युगांतर - आरंभ अंताचा ! भाग ३८

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
26 Aug 2019 - 5:57 pm

"मला हे पटत नाही युवराज!"
"का?"
"हे एका योद्ध्याचे काम नव्हे."
"ते मला माहित नाही. मला इतकंच महत्त्वाचं वाटतं की राजमुगुट त्या पंडुपुत्रांच्या माथी नसला पाहिजे.वारणावतला तुमच्यासाठी महाल बनवलाय म्हणल्यावर बघ कसे सगळे पांडव गेले तिकडे. हावरट कुठले.
"युवराज, त्यांनी विश्वास ठेवला तुमच्यावर. तुम्ही दिलेली भेट म्हणून संशय सुद्धा न घेता गेले ते तिथे. आणि राजगादीचाच प्रश्न आहे, तर त्यासाठी त्यांच्या बळी कशासाठी? तुम्ही द्वंद्वयुद्धाचे आव्हान द्या युधिष्ठिराला. तुमच्यावतीने मी त्याला पराजित करून त्याच्याच हस्ते तुमचा राज्याभिषेक करून देईन."
"आणि असे कोण करू देईल आपल्याला? पितामहं, गुरु द्रोण, कृपाचार्य की विदूर? त्यात विकर्णही असतोच कायम मोडता घालायला. "
"पण म्हणून असा भयंकर मृत्यू द्यायचा? जिवंत जाळायचे पांडवांना?"

"हो." दुर्योधन म्हणाला तसा कर्णाने अविश्वासाने बघितले.
"पण.....राजमाता कुंती सुद्धा आहेत त्यांच्या सोबत."
"त्या राजमातेमुळेच हे सगळं झालयं." शकुनी लंगडत कक्षात आला. "नाहीतर त्यांच्या पंडु महाराजांना कुठे होणार होतं मुल?"
"म्हणजे?" कर्णाने आश्चर्याने विचारले.
"सांगेन तुला नंतर." दुर्योधनाने म्हटले. "तू हे लक्षात घे, की जर राजमाता कुंती नसती, तर राजगादीवर निर्विवादपणे धृतराष्ट्रपुत्रांचाच अधिकार असता. जळू दे तिलाही त्या सर्वांबरोबर."
"इतकी क्रूरता, इतका द्वेष, युवराज? तुम्ही केव्हा पासून असं वागू लागलात, युवराज?"
दुर्योधन विचारात पडला.
"कर्ण, तू नक्की कोणाचा मित्र आहेस?" शकुनीने चिडून विचारलं.
"तुम्हाला शंका वाटते माझ्या मैत्रीनिष्ठेबद्दल? युवराज?"
"नाही!"
"मग या तुझ्या मित्राला तुझ्या शत्रूंचाच जरा जास्त लळा आहे असेही नाही वाटतं तुला?" शकुनीने प्रश्न केला.
दुर्योधनाकडे बघत कर्णाने त्याच्या नजरेला नजर भिडवली. "युवराज, मला कितीही वेळा कुठल्याही प्रकारे तुमच्यात आणि दुसऱ्या कुणात निवड करावी लागली, तर खात्री बाळगा....हा कर्ण केवळ युवराज दुर्योधनाला निवडेल."
आनंदाने दुर्योधनाने कर्णाला मिठी मारायला पुढे आला.
"पण युवराज, मित्र नसो वा कट्टर शत्रू असो. छळ करून मारणे.....मला नाही पटत."
दुर्योधन शांत बसला.
"हा तुझा स्वार्थ तर बोलत नाही ना कर्णा?" शकुनीने दाढी कुरवाळत विचारले.
"कसला स्वार्थ मामाश्री?" दुर्योधनाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिंह उभे राहिले.
"दुर्योधन, कुंतीने याला 'तू माझ्या पुत्रासारखा आहेस.' असे म्हणताना आणि ह्याने तिला दंडवत घालताना मी पाहिलंय माझ्या डोळ्यांनी. त्याला फूस लावलीये तिने, दुर्योधना. म्हणून आता याला कुंती जिवंत हवी आहे. आणि तो अर्जुनही. कारण त्याच्याशी द्वंद्व करून हा कसा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे हे दाखवायचे आहे याला. बोल कर्णा, असत्य आहे हे?"
कर्णाने मान खाली घातली.
"कर्णा?" दुर्योधनाने आश्चर्याने कर्णाकडे बघितले.
"युवराज, मला सांगा, राजगादी मिळवायला तुम्हाला राजमातांना आणि पांडवांना काही करण्याची काय गरज आहे?"
"मग दुसरा काही मार्ग आहे तुझ्याकडे?"

"हस्तिनापुरसोडून कैक संपन्न राज्ये आहेत, युवराज. मी तुम्हाला हवे ते राज्य जिंकून देईन. हवी तितकी भूमी जिंकून देईन."
"पण हस्तिनापुर नाही! हो ना?"
"युवराज, ते तुमचे बंधू आहेत. आप्तजनांचा छळ करून, स्वतःच्याच बंधुंना मारून मिळालेल्या राजगादीवर तुम्ही आनंदाने बसू शकाल?"
"कर्णा, हस्तिनापुर आमच्या पुर्वजांची संपत्ती आहे, वारसा आहे. हक्क आहे कुरुवंशाचा. आणि तो कुरुवंशाच्याच हाती असला पाहिजे."
"मग पांडव...."
"ते कुरुवंशाचे नाहीत."
"मग युवराज?" कर्ण गोंधळला.
"ते वेगवेगळ्या देवांचे पुत्र आहेत, अंगराज. कुरुवंशाचे नाहीत." शकुनी लंगडत कर्णाजवळ येत म्हणाला.
"म्हणजे....मी ऐकलं ते खरं होतं?" विचारात मग्न होत कर्ण म्हणाला.
"काय ऐकलं होतंस?"
"हेच की त्या दिवशी सुर्यास्त झाला म्हणून..... नाहीतर परिणाम...."
"काय बोलतो आहेस? कोणत्या दिवशी?"
"अर्जुनाला आव्हान दिले द्वंद्वाचे त्यादिवशी. युवराज, हे खरे आहे का, की अर्जुन इंद्रदेवांचा पुत्र आहे आणि त्याला ब्रम्हास्त्र चालवण्याची परवानगीसुद्धा आहे?"
"हो अंगराज. त्यादिवशी खरंतर सुर्यदेवांनी उपकार केले तुमच्यावर अस्त होऊन." शकुनी म्हणाला.
"मामाश्री!" कर्ण दुखावला गेल्याच त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते.
"हो कर्णा. आहे त्याच्याकडे ब्रह्मास्त्र.... पण ब्रम्हास्त्र तर माझ्या मित्र अश्वत्थामा कडेही आहे. आणि ते चालवायची त्याच्याकडे परवानगीही आहे." दुर्योधनाने विषय बदलत म्हटले.
"पण युवराज, जर ते देवांचे पुत्र असतील तर कृपाचार्यांनी त्यांना स्पर्धेत उतरूच कसे दिले? कुरुवंशाची राजगादी वंशाबाहेरील व्यक्तीकडे जाऊ नये असा पवित्रा घेतला होता द्रोणाचार्यांनी."
तीचाच मानला जातो. मग नियोग द्वारा मिळालेला असो वा मंत्रप्रसाद म्हणून मिळालेला.' " दुर्योधनाने विदूर सारखे हावभाव करत त्याच वाक्य कर्णाला म्हणून दाखवलं. "पण आता हे जास्त काळ चालणार नाही. आता ही राजनितीही पांडवांसोबत जळून खाक होईल त्या आगीत."
"युवराज, तुम्ही परत...."
"तुझ्याकडे काही उपाय आहे यावर दुसरा?"
कर्णाने काही वेळ विचारात आणि शांततेत घालवला.
"युवराज, माझ्याकडे तूर्तास काही उपाय नाही. पण कोणाला असा मृत्यू देणे, पाप आहे."
"कर्णा, परत तेच? ठिक आहे. तुझा शब्द म्हणून मी ते ऐकेनही...."
"खरचं?" कर्णाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पसरले.
"पण मग तुला माझं जळलेलं शवं बघावं लागेल."
"युवराज?" कर्णाच्या डोळ्यात भिती उतरली.
"आता तू सांग, काय पाहणे परवडणार आहे तुला?"
"युवराज, तुम्ही काय....."
"उत्तर दे."
"युवराज, तुम्ही एकदा विचार...."
"मला उत्तर दे."
"युवराज, मी...."
"उत्तर दे, कर्णा." दुर्योधनाने चढ्या आवाजात विचारले.
दुर्योधन ऐकण्याच्या, समजून घेण्याच्या मनस्थितीत राहिलाच नव्हता, हे कर्णाला कळून चुकले होते. तरी शेवटचे काही व्यर्थ प्रयत्नही करून झाले पाहिले त्याने.
"तुम्हाला माहित आहे उत्तर."
"तुझ्या मुखातून ऐकायचे आहे मला."
"तुम्हाला जिवंत आणि आनंदात बघायचे आहे मला, युवराज. बाकीच्यांची पर्वा नाही मला तुमच्यापुढे."
दुर्योधनाच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. पण कर्णाचा चेहरा पडलेला होता.
"कर्णा, ज्याने माझ्या पित्यांचा अधिकार काढून घेतला....त्यांचा कधी राज्याभिषेक होऊ दिला नाही.... त्या पंडुच्या पुत्रांना माझा अधिकार देणार नाही मी."
"जशी तुमची इच्छा. माझ्यासाठी काय आज्ञा आहे?"
"आज्ञा? तू माझा मित्र आहेस, अरे. दास नाहीस."
"हो, युवराज? मगं मला अशी तुमच्या जीवाची धमकी दिली नसतीत."
"तुला माझा आनंदाचा क्षण साजरा करायला बोलावलं होतं. पण तू तर...." मान फिरवून दुर्योधन आसनावर बसला.
"मला माहिती आहे युवराज, हे वारणावत प्रकरण तुम्हाला नक्कीच नाही सुचलेले. तुम्हाला ओळखतो मी. " शकुनीकडे त्याने तिव्र कटाक्ष टाकला. "आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही. आज्ञा असावी." कर्णाने कक्ष सोडला.
दुर्योधन अस्वस्थ झाला. आज पहिल्यांदा कर्णाला असं निराश झालेले पाहिले होते त्याने. आपण त्याच्या निराशेचे कारण आहोत हा विचारच दुर्योधनासाठी असह्य होता. अर्जुनाला हरवायचे इतके मनावर घेतले असेल कर्णाने, की त्याच्यावर जय मिळवण्याआधी अर्जुनचा मृत्यू कर्णाला अमान्य असेल, असे वाटलेही नव्हते दुर्योधनाला. मेजवर ठेवलेला काठोकाठ भरलेला सोमरसाचा प्याला त्याने उचलून रागात फेकून दिला. फरशी वर सोमरसाचा सडा घालत प्याला भिंतीवर जाऊन आदळला तसे शकुनीने लगोलग सोमरसाने भरलेले मोठे भांडे दुर्योधनाच्या नजरेपासून दूर नेले. काय माहिती अजून काय तोडफोड करेल!
"दुर्योधन, काळजी करू नकोस. कर्ण विसरून जाईल हे काही दिवसात."
"मला नाही वाटतं मामाश्री. पाहिलंत ना तुम्ही कसं वागला आत्ता तो."
"तो तुझ्यावर किती वेळ रुसून राहू शकतो? जाईल तो विसरून."
"मामाश्री, वार्ता आली?"
"नाही अजून. पण येईल. तू खोटे अश्रू तयार ठेवं." विकृतपणे हासत शकुनी म्हणाला.
_______________
रात्रीची वेळ! आगीच्या भयानक ज्वाळा आकाशाकडे झेपावत होत्या. वाऱ्यावर घोंगावत वास्तूला पुन्हा लपेटून घेत होत्या. संपूर्ण महाल 'धु-धु' आवाज करत जळत होता. धूरासारखी भिती ही वातावरणात पसरली होती. मधेच भयावह स्फोट होत होते. त्या आवाजांनी बाहेर जमलेले सगळे अजून घाबरत होते. अंगावर काटा यावा असेच दृश्य होते ते. आग वाढतच चालली होती. अगदी तिव्रतेने. महालाच्या चौफेर त्या आगीचे पडसाद उमटले होते. बाहेर केवळ काही जळलेले अवशेष विखुरलेले दिसत होते. जवळ जायची कोणाचीच हिंमत होत नव्हती. त्या प्रचंड तापमानात, उष्णतेत कोणाचेच वाचणे शक्य नव्हते. महालातून तर काही आरडाओरडा आणि पळापळही झाली नव्हती. सगळे खूप आधीच आगीत होरपळून गेले असणार.... गांधारनरेशना वार्ता द्यायला त्याच्या माणसाने मागच्या मागे पाय फिरवले.
______________

कर्ण विस्तिर्ण आकाशाखाली मोकळ्या बगिच्यात उभा होता. त्याचं स्वप्न त्याच्याच जिवश्च कंठश्च मित्राने एका क्षणात लाक्षागृहासोबत राख केली होती. अमावास्येच्या चंद्रापरी निस्तेज झाला होता त्याचा चेहरा.
अर्जुनाला हरवून द्रोणांना दाखवायचं होतं.... तुमचा अर्जुन एकटा उत्तम धनुर्धारी नाहीये. मी पण आहे. उत्तम धनुर्धारी, उत्तम योद्धा.
"मित्रा...." दुर्योधन कर्णाच्या शेजारी येऊन थांबला.
"प्रणाम युवराज."
"तू अजून चिडला आहेस?"
"तेव्हडा माझा अधिकार आहे कुठे?"
त्याने कर्णाच्या खांद्यावर हात ठेवला.
"मित्रा, तू म्हणालास, तर हस्तिनापूरचा मुकुट तुझ्या मस्तकावर असेल, पुढच्या क्षणी. माझ्या सगळ्या संपत्तीवर अधिकार आहे तुझा, माझ्याकडे असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर अधिकार आहे. आणि जर मला दुखवायचंच असेल तर हे असे परक्या सारखे बोलण्याची गरज नाही. उचल तुझं धनुष्य आणि चालव बाण माझ्यावर. माझ्याकडे नाहीये तुझ्यासारखं कवच. आणि तुझा नेम मी चुकू देणार नाही, वचन देतो."
"युवराज...." कर्ण अस्वस्थ, कष्टी होत म्हणाला.
"मग अर्जुन समज मला हवंतर. निदान त्याला पराजित करण्याचं तुझं स्वप्न तर नाही तुटणार माझ्यामुळे."
"युवराज, काय बोलता आहात तुम्ही?"
"तू सांग... तू का वागतो आहेस असं?"
"कारण मला नाही पटलं ते सगळं. पण तरीही.... तुम्हाला असं बोलून दुखवायचं नव्हत मला."
दुर्योधनाला शांत वाटलं. कर्ण चिडून मैत्री तोडून निघून जाईल अशी वाटलेली भिती फोल ठरली.
"पण दुखावलंस."
"क्षमा असावी."
दुर्योधन खेळकर हसला. "नाही."
"बरं.... मग द्यालं तो दंड मान्य आहे."
"बघ हं...."
"शब्दाचा पक्का आहे मी, युवराज."
"माहिती आहे मला." दुर्योधनाने हसत कर्णासोबत महालाकडे जायला सुरवात केली, "मग या पुढे मला दुर्योधन म्हणून एकेरी हाक मारायची. युवराज वगैरे नाही. मित्र आहोत आपण." कर्ण खजिल होत नुसताच हसला.
______________

©मधुरा

संस्कृतीधर्मलेख

प्रतिक्रिया

तमराज किल्विष's picture

26 Aug 2019 - 8:15 pm | तमराज किल्विष

पद्म, कंपुगिरी आणि डुआयडी हे वेगवेगळे issues आहेत.
कंपुगिरी जाणून घ्यायची असल्यास, एकदा मिपावर फेरफटका मारून ये.
Well, I won't suggest that you should do it.
तिकडे अपमान पण करून मिळतो फुकट. त्यामानाने मायबोली वर अजून हे जास्त पसरलेलं नाहीये.

कंपुगिरी सहसा चांगल्या हेतूने होत नाही. Those who sums up only to show someone down, are part of this.

एखाद्याची योग्य कारणासाठी केलेली पाठराखण किंवा एखाद्याला आपल्या मर्जीने सहमती दाखवत मत मांडणे, त्याच्यावर झालेल्या टिकेला उत्तर देणे, एखादं लेखन आवडून त्याला भरभरून प्रतिसाद देणे याला कंपुगिरी म्हणत नाहीत.

गटबाजी, झुंडशाही असे याचे शाब्दिक अर्थ आहेत.

Submitted by मधुरा कुलकर्णी on 21 August, 2019 - 06:13