बडे तो बडे, छोटेमिया सुभानल्ला !

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
27 Jan 2017 - 5:20 pm

काल सुट्टी. झेंडावंदन करून झाल्यावर रीतसर जिलबीचे जेवण झालेले. सुट्टी म्हणून दुपारी मस्तपैकी ताणून द्यावी की दुर्दर्शनच्या शिरेलीने डोक्याची मालिश करून घ्यावी हा विचार सुमारे तीन मिनिटे करून झाल्यावर लक्षात आले की शाळेला सुट्टी असल्याने बाहेर चाललेल्या चिल्ल्यापिल्ल्यांच्या धुडगूसामुळे निद्रादेवीच्या राज्याचा रस्ता सापडणे कठीणच. प्रजासत्ताक दिन म्हणजे जवळजवळ बालसत्ताक दिनच असे समीकरण करायला हरकत नाही. माझ्या घराशेजारी एकूण तीन अपार्टमेंटस असल्याने बाल-सत्ताधाऱ्यांची मांदियाळीच होती. तेव्हा दुर्चित्रवाणीचा पेटारा पेटवला आणि सोफ्यावर ऐसपैस अंग पसरले. तशी मी दुर्चित्रवाणीसमोर नियमित हजरी लावत नसल्याने समोर चाललेल्या कथानकाचे धागे डोक्यात जुळायला चांगली दहा मिनिटे लागली. मग जरा कुठे विंट्रेष्ट येऊ लागला. एवढ्यात बेल ठाणठाण वाजली. डोक्याची मालिश थांबवून दार उघडलं. शेजारच्या घरातली एक कॉलेजकन्यका आत येऊन घाबऱ्याघुबऱ्या आवाजात सांगू लागली, ‘काकू, तुमची वाळू ती मुलं बादलीत भरून घेऊन जाताहेत !’
घरी थोडं दुरुस्तीकाम सुरु करायचं आहे म्हणून तासभरापूर्वीच बाहेर वाळू आणून टाकली होती. मी बाहेर जाऊन बघितलं तर दहा-एक जणांची वानरसेना वाळूच्या ढिगावर यथेच्छ नाचून आता कंपाऊंडच्या भिंतीवर चढलेली. झाला सत्यानाश वाळूचा ! मी रागारागानं पायात चप्पल सरकवली आणि गेटच्या बाहेर पडून मुलांना दरडावले ‘खाली येता आता का मोडू तंगडी एकेकाची ? काय चालवलाय वाळूचा नाश ? सगळ्या रस्ताभर झालीय ना वाळू, बघा !’
मुले भराभर कंपाऊंडच्या भिंतीवरून खाली आली. पण पळाली नाहीत. मी तिथंच त्यांच्यावर ताण काढत उभी राहिले. एवढ्यात पाठीमागून आलेली कॉलेजकन्यका म्हणाली, ‘काकू, पलीकडे बघा ना, बादल्या भरभरून वाळू नेलीय त्यांनी !’
मी अपार्टमेंटच्या कंपाउंडच्या भितीपलीकडे जाऊन बघितलं, तर खरंच तिथे त्यातल्या ओल्या वाळूचा एक लहानसा ढीग मांडलेला आणि दोन गवंडी ती वाळू आणि विटा घेऊन जमिनीत एक चेंबर बांधत होते. मी त्यांना विचारले की ते कुणाचे काम करताहेत आणि वाळू न विचारता का नेली ? तर ते म्हणाले की वाळूचे आम्हाला काही माहिती नाही. अपार्टमेंटमधल्या एका फ्लॅट्धारकाने ते चेंबर बांधायला सांगितले होते. वाळू विटा ही मुले आणून देतील असे म्हणाला. मी त्यांना ओरडून त्यांचे काम बंद पाडले आणि ज्या फ्लॅट्धारकाने सांगितले त्याला बोलवा म्हटलं.
तोवर वाळूत नाचणारी मुलेही माझ्या मागोमाग आली होती. त्यातला एक चुणचुणीत मुलगा पुढे झाला आणि त्याने मला सांगितले की त्या अंकलनी या दोघांना (एक चार वर्षाचा आणि एक सहा वर्षाचा मुलगा यांच्याकडे बोट दाखवून) तुमची वाळू आणायला सांगितली. हे दोघे नाही म्हणत होते, तर ते यांनाच ओरडले आणि त्यांच्याकडून जबरदस्ती वाळू आणवून घेतली आणि ते निघून गेले. मी त्या दोघांना विचारले, ते त्यांचे वडील होते का ? तर नाही म्हणाले.
‘अरे मग तुम्ही का ऐकलं त्यांचं ?’ मला नवल वाटलं.
‘आंटी, ते ओरडले आम्हाला. मग काय करणार ?’
कुणीपण उपटसुंभाने सांगितले म्हणून असला कारभार करणाऱ्या त्या कार्ट्यांचा मला इतका संताप आला, की त्यांच्या कानाखाली एक एक वाजवण्यासाठी माझे हात शिवशिवू लागले. मी खरंच माझा हात एकाच्या गालापाशी नेलासुद्धा !
आधी त्या मालकाच्या, आणि आता माझ्या ओरडण्याने तो चार-पाच वर्षाचा गोरापान मुलगा अगदी कावराबावरा झाला होता. त्याचे गुलाबी गाल लाल लाल बुंद झाले होते. एकाएकी मला त्याची कीव आली. त्याच्या गालापर्यंत नेलेला हात हळूच त्याच्या गालाला लावून मी म्हटले, ‘हे बघा मुलांनो, असं कुणीपण सांगितलं म्हणून आपण चोरी नाही करायची बरं. तुम्ही सगळी शाळेत जाणारी चांगली मुलं आहात, अशी चोरी करू नये.’
तो आपल्या मोठ्या मोठ्या निरागस डोळ्यांनी माझ्याकडे पहात राहिला.
मग मी त्या गवंड्यांना काम थांबवायला भाग पडलं आणि मुद्दाम त्यांच्या दोन विटा उचलून आणल्या आणि वाळूच्या खाली घसरणाऱ्या ढिगाला आधार म्हणून लावल्या. आणि म्हटलं, ‘पाठवून द्या तुमच्या मालकांना माझ्याकडे.’
आश्चर्य म्हणजे ते बघून सगळी वानरसेना पुढे आली आणि त्यांनी न सांगता कुठून कुठून दगड विटा आणून वाळूभोवती लावून टाकल्या. मग सगळी मला सॉरी म्हणू लागली. मी हसून मुलांना थँक्स दिलं आणि मग त्यांना गोड शब्दात सांगितलं की, वाळूत खेळा, पण खाली रस्त्यावर ती पसरू नये, याची काळजी घ्या. आणि कंपाउंडवर चढू नका, पडलात तर गंभीर दुखापत होईल. तशी सगळी मुले हसून परत खेळू लागली.
मी त्यांना इतकी संतापून आणि रागावूनसुद्धा त्यांनी उलट खोड्या न करता मला सॉरी म्हटलं, याचं मला खूपच आश्चर्य वाटलं. आपण नेहमी म्हणतो की नवीन पिढीकडे नितीमत्ता नाही, ते खोटं आहे, तर ! ही मुले तर इतकी सुसंस्कृत आणि मोठ्या मनाची आहेत, की आम्हीही आमच्या लहानपणी इतके नव्हतो. त्यांच्या हातावर काहीतरी चॉकलेट वगैरे ठेवावे काय असा एकदा विचार आला. पण मग वाटलं, तो त्यांच्या चांगुलपणाचा अपमान होईल. सहज मनात आलं, मला जर ऑफिसमध्ये बॉस किंवा इतर कुणी इतकं बोललं असतं, तर मी इतक्या सहजपणे चूक मान्य करून सॉरी म्हटलं असतं का ? कदाचित, होय ! पण कदाचितच !
मी ठरवले, इथून पुढे या मुलांना ओरडण्यापूर्वी शंभर वेळा विचार करायचा. आणि त्यांच्याशी बोलताना जिभेवर साखर ठेवूनच बोलायचे.
मी घरात आले. दहाच मिनिटात चेंबरवाला मालक गेटपाशी येऊन ‘मॅडम, मॅडम..’ म्हणून हाका मारू लागला. मी त्यांना आत बोलावले.
‘काय हो, वाळू कशी काय नेली तुम्ही न सांगता ? आणि त्या मुलांना काय म्हणून न्यायला लावलीत ? ’
‘अरे, आम्ही तुम्हाला नंतर सांगणारच होतो की मॅडम, दोन बादल्या वाळू नेली हो फक्त !’
‘अहो, पण तुम्ही मला विचारायचं नाही का ? मी काय नाही म्हटलं असतं का ? असं कसं कुणाचीपण वस्तू न विचारता नेता ?’ माझा सात्विक संताप अगदी अनावर झाला. तो अशा थाटात बोलत होता की सगळी गल्ली ही त्याचीच मालमत्ता होती.
‘कुणीतरी मुलं वाळू बादल्या भरून नेताहेत हे बघून मी काय समजायचं ? किती नेणार आहेत, कुठं, कशाला, हे कसं समजणार ? मला ती चोरीच वाटणार ना ? मुलं तर मुलं आहेत, पण तुम्ही तर मोठे लोक आहात की ! तुम्ही नको का सांगायला ?’ मी त्याची खरडपट्टी काढली.
‘ओ मॅडम, आमच्याकडे आहे हो वाळू, पण ती टेरेसवर हाय आणि हे गवंडी ती आणायला नाही म्हटले हो.’
‘म्हणजे ? गवंडी नाही म्हटले म्हणून तुम्ही दुसऱ्या कुणाचीतरी वाळू तिसऱ्याच कुणाच्या मुलांना आणायला सांगितली ?’ आता मात्र माझा आश्चर्य आणि संताप घरात मावेनासा झाला. मी सज्जड दम दिला त्यांना, ‘हे बघा, नेलीत ती नेली, इथून पुढे न विचारता मुळीच वाळूला हात लावायचा नाही. समजलं का ?’
ते गेल्यावर मी कोपरापासून हात जोडले. वा रे, वडिलधारे !
कोण जास्त शहाणं आणि सुसंस्कृत, ती लहान मुलं , का ही मोठी माणसे, हा प्रश्न माझ्या मनाला विचारण्याचे धाडस मला झाले नाही !!

संस्कृतीप्रकटनप्रतिक्रियाअनुभव

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Jan 2017 - 7:56 pm | पैसा

काय बोलणार!

त्यांना म्हणावं टेरेसवरुन तुमची वाळू आणून द्या आता. कमाल आहे!

च्यायला, निर्लज्जपणाची हद्द आहे!

त्या लहानग्या मुलांचं कौतुक आहे पण.

सुबोध खरे's picture

27 Jan 2017 - 8:33 pm | सुबोध खरे

हलकट पणाची मर्यादा आहे.

रातराणी's picture

27 Jan 2017 - 11:53 pm | रातराणी

महान आहेत!

कौशी's picture

28 Jan 2017 - 5:53 am | कौशी

निर्लज्ज ...

वयम मोठम खोटम असं म्हणतात ते खरं आहे तर ... छान छोटे वाईट मोठे..
बाकी तुमच्या अपार्टमेंटसमधले वानरसेनेचे उद्योग वाचुन देनिस , मिष्काची आठवले .

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2017 - 1:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं किस्सा !

सगळी मुलं जन्मतः निरागसच असतात... मग वाढता वाढता मोठ्यांच्या कलाकारी पाहून त्यांना बदमाष होण्याचे धडे मिळतात !

संजय पाटिल's picture

28 Jan 2017 - 1:25 pm | संजय पाटिल

छोटे तो छोटे, बडेमियां पण सुभानल्ला..