कुलुप

RDK's picture
RDK in जनातलं, मनातलं
19 Sep 2017 - 11:59 pm

लोणावळयाला उन्हाळयाचे भय कसले?? डोंगराच्या मध्यभागी वसलेल्या या शहराचे सौभाग्य की ग्रीष्माच्या तापत्या उन्हाचा कोप याला कमीच सहन करावा लागत होता. तरीही नाजुक प्रवृत्तिची लोक डोक्यावर छत्र्या धरून निसर्गाने दाखविलेल्या औदार्याप्रती कृतघ्नपना दाखवित होती.

स्टेशन गेट जवळ उसाच्या रसाचे दूकान लोकांचा गळा थंड करत होते. शाळेतुन येणारी काही मुले बंगल्यांच्या बाहेर, झाडावरुन पडलेले बादाम दगड़ाने फोडुन खात होती. तेवढ्यात एक गाडी गेटजवळ येऊन थांबली. मालगाड़ी जात होती. स्टेशन गेट लावलेले होते. गाडीतून एक गृहस्थ उतरले आणि त्यासोबत त्यांच्या पत्नी, मुलगा आणि दोन मुली उतरल्या.
"मयूर, तू जा बेटा ब्रेड डिलीवरी साठी. मालगाड़ी जात आहे. बराच वेळ लागेल. तुहि किती वेळ थांबशील? आम्ही जाऊ इथून"

"पण मामा, सामान आहे तुमच्याकड़े. कसे जाल तुम्ही?"
"अरे इतके कुठे आहे सामान? सगळे आधीच पाठविले आहे गावी. आम्ही जातो मालगाड़ी निघल्यावर. स्टेशन आहे तरी किती लांब? जा बेटा तू"

मयूर खाली उतरला आणी मामा मामींच्या पाया पडला. त्यांनी आशीर्वाद दिला. पुन्हा गाडीत चढून त्याने टर्न घेतला आणि हात हलवत साऱ्यांचा निरोप घेतला.

"बाबा, मी अतुल कड़े जाऊन येऊ का?" विकिने, त्यांच्या मुलाने विचारले.
"कोण अतुल? आणि आता कुठे जाणार तू त्याला भेटायला?"
"तो पहा त्या समोरच्या बंगल्यात राहतो तो" रस्त्याच्या पलीकडे एका लाल रंगाच्या भिंतीचे कुंपण असलेल्या काळ्या गेट कड़े विकिने बोट दाखविले.
"काही नको जायला. ती बघ मालगाड़ी संपेन आता. अजुन स्टेशन वर जाऊन रांगेत उभे राहायचे आहे. चला लवकर लवकर" आई म्हणाली.
नाईलाजने विकिने पुढे पाऊल टाकले. मालगाड़ी संपली. गेट उघडले आणि वाहनांची ये जा सुरु झाली. विकी आणि त्याचे कुटुंब स्टेशनकड़े जाण्यास वळले.…......................................…......…........
.
....
"काकी, बाळा आहे का घरी?" विकिने बाहेरुन विचारले. शिलाई मशीनाचा आवाज येत होता. बाळाच्या आईला आवाज आला नाही. विकिने या वेळेस घरात थोड़े वाकुन आवाज दिला आणि त्याचबरोबर बाळा घरी नसल्याची खात्री करून घेतली.
"कोण विकी का?"
"हो काकी. बाळा आहे का घरी?"
"नाही बेटा. तो प्रतिकसोबत गेलाय खेळायला. त्या तिथे मैदानात बघ त्याला. आणि दिसला की घरी बोलावले आहे म्हणून पण सांग"
"ठीक आहे"
"कुठे होतास इतके दिवस. दिसलाच नाही. अभ्यासाला देखील आला नाहीस आमच्या घरी? भांडण झाले का बाळाशी?" काकिंनी विचारले.
"नाही काकी तसे नाही. मी सांगतो बाळाला घरी बोलावलय म्हणून" असे म्हणत विकी बिल्ड़िंगच्या पायऱ्या उतरु लागला. तेवढ्यात काहिसा विचार करत तो परत वर चढला. त्याने पुन्हा आवाज दिला.
"काकी......."
"अरे काय झाल विकी?" या वेळेस बाळाची आई उठून बाहेर आली.
"काकी ते........" तो अडखळला.
"बोलना बेटा"
"काकी आम्ही लोनावळा सोडून जातोय..... सगळे...... मी आता गावी जाणार आणि तिथेच शिकणार आहे...... बाळाला भेटायला आलो होतो." मान खाली घालत आणि हळुुवारपने एकेक वाक्य तो बोलला.
"कधी जाणार आहे बेटा आणि असे अचानक? आई भेटली होती एका आठवड्यापुर्वी पण काही बोलली नाही"
"आजच जाणार आहे 1 वाजता. मी येतो काकी."
"ये हो बेटा. लोणावल्याला आलास की येत जा."
"बाय काकी" विकी झपाझप पायऱ्या उतरला आणि लगबगिने घराकड़े जाऊ लागला. वळणावर त्याला मैदानात बाळा, प्रतिक, निखिल वगैरे खेळताना दिसले. त्यांना भेटायला जाऊ का नको त्याला कळत नव्हते. आज तीन महिने झाले त्याच्याशी कुनिच बोलत नव्हते. शिकवनीला तो एकटा जायचा. तिथे अतुल वगैरे लांबुन येणारी लोक त्याच्याशी बोलायची. शिकवनीतून परत येताना वळणावर तो एकटाच असायचा. सगळ्यांना पुढे जाऊ देऊन मग तो मागून जायचा. कधी चुकुन तो त्यांच्या पुढे असला तर घराकड़े पळायचा.
पण बाळा पण त्याच्याशी का बोलत नव्हता हे त्याच्या बाळमनाला कधी उमगले नाही. त्याचे भांडण प्रतिकशी झाले होते पण बोलने मात्र बाळा व निखिलने देखील बंद केले. त्याने बाळाशी एकटे भेटन्याचा आणि बोलन्याच्या प्रयत्नही केला पण तो नेहमी प्रतिकच्या सोबत असे. आजही तसेच होते. उगाच तिथे जाऊन अपमान करून घेण्यापेक्षा निमुटपने घरी जाणे त्याला अधिक श्रेयस्कर वाटले.
"आउट......" कुणीतरी मैदानात ओरडले. विकी चालत चालत घरी पोहचला.

घराच्या बाहेर त्याने लावलेल्या झाडांच्या कुंड्या आईने शेजारी दिल्या होत्या. बाहेर ठेवलेल्या बाकाखाली त्याने जमा केलेले डब्बे, कैसेट्स, खिळे, धागे आणि त्यापासून त्याने तयार केलेले यंत्र (अस त्याला वाटायच) कचऱ्याच्या डब्यात स्थानापन्न झाले होते. पण या सगळ्या गोष्टीन्ची फिकिर करण्याचे त्राण त्यांच्यात राहिले नव्हते. त्या अस्तावस्त घरात शिरुन तो पलंगावर पडला आणि नकळत त्याच्या डोळ्यात आलेले अश्रु त्या चादरिविना गादिने टिपले.
"विकी उठ. काय विचार करतोय कुणास ठाऊक. ति बघ ट्रैन आली"
विकी भानावर आला. तो उठला. रांग पुढे सरसावली. ट्रैन स्टेशनवर प्लेटफॉर्मला लागली. दरवाजे उघडले गेले आणी लोक आत शिरु लागले. विकी दाराजवळ आला आणि काहीतरी विसरत असल्याची भावना आतून आली. तो मागे वळला पण निर्दयी लोकांनी त्याला आत ढकलेले. गाडी सुटली....…......................................................................बाळा घरी आला. आज तो फार दमला होता. आज बिल्डिंगच्या पायऱ्या चढनेही त्याच्या जीवावर आले होते. कसेबसे तो वर आला. चप्पल काढून घरात शिरला. पाणी घेऊन गटागटा प्याला तेव्हा कुठे त्याला बरे वाटले. तो तसाच पलंगावर पडला.
"बाळा, किती वेळ लावलास रे. चल हातपाय धुवून घे. मी जेवायला वाढते तोपर्यंत" बाळाची आई म्हणाली.
बाळा उठला आणी मोरीत गेला. त्याला टॉवेल देत आई म्हणाली.
"आणि काय रे तो विकी भेटला का तुला?"
त्या प्रश्नाने तो जरा चमकला कारण ते दोघे बोलत नव्हते.
"नाही भेटला पण का?" बाळाने विचारले.
"तो आला होता आज घरी तुला भेटायला. मी सांगीतले की तू मैदानात खेळत असशील म्हणून"
"काय सांगत होता तो" बाळाला कळेचना की तो त्याच्याशी बोलत नसतानाही आज विकी अचानक कसा आला होता ते.
"तो गावी जाणार आहे राहायला आणि आता तिथेच शिकणार. तुला भेटायला आला होता तो"
बाळाला क्षणभर काही सूचेचना. तो विकिशि बोलत नाही याचा त्याला विसर पडला पण तो असा अचानक जाणार या विचाराने त्याला घेरले. तो घरी आला होता पण मैदानात आला नाही. कदाचित प्रतिक वगैरे असतील म्हणून आला नसेल. पण मी जाऊ शकतो न त्याला भेटायला असा विचार करून तो चप्पल घालून बाहेर पडला.
"अरे कुठे निघालास परत. वाढून आहे मी. ते खा आणि मग जा कुठे जायचे ते."
"मी विकिकड़े जातोय आई. लगेच आलो जाऊन" बोलत बोलत तो खाली उतरला देखील.
"अरे पण तो गेला देखील असेल आता" त्याची आई म्हणाली पण ते ऐकन्यासाठी बाळा थांबला नव्हता...............…................
......
प्रतिक आणि मंडळी त्यांच्या अंगणात बसली होती. गप्पा मारत होती. त्यांना बाळा घाईघाईत जाताना दिसला.बाळा त्यांच्याकडे बघून हसला आणि म्हणाला
"आलोच मी"
"कुठे चालला" प्रतिकने विचारले.
"काम आहे" एवढेच तो म्हणाला. विकिला भेटायला चाललो हे त्यांच्यासमोर सांगायचे धाडस त्याला झाले नाही. जसेजसे विकिचे घर जवळ येत होते तशीतशी त्याच्या पायाची गती धीमी आणि हृदयाची गती तेज़ होत होती. विकीच्या घराच्या जवळ त्याचे पाय थबकले आणि हळूहळू पुढे होऊन त्याने डोकावून पाहिले. तो निळा दरवाजा बंद होता. दरवाज्याला कुलुप होते. बाळा दाराजवळ आला. अजुन थोड्या वेळात हा दरवाजा उघडेल किंवा कुणीतरी येऊन कुलुप अघड़ेल असे त्याच्या भोळसर मनाला वाटले. तो त्याच्या ओट्यावर बसला. बराच वेळ बसला. अचानक कुणाची तरी पाऊले वाजली. त्याने वळून पाहिले तर एक म्हातारे बाबा रोडवरुन जात होते. तो पुन्हा बसला. समोर रानटी भेंडिचे झाड़ होते. लोकांनी त्याच्या फांदया तोडून त्याला ओडकेबोड़के केले होते. त्या एकही पान शिल्लक नसलेल्या झाडाला पाहुन विकी आठवणीत हरवला.
याच रानटी भेंड्या ठेचुन त्याचा पिवळा रस ते होळीला तयार करायचे आणि एकदुसऱ्यावर टाकायचे. होळीच्या दिवशी सारा अबोला दूर व्ह्यायचा. भांडण मिटायची.
आजच्या दिवसांपूर्वी होळी का आली नाही? विकिबरोबरचे भांडण तरी मिटले असते. त्याच्यासोबत पुस्तकं वाचायला पाटेस्कर बाईंकड़े जाता आले असते.
तो मैदानात भेटायला देखील आला असता. आपल्यामधे नेमके काय बिनसले होते याचे उत्तर त्याला शोधूनही सापडेना. तेवढ्यात बाळाला विकिची आत्या येताना दिसली. ती विकीच्या घराशेजारिच राहायची.
"भाभी, विकी कुठे आहे हो. घराला कुलुप आहे त्यांच्या"
बाळाने आत्याला अडवून विचारले.
"तो तर गेला बेटा. दुपारिच गेला. बोलला नाही का तुला. तो आता गावी शिकणार आहे. धुळयाला" एवढे बोलून ती निघुन गेली.
बाळा तिथेच उभा होता. वारा आपली धूळ वाहून नेत होता. रस्तादेखिल सामसूम होता. तो भानावर आला. एकदा त्याने त्या दरवाज्याकड़े पाहिले. दरवाजा तसाच होता आणि कुलुपदेखिल. फ़क्त कुणीतरी ते कुलुप उघडून आत जाण्याची शक्यता नाहिशी झाली होती. बाळाच्या मनात मात्र विचारांचे ढग दाटून आले.
"तो बोलला पण नाही जाताना. तो जाणार हे तर त्याला आधीच माहीती होते. आज घरी आला तो . इतक्या दिवसांपासून कुठे होता? परवा समर्थांच्या मंदिरात दिसला होता त्याच्या आत्यासोबत. तेव्हा सांगीतले असते की मी जाणार आहे म्हणून. मैदानात आला असता भेटायला. आईने तर त्याला सांगीतले होते की मी मैदानात आहे म्हणून. आला असता तर काय आम्ही खाल्ले असते का त्याला? आता कधी भेटणार तो परत? मी इतक्या घाईने आलो त्याला भेटायला पण हा तर निघुन गेला. मला न सांगता, निरोप न घेता. जाउदे मी नसेल त्यांच्यासाठी कुणीही…घरी येऊनसुद्धा भेटला नाही....मी त्याच्यासोबत पुस्तक वाचायला कितिदा गेलो, दूसर कुणीही सोबत नसताना. बोलत नसताना देखील मी त्याला शिकवणीत पेन्सिल दिली. एकत्र गणितं सोडवली आहेत, फिरलो, गप्पा मारल्या, खेळलो, प्रयोग केले पण तरी हा असाच गेला, एकदाही न सांगता. जस काही मी त्याचा कुनिच नव्हतो"
विचार करता करता प्रतिकचे घर आले. तो थांबला. प्रतिक एकटा होता.
"कुठे गेला होतास रे" प्रतिकने विचारले.
"विकीच्या घरी"
"बोलतोस का त्याच्याशी?"
"तो गेला रे. लोनावळा सोडून गावी गेला. नेहमिसाठी" बाळा गहिवरलेल्या आवाजात म्हणाला.
"कधी गेला??" प्रतिकने विचारले.
"आजच गेला. आपल्याला न सांगता. अस कस कुणी अचानक जात रे?"
"आपण बोलत नव्हतो ना म्हणून कदाचित. थोड़ा गर्व बाजूला ठेवून भेटायला पाहिजे होत त्याने. चल जाउदे. माझ जेवण बाकी आहे. मी जेवण करून येतो तुझ्या घरी मग जाऊ आपण खेळायला"
प्रतिक गेला आणि बाळा पण निघाला. प्रश्नांची जागा आता रागाने घेतली.
"जाउदे गेला तर. मी जरा जास्तच महत्व देत होतो त्याला. गर्विष्ठ कुठला. थोड़ा हुशार होता तरी किती गर्व. हा जर कधी परत आला तरी बोलणार नाही यांच्याशी. मला काय मित्र नाहीत? हां एकच थोडिच आहे. माझे सगळे मित्र इथेच आहेत. याची गरजदेखिल नाही. नको येउस परत. ही गोष्ट मी सहजासहजी विसरणार नाही. नेहमी लक्षात ठेविन. इतकी वर्ष सोबत होतो पण याला त्याचे काहीच वाटले नाही. मलादेखिल पर्वा नाहीये......."
बाळा घरी आला आणि पलंगावर पडल्या पडल्या झोपि गेला..........................…............................…..........
बाळा स्कूटीवरुन येत होता. तो रॉकेल घ्यायला गेला होता. तो घराखाली आला. प्रतिक आणि निखिल होते तिथे आणि त्यांच्यासोबत अजुन कुणीतरी होत. पण तो पाठमोरी उभा होता.
"तो बघ बाळा आला" प्रतिकने त्या मुलाला महंटले.
त्या मुलाने मागे वळून पाहिले. बाळाने त्याला लगेच ओळखले. तीन वर्षात काही लक्षणीय बदल त्याच्यात झाला नव्हता. तो निश्चितच विकी होता. तो हसत होता. बाळाला क्षणिक आनंद झाला आणि लगेच त्याला आठवले की हाच आपल्याला सोडून गेला होता. न सांगता. वेळोवेळी हा सोबत असावा ही अपेक्षा होती. त्याची गरज होती पण हा मात्र आपल्यासाठी कधीच नव्हता. बाळाला त्याचे तोंड देखील पाहन्याची इच्छा नव्हती.
"रॉकेल देऊन आलो" असे प्रतिकला बोलून तो घरी गेला. विकि मात्र हा माझ्याशी का बोलला नाही याचा विचार करत होता. घरी आल्यावर आई त्याला म्हणाली
"बाळा अरे जेवुन घे रे. भूक नाही का लागली तुला?"
"जेवुनच तर गेलो होतो ना रॉकेल आणायला?"
"कधी जेवलास? विकिकड़े गेला होतास ना?"
"विकिकड़े?? जेवण झाले आई....."
"उठ रे बाबा...किती झोपयचे.... उठ आणि घे जेवुन. मला काम पडली आहेत" बाळाची आई त्याला उठवत होती. बाळाला स्वप्न पडले होते. तो उठला आणि निमुटपने ताटावर बसला.
"भेटला का विकी?" आईने विचारले.
पोळीचा तुकडा तोडताना बाळा हळूच पुटपुटला
"कोण विकी??"
….....…..............................................
....

कथासाहित्यिकसमाजजीवनमानkathaa

प्रतिक्रिया

कथा चांगली आहे. विनाकारण झालेले क्षुल्लक गैरसमज परस्परांच्या नात्यात किती मोठी दरी निर्माण करू शकतात हे छान उलगडून दाखवलंय.

RDK's picture

20 Sep 2017 - 2:34 pm | RDK

धन्यवाद

पैसा's picture

20 Sep 2017 - 2:26 pm | पैसा

कथा आवडली

RDK's picture

20 Sep 2017 - 2:34 pm | RDK

धन्यवाद