गाडी कोलंबो एअरपोर्ट वरून बाहेर निघाली आणि सगळ्यात पहिले काय नजरेत भरलेली गोष्ट म्हणजे हिरवळ आणि स्वच्छता. आता आपण भारतीय लोकांना सगळेच देश फारच स्वच्छ वाटतात परंतु मला श्रीलंका हे भारताचेच एक्स्टेंशन असेल असे वाटले होते त्या समजुतीला तडा गेला आणि सुदैवाने तो पुढे समज पुढेही आठवडाभर तसाच राहिला. शिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे ही मुद्दाम तयार केलेली शहरी हिरवळ किंवा लॉन नव्हते तर नैसर्गिक रित्या तयार झालेली गवताळ जमीन पाणथळ जागा आणि झाडी होती.मुंबई किंवा कुठल्याही शहरी एअरपोर्ट वरून बाहेर पडल्या पडल्या दिसणारा गजबजाट ट्रॅफिक इथे नव्हताच .
एखाद्या निवांत गावाच्या रेल्वे स्टेशन वर उतरल्यावर कसे वाटते तसेच काहीसे वाटत होते.
रात्रभराच्या प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळून गेला. वळण वळणाच्या रस्त्यावरून गाडी कॅंडीच्या दिशेने प्रवास करु लागली.
एकीकडे उपुल तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये आम्हाला माहिती देत होता. त्यानुसार आजचा कार्यक्रम पिनावाला हत्ती निवाऱ्याला भेट देऊन पुढे मसाला गार्डन बघून हॉटेलवर जाणे आणि सायंकाळी कॅंडी शहराचा फेरफटका मारणे असा होता.
तासाभरात गाडी पिनावाला गावात पोचली. एका छोट्या गल्लीतून उपुल बरोबर आमची वरात पुढे निघाली. वाटेत मराठी लोकही भेटत होते.अर्थात बहुतेक पर्यटन स्थळी आजकाल मराठी आणि गुजराथी लोक भेटतातच अगदी युरोप अमेरिकेत सुद्धा. गल्लीच्या दोन्ही बाजूला टिपिकल दुकाने होती जिथे तिथे हत्तीचे प्रिंट केले टी शर्ट कि चेन्स लाकडी सामान आणि विशेष म्हणजे हत्तीच्या शी पासून तयार केलेले कागद विक्रीला ठेवले होते. त्यावरून आठवले स्टे हंग्री स्टे फुलीश पुस्तकाचा दुसरा भाग (नाव विसरलो) आहे त्यात एका उद्योजिकेने हाच आपला पूर्णवेळ व्यवसाय म्हणून पत्करलाय. आणि त्यात तिला चांगला फायदाही मिळतोय.
तर गल्लीच्या टोकाला पोचलो आणि काय ? भसकन एक नदीचे पात्र समोर आले. नदीला भरपूर पाणी होते आणि गम्मत म्हणजे आपल्याकडे जशा पाण्यात म्हशी सोडलेल्या असतात तसे तिकडे हत्ती सोडले होते. ३-४ माहूत त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाण्यात उतरले होते आणि हाती सुखेनैव सहकुटुंब अंघोळीचा आनंद घेत होते. छोटे मोठे मिळून ३०-४० तरी सहजच असतील. एव्हढ्या मोठ्या संख्येने हाती बघण्याची माझी तरी पहिलीच वेळ होती. आसपासच्या दुकानातून पेरू वगैरे फळे ऐकत घेऊन त्या हत्त्तीना खाऊ घालण्यात बराच वेळ गेला. फोटो सेशन झाले.
मग पिनावाला चा दुसरा भाग बघायला परत येऊन रस्ता पार करून पलीकडे गेलो. वाटेत अजून एक आश्चर्य - ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना पहिला मान देऊन वाहने चक्क रस्त्यात थांबत होती. पुण्यातून तिकडे गेल्याने हे बघून मला तर डोळ्यात पाणीच यायचे बाकी राहिले. एव्हढा छोटा देश असून कायद्याचा धाक म्हणा टुरिझमसाठी आपली प्रतिमा सांभाळायचा प्रयत्न म्हणा किंवा लोकांच्या अंगात बाणलेली सवय म्हणा हे म्हणजे फारच सुंदर होते.
पलीकडेही हत्ती सांभाळायला केलेल्या विविध सोयी त्यांचे खाणेपिणे आणि इतर गोष्टी बघून पुन्हा गाडीत बसलो आणि पुढचे ठिकाण म्हणजे मसाला गार्डन कडे गेलो. त्याबद्दल लिहिण्यासारखे फार काही नाही. आपल्या केरळ सारखेच गाइड्सबरोबर एकेक वनस्पतीची माहिती घेत पुढे जायचे आणि शेवटी ते तुम्हाला रक्तदाब मधुमेह हृदय विकार आणि जगातल्या सर्व रोगांवरची रामबाण आयुर्वेदिक औषधे ओरिजिनल आम्हीच कशी विकतो हे सांगून तुमच्या गळ्यात मारणार. मग आपण लाजेकाजेस्तव काहीतरी विकत घेणार आणि घरी आल्यावर शेजारी किंवा नातेवाईकांना तिकडून आणलेली भेट म्हणून वाटणार. ही गार्डन पण काही वेगळी नव्हती. पण बाहेर आल्यावर मला अजून एक गोष्ट लक्षात आली. अशा ठिकाणी ड्रायव्हर लोकांचे अर्थपूर्ण संबंध असतात आणि आपण विकत घेतलेल्या वास्तूप्रमाणे त्यांना काहीतरी कमिशन मिळते.आपण काहीच विकत घेतले नाही तर अर्थातच त्यांना वरकमाई होत नाही आणि मग ते त्यांच्या वागण्यात दिसून येते. मला आजपर्यंत जवळपास सर्वच ठिकाणी हा अनुभव आलाय पण उपुल मात्र त्याला अपवाद निघाला.किंवा सिंहली लोकांचे ते वैशिष्ट्य असावे.हे लोक स्वभावाने जरा संतुष्ट (कन्टेन्डेड ) वाटले .बुद्धिस्ट विचारसरणीमुळे त्यांच्या स्वभावात हा गुण उतरला असेल काय असेही वाटून गेले.काही असो. यानंतर आमचा पुढचा मुक्काम होता कँडीचे हॉटेल ऑर्किड व्हिला. वळणावळणाच्या रस्त्याने गाडी मुक्कामाला पोचली तेव्हा २ वाजले होते. स्टाफने हसतमुखाने स्वागत केले पण हॉटेलवर जेवणाची सोय नव्हती. त्यामुळे आम्हीच आणलेले पराठे वगैरे खाऊन भूक भागवली आणि फ्रेश होऊन आराम करत पडलो.
सायंकाळी पुन्हा बाहेर पडलो ते प्रथम बुद्ध रेलिक टूथ टेम्पल अर्थात बुद्धाचा पवित्र दात जिथे जतन करून ठेवलाय ते देऊळ बघितले.
बाहेरून फारसे आकर्षक दिसले नाही तरी आतील भित्तिचित्रे फारच सुंदर आहेत. श्रीलन्केत एक बुद्ध रूट पण आहे ज्यावर बुद्धिस्ट लोकांचे मठ मंदीर वगैरे आहेत व त्याचे अनुयायी तेथे प्रवास करतात.
ह्यात जास्त करून चायनीज जॅपनीज कोरियन लोक असतात कारण त्या देशात बुद्धाचा प्रभाव फार आहे. या सर्व मार्गावर बुद्धाचे अनेक मठ मंदिरे आहेत ज्यात त्या लोकांना रस असतो.
इथेही भरपूर चायनीज लोक आले होते.आतील वातावरण धीर गंभीर होते.पांढरे कपडे घातलेलं लोक जप करत होते.
भिंतीवर अनेक ठिकाणी सूंदर चित्रे रंगवलेली दिसत होती. लाल कमळाचे विशेष महत्व असावे कारण सर्व दुकानात विकायला आणि लोकांच्या हातात लाल कमळे होती. एकूण प्रसन्न वाटले.
पुढे कॅंडी तलाव बघून आमचा मुक्काम जेम्स आणि स्टोन विकणाऱ्या कारखान्याकडे वळला.
ईथे थोडीफार खरेदी करून आणि ते जमिनीतून दगड कसे काढतात आणि पोलिश वगैरे करतात ते बघून आम्ही आजचा शेवटचा कार्यक्रम कॅंडी सांस्कृतिक शो बघून हॉटेलवर परतलो.
प्रतिक्रिया
22 Nov 2018 - 1:00 pm | राजेंद्र मेहेंदळे
कोणी मदत करेल काय? गुगल फोटो पेक्षा दुसरा काहि उपाय आहे का फोटो शेअरिन्गला?
22 Nov 2018 - 1:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
समस्या गुगल फोटोची नाही. तुम्ही थंबनेल्सचे दुवे (इमेज अॅड्रेसेस) टाकल्याने फोटो दिसत नाहीत. फोटो पूर्णावस्थेत उघडून घेतलेले इमेज अॅड्रेसेस वापरून मिपावर फोटो टाकल्यास ते नीट दिसतील.
उदा : खालील पहिला प्रयत्न थंबनेलच्या दुव्याने आणि दुसरा फोटोच्या दुव्याने केलेला आहे...
22 Nov 2018 - 7:20 pm | राजेंद्र मेहेंदळे
तसे करुन प्रयत्न करतो परत एकदा. फोटो शिवाय मजा नाही.
22 Nov 2018 - 1:37 pm | अनिंद्य
वाचतो आहे.
स्थानिकांच्या स्वल्पसमाधानी वृत्तीबद्दल वाचूनच छान वाटले.
चित्रे मात्र दिसली नाहीत.
पु. भा. प्र.
22 Nov 2018 - 1:47 pm | श्वेता२४
साधे सोपे वर्णन आणि सुरेख चित्रे यामुळे वाचायला मजा येतेय. जरा मोठे भाग टाका.
वाटेत अजून एक आश्चर्य - ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना पहिला मान देऊन वाहने चक्क रस्त्यात थांबत होती. पुण्यातून तिकडे गेल्याने हे बघून मला तर डोळ्यात पाणीच यायचे बाकी राहिले.
हे वाचून खुदकन हसूच आलं- बाईक चालवणारी माजी पुणेकर
22 Nov 2018 - 3:05 pm | मुक्त विहारि
प्रवास उत्तम सुरु आहे...
22 Nov 2018 - 7:01 pm | खिलजि
वा राजेंद्र साहेब , खरंच छान आहे आतापर्यंतचा प्रवास .. मला चित्रे दिसत आहेत आणि ती फार सुंदर आहेत .. वाचत आहे .. पुभाप्र
22 Nov 2018 - 10:24 pm | दुर्गविहारी
मस्त लिहीताय. पु.भा.ल.टा.
23 Nov 2018 - 3:36 pm | यशोधरा
प्रचि दिसत नाहीयेत. ते दिसले असते तर वर्णन अजून छान वाटले असते वाचायला.
24 Nov 2018 - 1:27 pm | विजुभाऊ
मी यावर्षी कंपनी कृपेने सहा महिने श्री लंकेत वास्तव्यास राहिलो.
तिथले लोक खरेच शांतताप्रिय आणि स्चच्छताप्रिय आहेत.. उगाच रस्त्यात भांडणे तंटे नाहीत. धक्काबुक्की नाही. रात्री दोन वाजता सिग्नल ला गाडी थांबवतात ते ही ट्राफीक अजिबात नसताना.
बहुतेक जण पेयपान केलेले असेल तर गाडी चालवणे टाळतात. कागद कचरा उगाच कुठेही फेकत नाहीत.
लम्केसारखा छोटा देश हे करु शकत असेल तर आपण कुठे मागे पडतो