मोहीम - १ पॅम्प्लेट्स इन्सर्शन

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
29 Jan 2017 - 8:05 am

माझ्यासाठी ५.०० एएम म्हणजे लेट नाईट असते बर्‍याचदा पण अर्ली मॉर्निंग कधीच नाही. तरीही ह्या पंचपंचऊ:षकाले अ‍ॅक्टीव्हाला किका मारुन वैतागलोय. बटनस्टार्ट तर होतच नाहीये, किक अ‍ॅणि स्टॅन्डमधला फरकही कळत नाही. स्वतःची नेहमीची बाईक देऊन मागून घेतलीय मित्राची अ‍ॅक्टीव्हा. कारणही तसेच. धंदा हो. दुसरे काय. इन्सर्शन्स टाकायचेत एक लाखभर.
.........................
इन्सर्शन्स म्हणजे आपले पॅम्पलेटस हो. फ्लायरपण म्हणतात बरेच क्लायंट. ते नसतात का शन्वार रविवारच्या पेपरच्या पानात. पेपरची घडी उलगडताना सुळ्ळकन सांडतात. एकदा बघितले की पुड्या बांधायला, विमान करायला नाहीतर काचा पुसायला उपयोगी येतात ते. तेच इन्सर्शन्स. न्युजपेपरात इनसर्ट करुन पाठवतात म्हणून इन्सर्शन्स. मार्केटिंग कॅम्पेनवाले सेमिनार, इंडक्शने, वर्कशॉप, एक्झिबिटस, जायंट डिस्प्लेज, शोज आदी नखरे करुन दमले आणि तरीही धंदा होत नसेल तर केले जातात ते पॅम्पलेटस. लहानसहान स्नॅक्स सेंटरापासून आक्खा मेनू होमडिलीव्हरी नंबरासहीत छापणार्‍या हॉटेलाचे लाडके अ‍ॅडव्हर्टाझिंग हत्यार म्हणजे पॅम्पलेट्स. वजने कमीजास्त करुन देणार्‍या डॉक्टरापासून ते एमएससीआयटी वाटणार्‍या सेंटरांचे आवडते माध्यम म्हणजे पॅम्पलेटस. एवढे करुन नोकरी लागत नसल्यास एलायसी एमएलएम नायतर न्युट्रापतंजलीहर्बल्स असे कायतरी पॅम्प्लेटसाठी असतेच.
.........................
तर अशाच एका मल्टीन्याशनल कंपनीचे आम्ही लाडके व्हेंडर. लाडके म्हणजे दहा वेळा आमचे तोंड पाहण्यासाठी आमची बिले सगळ्यात उशीरा दिली जातात. त्यांचे क्रियेटिव्ह डिझाईन येते मुंबईवरुन. अर्थातच ते आम्ही न वापरत असलेल्या फॉर्म्याटात असते. साईजही इथे उपलब्ध असलेली कधीच नसते. इथली ऑफिस हेड ते पाहूनच वैतागलेली असते. कारण सोलापूरकरांना आधीची हुच्च डिझाईन न झेपल्याने धंदा थांबलेला असतो. तिला लोकल भाषेत पाहिजेत जाहीराती. आम्ही त्या बनवतो कशाबशा. त्या अ‍ॅप्रुव्ह होऊन ऑर्डर दिली जाते. कोटेशन्समधले रेट मॅडमना समजत नसतात. सोळा हजार पॅम्प्लेटसना ८७०० रुपये म्हणजे "अरे हे दोन रुपयाच्या आसपास जातेय रे" म्हणणारी ही बाई. शेवटी लाखभराची ऑर्डर झाली की घाई होते. उद्या संडेला रीडर्स जास्त असतील, मग उद्याच्या पेपरला येऊ दे असे शनवारी दुपारी सांगितले जाते. डिझाईन सेट करुन प्लेटा मारुन मशीनीवर चढायला संध्याकाळ. प्रिंट होऊन कटिंग व्हायला रात्री १२ वाजतात.
.........................
हे पॅम्पलेट्सचे रेट साईज, पेपर आणि प्रिंटिंग वर अवलंबून असतात. सगळ्यात हलका कागद तो ६० जीएसएम चा जाहीरात कागद. हा वेस्टकोस्टचा असतो पण जाहीरात कागद म्हणूनच ओळखतात. गुलाबी, पिवळा, निळा, हिरवा अशा फिक्क्या रंगात मिळतो. त्यावर एकरंगी छपाई केली जाते. हा सगळ्यात स्वस्त प्रकार. मग मॅपलिथो. ह्यावर चाररंगी/बहुरंगी छपाई केली जाते. नंतर आर्टपेपर. हा ९० जीएसएम ते १३० पर्यंत मिळतो. हा ग्लॉसी. अर्थातच महाग. साईज १/८ म्हणजे आपल्या एफोर च्या निम्मा. १/४, १/५ हे रेग्युलर चालणारे फॉर्म्याट. किंमती साधारण २५ पैसे प्रति पॅम्प्लेट ते १.२० रुपये प्रति अशी पडते.
.........................
डिझाईन, प्रिंटिंग वगैरे सोपस्कार पार पडल्यावर ते न्युजपेपरात वाटायला द्यावे लागतात. लहान सहान क्लायंटस स्वतःच नेऊन पेपरवाल्या माणसाला देउन टाकतात. ते हजारभर पॅम्प्लेटससाठी तीन चारशे रुपये घेऊन निम्मे गट्ठे रद्दीवाल्याला विकून मोकळे होतात. मोठ्या कंपन्या ही खेंगटी आमच्या गळ्यात बांधतात. बर बांधतात ते बांधतात, त्यांचा विश्वासही नसतो. एका फ्रेशर एमबीएच्या गळ्यात हे कॅम्पेन असते. "यू डोंट वरी, साहील वील म्यानेज एवरीथिंग. जस्ट कोऑपरेट हिम" असा वरुन आदेश मिळाल्यावर साहीलसाहेब फोन नंबर देऊन एकदा वॉस्सप पिंगून गुडूप झोपतात.
.........................
रविवारी पहाटे गट्ठे चार चौकात पोहोचतात. शहरांचे वृत्तपत्र विक्रेत्यांचे विभाग असतात. त्यांचे ठिय्ये ठरलेले असतात. चार साडेचारच्या सुमाराला एकेक क्रूझर, ओमनी पेपर घेऊन यायला सुरुवात होते. अर्ध्या तासात तेथे मंडईची कळा येते. साताठशे विक्रेते ठरलेल्या जागी असतात. स्ट्रीट लाईटस वगैरे लागलेले असतात. प्रेसची स्टीकरे लागलेल्या टूव्हीलर्स आणि सायकलींच्या गर्दीत स्वेटशर्ट आणि कानटोप्यांची लगबग चालू असते. वृत्तपत्राचा एजंट ठराविक प्रती त्या त्या मुख्य विक्रेत्याला वाटून पैसे घेऊन निघून जातो. लोकल छापलेले पेपर आधी येतात. एक्स्प्रेस, लोकसत्ता, हिंदू, डीसी, व्हीटी हे उशीरा येतात. मुख्य विक्रेत्याकडेच पॅम्प्लेट वाटपाची जबाबदारी दिली असल्याने आम्ही फक्त खेळ पाहात उभे असतो. त्यांचीही संघटना, अध्यक्ष, सचिव वगैरे असतात. त्यांनी ठेवलेले उपविक्रेते असतात. त्यांच्याकडची लाईन टाकणारी मुले असतात. आजही पेपरलाईन टाकून शिक्षण पूर्ण करणारी मुले आहेत. शिवाय हे पॅम्प्लेटसचे काम म्हण्जे त्यांना बोनस असतो. सगळ्यांकडे गट्ठे मिळाले की ते सोडवून त्यात पुरवण्या टाकण्याचे काम सुरु होते. त्यासोबतच ही पॅम्प्लेटस सरकवली जातात. ह्या सरकवण्याचे त्यांना प्रति पॅम्प्लेट २० ते २५ पैसे मिळतात. म्हणजे हजारी दोनशे रुपये. ते जागीच रोख द्यावे लागतात. मुख्य विक्रेत्यासोबत व्यवहार असल्यास तो वाटपाची व दोन दिवस साईडची जबाबदारी घेतो पण ५ पैसे जास्त घेतो.
दहा कॉल झाल्यानंतर साहीलसाहेब जॉगींग सूट वगैरे चढवून अवतीर्ण होतात. पॅप्म्प्लेटस पेपरात घुसतानाचे स्नॅप्स मोबाईलात कैद होतात. वेगवेगळ्या हेडरचे, वेगवेगळे विक्रेते इन्सर्शन करत असताना स्नॅप्स घेतले जातात. ते त्यांना रिपोर्ट करायचे असतात. हि सगळी प्रोव्हीजन का तर ह्या धंद्यातही चालते चालूगिरी. सुरु होते प्रिंटरपासून. लाख म्हणताना पॅम्प्लेटस छापली जातात ९० हजार. कारण ही कोण मोजत बसत नाहीत. मग आम्ही आता प्रिंटर मशीन काउंटरचा पण स्नॅप देतो. नंतर हे विक्रेते. निम्मेच गट्ठे टाकले जातात. उरलेले रद्दीत जातात. ह्या रद्दीतल्या पॅम्प्लेटसचे चाहते म्हणजे पानपट्ट्या अन स्नॅक्स सेंटरवाले. पाठकोरे पॅम्प्लेटस बाइंड करुन वापरणारेही कस्टमर असतात. फोटो काढून कस्टमर सरकले की गट्ठा हळूच सरकवला जातो. मग त्यासाठी शेवटच्या गट्ठ्यापर्यंत स्नॅप करावे लागतात. वेगव्गळ्या एरीयातले, वेगवेगळ्या पेपरचे असे एजंटस स्पॉटचे स्नॅप्स एकत्र करुन बिलासोबत अ‍ॅटॅच करुन वाट पाहावी लागते ती चेकची.
.........................
हे पॅप्म्प्लेट्स साधारण डबल पेपर, डबल कस्टमर, ऑफीस, वाचनालये असा क्रॉस काउंट काढला तरी ६० टक्क्यापर्यंत सर्क्युलेट होतात. रविवारी, सुटीच्या दिवशी पडलेली पॅम्प्लेट्स वाचली जातात. ह्यांचा वाचक वर्ग मुख्यतः गृहिणी आणि पेन्शनरवर्ग. कुपन्स/व्हावचर्स /मेनू असलेली पॅम्प्लेटस जपून ठेवली जातात. पॉकेट कॅलेंडर, कटिंग केलेले स्कूटरेटचे चित्र, सुगंधी बुकलेट अशा टाइपची इन्सर्शन्स सक्सेसफुल होतात. जाहीरातदार त्याचे काम करतो अन मग ते बघायची, नीट वाचायची, वाचून त्यावर काही कृती करायची जबाबदारी मात्र ग्राहकराजाची.
.........................
(जाहिरातीची वेगवेगळी शस्त्रे वापरुन चालवल्या जाणार्‍या मोहिमेचा हा पहिला भाग. क्रमश: ह्या हत्यारखान्याची ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न. धन्यवाद )

जीवनमानमाध्यमवेध

प्रतिक्रिया

मस्त झाली आहे सुरुवात. येऊ देत अजून.
रद्दीत टाकलेल्या पॅम्प्लेट्सची आठवण झाली.

@सासं, कृपया हा फोटो धाग्यात अ‍ॅड करा.
a

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2017 - 2:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटो दिसत नाहिये रे. लिंक दे.

कंजूस's picture

29 Jan 2017 - 10:17 am | कंजूस

लइ ब्येस झालंय इन्सर्शन.

संदीप डांगे's picture

29 Jan 2017 - 10:36 am | संदीप डांगे

मस्त रे, अजून येऊ दे पटापट,

संजय पाटिल's picture

29 Jan 2017 - 10:57 am | संजय पाटिल

छान ओळख. पु.भा.प्र.

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Jan 2017 - 11:00 am | हतोळकरांचा प्रसाद

सुंदर! पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत! निवडणुका लागल्या असल्याने सध्या असली इन्सर्शनस् ढिगाने जमा होत आहेत :):)

भीमराव's picture

29 Jan 2017 - 11:08 am | भीमराव

आभ्यादादा आमच्या पॉम्लेट/ह्यांडवेल कारेक्रमाची आठवण झाली बघ, गावात सलग सुट्ट्यांचा काळ बघुन आम्ही पोरं पोरं क्रिकेट म्याचेस भरवायचो, गावातलाच प्रिंटींग वाला काकोबा बघुन त्याच्याकडुन हि हस्तपत्रके छापुन घ्याची, आणि सायकल वर कधी डब्बल तर कधी टिब्बल शीट जाऊन आसपास जितक्या गावात वाटता येतील तितक्या गावात वाटायची, आसपासचे दोनतीन भाऊ तात्या आप्पा आण्णा बक्षीसाच्या रकमेसाठी पाहुन ठेवायचे, जेवढी जास्त बक्षीस रक्कम,तितक्या जास्त एन्ट्र्या आणि जितक्या जास्त एन्ट्रया तितके जास्त पैसे. पण त्यासाठी हि पॉम्पलेट हेच आमचे जाहीरातीचे मुख्य साधन होते.

अभ्या..'s picture

30 Jan 2017 - 7:21 pm | अभ्या..

राईट्ट बाबुदादा,

हॅन्डवेल नावानं लै आठवणी जागृत झाल्या. गावाकडं अजुन हाच शब्द वापरतात. क्रिकेटच्या टूर्नामेंटाची लै हॅन्डबिलं केली राव. :)

सामान्य वाचक's picture

29 Jan 2017 - 11:25 am | सामान्य वाचक

रविवारच्या पेपरातले हे चिटोरे बघून खूप वैताग येतो खरे तर

पण केव्हडे कष्ट असतात यामागे

सानझरी's picture

29 Jan 2017 - 11:26 am | सानझरी

मस्तं लिहीलंय.. पु.भा.प्र.

वरुण मोहिते's picture

29 Jan 2017 - 12:08 pm | वरुण मोहिते

आपला लेख आणि आजच लोकसत्ता च्या पुरवणीसोबत २ डव्ह शाम्पू अटॅच आले आहेत . पॅम्प्लेट आणि बाकी वेळा असं शाम्पू किंवा कॅलेंडर पाठवणं ह्यात दरांचा हि फरक असेल ना ?
अवांतर -मागे एकदा जागतिक एड्स दिनानिमित्त टाइम्स ऑफ इंडिया ह्या पेपरासोबत कंडोम अटॅच होते जाहिरात किंवा सामाजिक उपक्रम म्हणून ते लीगल होतं का ??कारण नंतर टाइम्स ने असा प्रयोग केला नाही.

संदीप डांगे's picture

29 Jan 2017 - 2:04 pm | संदीप डांगे

एड्सदिनानिमित्त कंडोम वाटणे ह्यात इल्लिगल काय असावे?

अभ्या..'s picture

29 Jan 2017 - 2:29 pm | अभ्या..

वरुणभाव, खाली संदीपाण्णा म्हणतेत तसे आहे. ह्यात इल्लीगल काही नाही पण पेपर डायरेक्ट घरी जातो. लहान मुले बघतात वगैरे इश्शु होतात. आजकाल शाळेतच लैंगिक शिक्षण दिले जाते त्यामुळे ह्यात थोडासा अवघडलेपणा सोडले तर इलीगल काही नाही.
बाकी तुमचा प्रश्न जरा वेगळाय. तुम्ही दिलेली उदाहरणे ही डायरेक्ट त्यात्या पेपरने घेतलेले क्लायंट असतात. डव्हवाले टाईम्सला पैसे देतात. टाईम्सवाले त्यांचा स्टाफ वापरुन ते अ‍ॅट्च करतात.
मी दिलीत त्या इन्सर्शन मेथडमध्ये न्युजपेपरला एक छदामही जात नाही. विक्रेत्यांची यंत्रणा हे कुरीअरसारखे काम करते. टाइम्सचा फुलपेज अ‍ॅडचा रेट मेन एडीशनला पाच दहा लाख असेल तर दै. डावी भुसारी कॉलनी गर्जना चा रेट दहा हजारात भागतो. इनसर्शनला दोन्हीचे सोयरसुतक नाही. दोन्ही पेपरात इन्सर्शन वीस पैशातच होते. हे पैसे अंक टाकणार्‍याचे असतात. माझ्या माहीतीतला एकजण दहावी पास असून पेपर टाकत मोठा एजंट बनलाय. संघाचा अध्यक्ष आहे. फोरव्हीलरमधून फिरतो. त्याच्याकडे आज ४०-५० मुले आहेत पेपर टाकायला. इन्सर्शनची बिलेच दर महिना लाखालाखाची गोळा करतो. हि यंत्रणा न्युजपेपरचा एन्व्हलप सारखे माध्यम म्हणून वापर करुन घेते फक्त.

वरुण मोहिते's picture

29 Jan 2017 - 5:31 pm | वरुण मोहिते

धन्यवाद .पु.भा.प्र

जव्हेरगंज's picture

29 Jan 2017 - 1:27 pm | जव्हेरगंज

मस्त लेख!!
डिटेलिंग आवडलं!!

राही's picture

29 Jan 2017 - 1:36 pm | राही

जाहिरात आणि मुद्रण या व्यवसायातले बारकावे आणि हातघाई टिपणारे आपले लेखन आवडत असते. साधी सोपी बोलीभाषा, छोटीछोटी वाक्ये, अकृत्रिम, अनौपचरिक शब्दयोजना यामुळे आणि या विश्वातल्या अद्भुतरम्य तपशीलांमुळे लेख वाचावेसे वाटतात.
असेच चालू राहू दे.

प्रचेतस's picture

29 Jan 2017 - 4:28 pm | प्रचेतस

लै भारी सुरुवात.
ह्या प्रकाराबद्दल उत्सुकता होतीच.
पुढचे भाग पटापट येऊ देत.

निशाचर's picture

29 Jan 2017 - 4:44 pm | निशाचर

मस्त सुरुवात. पुभाप्र

पैसा's picture

29 Jan 2017 - 5:57 pm | पैसा

असेच तपशीलवार अजून येऊ देत!

संजय क्षीरसागर's picture

29 Jan 2017 - 8:30 pm | संजय क्षीरसागर

हि यंत्रणा न्युजपेपरचा एन्व्हलप सारखे माध्यम म्हणून वापर करुन घेते फक्त.

हे सगळ्याचं कन्क्लूजन !

अनिंद्य's picture

29 Jan 2017 - 8:30 pm | अनिंद्य

पेपरात ढिगाने आलेले पॅम्प्लेट्स कधी नीट बघितले सुद्धा नाहीत, त्याच्यामागे एवढी मेहनत आणि लोक-साखळी असते हे नव्याने समजले!

पु भा प्र.

वा.. मस्त माहिती. छान सुरुवात!

खेडूत's picture

29 Jan 2017 - 11:33 pm | खेडूत

सविस्तर वर्णन आवडले. अशी पहाटेची मंडई भरलेली आणी लीफलेटस टाकण्याची लग्बग पुण्यात अनेक ठिकाणी दिसते.
थंडीच्या दिवसांत त्यांची दयाही येते.

पुभाप्र!

आदूबाळ's picture

30 Jan 2017 - 12:29 am | आदूबाळ

पावसाळ्यात जास्त.

लीना कनाटा's picture

30 Jan 2017 - 5:39 am | लीना कनाटा

अभ्या दादा छान माहिती दिलीय.

या बद्दल थोडी फार कल्पना होती परंतु एव्हडी डिटेलवार माहिती नव्हती.

यातील सर्वात वैतागवाना प्रकार म्हणजे आपली इच्छा आणि गरज नसताना देखील आपल्या हातात अशी पॅम्पलेट्स कोंबू पाहणारी मंडळी आणि अशी पॅम्प्लेट्स तिथेच इकडे तिकडे फेकून कचरा करणारे लोक्स.

अशी मंडळी बहुधा रेल्वेच्या फलाटावर दिसतात.

याचा नवीन अविष्कार म्हणजे आंजा वर विहार करताना येणारे पॉप-अप्स किंवा तूनळीवरील जाहिराती. हे कमीत कमी ब्लॉक तरी करता येतात परंतु टीव्ही च्या पडद्यावर खालच्या बाजूला धावणाऱ्या एकोळी जाहिराती कशा थांबवायच्या?

गवि's picture

30 Jan 2017 - 12:25 pm | गवि

अतिशय रोचक.

एक शंका: तुम्ही झोपता कधी?

अद्द्या's picture

30 Jan 2017 - 12:46 pm | अद्द्या

हाय भारी .

ताक पुढे लवकर

सूड's picture

30 Jan 2017 - 12:52 pm | सूड

पंचपंचऊ:षकाले

पंचपंचउष:काले....

बाकी इन्फॉर्मेटिव्ह आहे, पुभाप्र.

अभ्या..'s picture

30 Jan 2017 - 7:22 pm | अभ्या..

थ्यांक्स रे सुडक्या.

एवढे संस्कृत येत असते तर अभ्या वैदिक पाठशाळेचे पॅम्प्लेटस नसते का छापले? ;)

एका माहिती नसलेल्या सप्लाय चेनची ओळख झाली.
ती ही खास अभ्या स्टाईलने...
मस्तच !!! येऊ दे अजून..

चौकटराजा's picture

30 Jan 2017 - 4:43 pm | चौकटराजा

मला असले रिपोर्ट वाले लेख आवडतात. मी अनिल अवचट यांचा त्याखातर पंखा आहे. अभ्याने काही काही पंचेस मात्र जबरा टाकले आहेत."एक दिवस अभ्याबरोबर " असा मी माझा भावी कार्यक्रम ठरवला आहे.

धर्मराजमुटके's picture

30 Jan 2017 - 6:19 pm | धर्मराजमुटके

मस्तच ! तुमचा लेख वाचून लहानपणचे दिवस आठवले. सक्काळी सक्काळी उठून पेपर टाकणे (महिना ४० रु. फक्त) त्यातही नगरसेवक राहत असणारी बिल्डींग माझ्याकडे होती त्यामुळे फुकटचं छाती दोन इंच फुगवून चालणं, रात्री लायटीच्या खांबांवर चढून क्लासेसचे फ्लेक्स बांधणे (हे घरच्यांच्या अपरोक्ष) अशी कामे केली ती झरकन डोळ्यासमोरुन गेली.
पुर्वीच्या काळी पेपरची लाईन टाकून मोठे होणार्‍यांना मान होता. आता काळं कुत्रं बी हिंग लावून विचारत नाही. उलट एखाद्या बिल्डींगमधे चोरीबिरी झाली तर सोसायटीवाले पहिले यांच्यावरच शक घेतात.

शिवाय असं सांगणं म्हणजे स्वतःला डाऊनमार्केट करुन घेणं. असो ! गेले ते दिन राहिल्या त्या आठवणी.

प्रिंटींगव्यवसायात देखील ४-५ वर्षे काढली असल्यामुळे लेखाशी चटकन रिलेट होता आलं. ( कालखंड : अ‍ॅल्डस पेजमेकर ५ ते अ‍ॅडोब पेजमेकर ७ आणि कोरल ४,५ वापरण्याचा. नंतर कोरल १२ पर्यंत वापरले पण आपला खरा जीव होता पेजमेकर वरच. गणेशोत्सव मंडळांचे अहवाल छापायला एकदम नामी. कोरलवाली मंडळी एकदम तोंडात बोट घालून बगायची. आता बहुधा पेजमेकर वापरणारी जमात नामशेषच झाली असावी.

जुन्या आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद !

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 6:31 pm | संदीप डांगे

छान प्रतिसाद!

पेजमेकर नामशेष झालंय आता. त्याचं आधुनिक रुप म्हणजे अ‍ॅडोबी इन्डिझाइन... पुस्तकांची कामे, अहवाल, वर्तमानपत्रे इत्यादीसाठी उत्तम. बाकी जुने पेजमेकरवाले उस्ताद लोक जेव्हा माऊस न वापरता फक्त किबोर्डवर शॉर्टकटकिज वर सुस्साट काम करायचे ते बघून खरंच आमच्यासारख्या कोरलबालकांची बोटे तोंडात जायचीच.

कोरल १८ आलंय आता तरी बर्‍याच फ्लेक्सवाल्यांकडे १२ वरच कामं चालतात.

धर्मराजमुटके's picture

30 Jan 2017 - 6:44 pm | धर्मराजमुटके

कोरल १८ आलंय आता तरी बर्‍याच फ्लेक्सवाल्यांकडे १२ वरच कामं चालतात पण त्याचं मुळ कारण म्हणजे सुटसुटीतपणा आणि क्रॅक करण्याचा सोपेपणा एवढेच असावे. शिवाय एकदा हात बसल्यावर त्यावरुन हात काढावा वाटत नाही हे देखील खरेच. अ‍ॅल्डस पेजमेकर ५ चालत होतं तेव्हा मी शाईनिंग मारायला नुकतेच बाजारात आलेले अ‍ॅडोब पेजमेकर ६.० देखील टाकले होते. नंतर हळुहळू आवडत गेले.

त्याकाळी कुंडली चे सॉफ्टवेअर देखील नवीनच बाजारात आले होते. मी चक्क रु. १०,००० टाकून विकत घेतले आणि ५० रुपयात ५ पानांची कुंडली छापून द्यायचा व्यवसाय चालू केला होता. त्यानिमित्ताने बरेच ज्योतिषी, कॉलेजला जाणारी आणि एकतर्फी लाईन असणारी पोरे, लग्नाळु मुले माझी गिर्‍हाईके झाली होती. काही जण तर आम्हाला चार-पाच पानांची कुंडली नको फक्त मॅच मेकींगवाले पेज छापून द्या १०-२० रुपयांत असे म्हणायचे. सॉफ्टवेअरने प्रिंट मारायच्या नादात आणि ज्योतिषांना गिर्‍हाईक बनवण्याच्या नादात मी देखील त्यांचे गिर्‍हाईक बनलो पण तो वेगळ्या लेखाच्या विषय होईल.

असो. इथे येणार्‍या सगळ्या प्रिंटींगच्या लेखांवर नजर ठेऊन असतो याची पोचपावती देण्यासाठी हा अट्टाहास !

अभ्या..'s picture

30 Jan 2017 - 7:27 pm | अभ्या..

थॅन्क्स धर्मराज, संदीप

माझ्याकडे कोरल १२ लीगल होते. त्याचीच सवय लागलेली. सध्या एक्ससिक्स आहे पण १२ ची मज्जा येत नाही.

पेजमेकरवर टॅब्ज आणि इंडेट हँगर वापरुन जे लोक्स काम करतात त्यांच्याविषयी जाम रिस्पेक्ट आहे. पेजमेकर कंपोझीटर लोकांच्या हिशोबाने होते अगदी. प्लेस केलेले ऑब्जेक्ट एम्बेड असल्याने फाईली वजनदार नसायच्या हे मस्त. बँकाचे अहवाल हा एक दिव्य प्रकार करणार्‍या माणसाला डीटीपीचा सर्वोच्च पुरस्कार दिला पाहिजे. (मलापण ;))

संदीप डांगे's picture

30 Jan 2017 - 8:00 pm | संदीप डांगे

बँकाचे अहवाल हा एक दिव्य प्रकार करणार्‍या माणसाला डीटीपीचा सर्वोच्च पुरस्कार दिला पाहिजे. (मलापण ;))
>>> खरे आहे अगदी.

पेजमेकरबद्दल फारसं माहित नसतांना उमेदवारीच्या काळात हा प्रकार एकदाच केला देवा. आपण जन्मालाच कशाला आलो असे वाटण्याची वेळ होती ती. ;-)
स्लीपलेस नाईट्स, बसून बसून पोटर्‍यांची सूज आणि सतत पांढरे स्क्रीन बघून डोळे लाल-भडक... त्यावेळची मनोवस्था शब्दांत नाही सांगता यायची. :-)

आदिजोशी's picture

3 Feb 2017 - 5:26 pm | आदिजोशी

प्लेस केलेले ऑब्जेक्ट एम्बेड असल्याने फाईली वजनदार नसायच्या

माझ्या माहिती नुसार इमेज एम्बेड केली की फाईल साईज वाढते. लिंक / प्लेस सली की फाईलची साईज कमी राहते.

अभ्या..'s picture

3 Feb 2017 - 6:06 pm | अभ्या..

तेच रे रे ते आदी. ओले ओले (ऑब्जेक्ट लिंक एम्बेडेड) म्हणायचे राहिले.

कोरलला इम्पोर्ट केलेली इमेज अन पेजमेकराला प्लेस केलेली इमेज ह्याच्यामुळे फाईलीतल्या वजनातला फरक सांगत होतो.

मग विकल्या का २०० कुंडल्या?

अभ्या..'s picture

2 Feb 2017 - 6:46 pm | अभ्या..

अरे शीयेसायबा,
गुंतवणुक अन परताव्यातून बाहेर ये. जरा तुमीलेदिलखिले बघ की. सारखंच गुणुलेभागुले काय? ;)

रातराणी's picture

31 Jan 2017 - 12:11 am | रातराणी

पु भा प्र असं म्हणणार नाही. आधी ऐरटेलचा पुढचा भाग पाहिजे.

गामा पैलवान's picture

31 Jan 2017 - 12:24 am | गामा पैलवान

लेख मस्तंच आहे. पण च्यायला ही प्यांपलेटं कसली टाकता राव ! त्यापेक्षा खरीखुरी पापलेटं टाका ना! कोळणीकडून घ्यायची आणि कॉलनीभर वाटायची. हाकानाका! सक्काळीसक्काळी फडफडीत पापलेट आपुल्या दारी. पेपरवाल्यांना ही आयडिया दिली पाहिजे. नाहीतरी त्यांना प्यांपलेटांतून फुटकी कवडीही लाभंत नाही.

-गा.पै.

राघवेंद्र's picture

31 Jan 2017 - 2:33 am | राघवेंद्र

अभ्या एकदम मस्त लेख !!!
नळ-स्टॉप ला पहाटे असे गठ्ठे येतात आणि आम्ही पहाटे चहा-पोहे मिळतात म्हणून नळ-स्टॉप ला जात असायचो.

घरी पेपरात आलेले हे कागद बघून, न बघता टाकून दिले जातात. या कामामागेही किती जणांची मेहनत आहे हे लेख वाचून जाणवलं.
पुभाप्र

गणामास्तर's picture

31 Jan 2017 - 12:37 pm | गणामास्तर

एवढी किचकिच करून पेपरात टाकलेले ते कागदं न बघताचं फेकून देतो राव.

अवांतर: मी येतो शनिवार रविवार तुझ्यासोबत गट्ठे टाकायला. काम झाले कि तुळजापूरला मटन खायला जाऊ, ओके ?

सिरुसेरि's picture

31 Jan 2017 - 3:56 pm | सिरुसेरि

छान माहिती . काहि वर्षांपुर्वी एका ऑटोमोबाईल कंपनीने ( वोल्क्सवॅगन ?) आपल्या गाडीची माहिती देणारा स्पीकर पेपरमधुन वाटला होता ते आठवले .

राजाभाउ's picture

31 Jan 2017 - 4:02 pm | राजाभाउ

मस्त रे अभ्या, येउ ते अजुन. (ते एयरटेल च पण बघ की जरा)

सही रे सई's picture

31 Jan 2017 - 10:27 pm | सही रे सई

लेख भारी जमलाय आणि स्टाईल पण खुसखुशीत खमंग.
अजून येउंद्या. वाट बघत्ये.

सर्व वाचक प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद.
आता आगामी लेख: साईनबोर्ड.
आमचा आवडता विषय पण मोट्ठा असल्याने टप्प्याटप्प्यात.
शशक आटोपल्या की लगेच. ;)

आदिजोशी's picture

3 Feb 2017 - 5:22 pm | आदिजोशी

अनेक उद्योग केलेत, त्यातलाच हा एक :)

अत्रुप्त आत्मा's picture

2 Apr 2017 - 10:52 pm | अत्रुप्त आत्मा

ब्बाबो! अनंताचा पसारा आहे हा धंदा मंजी.

रघुनाथ.केरकर's picture

10 Jul 2017 - 3:59 pm | रघुनाथ.केरकर

१२वीला असताना मी सुधा लाइन टाकायचो.उल्हासनगर लालचक्की पासुन अंबरनाथ कानसाई पर्यन्त. १८० पेपर. १५० लाइन चे आणी ३० सेल चे. सोबत एक घोडा सायकल. डबल दांड्याची आणी मोठा क्यारीयर लावलेली. महिना ४०० मिळायचे आणी मोठी कमाइ म्हणजे सायकल २४ तास माझ्याकडेच रहायची. उल्हासनगर च्या चांदीबाइ कॉलेजच्या समोर हा पेपर चा बाजार भरायचा. अभ्या ने म्हटल्या प्रमाणे पँपलेट्स टाकायचे म्हणजे बोनस असायचा. आम्ही १०० पँपलेट्स ला ५ रुपये घ्यायचो (साल होतं २००५). पँपलेट्स वाला नजरेआड झाला की नीम्मे पँपलेट्स कॉलेजसमोरच्या नाल्यात.