एसटी कार्यशाळा भेट-चिखलठाणा औरंगाबाद

आलमगिर's picture
आलमगिर in जनातलं, मनातलं
21 Feb 2018 - 10:01 am

नमस्कार मिपाकर मंडळी ,
आज थोड्या वेगळ्या विषयावर लिहिणार आहे.

दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी एसटी लव्हर्स ग्रुप तर्फे केंद्रीय बस बांधणी आणि दुरुस्ती कार्यशाळा चिखलठाण औरंगाबाद ला दिलेल्या भेटीचा हा वृत्तांत.

औरंगाबाद शहराबाहेर सिडको बस स्टॅन्ड वरून बाहेर पडला कि चिखलठाना मध्ये आपल्याला दिसते ती एसटीची विभागीय कार्यशाळा. एसटीच्या प्रचंड कारभाराची ती जणू प्रतिनिधीच. ह्याच कार्यशाळेत आम्ही म्हणजे MSRTC LOVERS GROUP च्या सदस्यांनी भेट दिली.

कार्यशाळेमध्ये असलेल्या विविध विभागांची माहिती आपण आता घेऊ.

०१: दुरुस्ती विभाग:- कार्यशाळेत शिरताच प्रथम दिसतो दुरुस्ती विभाग. एसटीच्या शहर बस आणि इतर अनेक बस गाड्या ( शहर बस-४० , हिरकणी-७४ , शिवनेरी-१४ , साधी-८० परिवर्तन-८० , यशवंती-४ शिवशाही-८) ह्यांची देखभाल दुरुस्ती होते. टायर ६०००० किमी नंतर बदलले जातात. औरंगाबाद १ आणि २ आगार च्या सर्व बसेस येथेच दुरुस्ती साठी आणि आर.सि. साठी येतात.
महाराष्ट्र राज्य परिवहन आपल्या बस चा पुरेपूर उपयोग कसा करते ते आपण पाहू.
समजा एखादी हिरकणी सलग ८ वर्षे चालवली जाते. त्यानंतर ती दापोडी , औरंगाबाद अथवा नागपूर ह्या विभागीय कार्यशाळेत आणली जाते. मग त्या गाडीचे रुपडे पूर्ण बदलून म्हणजेच आर.सी ( Reconstruction) करून पहिले परिवर्तन आणि मग शेवटी ती बस अजून ४/५ वर्षांनी भंगारात काढली जाते.


०२:इंजिन विभाग:-
एंजिने विभाग म्हणजे बस चे हृदय. भारत-दोन स्टेज ची एंजिने मग ती अशोक लेलँड असोत अथवा टाटा तेथे दुरुस्त केली जातात. एसटीने यासाठी खास कामगारांची नेमणूक केली आहे. एंजिने दुरुस्त/नवीनीकरण झाल्यावर ती ड्राईव्ह वे वर चाचणी घेतली जाते. प्रचंड आकाराची ती ड्राइव्ह टेस्ट यंत्रणा एका एंजिने ला टेस्ट करायला ८ तास घेते. चाचणी मध्ये एंजिने पास झाल्यावरच मग ते परत बस मध्ये बसवले जाते. गेल्याच आठवड्यात एसटी चा कामगारांनी भारत-२ चे एंजिने यशश्वीरित्या भारत-३ प्रणाली मध्ये बदलून दाखवले आहे. भारतीय वाहतूक मानांकन मध्ये सध्या भारत-४ हेवी वाहनांसाठी आहे अशा आहे कि एसटी लवकरच भारत-४ श्रेणीचे एंजिने बस मध्ये बसवेल.

०३:भांडार विभाग:- स्टोअर्स / भांडार विभाग खरंतर स्टोअर्स हि नेहेमीच पुरुषी मक्तेदारी राहिली आहे. पण ह्या बाबतीत एसटी ने आम्हाला चकित केले. कारण एस्टिच्या ह्या विभागाचे परिचालक एक महिला अधिकारी समर्थपणे गेले ४ वर्षे सांभाळत आहेत. नट बोल्ट पासून चासी पर्यंत आणि दिव्या पासून ते पेट्रोल टाकीपर्यंत सर्वच लागनाऱ्या वस्तू भांडार विभागाच्या नियंत्रणाखाली आहेत ( ह्याची खरेदी मुख्यालय-मुंबई येथून केली जाते). भांडार विभागाकडे सध्या बस चे रूपांतर केलेले २ ट्रक्स कार्यरत आहेत जे ह्या सर्व गोष्टींची नेमाने वाहतूक करतात.

०४:बॉडी शॉप: आपल्या सर्वांना कदाचित हे माहित नसेल पण हे सत्य आहे कि आपली लाडकी एसटी बस बांधणी पण करते. होय एसटी च्या सर्व बसेस एसटी दापोली , औरंगाबाद आणि नागपूर कार्यशाळेत बांधते. असे करणारे महाराष्ट्र राज्य परिवहन हे देशातले एकमेव महामंडळ आहे. हल्लीच एसटीने एसिजिएल-गोवा कडून नवीन हिरकणीची बांधणी करून घेतल्या आहेत. बस बांधली हि पारंपरिक अलुमिनियम वापरूनच केली जात होती पण आता केंद्रीय नियम बदलल्यामुळे एसटी ने माईल्ड स्टील प्रकारातल्या नवीन परिवर्तन बस ची बांधणी पण सुरु केली आहे. सादर गाड्या ह्या अनुक्रमे नागपूर<>गोंदिया , पुणे<>शिर्डी आणि विजयपूर<>पाटण मार्गावर यशश्वीपणे धावत आहेत. लवकरच राज्यभरातल्या सर्व आगारांसाठी १५० बस बांधणी चे काम सुरु होणार आहे.

०५:पेंट विभाग: टोमॅटो रेड हीच शेड आता एसटी च्या परिवर्तन बस साठी वापरली जाणार आहे. विविध प्रकारचे स्टंन्सील्स , लोगोचे अल्लुनिमिम चे स्टेन्सिल्स , ग्लास पैंटिंग साठी विशेष पेन्ट्स , डेपो मार्किं साथी चमकणारे रंग , तरच बस मध्ये लावायचा पिवळा आणि सीट ला देण्यासाठी हिरवा रंग पण फिक्स झाला आहे. पैं विभागात बस चा रंग नवीन दिला जातो. प्रथम एसटी चे कामगार हाताने सर्व रंग खरवडून काढतात मग त्यावर प्रिमेर चा ठार देऊन बस २ दिवस ठेवली जाते . त्यानंतरच बस वर रंग आणि गंज प्रतिरोधकचे मिश्रण पेंट केले जाते . मग बस पुढे चर्मकार विभागाकडे पाठवली जाते.

०६:चर्मकार विभाग: सीट बनवणे आणि खराब झालेल्या सीट्स दुरुस्त करणे हेच ह्या विभागाचे काम आहे. चर्मकार विभागात सध्या ३० कामगार काम करत असून दिवशाला ४० सध्या आणि २० पुश-बॅक पारावरच्या सीट चे उत्पादन होत आहे. ह्या सीट बस मध्ये बसवल्याचे काम पण पेंट विभागाचं करतो.

०७:चाचणी विभाग:- बस पूर्ण बांधून / नवी बनवून झाल्यावर त्याची पूर्ण चाचणी केली जाते यासाठी बस कार्यशाळेत चाचणी रास्ता उपलब्ध आहे.

वरील सर्व विभागांना आम्ही भेटी दिल्या. एसटीचे विभागीय प्रमुख सुद्धा आमच्या बरोबर होते . कोणाला सादर ग्रुप मध्ये यायचे असल्यास लिंक खाली देतो आहे .

फोटो काधायला मनाई असल्यामुळे कुठलेही फोटो काढलेले नाहीत अधिक माहितीसाठी youtube वर "अशी बनते एसटी " नावाची डोकमेंटरी उपलब्ध आहे

फेसबुक लिंक : ग्रुप साठी
https://www.facebook.com/search/top/?q=msrtc%20lovers%20group%20-%20st%2...

प्रवासअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

भारत २/३/४ एन्जिनात काय फरक आहे? इग्झॉस्ट gas मधले दुषित वायुंचे प्रमाण?
कर्नाटकात असतात तशा बस का बनवत नाहीत?

कर्नाटक राज्य परिवहन टाटा आणि आयशर कंपनी कडून थेट बांधणी केलेल्या बस घेते त्यामुळे त्या भारत ४ च्याच असतात
https://en.wikipedia.org/wiki/Bharat_Stage_emission_standards
भारत एंजिने स्टॅंडर्ड साठी विकी लिंक वरती आहे

ड्राइवरच्या मागचं पार्टिशन काढल्यास हवा खेळती राहील. डिझलचा वास कोंडणार नाही.

हा प्रकार एसटी ने केला होता पण ड्राइवर कंपार्टमेंट वेगळा असणं हे पूर्णतः ड्रायव्हरच्या सुरक्षेच्या दृष्टीने ( प्रवाशांपासून) महत्वाचे आहे . नवीन बांधलेल्या बस मध्ये हा प्रयोग एसटीने केला आहे ड्राईव्ह मागे ग्रिल लावले आहे सिटी बस सारखे. जर यशश्वी झाला तर सर्व बस बदलतील

कंजूस's picture

21 Feb 2018 - 2:46 pm | कंजूस

काहितरीच दावा आहे सुरक्षिततेचा. कर्नाटकात काय ते असुरक्षित आहेत का? ड्रायव्हर केबिनमध्ये डावीकडे एक कंडक्टर शिट असते तिथेही प्रवासी उभे असतात!!
आमदार,खासदारापर्यंत शिटा रिझव ठेवण्याचा आणखी एक आचरट विनोद असतो.
आसनगावजवळचा शहापूर डेपो हा एक नमुना आहे.

अभ्या..'s picture

22 Feb 2018 - 2:00 pm | अभ्या..

कर्नाटकाच्या बसेस जास्त मोठ्या आणि स्पेसिअस असतात पण त्यांच्या बर्याच बसेस महाराष्ट्रात बिल्ड होतात. आयशर ची इंजिने अधिक वेगासाठी आहेत दिसले की त्यांनी आयशर ला प्राधान्य दिले. त्यांच्या पांढऱ्या लाल बसेस मस्त आहेत. आत स्टेनलेस स्टील मुळे स्वच्छ वाटते.
महा एसटीचा यूएसपी आहे तुलनेने चांगले द्रायव्हर्स. दरिद्री बसेस पण परफेकट चालवतात. आपण प्रवासी बस चालवत आहोत, रेसिंग बाईक नाही हे भान एसटी वाले पाळतात. इतके करून ते बर्याच वेळेत राईट टाइम पोहोचवतात. सुरक्षित वाटते एसटीत. कर्नाटक आंध्र बसेस तसे नाहीत. द्रायव्हिंग रॅश असते. इंटरस्तेट प्रवासता तिकीट न देता कमी पैसे घेऊन खिशात घालणे सर्रास असते. लगेज तर हमखास कंडक्टर च्या खिशात पैसे जातात. ढाब्याचे सिलेक्शन गचाळ असते. त्यांच्या राज्यात एसटी ला प्लॅटफॉर्म मिळू देत नाहीत (आजकाल आपले पण तसेच करतात हे खास)
तेलंगणाच्या बसेस सगळ्यात गचाळ. त्यांच्या इतके माजूरडे कंडक्टर पाहिले नाहीत. तिकिटे बर्याचदा पंच असतात.

महा एसटीचा यूएसपी आहे तुलनेने चांगले द्रायव्हर्स.

+१.
शिवाय ते काहीतरी स्पीड लॉक का काय लावतात म्हणे आपल्या बसेस ना.

मार्मिक गोडसे's picture

22 Feb 2018 - 2:48 pm | मार्मिक गोडसे

शिवाय ते काहीतरी स्पीड लॉक का काय लावतात म्हणे आपल्या बसेस ना
Speed governor

मार्मिक गोडसे's picture

22 Feb 2018 - 2:42 pm | मार्मिक गोडसे

महा एसटीचा यूएसपी आहे तुलनेने चांगले द्रायव्हर्स. दरिद्री बसेस पण परफेकट चालवतात. आपण प्रवासी बस चालवत आहोत, रेसिंग बाईक नाही हे भान एसटी वाले पाळतात. इतके करून ते बर्याच वेळेत राईट टाइम पोहोचवतात. सुरक्षित वाटते एसटीत.

खरंय, सुरक्षित प्रवासाच्या हमीमुळे मी नेहमी एसटीनेच प्रवास करतो.

मुंबई -पुणे स्टे- सोलापूर- आन्ध्रात जाणाय्रा बसेसने जातो. उत्तम सेवा ,स्वस्त. स्वच्छ. हायवेने वाकडफाटा- युनिवरसिटी - पुणे स्टेशन.
कुरल्याहून सुटल्यावर फक्त पनवेलला थांबते, नंतर पुणे स्टेशन - सोलापूर. डिजिटल तिकिट. टिव्ही असतो.

उत्तम लेख. एरवी ही माहिती सहज मिळत नाही.

आलमगिर's picture

21 Feb 2018 - 11:53 am | आलमगिर

धन्यवाद गवि

शब्दबम्बाळ's picture

21 Feb 2018 - 10:38 am | शब्दबम्बाळ

चांगला लेख!(मला हल्ली मिपावर मराठी टायपिंग करता येत नाहीये, हा प्रॉब्लेम फक्त मलाच येतोय कि काही तांत्रिक घोळ आहे?)

गेल्याच आठवड्यात एसटी चा कामगारांनी भारत-२ चे एंजिने यशश्वीरित्या भारत-३ प्रणाली मध्ये बदलून दाखवले आहे.

हे वाचून आश्चर्य वाटलं. भारतात २०१० पासून BS ३ सुरु आहे. आता तर BS ३ गाड्या विकण्यावर देखील बंदी आहे.
अशा वेळेस हे लोक "आत्ता" भारत-३ प्रणाली स्वीकारत आहेत? मग भारत-६ हे २०२० ला येईपर्यंत यांच्या सगळ्या गाड्या भारत-३ मध्ये तरी रूपांतरित होतील का?
एसटी ला प्रदूषण नियंत्रक मंडळाकडून काही विशेष सूट असते का? कि तुम्ही हवेत पाहिजे तितका धूर सोडू शकता?
कारण हवा दूषित करणाऱ्या गाड्यांमध्ये एसटीचा क्रमांक फार वरचा असेल!

आलमगिर's picture

21 Feb 2018 - 11:45 am | आलमगिर

एसटी ला कुठलीही सूट नाही पण एसटी च्या सर्व जुन्या गाड्या ह्या भारत-२ च्या आहेत आता नवीन गाड्यांची बांधणी शक्य नाहीये मला एसटी कडे नव्या गाड्या घ्याल पैसे नाहीत. एंजिने मॉडिफिकेशन ला भारत-२ ची एंजिने काही तांत्रिक कर्ण मुले भारत-३ मधेच ती भारत-४ मानकांप्रमाणे होऊ शकत नाहीत त्यामुळे आता सगळ्या गाड्या हुळउ हळू भारत-३ च्या होतील जुन्या गाड्या जेव्हा बदलतील तेव्हा त्या भारत-४/५ च्या होतील . टाटा कंपनी ने भारत-४ चे तंत्रज्ञान एसटी ला दिले आहे पण अशोक लेलँड जास्त पैसे मागत आहे. म्हणूनच नवीन बांधलेल्या मोल्ड स्टील बसेस टाटा च्या चासीस वर पुनर्बांधणी करून भारत ४ एंजिने सह रस्त्यावर उतरवल्या आहेत.

मस्त आहे तुमचा ग्रुप. लेख पण चांगला झालाय. अश्या विषयावरचे अजून लेख येउ द्या.

बिटाकाका's picture

21 Feb 2018 - 12:12 pm | बिटाकाका

खूप सुंदर माहिती! दापोडीच्या कार्यशाळेला जाऊन भेट देण्याची इच्छा निर्माण झाली. धन्यवाद या माहितीबद्दल!

मार्मिक गोडसे's picture

21 Feb 2018 - 12:34 pm | मार्मिक गोडसे

कल्याण डोंबिवली वाहतूक शाखेच्या बसमध्ये रंग दिल्याची व त्याची अंतिम मुदतीची माहिती बघितल्याचे आठवते. एस्टीच्या बसमध्ये अशी माहिती आढळली नाही.
प्रदूषण करणाऱ्या एसटीच्या बसेस फक्त ग्रामीण भागात वापरल्या जातात, शहर हद्दीत त्यांना प्रवेश करण्यास बंदी आहे.

एस्टीच्या पुढील दारापाशी स्टेंसिलने किंवा मागिल दारापाशी माहिती असते. पण ही माहिती मुंबई विभाग पेंट करत नाही. पण बाकीचे विभाग करतात

पैसा's picture

22 Feb 2018 - 9:12 am | पैसा

एसटीला महाराष्ट्रात स्पर्धा किंवा पर्याय नाही तरी ती तोट्यात का? गोव्यात कदंब बसेस फायद्यात आणण्याचा यशस्वी प्रयोग झालेला बघितला आहे. तशा प्रकारे फक्त ड्रायव्हर असलेल्या पॉइंट to पॉइंट विना थांबा बस, आंतरराज्य बसेस असे जास्त प्रमाणात एस्टी का चालवत नाही? आंध्र च्या बसचा ड्रायव्हर कंडक्टर आलटून पालटून दोन्ही कामे करत आंतरराज्य बसेस चालवतात. असे काही कल्पक प्रयोग एस्टीने करावेत.

एस्टीच्या बसेस हाडे खिळखिळी करणाऱ्या असतात. रस्ते खराब आणि गाड्या भंगार अवस्थेत असतात. रत्नागिरी विभागात एस्टी प्रवास म्हणजे अगदी शिक्षा वाटते. प्रवाशाला जराही आराम मिळणार नाही याची पुरेपूर काळजी घेतात.

आलमगिर's picture

25 Feb 2018 - 7:09 pm | आलमगिर

कदंबला नाॕन इनकम रुट्स चालवायचे बंधन नाही जे एस्टीवर आहे.

पैसा's picture

26 Feb 2018 - 8:31 pm | पैसा

खाजगी बसेस बहुतांशी फायद्याच्या रुट्स वर आहेत. लहान गावातून कदंबाच जातात.

अभिजीत अवलिया's picture

25 Feb 2018 - 7:19 pm | अभिजीत अवलिया

एस. टी.ला महाराष्ट्रात पर्याय किंवा स्पर्धा नाही असे वाटत नाही. ग्रामीण भागात जीप, सिक्स सीटर तर महामार्गावरती खाजगी गाड्यांपासून प्रचंड स्पर्धा आहे.
खाजगी गाड्यांपेक्षा प्रति सीट जास्त प्रवासी कर, टोल मधून सवलत नाही, एस. टी. कडून शेकडो प्रकारच्या दिल्या जाणाऱ्या सवलती आणि खाजगी वाहतूक ह्यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे. कुठलेही सरकार एस. टी. महामंडळाला मदत करेल असे वाटत नाही.

बऱ्याचदा महामंडळ देखील फारच अतरंगी पद्धतीने काम करते असे वाटते.
उदा. पुणे सातारा विना वाहक विना थांबा गाड्या दर अर्ध्या (का एक ?) तासाला असतात. असे असताना देखील पुणे ते कराड/कोल्हापूर/सांगली/पणजी गाड्या साताऱ्यात आत आणून काय साध्य करतात समजत नाही. ह्यात विनाकारण पाऊण तास वाया जातो.
पुणे ते पणजी दिवसाला ८-१० खाजगी वोल्वो असतात. पण महामंडळाने ह्या प्रचंड मागणी असणाऱ्या रूटवर कधीही शिवनेरी सुरु केली नाही. आता शिवशाही सुरु केलीय बहुतेक.

सध्या एस. टी. आगारात खाजगी बसेसना प्रवेश नसला तरी बहुतांश ठिकाणी बस स्थानकाच्या बाहेरच खाजगी गाड्यांचा थांबा असतो. त्यामुळे तसे पण उत्पन्नातील नुकसान टाळू शकत नाही एस. टी. महामंडळ. त्यापेक्षा त्यांना आत प्रवेश देऊन त्यांच्याकडून भाडे आकारले तर उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल.

आगारांचे व्यावसायिक पद्धतीने विकसन करणे जरुरीचे आहे. अत्यंत घाणेरड्या स्थितीत असणारी सुलभ शौचालये, गळके छप्पर, सगळीकडे पान तंबाखू खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या, जळमटे, आणि अगम्य भाषेत उद्घोषणा करणारे कंट्रोलर ह्या स्थितीतून कधी तरी बाहेर पडावेच लागेल. केवळ दुसरा पर्याय उपलब्ध नाही म्हणून एस. टी. ने प्रवास करण्यापेक्षा लोकांना एस. टी. प्रवास करावासा वाटलं पाहिजे.

बाकी एस. टी.चे चालक वाहक खूपच उत्तम पद्धतीने गाड्या चालवतात ह्यात वाद नाही.

मारवा's picture

22 Feb 2018 - 10:35 pm | मारवा

ह्याच कार्यशाळेत आम्ही म्हणजे MSRTC LOVERS GROUP च्या सदस्यांनी भेट दिली.
क्या बात है ! प्रेम कुणी अगदी कशावरही करु शकतो एस टी हा कोणाच्या इश्क चा विषय असु शकतो हीच माहीती मोठी रोमांचक आहे.
म्हणजे या धक्क्यातुन सावरल्यावर पुढील प्रतिसाद देतो.

आलमगिर's picture

23 Feb 2018 - 10:44 pm | आलमगिर

अहो आमच्या फेसबुक ग्रुपची संख्या १५०००+ आहे. बस सजवणे गौरी गणपती जादा वाहतूकीवेळी Helpdesk लावणे,तसेच बसचा Database पण आम्ही Maintain करतो. एस्टची बसमधले प्रदर्शन ही पण याच ग्रुपची संकल्पना

पण हे सर्वच १५००० सदस्य नेहमी एसटीनेच प्रवास करतात का?

पाषाणभेद's picture

26 Feb 2018 - 5:13 pm | पाषाणभेद

फक्त लव्ह न करता त्या चुकारांना काम न केल्याबद्दल अन योग्य ते बदल करण्याच्या सुचना देखील देवून त्यांचा पाठपुरावा करा.
सिट्स, बस स्थानके, स्वच्छता, मुतार्‍या आदी. आदी.

रीडर's picture

23 Feb 2018 - 1:55 am | रीडर

शिवशाही बस खूप छान आहे
विना वाहक आणि a c
टीकीट शिवनेरी पेक्षा कमी
S T प्रोफेशनली चालवली तर उत्तम सर्विस आहे

S T प्रोफेशनली चालवली तर उत्तम सर्विस आहे

+१

अभ्या..'s picture

25 Feb 2018 - 2:37 pm | अभ्या..

डोंबलाची प्रोफेशनल.
सोलापूर पुणे थाटात शिवशाही तासातासाने चालू केलीय. 395 भाडे आहे. साध्या परिवर्तन बसला 266 रुपये. हिरकणी एशियाड ला काहीतरी 295. लोक कशाला 400 रुपये फक्त एसी साठी घालवत बसतील. सध्या दुपारची इंटरसिटी ट्रेन बंद आहे म्हणून निदान निम्म्या सीट्स भरतात शिवशाहीच्या. इंदापूर भिगवण घेत 5 तास लावतातच. परिवर्तन 5.30 तासात येते इतकाच फरक. ट्रेन 125 रुपयात 4 तासात आणते. शिवशाही निदान वल्लभ नगरपर्यंत आणली तर आयटीवाले प्रतिसाद देतील. अन्यथा बंदच पडणार आहे.

शिवशाही निदान वल्लभ नगरपर्यंत आणली तर आयटीवाले प्रतिसाद देतील. अन्यथा बंदच पडणार आहे.

डायरेक्ट हिंजवडीतून सुरु झाल्यात म्हणे काही भागांना शिवशाही.

चौथा कोनाडा's picture

26 Feb 2018 - 5:35 pm | चौथा कोनाडा

मग निगडी पर्यंत आणायलाही काही हरकत नाही. नॉन-आयटी वाले देखिल याचा लाभ घेऊ शकतील.

रीडर's picture

23 Feb 2018 - 1:55 am | रीडर

शिवशाही बस खूप छान आहे
विना वाहक आणि a c
टीकीट शिवनेरी पेक्षा कमी
S T प्रोफेशनली चालवली तर उत्तम सर्विस आहे

कंजूस's picture

25 Feb 2018 - 7:15 am | कंजूस

कालचीच लोकसत्ता बातमी -शिवशाही बस - महिन्याला एक कोटी रु तोटा करून ----

चौथा कोनाडा's picture

24 Feb 2018 - 5:47 pm | चौथा कोनाडा

उत्तम लेख ! सुंदर माहिती !
लेखात एसटीच्या वाहन प्रदुषण मानका विषयी माहितीत गफलत केलेली आहे.

एसटी चा कामगारांनी भारत-२ चे एंजिने यशश्वीरित्या भारत-३ प्रणाली मध्ये बदलून दाखवले आहे.

एसटी चासिस विकत घेवुन त्यावर बॉडी बिल्डिंग करत असते. चासिस ही इंजिन सकट विकत घ्यावी लागते, ज्याचे प्रदुषण मानक प्रमाणित असते.
एसटी कामगार इंजिन प्रणाली बदलत / अपग्रेड करत नसतात.

एसटीचे दापोडी वर्कशॉप अतिशय नावाजलेले होते (आताची परिस्थिती माहित नाही) पिंचिं-भोसरी एमायडीसी मधल्या खासगी कंपनीप्रमाणे कडक शिस्त होती.
पाहुण्या लोकांना आवर्जून दाखवले जायची. कर्मचार्‍यांना अभिमान असायचा एसटी वर्कशॉप मध्ये काम करत असल्याचा !
खासगी बॉडी बिल्डर्स आल्यावर परिस्थिती बदलली , संबंधितांचे इंटरेस्टस ही बदलले. इतर सरकारी उद्योगा नुसार हा याचीही वाटचाल सुरू झाली.

एसटी वर्कशॉपमध्ये फोटो काढण्यास मनाई का असावी ? कितीतरी स्वःतहून त्यांच्या वर्कशॉप /असेम्ब्ली प्लान्टचे फोटो, व्हिडियोज प्रकाशित करत असतात.
मर्यादित का होइना फोटो काढता यायला हवेत. आपल्यासाठी हे आनंदाचं असेल. तुम्ही MSRTC LOVERS GROUP करवी आमची ही सुचवणी त्यांच्यापर्यंत पोहोचवा.

एसटी चासिस विकत घेवुन त्यावर बॉडी बिल्डिंग करत असते. चासिस ही इंजिन सकट विकत घ्यावी लागते, ज्याचे प्रदुषण मानक प्रमाणित असते.
एसटी कामगार इंजिन प्रणाली बदलत / अपग्रेड करत नसतात.

एस्टीकडे आजवर सगळ्याच बस भारत-२ आहेत. इंजिनामधे काही तांत्रिकबदल एस्टीने केलेले आहेत अपग्रेड म्हणजे भारत-३ प्रदुषणप्रणाली ला सोईस्कर असा हा बदल आहे.

नितिन थत्ते's picture

26 Feb 2018 - 8:28 pm | नितिन थत्ते

>>एसटीचे दापोडी वर्कशॉप अतिशय नावाजलेले होते (आताची परिस्थिती माहित नाही) पिंचिं-भोसरी एमायडीसी मधल्या खासगी कंपनीप्रमाणे कडक शिस्त होती.

यांनी भेट दिली ती विभागीय कार्यशाळा असणार. पुणे विभागातली विभागीय कार्यशाळा स्वारगेट इथे शंकरशेट रोडवर होती.
दापोडीचा वर्कशॉप हा सेंट्रल वर्कशॉप आहे. असे तीन सेंट्रल वर्कशॉप आहेत. दापोडी, औरंगाबाद आणि नागपूर इथे. त्यांच्या बसवर म का दा, म का औ आणि म का ना अशी अक्षरे असतात.

पूर्वी रजिस्ट्रेशन नंबरही पूर्वी एम एच १२, एम एच २० आणि एम एच ३१ असत.

चौथा कोनाडा's picture

28 Feb 2018 - 4:36 pm | चौथा कोनाडा

छान माहिती !
धन्यवाद.

माहितगार's picture

25 Feb 2018 - 10:23 am | माहितगार

वेगळ्या विषयावर धागा लेख लिहिल्या बद्दल अभिनंदन. अर्थात धागा लेखाची आणि MSRTC LOVERS GROUP ची भूमिका MSRTC वर टिका विरहीत प्रेमाची , एकांगी तर नाहीना अशी का कोण जाणे साशंकता वाटली.

एसटी वर्कशॉपमध्ये फोटो काढण्यास मनाई का असावी ? ह्या अपारदर्शकतेच्या मागचे गमक काय ? आजच्या काळात सिसिटीव्ही कॅमेरे बसवून काय चालू आहे ते आंतरजालावरुन बघण्यास खुले का करु नये ? असा प्रश्न पडला.

अनुषंगिक अवांतरात

एस टी बसेसच्या इंजिनांचे आणि वाजणार्‍ञा खिडक्यांचे कर्णकक्रश्य नकोसे आवाज आठवले. पाठीच्या बाजूस डोके टेकवण्या एवढी उंचीची पाठीची सीट देण्यासाठी एस टी प्रिमियम का लावते ? वर पैसाताई म्हणतात तसे शॉक ऑब्सॉर्बरचा अभाव असेल का सीटचे प्रॉब्लेम असतील प्रवाशाचे अंग मोडून आले पाहीजे अशी व्यवस्था का असते ? एकविसाव्य शतकात मूळात उभे टाकून प्रवास करण्याची वेळ कुणावर ही का यावी ? ५२ सिटर ने अधिक फ्रिक्वेन्सीने बसेस उपलब्ध करणे तोट्याचे जात असेल तर कमी सीटर कदाचीत २० किंवा ३० सीटरचे ऑप्शन का असू नयेत ? ग्रामीण भागात अमूक एका ठिकाणासाठी अमूक वाजे नंतर बस उपलब्ध नाही अशी अजूनही बर्‍ञाच ठिकाणी अडचण आहे. ह्या अडचणी परिवहनाची वेगवेगवेगळी साधने वापरुन दूर का केल्या जात नाहीत ?

मुदलात कोणत्याही क्षेत्रात ३० वर्षापेक्षा अधिक शासकीय मोनोपॉली असू नये असे माझे मत आहे. किमान पक्षी बस बांधणी आणि दुरुस्ती कार्यशाळा, आगार व्यवस्था आणि परिवहन या तीन स्वंतत्र आणि व्यावसायिक पद्धतीने काम करणार्‍या संस्था असावयास हव्यात . एअरपोर्टवर वेगवेगळ्या कंपन्यांची विमाने उतरु शकतात तर आगारातून वेअवेगळ्या कंपन्यांच्या बसेसची सुविधा का उपलब्ध होऊ नये ? असो.

नितिन थत्ते's picture

25 Feb 2018 - 1:33 pm | नितिन थत्ते

>>आगारातून वेअवेगळ्या कंपन्यांच्या बसेसची सुविधा का उपलब्ध होऊ नये ?

कारण आगारे ही सरकारने बांधलेली नसून एसटीने स्वखर्चाने बांधलेली असतात.

एकूणात एसटीच्या अर्थकारणात नॉन पेईंग रूट चालवायला लागणे हा भाग असतो. त्यात रस्ता तेथे एसटी या धोरणाचा मोठा भाग आहे. चोराची आळंदी ते गावडे वाडी* ही बस एसटीला कम्पल्सरी चालवावी लागते. शिवाय बहुतेक आमदारांना आपल्या तालुक्याच्या गावापासून मुंबई-पुणे-ठाणे अशा टिकाणी जाणारी थेट बस हवी असते. त्या बसने त्या तालुक्यातले लोक सातत्याने प्रवास करत नाहीत. मी पूर्वी नियमित प्रवास करत असे तेव्हा सकाळी सहा वाजता ठाणे-सोलापूर आणि साडेसहा वाजता ठाणे करमाळा अशा बस होत्या. शिवाय शहापूर ते सोलापूर अशीही बस असे. या सर्व बसेस मुख्यत्वे पुण्यापर्यंतच्या प्रवाशांनी भरलेल्या असत.

आणखी फरक म्हणजे रेल्वेप्रमाणे आठवड्यातील काही दिवसच बस सेवा पुरवण्याची पद्धत एसटीत नाही. शहापूर ते सोलापूर बस रोज चालवण्याचीआवश्यकता आहे का हे पाहून ती आठवड्यातून दोन किंवा तीनच दिवस चालवायला हरकत नसावी. किंवा ठाणे सोलापूर बस एक दिवस इंदापूरमार्गे आणि एक दिवस करमाळामार्गे असे रॅशनलायझेशन करता येईल.

तिसरे कारण म्हणजे सीझनमध्ये इतर खाजगी बस ऑपरेटर "सर्ज प्रायसिंग" करून मजबूत कमावतात. जेव्हा कमवायचे दिवस येतात (गणेशोत्सव, उन्हाळी सुट्या) त्या काळात एसटी नॉर्मलच दर आकारते. उलट नॉर्मलच दराने आणखी बस उपलब्ध करून देते.

*अशी बस प्रत्यक्षात आहे की नाही हे ठाऊक नाही. वार्‍यावरची वरात मध्ये पुलंनी हहीनाहीनावे घेतली आहेत म्हणून उदाहरणादाखल ते घेतले आहे.

माहितगार's picture

25 Feb 2018 - 3:19 pm | माहितगार

कारण आगारे ही सरकारने बांधलेली नसून एसटीने स्वखर्चाने बांधलेली असतात.

नितीनजी असा तर्क तेही आपल्या कडून ! ? , आगारे सरकारची असो अथवा एस टीची आगारे स्वतंत्रपणे व्यावसायिकपणे का चालवता येऊ नयेत ? आगारातील सुविधांना अधिक व्यावसायिक (प्रोफेशनल) स्वरुप प्राप्त होऊन दर्जा सुधारण्यास मदत होऊ शकते असे वाटत नाही का .

एक गोष्ट नक्की आहे की एस्टीला आता खासगीबसेसचे/वडापचे आव्हान आहे. मान्य आहे की राज्य परिवहन काही ठिकाणी कमी पडतय. शिवशाहीचच बघ ना. बसेस सुरु होऊन १ महिना झालानाही तर बस तोट्यात आहे म्हणून ओरड सुरु झाली. ज्या झपायाने एस्टीचे रुप पालटेय त्याचा वेग थक्क करणारा आहे. यापुढे केवळ २*२ परिवर्तन बसबांधणी होणार आहे. हिरकणी साठी ACGL ला approach झाली आहे.
शिवशाही पण MG ALMA , VEERA, ANTONY, SATNAM & In-Coach ह्या नामांकित बस बांधणीदारांकडून बांधूनघेतल्या आहेत.

यशवंती मिनीबस पण ताफ्यात आणत आहेत. पनवेल, कल्याण, कुर्ला नेहरुनगर ही बस स्थानके PPP तत्वावर Bus port करणार आहेत ह्याचा incharge आमच्या ग्रुपचा सदस्य आहे

एस्टीत परिवर्तन होतय. पण आपली थांबायची तयारी पाहिजे.

अभ्या..'s picture

25 Feb 2018 - 7:30 pm | अभ्या..

बादवे जाता जाता एक सांगा.
ते एस्टीचा आधीचा लोगो किती सुंदर होता. बाणाने गति दाखवणारा टायर आणि प्रवाशांच्या सेवेसाठी हि अक्शरे, खाली रिबनवर महाराष्ट्र राज्य परिवहन. अगदी प्रमाणबध्द वाटायचा.
आता त्यात डोंबलाची सुधारणा केलीय काय तर ते टायर आहे हेच समजत नाही. ट्रेडसएवजी डोटेड लाईन टाकलीय. खाली अजुन एक जय महाराष्ट्रची रिबन जोडलीय. त्यात एवढुसा मॅप टाकलाय. काही पण करायचे म्हनून करतात का हे लोक?

बिटाकाका's picture

26 Feb 2018 - 12:18 pm | बिटाकाका

त्ये जय महाराष्ट्र कायतरी महाराष्ट्र-कर्नाटक राजकारणातून टाकलंय वाटतं!

एस्टीत परिवर्तन होतय. पण आपली थांबायची तयारी पाहिजे.

एसटीत जे काही डोकेबाज लोक आहेत त्यांना डोके चालवायला परवानगी नसते.
आगराआगरात भांडणे.
शिवशाही इतर चांगले कचकून भाडे देणाय्रा प्रवाशाला आगरातल्या घाणेरड्या टॅाइलेटांत जावे लागते.
एसटीइतकेच प्रवासीही ओकांडे आणि नालायक आहेत महाराष्ट्रात. सीटची कवरं फाडणे,ब्लेडने लिहिणे,पायरीवरच ओकणे हे इकडेच आहे.

प्रवाशाला आगरातल्या घाणेरड्या टॅाइलेटांत जावे लागते.

आगारांची अस्वच्छता आणि घाणेरडी टॉयलेट्स आणि टॉयलेटची घाण टाळणार्‍यां चे उघड्यावरच्या क्रियेने पसरणारी दुर्गम्धी अत्यंत वाईट अवस्था

मराठी_माणूस's picture

26 Feb 2018 - 10:07 am | मराठी_माणूस

मुंबई नाशिक हा एक महत्वाचा रुट. पण शिवनेरि नाही. शिवाशाही पण अतिशय कमी. खजगी बस मात्र जोरात.

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Feb 2018 - 12:44 pm | हतोळकरांचा प्रसाद

उत्तम चर्चा! खूप महत्वाचा आणि बऱ्याच जणांच्या जिव्हाळ्याचा विषय. मला वाटतं, एसटी जेवढ्या भागांत, अगदी खेडोपाडी जाते तेवढी अवैध वाहतूक जात नसावी. शिवाय अवैधवाले सरकारी फायदे कुठे देतात. त्यामुळेच खेडोपाडी अजूनही एसटी हाच सक्षम पर्याय आहे. पण खराब रस्ते यामुळे वाढणारा देखभाल-दुरुस्तीचा खर्च परवडत नसल्याने खडखडाटी बसेस चालण्याशिवाय पर्यायही दिसत नाही. एसटी बसेसचे जेवढे प्रॉब्लेम्स नसतील त्यापेक्षा जास्त बसस्थानकांचे आहेत. एकूण एसटीबद्दलचे मत खराब करण्यास हि घाणेरडी बसस्थानके फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत.

प्रसाद_१९८२'s picture

26 Feb 2018 - 4:07 pm | प्रसाद_१९८२

एकूण एसटीबद्दलचे मत खराब करण्यास हि घाणेरडी बसस्थानके फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत.

===
अगदी सहमत !
===
सोलापूर सारख्या सतत गजबलेल्या व मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था तर पाहवत नाही. सगळीकडे नुसती घाणच घाण. शिवाय कर्नाटक परिवहनच्या बसेसना तिथे फलाट उपलब्ध नसतात ते ड्रायव्हर तश्याच बस मुत्रविसर्जन केलेल्या कंपाऊडच्या भिंतीजवळ लावतात, गाडीतून उतरताना पाय कुठे ठेवावा हा प्रश्न पडतो कधी-कधी. राज्यातील इतर स्थानकात सोलापूर इतकीच अस्वछता असेल कदाचीत मात्र कर्नाटकात कामानिमित्त जाण्याकरता सोलापूर बसस्थानकाशी आमचा सतत संबध येतो तेंव्हा फार त्रास होतो.
==
ह्या सोलापूर बसस्थानकात पुण्याच्या एसटी बसेस ज्या फलाटावर लागतात तिथे प्रायव्हेट बसचे पंटर लोक बिंधास्त प्रवासी गोळा करत फिरत असतात. त्यांना रोखणारे-टोकणारे तिथे कुणीही नसते.

उत्तम चर्चा चालू आहे.
आलमगीर तुम्ही यातल्या काही सूचना जर संबंधितांकडे पोहोचवू शकलात तर याचा खूप उपयोग होईल.

आलमगिर's picture

2 Apr 2018 - 10:49 pm | आलमगिर

सर्व सुचना मा. मंत्रीमहोदयांपर्यंत पोहोचवा येतील आसे बघतो