बाजीराव अ‍ॅट बिठूर

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
2 Feb 2018 - 1:38 pm

पार्श्वभूमी

हे किस्से म्हणजे पुराव्यासकट सिद्ध करता येण्यासारखा इतिहास नव्हे. कुणी पाहिलेल्या, ऐकलेल्या, त्यात स्वतःची भर घालून सांगितलेल्या अश्या या दंतकथा आहेत. त्यामुळे त्यांना फार गंभीरपणे घेऊ नये अशी एक सूचना. यातले काही 'मंत्रावेगळा' कादंबरीकार ना. स. इनामदार यांनी लिहिले आहेत. काही विंचूरकरांच्या इतिहासात आहेत. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामांत लढलेल्या नानासाहेब पेशवे यांच्या चरित्रात काही सापडते. प्रतुलचंद्र गुप्ता या माणसाने दुसऱ्या बाजीरावावर ईस्ट इंडिया कंपनीचा पत्रव्यवहार वाचून जे अनमोल संशोधन केले आहे त्यात काही सापडते. मला सगळी पुस्तके एकत्र मिळाली नाहीत, त्यामुळे काही बाबी स्मरणशक्तीवर विसंबून टाकल्या आहेत, त्यात किरकोळ चुका नक्कीच असतील.

(पुढला भाग 'मागणी तसा पुरवठा' या तत्वावर लिहिला जाईल, तेंव्हा लेख आवडल्यास प्रतिक्रिया जरूर टाका)

दुसरे बाजीराव पेशवे (बहुदा शिळा प्रेस चित्र)

bajirao

३ जून १८१८

पेशवे दुसरे बाजीराव अखेर अशीरगडाजवळ धूळकोट येथे माल्कम साहेबाबरोबर वाटाघाटी करून त्याला शरण गेले. तहातील अटीनुसार बाजीरावास लगेच एका दिवसाच्या आत इंग्रजांच्या स्वाधीन होऊन महाराष्ट्राबाहेर उत्तरेत जावे लागले. या वेळीसुद्धा बाजीरावासोबत बापू गोडबोले बक्षी, हुजुरातीच्या पागा आणि स्वार, बापू गोखले यांच्या निसबतीतील रामचंद्र वेंकटेश, बाळाजीपंत मराठे, भिकाजी जगताप, विंचूरकरांचे दिवाण बाळोबा सालकाढे, ढमढेर्यांचे सरदार श्रीधर बापू दामले यांची पागा अशी काही नावे सापडतात.

बुंदेलखंडात अजूनही शांतता प्रस्थापित झाली नसल्यामुळे पेशव्यास राजपुताना मार्गे अजमेर, मथुरा या दिशेस जावे लागले. हा प्रवास चालू असतानाच उत्तरेत नक्की कुठे बाजीरावास ठेवायचे याचा निर्णय ठरत होता. सुरुवातीस काशी ही जागा सर्वांस पसंत होती, पण नंतर इतर पर्याय पुढे आले. त्यापैकी मुंघेर, गोरखपूर हे पर्याय तिथल्या गरम हवामानामुळे बाजीरावास मान्य झाले नाहीत. शेवटी गव्हर्नर जनरलच्या निर्णयानुसार गंगेकाठचे बिठूर म्हणजे ब्रह्मावर्त (कानपूरपासून १४ मैल) ही जागा बाजीरावास मान्य करावी लागली. बाजीरावाचा आग्रह असा होता कि त्याला पंतप्रधान अथवा पेशवे असाच संबोधले जावे. पण इंग्रजांनी त्यास 'महाराजा' बाजीराव अशी नवीनच पदवी लावली. एका अर्थे बाजीराव १८१८ साली पेशवाईच्या 'मंत्रा'वेगळा झाला, त्यामुळे इनामदारांनी कादंबरीस दिलेले शीर्षक अगदी समर्पक आहे.

पेशव्यांना भरपूर वार्षिक तनखा मंजूर करण्यात इंग्रजांची अशी अटकळ होती की बाजीराव फार काळ जगणार नाही, कारण पेशवे घराण्यातले पुरुष या आधी फार जगले नव्हते. पण इंग्रजांची अपेक्षा खोटी ठरवत बाजीराव पेशवे ७६ वर्षे जगले. त्यामुळे पेशव्यांना मिळणार्या वार्षिक रकमेचा एकूण एकदा प्रचंड मोठा झाला. त्याबद्दल इंग्रज अधिकाऱ्यांनी एकदुसर्याला दोष दिलेला सापडतो. पेशव्यांचे उत्पन्न मोठे असले तरी त्यांनी ते सर्व खर्चही करून टाकले. त्यामुळे त्यांचा मुलगा नानासाहेब पेशवे यांची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती. १८५७ नंतर तर पेशव्यांच्या खुणा सांगणाऱ्या साऱ्या वास्तू मुद्दाम जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यामुळे आज आपल्याला त्यातले फार थोडे पाहायला मिळते.

उध्वस्त पेशवे वाडा

wada

इंग्रजांनी बाजीराव पेशव्यास दक्षिणेबरोबर कोणताही पत्रव्यवहार करण्यास बंदी घातली होती. कोणीही महाराष्ट्रातून त्यांना भेटू नये असा इंग्रज सरकारचा आदेश होता. बाजीरावाचे दत्तक पुत्र धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या मुंजीची आमंत्रणेसुद्धा इंग्रज सरकारने बाजीरावास पाठवू दिली नाहीत. सरकारचा असा संशय होता की बाजीरावास शिंदे, होळकर, गायकवाड आणि भोसले हे सामील होतील आणि मग सर्व मराठे एक झाले तर त्यांना हरवणे फार कठीण होईल. बिठूरच्या ककमिशनरच्या अहवालात आपल्याला अनेक कारस्थाने, गुप्त पत्रव्यवहार याचे वारंवार उल्लेख सापडतात. बहुतेक सगळ्या वेळी पेशवे सैन्यासह दक्षिणेत पुण्यास जाणार अशी अफवा उठलेली दिसते. पेशवे जसे वृद्ध होत गेले तसे या अफवा कमी होत गेल्या.

अशीरगड

https://www.youtube.com/watch?v=AXJEgR1VA-I

बऱ्हाणपूर जवळचा अशीरगडाचा किल्ला त्या वेळी शिंद्यांच्या ताब्यात होता. इंग्रजांनी शिंद्यावर दडपण आणून तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. शिंद्यांचे तसे हुकूम घेऊन इंग्रज सेनाधिकारी अशीरगडावर किल्ला ताब्यात घेण्यासाठी गेले. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्या वेळी किल्लेदाराबरोबर झालेला इंग्रज सेनाधिकाऱ्याचा संवाद मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. किल्लेदार लाड असे म्हणतात की माझे धनी शिंदे यांची माझ्यावर आता खास इतराजी (म्हणजे नाखुषी, नाराजी) होणार हे नक्की. इंग्रज सेनाधिकाऱ्यास काही कळेना - तो म्हणतो की तुमचे धनी शिंदे यांनीच तुला किल्ला ताब्यात दिल्याचा हुकूम केला आहे, मग हुकुमाचे पालन केल्यावर शिंद्यांची इतराजी का होईल? किल्लेदार म्हणतांत, तुम्हा युरोपिअन लोकात असे कागदी हुकूम मानायची पद्धत असेल. (किल्ल्याकडे हात करून) हा असा बलदंड किल्ला इतक्या सहज शत्रूच्या ताब्यात द्यायचा नसतो. त्यापेक्षा लढून मरून का गेला नाहीस असं धनी मला विचारतील.

=============

हा प्रसंग विंचूरकरांच्या घराण्यातील एकाने ना. स. इनामदार याना मंत्रावेगळा कादंबरी प्रकाशित झाल्यावर सांगितला.

सरदार विंचूरकरांच्या घराण्याचा राघोबादादांच्या काळापासून पेशव्याच्या या शाखेशी घनिष्ट संबंध होता. विठ्ठल शिवदेव विंचूरकर हे राघोबादादांच्या गोटातले समजले जात. त्यांचे वंशज रघुनाथ विठ्ठल विंचूरकर यांनी उत्तरेस तीर्थयात्रेच्या निमित्ताने बराच प्रवास केला. अश्या एका यात्रेत ते १८५० साली काशीच्या वाटेवर असताना ब्रह्मवर्तास येऊन पेशवे बाजीराव यांना मुद्दाम भेटले.

त्या वेळी पुण्यात लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी त्यांच्या शतपत्रात पेशवाईवर सडकून टीका केली होती. अखेरच्या दुसऱ्या बाजीराव पेशव्याने राज्य घालवले, तो विलासी, स्त्रीलंपट होता, पराक्रम गाजवणाऱ्यापेक्षा त्याचे व्यक्तिगत विलास पुरवणार्यांना तो जवळ करत होता असा त्यातून अर्थ निघत होता. सरदार विंचूरकर यांनी आपल्या धन्याला म्हणजे पेशव्याला ह्या बातम्या दाखवल्या. लोकहितवादींचे वडील हरी देशमुख गोखल्यांच्या पदरी कारकून होते ही गोष्ट पेशव्यांना स्मरली. पेशवे विषादाने म्हणाले - 'हरीच्या मुलाने असं लिहावं?'. मग काही काळ पेशवे गप्प होते. पेशव्याचे नंतरचे उद्गार असे होते - 'हरी देशमुखांना आम्ही एक वाडा बांधून दिला होता. त्यांच्यावर आम्ही कृपा केली आहे ती याच कारणासाठी असं त्याला म्हणायचे आहे का?'

=============
ब्रह्मवर्ताचा शनिवारवाडा प्रवेशद्वार

wada1

नंतर बांधलेल्या बिठूर रेल्वेस्टेशन जवळ पेशव्यांचा दोन चौकी, दोन मजली वाडा होता. पण पेशव्यांना तो त्यांचा मान-मरातबास साजेसा नाही, लहान आहे असे वाटले. म्हणून त्यांनी एक नवा वाडा बांधला. तो कित्येक एकर जमिनीवर पसरला होता. त्याला 'शनिवार वाडा' असच नाव दिले होते. गालिचे, आरसे, चिनी वस्तू, हस्तिदंत यांनी तो वाडा सजवलेला होता. काचेची सुंदर झुंबरे टांगली होती. पेशव्यांच्या सर्व पूर्वजांची चित्रे भिंतीवर टांगलेली होती.

ओवरी
wada2

वाड्याला बाहेरून तट बांधलेला होता. आत ७ मोठ्या विहिरी होत्या. एक मोठे देऊळ होते.

उध्वस्त दालने
wada3

wada4

ब्रिटिशांनी या साऱ्याचा विध्वंस केला. फक्त ७ विहिरी काय त्या आज वाचल्या आहेत - त्या ही का तर त्यात खजिना दडवला आहे या अफवेमुळे त्या वाचल्या.

=============
सरस्वतेश्वर महादेव मंदिर

mahadev

हे मंदिर स्थानिक लोक पेशव्याचे मंदिर म्हणून ओळखतात. महाराष्ट्रातून येताना पेशव्यांबरोबर वाराणसीबाई आणि सरस्वतीबाई अश्या दोन बायका होत्या. सरस्वतीबाईंचे निधन ब्रह्मावर्त इथे झाल्यावर गंगेकाठी त्यांना अग्नी देण्यात आला. त्या जागेवर पेशव्यांनी घाट आणि एक महादेवाचे मंदिर बांधले. त्याला सरस्वतेश्वर महादेव मंदिर असे नाव दिले. मला या मंदिराचे नवीन छायाचित्र सापडले नाही. कुणाला हा भाग माहित असल्यास नवीन छायाचित्र मिळाले तर इथे जोडता येईल.

पेशव्याचे सर्व वाडे आणि मंदिरे १८५८ साली इंग्रजांनी कानपूरच्या हत्याकांडाचा नानासाहेब पेशव्यांवर सूड म्हणून सुरुंग लावून जमीनदोस्त केली. हे एकमेव मंदिर लखनौचे नवाब यांनी स्थानिक जनतेच्या वतीने मध्यस्ती केल्यामुळे वाचले.

=============
पेशव्यांच्या पूजेतील गणेश

बिठूरमध्ये 'दूबे' नावाचे घराणे फार दिवसांपासून आहे. त्यांच्या देवघरातला गणेश पाहण्यासाठी लोक येतात (निदान १९६१ साली येत होते). पांढऱ्या संगमरवराची माध्यम आकाराची ही मूर्ती आहे. पेशव्यांच्या खाजगी देवघरात ही मूर्ती होती. १८५८ च्या विध्वंसात वाडाच नष्ट झाला पण ही सुंदर मूर्ती कशीतरी वाचली आणि दुबे यांच्या पूर्वजांकडे आली. तेंव्हापासून दुबे आपल्या देवघरात तिची रोज पूजा करतात. बाजीरावाची या गणेशावर फार श्रद्धा होती आणि पेशवे रोज एक सोन्याची मोहोर गणपतीच्या पायाशी अर्पण करत असत अशी आख्यायिका आहे.

मला या गणेशाचे अथवा दुबे यांचे काहीच संदर्भ इंटरनेटवर सापडले नाहीत. त्यामुळे आज या गणेशाची काय अवस्था आहे याची काहीच कल्पना नाही.

=============
राजा शिवप्रसाद पेशव्यांच्या भेटीस

राजा शिवप्रसाद हा मुर्शिदाबाद इथल्या राजघराण्याशी संबंधित परिवारात जन्मला होता. नंतर १८८३ साली तो व्हॉइसरॉयच्या कौन्सिलमध्ये मेम्बर बनला. तो एक प्रसिद्ध लेखक होता. त्याचे आत्मचरित्र 'सावन ए उमरी' मध्ये त्याने पेशव्यांशी संबंधित एक किस्सा दिला आहे.

शिवप्रसाद दिल्लीहून काशीस निघाला होता. त्या काळातली एक सामान्य समजूत होती की बाजीराव पेशव्यांकडे एके काळी एकूण ३ लाख स्वार होते. चार महाराजे - शिंदे, होळकर, नागपूरचे भोसले, बडोद्याचे गायकवाड हे त्याच्या सिंहासनाचे चार खांब. कानपुर जवळ पोचल्यानंतर त्याला आतून एक उत्कट इच्छा झाली की अश्या प्रख्यात पेशव्यास जाऊन भेटावे. मग शिवप्रसाद बिठूरला गेला आणि एका पंड्याच्या मदतीने तो पेशव्याचे दिवाण यांच्या घरी गेला. दिवाण महादेवाची पूजा करण्यात गुंतले होते, पण त्यांनी पटकन पेशव्यांच्या भेटीची व्यवस्था केली. शिवप्रसाद शर्ट-पॅंट या कपड्यात असल्यामुळे त्याला असे कपडे घालून आदरणीय पेशव्यासमोर जाता येणार नव्हते. म्हणून दिवाणसाहेबानी एका धोतराची व्यवस्था केली.

पेशव्यासमोर पोचल्यावर त्याला एका आसनावर बसवण्यात आले. पेशवे स्वतः एका रेशमी दोर्यांनी बांधलेल्या झोपाळयावर एक फूट जाड गादीवर बसले होते. झोपाळा इतरांचा पेशव्यांना स्पर्श होणार नाही अश्या पद्धतीने पुरेसा दूर बांधला होता. शिवप्रसादने त्याचे पेशव्यांबरोबर काय बोलणे झाले त्याची नोंद केलेली नाही, पण त्याला वाड्याच्या भिंतीवर टांगलेली २५ घड्याळे मात्र नोंद घेण्याजोगी वाटली. ही फार मौल्यवान होती. ब्रिटिश अधिकाऱयांकडून पेशव्यास वेळोवेळी ही घड्याळे भेट म्हणून मिळाली होती. पण इतकी घड्याळे असूनही पेशव्यांना त्यांचा वेळ पाहण्यासाठी काहीच उपयोग नव्हता, कारण पेशव्यांकडे वेळ सांगण्यासाठी ठराविक वेळी एक घड्याळजी नेमला होता. ती सारी घड्याळे भिंतीवर डेकोरेशन म्हणून वापरली होती!

=============
तनखा गंगार्पण

इंग्रज सरकारकडून पेशव्यांना मिळणारा तनखा हा अनेक हप्त्यांमध्ये मिळत असे. पण तो योग्य पद्धतीने पेशव्यांचा मान राखून दिला गेला पाहिजे असा पेशव्यांचा कटाक्ष असे . अश्या एका प्रसंगी बाजीराव पेशवे गंगास्नान करून पूजेनंतर गंगेस प्रसाद अर्पण करत होते. कंपनीं सरकारच्या माणसांना दम धरवला नाही. त्यांनी घाईघाईने नाण्यांची पोती असलेली बैलगाडी गंगाकिनारी जात पेशवे होते तिथे नेली. तिथे पेशव्यांजवळ जाऊन त्यांना तनखा आल्याचे सांगण्यात आले. पेशव्यांनी एक क्षणाचाही विलंब न करता सर्व नाणी गंगार्पण करा असा हुकूम सोडला. त्यांच्या हुकुमाची अंमलबजावणी करण्यात आली. आपल्या दैन्यावस्थेतही पेशवा आपल्या पदाचा असा अभिमान बाळगून होता.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

2 Feb 2018 - 1:57 pm | आनन्दा

छान माहिती..

बिटाकाका's picture

2 Feb 2018 - 1:57 pm | बिटाकाका

आवडले! अजून...अजून....:)

बिटाकाका's picture

2 Feb 2018 - 1:57 pm | बिटाकाका

आवडले! अजून...अजून....:)

बिटाकाका's picture

2 Feb 2018 - 1:57 pm | बिटाकाका

आवडले! अजून...अजून....:)

बिटाकाका's picture

2 Feb 2018 - 1:57 pm | बिटाकाका

आवडले! अजून...अजून....:)

वाड्याची चित्रे आंतरजालावरून इथून साभार घेतली आहेत

http://1.bp.blogspot.com/-3H3faO1WVQQ/Usral4hO0gI/AAAAAAAABD8/hPAGM7-vto...

हा उल्लेख लेखात करायचा राहिला.

शलभ's picture

2 Feb 2018 - 2:17 pm | शलभ

आवडले. अजुन लिहा.

कपिलमुनी's picture

2 Feb 2018 - 2:50 pm | कपिलमुनी

माहिती आवडली !

अवांतर :
>>पेशवा आपल्या पदाचा असा अभिमान बाळगून होता. :
हसावे की रडावे ते कळेना ! पदाच्या अभिमानासाठी लढून शहीद झाला असता तर आज पूज्य असता

विशुमित's picture

2 Feb 2018 - 4:17 pm | विशुमित

+१

त्या काळाचा महिमाच तसा होता, दुसऱ्या बाजीरावास दोष देण्यात काही फारसा अर्थ नाही, मला वाटतं पेशव्यांच्या अस्तानंतर फक्त शीख राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात जायचे राहिले होते, बाकी अखिल भारतातील सर्वच राज्ये ब्रिटिशांच्या ताब्यात गेलीच होती, १७५७ च्या प्लासीच्या लढाईने त्याची सुरुवात झालीच होती, दोष द्यायचाच असेल तर तत्कालीन भारतातील सर्वच राजवटींना द्यायला हवा. पेशवे केवळ ब्राह्मण म्हणून त्यांना नेहमीच आकसाने पाहिले जाते.

आनंदयात्री's picture

2 Feb 2018 - 10:16 pm | आनंदयात्री

सहमत आहे.
लिखाण आवडले, अजून येऊ द्या किस्से.

कपिलमुनी's picture

3 Feb 2018 - 2:46 am | कपिलमुनी

बाजीरावास दोष देत नाही. तत्कालीन परिस्थितीनुसार राज्यकर्ते निर्णय घेतात पण एकदा मांडलिकत्व स्वीकारल्यानंतर त्यांच्या वागण्याला सध्या पदाचा अभिमान वगैरे विशेषण लावणे वैयक्तिकरित्या पटले नाही. हे म्हणजे गिरे तो भी टांग उपर असे वाटले.

प्रचेतस's picture

3 Feb 2018 - 8:29 am | प्रचेतस

हे तुझ्याबद्दल नाहीच रे, ज्यांना पेशवे म्हणल्यावर लगेच पोटशूळ उठतो त्यांच्याबद्दल लिहिलेय :)

गामा पैलवान's picture

2 Feb 2018 - 7:19 pm | गामा पैलवान

हसावे की रडावे ते कळेना ! पदाच्या अभिमानासाठी लढून हुतात्मा झाला असता तर आज कोणाला ठाऊकही नसता.

-गा.पै.

कपिलमुनी's picture

3 Feb 2018 - 2:42 am | कपिलमुनी

जशी झाशीची राणी कोणाला माहितीच नाही.

हरवलेला's picture

5 Feb 2018 - 7:12 am | हरवलेला

+1

हारुन शेख's picture

2 Feb 2018 - 3:16 pm | हारुन शेख

खरोखर रोचक माहिती आहे. प्रतिसाद देण्यास येत नसलो तरी वाचनमात्र असतो आणि पुढचे भाग वाचेन. तुम्ही पुढचे भाग लिहावेत अशी विनंती.

सिद्धार्थ ४'s picture

2 Feb 2018 - 3:27 pm | सिद्धार्थ ४

आवडले! अजून...अजून....:)

माहितगार's picture

2 Feb 2018 - 3:44 pm | माहितगार

The Last Peshwa And The English Commissioners 1818 1851

अर्काईव्ह डॉ ट ऑर्गवर गावले लेखकाचा धागा लेखात उल्लेख केल्यामुळे शोधता आले आता वाचतो.

माहितगार's picture

2 Feb 2018 - 8:56 pm | माहितगार

@ मनो , प्रतुलचंद्र गुप्तांचे, दुसर्‍या बाजीरावाच्या उत्तर आयुष्याबद्दलचे संशोधन पुर्ण पुस्तक वाचले. अशाच स्वरुपाचे सुधा शहांचे संषोधन पूर्ण लेखन रत्नागिरीस्थित ब्रम्ह देशचा नजरबंद सम्राट थिबाबबद्दल गूगल बुक्स वर उपलब्ध आहे. हे दोन्ही वाचले की दक्षिण आशियातली सत्ताधीश घालवताना धरले तर चावते सोडले तर पळते अशा डोकेदुखी सत्ताधीशांना त्यांना मारले तरी जनता उठाव करेल आणि जनतेच्या सन्नीध राहील्यास तेच कारवाया करतील अशांना मोठी तनखा देऊन जनतेच्या नजरेपासून दूर नेऊन नजरबंद ठेवण्याची ब्रिटीश स्टृअ‍ॅटेजी यशस्वी झालेली दिसते.

प्रतुलचंद्र गुप्तांचे, पुस्तक वाचल्या नंतर दुसर्‍या बाजीरावाचा रामचंद्रपंत नावाचा सुभेदार सरळ सरळ फितुर असण्याची शक्यता दिसते. नंतरच्या काळात दुसर्‍या बाजीरावास देखील हे लक्षात आलेले दिसते, त्यामुळे स्वतःच्या तनख्याचा मोठा भाग बाजीराव नंतर या रामचंद्रपंतास देण्यास तयार झाल्याचे दिसते. यात ही रामचंद्र पंत आणि ब्रिटीश कमिशनरांचे व्यक्तिगत संबंधाचे साटेलोटे असण्याची शक्यता जाणवते. वस्तुतः ब्रिटीशांनी जेवड्।ई आमिषे रामचंद्रपंताला दाखवली असतील तेवढा आर्थीक परतावा ब्रिटीशांकडून त्याला मिळालेला दिसत नाही हे लक्षात येई पर्यंत त्या रामचंद्रपंताची हयात संपली असावी. हा रामचंद्रपंत दुसर्‍या बाजीरावाच्या केव्हा पासूनसानिध्यात आला -म्हणजे नेमकी ही फितुरी केव्हा पासून चालत असली पाहिजे आणि दुसरा बाजीराव त्यावर अवलंबीत्व का वाढले याची अधिक माहिती वाचणे आवडेल.

दुसर्‍या बाजीरावा बद्दल मराठेशाहीत आधिच नाराजी होती , दुसर्‍या बाजीरावाच्या मर्यादाही असतील पण त्याची अधिक बदनामी करण्याच्या संधीनेही ब्रिटीशांचे फावले असण्याची शक्यता सुद्धा जाणवते . दुसर्‍या बाजीरावाच्या उत्तर आयुष्याबद्दलच्या माहितीही तशी कमी उपलब्ध असणे आणि पुर्वायुष्यातील बदनामीसाठी वापरली गेलेली माहिती आणि वास्तव यातले खरे खोटे करणे आधीच अवघड आहे. त्यामुळे दुसर्‍या बाजीरावा बद्दल अधिक वाचणे आवडेल पण प्रतुलचंद्र गुप्तां सारखे भक्कम स्रोत आणि केवळ ऐकीव असलेले दोन्ही माहिती द्याव्यात पण त्या वेगवेगळ्या नमुद कराव्यात असे वाटते.

१८५७ च्या उठावाची मानसिक तयारीत दुसर्‍ञा बाजीरावाचा हात कितपत असण्याची शक्यता असावी . या अंगाने काही माहिती मिळत असल्यास रोचक ठरु शकेल असे वाटते.

राजवट बदलल्यानंतर आपली इनामे कायम ठेवायची तर सरदारांना इंग्रजांशी निष्ठा दाखवणे भाग होते. इंग्रजांशी निष्ठा ठेवली तर ज्या पेशव्याचे इनाम आजवर भोगत आलो त्याच्याशी बेईमानी केली असा ठपका येतो. तो टाळायचा असेल तर मग आपला धनीच कसा लायक नव्हता आणि अश्या धन्याशी स्वामिनिष्ठ राहणे शक्य नव्हते म्हणून आम्ही इंग्रजांना मिळालो असा मार्ग काढलेला दिसतो.

सर्व पुरावा पाहताना एका लक्षात ठेवले पाहिजे की तो बहुतेक सगळा इंग्रजी दफ्तरातला आहे. बाजीरावाचे स्वतःचे दप्तर १८५८ मध्ये बिठूरच्या पेशवे वाड्यात नष्ट झाले.

जबरदस्त लेख, माहितीचा खजिनाच जणू, मंत्रावेगळा वाचले आहे आणि आवडले पण होते. पुढील भाग लिहाच मालक.

पाटीलभाऊ's picture

2 Feb 2018 - 4:18 pm | पाटीलभाऊ

अजून येऊ द्या..!

manguu@mail.com's picture

2 Feb 2018 - 4:22 pm | manguu@mail.com

किती स्वार्थी अन लहरी वृत्तीचे होते !

पैसा's picture

2 Feb 2018 - 5:16 pm | पैसा

रुक्ष इतिहासापेक्षा असे किस्से खूप मनोरंजक असतात!

लेखातील किस्से आवडले, अजूनही अशीच ऐतिहासिक माहिती येऊ द्यात.

सुखीमाणूस's picture

2 Feb 2018 - 7:43 pm | सुखीमाणूस

अर्थात वाईट वाटले सगळा प्रकार वाचून.
आपल्याच प्रजेवर अन्याय करणाऱ्या आणि राजेपदाचा व्रुथा माज करणाऱ्या राजाना कधी मनात विचार आला नसेल का
की आपल्या वागण्यामुळे शत्रू निर्माण झाले तर आपल्या पुढच्या पिढ्या त्याचा त्रास काढतील.
मजा आली वाचायला.
येऊदे पुढचा भाग लवकर.

सिरुसेरि's picture

2 Feb 2018 - 7:44 pm | सिरुसेरि

रोचक माहिती . पेशवाईतील घडामोडींवर आधारीत "तोतयाचे बंड" या नाटकाचा एक प्रयोग दुस-या बाजीरावांच्या मुली समोर सादर झाला होता अशी एक घटना ऐकीवात आहे .

अरविंद कोल्हटकर's picture

2 Feb 2018 - 8:59 pm | अरविंद कोल्हटकर

दुसर्‍या बाजीरावाची मुलगी कुसुमाबाई (जन्म १६ जानेवारी १९४७) ह्या ग्वालेरच्या आपटे घराण्यात दिल्या होत्या. त्यांचे सासरचे नाव सरस्वती. विवाहानंतर वय लहान असल्याने त्या माहेरीच नानासाहेबाजवळ राहत होत्या आणि नानासाहेब परागंदा झाल्यावर पेशवे कुटुंबातील अन्य स्त्रियांबरोबर त्या नेपाळला गेल्या. कालान्तराने श्वशुर बाबासाहेब आपटे ह्यांनी त्यांना परत ग्वाल्हेरला आणले. पतिनिधनानंतर १८८४ च्या पुढेमागे त्या कायमच्या मुक्कामासाठी वाराणसीमध्ये स्थायिक झाल्या.

१९१३ मध्ये बाई पुण्यास आल्या होत्या. त्या मुक्कामात किर्लोस्कर थिएटरामध्ये (वसन्त टॉकीजची जागा) त्यांनी न.चिं .केळकरांचे 'तोतयाचे बंड' हे नाटक पाहिल्याची नोंद ११ फेब्रुअरी १९१३ च्या 'केसरी'मध्ये मिळते.

बाई १९ जून १९१७ ह्या दिवशी वाराणसीमध्ये वारल्या. त्या घटनेवर अच्युत बळवंत कोल्हटकरांनी 'संदेश'मध्ये लिहिलेला 'शेवटची वेल सुकली' हा अग्रलेख बराच गाजला होता. (आधार - 'पेशवे घराण्याचा इतिहास' ले. प्रमोद ओक.)

(सवडीने ह्याच पुस्तकातील बाईंचे तरुण आणि वृद्ध वयातील छायाचित्र देतो.)

पगला गजोधर's picture

2 Feb 2018 - 9:34 pm | पगला गजोधर

दुसर्‍या बाजीरावाची मुलगी कुसुमाबाई (जन्म १६ जानेवारी १९४७) ह्या ग्वालेरच्या आपटे घराण्यात दिल्या होत्या. त्यांचे सासरचे नाव सरस्वती.

कुसुमाबाईसाहेबांचा जन्म भारतीय स्वातंत्र्य वर्षी झाला, असा उल्लेख मिपा संस्थळी, भा प्र वे फेब 2, 2018 रोजी रात्री 8 वा 30 मिनिटांनी , जसे आढळले तसें...
तरी सदर उल्लेख , नजरचुकीने झाल्या असल्याची शक्यता गृहीत धरता, सदर नोंद मिपा दफतरी रुजवात करून घेऊ नये, अशी विनंती.
.
.
आणि हो, हे राहीलच,
.
.

अस्मादिकांची ही प्रतिक्रिया प्रताधिकार मुक्त म्हणून गृहीत धरावी, सबब त्याचा यथा इच्छा भोगवटा उपभोगण्यास, आमची कोणतीही हरकत नाही, आम्ही हल्लागिल्ला करणार नाही, व भोगवटा धारकास कोणतीही तोशीस लागू देणार नाही.

manguu@mail.com's picture

2 Feb 2018 - 10:20 pm | manguu@mail.com

दुसर्या बाजीरावास पुत्र वारस नव्हता .. नानासाहेब दत्तक होते.

वारसासाठी अनेक लग्ने केली , असे उल्लेख आहेत .

मुली होत्या का , ते माहीत नाही

माहितगार's picture

3 Feb 2018 - 11:54 am | माहितगार

अभ्यासक प्रतुलचंद्र गुप्ता च्या पुस्तकानुसार दुसर्‍ञा बाजीरावाच्या मृत्यूसमयी त्यांच्या दोन विधवा मैनाबाई आणि सईबाई दोन दत्तक पुत्र नाना साहेब आणि बाळासाहेब दोन अविवाहीत मुली योगाबाई आणि कुसुमबाई तर अजून एक दत्तक मुलगी मतीया बाई असावयास हवी होती जिची माहिती त्यांना मृत्यूसमयीच्या कागदपत्रात आढळली नाही. असा स्वतःचा परिवार होता.

सदाशिवरावांचा मुलगा पांडूरंगराव आणि खापर पणतू चिमणाजी अप्पा दुसर्‍या बाजीरावाच्या कुटूंबाचा भाग होते.

manguu@mail.com's picture

3 Feb 2018 - 1:02 am | manguu@mail.com

दुसरा बाजीराव 'गेला' १८५१ मध्ये.

तोतयाचे बंड हे पुस्तक आले १९१३ साली.

१९४७ ला मुलगी कुठून आली ? की तोतया नाटक बघायला मुलगीही तोतयाच आणली ?

माहितगार's picture

3 Feb 2018 - 12:04 pm | माहितगार

१९४७ ला मुलगी कुठून आली ?

१८४७ वाचा की , टायपिंअ मिस्टेकच असणार न हो ती. १८४७ बरोबर असेल तर तो पर्यंत दुसर्‍या बाजीरावाचे वय चक्क ७२ च्या आसपास आसावे.

१८४१ नंतर लकवा सदृष्य व्याधीने दुसरा बाजीराव ग्रस्त असावा. शेवटपर्यंत घोड्याचा पागा सांभाळला पण बिठूरला गेल्यमात्रर त्याने व्यायाम सोडाच घोड्यावर स्वार होण्याचेही टाळून केवळ पालखीचा वापर केला असावा. इंग्रज अधिकार्‍ञांनी या गोस्।टीची मात्र नोंद ठेवत होते तो फारसा व्यायाम करत नसल्याने लवकर गचकेल आणि कंपनी सरकारचा मोठा खर्च वाचेल अशी त्यांची अपेक्षा मा त्र दुसरा बाजीराव चक्क ७५ वर्षे जगल्याने यशस्वी झालेली दिसत नाही.

तुषार काळभोर's picture

2 Feb 2018 - 8:01 pm | तुषार काळभोर

रोचक किस्से

ज्योति अळवणी's picture

2 Feb 2018 - 10:26 pm | ज्योति अळवणी

किस्से रोचक आहेत. अजून येउद्या

निशाचर's picture

2 Feb 2018 - 11:25 pm | निशाचर

लेख आवडला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Feb 2018 - 11:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक माहिती ! पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

3 Feb 2018 - 12:42 am | मुक्त विहारि

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

diggi12's picture

3 Feb 2018 - 12:53 am | diggi12

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

बयाबाई आपटे (१८४६-१९१७) असे त्यांचे नाव होते.
Bayabai Apte

अतिशय रोचक लेख. तुमच्याकडून अजून बरेच वाचायची इच्छा आहे. दुसरा बाजीराव हा आधीच्या कर्तबगार पेशव्यांच्या लायकीचा नव्हता हे निश्चित, पण त्याच्याकडे जातीच्या आकसाने न पहाता, वस्तुनिष्ठपणे पहाण्याचा दृष्टीकोन फार आवडला.

माझं काम कथाकाराचं, जे ऐकलं, वाचलं ते मांडायचं. वाचून आपापले निष्कर्ष काढण्यात मि. पा. कर हुशार आहेतच! ☺️

गामा पैलवान's picture

3 Feb 2018 - 3:09 am | गामा पैलवान

सुखीमाणूस,

आपल्याच प्रजेवर अन्याय करणाऱ्या आणि राजेपदाचा व्रुथा माज करणाऱ्या राजाना कधी मनात विचार आला नसेल का
की आपल्या वागण्यामुळे शत्रू निर्माण झाले तर आपल्या पुढच्या पिढ्या त्याचा त्रास काढतील.

माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्या बाजीरावाने प्रजेला त्रास दिला नाही. तसेच राजेपणाचा वृथा माजही दाखवला नाही. तो जरा जास्तंच विलासी होता हे खरंय. पण त्यामुळे राज्य बुडालं हे पूर्णपणे खरं नव्हे.

त्याचा बराचसा काळ राज्यव्यवहार शिकण्यात फुकट गेला. शिवाय त्याला अमृतराव नावाचा दत्तक अग्रज ( = मोठा भाऊ) होता. तोसुद्धा पेशवेपदाच्या शर्यतीत होता. विसाव्या वर्षी अचानक कैदेतून मुक्त होऊन थेट पेशावेपदी बसायला लागल्याने प्रशिक्षण वगैरेची बोंब होती. सुरुवातीस त्याला धड लिहिता वाचताही येत नसे. त्यातूनही त्याने जिद्दीने मार्ग काढला. राजकारणाचा प्रत्येक डाव त्याला स्वानुभवाच्या खडतर मार्गाने शिकवा लागला. त्याला कोणीही विश्वासू सल्लागार नव्हते. खुद्द नाना फडणीस त्याला दाबून ठेवायला बघंत असे. नाना मेल्यावर (इ.स. १८००) त्याला थोडा मोकळा श्वास घेता येऊ लागला. पण तोवर राजकीय परिस्थिती पार हाताबाहेर गेलेली होती.

अशा परिस्थितीत त्याने इ.स. १७९४ ते १८०२ पर्यंत सातेक वर्षं राज्य केलं. पुढे अमृतराव, शिंदे, होळकर व तो स्वत: वगैरेंच्या आपसांतल्या सततच्या झगड्यांपायी पदच्युत झाला. मग कुंपणी सरकारला गाठून वसईच्या तहान्वये वेलस्लीकडून परत पेशवेपदी बसला. पण तरीही धडपड आणि राजकारण चालूच राहिलं. १८०२ नंतर दोन इंग्रज-मराठा युद्धं झाली. त्यापैकी १८१७ साली झालेल्या दुसऱ्या (आणि एकंदर तिसऱ्या) इंग्रज-मराठा युद्धात शिंदे/होळकर/भोसले इत्यादिंची मदत आलीच नाही. इंग्रज एकट्या पेशव्याला भारी पडले आणि १८१८ साली पेशवाई संपुष्टात आली.

सांगायचा मुद्दा काये की दुसरा बाजीराव केवळ विलासी नव्हता. त्याने धडपडही भरपूर केली.

आ.न.,
-गा.पै.

कपिलमुनी's picture

3 Feb 2018 - 3:28 am | कपिलमुनी

एवढे सगळे घडत असताना छत्रपती घराणे कुठे होते ? युद्धात त्यांच्या वंशजांचा काही सहभाग असल्याची नोंद मिळते का ? कारण राजे पेशवे नसून छत्रपती होते.
छत्रपती शाहू (पहिले ) नंतर पुढे फार उल्लेख येत नाहीत म्हणून पृच्छा .

manguu@mail.com's picture

3 Feb 2018 - 7:36 am | manguu@mail.com

युद्ध करण्यात त्याना interest असता तर राज्य स्वत:कडेच ठेवले असते की , पेशव्याना कशाला दिले असते ?

बबन ताम्बे's picture

3 Feb 2018 - 9:43 am | बबन ताम्बे

1818 साली इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव करून सत्ता सोडायला लावली. पण राज्य तर छत्रपतींचे होते. त्यांनी ते वाचवायची काही धडपड केली होती की नाही ?

माहितगार's picture

3 Feb 2018 - 11:29 am | माहितगार

छ. प्रताप सिंगसाठी धडपडीचा जो काही प्रयत्न झाला तो इंग्रज आधिकार्‍यांच्या लक्षात आला. त्यामुळेच बिटीश सरकारने त्यास पदच्यूत करून बनारसला पाठवले आणि सातारा गादी खालसा केली. ( तर कोल्हापूरकर छत्रपतींनी दुसर्‍ञा बाजीरावास हटवण्या चा अयशस्वी प्रयत्न केला पण इंग्रजांशी पंगा घेतला नसावा चुभूदेघे)

सातार छत्रपतींनी किमान दुसरा बाजीराव इंग्रज स्वाधीन झाल्यावरतरी किमान नॉमीनल पेशवे आणि सेनापती अपॉईंट करत बदलत राहीले असते तरी इंग्रजांची बर्‍ञा पैकी नाकात नऊ आले असते असे काही वेळा वाटते. खासकरुन स्वातंत्र्यचळवळीत सहभाग असावयास हरकत नव्हती.

सातारकर निलेश झोरे यांच्याशी काही दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं. ते छत्रपतींचे संपूर्ण चरित्र लिहितायत. त्यांचा आजच्या छत्रपतींशी संपर्क आहे. त्यामुळे ते प्रकाशित झाले की छत्रपती घरण्याविषयी अजून माहिती मिळेल अशी आशा आहे.

त्या वेळी छत्रपती राजे प्रतापसिह हे होते. बाजीरावाने इंग्रजांशी लढाई करण्याचा निर्णय त्यांच्या संमतीने घेतला. स्वतः छत्रपती पेशव्याच्या सैन्यात होते.

गोपाळ-अष्टीच्या लढाईत सेनापती बापू गोखले पडले. त्यावेळी स्वतः छत्रपती हाती तलवार घेऊन घोड्यावरून निघाले. इंग्रजांचा पाठलाग चालू होताच. इंग्रज सैन्याने गाठल्यावर चिटणीसानी 'सातारकर छत्रपती आहेत.' असे सांगून छत्रपतींना सुरक्षित ताब्यात दिले. आम्ही सापडलो, आम्हास काढून न्या असा बाजीरावास निरोपही गेला, पण ते शक्य झाले नाही.

उत्सुकता असेल तर ते सगळे प्रसंग मूळ मराठीत देतो पुढच्या भागात.

बबन ताम्बे's picture

3 Feb 2018 - 4:59 pm | बबन ताम्बे

नक्की लिहा सर. तुम्ही इतिहासाचा खजिनाच सादर करताय. वर चित्रात दोन वाडे सुस्थितीत दिसताहेत. अजून आहेत काय ?
उरलेले उद्धवस्त खण्डहर बघून उदास वाटते. इंग्रजांनी मराठेशाही संपल्यांनंतर किल्ले उद्धवस्त केले, वाडे पाडून टाकले, रायगडावरचे दप्तर जाळून टाकले आणि आपण एका अमूल्य ऐतिहासिक ठेव्याला मुकलो.
त्यांचा राणीचा प्यालेस आणि क्यासल मात्र सुस्थितीत आहेत.

अरविंद कोल्हटकर's picture

3 Feb 2018 - 4:36 am | अरविंद कोल्हटकर

मराठेशाहीचे किस्से वाचण्याची ज्यांना इच्छा असेल त्यांच्यासाठी;

'ऐतिहासिक गोष्टी' असे एक पुस्तक लोकहितवादी ह्यांनी लिहिले होते आणि त्याच्या अनेक आवृत्त्या निर्णयसागरने छापल्या होत्या. त्यामध्ये अनेक व्यक्ति आणि घटनांवर छोटेछोटे परिच्छेद लिहिले होते. पुस्तका माझ्या एका मित्राला फूटपाथवर मिळाले आणि त्याने ते मला दाखविले. मनोरंजक पुस्तक म्हणून मी त्याची पाने स्कॅन करून एक पीडीएफ बनविली आणि ती archive.org वर अपलोड केली. ती येथे मिळेल.

पुस्तक मिळाले तेव्हा अतिजीर्ण आणि पाने गळून पडत असण्याच्या स्थितीमध्ये होते. स्कॅनवरून हे कळेलच.

सुखीमाणूस's picture

3 Feb 2018 - 7:26 am | सुखीमाणूस

नक्की वाचते

प्राची अश्विनी's picture

3 Feb 2018 - 8:44 am | प्राची अश्विनी

मी पण

प्राची अश्विनी's picture

3 Feb 2018 - 8:44 am | प्राची अश्विनी

धाग्यावर येणारे प्रतिसाद सुद्धा आवडले.
का कोण जाणे शाळेत हा इतिहास आवडला नव्हता. आता मात्र आवडतोय.

पगला गजोधर's picture

3 Feb 2018 - 12:04 pm | पगला गजोधर

अवांतराबद्दल क्षमस्व,
पण
माझ्या वैयक्तिक मते,
थोरला बाजीराव हाच वाघ...
.
बस्स थोरला बाजी हाच खरा बाजी,
उरलेंले बाजी फक्त, 'वोनियन बज्जी'.

आता जर काही मिपाकरांनी, 'वोनियन बज्जी' फॅन्सक्लब चालवायचाच असेल,
किंवा
'कसंही कराच पन आमच्या धाकल्या बबन्याला तेवढ पराक्रमी शूर म्हणाच !', चा फड रंगवायचाच असेल, किस्यांचीच बतावणी करायचीच असेल, तर करो बापुडे,
आमच्या काय पोटांत दुखत नाय ! :)
.
बाकी समोरच्याला 'ब्रिगेडी' म्हणायचा जर एखाद्याला शब्दचळ लागला असेन, तर म्हणो बिचारे.

माझ्या डोळ्यासमोर थोरलाच चांगला,
बिचारा कधी एकहाथ जाड गाद्या गिराद्यावर लोळला नाही, त्याचं "बसलेलं असतानाचे" चित्रंही काढण्याची संधी चित्रकारांना त्याने दिली नाही, असं ऐकिवात आहे.
जेव्हा बघावं तेव्हा गडी घोड्यावर स्वार, एका हातात तलवार, दुसऱ्या हातात आहार म्हणून, मोहिमेवर जाताना लागण्याऱ्या शेतातली कवळी कणसं...

बाकी आधीही आमच्या काही प्रतिक्रियेत थोरला आहेच...
======
रेफ:
https://www.misalpav.com/comment/reply/33728/772012

शिवाजीमहाराज व थोरला बाजीराव, हे जात धर्म यांच्या पलीकडे पाहणारे संघटक, सहकाऱ्यात भावंड भावना जोपासणारे नेतृत्व, आणि उत्कृस्थ योद्धे होते. ( बारकाईने पहा त्यांचा जीवाला जीव देण्यार्यात दुसर्या जात धर्माचे होते, व त्यांच्या मार्गात काटे पसरवणारे त्यांच्याच जाती/ धर्माचे होते ) अश्या रणधुरांदराच्या पराक्रमाकडे दुर्लक्ष करून, केवळ प्रणयजिवना विषयी लफडेबाजी म्हणून राळ उडवण्याचा करंटेपणा करणाऱ्यांची कीव येते.

‎========
रेफ:
https://www.misalpav.com/comment/reply/41764/978142

‎थोरल्या बाजीरावाने धर्म/जात पलीकडे जाऊन, प्रेम व पुढे विवाह केला, काय झालं बिचाऱ्याचे ...किती हाल अपेष्टा उभय जोड्याच्या नशिबी ??? त्यामुळे एखादा रण धुरंधर पेशव्याचे मनपरिवर्तन झालेही असते (तुम्ही कल्पिता तसे) तरी आजूबाजूची सिस्टिम ने त्याचा काटा काढला असता,

प. ग. अवांतर नाहीये, कारण दुसरा बाजीराव हाच विषय आहे धाग्याचा. उद्देश हा की त्याच्याविषयी फारशी प्रसिद्ध नसलेली माहिती द्यावी. मूळ धाग्यात कुठं तुम्हाला त्याला शूर पराक्रमी म्हणलेले दिसते? कथा सांगायचं काम माझं. जजमेंट देण्याचं नाही. आणि तशाही या दंतकथाच आहेत. निवडू द्यात ना प्रत्येकाला आपला आपला हिरो आणि व्हिलन ... माझाच हिरो सुपरहिरो अस कसं चालेल?

आणि जात जाता हे पहा पहिल्या बाजीरावाचे गादीवरचे चित्र - त्यामुळे ती आख्यायिका खोटी आहे.

a

पगला गजोधर's picture

3 Feb 2018 - 1:17 pm | पगला गजोधर

नाही सर तुमच्या धाग्याविषयी नव्हे, तर काही प्रतिक्रियांवरील ही माझी प्रतिक्रिया होती, म्हणून अवांतर असे म्हणालो,
तुमचा लेख नेहमीप्रमाणेच सचित्र आटोपशीर व वाचनीय आहेच, हे वे सां न ल.

सतिश गावडे's picture

3 Feb 2018 - 2:08 pm | सतिश गावडे

ऐतिहासिक राजे महाराजांची चिते बहुतांशी डावी कडे किंवा उजवीकडे तोंड करुन बसलेली (किंवअसतात) असतात. समोर पाहणारी चित्रे खुप कमी असतात. असे का?

प्रचेतस's picture

3 Feb 2018 - 2:25 pm | प्रचेतस

ती मुघल आणि दख्खनी शैली आहे. ज्यात प्रामुख्याने राजाचे तोंड एका बाजूलाच असते, शिवाय ऑब्जेक्ट हे मोठे दाखवलेले असते आणि इतर तपशील बारीक चितारलेले असतात. उदा. राजा हे ऑब्जेक्ट मोठे आणि त्याचे सेवक अतिशय लहान.

अभ्या किंवा धागालेखक मनो ह्या शैलींवर अधिक सांगू शकतील.

manguu@mail.com's picture

3 Feb 2018 - 2:58 pm | manguu@mail.com

मला तरी सगळी चित्रे एकाच माणसाची वाटतात. फक्त शर्टाचे रंग , डोक्यावरची टोपी आणि मिशीचा पीळ थोडेफार बदललेले वाटतात.

प्राची अश्विनी's picture

3 Feb 2018 - 4:25 pm | प्राची अश्विनी

हहपुवा.

अभ्या..'s picture

3 Feb 2018 - 4:27 pm | अभ्या..

भारतीय लघुचित्रशैली ही रेषाप्रधान आहे. जवळपास सर्वच (मुघल, पहाडी, दक्खनी, कांगडा)शैलीत सपाट रंग आणि लाईनवर्क हे वैशिष्ट्य पहावयास मिळते. समोरचा चेहरा काढताना सपाट रंग आणि रेषेने त्रिमित नाक दाखवणे जरा अवघड जाते. पाशिमात्य अ‍ॅकेडेमिक शैलीत लाईट आणि शॅडोज वापरुन ते करता येते पण ती ब्रिटिशानी आणली. त्यामुळे भारतीय चित्र शैलीत बाजुने चेहरा काढताना नाक व्यवस्थित दाखवता येते.
लाईट आणि शॅडोज, परस्पेक्टिव्ह, व्यवस्थित अ‍ॅनोटॉमी हे भारतीय चित्रशैलीत नसायचे. त्यापेक्षा चित्रांस अलंकरण, वास्तू, प्राणिपक्षी, झाडे, कपडे व दागिन्याचे डिटेलिंग व तजेलदार रंगसंगतीस महत्त्व दिले जायचे.
रावबाजींच्या ह्या चित्रात देखील त्यांची वाढलेली खुरटी दाढी दाखवलेली रोचक आहे. (मुंडन केलेले खुरटे केसवाले डोके दुसरीकडे काही चित्रात दिसते पण मिशा आणि खुरटी दाढी हे कॉम्बीनेशन नाही पाहण्यात)

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2018 - 2:24 pm | श्रीगुरुजी

ऐतिहासिक राजे महाराजांची चिते बहुतांशी डावी कडे किंवा उजवीकडे तोंड करुन बसलेली (किंवअसतात) असतात. समोर पाहणारी चित्रे खुप कमी असतात. असे का?
दे

असल्या चित्रातून राजेमहाराज फूट-दीडफूट लांबलचक देठ असलेले कमळाचे/गुलाबाचे फूल हुंगताना दाखवितात. देठ धरलेला हात बसलेल्या अवस्थेत मांडीवर असतो, पण फूल नाकापाशी असते. इतक्या लांबलचक देठांची फुले त्या काळात होती की काय?

गामा पैलवान's picture

3 Feb 2018 - 5:19 pm | गामा पैलवान

कपिलमुनी,

जशी झाशीची राणी कोणाला माहितीच नाही.

पहिल्याप्रथम माझ्या इथल्या तिरकस प्रतिसादाबद्दल क्षमा मागतो. मला वाटतं की पदाच्या अभिमानासाठी हुतात्मा होण्याबद्दल थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. हुतात्मा होणं हे काही ध्येय असू शकंत नाही. त्याने धडपड भरपूर केली, पण हाती यश आलं नाही. यासंबंधी माझा सविस्तर प्रतिसाद इथे आहे. त्याच्या अवगुणांपेक्षा त्याची बदनामी तुलनेनं जास्त झालेली आहे, असं माझं मत.

बाकी, तुमचं झाशीच्या राणीचं उदाहरण नेम चुकलेलं आहे. ती सुप्रसिद्ध असली तरी लढून हुतात्मा झालेले अनेक मराठा वीर होते ज्यांचं नावही फारसं परिचित नाही. उदाहरणादाखल बापू गोखले असाच दुसऱ्या बाजीरावाच्या पदरीचा एक योद्धा होता.

आ.न.,
-गा.पै.

राही's picture

3 Feb 2018 - 6:14 pm | राही

निव्वळ कुतूहल म्हणून : पूर्वी राजे राजवाडे मसनदीवर कसे बसत असत? तख्तावर बसून एक पाय किंवा दोन्ही पाय खाली पायठाणावर सोडलेली चित्रे पाहिली आहेत. पण गादीवर बसताना दोन्ही गुढघे मागे मुडपून बसत की गांधीजींसारखे शेजारी शेजारी समांतर मुडपून (एका पायाच्या पोटरीवर दुसरी मांडी) ?की गुढघे मागे मुडपून टाचांवर बूड टेकून?

तुम्ही म्हणता तसे सर्व प्रकार चित्रात दिसतात. एकच पद्धत होती असे नाही. एकाच राजाच्या बसायच्या पद्धतीत वयानुसार बदलही होतो. तेंव्हा स्वतःला आरामदायक होईल असे बसत हा माझा तर्क आहे.

हे चित्र पहा - बसण्याची (किंवा चित्रात बसलेले दाखवण्याची) अशीसुद्धा पद्धत होती.

sufi

अरविंद कोल्हटकर's picture

5 Feb 2018 - 10:36 pm | अरविंद कोल्हटकर

भारतातील ऐतिहासिक काळातील सिंहासने पुरेशी लांबरुंद छोट्या बैठकीसारखी असत आणि त्यांच्यावर खुरमांडी अथवा मांडी घालून बसणे किंवा वीरासन घालून बसणे शक्य होते आणि काही राजे-बादशहा तसे बसतहि असावेत. पण मला अधिक शक्यता पाय खाली सोडून बसण्याची वाटते कारण मी पाहिलेल्या सिंहासनांबरोबर पायासाठी स्टूलहि असते. अशी मुघल सिंहासने इराणकडून ऑटोमनांना भेट म्हणून पाठविलेली इस्तंबूलमधील टोपकापी प्रासादातील संग्रहालयामध्ये मी पाहिली आहेत. उदाहरणार्थ हे पहा:
मुघल सिंहासन
मुघल सिंहासन

नादिरशाहने हिंदुस्थानातून लुटलेले हे सिंहासन नंतर ऑटोमनांच्या हातात पडले असे सांगितले जाते.

संस्कृत साहित्यामध्ये अनेक सामन्तांवर विजय मिळवलेल्या सम्राटांचे जेथे वर्णन येते तेथे ’त्या सामन्तांच्या मुकुटांमधील रत्नांच्या किरणांचा प्रकाश सम्राटाच्या पायावर पडला’ अशा स्वरूपाचे शब्द असतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील, सध्या मला लगेच सुचणारे वर्णन विक्रमोर्वशीयाच्या तिसर्‍या अंकातील १९व्या श्लोकामध्ये आहे:

(उर्वशीची सखी चित्रलेखा उर्वशीला राजा विक्रमाच्या सहवासात सोडून जाते तेव्हा राजा आपला मित्र विदूषक माणवक ह्याला सांगतो-)
सामन्तमौलिमणिरञ्जितपादपीठ-
मेकातपत्रमवनेर्न तथा प्रभुत्वम् |
अस्या: सखे चरणयोरहमद्य कान्त-
माज्ञाकरत्वमधिगम्य यथा कृतार्थ: ॥

(अरे मित्रा, सामन्तांच्या मस्तकांवरील रत्नांनी शोभिवन्त झालेले पादपीठ ज्यामध्ये आहे असे पृथ्वीचे एकछत्री प्रभुत्व मिळवून मी तितका कृतार्थ झालो नाही जितका आज हिच्या चरणांपाशी आज्ञाकरत्व (सेवकभाव) मिळवून झालो.)

अशा वर्णनांवरून वाटते की प्राचीन राजे सिंहासनावर बसून पाय खाली सोडत असावेत, जेणेकरून त्यांच्या सामन्तांना त्यांच्या पदकमलांवर मस्तक ठेवून आपल्या मुकुटांमधील रत्नांचे किरण तेथे पसरवता येतील!

राजानेसुद्धा सिंहासनाला पाय लावू नयेत अशीहि रूढि होती म्हणून वीरासनात बसण्याचीहि पद्धत होती असे वाटते.

माहितगार's picture

6 Feb 2018 - 4:24 pm | माहितगार

@ अरविंद कोल्हटकरजी

आपल्या प्रमाणे अक्षरओळखी पलिकडे संस्कृत जमत नाही पण विशीष्ट शब्द कोणत्या परिपेक्षात अथवा अर्थाने आलेला आहे हे जाणून घेण्याची इच्छा असते. मी मराठीतील सिंहासन शब्दासाठीचे पर्यायी शब्द पाहिले असता तख्त हा शब्द पर्शियन किंवा अरेबीक मधून आला असेल का ? खुर्ची टाईप दुसरा मराठीतील शब्द 'मंचक' आहे.

१) मञ्च (मंच) हा शब्द संस्कृतात मिळणारे शोध

* मञ्चस्य शब्द शोध

* मञ्चक

* मञ्चकः

गादी हा शब्द टिपीकल मराठी आहे ज्यात आसनव्यवस्था मुळात बैठी असणे सहाजिक असावे.

२) संस्कृतात आसन हा शब्द सर्वाधिक वापरात असावा , संस्कृत विकिस्रोतात आसन आणि आसनम शब्दावर शोध मिळतात. ते कोणत्या अर्थाने आले आहेत ते या चर्चेच्या अनुषंगाने ते कोणत्या अर्थाने आले ते समजून घेणे आवडेल.

३) सिंहासन शब्दाचा उल्लेख अगदी रामायणाच्या किष्किंधा कांडात खालील प्रमाणे येतो त्या शिवाय गर्ग संहिता, पद्म आणि भविष्य पुराण, मानसरम नावाच्या ग्रंथात दिसताहेत पण

संस्कार्यो हरि राजः तु अंगदः च अभिषिच्यताम् |
सिंहासन गतम् पुत्रम् पश्यन्ती शान्तिम् एष्यसि || ४-२१-११

संस्कृत डॉक्यूमेंट डॉटऑर्ग वरील अर्थ

11. hari raajaH samskaaryaH = monkeys, king, is to be cremated; angadaH ca abhiSicyataam = Angada's, also, be anointed; simha aasana gatam = lion's, seat [throne,] invested; putram pashyantii shaantim eSyasi = son, on seeing, peace, you can obtain.

"Cremation of the king of monkeys and anointment of Angada are the present time affairs, and seeing your son invested on the throne you can obtain peace." Thus spoke Hanuma to Tara. [4-21-11]

* सिंहासन शब्दावरील संस्कृत विकिस्रोतातील इतर शब्द शोधात

** सिंहासन शब्दावरील संस्कृत विकिस्रोतातील शब्द शोध

य** सिंहासनस्य शब्दावरील संस्कृत विकिस्रोतातील शब्द शोध

तख्त हा शब्द फारसी आहे, उदाहरणार्थ तख्त इ सुलेमान (Persian: تخت سلیمان‎),

अरविंद कोल्हटकर's picture

6 Feb 2018 - 10:17 pm | अरविंद कोल्हटकर

सिंह हा सर्वांमध्ये शूर प्राणी अशी समजूत असल्याने राजा = सिंह आणि राजाचे आसन = सिंहासन असा अर्थ आपोआपच निर्माण झाला. आपटे ह्यांच्या इंग्लिश-संस्कृत कोशातहि Throne ह्याला समानार्थी म्हणून सिंहासन हाच शब्द दर्शविला आहे, यद्यपि भद्रासन - शुभ आसन - असाहि एक अन्य शब्द दर्शविला आहे. तख्त, गादी, गद्दी असे शब्द जरी वापरात असले तरी ते बाहेरून आलेले आहेत.

Throne आणि गद्दी ह्यावरून एक मजेदार गोष्ट आठवली. सत्ताधारी इंग्रज त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या नेटिव प्रजेमध्ये लहानलहान गोष्टींतून उच्च-नीच भाव दर्शवीत असत. His Majesty केवळ इंग्रज राजाच असे, सर्व नेटिव Princes हे His Highness असत. ते कधीहि King नसत, तर त्यांना Prince म्हणण्याची रीत होती. Throne वर केवळ इंग्रज राजा बसे, सगळे native princess गद्दीवर बसत. हिंदुस्थानातील लोकांना 'नेटिव' असे ओळखले जाई. नेटिवांनाहि कधीकधी लॉर्ड अथवा सर होता यायचे पण बहुतांशी ते राव साहेब/राव बहादुर (दक्षिणेतील हिंदु नेटिवांसाठी), राय साहिब/राय बहादुर (उत्तरेतील हिंदु नेटिवांसाठी) खान साहेब/खान बहादुर (मुस्लिम/पारसी/ज्यू नेटिवांसाठी) ह्या पलीकडे जाऊ शकत नसत.

अनिंद्य's picture

7 Feb 2018 - 11:29 am | अनिंद्य

भद्रासन - शुभ आसन... असे संबोधन नक्कीच असावे, उदा. जयपूर राज्याच्या सिंहासनाला आणि ते ठेवण्याच्या शोभिवंत दरबाराला 'सर्वतोभद्र' असे नाव आहे.

इंग्रजांत मुकुट फक्त ब्रिटनचा राजा किंवा राणीच घालु शकत असे. भारतातील मांडलिक राजांना पगडी (turban) घालायची अनुमती होती, म्हणून भारतातले ब्रिटीशांचे मांडलिक राजे रत्नजडित फेटे, पागोटे, पगड्या घालत असत.

मराठी_माणूस's picture

10 Feb 2018 - 12:50 pm | मराठी_माणूस

अरेरे , काय वेळ आली मांडलीक राजांवर ,त्यांनी काय घालायचे हे ब्रिटीशांनी ठरवायचे

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Feb 2018 - 3:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

मांडलिक म्हटला म्हणजे हे आलेच... आपल्या अंकीत असलेल्या मांडलिकाला आपली बरोबरी कोणत्या काळातला/प्रदेशातला कोण सम्राट करू देईल ?

"आजच्या जगातले सम्राट" पण काय फार वेगळे वागत आहेत काय ? :)

सुमीत भातखंडे's picture

6 Feb 2018 - 1:20 pm | सुमीत भातखंडे

छान लेख.
प्रतिसादांमधूनही भरपूर माहिती मिळाली.

सस्नेह's picture

6 Feb 2018 - 2:20 pm | सस्नेह

रोचक लेख आणि प्रतिसाद !
वस्तुनिष्ठ इतिहासापेक्षा कथारूप किस्से गोड लागतात ,खरे.

मराठी कथालेखक's picture

6 Feb 2018 - 3:08 pm | मराठी कथालेखक

चांगला लेख... प्रॉक्सीमुळे चित्रे दिसली नाहीत. नंतर पुन्हा धागा उघडून बघेन.

अनिंद्य's picture

6 Feb 2018 - 3:17 pm | अनिंद्य

@ मनो,

वाचतोय.

थोडे अवांतर होईल पण बिठूर भागात नानासाहेब पेशव्याचा उल्लेख 'नाना राव' असा असतो. बिठूरमध्ये रमेल, चौधरीपुरा, बिठूर खुर्द हा भाग मिळून एकूण ३००-३५० एकर जमिनीवर परागंदा पेशव्यांची व्यक्तिगत मालकी होती. १८५७ चा उठाव शमल्यानंतर बिठूरमधील पेशव्यांच्या सर्व मिळकती इंग्रजांनी ताब्यात घेतल्या किंवा नष्ट केल्या ते तुम्ही लेखात लिहिले आहेच. ही सर्व जमीन 'आराजी लष्कर' नावाने ओळखली जाते. पुढे १८९५ मध्ये ह्या जमिनीवर पेशवे कुटुंबीयांपैकी कोणी दूरस्थ नातेवाईकांनी दावा केला, अचानक हे नवीनच मालक प्रकटल्यामुळे इंग्रज सरकारने त्यांना ७००० रुपये मोबदला देऊन जमीन रीतसर सरकारच्या ताब्यात घेतली अशी माहिती कानपुर परगण्याच्या महसुली पत्रकात आहे.

पेशव्यांच्या ताब्यात असलेल्या जवळच्याच 'किला' भागात मात्र कोणतीही तोडफोड न करता १८५९ साली इंग्रजांनी 'हार्नेस अँड सॅन्डलरी फॅक्टरी' सुरु केली. जवळच १५ किलोमीटरवर असलेले कानपुर आधीपासून चामडे कमावण्याच्या उद्योगाबद्दल प्रसिद्ध होतेच, म्हणून बिठूरच्या किल्ल्यात इंग्रज फौजांच्या घोडदळासाठी खोगीर आणि अन्य चामडी सामान बनवण्यासाठी ही 'हार्नेस अँड सॅन्डलरी फॅक्टरी' कार्यरत होती, आजही आहे. फक्त आता त्याचे नाव बदलून OEF - ऑर्डीनन्स इक्विपमेंट फॅक्टरी असे करण्यात आले आहे.

बिठूर महर्षी वाल्मीकींच्या आश्रमासाठी आणि रामपुत्र लव-कुश यांची जन्मस्थळी म्हणूनही प्रसिद्ध आहे.

अनिंद्य

धन्यवाद, हे माहीत नव्हते.

वीणा३'s picture

6 Feb 2018 - 9:56 pm | वीणा३

उत्तम लेख आणि माहिती. प्रतिसाद सुद्धा माहितीपूर्ण. धन्यवाद

खूपच रोचक किस्से आहेत. फोटोही मस्तच. एक-दोन फोटो दिसत नाहीयेत.

या लेखासाठी धन्यवाद. प्रतिसादांमधूनही छान माहिती मिळाली.

फोटो परत टाकले आहेत, आता सगळे दिसायला हवेत.

रुपी's picture

7 Feb 2018 - 6:19 am | रुपी

बयाबाई/ कुसुमाबाई यांच्याबद्दल इथे काही माहिती आहे. पण इथल्या प्रतिसादांपेक्षा थोडी वेगळी आहे. त्यात लिहिले आहे की त्या बाजीराव पेशव्यांचा दत्तक मुलगा बाळासाहेब यांच्या कन्या होत्या. आणखी एक परिच्छेद तिथून साभार :
"कुसुमाबाई यांचें लग्न नानासाहेबानीं लाविलें. त्यानां लष्करचे रावसाहेब आपटे यानां दिलें होतें. त्यांचें सासरचें नांव सरस्वतीबाई असून त्यानां बंडाची सर्व हकीकत आठवत असे. कानपूरच्या बिबिखाना कत्तलीशी नानासाहेबांचा मुळीच संबंध नव्हता असें त्यानीं सांगितलें आहे. बंडाची स्थिरस्थावर झाल्यावर कुसुमाबाईनां त्यांच्या श्वशुरानें ग्वाल्हेरीस नेलें. त्यांचे पति वारल्यावर त्या काशीवास करून असत. त्यानां इंदूर व ग्वाल्हेर या संस्थानांकडून कांहीं तैनात असे; इंग्रज सरकार मात्र कांहीहि देत नसे. बाई निस्पृह, धैर्यशाली व अभिजात होत्या. त्या स. १९१७ च्या आगष्टांत वारल्या. आतां पेशवे घराण्याचा औरस वंश मुळींच राहिला नाहीं."

पगला गजोधर's picture

7 Feb 2018 - 1:01 pm | पगला गजोधर

पेशवे घराण्याचा औरस वंश मुळींच राहिला नाहीं

पेशवे घराण्याचा औरस वंश नक्कीच आहे मस्तानी पुत्र समशेरबहादूर कडून

manguu@mail.com's picture

7 Feb 2018 - 5:16 pm | manguu@mail.com

तो गृहीत धरतात का ?

गामा पैलवान's picture

10 Feb 2018 - 2:55 am | गामा पैलवान

कपिलमुनी,

एवढे सगळे घडत असताना छत्रपती घराणे कुठे होते ? युद्धात त्यांच्या वंशजांचा काही सहभाग असल्याची नोंद मिळते का ? कारण राजे पेशवे नसून छत्रपती होते.
छत्रपती शाहू (पहिले ) नंतर पुढे फार उल्लेख येत नाहीत म्हणून पृच्छा .

उत्तम प्रश्न. याच्या अनुषंगाने बरंच (अवांतर) लिहायचं आहे.

दुसऱ्या बाजीरावाच्या वेळेस जे छत्रपती होते ते पहिल्या शाहूंचे थेट वंशज नव्हते. शंभूपुत्र अर्थात पहिले शाहू महाराज निपुत्रिक वारले (इ.स. १७४९). औरंग्याच्या कैदेपायी त्यांना सैनिकी व/व राजनैतिक शिक्षण मिळालं नव्हतं. औरंग्या गचकल्यावर अकस्मात छत्रपती झाले. शिवाय ताराबाईंच्या रुपात प्रतिस्पर्धी होतेच. ताराबाईंनी कुठून तरी पकडून आणून उभा केलेल्या एका पुरुषास दुसरा राजाराम म्हणून मृत्युपूर्वी काही वर्षं अगोदर शाहूंनी दत्तक घेतलं.

शाहू सैनिकी दृष्ट्या निर्बळ व निपुत्रिक वारल्याने त्याचे पुढील वंशज केवळ नामधारी राहिले. दुसरे राजाराम महाराज १७७७ साली वारले. त्यावेळेस पेशवाईत सवाई माधवरावाचा जन्मून दोनतीन वर्षंच झाली होती. भाऊबंदकी ऐन भरांत होती. सवाई माधवरावाच्या नवे बारभाई (किंवा नाना फडणीस) राज्यकारभार हाकीत होते. साधारण त्याच वयाचे दुसरे बाजीराव धारच्या कैदेत होते. अशा प्रसंगी दुसरे शाहू १७७७ साली वयाच्या चौदापंधराव्या वर्षी छत्रपती झाले. तेसुद्धा नामधारीच होते. सैनिकी व राजनैतिक शिक्षणाची त्यांचीही तीच रड होती.

पुढे १७९४ च्या आसपास सवाई माधवराव आत्महत्येपायी मृत्यू पावले आणि दुसरे बाजीराव अकस्मात पेशवे झाले. सैनिकी व राजनैतिक शिक्षणाची बोंब होतीच. १८०२ चा इंग्रजांशी केलेला तह याच दुसऱ्या शाहूंच्या कारकिर्दीत घडला. पुढे १८०८ साली दुसरे शाहू वारले आणि प्रतापसिंह पित्याप्रमाणे चौदापंधराव्या वर्षी छत्रपती झाले. शिक्षण तसं यथातथाच होतं. हाताशी शिबंदी होती ती फक्त सातारच्या रक्षणापुरतीच होती. तिचा आक्रमणासाठी काडीमात्र उपयोग नव्हता.

१८०३ च्या तहानंतर सुमारे पंधराएक वर्षे दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांना हूल द्यायचा प्रयत्न केला. पण कुठलीच मसलत जमली नाही. १८०८ नंतर प्रतापसिंह छत्रपती झाले खरे, पण जाणत्या वयांत येईस्तोवर १८१३/१४ साल उजाडले. तोवर इंग्रज बरेच सबळ झाले होते. बाकी मराठा सरदारांचे कडून सहाय्य मिळंत नसल्याने छत्रपतींनीही इंग्रजांशी स्वतंत्रपणे बोलणी चालवली होती. पुढे १८१८ साली दुसऱ्या बाजीरावांनी इंग्रजांशी तह केल्यावर प्रतापसिंहांनी इंग्रजांचं मांडलिकत्व पत्करलं.

या सर्व घडामोडींमध्ये सर्वोच्च नेत्याच्या शिक्षणाची वानवा दिसून येते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीतही असाच प्रसंग ओढवला होता. वडील दूर बंगळुरात आणि हे गाढवाचा नांगर फिरलेल्या पुण्यांस. कशाचा कशास पत्ता नाही. शहाजीमहाराजांनी आपली विश्वासू माणसं फक्त पुण्यांस पाठवली होती. अशा परिस्थितीत जिजाबाई व दादाजी कोंडदेवांनी बालशिवबाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.

राजशिक्षणाची आबाळ झाल्याने राज्यं कशी खिळखिळी होतात ते उत्तर पेशवाईच्या उदाहरणांतून स्पष्ट दिसतं. सांगायचा मुद्दा काये की दादाजी कोंडदेवांना हलकं लेखणाऱ्या दंभाजी ब्रिगेडला शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाप्रती काडीमात्र आदर नाही. त्यांच्या दंभापासनं सावधान.

आ.न.,
-गा.पै.

manguu@mail.com's picture

10 Feb 2018 - 8:17 am | manguu@mail.com

दादाजी की दादोजी ?

अरविंद कोल्हटकर's picture

10 Feb 2018 - 3:10 am | अरविंद कोल्हटकर

सातार्‍याच्या छत्रपतींचा उत्तर इतिहास असा आहे:

२० फेब्रुअरी १८१८च्या अष्ट्याच्या लढाईत मराठा पक्षाचा पूर्ण पराभव झाला, सेनापति बापू गोखले लढाईत पडले आणि प्रारंभी मराठा बाजूला असलेले तत्कालीन छत्रपति प्रतापसिंह, त्यांच्या मातोश्री आणि त्यांचे कुटुंबीय इंग्रजांच्या स्वाधीन झाले. तदनंतर इंग्रजांनी फार लोकक्षोभ होऊ नये म्हणून ज्या अनेक योजना केल्या त्यांपैकी एक म्हणजे छत्रपतींना सातार्‍यात परत स्थानापन्न करून वारणेच्या उत्तरेकडील भाग कृष्णा-भीमासंगमापावेतोचा हा स्वराज्य म्हणून त्यांच्या स्वाधीन केला. त्याच वेळी त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी म्हणून कॅ.ग्रँटला रेसिडेंट म्हणून सातार्‍यात नेमले,

अशा रीतीने सातारचे १८१८ नंतरचे तथाकथित राज्य हे केवळ इंग्रजी मेहेरबानीने निर्माण झालेले संस्थान होते. त्याचा शिवाजीने स्वपराक्रमाने स्थापन केलेल्या राज्याशी काडीमात्र संबंध नव्हता. तेहि राज्य इंग्रजांना सोयीस्कर वाटले तोपर्यंत चालले. प्रतापसिंहास तो गैरसोयीचा वाटल्यामुळे इंग्रजांनी ४ सप्टेंबर १८३९ ह्या दिवशी पदच्युत करून बनारसला पेन्शनीवर पाठवले आणि त्याचे धाकटे भाऊ आप्पासाहेब ह्यास छत्रपतिपदावर बसविले. ते निपुत्रिक होते. त्यांव्या १८४८ मधील मृत्यूनंतर त्यांनी घेतलेला दत्तक नामंजूर करून इंग्रजांनी अखेर सातारचे संस्थान आणि शिवाजीच्या स्वनिर्मित राज्याचा अखेरचा दुवा १६ मे १८४९च्या जाहीरनाम्याने अखेरचा नष्ट केला आणि सातारा ब्रिटिश इंडियाचा भाग बनला. ईंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी निर्मिलेले हे राज्य त्यांना वाटले तोवर टिकले आणि नंतर त्यांच्याच इच्छेने विलयास गेले.

बबन ताम्बे's picture

10 Feb 2018 - 3:25 pm | बबन ताम्बे

धन्यवाद . बऱ्याच शंका दूर करणारी माहिती.
रंगो बापूजी याच प्रताप सिंहांसाठी लंडनला गेले होते का त्यावेळी ?
मूठभर इंग्रज खूपच धूर्त होते न काय.