कितीक वेळा पाठ फिरवली..खेळ-खेळले डाव रडीचे
वसूल केले आयुष्याने..कर्ज दिलेले दोन घडीचे!
खडू-फळा खुर्चीही नाही,अता न पाढे तसे राहिले
धूळ-जमा झाले डस्टर अन् छम-छमणारे बोल छडीचे!
मला न शिकता आली तेंव्हा,व्यवहाराची खरी कसोटी
नोट बनावट हाती आली,मोल कळाले मग दमडीचे!
अनवाणी फिरल्यावर कळली ऊब मातीच्या स्पर्शामधली
खुशाल बनवा मी मेल्यावर,पायताण माझ्या चमडीचे!
वारे फिरले लाख परंतू,ऋतू बदलणे जमले नाही
वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे!
—सत्यजित
प्रतिक्रिया
19 Apr 2017 - 4:55 am | एस
छान कविता.
19 Apr 2017 - 6:54 am | प्राची अश्विनी
फार सुंदर!
19 Apr 2017 - 9:30 am | पैसा
कविता आवडली!
19 Apr 2017 - 10:13 am | मोनाली
मस्तचं !
19 Apr 2017 - 10:43 am | पुंबा
सुंदर.. तुमच्या कवितांतली शब्दकळा अन प्रतिमा टवटवीत वाटतात.
19 Apr 2017 - 3:28 pm | सत्यजित...
धन्यवाद...एस,प्राची अश्वीनी,पैसा,मोनाली,सौरा विशेष!
19 Apr 2017 - 8:55 pm | अत्रुप्त आत्मा
20 Apr 2017 - 6:11 am | सत्यजित...
मनःपूर्वक धन्यवाद!