मालवणी माणूस खट म्हणूनच ओळखला जातो. तशीच त्याची भाषा. सरळ शब्दात बोलले तर मालवणचा खरोखरच कॅलिफोर्निया होईल की काय अशी त्याला भिती वाटत असावी. तर आज सादर करतोय अस्सल मालवणी इरसाल म्हणींचा खजिना. कुठेकुठे थोड्या वाह्यात वाटतील पण प्रगल्भ मिपाकर समजुतीने घेतील ही खात्री आहे.
१ जळ्ळो तुझी पिठी, घोवान धाडली चिठ्ठी
त्याचं काय आहे, एकेकाळी कोकणात घरोघरी चाकरमानी असायचाच. बायका मुलं गावाला आणि चाकरमानी नोकरीसाठी मुंबै लागले. गणपती आणि शिमग्याला फक्त घरी येत असे. त्याची जी काय खुशाली कळायचीची ती पत्र किंवा मनीआर्डरीच्या मागच्या जागेतून. अशी चिठ्ठी आल्यावर त्याची बायल हातातलं काम सोडून धावतपळत ती वाचायला येत असे.
तर अशी अत्यंत प्रिय गोष्ट करायला कुणी काम सोडून पळाला की अजूनही म्हणतात, जळ्ळो तुझी पिठी, घोवान धाडली चिठी.
२ गजालीन् घो खाल्लो
इथे एकदम उलटी परिस्थिती. बायका गजाली(गप्पा) मारायला बसल्या तर घोवाकडे( नव-याकडे) लक्षच नाही राहत.
आता ते गजालीच्याजागी व्हाट्सएप घातलं तरी चालेल. काय म्हणता?
३ मागूक येयना भीक तर इडीये वढूक शीक.
एकदा का माणसाला व्यसन लागले की त्याची सद्सद्विवेकबुद्धी, लाज शरम गहाण पडते. विड्या ओढणा-याला तलफ आली की कधीनाकधी काडेपेटी, विडी दुस-याकडे मागावीच लागते.
हेच उपहासाने उलटं म्हणतात. "मागूक येयना भीक तर इडीये वढूक शीक."
४ वत सांगल्यार वतूचा लोंबता काय इचारू न्हय.
मुलगा छोटा होता. अजून सगळे स्वत:चे स्वत: करायला जमायचे नाही. त्यामुळे "तिकडचा" विधी आटपला की आपल्या आईला पाणी ओतण्यासाठी हाक मारायचा. एकदा आई काही कामात बिझी असते. ती मुलीला पाठवते. मुलगी बालसुलभ उत्सुकतेने प्रश्र्न विचारते आणि आईकडून ओरडा खाते.
जर कोणी सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करायला लागला की म्हणतात, "वत सांगल्यार वतूचा लोंबता काय इचारू न्हय."
५ हगणा-याक न्हय तर बगणा-याक तरी लाज होयी
अर्थ स्पष्ट आहे. हो ना?
६ लिना लिना नी भिकारचिन्हा.
गावातली सगळी मुले शिकली. बीए, बिकाॅम अशा काय-काय डिग्र्या घेतल्या. पण नोकरी नाही म्हणून घरी बसून आहेत. नारळ सुपा-या काढणं, तण काढणं, शेती बागायतीची किंवा छोटी मोठी घरची काम एकतर त्यांना येत नाहीत किंवा कामे करायची लाज वाटते. काही न करता आई बाबांकडे हात पसरणारी ही पिढी बघून वाईट वाटते. जुने जाणते लोक म्हणतात, शिकले खरे पण लिना लिना (लिहिणं) नि भिकारचिन्हा.
७ बोच्याक श्येण लाऊन माका बैल म्हणा.
काहींना मोठेपणा मिळवण्याची, मिरवण्याची एवढी हौस असते त्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात.
बैलपोळ्याच्या बैलाला मिळणारा मान पाहून स्वत:ला तो मान मिळावा म्हणून "बोच्याक श्येण लाऊन माका बैल म्हणा" अशी परिस्थिती.
८ चोळी दी की पाताळ दी , बायेल शेजा-याचीच.
कोकणात घरोघरी कोर्ट कचेरी चालू असते. जमिनीला भाव आला ना! तर एक मुद्दा नेहमी येतो. त्या जागेत मी एवढे माड लावले, खपलो कष्ट काढले तर जागेवर हक्क माझाच. जर वकील चांगला असला तर तो मग समजावतो. " मेल्या, शेजाराच्या बायलेक तू चोळी पाताळ(साडी) कायव घेवान दिलस, तरी बायल तुझी होवची नाय. मालकी बदलत नाही. तसंच हे.".
(विशेष सूचना- या म्हणी स्वत:च्या जबाबदारीवर वापराव्यात.)
.
.
प्रतिक्रिया
3 Mar 2018 - 7:47 am | सस्नेह
हा: हा: !
भारी , इरसाल म्हणी !
3 Mar 2018 - 9:26 am | बबन ताम्बे
म्हणी आणि त्याची उत्पत्ती, दोन्ही भारी.
3 Mar 2018 - 10:20 am | मित्रहो
एकापेक्षा एक म्हणी.
3 Mar 2018 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
3 Mar 2018 - 4:45 pm | पैसा
शिमग्याच्या निमित्ताने अजून उजळणी झाली असणार! =))
3 Mar 2018 - 5:28 pm | प्राची अश्विनी
धन्य!_/\_
5 Mar 2018 - 1:42 pm | अजया
इरसाल मालवणी धन्य _/\_!
3 Mar 2018 - 7:49 pm | नाखु
सूचनेसकट वाचनीय धागा
नाखु
4 Mar 2018 - 3:17 am | भीडस्त
तुम्च्यावाल्या म्हनी.आवाल्ड्या
4 Mar 2018 - 8:31 pm | सुधीर कांदळकर
म्हणींशिवाय मालवणी बोली अपुरीच. पण बहुतेक म्हणी अब्रह्मण्यम आहेत.
उदा दुभती म्हस इकून *** रेडो कोनी घेवंचो?
** खरवडून मढां हलक्यां होतलां होय?
अशा अनेक म्हणी आठवल्या आणि मस्त करमणूक झाली. धन्यवाद.
4 Mar 2018 - 10:17 pm | पैसा
चुकलामाकला यांनी जरा हातचे राखून लेख लिहिला असावा असा संशय आला होता, तो आता पक्का झाला!
5 Mar 2018 - 2:11 pm | बाजीप्रभू
इरसाल भाषा आणि इरसाल म्हणी... मस्त... उजळणी झाली _/\_