स्वारस्याची अभिव्यक्ती

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
11 Apr 2017 - 8:16 am

वामन आणि मी, आम्ही दोघेही बसमध्ये बसून तासभर कसा काढावा ह्याचा विचार करत असता, ही चर्चा सुरू झाली. आणि मग उत्तरोत्तर रंगतच गेली. तिचाच हा वृत्तांत. हा संवाद कमीअधिक प्रमाणात प्रत्यक्षात असाच घडलेला आहे.

मीः हे बघा, तुम्हाला ह्यात रुची आहे का?
वामनः छे! हे सगळे गणिताने भरलेले आहे. ह्यात आपल्याला काय ’इंटरेस्ट’ असणार?
मीः ’इंटरेस्ट’? म्हणजे तुम्हाला ’स्वारस्य’ म्हणायचाय काय?
वामनः हो. तेच ते.
मीः तुम्हाला ह्यात स्वारस्य नसेल, तर आपण अधिक सुरस गप्पा करू या! तुम्ही ’इंस्ट्रुमेंटेशन’ मध्ये एवढी वर्षे काम करताय. मग सांगा बरे ’इंस्ट्रुमेंटेशन’ ला मराठीत काय म्हणतात?
वामनः साधनशास्त्र.
मीः अहो ते म्हणजे तर ’रिसोर्स सायन्स’ झाले. आठवा ’ह्युमन रिसोर्स’.
वामनः मग ’अवजार’शास्त्र असेल.
मीः अवजार म्हणजे ’टूल’. आता मीच तुम्हाला सांगतो की ’इंस्ट्रुमेंट’ म्हणजे ’उपकरण’. तर मग ’इंस्ट्रुमेंटेशन’ ला मराठीत काय म्हणणार?
वामनः काय?
मीः ’उपकरणन’!
वामनः ’उपकर्णन’?
मीः छे हो. इथे कानाचा काय संबंध? ’उ प क र ण न !’
वामनः ’उ प क र ण न !’

मीः हो. आता बरोबर झालं! आता ह्या विषयात ’रिझोल्यूशन’ म्हणजे काय ते तुम्हाला नक्कीच माहीत असणार.
वामनः हो. ’रिझोल्यूशन’ म्हणजे ’ठराव’!
मीः छे! ही काय सहकारी गृहनिर्माण मंडळाची आमसभा आहे?
वामनः मग ’कमीत कमी मोजदाद’!
मीः ते तुम्ही ’लीस्ट काऊंट’ बद्दल बोलताय.
वामनः मग, काय म्हणतात?
मीः ’सापेक्षपृथकता’! सुट्टे पाहता येतील असे, लहानात लहान भाग मापण्याची क्षमता!!

वामनः हे किती अवघड नाव आहे. असले कठीण कठीण शब्द सुचवाल तर लोक कशाला मराठी शब्द वापरतील?
मीः छे. हे नाव कठीण नाहीच. वापरात नाही हे मात्र खरेच आहे. ’रिझोल्यूशन’ च्या ऐवजी नेहमी वापरू लागलात तर मुळीच कठिण वाटणार नाही.
वामनः कबूल पण मग नुसतीच ’पृथकता’ म्हणता येईल की! ती सापेक्ष असण्याची काय गरज आहे?
मीः समजा मी तुम्हाला ’सुट्टा पाहता येईल असा लहानात लहान भाग’, ’एक इंच आहे’ असे सांगितले तर त्यावरून ’सापेक्षपृथकता’ कळेल का?
वामनः हो. कळेल की.
मीः नाही. कळणार नाही. कारण प्रश्न हा उरेल की एकूण केवढ्या पल्ल्यात ’सुट्टा पाहता येईल असा लहानात लहान भाग’ आहे ’एक इंच’? फुटपट्टीवर मोजत असाल तर बारा इंचात एक इंच म्हणजे १/१२ = ८.३३% ही ’सापेक्षपृथकता’ होईल. मात्र एका मैलात एखादा इंच मोजत असाल तर मैलभरातील ६३,३६० इंचात एक इंच म्हणजे १/६३,३६० = ०.००१५७८ % ही ’सापेक्षपृथकता’ होईल. सुमारे पाच हजार पट फरक आहे ह्या ’सापेक्षपृथकतां’मध्ये. यासाठी पट्टीशी सापेक्ष असते म्हणून सापेक्ष. एरव्ही पृथकताच.

वामनः आपल्याला काय म्हणायचाय ते ’प्रिसाईझली’ सांगता यायला हवे. नाही का?
मीः हो. तर मग आता सांगा की ’प्रिसाईझली’ ला मराठीत काय म्हणाल?
वामनः ’एक्झाक्टली’!
मीः पण मराठीत काय म्हणाल ते विचारलय मी!
वामनः मराठीत ना? मराठीत ’एक्झाक्टली’ म्हणजे ’तंतोतंत’.
मीः हो. पण मग ’प्रिसाईझली’ म्हणजे काय?
वामनः ’प्रिसाईझली’ म्हणजे अचूक.
मीः छे! ’अचूक’ला इंग्रजीत ’अक्युरेट’ म्हणतात!
वामनः हो. हो. हा अर्थ मात्र तुम्ही ’नेमका’ सांगता आहात!
मीः बरोब्बर. ’प्रिसाईझली’ म्हणजे ’नेमका’च.
वामनः अरे वा! माझा अर्थ बरोबर निघाला की!

मीः अगदी बरोब्बर. आता तुम्हाला ’रिपिटेबल’ म्हणजेही माहीत असणारच!
वामनः हो तर. ’रिपिटेबल’ म्हणजे ’फ्रिक्वेंट’.
मीः नाही हो. एकतर तुम्ही इंग्रजीतला प्रतिशब्द देताय. दुसरे म्हणजे प्रतिशब्द म्हणूनही योग्य नाही. कारण ’फ्रिक्वेंट’ म्हणजे पुनरावर्ती.
वामनः मग तुम्हीच सांगा ’रिपिटेबल’ म्हणजे काय?
मीः ’रिपिटेबल’ म्हणजे पुन्हपुन्हा मोजले असता एकसारखेच भरणारे मापन!

वामनः तुम्ही काय म्हणत होतात? ’स्वारस्य’च ना! हे बघा ही कशाची जाहिरात आहे?
मीः ’स्वारस्याची अभिव्यक्ती’! अहो म्हणजे ’एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’.
वामनः अहो मग असं शुद्ध मराठीत सांगा की. ’स्वारस्याची अभिव्यक्ती’ म्हटल्यामुळे ही जाहिरातच कुणी वाचणार नाहीत मुळात.

मीः असे म्हणून इंग्रजीला ’वाघिणीचे दूध’ म्हणून गौरवणारे दिवस आता मागे पडलेत. पैसे खर्चुन ’स्वारस्याची अभिव्यक्ती’ विचारणार्‍या जाहिराती लोक करू लागलेत! सांगा जमाना बदला की नाही.
वामनः खरंच हो! असली जाहिरात मी तरी पाहिली नव्हती यापूर्वी कधी.

मीः एकदा का मराठीतच आचार, विचार आणि प्रचार करायचा हे नक्की केले की मग, आपणही मराठीत सगळे व्यवहार उत्तमरीत्या व्यक्त करू शकतोच की. आजच्या आपल्या बोलण्यातून हे स्पष्टच झालेले आहे.
वामनः खरेच हो. तासभर कसा भुर्रकन उडून गेला पत्तासुद्धा लागला नाही!

समाजजीवनमानतंत्रप्रकटनअनुभवविरंगुळा