मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग २
भाग १
संस्कृत सुभाषितांच्या क्षेत्रात निश्चित उगम सांगता येईल असे थोडेच आहे. बहुतेक नीतिपर, व्यवहारज्ञान सांगणारे आणि बोलणार्यांच्या मुखामध्ये प्रत्यही असणारे असे श्लोक कोणातरी (आता अज्ञात) कवीची रचना असते. एकदा ती सर्वमान्य झाली की ती सुभाषितांच्या एका संग्रहातून दुसर्यात अशी फिरू लागते. ह्यातल्या बहुतेक संग्रहांचे पौर्वापर्य ठरविणे दुस्तर असते आणि मूळचा कोण आणि नक्कल कोणती हेहि ठरवता येत नाही. एक वचन लोकप्रिय झाले की ते वापरून दुसरा कोणी कवि त्याच्याभोवती नवा श्लोक निर्माण करतो. आता मूळचा श्लोक कोठला आणि त्याच्यासारखाच अर्थ असलेला नंतरचा दुसरा श्लोक कोठला हे ठरविता येत नाही. पंचतंत्र आणि हितोपदेशातील अनेक श्लोक तसेच्या तसे वा थोडयाबहुत फरकाने अन्यत्र आढळतात. ह्यांचा मूलस्रोत ठरविणे आता अशक्य कार्य आहे.
माझ्या ह्या कामापुरता जेथे कालिदास्र, भर्तृहरि, महाभारत ह्यासारखा उगम निश्चित दिसतो तेथे तसा उल्लेख केला आहे. बाकीसाठी प्रामुख्याने सुभाषितरत्नभांडागारात उल्लेखिलेले मूलस्रोत ह्यांचा आणि कधीकधी अन्य ग्रंथांचा आधार घेतला आहे.
१) नभ:स्पृशं दीप्तम्।
(भारतीय वायुसेनेचे ध्येयवाक्य. भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् ह्यांनी हे सुचविले असे वाचल्याचे स्मरते.)
नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो॥
गीता ११.२४
हे विष्णो, आकाशस्पर्शी ज्योतीसारख्या आणि अनेकवर्णयुक्त, उघडया मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्रांच्या तुला पाहून भयभीत झालेल्या मजमध्ये धैर्य आणि शांति नाहीसे झाले आहेत. (विश्वरूपदर्शनाचे श्लोक,)
२) मरणं प्रकृतिः शरीरिणाम्।
मरणं प्रकृतिः शरीरिणां विकृतिर्जीवितमुच्यते बुधैः।
क्षणमप्यवतिष्ठते श्वसन्यदि जन्तुर्ननु लाभवानसौ॥
रघुवंश ८.८७
मरण ही शरीरधारकांची प्रवृत्ति आणि जीवन ही विकृति आहे असे ज्ञानी म्हणतात. एखादा जीव श्वास घेऊन एक क्षणभर जगला तरी तो त्याचा लाभच आहे.
३) बलमार्तभयोपशान्तये।
बलमार्तभयोपशान्तये विदुषां सत्कृतये बहु श्रुतम्।
वसु तस्य विभोर्न केवलं गुणवत्तापि परप्रयोजना॥
रघुवंश ८.३१
त्या राजाचे बल दुःखितांचे भय घालविण्यासाठी आणि मिळविलेले ज्ञान विद्वानांचा सत्कार करण्यासाठी होते. त्याची संपत्तीच नाही तर गुणहि दुसर्यांच्या उपयोगासाठी होते.
४) नामूलं लिख्यते किञ्चित्।
इहान्वयमुखेनैव सर्वं व्याख्यायते मया।
नामूलं लिख्यते किञ्चिन्नानपेक्षितमुच्यते॥
मल्लिनाथ संजीविनीटीका प्रस्तावना
येथे मी सर्व व्याख्या अन्वयमार्गाने केली आहे. आधार नसलेले काहीहि लिहिलेले नाही आणि ज्याची आवश्यकता नाही असे काहीहि म्हटलेले नाही.
५) मल्लिनाथी - कोलाचल मल्लिनाथ ह्या १४व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या टीकाकाराने सर्व पंचमहाकाव्यांवर टीका लिहिल्या आहेत आणि त्यांना विद्वन्मान्यता मिळालेली आहे. इतकी की कशावरहि टिप्पणी करणे ह्याला ’मल्लिनाथी’ असा शब्दच रूढ झाला आहे.
६) विनाशकाले विपरीतबुद्धिः।
न भूतपूर्वो न च केन दृष्टो हेम्नः कुरङ्गो न कदापि वार्ता।
तथापि तृष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धिः॥
सुभाषित
सोन्याचा हरिण पूर्वी कधी झाला नाही आणि कोणी पाहिला नाही. त्याची काहीहि वार्ता नाही. तरीहि रामाला त्याचा लोभ पडला. विनाशकाळी बुद्धि उलटी फिरते.
७) बलीयसी केवलमीश्वरेच्छा।
स्वयं महेश: श्वशुरो नगेश: सखा धनेशस्तनयो गणेशः।
तथापि भिक्षाटनमेव शम्भोर्बलीयसी केवलमीश्वरेच्छा॥
सुभाषित
स्वत: महेश, सासरा पर्वतामधील प्रमुख, मित्र धनेश कुबेर, मुलगा गणांचा नेता. असे असूनहि शंकराला भिक्षेसाठी हिंडावे लागते कारण ईश्वरेच्छा सर्वशक्तिमान् आहे.
८) सुखं च मे शयनं च मे।
अभयं च मे सुखं च मे शयनं च मे
सूषा च मे सुदिनं च मे॥
चमक रुद्रप्रश्न
रुद्रसूक्त ह्या प्रसिद्ध सूक्ताच्या ’चमक’ नावाच्या दुसर्या अर्ध्या भागामध्ये ’मला अमुक मिळो, मला तमुक मिळो’ अशा अनेक गोष्टी रुद्रदेवतेकडून मागितल्या आहेत. त्यातच वरील मागण्या आहेत. त्यांचा अर्थ "मला भीतिपासून मुक्ति मिळो, मला सुख मिळो, चांगली निद्रा, चांगली पहाट आणि चांगला दिवस मिळो"...असा आहे. त्यामधून "आरामाचे जीवन" अशा अर्थी "सुखं च मे शयनं च मे" हा शब्दप्रयोग उचलला गेला आहे.
९) विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुख:।
शिरः शार्वं स्वर्गात्पशुपतिशिरस्तः क्षितिधरं
महीन्द्रादुत्तुङ्गादवनिमवनेश्चापि जलधिम्।
अधोधो गङ्गेयं पदमुपगता स्तोकमधुना
विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुख:॥
भर्तृहरि
स्वर्गातून शंकराच्या मस्तकावर, तेथून हिमालय पर्वतावर, तेथून भूमीवर आणि तेथूनही समुद्रामध्ये. अशी गंगा खालच्याखालच्या पदाकडे जाते. विवेकभ्रष्टांचा नाश शंभर मार्गांनी होतो.
१०) न भूतो न भविष्यति।
कृपणेन समो दाता न भूतो न भविष्यति।
अस्पृशन्नेव वित्तानि यः परेभ्यः प्रयच्छति॥
सुभाषित
कृपणासमान दाता झाला नाही आणि होणार नाही, जो आपल्या संपत्तीला हातहि न लावता दुसर्यांना देऊन टाकतो.
वेङ्कटाद्रिसमं स्थानं ब्रह्माण्डे नास्ति किञ्चन।
वेङ्कटेशसमो देवो न भूतो न भविष्यति॥
वेङ्कटेशस्तोत्र
वेंकटपर्वतासारखे स्थान विश्वामध्ये नाही. वेंकटेशासारखा देव झाला नाही आणि होणार नाही.
११) शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।
अपि क्रियार्थं सुलभं समित्कुशं जलान्यपि स्नानविधिक्षमाणि ते।
अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्॥
कुमारसंभव ५.३३
तुला विधींसाठी समिधा आणि कुशदर्भ सहजतेने मिळतात ना? स्नानास योग्य पाणी आहे ना? तप करायला तू आपल्या शक्तीने बसली आहेस ना? खरोखर, धर्मसाधनेसाठी पहिली गोष्ट म्हणजे शरीर. - कपटवेषधारी शंकर त्याच्या प्राप्तीसाठी तपश्चरणाला बसलेल्या पार्वतीला हे तिची परीक्षा घेण्यासाठी हे प्रश्न विचारतो.
१२) अद्वातद्वा - यद्वा तद्वा।
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मिश्रितम्।
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति॥
सुभाषित
कॊठल्यातरी झाडाचे मूळ कशाततरी मिसळून कोणालातरी द्यावे. परिणाम कोणताहि होईल!
मर्कटस्य सुरापानं तत्र वृश्चिकदंशनम् |
तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यति ||
आधीच मर्कट तशातच मद्य प्याला
झाला तशातहि वृश्चिकदंश त्याला |
झाली तयास तदनंतर भूतबाधा
चेष्टा वदू मग किती कपिच्या अगाधा ||
१३) बादरायणसम्बन्ध.
अस्माकं बदरीचक्रं युष्माकं बदरीतरुः।
बादरायणसम्बन्धात् यूयं यूयं वयं वयम॥
सुभाषित
आमचे चाक बदरीच्या म्हणजे बोरीच्या लाकडाचे आहे आणि ती बोरी तुमची आहे. असे तुमचे आणि आमचे बादरायण नाते आहे.
ह्या मागची कथा अशी असावी. एका गृहस्थाच्या दारी एक बैलगाडी येउन थांबते. एक कुटुंब उतरते आणि ह्याचे पाहुणे बनून पाहुणचार झोडते. ह्याला वाटते बायकोचे नातेवाईक असतील. तिला वाटते हे सासरकडचे दिसतात. रात्री दोघे पतीपत्नी एकमेकांस विचारतात की हे आलेले पाहुणे कोण? तेव्हा सर्व उलगडा होतो. सकाळी तो गृहस्थ पाहुण्यांना विचारतो, "महोदय, तुमची ओळख नाही लागली आणि आपले नाते्संबंध समजले नाहीत." तेव्हा पाहुणा उत्तर देतो, "माझ्या बैलगाडीचे चाक बोरीच्या लाकडाचे आहे. तुमच्या दारी बोरीचे झाड आहे, अन् असा आपला बोरीचा बादरायण संबंध आहे."
बादरायण संबंध ही तत्त्वज्ञानातील पारिभाषिक संज्ञा आहे.
१४) अजागळ आणि गलथान
धर्मार्थकाममोक्षाणां यस्यैकोऽपि न विद्यते।
अजागलस्तनस्येव तस्य जन्म निरर्थकम्॥
चाणक्यनीति
ज्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्यापैकी काहीहि मिळालेले नाही त्याचा जन्म बोकडाच्या गळ्याखाली लोंबणार्या स्तनांसारखा निरर्थक आहे. ’गलथान’ ह्याचाहि अर्थ तोच आहे - बोकडाच्या गळ्याखाली लोंबणार्या स्तनासारखा निरुपयोगी.
१५) वा न वा। (वानवा)
शतेषु जायते शूर: सहस्रेषु च पण्डित:।
वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा॥
सुभाषित
शंभरामधे एकजण शूर निपजतो, सहस्रांमध्ये एक पण्डित, दशसहस्रामध्ये एक वक्ता. देणारा दाता मात्र होतो किंवा होत नाही.
१६) लाङ्गूलचालन.
लाङ्गूलचालनमधश्चरणावपातं
भूमौ निपत्य वदनोदरदर्शनं च।
श्वा पिण्डदस्य कुरुते गजपुङ्गवस्तु
धीरं विलोकयति चाटुशतैश्च भुङ्क्ते॥
भर्तृहरि नीतिशतक
शेपूट हालविणे, पायांवर लोळण घेणे, भूमीवर पडून तोंड आणि पोट दाखविणे - खायला देणार्यापुढे कुत्रा हे सर्व करतो. गजेन्द्र मात्र त्याच्याकडे शांतपणे पाहतो आणि शंभर आर्जवे केली म्हणजेच खातो.
१७) यथा राजा तथा प्रजाः।
राज्ञि धर्मिणि धर्मिष्ठाः पापे पापाः समे समाः।
लोकास्तमनुवर्तन्ते यथा राजा तथा प्रजाः॥
भोजप्रबन्ध
राजा धार्मिक तर प्रजा धार्मिक, राजा पापी तर प्रजा पापी, राजा मध्यम तर प्रजा मध्यम. प्रजा त्याच्यासारखी वागते. जसा राजा तशी त्याची प्रजा.
१८) राजा कालस्य कारणम्।
कालो वा कारणं राज्ञः राजा वा कालकारणम्।
इति ते संशयो माऽभूत् राजा कालस्य कारणम्॥
महाभारत उद्योगपर्व
काळामुळे राजा निर्माण होतो की राजा काळ बनवितो ह्याविषयी संशय बाळगू नकोस. राजाच काळ बनवितो.
१९) नाटयं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम्।
देवानामिदमामनन्ति मुनयः कान्तं क्रतुं चाक्षुषम्।
रुद्रेणेदमुमाकृतव्यतिकरे स्वाङ्गे विभक्तं द्विधा।
त्रैगुण्योद्भवमत्र लोकचरितं नानारसं दृश्यते।
नाटयं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम्॥
कालिदास मालविकाग्निमित्र
ऋषि ह्याला देवांचा नेत्रग्राह्य यज्ञ मानतात. अर्धनारीनटेश्वर शंकराने जणू हा आपल्या शरीराचा केलेला अर्धा भाग आहे. सत्त्व, रज आणि तम ह्या त्रिगुणांतून निर्माण झालेली नाना रसांनी पूर्ण अशी जगरहाटी येथे दिसते. वेगळ्या वेगळ्या आवडीनिवडीच्या लोकांना मनोरंजन देणारी नाटय ही एकच गोष्ट आहे.
(पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील रंगमंचाच्या शीर्षस्थानी हे वचन पाहिल्याचे अनेकांना स्मरत असेल.)
२०) खटाटोप - फटाटोप.
निर्विषेणापि सर्पेण कर्तव्या महती फटा।
विषमस्तु न चाप्यस्तु फटाटोपो भयङ्करः॥
पंचतंत्र १-२२५
खटाटोप ह्या नित्य वापरातील शब्दाचा हा उगम आहे: बिनविषारी सापानेही मोठी फणा - फटा - काढावी. विष असो वा नसो - फटाटोप भीतिकारकच असतो.
२१) योजकस्तत्र दुर्लभः।
अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्।
अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः॥
सुभाषित
ज्यात मन्त्रशक्ति नाही असे एकहि अक्षर नाही. ज्याला औषधी गुण नाही असे मूळ नाही. पूर्णतः निरुपयोगी असा माणूस नाही. ह्यांना कामाला लावणारा दुर्मिळ असतो.
प्रतिक्रिया
3 Mar 2018 - 6:47 am | पैसा
हे सगळे शब्द, वाक्प्रचार आपण वापरतो. पण त्यांचा उगम बरेचदा माहित नसतो.
छान लिहिताय. धन्यवाद!
3 Mar 2018 - 11:01 am | प्राची अश्विनी
अतिशय अभ्यासपूर्ण तुमचं लिखाण नेहमीच आवडतं.