नमस्कार मंडळी,
या चतुर्थीपासून उभ्या महाराष्ट्रात वातावरण कसे गणेशमय झालाय ना, आता कालपासून त्यात भर पडलीय गौरींची. पण तुम्ही एक गोष्ट अनुभवलीत का? आपला लाडका बाप्पा महाराष्ट्रभर घरोघरी येत नसला तरी त्याचे लाड आणि साजशृंगार मगाराष्ट्राभर जवळ जवळ जवळ जवळ सारखेच केले जातात. पण माहेरवाशीण बनून येणारी गौरीचं तसं नाहीये, ती घरोघरी येते आणि तिचं कोडकौतुक मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. तिचं स्वरूपही वेगवेगळं असतं. म्हणून म्हटलं चला तुम्हाला आमच्या साध्या भोळ्या गौराईची ओळख करून द्यावी.
तर आमच्या गौरीच्या आगमनाची तयारी श्रावण संपतानाच चालू केली जाते. सुरुवात होते घमेलंभर तांबडमातीपासून. त्यानंतर गौरीची फुलं हेरणंही आलंच. आता गौरीची फुलं म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला. तर आमच्याकडे गौर हि मातीच्या मूर्तीच्या स्वरूपात किंवा मुखवट्याच्या स्वरूपात नसून ती असते पानाफुलांची, एकदम नैसर्गिक आपल्या आधुनिक भाषेत म्हणायचं तर अगदी इको फ्रेंडली हो.
या गौरीचं मुख्य फुल आहे अग्निशिखा किंवा आगलावी, नावाप्रमाणेच अग्नीचे रंग असलेली हि फुले रानात फुलतात. दुसरे फुल म्हणजे रान हळद. याच्या फुलांचा गुच्छ हलक्या जांभळ्या/गुलाबी रंगाचा असतो. तिसरे फुल कुर्डुचे, हि फुलेखरेतर तुर्यांसारखी दिसतात आणि रानोमाळी भरपूर उगवतात. आमच्याकडे सर्वपित्री अमावास्येलाही याचा उपयोग दाराला बांधल्या जाणाऱ्या तोरणांमध्ये केला जातो. याव्यतिरिक्त तेरड्याच्या फुलांचाही समावेश असतोच.
अश्या रीतीने फुले हेरून झाली कि ती गौरी स्थापनेच्या दिवशी तोडून आणली जातात. पण आता जंगल कमी झाल्याने हि फुलं मिलन जरा कठीण झालंय. आपण हेरून ठेवलेली फुले दुसरा कोणीतरी चोरून नेण्याची शक्यता जास्त. त्यामुळे चार पाच दिवस आधीच ती तोडून आणली जातात आणि आवारात किंवा तुळशीशेजारी ठेवली जातात. आदिवासीही यांची मोठ्याप्रमाणावर तोडणी करून विकतात.
विकण्यास ठेवलेली गौर. लाल पिवळी अग्निशिखा, छोटे तुरे कुर्डुचे आणि मध्ये असलेला गुच्छ रान हळदीचा.
तर अशी हि आमची गौर स्थापनेच्या दिवशी घरात प्रवेश करती होते मुलाऱ्याबरोबर. हा मुलारी असतो घरातला मुलगा, जो आपल्या बहिणीला-गौरीला माहेरी घेऊन येतो. गौरींसह त्याचेही हात पाय दुधाने धुवून मग गौर ओटीच्या/व्हरांड्याच्या उंबरा ओलांडते. तिथे तिची हळद-कुंकू वाहून साग्रसंगीत पूजा केली जाते, आणि गौरीला एका सुपात ठेवून घरभर फिरवले जाते. गौर घरभर फिरत असताना तिच्या पावलांचे ठसे जमिनीवर आधीच आणलेल्या तांबडमातीचे पट्टे ओढून त्यावर ठसवले जातात. हे पावलांचे ठसे उमटण्याची पद्धतही अगदी सोपी आहे. तांदळाचं पीठ पाण्यात कालवून त्यात वळलेल्या मुठीचा करंगळीकडचा भाग बुडवून त्याचे ठसे पडायचे, हे ठसे तळपायाच्या ठश्यासारखे दिसतात. त्यावर पाची बोटांची टोके टेकवली कि झाली पायाची बोटे. अशी एक एक पाऊल करत गौर घरातली प्रत्येक भिंत, वठणातला(हॉल) मुख्य खांब, प्रत्येक दार, जमिनीतील छोटं उखळ, माळ्यावर जाण्यासाठी असलेली शिडी(आमच्याकडे हिला निसन म्हणतात), धान्याचे कणगे तसेच चूल/आताचे किचनचे ओटे पादाक्रांत करते आणि मग घरातल्याच सोयीस्कर ठिकाणी तांदळांनी भरलेल्या तांब्या/पितळेच्या कळशीत आसनस्थ होते. तिथे मग तिला गाजरे, वेणी आणि इतर साजशृंगार केले जातात.
गौरीची पावले...
हे रिंगण उखळीसाठी. जेव्हा टाईल्स नसायच्या तेव्हा दगडात छोटीशी खळगी कोरलेली असायकजी जमिनीत पुरलेली. सारवणाबरोबर तीही इतिहास जमा झाली.
हि आमची गौराबाई. चार-पाच दिवसांपूर्वीच तोडल्यामुळे काहीशी कोमेजून गेलीय. मला आजही आठवते लहानपणी सगळ्यांकडे कशा भरगच्च आणि फुलांनी डवरलेल्या गौरी असायच्यात.
गौरीच्या मागे तिची अशी कागदाची प्रतिमा चिकटवली जाते(हा फोटो मावशीकडचा).
पुढचे अडीच दिवस या माहेरवाशिणीचे यथेच्छ लाड केले जातात, दूधभात, दहीभात, मताची भाजी, अळूच्या देठांची भाजी आणि इतर रानभाज्यांची थाट असतो. आणि हो, अळूची पानं, दही, गूळ आणि तांदळाच्या पिठाचे पातवडे राहिलेच कि. या पातवड्यांशिवाय आमची गौर परत जाऊ शक्यच नाही म्हणा ना. आणखी एक गोष्ट, आमच्याकडे काही घरी विसर्जनाच्या आदल्या दिवशी सण केला जातो. म्हणजे गौरीसाठी खास ओले किंवा सुकवलेले मासे नाहीतर गावठी कोंबडं असा खास बेत असतो. स्वतः माझ्या घरी गटारी अमावास्येपासून वर्ज्य असलेला मांसाहार या दिवशी पुन्हा सुरु होतो. गौर घरी असताना दोन्ही रात्री आधी मुली पारंपरिक गाणी म्हणत जागून काढत असत, पण आता तेवढा वेळ कुणी काढत नाही.
पळसाच्या पानात घालून वाफवलेले पातवड.
वड्या पाडून तेलावर परतलेले पातवड. काहीशी आंबटगोड चव असलेले हे पातवड गुळाच्या पाण्याबरोबर(आवडीनुसार दूध/चहाबरोबरही) खाल्ले जातात.
तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन केलं जातं पण दुसऱ्या रात्रीच गौर आपल्या घरातून गेलेली असते असा काही जणांचा समज. काही जण दुसऱ्या रात्री गौरीसमोर परातीत कणिक किंवा काजळीनं काळं केलेलं ताट ठेवतात. निघून जाताना गौरीच्या पावलांचे ठसे त्यावर उमटतात असे म्हणतात.
तिसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर गौरीच्या पाठवणीची लगबग सुरु होते. तिला स्वच्छ कपड्यात गुंडाळून ठेवली जाते, प्रसादासाठी खास दही, काकडी घातलेल्या तांदळाच्या पिठाची पळसाच्या पानात पसरवून भाजलेली पानगी काढली जातात. त्याबरोबर गौरीला वाहिलेली फळेही असतात. संध्याकाळी घरातील मुले आणि स्त्रिया गौरीला घेऊन आपल्या शेतात जातात आणि शेतातच विसर्जित करतात. याने गौर आपल्यात राहते आणि पीकही चांगले येते अशी श्रद्धा. घरी आल्यानंतरही गौर विराजित असलेली काळाशी/हंडा लगेच काढून ठेवला जात नाही. सगळ्यांच्या लाडक्या अश्या गौरीची आठवण म्हणून अजून काही दिवस त्याला दिवा बत्ती केली जाते. अशाने त्यात ठेवलेले तांदूळ वाढतात हा अजून एक समज.
तर अशी असते आमची गौर, साधी भोळी. अर्थात तीही काहीशी बदललीय. शेणाने सारवलेली जमीन आता इतिहास जमा झालीय हि वस्तुस्थिती तिनेही स्वीकारलीय. कारवीच्या कुडाच्या जागी आलेल्या भिंतींचा रंग खराब होऊ नये म्हणून आता मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला आपल्या हाताचे ठसे उमटवण्याचा हट्ट ती धरीत नाही. पण अजूनही आमच्याकडच्या स्वयंपाकघरात हळूच घुसखोरी केलेल्या आळुवडीला तिने पातवड्यांची जागा नाही दिलेली. कदाचित तिचा साधेपणा तिला अजूनही सोडवेना झालाय. पण म्हणूनच ती जास्त आपलीशी वाटतेय.
-कल्पेश गावळे.
नारे, तालुका वाडा, जि. पालघर.
प्रतिक्रिया
30 Aug 2017 - 8:39 pm | डॉ श्रीहास
मस्त वाटलं ..... महलक्ष्मी म्हणतात आमच्यकडे (मराठवाड्यात).... तुमच्याकडे यायचच आहे राव
30 Aug 2017 - 9:03 pm | प्रशांत
विदर्भात सुद्धा महालक्ष्मी म्हणतात
30 Aug 2017 - 8:41 pm | मोदक
ओळख आवडली.. अशीच बाकीच्या मिपाकरांनी आपापल्या गौराईंची ओळख करून द्यावी म्हणजे अनेक नव्या पद्धती कळतील..!!
30 Aug 2017 - 9:00 pm | धडपड्या
सुंदर लिखाण...
गौरी-गणपती म्हणजे धमाल दिवस असतात...
आमच्या गावीही असंच काहीसे कोड कौतुक केलं जायचं गौराईचं..
पण आता लोकांना "वेळ नाही" हे फार मोठं कारण सापडलंय सोईस्कर बदल करायला...
पण तुम्ही अजूनही आवर्जून एवढं सगळं करता, हे पाहून आनंद झाला...
आता वाड्यावर एक चक्कर नक्कीच...
30 Aug 2017 - 9:32 pm | पैसा
फार छान! फोटो आवडले.
आमच्या आईकडे पाच खड्यांच्या गौरी असतात. ज्येष्ठागौरी आणि कनिष्ठागौरी. त्या विहिरीच्या पाळीवरून आणतात आणि विहिरीत विसर्जन करतात. नदी असेल तिथे नदीकाढच्या आणतात. घावन घाटल्याचा नैवेद्य असतो. बाकीदूध पाणी पायावर घालणे,पावले काढणे, घर दाखवणे सगळे तसेच. घर दाखवताना घरातली मोठी स्री इथे काय आहे? इथे कपाट आहे. असं सांगत जाते आणि गौर हातात घेतलेली माहेरवाशीण 'उदंड असो" म्हणत जाते. परत जाताना दहीभाताची शिदोरी देतात.
बर्याच लोकांकडचे गणपती गौरीबरोबर विसर्जन करतात. गणपती आपल्या मामाकडे रहायला येतो. मग त्याला न्यायला त्याची आई येते आणि त्याला सोबत घेऊन जाते असा समज आहे.
30 Aug 2017 - 11:28 pm | इरसाल कार्टं
थोड्याफार फरकाने सारखच आहे म्हणायचं.
30 Aug 2017 - 10:08 pm | Nitin Palkar
अतिशय सुंदर लेखन! खूपच आवडलं!!
30 Aug 2017 - 10:17 pm | पुंबा
वाह!! घरच्या माहेरवाशिनींच्या प्रमाणे गौरायांची सरबराई केली जाते. प्रचि सर्वच सुंदर. आमच्याकडे मुखवट्यांच्या उभ्या महालक्ष्म्या असतात. त्यांचे कोडकौतूक लहानथोरांपासून सारे करतात. आज महालक्ष्म्या जेवल्या, पण आईच इतकी तृप्त झालीये! मला बहिण नाही. त्यामुळे वर्षातून एकदा का होईना, घरी आलेल्या मुलीचे लाड केल्याचा आनंद मिळतो तिला.
30 Aug 2017 - 10:40 pm | पुंबा
30 Aug 2017 - 11:13 pm | पैसा
फोटोला पब्लिक अॅक्सेस द्या.
30 Aug 2017 - 10:44 pm | pj
माझ्या सासरी माहेरी ही ५ खड्याच्या गौरी असतात. मला हौस म्हणून आणि मुलाला आपले सण कळावेत म्हणून भारताबाहेर ही मी गौरी - गणपती बसवते. पण मला मुलगी नाही आणि शाळेच्या दिवशी कोण कुमारिका येणार गौरी आणायला म्हणून माझा मुलगाच नेहमी गौरी आणतो. तुमच्या लेखातला मुलारी चा उल्लेख वाचून कळले की मी अगदीच वेगळे काही करत नाही :) खूप छान वाटले फुलापानांच्या गौरी बघून.
31 Aug 2017 - 1:57 am | पारुबाई
सुरेख आहे तुमचा लेख.
प्रतिसाद म्हणून माझाच एक लेख रिपोस्ट करते आहे.
http://www.misalpav.com/node/14383
https://manimanasi.wordpress.com/2010/09/13/ इथे फोटो दिसेल.
31 Aug 2017 - 1:49 pm | इरसाल कार्टं
छान वाटलं वाचून
31 Aug 2017 - 11:05 am | संजय पाटिल
सुंदर ओळख गौराईची..
31 Aug 2017 - 3:49 pm | केडी
कल्पेश, लेख मस्त जमलाय....
31 Aug 2017 - 4:06 pm | विशुमित
छान लेख आणि फोटो..!!
31 Aug 2017 - 4:13 pm | ज्योति अळवणी
खूप आवडली तुमची गौराई
31 Aug 2017 - 4:31 pm | स्वाती दिनेश
तुमची गौराई आवडली.
स्वाती
2 Sep 2017 - 12:10 am | पर्णिका
सुरेख लेख... गौराई फार्फार आवडली. :ड