बाजीराव अ‍ॅट बिठूर

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
2 Feb 2018 - 1:38 pm

पार्श्वभूमी

हे किस्से म्हणजे पुराव्यासकट सिद्ध करता येण्यासारखा इतिहास नव्हे. कुणी पाहिलेल्या, ऐकलेल्या, त्यात स्वतःची भर घालून सांगितलेल्या अश्या या दंतकथा आहेत. त्यामुळे त्यांना फार गंभीरपणे घेऊ नये अशी एक सूचना. यातले काही 'मंत्रावेगळा' कादंबरीकार ना. स. इनामदार यांनी लिहिले आहेत. काही विंचूरकरांच्या इतिहासात आहेत. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामांत लढलेल्या नानासाहेब पेशवे यांच्या चरित्रात काही सापडते. प्रतुलचंद्र गुप्ता या माणसाने दुसऱ्या बाजीरावावर ईस्ट इंडिया कंपनीचा पत्रव्यवहार वाचून जे अनमोल संशोधन केले आहे त्यात काही सापडते. मला सगळी पुस्तके एकत्र मिळाली नाहीत, त्यामुळे काही बाबी स्मरणशक्तीवर विसंबून टाकल्या आहेत, त्यात किरकोळ चुका नक्कीच असतील.

(पुढला भाग 'मागणी तसा पुरवठा' या तत्वावर लिहिला जाईल, तेंव्हा लेख आवडल्यास प्रतिक्रिया जरूर टाका)

दुसरे बाजीराव पेशवे (बहुदा शिळा प्रेस चित्र)

bajirao

३ जून १८१८

पेशवे दुसरे बाजीराव अखेर अशीरगडाजवळ धूळकोट येथे माल्कम साहेबाबरोबर वाटाघाटी करून त्याला शरण गेले. तहातील अटीनुसार बाजीरावास लगेच एका दिवसाच्या आत इंग्रजांच्या स्वाधीन होऊन महाराष्ट्राबाहेर उत्तरेत जावे लागले. या वेळीसुद्धा बाजीरावासोबत बापू गोडबोले बक्षी, हुजुरातीच्या पागा आणि स्वार, बापू गोखले यांच्या निसबतीतील रामचंद्र वेंकटेश, बाळाजीपंत मराठे, भिकाजी जगताप, विंचूरकरांचे दिवाण बाळोबा सालकाढे, ढमढेर्यांचे सरदार श्रीधर बापू दामले यांची पागा अशी काही नावे सापडतात.

बुंदेलखंडात अजूनही शांतता प्रस्थापित झाली नसल्यामुळे पेशव्यास राजपुताना मार्गे अजमेर, मथुरा या दिशेस जावे लागले. हा प्रवास चालू असतानाच उत्तरेत नक्की कुठे बाजीरावास ठेवायचे याचा निर्णय ठरत होता. सुरुवातीस काशी ही जागा सर्वांस पसंत होती, पण नंतर इतर पर्याय पुढे आले. त्यापैकी मुंघेर, गोरखपूर हे पर्याय तिथल्या गरम हवामानामुळे बाजीरावास मान्य झाले नाहीत. शेवटी गव्हर्नर जनरलच्या निर्णयानुसार गंगेकाठचे बिठूर म्हणजे ब्रह्मावर्त (कानपूरपासून १४ मैल) ही जागा बाजीरावास मान्य करावी लागली. बाजीरावाचा आग्रह असा होता कि त्याला पंतप्रधान अथवा पेशवे असाच संबोधले जावे. पण इंग्रजांनी त्यास 'महाराजा' बाजीराव अशी नवीनच पदवी लावली. एका अर्थे बाजीराव १८१८ साली पेशवाईच्या 'मंत्रा'वेगळा झाला, त्यामुळे इनामदारांनी कादंबरीस दिलेले शीर्षक अगदी समर्पक आहे.

पेशव्यांना भरपूर वार्षिक तनखा मंजूर करण्यात इंग्रजांची अशी अटकळ होती की बाजीराव फार काळ जगणार नाही, कारण पेशवे घराण्यातले पुरुष या आधी फार जगले नव्हते. पण इंग्रजांची अपेक्षा खोटी ठरवत बाजीराव पेशवे ७६ वर्षे जगले. त्यामुळे पेशव्यांना मिळणार्या वार्षिक रकमेचा एकूण एकदा प्रचंड मोठा झाला. त्याबद्दल इंग्रज अधिकाऱ्यांनी एकदुसर्याला दोष दिलेला सापडतो. पेशव्यांचे उत्पन्न मोठे असले तरी त्यांनी ते सर्व खर्चही करून टाकले. त्यामुळे त्यांचा मुलगा नानासाहेब पेशवे यांची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती. १८५७ नंतर तर पेशव्यांच्या खुणा सांगणाऱ्या साऱ्या वास्तू मुद्दाम जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यामुळे आज आपल्याला त्यातले फार थोडे पाहायला मिळते.

उध्वस्त पेशवे वाडा

wada

इंग्रजांनी बाजीराव पेशव्यास दक्षिणेबरोबर कोणताही पत्रव्यवहार करण्यास बंदी घातली होती. कोणीही महाराष्ट्रातून त्यांना भेटू नये असा इंग्रज सरकारचा आदेश होता. बाजीरावाचे दत्तक पुत्र धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या मुंजीची आमंत्रणेसुद्धा इंग्रज सरकारने बाजीरावास पाठवू दिली नाहीत. सरकारचा असा संशय होता की बाजीरावास शिंदे, होळकर, गायकवाड आणि भोसले हे सामील होतील आणि मग सर्व मराठे एक झाले तर त्यांना हरवणे फार कठीण होईल. बिठूरच्या ककमिशनरच्या अहवालात आपल्याला अनेक कारस्थाने, गुप्त पत्रव्यवहार याचे वारंवार उल्लेख सापडतात. बहुतेक सगळ्या वेळी पेशवे सैन्यासह दक्षिणेत पुण्यास जाणार अशी अफवा उठलेली दिसते. पेशवे जसे वृद्ध होत गेले तसे या अफवा कमी होत गेल्या.

अशीरगड

https://www.youtube.com/watch?v=AXJEgR1VA-I

बऱ्हाणपूर जवळचा अशीरगडाचा किल्ला त्या वेळी शिंद्यांच्या ताब्यात होता. इंग्रजांनी शिंद्यावर दडपण आणून तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. शिंद्यांचे तसे हुकूम घेऊन इंग्रज सेनाधिकारी अशीरगडावर किल्ला ताब्यात घेण्यासाठी गेले. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्या वेळी किल्लेदाराबरोबर झालेला इंग्रज सेनाधिकाऱ्याचा संवाद मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. किल्लेदार लाड असे म्हणतात की माझे धनी शिंदे यांची माझ्यावर आता खास इतराजी (म्हणजे नाखुषी, नाराजी) होणार हे नक्की. इंग्रज सेनाधिकाऱ्यास काही कळेना - तो म्हणतो की तुमचे धनी शिंदे यांनीच तुला किल्ला ताब्यात दिल्याचा हुकूम केला आहे, मग हुकुमाचे पालन केल्यावर शिंद्यांची इतराजी का होईल? किल्लेदार म्हणतांत, तुम्हा युरोपिअन लोकात असे कागदी हुकूम मानायची पद्धत असेल. (किल्ल्याकडे हात करून) हा असा बलदंड किल्ला इतक्या सहज शत्रूच्या ताब्यात द्यायचा नसतो. त्यापेक्षा लढून मरून का गेला नाहीस असं धनी मला विचारतील.

=============

हा प्रसंग विंचूरकरांच्या घराण्यातील एकाने ना. स. इनामदार याना मंत्रावेगळा कादंबरी प्रकाशित झाल्यावर सांगितला.

सरदार विंचूरकरांच्या घराण्याचा राघोबादादांच्या काळापासून पेशव्याच्या या शाखेशी घनिष्ट संबंध होता. विठ्ठल शिवदेव विंचूरकर हे राघोबादादांच्या गोटातले समजले जात. त्यांचे वंशज रघुनाथ विठ्ठल विंचूरकर यांनी उत्तरेस तीर्थयात्रेच्या निमित्ताने बराच प्रवास केला. अश्या एका यात्रेत ते १८५० साली काशीच्या वाटेवर असताना ब्रह्मवर्तास येऊन पेशवे बाजीराव यांना मुद्दाम भेटले.

त्या वेळी पुण्यात लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी त्यांच्या शतपत्रात पेशवाईवर सडकून टीका केली होती. अखेरच्या दुसऱ्या बाजीराव पेशव्याने राज्य घालवले, तो विलासी, स्त्रीलंपट होता, पराक्रम गाजवणाऱ्यापेक्षा त्याचे व्यक्तिगत विलास पुरवणार्यांना तो जवळ करत होता असा त्यातून अर्थ निघत होता. सरदार विंचूरकर यांनी आपल्या धन्याला म्हणजे पेशव्याला ह्या बातम्या दाखवल्या. लोकहितवादींचे वडील हरी देशमुख गोखल्यांच्या पदरी कारकून होते ही गोष्ट पेशव्यांना स्मरली. पेशवे विषादाने म्हणाले - 'हरीच्या मुलाने असं लिहावं?'. मग काही काळ पेशवे गप्प होते. पेशव्याचे नंतरचे उद्गार असे होते - 'हरी देशमुखांना आम्ही एक वाडा बांधून दिला होता. त्यांच्यावर आम्ही कृपा केली आहे ती याच कारणासाठी असं त्याला म्हणायचे आहे का?'

=============
ब्रह्मवर्ताचा शनिवारवाडा प्रवेशद्वार

wada1

नंतर बांधलेल्या बिठूर रेल्वेस्टेशन जवळ पेशव्यांचा दोन चौकी, दोन मजली वाडा होता. पण पेशव्यांना तो त्यांचा मान-मरातबास साजेसा नाही, लहान आहे असे वाटले. म्हणून त्यांनी एक नवा वाडा बांधला. तो कित्येक एकर जमिनीवर पसरला होता. त्याला 'शनिवार वाडा' असच नाव दिले होते. गालिचे, आरसे, चिनी वस्तू, हस्तिदंत यांनी तो वाडा सजवलेला होता. काचेची सुंदर झुंबरे टांगली होती. पेशव्यांच्या सर्व पूर्वजांची चित्रे भिंतीवर टांगलेली होती.

ओवरी
wada2

वाड्याला बाहेरून तट बांधलेला होता. आत ७ मोठ्या विहिरी होत्या. एक मोठे देऊळ होते.

उध्वस्त दालने
wada3

wada4

ब्रिटिशांनी या साऱ्याचा विध्वंस केला. फक्त ७ विहिरी काय त्या आज वाचल्या आहेत - त्या ही का तर त्यात खजिना दडवला आहे या अफवेमुळे त्या वाचल्या.

=============
सरस्वतेश्वर महादेव मंदिर

mahadev

हे मंदिर स्थानिक लोक पेशव्याचे मंदिर म्हणून ओळखतात. महाराष्ट्रातून येताना पेशव्यांबरोबर वाराणसीबाई आणि सरस्वतीबाई अश्या दोन बायका होत्या. सरस्वतीबाईंचे निधन ब्रह्मावर्त इथे झाल्यावर गंगेकाठी त्यांना अग्नी देण्यात आला. त्या जागेवर पेशव्यांनी घाट आणि एक महादेवाचे मंदिर बांधले. त्याला सरस्वतेश्वर महादेव मंदिर असे नाव दिले. मला या मंदिराचे नवीन छायाचित्र सापडले नाही. कुणाला हा भाग माहित असल्यास नवीन छायाचित्र मिळाले तर इथे जोडता येईल.

पेशव्याचे सर्व वाडे आणि मंदिरे १८५८ साली इंग्रजांनी कानपूरच्या हत्याकांडाचा नानासाहेब पेशव्यांवर सूड म्हणून सुरुंग लावून जमीनदोस्त केली. हे एकमेव मंदिर लखनौचे नवाब यांनी स्थानिक जनतेच्या वतीने मध्यस्ती केल्यामुळे वाचले.

=============
पेशव्यांच्या पूजेतील गणेश

बिठूरमध्ये 'दूबे' नावाचे घराणे फार दिवसांपासून आहे. त्यांच्या देवघरातला गणेश पाहण्यासाठी लोक येतात (निदान १९६१ साली येत होते). पांढऱ्या संगमरवराची माध्यम आकाराची ही मूर्ती आहे. पेशव्यांच्या खाजगी देवघरात ही मूर्ती होती. १८५८ च्या विध्वंसात वाडाच नष्ट झाला पण ही सुंदर मूर्ती कशीतरी वाचली आणि दुबे यांच्या पूर्वजांकडे आली. तेंव्हापासून दुबे आपल्या देवघरात तिची रोज पूजा करतात. बाजीरावाची या गणेशावर फार श्रद्धा होती आणि पेशवे रोज एक सोन्याची मोहोर गणपतीच्या पायाशी अर्पण करत असत अशी आख्यायिका आहे.

मला या गणेशाचे अथवा दुबे यांचे काहीच संदर्भ इंटरनेटवर सापडले नाहीत. त्यामुळे आज या गणेशाची काय अवस्था आहे याची काहीच कल्पना नाही.

=============
राजा शिवप्रसाद पेशव्यांच्या भेटीस

राजा शिवप्रसाद हा मुर्शिदाबाद इथल्या राजघराण्याशी संबंधित परिवारात जन्मला होता. नंतर १८८३ साली तो व्हॉइसरॉयच्या कौन्सिलमध्ये मेम्बर बनला. तो एक प्रसिद्ध लेखक होता. त्याचे आत्मचरित्र 'सावन ए उमरी' मध्ये त्याने पेशव्यांशी संबंधित एक किस्सा दिला आहे.

शिवप्रसाद दिल्लीहून काशीस निघाला होता. त्या काळातली एक सामान्य समजूत होती की बाजीराव पेशव्यांकडे एके काळी एकूण ३ लाख स्वार होते. चार महाराजे - शिंदे, होळकर, नागपूरचे भोसले, बडोद्याचे गायकवाड हे त्याच्या सिंहासनाचे चार खांब. कानपुर जवळ पोचल्यानंतर त्याला आतून एक उत्कट इच्छा झाली की अश्या प्रख्यात पेशव्यास जाऊन भेटावे. मग शिवप्रसाद बिठूरला गेला आणि एका पंड्याच्या मदतीने तो पेशव्याचे दिवाण यांच्या घरी गेला. दिवाण महादेवाची पूजा करण्यात गुंतले होते, पण त्यांनी पटकन पेशव्यांच्या भेटीची व्यवस्था केली. शिवप्रसाद शर्ट-पॅंट या कपड्यात असल्यामुळे त्याला असे कपडे घालून आदरणीय पेशव्यासमोर जाता येणार नव्हते. म्हणून दिवाणसाहेबानी एका धोतराची व्यवस्था केली.

पेशव्यासमोर पोचल्यावर त्याला एका आसनावर बसवण्यात आले. पेशवे स्वतः एका रेशमी दोर्यांनी बांधलेल्या झोपाळयावर एक फूट जाड गादीवर बसले होते. झोपाळा इतरांचा पेशव्यांना स्पर्श होणार नाही अश्या पद्धतीने पुरेसा दूर बांधला होता. शिवप्रसादने त्याचे पेशव्यांबरोबर काय बोलणे झाले त्याची नोंद केलेली नाही, पण त्याला वाड्याच्या भिंतीवर टांगलेली २५ घड्याळे मात्र नोंद घेण्याजोगी वाटली. ही फार मौल्यवान होती. ब्रिटिश अधिकाऱयांकडून पेशव्यास वेळोवेळी ही घड्याळे भेट म्हणून मिळाली होती. पण इतकी घड्याळे असूनही पेशव्यांना त्यांचा वेळ पाहण्यासाठी काहीच उपयोग नव्हता, कारण पेशव्यांकडे वेळ सांगण्यासाठी ठराविक वेळी एक घड्याळजी नेमला होता. ती सारी घड्याळे भिंतीवर डेकोरेशन म्हणून वापरली होती!

=============
तनखा गंगार्पण

इंग्रज सरकारकडून पेशव्यांना मिळणारा तनखा हा अनेक हप्त्यांमध्ये मिळत असे. पण तो योग्य पद्धतीने पेशव्यांचा मान राखून दिला गेला पाहिजे असा पेशव्यांचा कटाक्ष असे . अश्या एका प्रसंगी बाजीराव पेशवे गंगास्नान करून पूजेनंतर गंगेस प्रसाद अर्पण करत होते. कंपनीं सरकारच्या माणसांना दम धरवला नाही. त्यांनी घाईघाईने नाण्यांची पोती असलेली बैलगाडी गंगाकिनारी जात पेशवे होते तिथे नेली. तिथे पेशव्यांजवळ जाऊन त्यांना तनखा आल्याचे सांगण्यात आले. पेशव्यांनी एक क्षणाचाही विलंब न करता सर्व नाणी गंगार्पण करा असा हुकूम सोडला. त्यांच्या हुकुमाची अंमलबजावणी करण्यात आली. आपल्या दैन्यावस्थेतही पेशवा आपल्या पदाचा असा अभिमान बाळगून होता.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

9 Sep 2020 - 4:30 pm | खटपट्या

रोचक माहिती,
चित्राबद्दल मला असे वाटते की चित्रकाराला जरी वास्तववादी चित्रे काढायची असतील तरी काढता येत नसावीत,
एखादा राजा कुरूप असेल आणि त्याचे चित्र कुरूप काढले तर जीवास मुकावे लागले तर. :)

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Sep 2020 - 8:31 pm | अमरेंद्र बाहुबली

कानपुर हुन बिठूर २३ किलोमिटर आहे. १८१८ ला मराठा साम्राज्याचा पाडाव झाल्यावर दुसरे बाजीराव पेशवे ह्याना महाराष्ट्रा पासुन दुर गंगाकिनारी बिठूर ह्या ठिकाणी वार्षिक ५ लाख तनखा देऊन ठेवण्यात आले.
फोटोत दाखवल्या प्रमाणे “नानाराव” (नानासाहेब नाही) पार्क बनवलंय. जे कि पेशव्यांच्या अनेक एकर जागेतील काही एकरवर बनवलंय. २५ रूपये तिकीट काढून मी आत गेलो. मला वाटलं होतं कोरोना मुळे पार्क बंद असेल पण सुदैवाने तसं नव्हतं. पार्क ईतकं ऊत्तम मेंटेन केलंय की माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. पार्क मध्ये घुसताच राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा आहे आणी मधोमध नानासाहेब पेशव्यांचा. आत बोटींगची सोय देखील आहे. आत संग्रहासलय देखील आहे पण छोटे आणी रटाळ आहे. पा आपल्या शनिवार वाड्या सारखे आत भरपुर जोडपे बसलेले होते. पण संग्रहालयात मी सोडलो तर कुणीही नव्हतं.
पार्क ला लागुनच भिंतीला खेटून पेशव्यांचा वाडा आहे जो की खुप मोठा आहे. जो वाडा १८५८ मध्ये ईंग्रजानी सुरूंग लावून तोडून टाकला होता.पण बरेच भरभक्कम अवशेष शिल्लक आहेत.
बिठूर मधल्या कुणातरी बाहुबली चा त्यावर ताबा आहे. ऊत्तर प्रदेश सरकार आणी त्याबाहुबलीची कोर्टात केस सुरूय. त्या वाड्याला मोठं कुंपन आहे. आत मोर ही आहेत. मला आवाज येत होता.
त्या आवारातच त्या बाहुबलीचं घर आहे. मी त्याच्या घरी गेलो होतो. बाहुबली भेटला नाही पण त्याचा मॅनेजर भेटला. त्याला सांगीतलं की मला अवशेष पहायचेत जाऊदे. पण बर्याच वेळ विनंती करूनही त्याने जाऊ दिले नाही.
मग मी पुढे गंगा नदीवरील ब्रम्हावर्त घाटावर गेलो. घाट सुंदर बांधलाय. पाणी भरपुर वाढलंय अनेक छोट्या मंदीरांचे शेंडे दिसत होते. गावात लवकुश ह्यांचा जन्म झाला होता अशा अख्यायीका आहे. तिथे लवकुशचे मंदीर ही आहेत. तिकडे जाणं झालं नाही. स्थानीक लोकाना बाजीराव पेशव्यांबद्दल काहीच माहीती नाही. फक्त “नानाराव” आणी राणी लक्ष्मीबाई ईतकंच माहीतीय.

शेखरमोघे's picture

10 Sep 2020 - 3:43 am | शेखरमोघे

सरस्वतीबाईंचे निधन ब्रह्मावर्त इथे झाल्यावर गंगेकाठी त्यांना अग्नी देण्यात आला. त्या जागेवर पेशव्यांनी घाट आणि एक महादेवाचे मंदिर बांधले. त्याला सरस्वतेश्वर महादेव मंदिर असे नाव दिले. मला या मंदिराचे नवीन छायाचित्र सापडले नाही.

"बाज़ीराव पेशवा द्वारा निर्मित शिव मंदिर वर्ष1819" या शीर्षकासह एक छायाचित्र पहा:
https://www.google.com/maps/place/Maharaja+Peshwa+ghat/@26.6019922,80.2755913,3a,75y,90t/data=!3m8!1e2!3m6!1sAF1QipM5ZNUSVDTi_P5gee_cuFgTmF4YXjojHug0buJn!2e10!3e12!6shttps:%2F%2Flh5.googleusercontent.com%2Fp%2FAF1QipM5ZNUSVDTi_P5gee_cuFgTmF4YXjojHug0buJn%3Dw203-h270-k-no!7i3024!8i4032!4m8!1m2!2m1!1sSaraswateshwar+Bithoor,+Uttar+Pradesh,+India!3m4!1s0x399c31d3dd7ef0fd:0x1cc47246467e0671!8m2!3d26.6019918!4d80.2755922?hl=en

गामा पैलवान's picture

10 Sep 2020 - 5:48 pm | गामा पैलवान

धन्यवाद शेखरमोघे!

संक्षिप्त दुवा असा आहे : https://goo.gl/maps/4T5DBC8H7u4YtSAT6

आ.न.,
-गा.पै.