या जगात फक्त दोनच नशा आहेत, एक इश्क आणि दुसरी शराब. या ग़जलची खासियत अशी की शायर नशेतही आहे आणि तिच्या प्रेमातही आहे..... आणि कहर म्हणजे ती समोर आहे ! त्याला आता समजत नाहीये की आपल्याला चढलेला कैफ इश्काचाये की दारूचा. प्रेयसी नाराज होईल म्हणून तो तिला म्हणतो, की ही जी नशा आहे ती कालच्या दारूची आहे..... पण खरी नशा जी आहे ती तुझ्या प्रेमाची आहे ! त्याला दारूशी प्रतारणा करता येत नाही आणि प्रेयसीलाही समजावयाचं आहे कारण त्याची नशा दुहेरी आहे. दारुचा अंमल तर बेहोश करुन गेलायं पण तिच्या सहवासाची खुमारी त्याहून कमाल आहे.
तर अशा या जबरदस्त काव्यविषयावर ही ग़जल इतकी बेफाम उतरलीये की बोलता सोय नाही. फैझनं सुरुवातीलाच इतका जबरदस्त शेर पेश केला आहे की इंशाल्ला !
आपके वासते गुनाह सही,
हम पीए तो शबाब बनती है |
सौ ग़मोंको निचोड़नेके बाद,
एक क़तरा शराब बनती है |
तुझ्यासाठी दारु पिणं हा गुन्हा असेल पण मी जेव्हा दारु पितो तेव्हा ती सौंदर्य होते. माझ्यासाठी हे चराचर केवळ सौंदर्यमय बनतं..... आणि माझ्या शेकडो दु:खांनी जेव्हा हृदय पिळवटून निघतं, तेव्हा कुठे एक थेंब मदिरा बनते ! अशी शायरी सुचायला फैझच्या दिलका माहौल काय रंगारंग असेल याची आपण केवळ कल्पनाच करु जाणे. खरं तर दारु हा दु:खावर उतारा आहे पण फैझ म्हणतो, माझ्यासारखी शेकडो दु: ख भोगली की या जीवनाचा अर्थ कळतो, तेव्हा कुठे त्याची एक थेंब दारु बनते !
_______________________
इत्तेफा़कन शराब पीता हूं,
एहतियापन शराब पीता हूं,
जब खुशी मुझसे रूठ जाती है,
मैं इंतेक़ामन शराब पीता हूं |
मी केवळ अवचित दारु पितो कारण ती अनमोल आहे. जसा सखीच्या भेटीचा माहौल केवळ योगायोगानं जमतो तसा माझ्या पिण्याचा दौर क्वचितच जमून येतो. एहतियात या शब्दाच्या अनेक छटा आहेत. एका अर्थानं, दारु सुटावी म्हणून मी दारु पितो ! दुसरा अर्थ, जगण्यात सतर्कता राहावी म्हणून मी दारु पितो. आणि शेवटी, निरागसता यावी, आपल्या हातून गुन्हा घडू नये म्हणून मी दारु पितो ! जेव्हा सुख माझ्याकडे पाठ फिरवतं (तू माझ्याशी रुसवा धरतेस), तेव्हा त्या दु:खाचा बदला म्हणून मी दारु पितो !
__________________________
जख़्म सीनेकी क़सम खा लूंगा,
साथ जीनेकी क़सम खा लूंगा,
आज जी भरके पीला दे साक़ी,
आज जी भरके पीला दे साक़ी,
कलसे ना पीनेकी क़सम खा लूंगा !
माझी सगळी दु:ख बाजूला सारायचं वचन मी तुला देतो. तुझ्याशी जन्मभर संग राहाण्याचं वचन मी तुला देतो. फक्त आज तू मला दिलखुलास दारु दे.... उद्यापासनं दारु न पिण्याचं वचन मी तुला देतो !
___________________________
जामसे जाम तो टकराके पीयो,
जामसे जाम तो टकराके पीयो,
हमसे अपनी नज़र मिलाके पीयो,
देखनेंमे शराब तो पानी है,
इसमें पोशीदा ज़िंदागानी है |
चषकांशी चषक भिडवून प्या, तुझे डोळे इतके नशीले आहेत की तू माझ्या नजरेशी नजर मिळवून पी. तसं बघायला गेलं तर दारु केवळ पाणीच आहे... पण सगळ्या जिंदगीमधे जान आणण्याची किमया तिच्यात आहे !
____________________________
ज़ाहिदोंको दिखा दिखाके पीओ,
ज़ाहिदोंको दिखा दिखाके पीओ,
और उनके क़रीब लाके पीओ,
ज़िंदगीका सुरूर पाओगे,
पीके सारे ग़म भूल जाओगे |
विरक्त लोकांना दाखवत दाखवत दारु प्या ! त्यांना जीवनाची नशा कळावी म्हणून, त्यांच्या आणखी जवळ जाऊन दारु प्या. एकदा प्यायलात की तुम्हाला आयुष्याचा कैफ कळेल....आणि एका क्षणात तुमची सारी दु:खं विरुन जातील.
_________________________
हमसे हुए नियाज़ पीता हूं,
है कुछ ऐसाही राज़ पीता हूं,
बैठके सामने ख़ुदाके भी,
रोज़ पढकर नमाज़ पीता हूं |
हा शेर तर कमाल आहे ! नियाज़चे तीन अर्थ आहेत : कामना, प्रार्थना आणि परिचय.
फैझ ईश्वराला म्हणतो, माझ्याकडून तुझी प्रार्थना व्हावी म्हणून मी दारु पितो. हृदयात तुझी कामना जागावी म्हणून दारु पितो. इतकंच काय, तुझ्याशी भेट व्हावी म्हणून मी दारु पितो ! दारुची आणि माझी आपापसातली काही रहस्य आहेत त्या रहस्यांसाठी मी पितो. मी तुझ्यासमोर बसून दारु पितो..... रोज आधी नमाज़ पढतो आणि मग दारु पितो !
_________________________________
ज़िंदगानी शराब हो जाए,
ये जवानी शराब हो जाए,
सारी दुनिया हो मयक़दा यारों,
सारा पानी शराब हो जाए !
हे सारं आयुष्य एक कैफ होऊन जाऊ दे. हे तारुण्य एक उन्माद होऊन जाऊ दे. हे सारं जगच एक शराबखाना होऊन जाऊ दे.....या जगातलं सगळं पाणी दारु होऊन जाऊ दे ! ........मग जगाला दारुची खुमारी कळेल !
__________________________
मैं ख़ुदको खोके-पाके पीता हूं,
एक फ़िजासी बनाके पीता हूं,
लोग पानी मिलाके पीते है,
मैं तो नज़रे मिलाके पीता हूं |
फैझच्या शायरीची नज़ाकत कौतुकास्पद आहे. तो म्हणतो मी स्वतःला विसरतो, तेव्हा स्वतःला शोधायला पितो ! आणि जेव्हा स्वतःला भेटतो तेव्हा त्या आनंदात, पुन्हा स्वतःला विसरायला पितो !! लोक पाणी मिसळून दारु पितात, मी तुझ्याशी नजर मिळवून दारु पितो ! मग मी जाम बेहोश होतो, एकतर तुझ्या नजरेची नशा आणि त्यावर दारुची नशा ! आता मला कळेनासं होतं की मला हा कैफ नक्की कशाचाये. ही माझी कमालीची सृजनात्मकता कुठून आलीये ? हा नशा तुझा आहे का दारुचाये !
____________________
इथून पुढे आता खरी ग़जल सुरु होते ........................
कल जो पी थी अजी, ये तो उसका नशा है,
तुम्हारी क़सम आज पी ही नही |
आता पुन्हा एकदा ऐका :
प्रतिक्रिया
18 Apr 2017 - 3:18 pm | विनिता००२
सुरेख गजल!!
रसग्रहण चांगले जमलेय :)
18 Apr 2017 - 5:46 pm | पद्मावति
+१
फारच सुरेख आहे.
रसग्रहण सुद्धा छानच.
18 Apr 2017 - 7:50 pm | वरुण मोहिते
विवेचन . जिओ संक्षी
18 Apr 2017 - 9:05 pm | दशानन
आप तो मय कि खुशबू से ही बहक गये, थोडी पी होती तो गम ए दास्ता खुद्द बायां हो जाती, असो!
18 Apr 2017 - 10:16 pm | संजय क्षीरसागर
पीनेवाले पीनेवालोंको न पहेचाने,
इससे बडी तोहोमत क्या होगी ?
शायद तुमने आज पी ही नही,
वरना ऐसी तौहीन तो नही होगी |
27 Apr 2017 - 8:00 am | यशोधरा
सुरेख!
27 Apr 2017 - 10:26 am | संजय क्षीरसागर
शराबवर इतक्या रचना झाल्या आहेत पण ही गज़ल खरोखरी अप्रतिम आहे.