फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ९

रा.म.पाटील's picture
रा.म.पाटील in जनातलं, मनातलं
23 Sep 2018 - 2:14 pm

फेस्टिव्हल डायरीज..!!
(Decorate Your Love)

कथा - ९
गणेश चतुर्थी.. (प्रेमाची ओढ..)

रेखीव डोळे, डोळ्यातील चमक, चेहऱ्यावरचे तेज, सुंदर गौरवर्ण, जणू सौन्दर्याची मूर्तीच होती ती..
खरंतर तो गणपतीची मूर्ती निवडत होता आणि तिथे त्याला ती दिसली..
आणि त्याला गणपतीची जी मूर्ती आवडली होती तीच मूर्ती तिलाही आवडली होती, पण दुकानात तशी एकच मूर्ती शिल्लक होती..

त्याने मात्र ती मूर्ती तिला देण्यास सांगितले.. कारण त्याने निवडली होती आता जिवंत सौन्दर्याची मूर्ती म्हणजेच ती.. जिच्यासाठी शहरातल्या साऱ्या गणपतीपुढे हात जोडून तो नवस बोलायला तयार होता.. ती त्याची प्रेयसी बनावी म्हणून..

आज गणपतीची मूर्ती खरेदी करताना त्याला हा प्रसंग आठवला.. तिथेच ती पहिल्यांदा दिसली होती.. आणि त्याच्या डोळ्या समोर उभ्या राहू लागल्या त्या गणेशोत्सवातील तिच्या प्रत्येक भेटी..

त्यावेळी गणेशाचे काही दिवसात आगमन होणार होते.. तो नेहमीप्रमाणे त्यांच्या पथकाच्या ढोल ताशांच्या सरावासाठी पोहचला होता..

अजून कोणीच आले नव्हते म्हणून तो आपला सहजच ढोल वाजवू लागला, पण हळूच कोणीतरी त्याचा ढोलाचा रिदम पकडून ताशाची साथ देऊ लागले.. काहीतरी वेगळे आणि नवीन रिदम तयार होतोय म्हणून त्याने वाजवणे चालूच ठेवले.. दोघेही वाजवतच होते आणि आजूबाजूला हळूहळू जमलेले सहकारी तो रिदम ऐकून मंत्रमुग्ध झाले होते.. शेवटी दोघेही थांबले.. आता दोघांनी एकमेकांना वळून पाहिले.. हो ताशा वाजवणारी तीच होती जी त्याला त्या दिवशी गणपती घेताना दिसली होती..

तो खुश झाला कारण ती त्यांच्या ढोलपथकात असणार होती.. त्यामुळे तिला दररोज पाहता येणार होते..

आणि ह्याच कारणामुळे तीही खुश होती..

दोघांची पण मूर्तीची आवड जुळली होती, ढोल ताशाचे सूर जुळले होते मग त्यांचे प्रेमाचे धागे जुळतील का..?

पण आज त्यांनी वाजवलेला रिदम त्यांच्या ढोलपथकाची ओळखच बनून जाणार होता.. आणि त्या दोघांसाठी एकमेकांची आठवण..

त्यांच्या ढोलपथकाचा सराव दररोज सुरू झाला होता, दोघेही एकमेकांना दिसत होते, चोरून पाहत होते पण ओळख होणार कशी..? दोघांच्याही मनात होते बोलायचे, पण सुरुवात करणार कोण..

पण त्या रिदम ने तीही अडचण दूर केली, त्या दोघांना तो रिदम सर्वांना शिकवण्यास सांगितले, एकेमकांचा ताल जुळवताना संवाद होऊ लागला.. पण तो संवाद पुढे सरकेना.. दोघांनाही भीती होती की आपण आधी बोललो तर पुढच्याचा गैरसमज व्हायला नको..

पण नेहमीच्या सहवासाने थोडे धाडस वाढू लागले, सुरुवातीला चुकवणारी नजर आता नजर थोडा वेळ का होईना भीडू लागली..

बिथरणारे ओठ संवाद साधू लागले, पण हृदय अजूनही तितकेच धडधडत होते.. दोघांचे एकमेकांसाठी..

कधी सरावाची वेळ होतेय म्हणून दोघांचीही चलबिचल व्हायची.. वेळेच्या आधी पोहचले जायचे, थोडे जुजबी बोलता येईल का ह्यासाठी दोघे प्रयत्न करायचे..

हळूहळू मोबाईलवरून संवाद होऊ लागला, पण एकमेकाना जपून बोलले जात होते, चेष्टा मस्करी होत होत्या पण त्यातही आब राखला जात होता..

तिला त्याच्या ह्याच गोष्टी आवडल्या होत्या.. तो इतर मुलासारखा नव्हता, म्हणजे मुलींना इम्प्रेस करायला महागडी गाडी किंवा मोबाईल त्याच्या जवळ नव्हते.. बोलण्यात अतिशयोक्ती नव्हती.. तो जसा आहे तसाच राहत होता, वागत होता.. त्यामध्ये कुठे खोटेपणा वाटत नव्हता.. तिला जाणवले होते त्याची मुलीकडे बघण्याची नजर.. त्यात एक मुलींबद्दलचा आदर दिसायचा..

तोही तिच्या ज्या गोष्टी आवडत नव्हत्या त्या स्पष्टपणे तिला सांगत होता एक मित्र म्हणून, मुद्दाम तिला आवडावे म्हणून तिच्या हो ला हो करत नव्हता..

आणि तीही त्याला त्याच्या आयुष्याच्या खाजगी गोष्टी सांगू लागली, दिवसाचे क्रम सांगू लागली, तिचीही कसलीच लपवाछपवी नव्हती वागण्यात आणि बोलण्यात..

तुम्ही जसे आहात तसे खरंतर इतरांना दाखवावे, विनाकारण ओढून ताणून नाते जुळवण्यात अर्थ नाही, जर खरंच तुमचे विचार, मतं जुळत असतील तर प्रेमही मार्ग शोधते.. दोघेही ह्याच मताचे होते आणि म्हणूनच एवढा संवाद होऊनही त्यांचे प्रेम अव्यक्त होते..

एकेक दिवस सरत होते आणि दोघांसाठी त्यांच्या सुंदर आठवणी तयार होत होत्या..

शहरात गणेशाचे आगमन झाले होते,
आज दोघेही खास नटूनथटून आले होते, पण त्याला तिची एक गोष्ट आवडली होती, तिने इतर मुलीसारखा जास्तीचा मेकअप केला नव्हता आणि तरीही ती सुंदर दिसत होती..
प्रेमाचे सौन्दर्य साधेपणात सापडते, भपकेबाजपणा कधीही खोटाच ठरतो.. हेच खरे..

त्यांच्या ढोलपथकाने तो रिदम वाजवून साऱ्यांची मने जिंकली होती.. आणि त्यावर कळस चढवला होता त्या दोघांनी.. आणि तो रिदम वाजवताना त्या दोघांची नजर सारखी एकमेकांना पाहत होती.. आणि त्यांच्या ओठावर अलगद उमटलेले हसू त्यांना आणखीन जवळ आणत होते..

आरती करताना एकमेकांना पाहता येईल अशी जागा निवडली जात होती, प्रसादाचे ताट त्याच्याकडे आले तर तिच्या ओंजळीत थोडा जास्त प्रसाद पडायचा..

प्रसादासारखाच त्यांच्या अव्यक्त प्रेमाचा गोडवाही वाढत होता..

त्यांचे हे अव्यक्त प्रेम आता त्याच्या मित्रांच्या नजरेत येऊ लागले, तिच्या मैत्रिणीही तो दिसताच तिच्याजवळ कुजबुजायच्या आणि ती मात्र लाजून खालचा ओठ दाबत त्यांना गप्प करू पहायची..

वातावरण भक्तिमय होत होते आणि प्रेममय सुद्धा..
दोघांनाही एकमेकांच्या भावना समजत होत्या पण व्यक्त करायचे धाडस होत नव्हते..
भीती एकच, आपली प्रेमभावना समोरच्या व्यक्तीला आवडली नाही तर आपण चांगली मैत्री गमावून बसू..

पण खरंतर बोललोच नाही तर कदाचित प्रेमच गमावून बसू.. दोघांचीही द्विधा मनस्थिती झाली होती..

आज गौरी विसर्जन होते, तसेच घरच्या गणपतीचेही विसर्जन होते, घरचा गणपती जाताना तिला अश्रू अनावर होत होते, राहून राहून तिला एकच प्रश्न पडत होता, आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला निरोप कसा काय देऊ शकतो.. आणि गणपतीसारखा त्याचा निरोप घेणे आपल्याला जमेल का..?

तिने आज ठरविले होते की काहीही झाले तरी आज त्याला त्याचे प्रेम व्यक्त करायला लावायचे..

नेहमीप्रमाणे सराव संपला, आरतीही झाली, सर्वजण घरी जाऊ लागले, पण ते दोघे ताटकळले होते, ती तिच्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबली होती, तोही मित्राबरोबर थांबला होता.. पण दोघांचे लक्ष त्या गप्पामध्ये नव्हतेच तर एकमेकांकडे होते, वेळ चालला होता.. शेवटी खूप उशीर होईल म्हणून मैत्रिणीच्या हट्टापायी तिला निघणे भाग होते, ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, ' येऊ का मी?' आणि अशी म्हणत ती तिथेच थांबली होती.. पण त्याने मानेनेच होकार दिला त्यामुळे तिला जावे लागणारच होते, जड पावलांनी तिने घराचा रस्ता धरला..

आज घरचा गणपती गेल्यामुळे एक रिकामी पोकळी निर्माण झाली होती, तिला वाटले तो ती आज भरून काढेल त्याच्या प्रेमाची कबुली देऊन.. पण त्याला जमलेच नाही..

तिने दुसऱ्या दिवशीही प्रयत्न केला, पुन्हा उशिरापर्यंत थांबली, पुन्हा विचारले 'येऊ का मी?', त्यानेही मानेनेच होकार दिला..

मला समजले नाही का 'येऊ का मी..?' म्हणत तिचे तिथे घुटमळणे, मला समजले नाही का तिची धडपड, तिची ओढ.. समजले होते सर्व मला, पण तिला कसे सांगणार आज काय घडले होते ते.. तो विचार करत होता..

आज सकाळी त्याला त्याच्या मित्राकडून कळले की ती कोणाच्या तरी गाडीवर बसून चालली होती.. त्याने ती गोष्ट जास्त गंभीरपणे घेतलीही नाही.. पण त्याचा मित्र म्हणाला -' आजकालच्या मुली पण कमी नाहीत, वाटले नव्हते ही पण अशी निघेल..'

तो मित्रावरचा राग आवरत म्हणाला- ' ती तशी मुलगी नाही हे नक्की..'
त्याचा मित्र- ' कशावरून..?'
तो- 'जर ती तशी मुलगी असती तर तीने स्वतःहून माझ्याजवळ प्रेम व्यक्त केले असते.. एवढा वेळ घेतला नसता..'
त्याचा मित्र- 'म्हणजे स्वतःहून प्रेम व्यक्त करणाऱ्या मुली चुकीच्या असतात का..?'
तो- 'असा नियम मान्य केला तर सर्वच मुले चुकीचे ठरतील, मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की एवढा वेळ घेणारी मुलगी नक्कीच चुकीची असू शकत नाही..'

पण हे कारण होते का त्याने तिच्यावरचे प्रेम व्यक्त न करण्याचे.. नाही हे कारण नक्कीच नव्हते.. कारण तिने स्वतःहून त्याला कालच सांगितले तो तिचा चुलतभाऊ होता आणि तेही त्याने विचारले नसताना सुद्धा.. एवढा स्पष्टपणा होता तिच्याकडून..

खरे कारण तर तिच्या वडिलांना आलेली शंका जी त्याला त्याच्या मंडळाच्या ज्येष्ठाकडून कळली होती की तिचे घरी उशिरा येणे वाढले होते, आणि त्यामुळे तिचे वडील तिथे चौकशी करायला आले होते..

तिला घरी जाण्यास उशीर का होत होता हे त्यालाही चांगलेच माहीत होते.. कारण तिचे सरावानंतर तिथे घुटमळणे जास्त वाढले होते..

आणि आपल्यामुळे तिला त्रास होऊ नये, असे त्याला वाटत होते म्हणून त्याला सध्यातरी तिच्याजवळ तिच्यावरचे प्रेम व्यक्त न करणे योग्य वाटले.. तो योग्य वेळेची वाट पाहत होता..

आणि त्या दिवसानंतर मात्र त्याचे तिच्याप्रती वागणे बदलत गेले, इतर कामाची कारणे देऊन मोबाईलवरील संवाद कमी होऊ लागला, सरावानंतर तो लगेच निघू लागला, तो आरती करताना तिला न दिसेल अशी जागा शोधू लागला, प्रसाद वाटताना तो तिच्याकडे पाहतही नव्हता, तो पुन्हा तिची नजर टाळू लागला पण आताची त्याने नजर चुकवणे हे नेहमीच्या नजर चुकवण्यापेक्षा वेगळे आहे हे तिला जाणवत होते, त्याच्या नजरेत तिला एक प्रकारची भीती जाणवत होती,

पण ही भीती होती तिच्यासाठी, तिच्या काळजीपोटी आणि हे सुद्धा एक प्रकारचे प्रेमच असते.. हे तिला कसे कळणार..

त्याच्यातला बदल तिला जाणवत होता, तो तिला असह्य करत होता, खरंतर तिच्या मैत्रिणींना सुद्धा तो जाणवला होता त्यामुळे त्यांनी सुद्धा तिला त्याच्यावरून चिडवणे बंद केले होते, त्यामुळे तिची चिडचिड आणखी वाढत होती.. आणि त्याचा परिणाम त्यांच्या ढोलताशांच्या त्या खास रिदम वर होऊ लागला..

तो उत्साह, तो प्रयत्न, तो गोडवा कुठेतरी हरवत होता त्या रिदमचा..

शेवटी त्याच्या मित्रांनी आणि तिच्या मैत्रिणींनी तिला एकेमकांशी ह्या विषयावर बोलण्यास सांगितले, पण दोघांनीही बोलण्यास नकार दिला..

शेवटी त्यांच्या पथकातील मित्र मैत्रिणींनी त्यांच्या अपरोक्ष सराव संपल्यानंतर त्यांना एकांत दिला.. त्यांच्या नकळत..
दोघांनीही आजूबाजूला पाहिले कोणीच नव्हते.. पण दोघांनाही निघणे शक्य नव्हते कारण तिची मैत्रीण आणि त्याचा मित्र परत तिथेच येणार होते..

आणि तिला तसे तिथे एकटे सोडणे त्याला योग्य वाटत नव्हते..
तोच अचानक आलेल्या पावसाने दोघांना एकाच आडोशाखाली आणत एकमेकांच्या जवळ आणले..
क्षणभर कोणीच बोलेना.. शेवटी तो बोलला -' खूप उशीर झाला ना..'
ती जरा चढ्या आवाजात- ' नक्की कशाला उशीर झाला म्हणायचे..'
तिचा तो अपरिचित आवाज ऐकून तो जरा बिथरला होताच तरी म्हणाला- ' घरी जायला अजून कशाला..'
ती- ' असं होय, मला वाटले..?'
तिच्या बोलण्याचा रोख त्याने ओळखला म्हणून त्याने गप्प राहणे पसंत केले..
तो काहीच बोलत नाही हे पाहून ती म्हणाली- ' तुला खरंच काही कळत नाही की तू न समजल्यासारखे करतोय..'
तो तरीही गप्प होता..
ती- ' अरे आता तरी बोल, मला हे तुझे असे वागणे, गप्प राहणे सारे असह्य होत आहे..' असे म्हणून ती रडायला लागली..

आता मात्र त्याला कळले की त्याचे काहीतरी नक्कीच चुकत होते, तिला त्रास होऊ नये म्हणून काळजी घेणे हे त्याच्या दृष्टीने प्रेम होते पण तिच्यासाठी तो विरह होता.. तिच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद रहावा म्हणून आपण श्री चरणी नवस बोलत राहिलो आणि आज आपल्यामुळेच तिच्या डोळ्यात अश्रू आले..

तो तिच्यापुढे हात जोडत म्हणाला- 'मला माफ कर.. मला तुला दुखवायचे नव्हते.. पण माझा नाईलाज होता..' आणि त्याने तिला तिच्या वडिलांची शंका, त्यांची चौकशी आणि त्याचे तसे वागणे ह्याचा खुलासा केला..
शेवटी तो म्हणाला- ' असे नाही की तुझ्या वडिलांना घाबरतो पण आपल्या प्रेमाचे नाव खराब न होणे हेही तितकेच महत्वाचे..'

ती डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली- 'आज मला कळले प्रेम असेही करतात, झाडावरचे गुलाब तोडून मिरवणारे अनेकजण बघितलेत, पण झाडावरच गुलाब जपणारे खूपच दुर्मिळ असतात..'

तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत असतो, डोळ्यातील अश्रूंची जागा आश्चर्याने घेतलेली असते आणि तिची नजर त्याच्या पाठीमागे पाहत असते.. तो मागे वळून पाहतो.. एक वयस्कर व्यक्ती छत्री घेऊन उभी असते..
आणि तिच्या तोंडून शब्द बाहेर पडतात.. - 'बाबा..!'

आणि आज अंगारकी चतुर्थी.. गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस.. सर्व तयारी झालेली असते.. ढोलपथक सजलेले असते.. सर्वजण सुंदर पारंपरिक पोशाख आणि साड्या नेसून आलेल्या असतात.. मिरवणुकीचा रथ सजवला जातो.. सर्वांना लळा लावून बाप्पा आता निरोप घेत असतात.. पण तरीही सर्वजण मोठ्या उत्साहात निरोप देण्याची तयारी करत असतात.. असा निरोप आपण आपल्या प्रेमाला देऊ शकतो का..? इतक्याच उत्साहात..? त्याला तिची परवाच्या घटनेनंतर असलेली गैरहजेरी असा विचार करण्यास भाग पडत होती की काय..!

तिचा मोबाइल त्या रात्रीपासून बंद लागत होता, त्याला काल तिच्या घरी जावेसे वाटत होते पण थोडा वेळ वाट पाहणे योग्य राहील असा विचार करून तो थांबला..

त्याने तिच्या मैत्रिणीजवळ तिची चौकशी केली पण तिलाही जास्त काही सांगता आले नाही आणि तिनेही तिच्या घरी जायचे धाडस केले नाही..

शेवटी त्याची काळजी खरी ठरली, त्याच्या प्रेमाने तिच्या आयुष्यात दुःख आणले, मागच्या दिवसातल्या, सरावातल्या त्या गोड वाटणाऱ्या आठवणी आता कडवट, दुःखद वाटू लागल्या.. किती क्षणात बदलते ना हे सर्व.. जसा गेले दहा दिवस ओसंडून वाहणारे भक्तीचे, आनंदाचे वातावरण एका क्षणात उदास, भकास वाटू लागते.. असेच त्याला वाटू लागले.. त्याला आता ढोलही वाजवू वाटत नव्हता कारण त्याच्या जोडीचा ताशा कोण वाजवणार ना..!

मिरवणूक रंगात अली होती, त्यांच्या ढोलपथकाच्या त्या खास रिदमची चर्चा पूर्ण शहरात झाली होती म्हणून मोठ्या संख्येने जमाव त्यांचे पथक पाहण्यास आले होते, पथकाने तो खास रिदम वाजवण्यास सुरुवात केली होती.. रंग चढत होता.. ऐन शेवटच्या टप्प्यात रिदम पोहचला होता आता कळस चढवण्याचे काम त्या दोघांचे नाही आता फक्त त्याचे उरले होते.. त्याने ढोल वाजवण्यास सुरुवात केली आणि.. अगदी हवे त्या क्षणी त्याला ताशांचा आवाज ऐकू आला, त्याने वळून पाहिले तर ती होती.. हो तीच त्याची सौन्दर्याची मूर्ती.. ती त्याला अगदी तशीच वाटली जशी पहिल्यांदा दिसली तेव्हा वाटली होती, तेच हास्य, तेच तेज, तसेच रेखीव डोळे आणि त्यातील चमकही तीच..

फरक फक्त होता, तिने नेसलेल्या नऊवारी साडीचा व फेट्याचा.. आणि त्या पेहरावात ती आणखीन सुंदर दिसत होती.. तिने त्याच्याकडे पाहिले आणि हसली.. क्षणभर तो बावरलाच होता.. पण तिने वाजवायचा इशारा करताच तो भानावर आला आणि त्याने ढोल वाजवायला सुरुवात केली.. आता त्या रिदमचा कळस ते दोघे चढवणार होते..

गणपतीची मूर्ती नदीवर पोहचली होती, विसर्जन होणार होते.. ढोलपथक विश्रांती घेत होते.. लोकांच्या कौतुकाच्या गराड्यातून बाहेर पडता पडता दोघांच्या नाकी नऊ आले, शेवटी कसाबसा दोघांना हवा तसा वेळ मिळाला एकमेकांशी बोलायला..

तो- 'काय झाले घरी.? काय बोलले का बाबा तुझे? आणि तूला कसे काय येऊन दिले त्यांनी आज..?' त्याला बरेच प्रश्न पडले होते..
ती- 'अरे हो हो.. मला बोलू देशील की नाही.. खरंतर त्या रात्रीचे आपले सगळे बोलणे बाबांनी ऐकले होते.. आणि माझ्या काळजीपोटी तू स्वतःचे प्रेम विसरायला चालला होता ही गोष्ट त्यांना भावली.. म्हणूनच त्यांनी मला आज इथे येण्यास परवानगी दिली.. आता वडिलांचे मन असल्याने थोडा जास्तच वेळ घेतला त्यांनी पण ते शेवटी म्हणाले- ' जर माणूस चुकीचा नसेल तर त्याची प्रेमभावना तरी चुकीची कशी असू शकते.. आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.. पण प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते हेही लक्षात ठेवा..'

तो खूप खुश होता आता त्याचा प्रेमाचा प्रवास सुरू होणार होता..
ती म्हणाली- ' पण मला उद्या जावे लागणार आहे काही महिन्यासाठी तुझ्यापासून लांब दुसऱ्या शहरात..!'
तो- ' मी तुला विचारणार नाही कुठे जाणार आहेस, पण तू परत येणार ना मला भेटायला..?'
ती- ' मला नक्की आवडेल परत येऊन तुला भेटायला, जर तू माझी वाट पाहणार असशील तर..!'

गणपतीची मूर्ती नदीत विलीन होत होती, वातावरणात जयघोष दुमदुमत होता, ' गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!'

तो - 'जर आपण गणपतीची पुन्हा येण्याची वाट पाहू शकतो, तर प्रेमाची का नाही..!'

रस्त्यावरून जाताना त्याला ढोलताशाचा आवाज ऐकू आला आणि तो भूतकाळातून वर्तमानकाळात आला, त्यानं घड्याळात पाहिले, वेळ झाली होती..

तो लगबगीने पथकात पोहचला, ढोल काढून वाजवायला सुरुवात केली, थोड्या वेळाने त्याचा ढोलाचा रिदम पकडून कोणीतरी ताशाची साथ देऊ लागले.. त्याने वाजवणे चालूच ठेवले.. दोघेही वाजवतच होते आणि दोघांनीही तो कळस गाठला.. आता दोघांनी एकमेकांना वळून पाहिले.. हो ताशा वाजवणारी तीच होती जीची तो वाट पाहता होता.. तीच सौन्दर्याची मूर्ती..

ढोल ताशे वाजतच होते आणि तयार होत होता प्रेमाचा रिदम..

आणि ह्याच रिदममुळे टिकून राहिली होती त्यांची एकमेकांच्या 'प्रेमाची ओढ..'

***
राही..©
***
सूचना - वरील लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. वरील लेख किंवा त्याचा कोणताही भाग लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रकाशित किंवा मुद्रित किंवा कोणत्याही स्वरूपात वापरता येणार नाही. तसेच परवानगी घेऊन वरील लेखाचा वापर करताना त्यात लेखकाच्या नावाचा आणि मोबाइल नंबरचा उल्लेख करावा.

संपर्क : ८३७८ ०४५१४५ (राही..)

8378 045145 (Rahi..)

कथालेखअनुभव

प्रतिक्रिया

शित्रेउमेश's picture

25 Sep 2018 - 8:47 am | शित्रेउमेश

खूप सुन्दर.....

रा.म.पाटील's picture

7 Oct 2018 - 10:08 am | रा.म.पाटील

तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल अगदी मनापासून धन्यवाद..!!