संडास
नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी मिपावर लेखन करतोय. आणि पुनरागमनासाठी विषय आहे संडास.
काहीलोक लेखाचं नाव वाचूनच नाकं मुरडतील. मला एक कळत नाही संडास सारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलायला लोक लाजतात किंवा घाबरतात का? तसं पाहायला गेल्यास संडास ही आपल्या रोजच्या जीवनातील अतिशय महत्वाची क्रिया पण त्यावर किंवा संडासच्या समस्यांवर बोलायला लोक तयार नसतात.
शी!!! संडास वर मेलं काय बोलायचं!!!
एकवेळ माणूस दोन दिवस उपाशी राहील पण संडासला गेल्याशिवाय राहणार आहे का? अर्धा जीव होईल त्याचा. शौचाचा त्रास असणारे कितीतरी लोक मी चिडचिड करताना पहिले आहेत. कामात लक्ष नसणे, उगाच दुसऱ्याला दोष देणे असं काहीतरी करताना दिसतात. आणि कोणी माना आगर मानू नका पण "मस्तपैकी साफ शौचाला होण्यासारखं सुख जगात नाही" देवाने जी काही शारीरिक सुख देणाऱ्या क्रिया मानवाला दिल्यात त्यातली ही एक नंबरची क्रिया, परमानंद मिळवून देणारी. पण म्हणतात ना रोज फुकट मिळत असेल तर त्याचं मोल राहात नाही. एक दशांश सेकंदाची किंमत जशी शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरण्याला माहीत तशी मनसोक्त आणि विनासायास शौचास होण्याचं मोल बद्धकोष्ठ किंवा मूळव्याध झालेल्या माणसास ठाऊक. असो.
माझं बालपण गेलं सरकारी घरात. तिथे घरात संडास त्यामुळे फार त्रास झाला नाही. पण बाबा निवृत्त झाले आणि काही वर्ष आम्हाला सार्वजनिक संडास असणाऱ्या चाळीत काढावी लागली. मी त्या चाळीत राहायला आलो आणि मला मोठा साक्षात्कार पहिल्याच दिवशी झाला की आपण सार्वजनिक संडास नामक फार मोठ्या कट्ट्याला एवढे दिवस मुकलो होतो. अहो काय नव्हतं विचारा त्या सार्वजनिक संडासात... तिथल्या भिंती ऍब्स्ट्रॅक आर्ट, ह्यूमन अनॉटॉमी, मुक्तहस्त चित्रकला, चारोळ्या, प्रतिभावान शिव्या यांनी भरलेल्या असत. बाहेर तिष्ठत जी मंडळी उभी असत त्यांच्या चर्चासत्रांच्या विषयांना सीमा नसायची.
भारत पाकिस्तान संबंध/युद्ध,
अमेरिकन राष्ट्राध्याक्ष्यांची निवडणूक,
आखाती युद्ध/राजकारण,
विदेशातील स्वच्छता,
आपल्या देशातील अस्वच्छता,
विदेशातील संडास आणि आपल्या देशातील संडास,
स्थानिक निवडणुका आणि राजकारण,
चाळीतली भांडणे,
चाळीतली लफडी/प्रेमसंबंध/झेंगाट
आज शाळेला सुट्टी आहे की नाही, कोणत्या बाई कशा मारकुट्या आहेत. कोणते सर कसे मारतात.
दहावीचा निकाल, कोणाला किती मार्क पडले,
यूपीएससी/एमपीएससी परीक्षा, कॉलेज प्रवेश,
नोकरी, प्लेसमेंट, हाफिसातील राजकारण
कोणाला किती पगार,
काल कोणाकडे काय शिजवलं होतं, कोणाकडे मटण होतं (मग तो आज कसा जास्त वेळ लावणार यावर चर्चा)
आणि प्रत्येक वयोगटाची एक वेळ ठरलेली होती. कामावर जाणारे सकाळी, त्यानंतर थोडे उशीर गेलं तरी चालतं असे असणारे. शाळकरी मुलं दुपारी. म्हातारे कधीही, नेहमी (टाइमपास करायला काहीच नाही तेव्हा) अशा वेळा ठरलेल्या असत.
काही संवाद मला तिथे घुटमळायला भाग पाडत. संडासांचे दोन भाग होते. पाच एक संडास पुरुषांसाठी आणि तेवढेच महीलांसाठी. दोन विभागांच्या मधे भिंत. पण महिलांच्या गफ्फा स्पष्ट ऐकू येत.
प्रसंग १
पहीली - काय गं?
दुसरी - काय?
पहीली - लैच गर्दी हाय!
दुसरी - ह्म्म्म.
पहीली - काल काय केलं हुतं?
दुसरी - वांगं
पहीली - कसं?
दुसरी - भरल्यालं
पहीली - कसं झाल्तं?
दुसरी - बरं झाल्तं.
पहीली - हीतं कोन गेलय?
दुसरी - तीच. (काहीतरी हातवारे केले असणार, कारण पहीलीला कळले की आत कोण गेलय)
पहीली - तवाच, कीती येळ झाला?
दुसरी - झाली धा मिंटं
तेवढ्या आतली बाहेर आली - एवढी घाइ आसल तर घरी संडास बांधुन घी.
पहीली - घेनारच हाय. पानी वतलस काय?
बाहेर आलेली तिसरी - बघकी, तुज्यासारखी घानेरडी नाय मी.
पहीली - बरं बरं जा...
प्रसंग दुसरा - वेळ दुपारची. शाळकरी मुले. लहान मुलांना दार लावायला भिती वाटत असे म्हणून दरवाजा उघडाच ठेउन बसत असत. दोन समोरासमोरील संडासात बसून गफ्फा मारणारी दोन मुले
पहीला - तु कधी आला?
दुसरा - "...."
पहीला - अय, भैरा झाला का?
दुसरा - मगाच आलुय
पहीला - मग बोलकी तसं...
दुसरा - "....."
पहीला - काय झालंय? काय हुतंय?
दुसरा - कुटं काय?
पहीला - मग कुततोय कशापायी?
दुसरा - काय नाय असंच
पहीला - पेपर भेटले का सगळे?
दुसरा - ह्म्म
पहीला - सगळ्या विषयात पास झाला का?
दुसरा - नाय, गणित गेला.
पहीला - गणताला कोन हायत तुमाला?
दुसरा - देशपांडे बाइ, तुला?
पहीला - मला सोमण सर.
दुसरा - कशे हैत रे?
पहीला - मस्त. सगळ्यांना पास करतेत. चल माझं झालं
दुसरा - आरं दमकी, मला अजुन टैम है.
पहीला - काय खाल्लं हुतंस?
दुसरा - वडापाव
पहीला - त्या भैय्याचा ना? खात जौ नकोस.
दुसरा - मला तुमच्या वर्गात घेतीले का? झाली माजी...
पहीला - सरांना इचारावं लागतं. चल धू लवकर.
प्रसंग तिसरा
ग्रुहस्थ १ - राम राम
ग्रुहस्थ २ - राम राम
ग्रुहस्थ १ - कालची मॅच पायली का?
ग्रुहस्थ २ - ह्म्म
ग्रुहस्थ १ - धू धू धुतलंय की...
ग्रुहस्थ २ - कुटं धुतलंय, घानच हाय सगळीकडं
ग्रुहस्थ १ - आरं पाकीस्तानला धुतलय भारतानं
ग्रुहस्थ २ - ह्म्म
ग्रुहस्थ १ - बगीतली का न्हाय?
ग्रुहस्थ २ - बगीतली ना!
ग्रुहस्थ १ - दोन नंबरला कोन आला हुता सांग बरं?
ग्रुहस्थ २ - मला नाय म्हायत. मी तुज्या आदी आलोय.
ग्रुहस्थ १ - आरं रातची उतर्ली नाय का? मॅचचं इचारतोय
ग्रुहस्थ २ - हुता कोनतरी दाडीवाला
ग्रुहस्थ १ - (मोठ्याने) चला हो चला लवकर. आवरा पटापटा. तुला आर्जंट हाय का?
ग्रुहस्थ २ - नाय
ग्रुहस्थ १ - मग मी जाव का?
ग्रुहस्थ २ - जा...
ग्रुहस्थ १ - शेवटची ओवर बगीटली का
ग्रुहस्थ २ - आता आत जा की...
ग्रुहस्थ १ - लगा तुला इंटरेस्ट नाय
ग्रुहस्थ २ - आता जातू का मी जाव?
असे बरेच संवाद कानावर पडत. तुमच्यापैकी कोणाला सार्वजनिक संडासाचा अनुभव असल्यास इथे सांगा. यथावकाश मी दुसरीकडे घर घेतलं आणि मी त्या सार्वजनिक संडास नामक स्नेहसंमेलनाला मुकलो.
प्रतिक्रिया
23 Aug 2018 - 7:24 pm | टवाळ कार्टा
=))
23 Aug 2018 - 7:35 pm | कुमार१
बाकी शालेय शिक्षणादरम्यान शाळेतील संडास-विद्यापीठाचा छान अनुभव घेतला आहे !
23 Aug 2018 - 7:42 pm | टर्मीनेटर
:-)
23 Aug 2018 - 7:44 pm | माम्लेदारचा पन्खा
मोकळं झालेल्या माणसासारखंं वाटलं !
23 Aug 2018 - 7:44 pm | माम्लेदारचा पन्खा
मोकळं झालेल्या माणसासारखंं वाटलं !
23 Aug 2018 - 7:47 pm | खटपट्या
दोनदा मोकळे झालात :)
23 Aug 2018 - 8:08 pm | प्रसाद_१९८२
लेखातील दुसरा प्रसंग,
शनिशिंगापूरला दर्शनाला गेल्यावर तिथले सार्वजनिक स्वच्छतागृह वापरायची वेळ आल्यास पाहायला मिळतो.
23 Aug 2018 - 8:19 pm | सुबोध खरे
"मस्तपैकी साफ शौचाला होण्यासारखं सुख जगात नाही"
वैद्यकीय व्यवसायात एक गोष्ट शिकलो ती म्हणजे
अंथरुणावर पडल्या पडल्या ज्याला झोप लागते आणि
संडासात बसल्यावर दोन मिनिटात पोट मोकळे होते
तो माणूस खरा सुखी आहे
बाकी सर्व मोह माया आहे.
मनसोक्त आणि विनासायास शौचास होण्याचं मोल बद्धकोष्ठ किंवा मूळव्याध झालेल्या माणसास ठाऊक.
खरं आहे
लेख उत्तम आहे
ह ह पु वा
23 Aug 2018 - 9:47 pm | झेन
मस्तपैकी साफ शौचाला होण्यासारखं सुख जगात नाही"
अंथरुणावर पडल्या पडल्या ज्याला झोप लागते आणि संडासात बसल्यावर दोन मिनिटात पोट मोकळे होते
जगी सर्व सुखी असल्याचा रोज फिल येतो.
23 Aug 2018 - 8:34 pm | जेम्स वांड
लैच जबरी
23 Aug 2018 - 8:39 pm | अस्वस्थामा
पुलंच्या वाचनाने भारावलेला आमचा शाळकरी जीव पहिल्यांदा मुंबईच्या चाळीत आला तेव्हा अगदी भरून पावला होता. मग तिथल्या संडासाचं दर्शन घ्यायची वेळ आली आणि जीव मुठीत घेऊन कसाबसा परत आलो तेव्हा "आयला हे पुलंनी सांगितलंच नव्हतं!" याचा भयंकर वैताग आलेला. परत त्या वाटेला गेलो नाही. त्यापेक्षा गड्या आपला गाव बरा.
वर्षानुवर्षे हे सहन करून 'मेरी मुंबई महान' म्हणणारे खरंच ग्रेट म्हटले पाहिजेत.
24 Aug 2018 - 3:50 pm | राजेंद्र मेहेंदळे
तुम्ही तर सार्वजनिक शौचालयाबद्दल म्हणताय. रोज सकाळच्या विधीसाठी रेल्वे लाईन जवळ करणार्यांना काय म्हणाल?
23 Aug 2018 - 8:41 pm | अभ्या..
सनडान्स सारखा विषय आणि गुर्जी नाहीत?
गुरुजींची तीव्रतेने आठवण होतीय अगदी.
.
गुरुजीईईईईइईईईईईईईईई......या ना गडे.
23 Aug 2018 - 9:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
बरं झालं, शेवटचे दोन शब्द लिहिताना व्याक रणाचे भान ठे वलेते ;) =))
23 Aug 2018 - 9:12 pm | अभ्या..
=)) =)) =))
येऊद्या एकदा गुर्जी, वलेते वलेते सुध्दा यायला कमी करणार नाहीत.
मोडीत निघालाय अगदीच तांब्या संप्रदाय. :(
24 Aug 2018 - 4:19 pm | अत्रुप्त आत्मा
23 Aug 2018 - 9:03 pm | कंजूस
गुर्जी शौच पाळतात. असं मध्येच अवेळी कुठे मोकळे होत नाहीत.
24 Aug 2018 - 6:57 am | अत्रुप्त आत्मा
आमच्याच इ शया वरचा धागा म्हणता, किती जणांना ढुसक्या लागल्या रे रामा!!!! =))
अखेर आगोबाच यातला आमचा खरा आतला मित्र निघाला. त्यानेच वतसपी या धाग्याची लिंक टाकली अगदी सकाळच्याच पारी! लै भारी!
जीवाचा मैतर ह्यो ह्यो ह्यो ह्यो, टूर टूर करू चला! मोकळ्या'चा आनंद मोठ्ठा , डबड्यात धरू चला...हो हो हो हो!!!
24 Aug 2018 - 8:20 am | प्रचेतस
=))
24 Aug 2018 - 12:06 pm | खटपट्या
तुम्हाला विडंबनासाठी कच्चा माल हवा असेल तर मेन बोर्डावर कविथा आलीय. "निघताना"
24 Aug 2018 - 6:38 am | अत्रुप्त आत्मा
अगदी साफ झालीये! =))
हे लिहिताना आंम्ही त्याच ठिकाणी आहोत, आंत! ;)
प्रतिसाद अगदीच अस्थाणी पडला नाही याचं लै सुख वाटायलय आज!
आता हनुभव :-
स्थळ क्र:- १ पुणेरी वाडा
आत नखशिखांत भरलेल्या शिग्रेट च्या धुरातून चोरटे काका उरलेलं थोतुक टुप कन आत टाकून भायेर येतो, आणि डबडे ठेऊन ठितल्या नळाला हातपाय घुवायला जातो.. रबडे काका नामक दुसरा इसम सैल केलेल्या लेनग्याची नाडी धरत धरत आत घुसणार एवढ्यात हा पहिला भरलेले डबडे घिऊन झटकन परत आत जातो...
रबडे काका:- %$#@^ परत उलट कशाला आत ग्येला रे!??????
बाहेरच्या नबरातले कुणीतरी:- तेच झालं असेल! उलट आत!!!!!!!
To be continued.... ;)
--------------
आता आगोबा पण बादली घिऊन पळत पळत यील! =))
24 Aug 2018 - 7:17 am | प्राची अश्विनी
=))=))
24 Aug 2018 - 7:41 am | किल्लेदार
फार वर्षांपूर्वी मी या विषयावर कविता डकवली होती. ती तुम्ही वाचलीत का ??
24 Aug 2018 - 8:57 am | प्रचेतस
बालपण जिथे गेलं त्या चाळीत दोन संडास होते. अगदी अंधारी. खिडक्या अगदी लहान असल्यामुळे प्रकाश आत येतच नसे. आतमध्ये दिवे नसंत मग मेणबत्ती किंवा रॉकेलचे दिवे घेउन जावे लागे. संडासाच्या आतल्या भिंतीही काळ्या रंगाच्या असल्याने कुणाला भिंतीवर सुविचार वगैरे मात्र लिहिता येत नसे. पाणी मात्र आतमध्येही भरपूर असे. तसा पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याचा तेव्हाही सुकाळच होता. सकाळी सकाळी नंबर लागत असत. बाहेर लोकांचा इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असंत. घाईची लागलेल्याचे मात्र वांधे होत असंत. चाळीतली काही टवाळ मुद्दामून शौचास लागली नसतानाही बाहेर थांबलेली असंत कारण संडासाचे प्रवेशद्वारं उंचीनी थोटकी असंत. कधी कुणी बाई आतमधे गेलेली असेल तर बाहेर येताना वाकून यावे लागत असल्याने तिचा घसरलेला पदर पाहतांना त्यांना गंमत वाटे. काही माणसांना शौचास अर्धा अर्धा तास लगत असल्याने बाहेर नंबर लावून उभी राहिलेली लोक त्यांच्या नावे बोटे मोडत असंत.
दर सहा आठ महिन्यांनी टाकीतून मैला वाहून नेणारा खाजगी टँकर बोलवावा लागे. टाकीत ते भलामोठा हिरवा पाइप सोडत मग तो ओढून घेत असतना सगळीकडे सुवास दरवळे.
आता उरल्या त्या फक्त जुन्या आठवणी. आजच्या पिढीतल्या मुलांना चाळीतल्या संडासांची मजा आणि व्यथा कधीही कळणार नाहीच.
24 Aug 2018 - 9:25 am | अत्रुप्त आत्मा
आला आला आगोबा आला!
उलाला उलाला उलाला =))
---------------
आता पांडू कधी येईल!??? :-|
24 Aug 2018 - 9:43 am | ट्रम्प
च्यायला !!!
ह्या विषयावर मस्त विनोदी लिहलय राव तुम्ही !!!
24 Aug 2018 - 9:45 am | कंजूस
या काही अनुभवास पारखा झालो.
वेनिस शहरात पाचशे वर्षांपूर्वी सेप्टिक ट्यान्कस होत्या का? त्याच पाण्यात गण्डोला चालवून त्याचे मार्केटिंग करतात?
24 Aug 2018 - 8:36 pm | अस्वस्थामा
http://www.venipedia.org/wiki/index.php?title=Sewage_disposal
24 Aug 2018 - 9:58 am | प्रकाश घाटपांडे
आणि घाईची लागल्यावर संडास उपलब्ध होणे यासारखे भाग्य नाही.
24 Aug 2018 - 12:20 pm | खिलजि
पिझ्झा बर्गरचे वारेमाप पीक आले
घरचे जेवण आता आवडेनासे झाले
पूर्वी जेवायला वीस मिनिटे लागायची
आणि वावरात डब्बे टाकायला दोन
च्यामारी ह्या मैद्याच्या आयचा घो
आत कुंथत कुंथत बसलंय कोण ?
जिथे तिथे दरवळ्ते आता
चिकट चिकट कस्तुरी
मृगावानी धावत येति
डब्बेवाल्यांची हाणामारी
घरचा खाल्ला असता डाळभात तर
धुवून टाकलं असतं दोन मिनिटात
खात राहा असेच अरबट चरबट
येऊन देत हळूहळू बाहेर अस्सेच चिकट चिकट
हे शंभू महादेवा धन्यवाद , तू मला हे दुःख नाही दिलेस .
24 Aug 2018 - 9:37 pm | शुंभ
माझ्या एका मित्राच्या घरात संडासाच्या दरवाज्यावर पाटी आहे
How Long A Minute Is, Depends On Which Side Of The Door You’re On
25 Aug 2018 - 1:24 pm | मित्रहो
मस्त हसलो. मजा आली. आपुलकीच्या विषयाला हात घातला तुम्ही. "मस्तपैकी साफ शौचाला होण्यासारखं सुख जगात नाही" हे अगदी खर आहे. त्या पिकू सिनेमात पण असाच काहीसा संवाद होता मोशन्स आणि इमोशन्स सोबत असतात वगैरे. नालीपासून ते कमोडपर्यंतचा प्रवास अनुभवलाय. त्या अनुषंगाने येणारे अनुभव.
फार पूर्वी एक छोटीशी कविता वाचली होती.
एकांत आणि वास
मिळते हमखास
म्हणजेच संडास
25 Aug 2018 - 1:27 pm | प्रचेतस
घाई गर्दीचा किती हा त्रास
हवा माणसाला एकांतवास
एकांत आणि वास एकत्र मिळण्याचे ठिकाण हमखास
ते म्हणजेच संडास.
26 Aug 2018 - 2:52 pm | खटपट्या
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार्स...
30 Aug 2018 - 4:38 pm | समीरसूर
हा विषय गहन आहे पण आपण सोप्पा करून सांगीतला. :-)
प्रतिसाददेखील पटले. पोट साफ तर आयुष्य सुखी!
सार्वजनिक संडासाचा फारसा अनुभव नाही पण एस टी स्टँडवरच्या सुलभ शौचालयाचा बर्यापैकी अनुभव आहे. तो भयंकर वास डोक्यात जायचा. शरीररचनाशास्त्र उलगडून दाखावणार्या विविध आकृत्या आणि चित्ररुपात मांडलेल्या लैंगिक सुखाच्या विविध कल्पना बघून करमणूक व्हायची. प्रेमप्रकरण जाहीर करण्याची सार्वजनिक संडास ही हकाची जागा! सुनिल (बदाम) सुनिता किंवा महेश (बदाम-तीर) मीना अशा जोड्या बघून हे लिहिणारी माणसं कोण असतील हा प्रश्न पडायचा. संडास आणि प्रेम हे किती विजोड कॉम्बीनेशन आहे. मोबाईल आल्यानंतर "अमुक अमुक कडे क्षक्षक्ष साठी जा" असे निरोप लिहून मोबाईल नंबर दिलेला असायचा. हे 'क्षक्षक्ष' अगदी काहीही असू शकते याची जाणकारांना कल्पना आली असेलच. शिवाय बवासीर, गरमी, पतलापन वगैरे च्या सुपरहीट जाहिराती असायच्याच. विटांचे तुकडे, दारुच्या रिकाम्या बाटल्या, कंडोमची थकलेली वर्तुळे, माव्याची पाकिटे, सिगारेट-बिडीची थोटके, वगैरे ऐवज या शौचालयांची शान अधिकच वाढवायचा.
पर्सनली संडास हा माझा "मी-टाईम" आहे. वर्तमानपत्र, पुस्तक वाचणे, गाणी ऐकणे, दैनंदिनी लिहिणे, विचार करणे, वगैरे कामे संडासात बिनबोभाटपणे आणि उत्तम प्रकारे होतात...
30 Aug 2018 - 5:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>एस टी स्टँडवरच्या सुलभ शौचालयाचा बर्यापैकी अनुभव आहे.
असाच अनुभव आहे, डाव्या आणि उजव्या बाजूच्या भिंती भरपूर वेळ काढून पेनाने रंगवलेल्या दिसतात. मुळात काही विकृति, काही जाहिराती, काही बदनामी, आणि काही टाइमपास अशा हेतूनेही काही लोक मूळ उद्देश् सोडून इथे आलेले दिसतात.
१) स्री पुरुषांच्या संभोगाची चित्रे. अफाट चित्रकला.
२) वेशांचे पत्ते फोन नंबर्स.
३)मालिश करून मिळेल. फोन नंबर्स दिलेले असतात.
४) चित्रे काढ़णा-याला आय माय वरुन आणि सर्व प्रकारच्या शिव्या
५) पुरुष लिंगाची लांबी वाढविण्याचे विविध मलम आयुर्वेदिक औषधे. उपचार. स्टामीना वाढविण्यासाठी गोळ्या.
६) सभ्य स्त्री पुरुषांना त्रास व्हावा म्हणून त्या उद्देशाने लिहिलेली अनेक नंबर्सही असावेत.
असं बरंच काही.
-दिलीप बिरुटे
30 Aug 2018 - 6:00 pm | खटपट्या
ख्खिक !
बाकी मी ज्या ज्या ठीकाणी गेलोय, देशात आणि परदेशात तिथे भाड्याची जागा किंवा हॉटेल बघाताना आधी मी संडास बघतो, रचना कशी आहे? स्वच्छ आहे की नाही. कित्येक जागा मी केवळ संडास आवडला नाही म्हणून नाकारल्या आहेत. कारण खरी स्वच्छतेची गरज तीथेच असते.
तोच प्रकार उपहारग्रुहांचा - वरुन अत्यंत झकपक आणि चकचकीत असणार्या उपहारग्रुहांचे संडास मात्र किळस वाटावे एवढे अस्वच्छ असतात. परदेशातील उपहारग्रुहे याला अपवाद असतात. आणि परदेशी उपहारग्रुहातील संडासात एक बोर्ड नेहमी असतो - "येथील कामगारांनी हात धुतलेच पाहिजेत" :)
30 Aug 2018 - 5:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
https://www.misalpav.com/node/8554
आमच्या मिथन्याचा लेख नक्की वाचा. विषय कसा फूलवलाय बघा. :)
-दिलीप बिरुटे
2 Sep 2018 - 5:22 pm | मदनबाण
धाग्यावर अनेकांनी कुंथुंन घेतलेल दिसतय ! :)))))
माझ्या आठवणीतले चाळीतले संडास आहेत, सिमेंटची चाळ आणि लाकडी चाळ !
फार छोटासा काळ चाळीत गेलेला आहे... त्याची मजा कुठेच नाही. मी अतिशय वांड असल्याने आमच्या बाजुला राहणार्या डुडायडु बाईंना एकदा लयं छळल व्हंत !
एकदा कार्यक्रम आटपुन बाहेर आलो असता समोर डुडायडु बाईंना पाहिले. वाट पाहत होत्या बिचार्या ! वांड मुलाचे डोके नको तिकडे वेगात चालते, तसे ते माझे चालले... बाईंना थोडे पिडावे असे क्रांतिकारक विचार आले आणि त्याची अंमलबजावणी लगेच सुरु झाली. बाईंचा वेळ समजला होता [ वांड डोके फास्ट चालते ] त्यामुळे आधी जाउन चिंतन करण्यास सुरुवात केली, दारावर माझ्या नावाच्या थापा पडल्या तेव्हा कुठे मला चिंतनातुन बोध झाला ! वेग वेगळ्या वेळी बाहेर पडुन केलेल्या चिंतनातुन ज्या गोष्टी समजल्या त्या अश्या :-
१} अशा प्रकारे कोणासही त्रास देउ नये.
२} प्रेशर कंट्रोल करायचे असल्यास फेर्या मारतात.
३} पाणी मौल्यवान असते.
४} वेळेचे महत्व
५} एरंडेल घ्यावे, फायदा होतो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नि मैं वोडका लगा के तेरे नाल नाचना, नि मैं वोडका लगा के तेरे नाल नाचना, होय मैं तेरा ही ना रटना अड्डी मार के वेहदा पट्टना अज्ज मैं टल्ली होक हटना नि... :- Nawabzaade
3 Sep 2018 - 2:38 am | चामुंडराय
आमच्या वाड्यातील सार्वजनिक संडासाला मागच्या बाजूला (दारासमोर) एक खिडकी होती आणि त्याच्या मागे उकिरडा होता.
दिवाळीमध्ये काही टारगट पोरं संडासाच्या खिडकीच्या गजाला बाहेरच्या बाजूने संडासातून दिसणार नाही अशा बेताने एक सुतळी बॉम्ब बांधून ठेवत असत.
संध्याकाळी किंवा रात्री वाड्यातील काही विशिष्ट्य (आणि शिष्ट) मंडळी संडासात गेली हि टारगट पोरं उकिरड्याच्या बाजूने सुतळी बॉम्ब पेटवत आणि पळून जात.
खिडकी जवळच बॉम्ब फुटल्याने संडासात मोठ्ठा आवाज होई आणि त्यामुळे संडासातून बाहेर आल्यावर सुतळी बॉम्बपेक्षा मोठ्ठा ओरडाओरडा आणि पोरांचा उध्दार होत असे. :)
3 Sep 2018 - 6:09 am | प्रचेतस
=))
27 May 2020 - 5:11 pm | सॅनफ्लॉवर्स
सगळ्या जगा"शी" निगडित असा पण दुर्लक्षित असा विषय... याला वाचा फोडल्याबद्दल अभिनन्दन...!!!