बऱ्याच दिवसांपासून लिहायचे होते, पण कामामुळं राहून जात होतं...
थोडी रोचक माहिती............
काही दिवसांपूर्वी पुन्हा दक्षिण भारत फिरायचा योग आला, त्यामध्ये अनेक मंदिरात गेलो, अर्थातच सर्वात जास्त मंदिरं विष्णूची किंवा त्याच्या विविध अवतारांची होती उदा: राम, कृष्ण, नृसिंह, केशव इत्यादी. पण प्रत्येक ठिकाणी वेगळी मुर्ती, वेगळी रचना, नाव वेगळं त्याचे सहचारीही वेगळे होते. एव्हढाच काय आपण विष्णूच्या विविध मूर्ती, चित्रं आणि ग्राफिक बघतो त्यात प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं विष्णूची रूपं दाखवतो, म्हणून त्यावर अभ्यास करायचा ठरवलं आणि त्यातून काही रोचक माहिती समोर आली. ती आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे.
(मागील काही वर्षांत भेट दिलेली ठिकाणे - हल्लीबेड-बेल्लूर, बेंगळुरू, श्रीरंगपट्टणम, म्हैसूर, तिरुपती, कांचीपुरम, महाबलीपूरम, हंपी- बदामी, पट्टदडकल- ऐहोळे, रामेश्वरम, मदुरै...इत्यादी )
विष्णु सहस्रनामस्तोत्रांमधे उपलब्ध वर्णनं काहीस असं आहे
भूः पादौ यस्य नाभिर्वियदसुरनिलश्चन्द्र सूर्यौ च नेत्रे
कर्णावाशाः शिरो द्यौर्मुखमपि दहनो यस्य वास्तेयमब्धिः ।
अन्तःस्थं यस्य विश्वं सुरनरखगगोभोगिगन्धर्वदैत्यैः
चित्रं रंरम्यते तं त्रिभुवन वपुषं विष्णुमीशं नमामि ॥
सशङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं
सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणम् ।
सहारवक्षःस्थलशोभिकौस्तुभं
नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम् ||
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥
श्री विष्णूची बोधचिन्हे आणि प्रतिकं याविषयीची थोडक्यात माहिती...
(Vishnu iconography and Symbolisms)
विष्णुमूर्ती तीन पद्धतीनं दाखवण्यात येते
१) बैठी (योगमुद्रा / आसनस्थ ) - श्वेत कमळावर / शेषनागावर / गरुडावर
२) उभारलेली (स्थानस्थ) - कमळावर
३) झोपलेली (शयन / योगनिद्रा) – शेषनागावर
वर्ण (colour) -
अगाध, विराट आवि सर्व-व्यापी रूप दर्शवण्यासाठी, विष्णू सदैव, मेघवर्ण/ कृष्ण (काळा)/ गडद निळा अशा रंगामध्ये दर्शविला जातो. सहचारी लक्ष्मी – हिरण्यवर्ण (तप्त कांचन) आणि पद्मावती - पीतवर्ण (कदंब / बाभळीच्या फुलांचा रंग) याप्रमाणे दर्शवतात. गरुड (सुपर्ण) - श्वेतवर्ण / पीतवर्ण, हनुमंत - हरित आणि शेषनाग – गडद काळ्यारंगाने दाखवला जातो. शंख - पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शुभ्र, चक्र- सूर्यप्रभा, गदा - गडद रंगाने तर कमळ प्रफुल्लीत गुलाबी रंगाने दाखवतात.
वस्त्र आणि आभूषण (attire and ornaments)-
विष्णूच्या ललाटावर कस्तुरी तिलक, वक्षस्थळी पहाटेच्या सूर्यकिरणांप्रमाणे चमकणारा कौस्तुभमणी, गळ्यात वैजयंती (कमळांच्या फुलांची) माळ, किरीट - शिवलिंग आकाराचे, मत्य-कुंडलं, पीतवस्त्र / पितांबर, कटिबंध, नागचे बाजूबंध दाखवले जातात.
सहचारी (consort) –
लक्ष्मी (श्रीदेवी) - धन आणि समृद्धीची देवता - समुद्र मंथनातून उत्पन्न झाली.
श्री (लक्ष्मी) - वत्स (प्रिय) असे चिन्ह (तीन पानांच्या स्वरूपात) मुद्रित आहे. श्रीवत्सलाञ्छान - विष्णूच्या योग-निद्रेत हि जागृती आहे. आता काहीजण लक्ष्मीची मुद्राच अंकित करतात. हे चिन्ह पुढे बौद्ध आणि जैन धर्मातही वापरले गेले आहे.
पद्मावती (भूदेवी) - लक्ष्मीचे स्वरूप / अवतार म्हणून मान्यता. वराह अवतारात पृथ्वीला दैत्यांपासून सोडवले आणि विष्णू भूपाल / भूपती झाला.
कृष्णावतारात - सत्यभामा, वेंकटेशासह - पदमावती, रामावतारात - वेदवती. (समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले.विष्णु पत्नी नमस्तुभ्यं,पद स्पर्शं क्षमस्व मे)
गरुड - वाहन / गरुडारूढ / गरुडध्वज - काश्यप आणि विनाता याचा मुलगा , आपल्या आईला त्याचा सावत्र आईच्या कपटातुन मुक्त करण्याकरिता
इंद्राला परास्त करून अमृत कलश मिळवला. त्याची मातृभक्ती, पराक्रम आणि अमृताची अनासक्ती पाहून विष्णूने वाहन म्हणून स्वीकारले.
हनुमंत/मारुती – सेवक आणि वाहन (कपिलध्वज) - रामावतारातील रामाचा प्रिय भक्त, रावणाचा वध हनुमंताच्या खांद्यावर बसून केला.
जय – विजय – द्वारपाल
शंख – पाञ्चजन्य (conch)
पाञ्चजन्य /शंखासूर हा प्रभास नावाच्या समुद्र तळाशी शंखामध्ये राहणार समुद्री-दानव, विष्णूने कृष्णावतार मध्ये यांस मारले. पाञ्चजन्यने (शंखासुराने) सांदिपनी ऋषींच्या मुलाचे अपहरण केले आणि शंखामध्ये बंदी केले, ऋषींनी गुरुदक्षिणेमध्ये कृष्णाकडे मुलाला सोडवण्याचीही मागणी केली. कृष्णाने पाञ्चजन्य दैत्याला ठार करून ऋषींच्या मुलाला सोडवले आणि दैत्याचा विनंतीवरून कृष्णाने हा शंख पाञ्चजन्य दैत्याच्याच नावानं धारण केला.
चक्र – सुदर्शन (wheel)
देवशिल्पी विश्वकर्माची मुलगी संजना हिचा विवाह सूर्याशी झाला, पण सूर्याच्या तेजामुळे तिला सूर्याच्या जवळ जातयेत नव्हते. हे ओळखून विश्वकर्माने सूर्याची आभा / तेज कमी केले आणि उरलेल्या सूर्य तेजा पासून त्रिशूल आणि चक्र बनवले आणि शंकराला अर्पण केले. विष्णूच्या भक्तीवर प्रसन्न होऊन पुढे शंकराने ते विष्णूला दिले पण विष्णूने हे चक्र एका शिवभक्त दैत्यावर चालवल्यामुळे ते परत शिवाकडे गेले. हेच चक्र शंकराने (धनुष्य आणि परशुसह) परशुरामाला दिले आणि कृष्णावतारात गोमंतक प्रदेशात जाऊन कृष्णाने ते मिळवले.
गदा – कौमुदी (mace)
शंकराच्या आशीर्वादाने उन्मत्त झालेल्या दैत्यांना परास्त करणे देवांना कठीण झाले होते. सर्व देव आणि मानवांच्या विनंतीवरून विष्णूने दानवांविरुद्ध युद्ध सुरू केले पण ते कोणत्याच आयुधाने मारणार नव्हते. विष्णूने ब्रह्मदेवाला सर्व विश्वाचा भार एका क्षणाकरिता त्याचा हातातील निल-कमळामध्ये ठेवण्यास सांगितले. विष्णूने दैत्यांवर नील-कामालाने वार केला होता पण वार डोक्यावर पडताच ब्रम्हदेव विश्वभारासह त्या फुलावर विराजमान झाले आणि दैत्य मारले गेले. त्या निल कमळाच्या कळी वरूनच या गदेस कौमुदी असे संबोधतात.
कौस्तुभ मणी - कालिया नागाने परास्त झाल्यावर हा मणी कृष्णाला दिला आणि जीवदान मागितले. समुद्रामध्ये होणाऱ्या गरुडाच्या त्रासातून मुक्त होण्याकरिता
कृष्णाचे / विष्णूचे पदचिन्ह अंकित केले आणि यमुनेतून (कालिदींतून) परत समुद्रात जाण्यास सांगितले.
अष्टभुजा विष्णूच्या हातात - शंख, चक्र, खङग, धनुष्य, बाण आणि खेट (ढाल) आहे. गदा, पद्म न-दाखवता हात वरद आणि अभय मुद्रेत दाखवतात.
पद्म – कमळ
देवांची / देवींची तुलना कमळाच्या फुलांशी केलेली आहे
करकमल, चरणकमल / पादपद्म / चरणारविंद, मुखकमल, पद्मालंकृत, पद्मासनस्थ, पद्मनाभ, राजीवलोचन,
धनुष्य – शिंगांपासून बनवलेले शांर्ङ्ग / सारंग (सारंगपाणी)
खड्ग - नंदक
विष्णूची अनेक (सहस्त्र) नावं आहेत, त्यापैकी २४ नावे महत्वाची आहे आणि इतर सर्व वर्णनात्मक / त्याची उपरूपं आहेत. त्या नावप्रमाणे आयुध धारण करण्याची पद्धत (अगम शास्त्रा नुसार) वेग-वेगळी आहे. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये हे स्पष्ट केले आहे, प्रत्येक महिन्यांचीही एक देवता आहे तीही यात दाखवली आहे
नाव वरील खालचा
हात उजवा - डावा उजवा - डावा
केशव शंख चक्र गदा पद्म मार्गशीर्ष
नारायण पद्म गदा चक्र शंख पौष
माधव चक्र शंख पद्म गदा माघ
गोविंद गदा पद्म शंख चक्र फाल्गुन
विष्णू पद्म शंख चक्र गदा चैत्र
मधुसूदन शंख पद्म गदा चक्र वैशाख
त्रिविक्रम गदा चक्र शंख चक्र जेष्ठ
वामन चक्र गदा पद्म शंख आषाढ
श्रीधर चक्र गदा शंख पद्म श्रावण
हृषीकेश चक्र पद्म शंख गदा भाद्रपद
पद्मनाभ पद्म चक्र गदा शंख अश्विन
दामोदर शंख गदा चक्र पद्म कार्तिक
सङ्कर्षण शंख पद्म चक्र गदा -
वासुदेव शंख चक्र पद्म गदा -
प्रद्युम्न शंख गदा पद्म गदा -
अनिरुद्ध गदा शंख पद्म चक्र -
पुरुषोत्तम पद्म शंख गदा चक्र -
अधोक्षज गदा शंख चक्र पद्म -
नरसिंह पद्म गदा शंख चक्र -
अच्युत पद्म चक्र शंख गदा -
जनार्दन चक्र शंख गदा पद्म -
उपेंद्र गदा चक्र पद्म शंख -
हरी पद्म चक्र गदा शंख -
कृष्ण गदा पद्म चक्र शंख -
याच प्रमाणे विष्णूची नावेही प्रसंगानुसार ध्यावयाची आहेत.
औषधे चिंतये विष्णुम(1),भोजने च जनार्धनम(2), शयने पद्मनाभं च(3), विवाहे च प्रजापतिम(4), युद्धे चक्रधरम देवं(5), प्रवासे च त्रिविक्रमं(6), नारायणं तनु त्यागे(7), श्रीधरं प्रिय संगमे(8), दुःस्वप्ने स्मर गोविन्दम(9),संकटे मधुसूधनम(10), कानने नारासिम्हम च(11),पावके जलाशयिनाम(12), जलमध्ये वराहम च(13), पर्वते रघु नन्दनं(14), गमने वामनं चैव(15), सर्व कार्येशु माधवं(16). षोडशैतानी नमानी प्रातरुत्थाय यह पठेत सर्वपापा विर्निमुक्तो विष्णुलोके महीयते.
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् सर्व देव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति |
ज्या प्रमाणे आकाशातून पडणारे पाणी शेवटी (वेग-वेगळ्या मार्गाने) समुद्रालाच जाऊन मिळते,
तसेच कुणत्याही देवाला केलेला नमस्कार हा केशवालाच (विष्णूलाच) पोहचतो.
प्रतिक्रिया
19 Aug 2017 - 1:04 pm | अत्रे
छान लेख.
चित्रे ब्लर दिसत आहेत, परत एकदा डकवा.
कशामुळे? दक्षिण भारतात विष्णूचे प्रस्थ जास्त आहे का?
20 Aug 2017 - 12:21 pm | जेम्स वांड
ब्रह्मा - निर्माता
विष्णु - प्रतिपालक
महेश - संहारक
साहजिकच जो 'प्रतिपाळ' करतो त्याचे गुणगान जास्तच असणार. त्याशिवाय, बऱ्याच ठिकाणी (आता नेमका संदर्भ आठवत नाहीये) राजा हा भूमिपाल प्रजाप्रतीपालक म्हणजेच विष्णूचा अवतार असावा असेही प्रोजेक्शन सापडतात, पुराणात असणारे संदर्भ, विष्णूच्या भक्तीत निस्सीम बुडालेले राजे राजकुमार (अंबरीष , प्रल्हाद वगैरे) भरपूर सापडतात. ह्या तर्काशिवाय, दक्षिणेत असलेल्या विष्णु मंदिरांचा राजाश्रय पाहता तीच बहुसंख्य असणे नवल वाटत नाही (तिरुपती बालाजी, पद्मनाभस्वामी इत्यादी)
20 Aug 2017 - 2:38 pm | पगला गजोधर
विट्ठल व विष्णु , साम्यस्थळ आहेत का ?
20 Aug 2017 - 3:08 pm | जेम्स वांड
विष्णू - कृष्ण अवतार - विठ्ठल अशी साधारण क्रोनोलॉजी असावी.
20 Aug 2017 - 5:48 pm | पगला गजोधर
भक्तीमधे शैव व वैष्णव ऐसे दोन वेगवेगळे पंथ निर्माण होण्या मागे काही इतिहास आहे का ? शंकर = खंडोबा असे महाराष्ट्रिकरन, तसेच विष्णु = विठ्ठल असे विष्णुचे महाराष्ट्रिकरन होण्यामागे काय कारणे, इतिहास आहे ?
19 Aug 2017 - 1:54 pm | पैसा
उत्तम माहितीपूर्ण लेख
19 Aug 2017 - 5:16 pm | दुर्गविहारी
उत्कॄष्ट लेख. आणखी अशीच माहिती असेल तर टाका मि.पा.वर
19 Aug 2017 - 7:10 pm | विवेकपटाईत
माहिती पूर्ण लेख , आवडला
20 Aug 2017 - 3:20 pm | मूकवाचक
+१
19 Aug 2017 - 10:09 pm | ज्योति अळवणी
आवडला
20 Aug 2017 - 6:53 am | शरद
प्रा. देगलुरकर यांची विष्णुमूर्तये नम: आणि शिवमूर्तये नम: नावाची पुस्तके शिल्पशास्त्रातील मूर्तिविज्ञानाबद्दल भरपूर माहिती देतात. भारतातील निरनिराळ्या ठिकाणच्या मंदिरातील मूर्तींबद्दल विष्णूची व शिवाची असे दोन भाग करून दिलेली माहिती वाचनीय आहे.,
श्री. सोमपुरिया, ख्यातनाम शिल्पकार, यांचे पुस्तकही मूर्ति बनवण्याकरिता काय नियम आहेत याची माहिती देते.
20 Aug 2017 - 12:27 pm | धर्मराजमुटके
लेख वाचताना 'दशावतारम" चित्रपटातील विष्णूप्रेमापायी शैव राजाशी पंगा घेणारा मंदिराचा पुजारी साकारणारा कमल हसन आठवला.
20 Aug 2017 - 3:07 pm | श्रीगुरुजी
उत्तम माहितीपूर्ण लेख!
21 Aug 2017 - 9:09 am | प्रचेतस
लेख छान पण काहीसा त्रोटक वाटला.
विष्णूच्या मूर्तीप्रकारांचा आढावा घ्यायचा राहून गेलाय असे वाटले. उदा.
अवतार मूर्ती (दशावतार, हयग्रीव इत्यादी),
संकीर्ण मूर्ती- अनंतशयन, पद्मनाभ इत्यादी,
संयुक्तमूर्ती - लक्ष्मी विष्णू, विष्णू, भुदेवी, श्रीदेवी, त्रिमुर्ती, बलराम, एकानंशा, श्रीकृष्ण
प्रासंगिक मूर्ती- गजेन्द्रमोक्ष, लक्ष्मी विष्णू विवाह
लिंग मूर्ती - शाळीग्राम इत्यादी.
अर्थात विषयाचा आवाकाच इतका मोठा असल्याने जितके लिहावे तितके कमीच.