काल २५ डिसेंबर २०१८.याच दिवशी २००९ साली ३ इडीयट्स हा सिनेमा रिलीज झाला होता.काल या सिनेमाने १०व्या वर्षात पदार्पण केलं.सिनेमाने त्यावेळी भरपूर गल्ला जमवला.भरपूर प्रबोधन करण्याचाही प्रयत्न केला.
"जे आवडतं,भावतं त्यातंच करियर करा" हा बहुमोल सल्ला या सिनेमाने दिला.आपणही यातल्या सल्ल्यांनी तीन तास का होईना भारावून गेलो.अजूनही बरेचसे प्रबोधनपर प्रसंग आहेत.
या सिनेमातल्या प्रबोधनाची दुसरी बाजू मात्र कोणीच मांडली नाही.तर तीच मांडायला याच सिनेमातली काही पात्रं जमली.बघा ती काय म्हणताहेत.काय चाललंय त्यांचं! :))
पात्रे: चतुर,सुहास,फरहान आणि विरु सहस्रबुद्धे उर्फ व्हायरस सर.सगळे ९ वर्षांनी एकत्र आलेत.
ठिकाण: असाच कुठला तरी महागडा रेस्टोबार.
चतुर: मग! काय म्हणतोस फरहान? कसं काय चाल्लंय?काय करतोस सध्या?
फरहान: काय विच्चारु नका! जाम लोचे झालेत.
चतुर: म्हणजे?नेमकं काय झालंय?
फरहान: काय व्हायचं राहिलंय? ही महागाई रे!सगळंच महागलंय! साले आमच्या कामाचे कॅमेरेपण महागलेत राव! काय करावं गरीबानं?
चतुर: (हसत) तूच काढलेल्या जनावरांच्या फोटोकडे बघत बसायचं आणि सगळं विसरायचं.नाहीतरी तूच म्हणाला होतास ना तुझ्या बाबांना? "गाडी छोटी होगी,घर छोटा होगा लेकीन खुश तो रहूँगा ना पापा" मग आता काय झालं?रहा की खुशीत! आणि तुला शहाणपणा शिकवणारा तो रँचो कुठं गेला?
फरहान: नाव काढू नका साल्याचं! स्वत: आपला बसलाय रग्गड पैसा मिळवून आणि आम्ही इकडे बोंबलत फिरतोय जंगलातून प्राण्यांचे फोटो काढत!
चतुर: का? आता का? अजून ऐक त्याचा सल्ला! त्यावेळीच आमचं ऐकलं असतंस तर? आणि तू तर अॅनिमल प्लॅनेटसाठी काम करायचास ना? छापले असशील की लेका भरपूर!
फरहान: मुर्खपणा केला त्याचं ऐकून.अॅनिमल प्लॅनेटवाल्यांचं पण कंत्राट असतं राव! ती काय कायमची नोकरी थोडीच आहे? आता स्वतंत्रपणे करतो पण त्यात पण जास्त कमाई नाय होत.लोक म्हणतात कसले छान फोटो काढतोस यार प्राण्यांचे! पण ते काढताना अस्मादिकांची काय फा*ते ते कुठं माहित असतं?शिवाय मी काय जगातला एकमेव निष्णात फोटोग्राफर थोडाच आहे?मलाही स्पर्धा आहेच की रे!लॉबिंगही असतं या क्षेत्रात.मी तर भारतीय.डावलतात यार आपल्याला.
बाकी सगळं जाऊ दे रे पण एवढी मरमर मेहनत करुन तेवढा मोबदला पण नै मिळत.
चतुर: अरे मग गेलास कशाला या क्षेत्रात? पैसाच हवा होता तर करायचं ना मन लावून इंजिनिअरिंग!
फरहान: झिंग होती रे झिंग! फोटोग्राफीची.बाप पोसत होता त्यामुळे त्यावेळी एवढं काही नै वाटलं.आता वडील नाहीत.सगळं मलाच बघावं लागतं.
सुहास: अरे येड्या जरा डोकं वापरलं असतंस तर प्रॉब्लेम सुटला असता तुझा!
फरहान: तो कसा?
सुहास: अरे तू वापरतोस ते कॅमेरे बनवणार्या एखाद्या कंपनीतच इंजिनिअर म्हणून नोकरीला लागला असतास तर? नाहीतरी तुला आवड होतीच की वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची! इंजिनिअरिंगची डिग्री+वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड.सहज सिलेक्ट केलं असतं तुला.शिवाय उरलेल्या वेळात किंवा वीकेंडला फोटोग्राफीचा छंदसुद्धा चालू ठेवायचा.हाकानाका!
फरहान: खरंय राव.असंच करायला हवं होतं.आवडीला चांगला बाजारभाव असेल तर सगळं व्यवस्थित निभावतं.शेवटी पैशाचं सोंग आणता येत नाही हेच खरं!
सुहास: त्या रँचोनं मला तरी काय कमी नावं ठेवली होती? पियाला भडकवायचा माझ्याविरुद्ध सांगून! पण पिया गेली ते बरंच झालं.एका इंडस्ट्रीयालिस्टची पोरगी बायको म्हणून लाभली मला.मस्त चालूय आमचं.दोन मुलंही झाली.मज्जानु लाईफ!
"अो व्हायरस सर बोला की,तुम्ही का गप्प?"
व्हायरस: माझा जावई असला तरी आजही मला त्याची सगळी मतं नाही पटत!
मला सांगा ९ वर्षं झाली सिनेमाला.झालाय का परिस्थितीत बदल? थांबली का पोरं इंजिनिअरिंगला जायची? अोस पडली का इंजिनिअरिंग कॉलेजेस? अरे शाखा बदलतायत फक्त.बाजारभाव नसलेल्या शाखांऐवजी मेक,इलेक्ट्रिकल,कॉम्प्युटर अशा शाखांना जातायत पोरं!
त्याच्या मताप्रमाणं सगळेच जर 'तज्ञ' झाले तर कामगार कुठून आणणार? कुठलाही कारखाना,कुठलीही संस्था चालवायला जशी तज्ञांची गरज लागते तशीच अर्धकुशल,अकुशल लोकांचीही गरज लागतेच की! सगळेच तज्ञ झाले आणि आम्ही साधी सोपी कामं करणार नाही.चॅलेंजिंग कामंच करणार,अमुक एक काम माझ्या पात्रतेपेक्षा खुप कमी दर्जाचं आहे मी नाही करणार असं म्हणू लागले तर तो उद्योग,ती संस्था व्यवस्थित चालेल का?
मी कोकीळेच्या घरट्याचं उदाहरण द्यायचो,चंद्रावर दुसर्यांदा पाऊल ठेवणार्या माणसाचं नाव विचारायचो तर ते त्याला आवडायचं नाही.माझीच टर उडवायचा!
मला सांगा स्पर्धा कुणाला चुकलीय हो? अगदी तो म्हणतो त्या 'तज्ञांनाही' ही स्पर्धा चुकलेली नाही.तुम्हाला माहिताय? फोनच्या शोधावर ग्रॅहम बेलसारखंच थॉमस एडीसन सुद्धा संशोधन करत होता.बेलचा पेटंटचा अर्ज एडीसनच्या आधी २ तास पोहचला आणि फोनचा संशोधक म्हणून ग्रॅहम बेलचं नाव झालं;पण यामुळे एडीसनच्या शोधाचं महत्त्व कमी नाही ना होतं? अर्ज २ तास वेळाने पोहचला याची चुटपूट एडीसनला होतीच आणि आपला अर्ज २ तास आधी पोहचल्याने पेटंट आपल्याला मिळालं हे पाहून बेल काय खुश झाला नसेल?
याच एडीसन आणि टेस्लाचं करंट वॉर तर जगजाहीर आहे.समान प्रकारचा व्यवसाय करणार्या मोठमोठ्या कंपन्यांमधे कंत्राट मिळवण्यासाठी असणारी जीवघेणी स्पर्धा काय मी सांगायला हवी?
"काबील बनो,कामयाबी झक मारके पीछे आ जाएगी" म्हणताना स्पर्धा सर्व स्तरांवर असू शकते हा संदेश त्यानं दिलाच नाही.जगात सगळे रिप्लेसेबल आहेत.अमेरिकेच्या इतक्या अध्यक्षांचे खून झाले.थांबली का अमेरिकेची प्रगती?कोणाहीसाठी जग थांबून राहत नाही.स्वत:चं वेगळेपण जरुर जपावं पण आपणच एकमेवाद्वितीय असल्याच्या डिंग्या मारु नयेत हे या पठ्ठ्यानं शिकवलंच नाही.
त्या SOM च्या दातार सरांना पण किचकट व्याख्यांची सक्ती कशाला करता म्हणून ऐकवलं होतं.पण लेका तू परीक्षेत काय लिहिलंस? तेच लिहिलंस ना? ते लिहूनंच पहिला आलास ना? काही काही व्याख्या किचकट असतातंच; पण त्या तशा का असतात याचा विचार केला का कधी यानं?व्याख्या अशा चौकटबंद करण्यामागं कारणं असतात.त्या बनवणारे भांग पिऊन बनवत नाहीत रे!
सुहास: मला तर 'गधा' म्हणाला होता. का? तर मी इंजिनिअरिंग केलं नंतर MBA केलं आणि त्यानंतर अमेरिकेत बँकेत नोकरी करतो म्हणून.मला सांगा काय चुकलं माझं? बरेच लोक करतात असं.शेवटी आपण शिक्षण घेतो कशाकरता? पैसे मिळवण्यासाठीच ना? शिक्षणावर एवढा वारेमाप खर्च करुन त्याचा परतावा मिळावा असा मी विचार केला तर ते चुकीचं कसं? भारतातली शिक्षणव्यवस्था इतकी दर्जेदार आहे का की ज्या शाखेत शिक्षण घेतलंय त्याच क्षेत्रात बराच काळ नोकरी,व्यवसाय करता येईल अशी? मग नसेल तर त्याचा दोष आम्हाला का?
शिवाय जी अमेरिकन बँक मला पगार देते त्या बँकेला माझ्यात काहीतरी कॅलिबर दिसलं म्हणूनच तर लठ्ठ पगाराची नोकरी दिली ना? मी ज्या बँकेत काम करतो ती अमेरिकतल्या टॉपच्या १० बँकांपैकी एक आहे.ती अशी सहजच निवडेल का आपला एम्प्लॉयी?
चतुर: सगळ्यात जास्त त्रास त्यानं मला दिलाय.त्याच्यामुळे मी खुप अपमान,फजिती सहन केलीय.मी पैशाच्या मागं धावतो म्हणून मला हसायचा.अरे लेका पण तुझं संशोधन पुढं चालण्यासाठी,महागडी मशिनरी खरेदी करण्यासाठी जो पैसा लागतो तो माझ्या कंपनीसारख्या बलाढ्य कंपन्याच करु शकतात एवढंही नाही कळलं तुला? माझ्या टॅलंटचं मोजमाप मला पोसणारी कंपनी करेल की. तू का डोक्याला ताप करुन घेतोस?एवढ्या मोठ्या कंपनीनं मला काय उगाच नोकरी दिली?
फार कशाला आपल्याला घेऊन कथा रचणारा तो चेतन भगत पूर्वी इन्वेस्ट्मेंट बँकींगच्या क्षेत्रात आणि आता लेखनाच्या क्षेत्रात का बरं काम करतो? का बरं आयआयटीतून शिकला? लेखकच व्हायचं होतं तर आर्टस् का घेतलं नाही? का वेळ आणि पैसा वाया घालवला इंजिनिअरिंगमधे? आहे का उत्तर? अरे हा भारत आहे.इथे आवडीपेक्षा पोट भरण्याची क्षमता पाहूनच कोर्सेस निवडले जातात.
रँचो सारखा सांगत असतो आवडतं तेच करा,त्यातंच करियर करा.अरे पण त्या आवडीलासुद्धा स्तर असतील ना रे? समजा दोन मुली आहेत,दोघीही गायिका आहेत.पण त्या दोघी समान पात्रतेच्या गायिका असतील का? दोघींना मिळणारी गायनाची संधीही समान असेल का? एक बॉलिवुडसाठी गाईल आणि दुसरी मात्र भजनी मंडळात,वनिता समाज मंडळात कार्यक्रम करत राहू शकते.टॉपला जाण्यासाठी फक्त प्रतिभा,बुद्धीमत्ता असून उपयोगाचं नाही.लॉबिंग,पॉलिटिक्स,डावे-उजवेपणा अशा अनेक गोष्टी असतात.तुम्ही नाही तर दुसरा संधी घ्यायला बसलेलाच असतो.काम व्हायला वेळ लागू शकतो पण तुमची जागा कोणी घेऊच शकत नाही असं काही नाही.
व्हायरस: त्या जॉय लोबोनं आत्महत्या केली तर किती दंगा केला रँचोनं.अर्थात त्याच्या आत्महत्येचं मलाही वाईट वाटलं होतंच.मी असेन थोडा फटकळ.नव्हे आहेच! पण मी एकट्या जॉय लोबोला थोडंच बोलायचो? सर्वांनाच बोलायचो.तो माझ्या शिस्तीचा भागच होता.
मी बोलतो म्हणून जॉयच्या आणि माझ्या मुलाच्या आत्महत्येचं खापर माझ्यावर फोडलं.मला सांगा उद्या ही मुलं जेव्हा नोकरीला जातील किंवा काही व्यवसाय करतील त्यात जर बॉस फटकळ मिळाला,कलिग्ज बुलियिंग करायला लागले किंवा व्यवसायात फेवरेबल कंडीशन नसली तर काय करतील ही मुलं? इतका हळवेपणा घेऊन या जगात जगणं शक्य नाही.कणखर व्हायला हवं. वेळप्रसंगी अरे ला कारे करता यायला हवं हे यांना कळायला नको? यांचे पालक हव्या त्या गोष्टी मागितल्याबरोबर लगेच हजर करत असतील तर यांना नकार कसा पचवायचा आणि त्यातून कसं सावरायचं हे कळणारंच नाही.
फक्त आयक्यू चांगला असून उपयोग नाही.ई क्यू पण चांगला हवा ना? लता मंगेशकरांचं उदाहरण रँचो द्यायचा.कधी मेहनत बघितली का लताबाईंची? सचिन तेंडुलकरचं उदाहरण देतोस पण सचिनचा भावनांक बघितलास का? शतक पूर्ण व्हायला अवघ्या काही रन्स बाकी असताना तो आऊट झाला तर रागाच्या भरात बॅट फेकली किंवा पंचांशी वाद घातलाय असं एकदातरी पहायला मिळालंय का सचिनबाबत?आता झालेली चूक पुन्हा होऊ द्यायची नाही यासाठी सचिन किती सजग असायचा ते बघ म्हणावं! अशी एक का अनेक उदाहरणं आहेत गुणवंतांची.पण या 'माहिमच्या हळव्यांचं' खापर मात्र माझ्यावर फोडलं! ते मनानं दुबळे निघाले त्याला मी काय करु?
सुहास: (हसत) कंट्रोल उदय कंट्रोल!!!
व्हायरस: जाऊ द्या.आता बोलून काय उपयोग? शेवटी आपण काय सिनेमातली पात्रं.लेखक लिहील तसं वागायचं.पण आपल्याला काय बुवा हा अन्याय पटला नाय!
चतुर: काय करुया मग सर?
व्हायरस: आपण पण सिनेमा बनवायचा.हिरानीनं 'तीन मुर्ख' बनवला ना? आपण 'साडेतीन शहाणे' बनवायचा.
फरहान: कोण साडेतीन शहाणे?
व्हायरस: मी,सुहास,चतुर तीन पूर्ण शहाणे आणि तुला आत्ता आत्ता आयुष्याच्या मध्यावर अक्कल यायला लागलीय म्हणून तू अर्धा शहाणा! असे आपण साडेतीन शहाणे!
सुहास: नक्की बनवा असा सिनेमा सर! जगाला दुसरी बाजू पण दिसली पाहिजे.आपल्यावरचे हे कलंक पुसले गेलेच पाहिजेत.
चतुर: कचकून अनुमोदन! फायनान्स मी करतो.
फरहान: भावा सिनेमॅटोग्राफीचं काम मला दे.भरपूर बिलं थकलीयत.तेवढीच गरीबाला मदत!
चतुर: अरे आता तू आमच्यात आलास ना! मग चिंता छोड यार!
फरहान: थँक्स भावा!
चतुर: चलो! इसी बात पे अौर एक एक पेग हो जाए।
व्हायरस,फरहान,सुहास: आमेन!!!!
प्रतिक्रिया
26 Dec 2018 - 8:00 pm | बबन ताम्बे
दुसरी बाजू ही पटतेय ! :-)
26 Dec 2018 - 10:20 pm | दुर्गविहारी
विचार प्रवर्तक धागा. मस्त लिहीले आहे.
27 Dec 2018 - 7:08 am | अर्धवटराव
साडेतीन शहाणे भारी निघालेत :)
फरहानचं परिक्षा तोंडावर आली असताना डिग्री नाकारणं काहि पटलं नव्हतं. डीग्री पूर्ण करुन, नोकरी करत आरामात छंद जोपासता आला असता. किंबहुना पैसे साठवुन छायाचित्रकलेचा एखादा विषेश कोर्स करता आला असता. आवडीच्या क्षेत्रात काम करणं चांगलं हे कबुल. पण समोर आलेलं काम आवडीने करणं जास्त महत्वाचं असतं. शिवाय छंदाचें व्यवसायात रुपांतर करणं हि एक वेगळीच कला आहे. ति नाहि जमली तर बोंबला.
आपल्या आवडीचे काम करावे हि एक बाजु. पैशाचं काम पैशाकरता करावं, आवडीचं काम आनंदाकरता करावं हि दुसरी बाजु. बाकी मज्जानु लाईफ.
27 Dec 2018 - 6:24 pm | मुक्त विहारि
आणि आवडीचं काम आनंदाकरता करावं हि दुसरी बाजु. बाकी मज्जानु लाईफ....
एक नंबर...आमच्या तर्फे तुम्हाला एक बियर कट्टा लागू....
(स्वसुखा किवा स्वसमाधाना साठी, शेती करणारा) मुवि
29 Dec 2018 - 8:48 pm | नाखु
अराजकीय असल्याने धुरळा उडवत नेहमीचेच खेळाडू येणार नाहीत, त्यामुळे धगधगता राहणार नाही.
पण अगदी मूलभूतजीवनावश्यक अश्या प्राधान्य क्रम कशाला द्यावं यावर खुमासदार शैलीत केलेले भाष्य आवडले.
लग्नाच्या बाजारापासून ते समाजाच्या सर्व व्यवहारात आर्थिक पत प्रतिष्ठा हीच ओळख असते,उघड कुणी मान्य करीत नाहीत पण अर्थाजनासाठी व स्वान्तसुखाय वेगळं असं असू शकते यावर हंस दिवाळी अंकात सातारा येथील डॉ.दाते यांचा लेख आवर्जून वाचावा.
अंक जालावर उपलब्ध नाही.
एक वेगळी दिशा दाखविली याबद्दल धन्यवाद.
पांढरपेशा मिपाकर वाचकांची पत्रेवाला नाखु
27 Dec 2018 - 8:25 am | गवि
अगदी उत्तम प्रकारे बाजू मांडली आहे. प्रत्येकाची परिस्थिती निराळी, फिलॉसॉफी निराळी. फक्त रँचोचीच बाजू सिनेमात पुढे आली. तेही ठीकच. रँचोसारख्या लोकांचंही महत्व आहेच.
चित्रपट ही एक कलाकृती असल्याने त्यात प्रत्येक वेळी सर्व बाजू समतोल दाखवून बॅलन्स साधलाच पाहिजे अशी अपेक्षा करता येणार नाही.
पण लेखात मांडलेली बाजू अगदी उत्तम मांडली आहेत. ही बाजू लिहिणं आवश्यक होतं. सर्व विचार चित्रपट पाहून मनात येऊन गेले होते हे जाणवलं.
27 Dec 2018 - 11:01 am | विशुमित
सर्व विचार चित्रपट पाहून मनात येऊन गेले होते हे जाणवलं.
==))अगदी अगदी
27 Dec 2018 - 9:30 am | टर्मीनेटर
रील आणि रियल लाईफ मधल्या तत्वज्ञानातली तफावत छान मांडली आहे.
पुढील लेखनास शुभेच्छा!
27 Dec 2018 - 2:36 pm | उपयोजक
टर्मीनेटरजी!! :)
27 Dec 2018 - 3:48 pm | फुटूवाला
हेच म्हणतो....
27 Dec 2018 - 9:59 am | भावना कल्लोळ
मस्त.. रील आणि रिअल लाईफ मधली तफावत छान पणे मांडली आहे
27 Dec 2018 - 10:56 am | पिंगू
ह्येला म्हणत्यात रियल लाईफ..
27 Dec 2018 - 11:02 am | चिनार
फार छान जमलंय...मस्त लेख..
मला असंच जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमाविषयी लिहायचं आहे..
27 Dec 2018 - 5:44 pm | भुमन्यु
चित्रपट एकच बाजु दाखवतोय, पण चतुरने जे मोठ्या कम्पन्यांबद्दल जे लिहिलय ते पण खुप खरय.
27 Dec 2018 - 5:51 pm | अनिंद्य
धमाल लिहले आहे :-)
27 Dec 2018 - 6:21 pm | मुक्त विहारि
खरोखरच उत्तम...
27 Dec 2018 - 8:12 pm | जेम्स वांड
हे जे काही लिहिलंय ते अजिबात पटलेलं नाही, खासकरून "तू आता आमच्यात आलास" वगैरे अटीतटीला येऊन लिहिल्या सारखी वाक्ये मला खास काही आवडलेली नाहीत अजिबातच. आपण सगळेच मध्यमवर्गीय आहोत, सिक्युरिटी सिक्युरिटी करत आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग सरळ राईट ऑफ केले जाणे अजिबात पटणारे नाही मला तरी.
वैयक्तिक मत. दुखावले गेल्यास क्षमस्व.
(वेळीच हिम्मत गोळा करून 'सिक्युरिटी' न सोडता आल्यामुळे फसलेला) वांडो.
28 Dec 2018 - 11:12 pm | उपयोजक
तो त्या पात्राचा स्वभाव आहे.ते पात्र तसंच रँचोचा द्वेष करणारंच आहे.ते तसंच वागणार.
दुसरं असं की 'आऊट अॉफ द बॉक्स' थिकींगला कोणाचीच ना नाही.पण या अशा आयडिया प्रत्यक्ष व्यवहारी जगात कमर्शिअली उतरवायच्या म्हणजे पैसा हा लागणारंच ना? मग अशा कल्पनेवर पैसा लावताना त्यात शंभर टक्के फायदा जरी नाही झाला तरी कमीतकमी नुकसान होतंय का हेच कोणताही धनको बघेल ना? का रँचोला वाटलं म्हणून लगेच पैसा अोतायचा? त्याची आयडीया आऊट अॉफ द बॉक्स असेलही पण व्यवहारी जगात ती अयशस्वी झाली तर रँचो घेणार का ती जबाबदारी?
अशा कल्पनांचं इम्प्लिमेंटेशन हा मुद्दा कदाचित असेलही पण त्यातही सगळ्या गोष्टी गृहितंच धराव्या लागतात.चिक्कार फॅक्टर असू शकतात जे केलेले अंदाज चुकवतील.ते रँचो किंवा त्याच्या कल्पनेवर पैसे लावणार्या कंपनीच्या कक्षेबाहेरचेसुद्धा असू शकतात ना? १००% अचूक अंदाज जर कोणीच करु शकत नसेल तर सुरक्षितता विचारात घ्यावीच लागणार.कॅल्क्युलेटेड रिस्कच घ्यावी लागणार.ब्लाईंड रिस्क घेणं मुर्खपणाचं ठरेल ना?
28 Dec 2018 - 11:14 pm | उपयोजक
तो त्या पात्राचा स्वभाव आहे.ते पात्र तसंच रँचोचा द्वेष करणारंच आहे.ते तसंच वागणार.
दुसरं असं की 'आऊट अॉफ द बॉक्स' थिकींगला कोणाचीच ना नाही.पण या अशा आयडिया प्रत्यक्ष व्यवहारी जगात कमर्शिअली उतरवायच्या म्हणजे पैसा हा लागणारंच ना? मग अशा कल्पनेवर पैसा लावताना त्यात शंभर टक्के फायदा जरी नाही झाला तरी कमीतकमी नुकसान होतंय का हेच कोणताही धनको बघेल ना? का रँचोला वाटलं म्हणून लगेच पैसा अोतायचा? त्याची आयडीया आऊट अॉफ द बॉक्स असेलही पण व्यवहारी जगात ती अयशस्वी झाली तर रँचो घेणार का ती जबाबदारी?
अशा कल्पनांचं इम्प्लिमेंटेशन हा मुद्दा कदाचित असेलही पण त्यातही सगळ्या गोष्टी गृहितंच धराव्या लागतात.चिक्कार फॅक्टर असू शकतात जे केलेले अंदाज चुकवतील.ते रँचो किंवा त्याच्या कल्पनेवर पैसे लावणार्या कंपनीच्या कक्षेबाहेरचेसुद्धा असू शकतात ना? १००% अचूक अंदाज जर कोणीच करु शकत नसेल तर सुरक्षितता विचारात घ्यावीच लागणार.कॅल्क्युलेटेड रिस्कच घ्यावी लागणार.ब्लाईंड रिस्क घेणं मुर्खपणाचं ठरेल ना?
27 Dec 2018 - 8:23 pm | खिलजि
मस्तच लिवलंय , साहेब .. जब्बर्राट
27 Dec 2018 - 8:43 pm | चित्रगुप्त
लेखात मांडलेली मते पटण्यासारखी असली, तरी शेवटी ज्याचे त्याचे नशीब/नियती हेच खरे.
28 Dec 2018 - 6:39 pm | सिरुसेरि
राजु रस्तोगी राहुन गेला की .
28 Dec 2018 - 11:35 pm | उपयोजक
राजूचा ब्लॉग बरा चाललाय! बरे पैसे मिळतायत त्याला.कन्सल्टंसी आहे स्वत:ची.बरे पैसे मिळवतोय तो! :))
29 Dec 2018 - 4:58 pm | पद्मावति
मस्तच :)
31 Dec 2018 - 12:12 pm | चिर्कुट
न आवडल्यामुळे आणि तसं जगजाहीर केल्यामुळे मित्रांच्या बर्याच शिव्या खाल्ल्या होत्या. तेव्हां जे काही खटकलं होतं, ते नीट शब्दात मांडता आलं नव्हतं, या लेखात बरचसं कव्हर झालंय असं वाटतय.
रँचोची बाजू वरचढ दाखवण्यासाठी इतरांची चेष्टा करावी लागली, यातच सिनेमाचा उद्देश फसला असं वाटलं.
31 Dec 2018 - 12:48 pm | मराठी कथालेखक
मला तसाही थ्री इडियट्स फारसा आवडला नव्हता.
बरंचसं अतर्क्य होतं त्यात. रॅंचोचं काही तत्वज्ञान ठीक होतं पण सगळंच नाही.
पोट भरता येईल पण तरी काहीसं आवडीचंच असेल असं काम घेवून जे खूप जास्त आवडीचं असेल असं काम म्हणजे छंद जोपासावा हा सर्वात व्याहवारिक विचार होईल.
नावडतं काम जबरदस्तीने करत रहा असं म्हणणं अयोग्य पण सर्वाधिक आवडीच्या कामाचे (छंद) पोटापाण्याच्या व्यवसायात रुपांतर करता येईलच याची खात्री नसेल किंवा त्याकरिता लागणारा काळ/ पैसा ई देणं शक्य नसेल तर या दोन टोकांच्या मधलं म्हणजे अगदी छंद नसलेलं पण नावडतंही नाही म्हणजे माफक आवडीचं काम पण ज्यात पैसा लवकर आणि ठीक ठाक प्रमाणात हाती येवू शकेल असं काहीसं घेवून छंदाकरिता वेळ देणं सुरु ठेवावं असा मध्यम मार्ग काढता येईल.
8 Jan 2019 - 8:00 am | लई भारी
शेवटच्या २ प्रतिक्रिया सारखीच भावना आहे :)
ही दुसरी बाजू आवडली.