नमस्कार मंडळी,
मागच्या भागात आपण पॅम्प्लेटस इन्सर्शन ह्या जाहीरात मोहीमेचा एक भाग पाह्यला. जाहीरातीसाठी वापरला जाणारा आद्य प्रकार म्हणजे नाम फलक. ह्या फलकांचे विविध प्रकार आपण ह्या भागात जाणून घेऊ. विषयाची व्याप्ती बरीच असलेने सुरुवातीपासूनचे फलक ते विद्युत आकाश फलक (हो, अशा फलकांना परवानगी देणार्या विभागाचे अधिकृत नाव हेच आहे) असे प्रकार क्रमश: पाहुयात. ह्यासंदर्भात काही सूचना, दुरुस्ती असल्यास स्वागत आहे. माझ्या अल्पज्ञानाने अन अनुभवाने जेवढी माहीती आहे ती मी लिहायचा प्रयत्न करत आहे.
................................
माणसाने व्यवसायास सुरुवात केली की जाहीरातीची सुरुवात झालीच. सुरुवातीची जाहीरात म्हणजे जो व्यवसाय करतो त्याची एक खूण म्हणून दर्शनीभागात व्यवसायाशी संबधीत वस्तू टांगणे. सुतार, चांभार, लोहार अशा आदिम व्यवसायांची जाहीरात अशीच व्हायची.
आजही त्याच पध्दतीस अनुसरणारा व्यवसाय म्हणजे पंक्चरवाले. टांगलेले अथवा ढिगाने ठेवलेले टायर पाहताच कडेला कोणी मल्लू एखाद्या ट्युबला टबबाथ घालत बसलेला असणारच.
तर ह्याअनुसार एखादी डिश, काटाचमचा, बाटली, बूट, घोड्याचा नाल अशा खुणा व्यवसायाला ओळख देऊ लागल्या.
दरवाज्यावर लावलेली पाटी फक्त समोरुन दिसते, बाजूने येणार्याला दिसण्यासाठी भिंतीला काटकोनात अशा वस्तू टांगल्या जात. फलकांचे हे खापर खापर पणजोबा आजच्या एलईडी न लेसर साईन्सच्या जमान्यातही आपले स्थान राखून आहेत. चला तर ह्या फलकांना कसे बनवले जाई, सध्या बनवले जाते ह्याचा आढावा घेऊ.
आद्य फलक : लाकडी फळकुटांवर कोरुन अथवा रंगाने लिहून टांगले जाई.
ह्यात सुधारणा झाली ती धातूच्या फ्रेम्स आणि पत्रा वापरुन फलक तयार करण्याची.
पत्र्यावर तैलरंगाने लिहिलेले फलक बरेच वर्ष चालत आणि बर्याच पिढ्या प्रचलित होते. अगदी २००० सालापर्यंत डिजिटल बॅनर सर्वत्र होईपर्यंत ऑईलपेंटने बोर्डस रंगवणारे पेंटर्स गल्लोगल्ली असत.
पेंटरलोक हे जास्त शिक्षित नसले तरी अक्षरे रेखायची एक विशिष्ट शैली आत्मसात केलेले असत. फलकावरची अक्षरे शक्यतो ठसठशीत फॉन्टस मध्ये असत. असे बरेचसे फॉन्टस डेकोरेटिव्ह पध्दतीने रंगवले जात, त्या अक्षरांना बीव्हेल एंबॉससारखा थ्रीडी इफेक्ट रंगाद्वारे दिला जाई, अक्षरांची सावली रंगाने दाखवून हा इफेक्ट अधिक उठावदार होई. अशा रंगकर्त्याचे शि़क्षण एखाद्या गुरुमार्फतच होई, हातात सफाई येईपर्यंत अक्षरे घोटणे, मधले सोपे रंगकाम करणे अशा इयत्ता पास करत शेवटी चित्रांचा भाग रिअलिस्टिक पध्दतीने जमायला लागला की शिष्य स्वतःचा रंगाचा डबा आणि ब्रश घेऊन स्वतःचे नाव झोकदार सहीत टाकायला मोकळा होई.
अक्षर आरेखनाच्या पध्दतीतही घराणी असत. पट्टीचा पेंटर बोर्डावरचे 'र' अथवा 'स' अक्षर पाहून पेंटर सांगलीचा कि कोल्हापूरचा हे ओळखू शके. चित्रात चांगला हात असलेले पेंटर्स शक्यतो अक्षरआरेखनात एवढे यशस्वी होत नाहीत अन त्याच्या उलट असते. चित्रे काढणार्या पेंटर्सना चित्रपटाचे जाहिरात होर्डिंग अन नाटक सिनेमाच्या पार्श्वभूमीचे पडदे हा एक उत्पन्नाचा हमखास मार्ग ९०-९५ सालापर्यंत होता. डिजिटल बोर्डांच्या सुळसुळाटाने हि जमात मात्र डायनासोरसप्रमाणे अदृष्य झाली.
धातूच्या पत्र्यावर टिकाऊ फलकाचा अजून एक मार्ग म्हणजे पोर्सलीनचे बोर्ड्स. पांढरा रंग सोबत हिरवा, लाल अथवा निळा रंम्ग लावलेले पोर्सलीनचे चमकदार फलक कित्येक वर्षे टिकत. ब्रिटिशांच्या काळातले नीलफलक किंवा पारशी बेकर्यांचे फलक कित्येकांना आठवत असतील. जुन्या कंपन्या, पेट्रोल पंपांचे फलक पोर्सलीन एनॅमलचे असत. अलिकडच्या काळात व्हिनाईल फलक येईपर्यंत निदान पोस्टाचे अन बँकाचे तरी फलक पोर्सलीन एनॅमलचे असत.
धातूची अथवा लाकडी अक्षरे बसवून केलेले फलक हे अत्यंत कारागीरीचे काम असे. ह्या फलकांचे आयुष्यही बरेच असे. धातूच्या अक्षरांना पॉलीश केले अन लाकडी अक्षरांना वेळोवेळी रंगकाम केले तर ५०-५० वर्षे हे फलक टिकत.
आता ह्या सर्व पध्दतींचा उपयोग व्यवसायांच्या फलकासोबत खांबावरचे फलक, दिशादर्शक फलक, नामफलक, वाहनांवरचे फलक आदि फलकांसाठी थोड्याफार फरकांने केला जाई. डिजिटल फ्लेक्सचे युग येईपर्यंत असेच फलक दिसत. अॅक्रेलिक लेटर्स अन निऑन साईन्स चा वापर डिजिटल येण्याआधीपासून होता पण विद्युतफलकांचा भाग आपण सोयीसाठी दुसर्या डिजिटल फलकांच्या भागात घेऊ.
धन्यवाद.
(ह्या सर्व पध्दती मी ह्या व्यवसायात येण्याच्या आधीच्या असलेने सर्व चित्रे जालावरुन साभार. ;) आगामी भागात काही स्वतः केलेले जाहीरात फलक देण्याचा प्रयत्न करीन.)
प्रतिक्रिया
2 Apr 2017 - 6:47 pm | तुषार काळभोर
वाट बघतोय...
2 Apr 2017 - 6:47 pm | यशोधरा
डच, साडीवाले फलक आणि शेवटचा एकदम ठसठशीत!
लिखाण आवडले.
2 Apr 2017 - 6:47 pm | उपेक्षित
नुकताच नवीन व्यवसाय चालु केला असल्यामुळे फलकाचे काम कसे चालते त्याचा थोडा अंदाज आला, पण माझ्यासाठी पूर्ण नवीन असलेल्या क्षेत्राची करून देत असलेल्या ओळखीबद्दल धन्यवाद.
2 Apr 2017 - 7:09 pm | जव्हेरगंज
माहितीपुर्ण लेख आहे. आवडला.
2 Apr 2017 - 7:13 pm | आदूबाळ
बहुदा अजून एक प्रकार म्हणजे धातूचीच अक्षरं करून सपाट बोर्डावर उठावदार (रिलीफ) पद्धतीने ठोकायची. माझ्या जुन्या घराजवळच्या 'अद्ययावत' कटिंग सलूनचा बोर्ड असा होता.
2 Apr 2017 - 7:22 pm | अभ्या..
हो. तीच एम्बॉस मेटल लेटर्स. त्यात आतील बाजूने लाख भरायचे. आजकाल(भारतात, परदेशात बर्याच आधीपासून दिसतात) गाड्यांसाठी अॅल्युमिनिअम एम्बॉसड नंबरप्लेटस मिळतात. सेम तशाच.
2 Apr 2017 - 7:31 pm | अत्रुप्त आत्मा
लै भारी!
2 Apr 2017 - 9:24 pm | कंजूस
झकास!!
2 Apr 2017 - 9:33 pm | इरसाल कार्टं
ज्ञानात भर घातलेत.
2 Apr 2017 - 10:07 pm | प्रचेतस
जबरी लिहिलं आहेस. जुन्या हिंदी चित्रपटांच्या पोस्टर्सचीही आठवण झाली. त्यावरही काही लेख येऊ दे.
2 Apr 2017 - 10:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
जुन्या हिंदी चित्रपटांच्या पोस्टर्सवर तर लेखमाला (किंवा किमान २-३ लेखतरी) होईल !
2 Apr 2017 - 10:35 pm | सतिश गावडे
मस्त लेख. पुढील भागात तू स्वतः बनवलेले फलक पाहायला नक्की आवडतील.
यानिमित्ताने काही वर्षांपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोच्या एका विशिष्ट "रुंद रस्त्यावरील" पाहीलेले झगमगीत फलक आठवले. ;)
3 Apr 2017 - 8:47 am | गणामास्तर
भारीचं. .जुन्या हिंदी चित्रपटांचे पोस्टर्स आठवले.
मला एक शंका आहे, भेळपुरी वा मेवाड आईस्क्रीमवाले त्यांच्या गाड्यावर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितच का रंगवतात?
3 Apr 2017 - 10:23 am | रातराणी
पुढील भागाची वाट पहात आहे.
3 Apr 2017 - 5:23 pm | खेडूत
हाही भाग आवडला. लहानपणी असे फलक रंगवणारे कारागीर किंवा ट्रकावर हॉर्न ओके प्लीज अन इतर मजकूर आम्ही कितीतरी वेळ पहात बसत असू. त्यावेळी त्यांचा ब्रश मिळावा अन चार रेषा आपणही माराव्यात अशी इच्छा होई ते आठवले.
अवांतरः ९०-९५ पूर्वीच्या कालबाह्य पद्धतीत कंपाऊंडच्या भिंतीवर जाहिराती रंगवणारे कलाकार पाहिले होते. गावातला एक चित्रकार त्याच्या घरासमोर टूरिंग टॉकीजची पोस्टर्स पाहून चित्रकलेकडे आकर्षित झाला. कसल्याही शिक्षणाशिवाय हुबेहूब जितेन्द्र, बच्चन, जयाप्रदा वगैरे काढत असे. पुढे पुण्यात अभिनवला प्रवेश घेऊन रहायला जागा नाही म्हणून कॉलेजच्या व्हरांड्यात झोपून शिकला अन व्यवसायिक झाला. गेली वीस वर्षे त्याचा काहीच पत्ता नाही. पुण्यात 'मुकुंदराज आर्टस' नावाने भिंती रंगवलेल्या दिसत. त्या पब्लिसिटीवाल्यांना विचारले हा पेंटर कुठाय- तर माहीत नाहीय म्हणून सांगत.
3 Apr 2017 - 5:41 pm | अभ्या..
अगदी अगदी खेडूतकाका,
हे वॉलपेंटिंगचे काम असे केले नाही पण एक गम्मत झालेली. कॉलेजच्या तिसर्या वर्षची एक्झाम झाली. गावाकडे परत जायचे होते. होते ते पैसे पार्टीत उडाले. मावशीकडे राहायचो मिरजेला. मग मावशीला परत मागायची लाज वाटायली. मित्राकडे गेलो. त्याचा खानदानी पेंटरचा व्यवसाय. त्याला प्रॉब्लेम सांगितला. तो पण काही पैसे पाळून नसायचा जास्त. बस म्हणला जरा वेळ. तेवढ्यात एक आईस्क्रीमचा गाडा रंगवायचे काम आले. दोघे मिळून केले ४ तासात. प्लस एक वॉल रंगवली टेलरची. सगळे मिळून २२०० रु. मिळाले. माझ्या वाटचे १००० लगेच मिळाले. त्याच्या वाटच्या पैशात अजून एक पार्टी आटपून गावचा रस्ता धरला. हि कला उपाशी मरु देत नाही. मस्ती मात्र अवघड.
7 Apr 2017 - 1:11 am | आनंदयात्री
>>माझ्या वाटचे १००० लगेच मिळाले. त्याच्या वाटच्या पैशात अजून एक पार्टी आटपून गावचा रस्ता धरला.
जबर्या किस्सा आहे _/\_
लेखहि आवडला. पुढचा भाग ताक आता लवकर. तशीच तू काढली असतील कलाकारांची चित्र तर ती पण टाक.
7 Apr 2017 - 1:47 am | राघवेंद्र
मस्त किस्सा !!!
पुढील भाग लवकर टाक मित्रा !!!
7 Apr 2017 - 1:13 am | पद्मावति
मस्त!