ती सर ओघळता सोबतीस मी झरतो
तो मेघ झुरावा तैसा मीही झुरतो
आपुलेच काही तुटुन ओघळून जावे
खेदात तशा मी कणा कणाने विरतो...
ती सर ओघळता विझती स्वप्नदिवेही
अन दिवसासंगे विझून जातो मीही
अन लख्ख काजळी गगनी दाटून येता
मी आशेचे कण शोधित भिरभिर फिरतो
ती ओघळता मी सुना एकटा पक्षी
पंखांच्या जागी असाह्यतेची नक्षी
शेवटास मीही काव्यपंख लेवून
आठवांभोवती तिच्या नित्य भिरभिरतो
ती सर ओघळता उरे न काही बाकी
सहवास सरे अन अंती मी एकाकी
ती सरीसारखी चंचल आर्त प्रवाही
तिज धरू पाहता मीच दिवाणा ठरतो
©अदिती जोशी
प्रतिक्रिया
3 Dec 2019 - 7:19 am | राघव
ती सरीसारखी चंचल आर्त प्रवाही
तिज धरू पाहता मीच दिवाणा ठरतो मस्त!
चांगली रचना. गीत म्हणणं जास्त योग्य आहे.
कुणी चाल लावली तर आणिक छान वाटेल.
अवांतर :
दिवाणा या शब्दाला चपखल मराठी प्रतिशब्द काय असावा बरे?