नमस्कार मंडळी
रोजच्या कामकाजाच्या धावपळीतून कधीकधी जरा विश्रांती मिळावी आणि कुटुंबाबरोबर चार निवांत क्षण घालविता यावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.पण वेळ, सर्वांच्या सुट्ट्या आणि पैसे असे सर्व गणित नेहमीच जमते असे नाही.
या वर्षी मुलांना जशा दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर झाल्या तेव्हाच आमचे फिरायला जायचे नक्की झाले होते.पैशांची जमवाजमव एकीकडे चालू होतीच.पण याहीवर्षी परिस्थिती काही फार वेगळी नव्हतीच. मध्येच कधीतरी "दिवाळीच्या सुटीत कुठे जायचे ते लवकर प्लॅन करूया " असा विषय निघायचा पण मग(सगळ्या वरकिंग कपल सारखाच) आत्ता वेळ नाही रविवारी बसून ठरवू असे बोलून त्याचा समारोप व्हायचा.सुदैवाने एक रविवार मुहूर्त लागला आणि मग आम्ही दोघांनी आपापले लॅपटॉप घेऊन आंजावर शोधाशोध सुरु केली. प्रथम देशातली न बघितलेली ठिकाणे बघू म्हणून सुरु झालेला विषय हळूहळू नेपाळ भूतान ब्रम्हदेश अंदमान लक्षद्वीप दुबई सिंगापूर असा देशाबाहेर जाऊ लागला.
ह्यात सगळ्यात मुख्य निर्णय बजेटवर अवलंबून होताच शिवाय मुले लहान असल्याने खाणेपिणे काय मिळेल वातावरण कसे असेल त्यांना आवडणाऱ्या गोष्टी असतील का वगैरे बाजू होत्याच. दुसरीकडे जायचा यायचा प्रवास विमानानेच करणे भाग होते त्यामुळे ती तिकिटे किती महाग पडतील ह्यावर सुद्धा निर्णय अवलंबून होता.
या सगळ्या ब्रोकर वेबसाईट जसे कि मेक माय ट्रिप,यात्रा,गो आय बीबो यांची लबाडी अशी असते की एकाच आय पी ऍड्रेस वरून तुम्ही पुन्हा पुन्हा एकाच मार्गाची विमानाची तिकिटे बघत राहिलात तर आपले विशिष्ट अल्गोरिदम वापरून त्यांची सिस्टीम ते शोधून काढते आणि मग त्या तिकिटांची किंमत भराभर वाढत जाते म्हणजे अगदी दरवेळी नवीन किंमत दिसू लागते. त्यामुळे पाच मिनिटांपुरवी आपण नक्की कुठल्या वेबसाईट वर किती किंमत बघितली होती याचा गोंधळ उडतो.त्यामुळे इनकॉग्निटो मोड वापरून बुकिंग करणे फायद्याचे ठरते.(हे मला थोडे उशिराच समजले पाने तरीही वाचकांच्या माहितीसाठी सांगतोय ) आणि शिवाय शक्यतो एकाच वेळी बसून हि सर्व कामे संपवलेली चांगली कारण मग किमती वाढलेल्या बघून "अरेरे कालच बुकिंग केले असते तर..."अशी पस्तावायची वेळ येऊ शकते
दुसरा महत्वाचा विषय होता व्हिसा. कुठल्या देशाचा व्हिसा ऑनलाईन/ऑन अरायव्हल मिळतो , किती किंमत आहे , विमानात बोर्ड करायला आधी व्हिसा लागतो का (उदा.दुबई) हि सर्व चर्चा चालू होती.
तिसरा महत्वाचा विषय म्हणजे चलनाचा एक्स्चेंज रेट किती पडेल आणि कुठे कुठे क्रेडिट कार्ड चालेल (काय करणार उधार कि जिंदगी ). अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्यावर बजेटच्या दृष्टीने दुबई सिंगापूर मागे पडले तर खाण्यापिण्याची गैरसोय होऊ शकेल यामुळे भूतान मागे पडले. थन्डीचे दिवस आहेत म्हणून नेपाळ नको असे करत करत शेवटी दक्षिणेकडचा श्रीलंकेचा पर्याय समोर आला.
भारतीय चलन १ रुपया म्हणजे श्रीलंकेचे २ रुपये होतात आणि तिकडे भारतीय श्रीलंकन आणि यु एस डॉलर अशी सर्व चलने स्वीकारली जातात हि माहिती मिळाली. बघण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक बुद्ध मंदिरे,दंबूला गुहा आणि सीगारिया, मुलांसाठी समुद्र सफारी (व्हेल वॊचिंग), याला नॅशनल पार्क सारखे प्रचंड मोठे अभयारण्य, सुंदर समुद्रकिनारे, दुर्मिळ दगड आणि रत्ने असे बरेच काही दिसत होते . विमानप्रवास धरून ट्रीपही आमच्या बजेट मध्ये दिसत होती (जी नंतर बजेटबाहेर गेली , कशी ते सांगेनच). त्यामुळे २-४ एजंट लोकांना मेसेज टाकून ठेवले आणि त्यांचे उत्तर आल्यावर पुढचे विमान प्रवासाचे वगैरे ठरवू असे म्हणून त्या दिवशीची मोहीम थांबविली.
यथावकाश एकेक एजंटकडून माहिती मिळू लागली. साधारण सर्वजण ५ दिवस ४ रात्रीचा प्लॅन देत होते. पण आम्हाला थोडी निवांत पणे ट्रिप करायची असल्याने मी सगळ्यांना ७ दिवस ६ रात्रीचा प्लॅन मागितला. साधारण सगळे प्लॅन किंवा रूट सारखेच होते पण मुख्य फरक राहण्याच्या हॉटेल्स मध्ये आणि काही प्रेक्षणीय स्थळे कमीजास्त अशा प्रकारचा होता. फार उत्तरेकडील जाफना आणि पूर्वेकडील त्रिनकोमाली वगैरे कुणीच दाखवत नव्हते. कोलंबो पासून ट्रिप चालू होऊन गोल फिरून पुन्हा कोलंबोलाच संपणार होती असेच सगळे प्लॅन बघून समजले. कायप्पा वरून एक दोन एजंट शी बोलणेही झाले.आणि शेवटी एका एजंटच्या नावावर शिक्का मोर्तब करून त्याला फायनल करून टाकले.
दुसऱ्याच दिवशी विमानाची तिकिटेही बुक करून टाकली आणि पुढच्या विकांताला थोडे यु.एस.डी आणि श्रीलंकन रुपये विकत घेऊन तोही प्रश्न संपवून टाकला.
पण मध्ये डोंगर होता ऑफिसमधील कामांचा आणि मुलांच्या परीक्षांचा. त्यामुळे तो संपवून टाकेपर्यंत दोन तीन आठवडे कसे निघून गेले समजलेच नाही. म्हणता म्हणता परीक्षा संपल्या सुट्ट्या लागल्या आणि दिवाळी चालूसुद्धा झाली.
यथावकाश ट्रीपच्या दृष्टीने कपडे काय घ्यायचे औषधे काय लागतील खाण्यापिण्यासाठी काय घेता येईल याच्या चर्चा घरात झडू लागल्या आणि आता वेध लागले निघायच्या तारखेचे.(क्रमशः)
प्रतिक्रिया
20 Nov 2018 - 12:37 pm | एकनाथ जाधव
येउ द्या लवकर पुढिल भाग.
20 Nov 2018 - 1:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर सुरुवात. येऊद्या पुढचे भाग भरभर.
20 Nov 2018 - 1:42 pm | श्वेता२४
बकेटलिस्टमधील देश असल्याने पु.भा.प्र. सर्व माहिती डिटेल येऊद्या.
20 Nov 2018 - 1:47 pm | अनिंद्य
सैलाव, सिलोन, श्रीलंका !
मालिकेतील पुढील भागांची वाट पाहतो आहे.
20 Nov 2018 - 6:54 pm | दुर्गविहारी
ईनकॉग्निटो मोड म्हणजे काय? बाकी तुमच्या प्रवासाचे अनुभव वाचायला नक्की आवडतील. पु.भा.ल. टा.
21 Nov 2018 - 11:19 am | राजेंद्र मेहेंदळे
गुगल क्रोम ब्राउझरमध्ये हि सोय असते. थोडक्यात युजरची (ब्राउजिंग करणार्याची) माहिती लपवुन तुम्हाला काहि सर्च करायचे असेल तर हा मोड वापरता येतो.
21 Nov 2018 - 11:36 am | मुक्त विहारि
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
22 Nov 2018 - 2:03 am | मनो
इंकोग्नीटो मोड मध्ये आयपी बदलत नाही. त्यामुळे घरून सर्च करावे आणि मग मोबाईल चे कनेक्शन वापरून अथवा ऑफिस मधून अथवा व्ही पी एन वापरून मग बुक करावे. What is my ip असा गूगल सर्च केला की आय पी दिसतो.