स्वरांजली

मिडास's picture
मिडास in जनातलं, मनातलं
27 Mar 2017 - 4:55 am

पहाट आणि रात्र या मधली वेळ. कशी कुणास ठाऊक आज अश्या अवेळी जाग आली तिला. कूस बदलून पाहते ती, पण निद्रादेवी काही प्रसन्न होत नाही. झोपडीचं दार उघडून ती बाहेर येते. आकाशात तारे मंद चमचमत आहेत. पहाटेच्या वाऱ्याने तिच्या अंगावर शहारा येतो. पदर गच्च आवळून घेत ती चालू लागते. कुठे जायचंय ठाऊक नाही पण ती चालू लागते. पहाटेच्या दवात भिजलेली मऊशार माती तिच्या पायाला पावलागणिक माखतेय. कसलास धुंद सुवास पसरलाय चहूकडे. त्या सुवासाने तिची आठवण जरा चाळवते. चंदनाचा सुवास. तिच्या मनात भरलाय तो वास. आठवणींच्या कपाटात ती धुंडाळतेय काहीतरी. आणि अचानक गवसते तिला ती नेमकी स्मृती. तो मातीचा नाजूक स्पर्श हा त्या कृष्णाच्या स्पर्शासारखाच आहे की. त्या स्पर्शानेच तर नाहीसं केलं होतं तिचं कुबड.
कुब्जा! सर्वांगाला कुबड असलेली म्हणून ती कुब्जा. पण त्या कुबड्या शरीरात कमालीची जादू होती. कंसासारखा राक्षस सुद्धा विरघळून जायचा तिच्या हस्त-स्पर्शाने. आवडती दासी होती ती कंसाची. त्याला चंदनाचं लेपन करायची अनुमती फक्तं तिलाच होती. बरं चाललेलं होतं की तिचं. आणि मग कुठूनसा तो सुकुमार कृष्ण गवसला तिला वाटे मध्ये.
"तुझी कीर्ती ऐकून आहे मी कुब्जे. फक्तं एकदा मला तुझ्या हाताने चंदनाचा लेप लावशील ? " त्याने विचारलं होता तिला.
खास कंसाकरता बनवलेला लेप घेऊन ती तशीच माघारी फिरली होती तिच्या झोपडीकडे. मागोमाग कृष्ण येताच होता. त्याला लेप लावताना हरपून गेली होती ती. आजपर्यंत अनेकदा गंधाळली होती तिने अपरिचित शरीरं. पण हि अनुभूती काही तरी वेगळीच होती. पुरुष स्पर्श नवा नव्हता तिला. वासना, लाचारी, क्रूरता सारं काही अनुभवलं होतं तिने या आधी पण आपुलकी नव्हती जाणवली कधी तिला. प्राजक्ताच्या कळीसारखा नाजूक असा कृष्ण तिच्याकडून लेप लावून घेत होता. कधी तो हुंकारात होता तर कधी तृप्तीची साद देत होता. एका आवेगाच्या क्षणी डोळे मिटून घेतले त्याने आणि तिने भरून घेतलं होतं त्याचं कोवळेपण डोळ्यामध्ये.
"कुब्जे फार अलौकिक अनुभव दिलास तू मला. मी काय मोबदला देणार तुला याचा? तरीही माग तुला हवं ते. प्रयत्न कारेन मी देण्याचा"

विचारांच्या भरात ती कधी नदीकिनारी आली तिलाही समजलं नाही.कुठल्यातरी मंजुळ स्वरांनी भारून टाकला होता तो नदीकाठ. पाण्यात पाय भिजवत ती भोगत होती तो अनुपम नाद. त्या सुंदर क्षणांच्या साथीने तिने मोकाट सोडलं आपलं मन भूतकाळामध्ये.

"मी तरी काय मागू कृष्णा तुला. पण तुझ्या बासरी बद्दल खूप ऐकलंय मी. हरकत नसेल तर ऐकवशील तुझा पावा मला ?" तिने विचारलं.
"भ्रम आहे कुब्जे तो लोकांचा . एका शुष्क वेळूच्या छिद्रातून वाहणारा वारा एवढंच या आवाजाचं स्वरूप. तो नाद येतो तो या काळजातून. मनाच्या कोपऱ्यातली कुठलीतरी जखम अशी या बासरीतून बाहेर पडते. ती फुंकर या वेळूवर नाही, माझ्या मनावर घालतो मी. अडाणी लोक त्यालाच संगीत म्हणतात. नाही कुब्जे. माझं दुःख हे माझं मलाच भोगावं लागेल. मी तो भार तुझ्यावर नाही टाकू शकत." कातर स्वरात कृष्ण बोलत होता.
"तरीही कुब्जे मी वचन देतो तुला. एक दिवस मी फक्त तुझ्या करता म्हणून या पाव्यात माझा प्राण फुंकेन आणि ते स्वर फक्तं आणि फक्तं तुझ्याच मालकीचे असतील."

हे आठवलं मात्रं आणि तिची थकलेली गात्रं शहारून गेली. त्या स्वरांचा उगम तिला कळून चुकला. इतका काळ लोटून सुद्धा तो तिला विसरला नव्हता. त्याला ती आठवत होती आणि तिला दिलेलं वचन सुद्धा. हे स्वर्गीय सूर तिचे होते. फक्त तिच्यासाठी तो पावा मंजुळ निनादत होता. या क्षणाला फक्तं तिचाच अधिकार होता कृष्णावर. मन लावून ती ते सूर तुडुंब भरू लागली तिच्या काळजामध्ये. नदीच्या लाटा मात्रं तिच्या पायाशी लपलपत लगट करत राहिल्या.

कथाप्रकटनआस्वादलेख

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Mar 2017 - 11:26 am | पैसा

फार सुंदर!

पद्मावति's picture

27 Mar 2017 - 11:32 am | पद्मावति

सुरेखच!

उगा काहितरीच's picture

27 Mar 2017 - 12:20 pm | उगा काहितरीच

अप्रतिम .... !

सिरुसेरि's picture

27 Mar 2017 - 6:27 pm | सिरुसेरि

छान लेखन . +१००

सुमीत's picture

27 Mar 2017 - 7:27 pm | सुमीत

अलौकिक स्वर्गीय, अजुन काही नाही. कुब्जा कधि कोणाच्या लक्षात पण नाही राहिली आणि तुम्हि किती सुंदर अनुभुती दिलीत.

प्राची अश्विनी's picture

28 Mar 2017 - 10:08 am | प्राची अश्विनी

सुरेख!!