नित्या! अारं किती दिवसानं दिसायलास! आनि हिकडं कुटं रे?
सुन्या तू पन बदललास लेका! जाड झालाईस चांगलाच!
व्हय लेका. आरं पन हितं कुटं बोलत बस्लोय आपन,चल च्या घ्यीऊया.निवांत बोलाय यिल!
चा मस्त हाय रे हितला!
बर नित्या सांगितल न्हाईस हिकडं कुटं आल्तास?
आरे सुन्या ह्या पलिकडच्या कारखान्यात कामाला हाय मी! वर्ष झालं.
हा हा बरोबर! मीच हिकडं लई दिवसानं आलो न्हाईतर आधीच गाट पडली असती.
ते न्हवं आयटीआय नंतर तू कुटं दिसलाच न्हाईस.काय संपर्क न्हाई.आनि आज तीन वर्षांनं गाट पडली आपली.कुटं हुतास इतकी वर्ष?
आरं हुतो हितंच.डिप्लोमा केला लेका! पॉलटेक्निकचा!
काय सांगतोस? म्हंजे आता इंजिनेर झालास म्हन की!
व्हय लेका!
मग पगार तेन् चांगला मिळत असलं हितं! कुटल्या डिपार्मेंटला असतोस?
कुटला चांगला पगार ल्येका! साडेपाच हजार हाय.
आ! वर्षभर काम करुन साडेपाचंच हजार?
लाईनवरंच काम रे! नटं आवळ,बॉडी फिक्स कर,क्लिनिंग कर,वायरी काप आसली कामं.
आरारारा! काय रे ह्ये! डिग्रीवाली कोन हायीत का? बीई झाल्याली? त्यासनी तरी हायीत का चांगली कामं?
न्हाई लेका.त्यासनी पन कॉम्प्युटरवरची कामं लावत्यात कदीकदी.पन ते काम नसलं की लाईनवर बशिवत्यात आमच्याबरोबर!
आरं मग काय उपयोग झाला? डिप्लोमा आनि डिग्री करुन?
आरे पप्पा म्हनले आयटीया करुन कुटं हात काळं करुन घेतोस? कामगाराचा ड्रेस घालून फिराय लागलं.गप डिप्लोमा कर! म्हनून केला.पन परत कामं तसलीच मिळाली.
आरं म्हंजे सगळा खेळंच फसला की रे! कामगार व्हाय लागू ने म्हनून डिप्लोमा केलास आनि कंपनीनं परत तुला कामगाराच्याच लेवलला आनला!
आयला ह्येज्यापेक्षा आमी बरं की रे मग! तीन वर्षात १३ हजार पगार झाला मला.पर्मनंटबी झालो.
आनि कुटं जॉब आसला तर सांग लेका.डिप्लोमाच्या लेवलचा.वैताग आलाय या कंपनीत.
म्हजे काय! सांगनार की भावा!
बर चल निगुया बसं यिल कंपनीची.उद्या कामगार दिन हाय.कारेक्रम हायीत कंपनीत मनोरंजनाचं.तेची तयारी करायची हाय! तुला पन शुभेच्चा कामगार दिनाच्या!
चोळ लेका तू बी जखमेव मीठ!
आरं गंमत केली लेका! बरं चल पळतो.बस आली.सांगतो कुटं जॉब आसला तर!
बर बर!! चालतंय!
प्रतिक्रिया
2 May 2018 - 6:13 am | तुषार काळभोर
कुणाला कामगार व्हायचंच नाहीये. उद्योग क्षेत्रात कामगार, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अभियंता व व्यवस्थापक अशी जी ढोबळ विभागणी आहे, त्यात सर्वांना बी.ई.+एमबीए करून व्यवस्थापनात जायचंय. किंवा कमीत कमी कॉम्पुटर वर CATIA/ProEवर 3D drawing करायचंय. कुणालाच लाईन वर कामगार व्हायचं नाहीये. डिप्लोमा करून मेंटेनन्स/प्रॉडक्शन सुपरवायझर सुद्धा कुणाला व्हायचं नसतं.
म्हणून मग आयटीआय केलेले कामगार कमी आणि बीई झालेले कंत्राटी कामगार जास्त झालेत.
मागच्या आठवड्यात एका कंत्राटी ऑपरेटर ने त्याच्या लग्नाची पत्रिका दिली.
काम:methods&process engineering विभागात वेगवेगळ्या मशिन्स नवीन गरजेनुसार सुधारणे - या कामात प्रोसेस इंजिनियर ला मदत करणे
पगार १०००० महिना (कँटीन, बस, पी एफ जाऊन ८५००-९०००)
शिक्षण BE (मेक) + MBA (ऑपरेशन्स)
कारण इतकं शिकूनही तरुणांना BE किंवा MBA झाल्यावर असायला हवं तितकं त्या क्षेत्रातलं कौशल्याच नसतं.
2 May 2018 - 12:23 pm | उपयोजक
काय करायला हवं नेमकं? कारण दरवेळी फक्त प्रॉब्लेम मांडून भागत नाही. समस्या सुटण्याच्या दृष्टीनेही विचार व्हायला हवा.
3 May 2018 - 6:30 am | तुषार काळभोर
उदा
१) आरे पप्पा म्हनले आयटीया करुन कुटं हात काळं करुन घेतोस? कामगाराचा ड्रेस घालून फिराय लागलं.गप डिप्लोमा कर! म्हनून केला.पन परत कामं तसलीच मिळाली.
आय टी आय करून कामगार होणे कमीपणाचे मानले जाणे. यामुळे सर्वांनाच इंजिनियर व्हायचे असते.
२) खेडूत यांची लेखमाला
तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …
३) बी एस्सी जिओलॉजी करून पेट्रोलियम कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी असणं, बी ए इकॉनॉमिक्स करून इन्शुरन्स क्षेत्रात उच्च पदस्थ नोकऱ्या करणं, अशा वेगळ्या वाटा माहिती व्हायला हव्यात.
(मला स्वतःला ही दोन उदाहरणं मिपावर वाचून कळली. बाहेरच्या जगात तर हे कुठे ऐकायला सुद्धा मिळत नाही. किमान मराठी समाजात तर जवळजवळ अज्ञान आहे अशा करियर विषयी)
४) आपण जे काही शिकणार आहोत/शिकत आहोत, त्यात कसंतरी पास होण्यापेक्षा ते ज्ञान मिळवणे.
बाकी तुम्हीही तुमच्या ज्ञान व अनुभवाचं ' ऍप्लिकेशन' करून सांगा की काहीतरी.