे का असं कोणी? दुसऱ्याही प्रकारचे मनुष्य असतातंच. म्हणजे " हा मला काय अक्कल शिकवणार? ", " हा कुठली गोष्ट सांगणार ते मला माहितेय.", "मला माहीत नाहीत अशा गोष्टीच नाहीत." अर्थात ही वाक्ताडनं मनातल्या मनातंच हो. एकच भुवई तुळशीच्या रोपट्याच्या उंचीपासून हळूहळू माडाच्या शेंड्यापर्यंत नेत नेत नजर वक्त्यावर रोखून ठेवत वरील वाक्ये पुटपुटली जाणं, हे ही नवल नव्हेच.
थोडक्यात काय वय वाढत गेलं की गोष्टींच्या खजिन्याबाहेरील वास्तव कथांचा परिचय रोज होत गेल्याने 'गोष्ट' ग्रहण करण्यातली संवेदनशीलता कमी होत जात असावी. किंबहुना जरी एखादी नवी उत्तम गोष्ट जरी कानावर आली तरी त्याबद्दल मनमोकळी प्रतिक्रिया, सांगणाऱ्याचं कौतुक होईलच असं नाही. बऱ्याच वेळा पूर्ण ऐकून झाल्यावर " ही मी आधी ऐकली/ वाचली होती." अशी भलावण करण्यात येते. म्हणून शैशवात जावं जिथे गोष्टी शाश्वत वाटतात.
कुठे सुरू करू? जेवढं आधीचं आठवतंय तिथं कमालीची आश्वासकता, स्थैर्य, निखळ प्रेम, लाड यांनी लगडलेलं जगाच्या कोलाहलापासून लांब असं एक शांत जीवन होतं. मे मधील सुट्ट्यांचे गावात घालवलेले दिवस व त्यांच्या आठवणी गोंदल्या गेल्यात हृदयावर. त्यात गोष्टींची नक्षीदार सजावट आहे; ज्याला संस्कारांचं कोंदण आहे. (त्याची आज जगाशी लढताना पुष्कळ झीज झालीय खरी) एखाद्या सुरेख बालनाटकातील किंवा बालवाङ्मयातील प्रसिद्ध पुस्तकातील पात्रं जिवंत होऊन त्यांनी आपल्याभोवती फेर धरावा. आणि आपण विसरूनच जावं की आपण तर पुस्तकात जगतोय. सगळंच मनासारखं घडत असतं प्रत्येक पानांत आणि प्रसंगांत. काही हट्ट पूर्ण नाही झाले तरीही त्याची योग्य ती भरपाई केली गेलीच.
दिवसभर कसे दमायचो याचा तपशील देऊ लागलो तर मूळ मुद्दा विश्वाच्या कक्षेबाहेर जाईल. काय काय नव्हतं सांगून ठेवतो. टिव्ही, मोबाईल ( वायफाय नव्हतं हे वेगळं सांगायला हवंच का?) सॅनिटायजर, कॉम्पुटर गेम्स, कॅम्पिंग,( आजोळी तर मी आठवीत जाईपर्यंत वीज पण नव्हती)अजून खूप काही नव्हतं हो. तरी आम्ही सगळी सख्खी चुलत मामे मावस वगैरे भावंडं जिवंत रहायचो. कंबरेत एक चड्डी, अंगात एक बनियन डकवला की दिवसभर आसपासच्या माकडांना लाजवत आरडाओरडा करत हिंडणं, उत्तम प्रतीचे आंबे यथेच्छ रेमटवणं, करवंदांच्या जाळ्यांनी शरीर आणि चिकाने थोबाड रंगवणं, ती करवंदे घरी जाऊन धुवून वगैरे खाणं हे आम्हा प्राण्यांकरता अपमानास्पद नाही का? त्यामुळे निव्वळ परमेश्वराच्या समाधानासाठी चड्डीला ती पुसली की थेट पोटात ढकलणं. जेवणाआधी थोडे साफसफाईचे सोपस्कार व्हायचे पण आजच्या डेटॉलच्या बापातही आमच्यातले ९९.९% जंतू का काय ते नष्ट करायची ताकद नाही. किंवा आम्ही ते पाळले होते असं म्हणा ना. ते धुंद आम्ही बेधुंद. तो साबणात लपलेला लाईफबॉयही ओशाळायचा आणि दुपारी आमच्या बाजूला लोळत कैऱ्या खायचा. त्याला कोणीही घाबरत नव्हतं ना जंतू ना आम्ही ना तो स्वतः.
गोठ्यातील गाईम्हशी बैल व रेडे खरोखरच आमच्यापेक्षा नेहमीच शुचिर्भूत दिसायचे. सकाळ संध्याकाळ आमच्या पायांनी शेण झिजायचे. आमचे ओठ दुवक्त कासंडीतील दुधाच्या फेसाने मिश्या मिरवायचे. जेवणानंतर केळीची पानं त्यांना भरवता भरवता त्यांच्या खरखरीत जिभांनी हात सुखावायचे. दगडी डोणीत तासनतास डुंबताना आम्ही किती पाणी हार्वेस्ट केलं आणि किती वेस्ट केलं याचा हिशोब माहीत नाही. संध्याकाळी मामाच्या दुकानात किंवा समुद्रावर किंवा अंगण्यात वर्ल्ड कप. सूर्य दमून त्याच्या आईच्या कुशीत जायचा पण आमची मस्ती संपायची नाही आणि आमच्या आयांना आमची ओळख पटायची नाही. चहाच्या टपरीवर कप धुताना बघितलं असाल ना? आम्हाला तसं पाण्यातून काढलं की आम्हाला थोडंसं ओळखता यायचं; कपडे बदलणं यासारख्या व्यर्थ गोष्टी यथावकाश पार पडल्या (पाडल्या)नंतर सामूहिक स्तोत्रपठण हा फारच आल्हाददायक, आवश्यक ( अनिवार्यसुद्धा) असा धार्मिक कार्यक्रम थोरामोठ्यांच्या उपस्थितीत संपन्न व्हायचा. मावश्या मामा आजोबा ( सर्व अनेकवचनांत) पुढच्या पडवीत बसून आमच्याकडून अर्धा तास देवांना आळवून घ्यायचे. आम्ही सर्व वानरसेना झोपाळ्यावर. श्लोक / स्तोत्र पाठ असणारे पुढल्या बाजूला व एकूणच ह्या सर्व विषयात फारसं स्वारस्य नसलेले मागच्या बाजूला गोठ्याकडे तोंड करून निर्विकारपणे पोटात उसळलेल्या भुकेचे स्तवन म्हणत असायचे ( मनोमन). दिवसा बॅटिंग बॉलिंग मागूनही कधीच मिळायची नाही तरी रात्री झोपाळ्यावर फ्रंट सीट न मागता धक्काबुक्की न करता नेहमीच ठेवून दिली जायची. " त्वं काल त्रयातीत: ..." असं म्हणताना मागे गोठ्यातून एखादं रेडकू एखादा पाडा किंवा पाडी " हंब्या " असं रेकून मधूनच कोरस द्यायचा. थोड्याच वेळात एखाद्या मावशीला साक्षात्कार व्हायचा की तिचा कार्टा किंवा कार्टी स्तोत्र म्हणत नाहीए मग त्याच्या नावाचा सौम्य रागाने ( खूप पराकाष्ठा करून जमायचं हे) उद्धार व्हायचा. संबंधित व्यक्ती अजून जोरात ओरडून " म्हणतोय ना..अजून काय करू?" असं काहीतरी उत्तर टेकवून द्यायची. यावर प्रश्नकर्त्याचा मुळातच संपायला आलेला संयम खरोखरच संपायचा आणि " तू घरी चल मग तुझा आगाऊपणा बाहेर काढते." या घोषणेने संवाद व परवचा संपायचा.
पेट्रोमॅक्सच्या बत्तीत किडेपाखरं यांच्याशी खेळत मागे गुपचूप बसलेल्या मनीमाऊला पोळीचे तुकडे सारत सारत निद्रादेवी डोळ्यांचा ताबा घ्यायची. काही स्वाऱ्या तर जेवता जेवताच स्वप्नांत जायच्या. एकेक अवतार निद्रिस्त व्हायचे. दिवसभर पराक्रम गाजवत फिरणारी डोंबारी शरीरं आयांच्या एवलुश्या कुशीत नाजूकपणे मुरगुशी मारत मावायची. त्यांच्या कपाळावरुन, केसांतून हात फिरवला जायचा, कधी हातापायाला तेलाचा हात लावला जायचा. " किती तडतड करतो गं तुझा/ तुझी." इथपासून " ह्याच्यावेळी काय पाऊस होता..." अश्या माहेरवाशी गप्पा सुरु व्हायच्या. आमच्या कानात अर्धे अर्धे शब्द शिरायचे उरलेले तिथेच सांडायचे. ते युधिष्ठिराच्या यज्ञात उष्ट्या अन्नात लोळलेले मुंगूस माहितेय ना. आम्ही त्या उष्ट्या आजोळच्या गप्पांमध्ये लोळलोय. आमचं शरीर सोन्याचं नाही झालं पण आमचं शैशव नक्कीच समृद्ध झालं.
( पुढचा भाग लिहायची जब्बर इच्छा आहे. बघू या इच्छा व वेळ यांत कोण जिंकते ते)
- अभिजीत श्रीहरी जोगळेकर
१२.१.२०२०
प्रतिक्रिया
14 Jan 2020 - 9:18 am | नीळा
छान आहे ....
14 Jan 2020 - 4:44 pm | कुमार१
छान आहे .
14 Jan 2020 - 5:48 pm | कंजूस
लिहाच.
15 Jan 2020 - 12:00 am | सौन्दर्य
फारच छान लिहिलं आहे तुम्ही. अगदी त्या काळातील गावातून, घरातून फेरफटका मारून आणलेत म्हंटले तरी चालेल. मला कधीच गाव नव्हते ही खंत कायम आहे. अजून लिहा.
15 Jan 2020 - 10:54 am | पुणेकर भामटा
लिहीत रहा!
15 Jan 2020 - 2:42 pm | शैलेश लांजेकर
आरा रा रा रा रा रा रा रा .. खत्तरनाक... जब्बरदस्त !!