कालच दिवसभराची धावपळ झाल्याने सर्व मंडळी दमली होती. त्यामानाने आजचा दिवस लीजर डे होता. त्यामुळे आज उशिरा निघायचे आणि वाटेत एक दोन गोष्टी बघून अहंगामा मुक्कामी पोचायचे एव्हढाच प्रोग्रॅम होता.
सकाळ उजाडली तेव्हाच "आज स्विमिंग पूलमध्ये उतरायचे आहे" असे मुलांनी आधीच जाहीर करून टाकले होते. त्यामुळे फार वेळ ना घालवता नाश्ता केला आणि सर्व तयारी घेऊन पूलमध्ये उतरलो.सुदैवाने फार पर्यटक नव्हते आणि असलेले चेक औत करायच्या मार्गावर होते त्यामुळे जणू सगळं पूल आम्हालाच आंदण दिल्यासारखा वाटत होता.येत असलेले नसलेले पोहण्याचे सगळे प्रकार करून झाल्यावर मग पाण्यात कबडडी डॉज बॉल वगैरे खेळायला लागलो. या सगळ्यात १-२ तास कसे गेले समजलेच नाही. मग मात्र दिवस डोक्यावर येऊ लागला आणि ऊन वाढू लागले तशी वेळेची जाणीव झाली. बाहेर येऊन आवरते घेतले आणि चेक आउट करून पुढच्या प्रवासाला लागलो.
वाटेत एक प्रचंड बुद्ध मूर्ती दिसली तिकडे पायउतार होऊन फोटो वगैरे काढले आणि पुढे निघालो.
आता आम्ही हळूहळू विषुव वृत्ताकडे येत चाललो होतो त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढत होता.पण रस्ता समुकद्रकिनाऱ्याने जात असल्याने नेत्रसुखद वाटत होते.वाटेत हंबनटोटा विमानतळ असल्याने अचानक रस्ता चकाचक झाला आणि बराचवेळ गाडी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून जात आहे असेच वाटत राहिले.रस्त्यावरची रहदारी तुरळक होती त्यामुळे प्रवास सुखकर वाटत होता. डाव्या हाताला समुद्रकाठी तयार झालेली लगून्स दिसत होती. कुठे कुठे कोलंबी शेती केलेली दिसत होती.
२-३ तासात मातारा हे शहर आले. उपुलला इथे त्याचा मित्र भेटणार होता म्हणून त्याने गाडी थांबवली.आम्हीही पाय मोकळे करायला खाली उतरलो.
समोरच अर्धा किलोमीटर अंतरावर समुद्रात एक बेट तयार झाले होते आणि त्यावर एक बुद्ध मंदिर होते. मुख्य भूमी आणि बेटाला जोडणारा एक सस्पेन्शन ब्रिज होता.
पण वेळेअभावी आणि कडक उन्हाच्या त्रासाने आम्ही तिकडे न जाता किनाऱ्यावरूनच फोटो काढणे पसंत केले. थोड्या वेळातच उपुलचे कामही झाले आणि आमचा पुढचा प्रवास सुरु झाला.
वाटेत मध्ये मध्ये थांबून शहाळी पिणे चालूच होते. इथे वेगळीच केशरी रंगाची शहाळी सगळीकडे विकायला असतात. साधारण ७० ते १०० रुपयाला एक. (श्रीलंकन २ रुपये म्हणजे आपला १).
कडक उन्हाच्या त्रासाला दूर ठेवण्यासाठी ते आवश्यकच होते. शिवाय बाटल्यामध्ये टँग/ ग्लुकोन डी वगैरे करून ठेवले होतेच.
साधारण तासाभराने आमचे मुक्कामाचे हॉटेल आलेच.
इतक्या सुंदर ठिकाणी ते बांधले होते कि हॉटेलच्या दारात आडवा रस्ता आणि त्यानंतर समुद्रच समुद्र दिसत होता.हॉटेलच्या रूम इतक्या मोठ्या होत्या की एकेका रूममध्ये ७-८ जण तरी राहू शकतील. प्रत्येक रूममध्ये २ डबल बेड होते. शिवाय बाथरूममध्ये टब बाथ आणि जाकुझीची सोय. एकूण मंडळी खुश झाली.
भर दुपारच्या उन्हात जेवायची इच्छा तर होता नव्हती पण सकाळचा नाश्ता करून ४-५ तास झाले असल्याने काहीतरी खाणे भागच होते. हॉटेल नवीनच बांधले होते त्यामुळे स्टाफ फारच अगत्यशील होता.शिवाय मुख्य गावाच्या म्हणजे मिरिस्सा बीच च्या बरेच पुढे हे हॉटेल होते त्यामुळे पर्यटक फारसे नव्हते. उशीर झाला होता तरी मुख्य शेफने पुढे येऊन आमची चौकशी केली आणि जेवायला व्हेज मध्ये काय काय बनू शकेल ते सांगितले. आम्ही वाटेत दह्याचे मोठा पसरट भांडे म्हणजे साधारण किलोभर दही घेतले होते त्यामुळे नुसता भात मिळाला तरी आम्हाला चालणार होता. पण त्याने भाताबरोबर श्रीलंकन करीपण बनवली आणि जोडीला पापड भाजून दिले. त्यामुळे जेवणाची मजा अजूनच वाढली.
आज फार काही करायचे नव्हतेच त्यामुळे २ तास आराम केला आणि संध्याकाळी थोडा वेळ समुद्रावर खेळायला गेलो.
उद्या पहाटे ६ ला उठून मिरिस्सा बीचला व्हेल वॉचिंगसाठी जायचे होते त्याची तिकिटे (साधारण २१० यु.एस.डी ) आजच घेऊन ठेवली होती .त्यामुळे फार वेळ न जागता जेवून झोपी गेलो.
प्रतिक्रिया
25 Nov 2018 - 3:09 pm | अनन्त अवधुत
ह्या भागात सगळी छायाचित्रे दिसतात. बुद्धांचा उजवा हात, अर्धवट दिसतो. त्यात मनगट आणि बोटे दिसत नाहीत. मूर्ती अजून पूर्ण नाही कि फोटो तसा आलाय?
25 Nov 2018 - 3:26 pm | राजेंद्र मेहेंदळे
तसाच आहे तो मुर्तीचा हात
27 Nov 2018 - 2:07 am | अनन्त अवधुत
हॉटेलचा नजारा मस्त आहे
25 Nov 2018 - 6:08 pm | दुर्गविहारी
वा ! हा भाग झक्कास जमून आला आहे. आता जाउ द्या गाडी जोरात. पु.भा.प्र.
25 Nov 2018 - 9:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
हा भागही मस्तं. चित्रांचे गणित छान जमले आहे !
28 Nov 2018 - 9:29 am | सुधीर कांदळकर
वर्णन, चित्रे दोन्ही झकास. श्रीलंकेचा फारसा वाचनात न आलेला प्रदेश. हंबनटोटाला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना हल्लीच खेळला गेला. तेव्हा हे नाव ऐकूनच गंमत वाटली होती.
वेळात वेळ काढून छान लिहीत आहात. मस्त लेखाबद्दल धन्यवाद.
28 Nov 2018 - 11:41 am | राजेंद्र मेहेंदळे
खरच वेळात वेळ काढावा लागतोय. एक दोन भाग लिहुन ठेवलेत पण टाकायला वेळ होईना सध्या.