"आश्रमरस्त्यानं रेल्वे स्टेशनकडे निघालो. जाताना कुणाकडं तोंडवर करून पाहायचीदेखील इच्छा नव्हती. या तांबडीनं आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. तिनं असं का करावं, हा प्रश्न मी स्वत:लाच विचारत होतो. चालत होतो. स्टेशनवर लवकर जाता यावं म्हणून मधल्या आळीनं निघणार होतो; पण आपले जातशत्रू काय कमी आहेत? प्रत्येकजण अंगावर येणार. प्रत्येकाला कुठं तोंड देत बसणार म्हणून आश्रमरस्ता धरला. पण दोन जातभाऊ आलेच अंगावर. म्हटलं, बाबांनो मारहाण करण्यापेक्षा मला जीवे मारता आलं तर पाहा. कारण मी निघालोय जीव द्यायला. एवढं म्हटल्यावर दोघे जीभ बाहेर काढून व्हॅ... व्हॅ... करीत थांबून माझ्याकडे पाहू लागले. मी कुणीतरी "सटकेल' आहे, अशा आविर्भावात ते माझ्याकडे पाहत होते. मी काही त्यांचा विचार केला नाही. तसाच चालत निघालो, '' टॉम्या शेरूला सांगत होता.
"आश्रम चौकात आल्यावर डावीकडच्या उड्डाण पुलावरून पळत स्टेशनकडं निघालो. पुलावर उभं राहून संपूर्ण स्टेशन डोळ्यात साठवून घेतलं. कुठं उभ राहायचं. गाडी आल्यावर कशी उडी मारायची, लवकर मरण कसं येईल, याचा प्लॅन मी आखत होता. मला मरायची घाई झाली होती. काळ्या आणि तांबडीची ती "अवस्था' मला स्वस्थ बसू देत नव्हती. तेवढ्यात समोरून एक गाडी आली. म्हटलं पुलावरूनच उडी मारावी आणि संपवून टाकावं सगळं एकदाचं. उडी मारण्यासाठी पुलाच्या भिंतीवरही चढलो. पण पुन्हा विचार केला की उडी मारली आणि गाडी खाली गेलोच नाही, तर आयुष्यभर चारही पाय आपल्याच गळ्यात पडतील. मग माणूस तर सोडाच आपले हाल कुत्रेही खाणार नाही. त्यामुळं सरळ स्टेशनवर जावं आणि गाडी आली की तिच्यासमोर झोकून द्यावं स्वत:ला. असं ठरवून पुन्हा स्टेशनच्या दिशेने निघालो. पूल ओलांडून स्टेशनमध्ये घुसला. बराचवेळ स्टेशनच्या शेवटच्या टोकाला घुटमळत होतो; पण गाडी आलीच नाही. म्हणून म्हटलं पुढच्या टोकाला जाऊन उभं राहावं. निघालो तर मध्येच तू भेटला. '' स्टेशनच्या पुढच्या टोकाजवळ एका खांबा शेजारी बसून टॉम्या आणि शेरूचा संवाद सुरू होता.
"अरे पण आपली गल्ली सोडून एवढ्या लांब काय करतोयस तू? '' टॉम्यानं विचारलं.
"काही नाही रे. इकडं एक झेंगट पटवलंय. आलो होतो भेटायला तिला. ''
"बराय बाबा तुझं. तिकडं गल्लीत सुदामेच्या हंपीला नादी लावलंय. आता इकडंही सुरू केलं का? '' टॉमीच्या या प्रश्नावर शेरू लाजरं हसला.
"चालायचंच. यालाच जीवन म्हणतात टॉम्या. तू बसला एकीला धरून. काय झाली तुझी अवस्था? '' शेरूच्या या बोलण्याने टॉम्या दुखावला. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. हुंदका देतच त्याने विचारलं,
"काय चुकलं माझं? कुठं कमी पडलो मी, काय कमीये माझ्यात? बरं एवढे दिवस बरोबर राह्यलो. चांगली चार पिलं झाली आम्हाला. तीही चांगल्या कुटुंबात गेलीय आता. तरीही तांबडीनं मला दगा द्यावा? नाही सहन होत शेरू! ''
"अरे आपण माणसं का आहोत. मग माणसासारखा का विचार करतोस? आपल्या जातीत "पतिव्रता' ही संकल्पनाच नाहीये. त्यामुळे तूही कुत्रोत्तम होण्याचा प्रयत्न करून नको. पूर्वापार असंच चालत आलंय. यापुढेही असंच चालत राहणार. त्यामुळे सामान्य कुत्र्यांप्रमाणेच वाग. जास्त माणूसवादी होऊ नको. आणि हे आत्महत्या करण्याचं खूळ डोक्यातून काढून टाक बरं, '' शेरूनं समजावण्याचा प्रयत्न केला.
"छे!, मला नाही पटत. अरे आपण भारतात राहतोय; अमेरिकेत नव्हे. तिथं असतो तर ठीकाय. पण माणसाबरोबरच इथल्या संस्कृतीशी आपणही एकरूप झालोय. मग थोडं माणूसपण आपल्यात आलं आणि आपण ते जपलं तर बिघडलं कुठं? ''
"तू मार भारतीय संस्कृती आणि अमुक तमूकच्या गप्पा मारतोय टॉम्या; पण आपला "व्यवहार' अमेरिकन लोकांहून वेगळा नाही बरं का! भारतात राहतो म्हणून आपण बंदिस्त जागेत किंवा बेडरूममध्ये भादव्याचा उत्सव साजरा करीत नाही. उघड्यावरच, सर्वांदेखत आपण तो साजरा करतो. '' शेरूच्या या युक्तीवादापुढं टॉम्या गार झाला. पुढं काय बोलावं, हेही त्याला कळेना. दोघेही गप्प. एवढ्यात कर्कश शिट्टी वाजवीत एक गाडी स्टेशनात शिरली. तोच लोकांनी गलका केला. वेग कमी होताच लोकांची गाडीत चढण्यासाठी धावपळ सुरू झाली.
"या गर्दीत आपण चिरडले जायचो. चला निघू या आपल्या गल्लीकडे. '' असं म्हणत दोघांनी स्टेशनच्या पुढच्या टोकाकडे पळ काढला. शेजारच्या काटेरी कुंपणातून दोघे अलगद बाहेर पडले.
मघाच्या अर्धवट राहिलेल्या विषयावर शेरू पुन्हा बोलू लागला.
"माणूस जातीच्या सुसंस्कृतपणाचे दाखले तू देतोयस; पण माणसंही आपल्यासारखंच वागू लागली आहेत आता, टॉम्या. रात्री स्टेशनवर उभ्या असलेल्या रिकाम्या डब्यांमध्ये फेरफटका मार जरा. बाग-बगिचात जाऊन बघ. म्हणजे माणसाचं खरं रूप तुला कळेल. हे कशाला, आपल्या गल्लीतलंच बघ. मी ज्या सोसायटीची रखवाली करतो. तिथं येऊन बघ जरा माणसं संस्कृतीला कसा काळा रंग फासतात आणि शिष्टाचाराची चित्रं कशी रंगवतात ते. अरे आपल्याला माणसाची भाषा बोलता येत नाही म्हणून बरंय, नाहीतर... '' शेरूचा उद्वेग टॉम्या मुकाट्यानं ऐकून घेत होता. पण त्याच्या मनातील तांबडी आणि काळ्याविषयीचा राग अजूनही कमी झालेला नव्हता.
"तू म्हणतो त्यात तथ्य असेल, शेरू. पण मी सच्चा दिलवाला होतो. तांबडीनं असं करणं मला पटतच नाही. त्या दोघांनाही धडा शिकवायचाय मला. त्यासाठी तू मला मदत कर. '' टॉम्यानं विनवलं.
"हे बघ, मला वाटतं तुझ्या प्रेमभंगाचा चॅप्टर तू विसरून जावं आणि काळ्याच्या नादी लागू नये. ''
"का बुवा, असा कोण मोठा लागून गेलाय तो? ''
"तुला माहीत नाही टॉम्या. इथं तू नंतर आलायस. काळ्या आपल्याआधी कैक वर्षांपासून राहतोय इथं. आजूबाजूच्या दोन-तीन गल्ल्यांमधल्या कुत्र्यांमध्ये त्याचं वजन आहे. थोडक्यात सांगायचं तर तो पुढारी आहे इथला. ''
"मला त्याच्याशी घेण-देणं नाही. त्याला अद्दल घडलीच पाहिजे बस्स. आणि तू काय कमी नेतेगिरी करतो का शेऱ्या. तुझंही वजन वाढतयचं ना. चार कुत्रे तुलाही मानणारे आहेतच की. मग काळ्याचा दबदबा कमी झाला आणि तुझा वाढला तर बिघडलं कुठं? '' टॉम्यानं शेऱ्याची मर्जी वळविण्यासाठी खडा टाकला. तो बरोब्बर बसला. शेरूलाही कुत्र्यांचा नेत्या होण्यात भलताच इंटरेस्ट होता. त्याच्या डोक्यात चक्र फिरू लागली. काळ्यानंतर आपणचं मोठे, असा विचार त्यानं केला आणि टॉम्याला मदत करायला तयार झाला.
"बोल टॉम्या, काय मदत करू म्हणतो तुला. काळ्या आणि तांबडीला अद्दल घडवायची ना, ठीकाय. मी आहे तुझ्याबरोबर. चल आपण काहीतरी प्लॅन करू. '' शेरूनं टॉम्याला आश्वासन दिलं. दोघेही मधल्या आळीच्या दिशेने चालू लागले.
-क्रमश:
प्रतिक्रिया
25 Sep 2008 - 7:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चालु दे, मस्त चाल्लंय :)
25 Sep 2008 - 7:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्तच!
आणि फार वेळ नका लावू पुढच्या भागाला.
अदिती
26 Sep 2008 - 3:02 am | टारझन
आणि फार वेळ नका लावू पुढच्या भागाला.
असेच म्हणतोय ,,,, बाकी पार्ट वन कुठे आहे ? टॉमी आणि तांबडीला झालेल्या ४ पिल्लांचा पहिला पार्ट कुठे आहे ?
का डायरेक्ट पार्ट २ पासून ? असो ... उत्तम आहे "कुत्रोत्तम"
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
25 Sep 2008 - 7:33 pm | रामदास
अगोदरचा हिस्सा मी नाही वाचला.लिंक देता का?
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
25 Sep 2008 - 7:35 pm | अवलिया
चालु द्या
जोरदार आहे
25 Sep 2008 - 8:04 pm | प्रभाकर पेठकर
मस्त आहे कल्पनाविस्तार. अभिनंदन.
25 Sep 2008 - 8:39 pm | प्राजु
कुत्रोत्तम... हे बाकी भारी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Sep 2008 - 8:42 pm | सखाराम_गटणे™
मस्त लिहीले आहे,
पुलेशु.
फक्त टॉम्याला हा धागा 'प्रपोज करताय...अरे थांबा !' (http://misalpav.com/node/3690) वाचायला दे, बघुया काय फायदा होतोय का ते?
आणि काय होते ते सांगायला विसरु नकोस,
त्याला सांग नाडीला घाबरु नकोस, ज्योतिषाला पैसे देउन पटव.
26 Sep 2008 - 1:18 am | झंडू बाम
कथेला उत्स्फुर्त प्रतिसाद आणि लिखाणास दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल शतश: ऋणी आहे.
26 Sep 2008 - 1:33 am | भडकमकर मास्तर
बामा,
छान ... मजा आली...
लवकर पुढचे येउदेत ..
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
26 Sep 2008 - 2:35 pm | श्रावणी
श्वानप्रेमी दिसताय.
पण एकंदरीत मस्त लिहिलय.
26 Sep 2008 - 5:29 pm | झकासराव
काही नाही रे. इकडं एक झेंगट पटवलंय. आलो होतो भेटायला तिला. ''>>>>
वा! झेंगट हा शब्द किती दिवसानी ऐकला.
झेंगट, लडतर अशा शब्दांची मजा काही औरच. :)
मला तरी पहिल्या भागापेक्षाही हा भाग खुपच आवडला.
तत्वज्ञानी कुत्रे आहेत अगदी.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
26 Sep 2008 - 5:31 pm | अनिल हटेला
कभी बंधन जूडा लिया .....भू भू
कभी दामन छूडा लिया.....भू भू...
साथी रे ये कैसा सिला दिया ...
वफा का कैसा सिला दिया.....
भू भू ~~~~~
भू भू........
चालू देत रे भो !!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
26 Sep 2008 - 5:48 pm | झंडू बाम
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
ही लिंक पहिला भाग न वाचलेल्यांसाठी.
http://www.misalpav.com/node/3617