Without A Trace 3 - Andrew Irvine
भारतीय उपखंड आणि तिबेटचं पठार यांच्या मधोमध उभी ठाकलेली प्रचंड मोठी पर्वतरांग म्हणजे नगाधिराज हिमालय!
भारतीय टॅक्टॉनिक प्लेट आणि युरेशियन प्लेट एकमेकांवर आदळल्यावर निर्माण झालेला हिमालय पर्वत वायव्य - ईशान्य असा पसरलेला आहे. हिमालयाची मुख्य रांग ही वायव्येला पाकिस्तानपासून भारत, तिबेट, नेपाळ ते ईशान्येला भूतानपर्यंत पसरलेली असली तरी या मुख्य रांगेव्यतिरिक्त वायव्येच्या काराकोरम, हिंदकुश आणि पामिर, पूर्वेच्या हेन्गवान, उत्तरेच्या इत्यादी, दक्षिणेच्या शिवालिक इत्यादी पर्वतरांगांचाही हिमालयाच्या घराण्यात समावेश केला जातो. या पर्वतरांगा म्हणजे जगभरातील सर्वोच्चं शिखरांचं माहेरघरच! जगातील ८००० मीटर पेक्षा अधीक उंच असलेली एकूण एक १४ शिखरं (एट थाऊजंडर्स) यापैकी काराकोरम आणि हिमालयाच्या मुख्य रांगेत विखुरलेली आहेत. (त्याबद्दल पुन्हा कधीतरी..)
१८५२ मध्ये कलकत्त्याच्या राधानाथ सिकदरांनी नेपाळच्या सीमेवर असलेलं १५ क्रमांकाचं शिखर हे जगात सर्वोच्चं उंचीचं शिखर असून त्याची उंची २९००२ फूट आहे हे गणिताच्या सहाय्याने सप्रमाण सिद्धं केलं! सिकदरांचं हे गणन चार वर्षांनी सर्वमान्यं झाल्यावर काही वर्षांनी १८६५ मध्ये हिंदुस्तानचे सर्व्हेयर जनरल अँड्र्यू वॉ यांनी आपल्या पूर्वी सर्वेयर जनरल असलेल्या जॉर्ज एव्हरेस्टचं नाव या शिखराला दिलं - माऊंट एव्हरेस्ट!
एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्चं शिखर आहे हे सिद्धं झाल्यावर त्यावर चढाई करण्यासाठी जगभरातल्या गिर्यारोहकांमध्ये चढाओढ लागणार हे उघड होतं. हिंदुस्तानचे राज्यकर्ते असल्याने एव्हरेस्टवर आपला वहिवाटीचा हक्क आहे असा नेहमीप्रमाणे इंग्रजांनी दावा केलाच! त्यातच १९०९ मध्ये रॉब पेरीने उत्तर धृव आणि त्यापेक्षाही १९११-१२ मध्ये रोआल्ड अॅमंडसेनने दक्षिण धृव सर्वप्रथम पादाक्रांत करुन इंग्रजांवर मात केल्याने एव्हरेस्टचं शिखर गाठणं हा ब्रिटीशांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा प्रश्नं झाला होता. परंतु पहिल्या महायुद्धामुळे १९१८ पर्यंत एव्हरेस्टवर कोणतीही मोहीम आखणं अशक्यंच होतं! पहिल्या महायुद्धानंतरही नेपाळ आणि तिबेटच्या सीमा पाश्चात्यांना बंदच असल्याने कोणत्याही बाजूने एव्हरेस्टवर चढाई करणं ही अशक्यं कोटीतली गोष्टं होती.
१९२१ मध्ये तिबेटच्या तत्कालीन दलाई लामांनी ब्रिटीशांना तिबेटमध्ये प्रवेश करुन एव्हरेस्ट गाठण्यास परवानगी दिली. ब्रिटीशांची पहिली मोहीम ही अर्थातच पाहणीच्या दृष्टीनेच आखलेली होती. या पहिल्या मोहीमेत एडवर्ड व्हीलरला पूर्व रॉन्गबुक ग्लेशीयरचा शोध लागला. ग्लेशीयरवरुन जाणा-या मार्गाने २३ सप्टेंबरला जॉर्ज मॅलरी एव्हरेस्ट पर्वताच्या पायथ्याशी पोहोचणारा पहिला गिर्यारोहक ठरला. दुसर्या दिवशी २४ सप्टेंबरला मॅलरी, गाय बुलॉक आणि एडवर्ड व्हीलर यांनी नॉर्थकोलवर पाऊल ठेवलं, परंतु झंझावाती वादळापुढे त्यांना माघार घ्यावी लागली!
जॉर्ज मॅलरी
१९२१ मधली ब्रिटीशांची पहिली मोहीम ही केवळ पाहणीच्या दृष्टीने आखलेली असली तरी १९२२ मधली दुसरी मोहीम ही मात्रं एव्हरेस्टवर चढाईच्या दृष्टीनेच आखण्यात आलेली होती. चार्ल्स ब्रूसच्या नेतृत्वातल्या या मोहीमेत मॅलरी, जॉर्ज इंगल फिंच, एडवर्ड नॉर्टन, हेनरी मोर्सहेड, हॉवर्ड समरवेल या उत्कृष्टं गिर्यारोहकांचा समावेश होता. या मोहीमेत मॅलरी, समरवेल, नॉर्टन आणि मोर्सहेड यांनी विक्रमी ८२२५ मी ( २६९८५ फूट ) उंची गाठली. पाठोपाठ जॉर्ज फिंच आणि ब्रूस ८३२६ मी वर पोहोचले, पण अतीश्रमांमुळे ते परत फिरले. मॅलरी, समरवेल, फिंच यांचा तिसरा प्रयत्न हिमप्रपातात (अॅव्हलॉन्च) सात शेर्पांचा बळी गेल्यावर अर्ध्यात सोडून सर्वांनी मोहीम आवरती घेतली. याच मोहीमेत एव्हरेस्टवर सर्वात प्रथम गिर्यारोहकांनी ऑक्सीजन सिलेंडर्सचा वापर केला होता. परंतु मॅलरीसह अनेकांनी ऑक्सीजन सिलेंडर्स वापरण्यास विरोध दर्शवला होता. ऑक्सीजन सिलेंडर्सचा वापर करणं गिर्यारोहणाच्या परंपरेविरुद्धं आहे असं त्यांचं मत होतं! ब्रिटीशांबरोबरच्या नेपाळी आणि तिबेटी शेर्पांनी तर या सिलेंडर्सची English Air अशी संभावना केली!
१९२२ च्या मोहिमेवरुन इंग्लंडला परतल्यावर मॅलरी आणि फिंच यांनी इंग्लंडभर व्याख्यानांचा दौरा आखला. एव्हरेस्टवर काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन करणं तसंच पुढील मोहीमेच्या दृष्टीने आर्थिक मदत गोळा करणं असा या दौर्याचा दुहेरी हेतू होता. या दौर्यानंतर मॅलरीने अमेरीकेचा तीन महिन्यांचा दौरा केला. अमेरीकेच्या दौर्यावर असताना न्यूयॉर्कमध्ये मॅलरीला विचारण्यात आलं,
"Why do you want to climb Mount Everest?"
"Because it's there!" मॅलरी उत्तरला!
इंग्लंडमध्ये १९२४ मधल्या एव्हरेस्ट मोहीमेची आखणी सुरु झाली होती. १९२२ च्या मोहीमेप्रमाणे जनरल चार्ल्स ब्रूसकडेच या मोहीमेचं नेतृत्वं होतं. मॅलरी, नॉर्टन आणि समरवेल हे मुख्यं गिर्यारोहक होते. उत्कृष्टं गिर्यारोहक असलेल्या फिंचला मात्रं १९२२ च्या मोहीमेत एव्हरेस्टवर रेकॉर्ड उंची गाठूनही वगळण्यात आलं होतं! याचं कारण काय तर फिंचचा नुकताच घटस्फोट झाला होता तसंच त्याने व्याख्यानाचा दौरा करण्यासाठी घसघशीत रक्कम स्वीकारली होती! तत्कालिन आदर्श इंग्रज पुरुषांच्या व्याख्येत तो बसत नाही असं काही इंग्रज ढुढ्ढाचार्यांचं विशेषतः ब्रिटीश माऊंट एव्हरेस्ट कमिटीचा प्रभावशाली सेक्रेटरी आर्थर हिंक्सचं मत पडलं! परंतु फिंचप्रमाणेच मॅलरीनेही व्याख्यानं देण्यासाठी पैसे घेतले होते याकडे हिंक्सने सोईस्करपणे काणाडोळा केला! खरं कारण म्हणजे फिंच ऑस्ट्रेलियन होता आणि एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचणारा पहिला गिर्यारोहक हा ब्रिटीशच असला पाहीजे असा हिंक्सचा अट्टाहास होता! एव्हरेस्टची ही संपूर्ण मोहीम म्हणजे इंग्रजांच्या धैर्याचं प्रतिक असल्याचं तो आग्रही प्रतिपादन करत असे!
मॅलरी, नॉर्टन, समरवेल यांच्याबरोबर गिर्यारोहकांच्या मुख्यं तुकडीमध्ये नोएल ओडेल, बेन्टली बिथॅम, जॉन डी व्हॅर्स-हॅझार्ड आणि अँड्र्यू आयर्विन यांचा समावेश करण्यात आला होता. अवघ्या २२ वर्षांच्या आयर्विनची निवड हिमालयात तरुण रक्ताला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती! फिंचला वगळण्यात आल्याचं कळताच मॅलरीने मोहीमेत सहभागी होण्यास स्पष्टपणे नकार दर्शवला! त्याच्या दृष्टीने फिंचच्या गिर्यारोहणाच्या कौशल्यापुढे बाकीच्या गोष्टी गौण होत्या! मॅलरीचा अनुभव मोहीमेच्या दृष्टीने मोलाचा असल्याने आर्थर हिंक्सने मॅलरीचं मन वळवण्यासाठी थेट इंग्लंडच्या राजघराण्याला साकडं घातलं! खुद्दं राजघराण्याची सूचना नाकारणं शक्यं नसल्याने मॅलरीने मोहीमेवर जाण्यास अखेर होकार दिला!
अँड्र्यू आयर्विन
१९२४ च्या फेब्रुवारीत चार्ल्स ब्रूस आणि नॉर्टन आपल्या दोन सहकार्यांसह पूर्वतयारीच्या दृष्टीने दार्जिलिंगला पोहोचले. मार्चच्या अखेरीस एव्हरेस्टच्या पायथ्याच्या दिशेने अखेरीस मोहीमेला सुरवात झाली. यातुंग - फारी दझाँग - कॅम्पा दझाँग या मार्गाने सर्वजण २३ एप्रिलला शेकर दझाँगला पोहोचले, परंतु मोहीमेचा सर्वाधिकारी चार्ल्स ब्रूस मलेरीयामुळे पुढे जाण्यास असमर्थ ठरला! अखेर मोहीमेचं नेतृत्वं नॉर्टनकडे सोपवून त्याने माघार घेतली! २८ एप्रिलला राँगबक मोनेस्ट्रीच्या लामाची भेट घेऊन दुसर्या दिवशी अखेरीस त्यांनी बेस कँप गाठला.
बेस कँपला दोन दिवस विश्रांती घेतल्यावर ५१०० मीटर्स उंचीवर पहिला कँप उभारण्यात आला. त्यापाठोपाठ ६००० मीटर्सवर दुसरा आणि ६४०० मीटर्सवर कँप ३ - अॅडव्हान्स बेस कँप उभारण्यात आला, परंतु त्यानंतर आठवडाभर वादळामुळे एक पाऊलही पुढे टाकता आलं नाही. अखेर हवामान निवळल्यावर नॉर्टन, मॅलरी, समरवेल आणि ओडेल १९ मेला अॅडव्हान्स बेस कँपवर पोहोचले. दोन दिवसांनी ७००० मीटर उंचीवर नॉर्थ कोलवर चौथा कँप उभारण्यात आला. परंतु पुन्हा एकदा एव्हरेस्टच्या लहरी हवामानाने आपला रंग दाखवला. जॉन हॅझार्ड आणि १२ पोर्टर्स नॉर्थ कोलवर अडकले! दोन दिवसांनी आठ पोर्टर्ससह हॅझार्ड खाली उतरला खरा, पण उरलेल्या चार पोर्टर्सना वाचवण्यासाठी नॉर्टन, मॅलरी आणि समरवेल यांना नॉर्थ कोलवर धाव घ्यावी लागली!
१९२२ च्या मोहीमेप्रमाणेच दोन-दोन गिर्यारोहकांच्या गटांनी एव्हरेस्टवर चढाई करण्याची योजना होती. पहिल्या गटात मॅलरी आणि चार्ल्स ब्रूसचा चुलतभाऊ गिर्यारोहक जेफ्री ब्रूस यांचा समावेश होता. दुसर्या गटाचे शिलेदार होते नॉर्टन आणि समरवेल! ओडेल आणि आयर्विन नॉर्थकोलवरच्या कँप ४ वर तर हॅझार्ड कँप ३ वर सहाय्यकाच्या भूमिकेत तयारीत राहणार होते. तिसरा प्रयत्नं झालाच तर त्यांच्यापैकी कोणालातरी संधी मिळणार होती!
१ जूनला मॅलरी आणि ब्रूस यांनी ९ पोर्टर्ससह चढाईला सुरवात केली. नॉर्थ कोलवरच्या कँप ४ वरुन ७७०० मीटर्सवर कँप ५ उभारण्याची त्यांची योजना होती. परंतु कँप ५ च्या नियोजित जागी पोहोचण्यापूर्वीच एव्हरेस्टच्या जोरदार वार्यांपुढे ४ पोर्ट्॑र्सनी हार पत्करली आणि आपलं ओझं बर्फात तसंच सोडून ते मागे फिरले! ब्रूस आणि एका पोर्टरने ते सामान आणेपर्यंत मॅलरीने कँपच्या उभारणीस सुरवात केली खरी, परंतु दुसर्या दिवशी उरलेल्या ६ पोर्टर्सपैकी तिघांनी ८१७० मीटर्सवरच्या कँप ६ पर्यंत चढाई करण्यास नकार दिला! पोर्टर्सनी असहकार्याचं धोरण पत्करल्यावर मॅलरी आणि ब्रूसने निरुपायाने बेस कँपची वाट धरली.
२ जूनलाच नॉर्टन आणि समरवेल यांनी अॅडव्हान्स बेस कँपवरुन चढाईला सुरवात केली होती. खाली उतरणार्या मॅलरी आणि ब्रूसची गाठ पडल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला! नॉर्टन आणि समरवेलबरोबरच्या सहापैकी दोन पोर्टर्सनीही कँप ५ पासून वर चढाईस नकार दिला, परंतु इतर चार पोर्टर्सनी मात्रं ३ जूनला नॉर्टन-समरवेलसह ८१७० मीटर्सवर कँप ६ उभारला. कँप ६ वरुन दोघांनी पोर्टर्सना परत पाठवलं आणि दुसर्या दिवशी चढाईचा बेत आखला.
४ जूनच्या सकाळी पावणेसातच्या सुमाराला नॉर्टन आणि समरवेलने चढाईला सुरवात केली. हवामान उत्तम होतं. उत्तरेच्या धारेवरुन (नॉर्थ रीज) सुमारे दोनशे मीटर्स उंची गाठल्यावर त्यांच्यासमोर नॉर्थ रीजची सुप्रसिद्ध दुसरी स्टेप उभी ठाकली. या स्टेपला बगल देण्याच्या हेतूने दोघांनी नॉर्थ फेसच्या दिशेने चढाईस सुरवात केली (ट्रॅव्हर्स), परंतु इतक्या उंचीवर आणि ऑक्सीजन सिलेंडर्सविना चढाई करत असल्याने दोघांना अनेकदा विश्रांतीसाठी थांबावं लागत होतं. दुपारी बाराच्या सुमाराला तर समरवेलला एक पाऊलही पुढे टाकणं अशक्यं झालं होतं! त्याने नॉर्टनला पुढे जाण्याची सूचना केली आणि नॉर्टनची वाट पाहण्याच्या हेतूने तिथेच बर्फात बैठक मारली! समरवेल मागे पडल्यावरही नॉर्टनची आगेकूच सुरुच होती. दुसर्या स्टेपला पूर्णपणे वळसा घालून अखेर नॉर्टन बर्फाच्या एका मोठ्या घळीपाशी पोहोचला. ही घळ शिखराच्या अंतिम टप्प्यात असलेल्या उतारावरुन थेट खाली उतरत होती. नॉर्टनने या घळीतून चढाई करत ८५९० मीटर्स इतकी उंची गाठली. दरम्यान मागे थांबलेल्या समरवेलचं नॉर्टनवर बारीक लक्षं होतं. नॉर्टन ८५९० मीटर्सवर असताना समरवेलने त्याचा एक अप्रतिम फोटो काढण्यात यश मिळवलं! नॉर्टन चढून गेलेल्या या घळीला पुढे त्याचंच नाव देण्यात आलं. नॉर्टन कॉलोर!
एव्हरेस्टच्या शिखरापासून नॉर्टन केवळ २८० मीटर्स इतक्या कमी उंचीवर होता, परंतु समरवेलप्रमाणेच त्यालाही पुढे चालणं अशक्यं झालं. मागे फिरुन दुपारी दोनच्या सुमाराला त्याने समरवेलला गाठलं आणि दोघं परत फिरले. खाली उतरत असताना अचानक समरवेलला श्वास घेण्यास अडचण जाणवू लागली. कोणतीही हालचाल करणं त्याला अशक्यं झालं होतं! बर्फात बसकण मारुन तो मृत्यूची प्रतिक्षा करु लागला! शेवटचा उपाय म्हणून त्याने दोन्ही हातांनी छाती गच्चं आवळून धरली! नेमक्या या हालचालीमुळे अचानकपणे त्याचा श्वास मोकळा झाला आणि त्याचे प्राण वाचले! कसाबसा स्वतःला सावरुन तो पुन्हा आपल्या मार्गाला लागला!
नॉर्टनला या प्रकाराची काहीही कल्पना नव्हती! समरवेलने त्याला गाठून सगळा प्रकार सांगितल्यावर तो उडालाच! दोघांनी कँप ५ गाठला पण तिथे न थांबता त्यांनी कँप ४ ची वाट धरली.
कँप ४ वर त्यांच्या स्वागताला हजर होता जॉर्ज मॅलरी!
नॉर्टन आणि समरवेल एव्हरेस्टवर चढाईच्या इराद्याने गेलेले असताना मॅलरीने अॅडव्हान्स बेस कँप गाठला होता आणि ऑक्सिजन सिलेंडर्ससह तो कँप ४ वर परतला होता. सुरवातीला ऑक्सिजन सिलेंडर्सला नाक मुरडणार्या मॅलरीला आता त्यांच्या उपयुक्ततेची खात्री पटली होती! याला कारण होता तो म्हणजे अँड्र्यू आयर्विन! इंजिनियरींगचा विद्यार्थी असलेल्या आयर्विंगने ऑक्सिजन सिलेंडर्समध्ये असलेले अनेक तांत्रिक दोष दूर केले होते. ऑक्सिजनच्या वापरामुळे १९२२ च्या मोहीमेत फिंच आणि ब्रूस यांनी विक्रमी उंची गाठल्याचं मॅलरीच्या स्मरणात होतं. मॅलरीने अँड्र्यू आयर्विनच्या जोडीने ऑक्सिजन सिलेंडर्सचा वापर करुन चढाईचा तिसरा प्रयत्न करण्याची योजन नॉर्टनसमोर मांडली. चार्ल्स ब्रूसच्या माघारीनंतर नॉर्टनकडे मोहीमेचं नेतृत्वं आलं होतं. मॅलरी एव्हरेस्ट मोहीमेचा प्रमुख अनुभवी गिर्यारोहक होता. त्यामुळे आयर्विनच्या साथीने चढाई करण्याचा प्रस्ताव त्याने मांडल्यावर हिमालयात गिर्यारोहणाचा आयर्विनला अनुभव नसूनही नॉर्टनने मॅलरीच्या बेतास होकार दिला.
६ जूनला मॅलरी आणि आयर्विन कँप ५ वर पोहोचले. त्यांच्या जोडीला पाच पोर्टर्सही होते. दुसर्या दिवशी सकाळी चार पोर्टर्ससह त्यांनी कँप ६ गाठला. दरम्यान नोएल ओडेल एका पोर्टरसह अॅडव्हान्स बेस कँपवरुन कँप ५ वर येऊन थडकला. मॅलरी-आयर्विनला आवश्यक ते सहाय्य करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. ओडेल कँप ५ वर पोहोचल्यावर काही वेळातच कँप ६ वर गेलेले चार पोर्टस खाली उतरुन आले. मॅलरीने त्यांच्याजवळ ओडेलसाठी चिठी दिली होती. मॅलरीने चिठीत लिहीलं होतं,
Dear Noel,
We'll probably start early to-morrow (8th) in order to have clear weather. It won't be too early to start looking out for us either crossing the rockband under the pyramid or going up skyline at 8.0 p.m.
Yours ever
G Mallory
मॅलरीने चिठीत 8 a.m च्या ऐवजी चुकून 8 p.m असा उल्लेख केलेला होता.
८ जूनच्या सकाळी ओडेलने कँप ५ मधून चढाईस सुरवात केली. एव्हरेस्टच्या परिसरातील प्रदेशांची निरीक्षणं नोंदवणं आणि मॅलरी-आयर्विन यांच्या मोहीमेचं अवलोकन करणं आणि जरुर पडल्यास त्यांच्या मदतीला जाणं असा त्याच्या मोहीमेचा दुहेरी हेतू होता. ओडेलची चढाई सुरु असताना एव्हरेस्टच्या आग्नेय धारेवर (नॉर्थ-ईस्ट रि़ज) पूर्णपणे धुक्याचं आवरण होतं. दुपारी १२.५० ला मात्रं अचानक धुकं निवळलं. ओडेल यावेळेस ७९०० मीटर्स उंचीवर पोहोचला होता. एव्हरेस्टच्या आग्नेय धारेवर नजर टाकल्यावर त्याला शिखराचा उतार आणि शिखर स्पष्टपणे दिसत होतं. एव्हरेस्टच्या धारेवर असलेल्या तीन खडकाळ स्टेप्सही त्याच्या नजरेने टिपल्या होत्या.
ओडेलच्या निरीक्षणानुसार दुसर्या स्टेपच्या पायथ्यापाशी दोन काळे ठिपके त्याच्या दृष्टीस पडले. दोघांपैकी एकाने दुसर्या स्टेपचा पायथा गाठला आणि पाच मिनीटांत स्टेपची चढाई पूर्ण केली आणि तो स्टेपच्या माथ्यावर पोहोचला. हे दोघं म्हणजे मॅलरी-आयर्विन असणार याबद्द्ल ओडेलला कोणतीच शंका नव्हती. दोघांपैकी एकाने दुसर्या स्टेपचा माथा गाठला, परंतु दुसरा गिर्यारोहकही पहिल्याप्रमाणेच दुसरी स्टेप चढून वर पोहोचला किंवा नाही याबद्दल ओडेलची खात्री नव्हती. ओडेलचं निरीक्षण सुरु असतानाच पुन्हा एकदा एव्हरेस्टचं शिखर आणि तिन्ही स्टेप्स धुक्यात गडप झाल्या!
एव्हरेस्टवर पुन्हा धुक्याचं आवरण पसरल्यावर ओडेलने पुन्हा चढाईला सुरवात केली आणि कँप ६ गाठला. कँप ६ वरचं सगळं सामान अस्ताव्यस्तं पसरलेलं होतं. ओडेल कँप ६ वर पोहोचल्यावर थोड्याच वेळात - दुपारी २ च्या सुमाराला जोरदार हिमवादळाला सुरवात झाली. मॅलरी-आयर्विनला कँप ६ ची दिशा कळावी म्हणून तशा वादळातही तंबूच्या बाहेर जाऊन त्यांच्या नावाने हाका मारण्याचा आणि शिट्टी वाजवून त्यांना इशारे करण्याचा ओडेलने आकांती प्रयत्नं चालवला होता. परंतु अखेर बर्फाच्या मार्यापुढे माघार घेऊन तो तंबूत परतला.
दुपारी ४ वाजता हिमवादळाचा जोर ओसरल्यावर ओडेलने पुन्हा बाहेर जाऊन एव्हरेस्टच्या शिखराच्या दिशेने मॅलरी-आयर्विनचा शोध घेण्याचा प्रयत्नं केला, पण दोघांचीही कोणतीही खूण त्याला आढळून आली नाही. कँप ६ वर असलेल्या तंबूमध्ये केवळ २ माणसांनाच आश्रय घेणं शक्यं असल्याने मॅलरीने ओडेलला कँप ५ वर परतण्याची सूचना दिली होती. दुपारी साडेचारच्या सुमाराला ओडेलने कँप ६ सोडला आणि कँप ५ च्या दिशेने खाली उतरण्यास सुरवात केली. कँप ५ मध्ये न थांबता संध्याकाळी ६.४५ ला त्याने कँप ४ गाठला. रात्रभरात कधीतरी मॅलरी आणि आयर्विन कँप ६ वर परतून येतील अशी त्याची अपेक्षा होती.
९ जूनच्या सकाळपर्यंत मॅलरी-आयर्विनकडून कोणताच संदेश न आल्याने आणि दोघांची कोणतीही खूण न आढळल्याने ओडेलने दोन पोर्टर्ससह पुन्हा चढाईला सुरवात केली आणि दुपारी ३.३० ला कँप ५ गाठून तिथे मुक्काम ठोकला. १० जूनच्या सकाळी ओडेल एकटाच कँप ६ वर पोहोचला, परंतु मॅलरी-आयर्विन अद्यापही परतलेले नाहीत असं त्याला आढळून आलं. ओडेलने ८२०० मीटर्सपर्यंत चढाई करुन दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्नं केला, पण दोघांच्या अस्तित्वाची पुसटशी खूणही त्याच्या दृष्टीस पडली नाही. कँप ६ च्या बाहेर असलेल्या बर्फात ब्लँकेट्सच्या सहाय्याने दोघांचा कोणताही तपास लागत नाही आणि कोणतीही आशा नाही (No trace can be found, Given up hope!) असं सूचित करणारी खूण करुन ठेवली आणि कँप ५ च्या दिशेने उतरण्यास सुरवात केली. कँप ५ वरच्या दोघा पोर्टर्ससह संध्याकाळी तो कँप ४ वर परतला. ११ जूनच्या सकाळी नॉर्टन आणि कंपनीने एव्हरेस्टवरुन परतीची वाट धरली.
मॅलरी आणि आयर्विन यांच्या संदर्भात सर्वात शेवटचं निरीक्षण नोएल ओडेलने नोंदवलेलं होतं. त्याच्या निरीक्षणानुसार मॅलरी-आयर्विन दुपारी १२.५० ला दुसर्या स्टेपच्या पायथ्याशी होते. मॅलरीने चिठीत नमूद केलेल्या वेळेपेक्षा (सकाळी ८.०० वाजता) ते सुमारे पाच तास उशीराने एव्हरेस्टच्या उतारावर पोहोचले होते. नोव्हेंबर १९२४ मध्ये आपल्या सुरवातीच्या रिपोर्टमध्ये त्याने मॅलरी आणि आयर्विनला दुसर्या स्टेपपाशी पाहिल्याचं स्पष्टपणे नमूद केलं होतं.
ओडेलच्या या निरीक्षणावर अनेक गिर्यारोहकांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. तिबेटच्या मार्गाने एव्हरेस्टच्या चढाईत दुसरी स्टेप हा सर्वात कठीण टप्पा आहे. सुमारे ४० मीटर उंचीच्या या स्टेपचा शेवटचा पाच मीटरचा भाग हा सरळसोट तुटलेला कडा आहे. १९२४ मध्ये तर या स्टेपवर चढाई करणं अत्यंत कठीण आहे असं मानलं जात होतं. ओडेलच्या प्रतिपादनानुसार केवळ पाच मिनीटांत ही स्टेप चढणं तर निव्वळ अशक्यप्राय गोष्टं होती. बहुसंख्य गिर्यारोहकांच्या मतानुसार ओडेलने मॅलरी-आयर्विनला पहिल्या स्टेपच्या पायथ्याशी पाहिलं असण्याची शक्यता जास्तं होती. पहिली स्टेप तुलनेने तशी सोपी असून पाच मिनीटांत पार करणं मॅलरीसारख्या अनुभवी गिर्यारोहकाला अगदी सहज शक्यं होतं.
जगभरातल्या गिर्यारोहकांसमोर आणि संशोधकांसमोर आता दोन प्रश्नं उभे ठाकले -
मॅलरी आणि आयर्विन यांचं नेमकं काय झालं?
आणि
मॅलरी आणि आयर्विन एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचले का?
ओडेलला मॅलरी आणि आयर्विन एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचल्याची पक्की खात्री होती. परंतु त्याच्या निरीक्षणांवर अनेक प्रश्नचिन्हं उभी राहील्यावर १९२५ मध्ये त्याने दोघांना दुसर्या स्टेपऐवजी पहिल्या स्टेपच्या पायथ्याशी पाहिल्याचं स्पष्टं केलं! १९३३ मधल्या ह्यू रटलेजच्या मोहीमेत घेतलेल्या फोटोंचं बारकाईने निरीक्षण केल्यावर पुन्हा मॅलरी-आयर्विनला दुसर्या स्टेपपाशी पाहिल्याचा त्याने दावा केला! ओडेलच्या प्रत्येक रिपोर्टमध्ये हवामानाची निरीक्षणंही वेगवेगळी होती! १९२४ मध्ये एव्हरेस्टचं शिखर आणि आग्नेय धारेवर संपूर्णपणे धुकं पसरल्याचा दावा करणार्या ओडेलने १९२५ मध्ये फक्तं एव्हरेस्टचं शिखर आणि वरच्या उतारांवरच धुकं पसरल्याचा दावा केला होता!
१९३३ मध्ये ह्यू रटलेजच्या नेतृत्वात पुन्हा इंग्लिश गिर्यारोहक एव्हरेस्टवर आले. ३० मे च्या पहाटे लॉरेन्स वॅगर आणि पर्सी वेन-हॅरीस यांनी नॉर्थकोल वरच्या कँप ५ वरुन एव्हरेस्टवर चढाईस प्रारंभ केला. चढाईला सुरवात केल्यावर अवघ्या तासाभरात एव्हरेस्टच्या आग्नेय धारेच्या साठ फूट खाली असलेल्या खडकाळ-बर्फाळ उतारावर वेन-हॅरीसला एक विलक्षण गोष्टं आढळली..
आईस एक्स!
या आईस एक्सच्या दांड्यावर असलेल्या तीन विशिष्टं प्रकारच्या खाचांवरुन ती आयर्विनची असल्याचं सिद्धं झालं!
१९३६ मध्ये एव्हरेस्टच्या मोहीमेवर असताना आपल्याला एक मृतदेह आढळल्याचा फ्रँक स्मिथने एडवर्ड नॉर्ट्नला लिहीलेल्या पत्रात उल्लेख केला होता. परंतु स्मिथच्या सूचनेनुसार नॉर्टनने या पत्राला प्रसिद्धी देणं टाळलं होतं. स्मिथ म्हणतो,
"I was scanning the face from base camp through a high-powered telescope...when I saw something queer in a gully below the scree shelf. Of course it was a long way away and very small, but I've a six/six eyesight and do not believe it was a rock. This object was at precisely the point where Mallory and Irvine would have fallen had they rolled on over the scree slopes,"
१९५३ मध्ये एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केल्यावर शिखरावरुन परतण्यापूर्वी मॅलरी आणि आयर्विन यांच्या काही खुणा आढळतात का याचा तपास केला, परंतु दोघांची कोणतीही खूण त्यांना आढळली नाही. अर्थात या दोघांपैकी कोणी एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचलं असलं तरी त्याच्या काहीही खुणा २९ वर्षांनी आढळण्याची शक्यता खूपच कमी होती.
१९७५ मध्ये चीनी गिर्यारोहक एव्हरेस्टच्या मोहीमेवर होते. एव्हरेस्टच्या आग्नेय धारेवर ८१०० मीटर्सवर या गिर्यारोहकांचा कँप होता. या गिर्यारोहकांपैकी वँग हन्गबो नुकताच तंबूच्या बाहेर बर्फात एक फेरफटका मारुन आला होता. तंबूत परतल्यावर झँग जुन यांग या आपल्या सहकार्याला त्याने आपल्याला एका युरोपियन गिर्यारोहकाचा मृतदेह आढळल्याचं सांगितलं! झँग जुन यांगच्या मताप्रमाणे वँग सुमारे वीस मिनीटांनी परतला होता. त्या मृतदेहाजवळ आढळेली आईस एक्सही वँगने उचलली होती! दुर्दैवाने दुसर्याच दिवशी हिमप्रपातात (अॅव्हलाँच) वँगचा मृत्यू झाल्याने त्याला मृतदेह आढळून आलेली नेमकी जागा गुलदस्त्यातच राहीली!
वँगला आढळलेला मृतदेह कोणाचा होता?
मॅलरी का आयर्विन?
१९९९ मध्ये मॅलरी आणि आयर्विनच्या शोधार्थ बीबीसी आणि नोव्हा या टीव्ही शोच्या निर्मात्यांनी एरिक सिमन्सनच्या नेतृत्वात एव्हरेस्टवर शोधमोहीम आखली. सिमन्सनच्या या मोहीमेत संशोधक जोकेन हेम्लेब आणि कॉनरॅड अँकर, डेव्ह हान, जेक नॉर्टन, अँडी पोलीट्झ आणि टॅप रिचर्ड्स या गिर्यारोहकांचा समावेश होता. वॅंग हन्गबोच्या माहितीवरुन आयर्विनच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयर्विनने एव्हरेस्टवर नेलेला कॅमेरा शोधण्याचा त्यांचा इरादा होता. आयर्विनचा कॅमेरा सापडल्यास आणि त्यात शिखरावरचे फोटो सापडल्यास मॅलरी आणि आयर्विन सर्वप्रथम एव्हरेस्टवर पोहोचल्याचं सिद्धं होणार होतं.
१ मे ला अँकर, हान, नॉर्टन, पोलीट्झ आणि रिचर्ड्स ८१०० मीटर्सवरच्या भागात शोध घेत होते. अँकरला एक मृतदेह आढळून आला, परंतु त्याच्याजवळ असलेल्या गिर्यारोहणाच्या साहित्याचं निरीक्षण केल्यावर तो आयर्विनचा असण्याची शक्यताच नव्हती. सुमारे तासाभराने अँकरला आणखीन एक मृतदेह आढळला. या मृतदेहाचं निरीक्षण केल्यावर हा आयर्विनचा मृतदेह असावा याबद्दल अँकरची खात्री पटली. आपल्या सहकार्यांना आणि बेसकँपवर असलेल्या सिमन्सन आणि हेम्लेब यांना त्याने सांकेतिक भाषेत संदेश पाठवला,
"I've got a thermos of Tang juice and some Snicker bars. Why don't you guys come down and have a little picnic with me? Over."
कॉनरॅड अँकर
हान, नॉर्टन, पोलीट्झ आणि रिचर्ड्स काही वेळातच अँकरपाशी पोहोचले. त्यांच्यासमोर असलेला मृतदेह निश्चितपणे आयर्विनचा असावा अशी सर्वांची खात्री पटली होती. त्या मृतदेहाच्या कपड्यांची पाहणी करताना सर्वात आतल्या कॉटनच्या शर्टवर त्यांना डब्ल्यू एफ पेन हे लेबल आढळलं आणि त्याखाली शर्टच्या मालकाचं नाव होतं...
जॉर्ज मॅलरी!
आतापर्यंत आयर्विनचा समजून त्या मृतदेहाची तपासणी सुरु होती, परंतु तो मृतदेह प्रत्यक्षात मॅलरीचा निघाला होता!
अँकर आणि पोलीट्झ यांनी मॅलरीच्या मृतदेहाची आणि कपड्यांची कसून तपासणी केली. मॅलरीच्या उजव्या पायचं हाड मोडलं होतं. त्याला डाव्या पायाचा आधार दिलेला दिसून येत होता. मॅलरीच्या कपाळावर मधोमध गोल्फच्या चेंडूच्या आकाराची जखम आढळली होती. परंतु त्याच्या बाकीच्या देहाची विशेष मोडतोड झालेली दिसत नव्हती. त्यावरुन तो बर्फात कोसळला असलाच तर फार उंचीवरुन कोसळला नसावा असा अँकर आणि इतरांनी तर्क केला. मॅलरीच्या कमरेभोवती बराच दोर हार्नेसप्रमाणे गुंडाळलेला आढळून आला. त्याच्या कमरेभोवती असलेल्या दोराला जोरदार हिसका बसल्याच्या खुणा आढळल्याने मॅलरी आणि आयर्विन दोघंही एकमेकांशी दोराने संलग्न असावेत असं अँकरने अनुमान काढलं.
अँकर आणि त्याच्या सहकार्यांनी मॅलरीची तपासणी आटपल्यावर त्याचा मृतदेह बर्फात पुरला आणि त्याला श्रद्धांजली वाहून त्यांनी परतीची वाट धरली.
जॉर्ज मॅलरीवर अंत्यसंस्कार करताना अँडी पोलीट्झ, टॅप रिचर्ड्स आणि कॉनरॅड अँकर
परंतु अँकर आणि त्याच्या सहकार्यांना केवळ मॅलरीचा मृतदेहचा आढळला नव्हता!
पहिल्या स्टेपच्या सुमारे १८० मीटर आधी एक रिकामा ऑक्सिजन सिलेंडरही आढळून आला होता!
मॅलरीचा मृतदेह आणि त्याच्याजवळ सापडलेल्या चीजवस्तूंचं निरीक्षण केल्यावर मॅलरी-आयर्विन एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचले अथवा नाही हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला.
मॅलरीच्या मृतदेहाजवळ अँकरला एक अल्टीमीटर, स्नोगॉगल्स आणि एक पॉकेट नाईफ आढळून आली होती. मॅलरी आणि आयर्विनने आपल्या बरोबर घेतलेला कोडॅकचा छोटासा कॅमेरा अत्यंत काळजीपूर्वक शोध घेऊनही त्यांना सापडला नाही. मॅलरीने आपल्या पत्नीचा - रुथचा - फोटो स्वतःजवळ बाळगला होता. एव्हरेस्टचं शिखर पादाक्रांत केल्यावर तो फोटो शिखरावर ठेवण्याची त्याची मनिषा होता. मॅलरीच्या कपड्यांमध्ये हा फोटोही आढळून आला नव्हता.
रुथ मॅलरीचा फोटो जॉर्जजवळ न आढळल्यावर तो एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचल्याची मॅलरी समर्थकांची पक्की खात्री झाली. एव्हरेस्टच्या मोहीमेच्या वेळेस मॅलरीकडे दोन स्नोगॉगल्स होते असं त्याच्या अनेक फोटोंमध्ये दिसून आलं होतं. त्यामु़ळे मॅलरी रात्रीच्या वेळेस खाली उतरला नसून एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचल्यावर परत येताना वादळात सापडला असावा असा तर्क मांडण्यात आला. अँकरच्या सहकार्यांना सापडलेला ऑक्सिजन सिलेंडर हा १९२४ मधल्या मोहीमेतलाच एक सिलेंडर असल्याचं सिद्धं झालं. हा सिलेंडर मॅलरीनेच वापरला असावा असा तर्क मांडण्यात आला.
२००१ मध्ये सिमन्सन आणि अँकर आपल्या सहकार्यांसह पुन्हा आयर्विनच्या शोधार्थ एव्हरेस्टवर आले. यावेळी अँकरला मॅलरी-आयर्विनचा १९२४ च्या मोहीमेतला तंबू आढळून आला. मात्रं या तंबूत बारकाईने तपासणी केल्यावरही आयर्विन किंवा त्याच्या कॅमेर्याची पुसटशी खूणही आढळून आली नाही! अँकर आणि त्याच्या सहकार्यांना १९७५ च्या मोहीमेतला वँग आणि झँग जुन यांगचा तंबूही आढळला. या तंबूच्या परिसरात कसून शोध घेऊनही आयर्विनचा मृतदेह कुठेही आढळला नाही.
एव्हरेस्टवर चढण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा अडथळा होता तो म्हणजे दुसरी स्टेप!
१९६० मध्ये चिनी गिर्यारोहकांनी अगदी शेवटच्या टप्प्यात एकमेकाच्या खांद्यावर उभं राहून ही स्टेप पार केली होती आणि एव्हरेस्टचं शिखर गाठलं होतं. १९७५ च्या मोहीमेत हा अवघड टप्पा पार करण्यासाठी चिन्यांनी तिथे अॅल्युमिनीयमची शिडी लावली होती. १९९९ च्या मोहीमेत अँकरने ही शिडी न वापरता स्टेप पार करण्यात यश मिळवलं होतं. त्याच्या मतानुसार ही स्टेप कोणत्याही मदतीविना - सोलो - पार करणं मॅलरीच्या आवाक्याबाहेर होतं. २००१ मध्ये थिओ फ्रिश्चने ही चढाई केल्यावर मॅलरीने ही स्टेप ओलांडली असण्याची शक्यता व्यक्तं केली होती. २००७ मध्ये अँकर आणि लिओ हाऊल्डींग यांनी पुन्हा दुसर्या स्टेपवर यशस्वी चढाई केली. फ्रिश्चप्रमाणे मॅलरी ही स्टेप चढण्यात यशस्वी झाला असावा असं हाऊल्डींगचं मत होतं. चिनी गिर्यारोहकांप्रमाणेच आयर्विनच्या खांद्यावर चढून मॅलरीने ही स्टेप पार केली असावी असं त्याने अनुमान काढलं.
मॅलरी आणि आयर्विनच्या मोहीमेत ऑक्सिजनचा वापर हा एक महत्वाचा भाग होता. ८१७० मीटर्सवरच्या त्यांच्या अखेरच्या कँपपासून एव्हरेस्टच्या शिखरावर चढाई करुन पुन्हा परत येण्यास किमान दहा ते अकरा तास लागणार होते. मॅलरी आणि आयर्विन दोघांनीही प्रत्येकी दोन ऑक्सिजन सिलेंडर्स नेले असते तरीही त्यांच्याजवळ आठ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन असणार होता. मॅलरी-आयर्विनच्या ऑक्सिजन सिलेंडर्सपैकी एक सिलेंडर पहिल्या स्टेपच्या पायथ्याशी आढळला होता. या सिलेंडरचा विचार करता दुसर्या स्टेपच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत दोघांकडे प्रत्येकी केवळ दीड तास पुरेल इतका ऑक्सिजन शिल्लक राहू शकत होता. दुसरी स्टेप चढण्यात मॅलरी-आयर्विन यशस्वी झाले असले तरी सतत वाढत्या उंचीपुढे हा ऑक्सिजन त्यांना पुरणार नव्हता.
मॅलरीने पोर्टर्सबरोबर पाठवलेल्या चिठीत दोन सिलेंडर्ससह चढाईचा इरादा व्यक्तं केला होता. त्यावरुन मॅलरी आणि आयर्विनकडे कँप ६ वर प्रत्येकी तीन ऑक्सिजन सिलेंडर्स असावेत असाही एक तर्क मांडण्यात आला. मॅलरी-आयर्विन दोघांनीही प्रत्येकी तीन सिलेंडर्स नेल्यास त्यांना एव्हरेस्ट गाठून परतण्यास पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध झाला असता यात शंका नाही. परंतु केवळ दोन ऑक्सिजन सिलेंडर्सचं वजन घेऊन चढण्यासही मॅलरी नाखूश होता त्यामुळे तीन सिलेंडर्ससह त्याने चढाई केली असेल याची शक्यता खूपच कमी आहे.
यातूनच आणखीन एक प्रश्नं निर्माण होतो, तो म्हणजे मॅलरीने आयर्विनचा ऑक्सिजन सिलेंडर घेऊन चढाई केली होती का?
मॅलरी आणि आयर्विनने प्रत्येकी दोन सिलेंडर्स नेले असल्यास दुसर्या स्टेपच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत दोघांकडे प्रत्येकी दीड तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक उरणार होता. मॅलरीने आयर्विनचा सिलेंडर घेऊन एव्हरेस्टवर चढाई केली असं क्षणभरासाठी मानलं तरी शिखर गाठून परत येण्यास तो ऑक्सिजन अपुरा होता.
जॉर्ज मॅलरी खरंच एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचला होता का?
आणि
अँड्र्यू आयर्विनचं काय झालं?
जर्मन गिर्यारोहक टॉम हॉल्झेलच्या तर्कानुसार पहिल्या स्टेपच्या आधीच एक ऑक्सिजन सिलेंडर संपल्यावर उपलब्धं ऑक्सिजनच्या सहाय्याने दोघांनाही एव्हरेस्टचं शिखर गाठणं शक्यं नाही याची मॅलरीला कल्पना आली असावी. आयर्विनचा भरलेला ऑक्सिजन सिलेंडर घेऊन मॅलरीने त्याला तिथेच थांबण्याची सूचना केली आणि पुढे चढाईला सुरवात केली. दुसरी स्टेप चढून जाण्याऐवजी मॅलरीने नॉर्टन कॉलोरमार्गे चढाईचा प्रयत्न केला, परंतु नॉर्टनप्रमाणेच त्यालाही माघार घ्यावी लागली. मॅलरी खाली उतरून आयर्विनपाशी आला तेव्हा तो कमालीचा दमलेला असावा. आयर्विन मात्रं विश्रांती घेऊन बर्यापैकी सुस्थितीत होता. मॅलरी परत येताच एव्हरेस्ट आणि परिसराचे फोटो घेण्याच्या दृष्टीने पहिल्या स्टेपवर चढाई करण्याचा त्याने प्रस्ताव मांडला, परंतु अतिश्रमाने दमलेल्या मॅलरीला ही चढाई शक्यं नसल्याने आयर्विनने ती जबाबदारी घेतली. नेमक्या याच वेळेस धुक्याचा पडदा दूर झाल्याने ओडेलला मॅलरी आणि आयर्विन पहिल्या स्टेपच्या पायथ्याशी दिसून आले. ओडेलने स्टेपवर चढताना पाहिलेला गिर्यारोहक हा मॅलरी नसून आयर्विन होता! परत खाली उतरुन येताना हिमवादळात सापडल्यामुळे मॅलरी आणि आयर्विन वाचू शकले नाहीत.
आपल्या या तर्कानुसार आयर्विनची आईस एक्स जिथे सापडली तिथेच मॅलरी-आयर्विन किंवा दोघांपैकी एक - बहुधा आयर्विन कोसळला असावा असा होल्झेलचा तर्क होता. या अपघातात मॅलरी आणि आयर्विन यांना जोडणारा दोर तुटल्याने मॅलरीचीही घसरण झाली. यलो बँडमधून खाली घसरताना आपली आईसएक्स वापरुन घसरण थांबवण्याचा मॅलरीचा प्रयत्नं करत होता. परंतु दोन्ही हातांनी पुढ्यात धरलेली आईस एक्स दगडावर आपल्याने उलट फिरुन मॅलरीच्या कपाळावर आदळल्याने मॅलरीला मृत्यू आला असा होल्झेलचा तर्क होता. आयर्विनला झालेल्या अपघातापासून सुमारे ३०० मीटर खाली मॅलरीचा मृतदेह आढळूनही त्याच्या शरीराची फारशी मोडतोड झाली नव्हती कारण मॅलरी त्यानंतरही सुस्थितीत होता आणि आईस एक्स कपाळावर आदळल्याने त्याचा मृत्यू झाला असं होल्झेलने प्रतिपादन केलं.
होल्झेलच्या या तर्कामध्ये काहीसा गोंधळात पाडणारा एक मुद्दा म्हणजे आयर्विनची आईस एक्स जिथे आढळून आली तो आग्नेय धारेचा भाग! या भागात अपघात होऊन गिर्यारोहक कोसळण्याची शक्यता जवळजवळ सर्वच अनुभवी गिर्यारोहकांनी फेटाळली आहे. तसंच इथे अपघात झालाच तर मॅलरीच्या कंबरेला दोराचा जोरदार हिसका बसल्याची खूण उमटण्याचं कोणतंही तर्कसंगत स्पष्टीकरण देता येत नाही. कँप ६ कडे परतण्याच्या दृष्टीने बर्फाळ प्रदेशातून मार्गक्रमणा करण्यासाठी आईस एक्स आवश्यक असल्याने आयर्विनने आईस एक्स तिथे सोडली असण्याची शक्यताच नव्हती.
आणखीन एका तर्कानुसार मॅलरी आणि आयर्विन यांनी दुसर्या स्टेपचा पायथा गाठल्यावर दोघांपैकी एकाच गिर्यारोहकाला पुढे चढाई करणं शक्य असल्याचं स्पष्टं झालं होतं. आयर्विनने आपल्या खांद्यावर चढून दुसरी स्टेप ओलांडण्याची मॅलरीला सूचना दिली आणि आपला ऑक्सिजन सिलेंडरही मॅलरीच्या हवाली केला. मॅलरी दुसरी स्टेप चढून गेल्यावर त्याने कँप ६ वर परतण्याची सूचना दिलेली असतानाही आयर्विनने दुसर्या स्टेपच्या खालीच त्याची वाट पाहत थांबण्याचा निर्णय घेतला. मॅलरी आणि आयर्विनला एव्हरेस्टचं शिखर अगदी जवळ आणि स्पष्टं दिसत होतं आणि अनुभवी गिर्यारोहक असलेला मॅलरी फारतर दोन-तीन तासात एव्हरेस्ट सर करुन सहज परत येऊ शकत होता. एव्हाना दुपारचे १२.५० वाजले होते आणि दुसर्या स्टेपवर चढत असलेला मॅलरीच ओडेलच्या दृष्टीस पडला होता.
दुसरी स्टेप चढून गेल्यावर मॅलरीने शिखराच्या दिशेला चढाईला प्रारंभ केला. जवळ दिसत असलेलं एव्हरेस्टचं शिखर प्रत्यक्षात बरंच दूर असल्याचं मॅलरीच्या ध्यानात आलं पण तरीही त्याने चढाईतून माघार घेतली नाही. मॅलरी एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचला असावा किंवा परत फिरला असावा... परंतु त्याची पुन्हा आयर्विनशी गाठ पडली नसावी. आयर्विनला कँप ६ वर परतण्याची सूचना दिलेली असल्याने आणि आयर्विनच्या मदतीविना दुसरी स्टेप उतरणं निव्वळ अशक्यं असल्याने मॅलरीने नॉर्टन कॉलोरचा मार्ग धरला. एव्हाना अंधार पडल्याने आणि अतिश्रमांनी मॅलरीच्या मनावरचा ताबा सतत उडत होता. त्या मनस्थितीतच यलो बँडमधून उतरताना तो घसरला आणि आईस एक्सने आपली घसरण थांबवण्याच्या प्रयत्नात दगडाला अडखळलेली आईस एक्स कपाळावर आपटल्याने तो प्राणास मुकला.
दुसर्या स्टेपखाली मॅलरीची वाट पाहत थांबलेल्या आयर्विनने अखेर अंधार पडू लागल्यावर खाली उतरण्याचा निर्णय घेतला, परंतु एव्हाना त्याचीही अवस्था मॅलरीसारखीच झाली असावी. त्यातच आयर्विनला हिमालयात चढाईचा अजिबात अनुभव नव्हता. पहिली स्टेप उतरुन आल्यावर जिथे आयर्विनची आईस एक्स सापडली तिथे अतिश्रमांनी आणि हाय अल्टीट्यूड पल्मनरी एडेमामुळे आयर्विनला मृत्यू आला.
या तर्कानुसार विचार केल्यास १९७५ मध्ये वँगला आढळलेला मृतदेह मॅलरीचा नसून आयर्विनचा होता का?
आयर्विनची आईस एक्स सापडली तिथे आयर्विनचा अपघात झाला आणि त्यावेळी दोघं एकत्रं होते असं मानलं तर मॅलरीचा मृतदेह त्याच रेषेत सरळ खाली आढळून येणं आवश्यक होतं. प्रत्यक्षात मॅलरीचा मृतदेह सरळ रेषेत खाली न आढळता सुमारे ३०० मीटर खाली आणि वेगळ्याच दिशेला आढळला होता. होल्झेलच्या तर्काप्रमाणे आयर्विनच्या अपघातानंतर मॅलरी यलो बँडमधून घसरला असता तर सरळ खाली घसरण्याची शक्यता जास्तं होती.
२००१ मध्ये सिमन्सन आणि हेम्लेब यांनी १९६० च्या चिनी मोहीमेतील गिर्यारोहक झू जिंगची गाठ घेतली. झू जिंगने १९६० च्या मोहीमेत पहिली स्टेप उतरुन खाली येत असताना त्याने एका गिर्यारोहकाचा मृतदेह पाहिल्याचा दावा केला! हा मृतदेह एका लहानशा घळीत शिखराकडे पाय असलेल्या अवस्थेत उताणा पडलेला आढळला होता. जिंगने वर्णन केलेल्या जागेच्या बर्याच खाली मॅलरीचा मृतदेह आढळल्याने हा मृतदेह आयर्विनचाच असण्याची शक्यता होती. अर्थात स्वतः जिंग प्रचंड दमलेला असल्याने मृतदेह पाहिलेली नेमकी जागा त्याला सांगता येणं अशक्यं होतं.
जिंगच्या या दाव्याला पुष्टी देणारा पुरावा २००५ मध्ये पुढे आला. जिंगच्याच मोहीमेतला गिर्यारोहक वँग फू चो याने १९६५ मध्ये लेनिनग्राड इथे रशियन जिओग्राफीक सोसायटीच्या सभेत भाषण करताना ८५०० मीटर्सपेक्षा जास्तं उंचीवर एका युरोपियन गिर्यारोहकाचा मृतदेह आढळल्याचं त्याने स्पष्टं केलं. या गिर्यारोहकाच्या पोशाखावरुन तो युरोपियन असल्याचं आपण ओळखल्याचंही त्याने आपल्या भाषणात बोलून दाखवलं. रशियन जिओग्राफीफ सोसायटीच्या २००५ च्या पत्रकात फू चो याच्या भाषणाची तपशीलवार माहीती देण्यात आली होती.
मॅलरीचा मृतदेह तुलनेने बराच खाली आढळल्याने जिंग आणि फू चो यांच्या दृष्टीस पडलेला मृतदेह निश्चितपणे आयर्विनचाच असावा हे नक्की कारण चिन्यांच्या १९६० च्या मोहीमेच्या आधी एव्हरेस्टच्या आग्नेय धारेवर इतक्या उंचीवर केवळ मॅलरी आणि आयर्विनच नाहीसे झालेले होते!
अँड्र्यू आयर्विनचा मृतदेह आजतागायत कोणालाही आढळलेला नाही!
-----------------------------------
संदर्भ :
Mount Everest: The Reconnaissance - जॉर्ज मॅलरी
The First High Climb. The Geographical Journal - जॉर्ज मॅलरी
The Fight for Everest 1924: Mallory, Irvine and the Quest for Everest - एडवर्ड नॉर्टन
The Mount Everest Expedition, 1933 - ह्यू रटलेज
The Mystery of Mallory and Irvine - टॉम होल्झेल, ऑड्रे साल्केल्ड
The Last Witness: Noel Odell - जोकेम हेम्लेब
The Story of the 2001 Mallory & Irvine Research Expedition - जोकेम हेम्लेब, एरीक सिमन्सन
Fearless on Everest: The Quest for Sandy Irvine - ज्युली समर्स
इंटरनेटवरील अनेक संस्थळांवरील बहुमोल माहिती.
सर्व फोटो इंटरनेटवरुन साभार
प्रतिक्रिया
14 Dec 2016 - 9:56 am | महासंग्राम
तुफान आणि तितकाच दुःखदायक..
14 Dec 2016 - 1:23 pm | अजया
लेख अतिशय आवडला.
14 Dec 2016 - 1:20 pm | इडली डोसा
तुम्ही गिर्यारोहणाबद्दल किती पॅशनेट आहात हे लेखातुन दिसुन येतयं. तुम्ही गिर्यारोहण करता का?
14 Dec 2016 - 9:03 pm | स्पार्टाकस
गिर्यारोहण सध्या काही कारणांमुळे शक्यं होत नसलं तरी एके काळी घरी कमी आणि कँप मध्ये जास्तं मुक्काम होता :)
14 Dec 2016 - 2:09 pm | अत्रन्गि पाउस
जमलाय ...पुलेशु
14 Dec 2016 - 7:26 pm | तुषार काळभोर
वीसेक वर्षांपूर्वी बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकात एका धड्यात (बहुधा हिलरीच्या/तेन्सिंग च्या आत्मवृत्ताचा भाग असावा) हा उल्लेख वाचला होता.
14 Dec 2016 - 7:34 pm | स्पार्टाकस
फ्रॉम द समिट या आपल्या आत्मचरित्रात हिलरीने याबद्दल लिहीलेलं आहे.
तेनसिगच्या आत्मचरित्रातही याचा उल्लेख केला आहे. मराठीच्या पुस्तकात असलेला लेख तेनसिंगच्या आत्मचरित्रातून घेतलेला आठवतो आहे.
14 Dec 2016 - 7:51 pm | प्रचेतस
छान लिहिलंय.
जेफ्री आर्चरच्या मेलरी वर आधारीत 'पाथ्स ऑफ ग्लोरी' ह्या कादंबरीत उपरोक्त लेखातील बहुसंख्य व्यक्तींचा परिचय झाला होता.