त्याच्या प्रेमभंगाची कथा : भाग ३

झंडू बाम's picture
झंडू बाम in जनातलं, मनातलं
27 Sep 2008 - 1:52 am

नाना पुलावरून उतरून दोघेही मधल्या आळीकडं वळाले. गल्लीच्या तोंडालाच टॉम्या थबकला.
"शेरू, आपण या आळीनं चाललोय खरं; पण या गल्लीतले आपले जातभाई खूप आक्रमक आणि टगे आहेत. त्या दिवशी तांबडी दिवसभर गायब झाली, म्हणून तिला पाहत या गल्लीत आलो, तर चार माजलेले जातभाऊ माझ्या अंगावर तुटून पडले. काही विपरीत घडायच्या आत पळ काढला म्हणून वाचलो. त्यामुळे या आळीनं जाणं, मला तरी धाडसाचं वाटतंय. '' टॉम्याच्या मनातल्या धास्तीनं शेरू मोठ्यांदा हसला नि म्हणाला,
"या गल्लीत दहा-बारा मटणाची दुकानं आहेत, टॉम्या. इथल्या कुत्र्यांना तुझ्या माझ्यासारखं खाद्य शोधण्यासाठी उकिरडे धुंडाळावे लागत नाही. त्यांना स्पेशल खाणं गल्लीतच मिळतं. रोज नॉनव्हेज खायची सवये त्यांना. त्यामुळंच ते ऍटॅकिंग आहेत. आणि माझ्याबरोबर या गल्लीत जायला बिलकूल घाबरू नको. कारण या गल्लीतला भाई माझा दोस्त आहे आणि अनेक कुत्र्यांबरोबर माझे चांगले संबंध आहेत. चल, तुझी ओळख करून देतो त्यांच्याशी म्हणजे पुढं तुला प्रॉब्लेम येणार नाही. काळ्याला अद्दल घडविण्याचा प्लॅन आपल्याला ठरवायचाय. त्यासाठी भाईची मदत मिळते का तेही पाहू. '' शेरूच्या बोलण्यानं टॉम्याला धीर आला आणि शेरूच्या अशा ओळखीचं अप्रूपही वाटलं. दोघेही मधल्या आळीतून चालू लागले.
थोडं चालल्यानंतर चार रांगड्या कुत्र्यांनी मान हलवून शेरूला नमस्कार केला.
"काय भाऊ लई दिसानं दिसताय? ''
"हां. म्हणूनच आलो तुम्हाला भेटायला. तुमचं कसं चाललंय. '' शेरूनं त्यांची ख्याली खुशाली विचारली.
"मस्त चाललंय. परवा भाईंनी तुमची आठवण काढली. आलाय तर त्यांना भेटून जा. पुढच्या चौकात दत्तमंदिराजवळ बसलेत ते. '' एका कुत्र्यानं सांगितलं.
"लगेच जातो. '' शेरू आणि टॉम्यानं पुढची वाट धरली. दोघेही दत्त मंदिराच्या चौकात आले.
देवळाला लागून असलेल्या एका घराच्या ओट्यावर दोन पाय पुढं पसरून भाई शानसे बसला होता. त्याच्याजवळ जाऊन शेरूनं त्याला नमस्कार केला.
"गुरूदेव दत्त, भाई! ''
"दत्त, दत्त. काय रे शेरू बऱ्याच दिवसांनी दिसतंय. काय विसरला की काय भू आम्हाला? '' भाईंनं आपल्या स्टाईलनं विचारलं.
"नाही भाई. असं होईल का कधी? लांब येणं होत नाही. आज आलो होतो इकडं. तुमची आठवण झाली म्हटलं भेटून घ्यावं. ''
"बरं झालंस आलास. काय चाललंय. बरंए का, काही कमी जास्त? '' शेरू आणि भाईचा संवाद सुरू होता. टॉम्या शेरूच्या मागं उभा राहून सगळं शांतपणे पाहात होता.
"भाई, हा माझा मित्र टॉम्या. '' शेरूनं मागं वळून पुढं येण्यासाठी टॉम्याला खुणवलं. त्यानं मान तुकवून भाईला नमस्कार केला.
"बसा की. काही खाणार का?... एऽऽऽऽ भोऱ्या मागच्या बाजूला बकराचा खुरा ठेवलाय. घेऊन ये जरा भाऊला. '' भाईनं आपल्या पंटरला आवाज दिला.
"नको भाई. हा नॉनव्हेज खात नाही. माझा उपवास आहे. ''
"बरं बरं. ठीकाय. पुन्हा ये एकदा. चांगली मेजवानी करू. बाकी काय चाललंय. ''
"भाई ठिक चाललंय. एक काम होतं तुमच्याकडं. ''
"अरे बोल ना. ''
"हा टॉम्या आपला मित्र आहे. एकानं बिनकामाचा पंगा घेतला याच्याशी. लव्ह का मामला है भाई. हा काही कोणाच्या वाट्याला जात नाही. शांत आहे. ''
"काय नाव रं त्याचं. ''
"काळ्या म्हणून आहे भाई. गल्लीचं पुढारपण करतोय. ''
"त्याचा काटा काढायचा म्हणतोस. काय मदत पाहिजे बोल! ''
"नाही भाई. त्याला फक्त अद्दल घडवायचीय. ''
"अरे मग आपली पाचसहा कुत्री घेऊन जा की. तुझं काम होऊन जाईल. कधी पाठवू सांग. ''
"उद्या रात्री चालतंय भाई. ''
"आणि एक शेरू. तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे, तो त्यांना आधी सांग म्हणजे प्रॉब्लेम नको. नाही तर पाय मोडायच्या ऐवजी जीव घेतील ते. ''
"हो भाई. आधी सगळं समजून सांगतो त्यांना. आणि मी असेलच बरोबर त्यांच्या. काळजी नको भाई. ठीकाय भाई. येतो. भेटतो परत. ''
"गुरूदेव दत्त. ये ये. येत जा रे असा अधूनमधून. बरं वाटतं कुणी असं भेटलं की. काय? ''
"हो भाई जरूर येईन. '' शेरू आणि टॉम्यानं भाईचा निरोप घेतला आणि मंदिराला वळसा घालून ते आश्रम चौकात येऊन पोचले.
"आता आपला प्लॅन ठरवला पाहिजे टॉम्या. ''
"हो ना. चल. आश्रमातल्या हिरवळीवर बसून ठरवू काही तरी. दुपारची वेळ आहे. कुणी नसेल आश्रमात. शांतपणे काहीतरी ठरवता येईल. ''
दोघंजण आश्रमात्याला हिरवळीवर जाऊन बसले. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर काळ्या आणि तांबडीला अद्दल घडविण्याचा प्लॅन अखेर ठरला.
- क्रमश:

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

टारझन's picture

27 Sep 2008 - 2:51 am | टारझन

कल्पना अंमळ मजेशीर आहे... स्टुअर्ट लिटील ची आठवण झाली.. त्यात तो पिक्चर हिंदीत पाहीलेला अंमळ मजेशीर
फुडला भाग लवकर येउ द्या

अमृतांजन + कैलास जिवन
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

अनिल हटेला's picture

27 Sep 2008 - 7:36 am | अनिल हटेला

च्या मारी !!

आता गँगवार होणार बहुतेक !!

भू -भू ची भूगीरी जोरात !!

एकतर क्रमशः ,त्यात छोटे छोटे भाग

जरा मोठे भाग टाका की राव !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्राजु's picture

27 Sep 2008 - 8:06 am | प्राजु

छान चालू आहे.
प्लॅन आहे तरी काय??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

झकासराव's picture

27 Sep 2008 - 5:04 pm | झकासराव

जरा मोठे भाग येवु देत हो.
:)

भुभु गिरी जोरात आहे की.
`................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Sep 2008 - 6:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

झंडू बाम भू, आपलं भौ, जरा मोठे भाग टाका की!

अदिती (म्याव)