घर क्रमांक – १३/८ भाग - ३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
4 Jun 2016 - 10:43 pm

घर क्रमांक – १३/८ भाग - १
घर क्रमांक – १३/८ भाग - २

घर क्रमांक – १३/८ भाग - ३
.......काही क्षण मी तसाच विचार करत उभा राहिलो. ‘जावे का त्याच्या मागे ?’ पण शेवटी बुद्धीनिष्ठतेची घमेंड आणि त्या घरात जे काही चालले होते त्याची भेद करण्याच्या इच्छेने मला थांबवले. मी परत माझ्या खोलीत शिरलो व दरवाजा बंद केला. प्रणवने त्याच्या खोलीत काय पाहिले असावे बरे? ते पाहण्यासाठी मी त्याच्या खोलीत गेलो. मला तरी त्याला घाबरविण्यासारखे त्या खोलीत काही दिसले नाही. मी त्या खोलीच्या सगळ्या भिंती परत एकदा नीट तपासल्या. बऱ्याच ठिकाणी हाताने ठोकून पाहिल्या पण मला तरी संशयास्पद असे काही आढळले नाही. भिंतीत एखादी फटही दिसत नव्हती. मग ते जे काही त्याच्या मागे लागले होते ते त्याच्या खोलीत कसे आले ? अर्थातच माझ्या खोलीतून! हा विचार माझ्या मनात येताच मला घाम फुटला.

‘हेच, हेच तुला टाळायचे आहे’ मी स्वत:ला उद्देशून म्हणालो.

मी माझ्या खोलीत परतलो व मधले दारही बंद केले व त्याला कडी घातली. आता जे काही येणार होते त्याचा समाचार घेण्यास मी तयार व समर्थ होतो. तेवढ्यात माझे लक्ष वाघ्याकडे गेले. तो एका कोपऱ्यात भिंतीत डोके खुपसून बसला होता. जणू काही त्याला भिंतीच्या पलिकडे जायचे आहे. मी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण त्याचा अवतार पाहिल्यावर टरकून मागे सरलो. तो बिचारा प्राणी पूर्णपणे घाबरुन थरथरत होता. त्याचे सगळे सुळे दिसत होते व जबड्यातून लाळ ठिबकत होती. त्याच्या डोळ्यात माझी ओळखच मला दिसत नव्हती. मी आत्ता जर त्याला हात लावायचा प्रयत्न केला असता तर तो मला निश्चितच चावला असता. एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखाच दिसत होता तो आणि आत्तातरी मला शंभर सुया टोचून घेण्याची इच्छा नव्हती. शिवाय त्याच्या लाळेत वातावरणातील विषही भरले असावे अशी शंका माझ्या मनात आली. प्राणीसंग्रहालयातील शिकारी प्राण्यांच्या पिंजऱ्यातील जिवंत भक्षाच्या चेहऱ्यावरील भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले दिसले मला. त्याचा नाद सोडून मी माझे रिव्हॉल्वर टेबलावर ठेवून माझे पुस्तक परत हातात घेतले.

मी किती शूर आहे व असल्या प्रसंगातही किती शांत राहू शकतो अशी बढाई मारण्यासाठी मी हे प्रसंग खुलवून सांगतोय अशी शंका वाचकांना येणे नैसर्गिक आहे. त्यासाठी या बाबतीत माझे विचार काय आहेत व माझ्या काही गुणांबद्दल मला सांगितलेच पाहिजे. थोडे अवांतर झाले तरीही.. या विचारांना तुमम्ही कदाचित दुराग्रही म्हणाल, पण ठीक आहे !
मी प्रचंड प्रसंगावधानी आहे. ज्याला काही लोक चुकीने शौर्य म्हणतात. माझा हा गुण मला आलेल्या अनुभवाच्या प्रमाणात आहे. म्हणजे मी तसल्या अनेक प्रसंगातून गेलेलो असल्यामुळे मी तसल्याच प्रसंगात अर्थातच जास्त प्रसंगावधान दाखवतो. मी जगभर अमानवी चांगल्या/वाईट गोष्टींसमवेत प्रयोग केलेले आहेत. मी जर ते येथे सांगितले तर ही गोष्ट कधीच संपणार नाही. शिवाय काहीजण त्याची टिंगलटवाळी करतील तर काहींचा या अमानवी शक्तींवरचा विश्र्वास अधिकच दृढ होईल. आता माझे या बाबतीतील तत्वज्ञान सांगतो. अमानवी असे काहीही नसते. अशक्य आहे ते ! आपण ज्याला अमानवी इ.इ. म्हणतो ते निसर्गाच्या कुठल्यातरी नियमानुसारच चाललेले असते फक्त आपल्याला त्या नियमाची कल्पना नसते. किंबहुना तसले काही नियम अस्तित्वात असतात हेच आपल्याला माहीत नसते. हे एकदा समजले की सगळे कसे सोपे होऊन जाते. म्हणून जर एखादे पिशाच्च माझ्यासमोर प्रकटले तर मी ‘‘अमानवी शक्तीं अस्तित्वात आहेत तर !’’ असे न म्हणता म्हणेन, ‘‘ या पिशाच्चाचे प्रकटीकरणही निसर्गनियमानुसारच झाले आहे. त्यात अमानवी, अनैसर्गिक, अमानवी काही नाही.’’

आत्तापर्यंत मी जे पाहिले आहे किंवा अनुभवले आहे तसल्या घटनांबद्दल लिहितांना बरेच लेखक ते सत्य आहे असे म्हणून मोकळे होतात. पण याच्यामागे कुठल्यातरी जिवंत शक्तीची आवश्यकता असतेच हे ते विसरतात. आपल्याच इथे काही जादूगार ते आत्म्याशी संवाद करु शकतात किंवा पिशाच्चाला जागृत करु शकतात हा दावा करताना आपण पाहिले असेलच. क्षणभर आपण ते सत्य सांगत आहेत हे गृहीत धरुया पण ते करण्यास त्यांच्या सारख्या जिवंत मांत्रिकांचे अस्तित्व आवश्यक आहे हेही सत्य आहे. म्हणजे या अमानवी विशिष्ठ गोष्टी घडण्यासाठी व तुमच्या इंद्रीयांना समजेल अशा स्वरुपात आणण्यासाठी हाडामासाच्या जिवंत माणसाची आवश्यकता आहेच. त्याच्या शिवाय ते शक्य नाही.

या अमानवी शक्तीच्या दृष्य स्वरुपाबद्दल जरा विचार करु. प्रत्येक ठिकाणी ते वेगळे असते. काही ठिकाणी कागदावर अक्षरे उमटतात तर काही ठिकाणे खुर्च्या हलतात. काही ठिकाणी प्लँचेटवरची भांडी हलतात. हे सगळे खरे मानले तरीही त्यासाठी माध्यमाची गरज लागते हे नाकारुन चालणार नाही. आता समजा यात काहीही फसवणूक नाही असे मानले तरीही जिवंत माणसांची उपस्थिती तेथे आवश्यक असते हे लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे बघा जंगलात पडलेले ओंडके हलून गावात येतात का ? असो मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजले असेल. आणि हल्ली मोहिनीविद्याही इतकी प्रगत झाली आहे की समोरच्या माणसाच्या मनावरही म्हणे ताबा घेतला जाऊ शकतो. पण तेथेही जिवंत माणसे असावीच लागतात. म्हणून या घरात जे अमानवी प्रकार घडले किंवा घडणार आहेत ते सगळे घडण्यासाठी एखादे जिवंत माध्यम तेथे उपस्थित असण्याची गरज आहे. म्हणून जे काही घडले त्याने मी एवढा काही हादरलो नाही. म्हणून मी म्हणतोय की जे काही माझ्या इंद्रियांनी या घरात अनुभवले आहे ते कोणीतरी माझ्या इंद्रियांना समजेल अशा स्वरुपात येथे मांडले आहे आणि ते करण्यासाठी काहितरी प्रयोजन असले पाहिजे. माझ्या या स्वत:च्या स्पष्टीकरणाने मी स्वत:वरच खुष झालो. आणि प्रामाणिकपणे सांगतो, एखादा शास्त्रज्ञ एखादा धोकादायक प्रयोग करताना जसा एकाग्र असतो तशीच अवस्था माझीही झाली होती. थोडीशी विचारांची तंद्रीच लागली होती मला....

या सगळ्या विचारांपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी मी पुस्तकात डोके खुपसले. तेवढ्यात माझ्या पुस्तकावर कोणाची तरी सावली पडली. मी चमकून वर पाहिले. मी जे पाहिले त्याचे वर्ण करणे अवघड आहे. नाही, अशक्य आहे.

अंधाराने कसला तरी आकार घेतला व माझ्यासमोर उभा राहिला असे मी सांगितले तर तुम्हाला काही कळेल का ? पण तसेच होते ते. तो माणसाचा आकार होता असे मी म्हणू शकत नाही किंवा माणसाच्या सावलीचा आकार म्हणावा तर तसाही तो नव्हता. त्या अंधाराचा आकार बराच मोठा होता. इतका मोठा की त्याचे वरचे टोक छताला टेकले होते. मी त्याच्याकडे पहात असतानाच माझे शरीर थंडगार पडले. इतके थंडगार की मला वाटले कोणीतरी मला बर्फाच्या लादीवर जखडून ठेवले आहे. बर्फाची लादीही माझ्यापेक्षा गरम असेल असे मला क्षणभर वाटले. मी त्या आकाराकडे बघत असतानाच मला भास झाला की त्या आकारातून दोन डोळे माझ्याकडे रोखून बघताएत. क्षणभर मला ते डोळे स्पष्ट दिसले तर दुसऱ्याच क्षणी ते त्या अंधारत विरघळून गेले. पण निळसर प्रकाशाचे दोन किरण त्या जागेवरुन अजुनही माझ्यावर पडत होते.

मी बोलण्याचा प्रयत्न केला पण माझ्या तोंडातून शब्दच फुटेना.

‘भीती, भीती म्हणतात ती हीच का ?’ मी मनाला विचारले. ‘नाही ही भिती नाही.’

असे म्हणून मी उठण्याचा निकराचा प्रयत्न केला पण मला कोणीतरी माझ्या मनाविरुद्ध खुर्चीला जखडून ठेवले होते. समुद्रावरील वादळात माणूस जसा हतबल होतो तसा मी हतबल झाल्याची भावना माझ्या मनात घर करु लागली. माझ्या इच्छाशक्तीविरुद्ध त्यापेक्षाही जास्त शक्तीशाली शक्ती माझ्याविरुद्ध उभी ठाकली होती.

या भावनांनी माझ्या मनावर ताबा मिळवला आणि मला ‘‘ भय ’’ या शब्दाचा खरा अर्थ त्या क्षणी कळाला. मी भयभीत झालो. इतक्या टोकाची भिती की तिचे मी वर्णन करु शकत नाही. माझे अवसान गळाले असले तरी माझी विवेकबुद्धी थोडीफर शाबूत होती.

‘‘हे सगळे भयानक असेल पण ही भीती नाही....मी भ्यालेलो नाही...’’

मोठ्या कष्टाने धपडत मी टेबलावरील माझ्या रिव्हॉल्वरला हात घातला... त्याच क्षणी माझ्या खांद्याला व हाताला कसलातरी जोरदार झटका बसला व माझे दोन्ही हात लुळे पडून बाजूला लोंबू लागले. त्यातच भर म्हणून की काय, मेणबत्तीचा प्रकाश मंद होऊ लागला. त्या विझल्या नाहीत पण त्यांच्या ज्योतींनी त्यांचे अंग आक्रसून घेतलेले मला स्पष्ट दिसले. जणू काही कोणीतरी त्यांचा प्रकाश शोषून घेत आहे. थोड्याच क्षणात सगळीकडे अंधार पसरला... काळाकुट्ट अंधार..

त्या काळ्या आकाराबरोबर काळ्याकुट्ट अंधारात माझ्या इंद्रीयांनी माझ्याशी सहकार्य नाकारले. पण त्या भयानक शक्तीसमोर माझी अवस्था एखाद्या बंद खोलीत कोंडलेल्या मांजरासारखी झाली. मी एकदम ओरडलो,

‘‘ मी घाबरलेलो नाहे...मुळीच नाही.’’

माझ्या त्या किंकाळीने मला आवश्यक ती उर्जा दिली आणि मी जागेवरुन उठलो आणि खिडकीकडे धावलो. खिडकीवरील जीर्ण पडदे टराटरा फाडले व खिडकीची तावदाने उघडली. माझ्या लक्षात पहिल्यांदा जी गोष्ट आली ती म्हणजे प्रकाश. आकाशातील स्वच्छ प्रकाश देणारा चंद दिसल्यावर माझ्या मनावरचे मळभ नाहीसे झाले. आकाशात चंद्र होता. रस्त्यावर दिव्याचे खांब होते आणि उजाड रस्त्यावर ते प्रकाश फेकत होते. मी वळून खोलीत पाहिले. चंद्राचा प्रकाश क्षीणपणे का होईना खोलीत झिरपत होता. तो अंधाराचा आकार किंवा जे काही ते होते ते नाहिसे झाले होते. पण समोरच्या भिंतीवर अजूनही त्या आकाराची अंधुक सावली दिसत होती... का ओल होती ती ?

तेवढ्यात माझी नजर टेबलाकडे गेली. मी दचकलो. हादरलो. माझा माझ्या स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसेना. त्या टेबलाखालून एक हात बाहेर आला... माझ्या हातासारखा हाडामासाचाच वाटत होता तो. सुरकुतलेला, नाजूक गोरापान... निश्चितच एका स्त्रीचा.. त्या हाताने हळुवारपणे ती पत्रे पकडली व नाहिसा झाला. त्याचवेळी माझ्या पलंगाच्या मागच्या फळीवर तीनदा टकटक झाली.. ती बंद होतानाच ती खोली भुकंपात हादरते तशी थरथरली. एका कोपऱ्यातून वेगवेगळ्या ठिणग्या उडायला लागल्या. लाल, नारंगी, पांढऱ्या निळ्या... एक खुर्ची ओढली गेली व टेबलासमोर विसावली. अचानक त्या खुर्चीवर एका स्त्रिचा आकार तयार झाला. एका हाडामासाच्या स्त्रिचा आकार... स्पष्ट. एका मृत स्त्रिचा भयानक आकार.. काही नीट समजत नव्हते.. चेहरा एका तरुणीचा होता. उदास, दु:खीकष्टी. मोठ्या गळ्याचे पोलके व गळ्यात काही नव्हते. अंगावर पांढऱ्या रंगाचे पायघोळ काहीतरी घातल्याचा भास होत होता. केस सावरत त्या बाईने ते मोकळे सोडले. ती माझ्याकडे पहात नव्हती. तिचे डोळे दरवाजाकडे लागले होते जणू काही ती कोणाची तरी वाट बघत होती. ती बहुधा कोणाचीतरी चाहूल घेत होती. त्या समोरच्या भिंतीवरची सावली आता गडद झाली. तेवढ्यात दरवाजातून एक आकार जन्माला आला. तेवढाच भयंकर. एका माणसाचा आकार. त्याने जुन्या पद्धतीचे कपडे परिधान केले होते. त्या दोघांचेही कपडे होते अगदी दरबारी. पण त्यात काहीतरी अभद्र होते... त्या माणसाचा आकार जसा टेबलाकडे येऊ लागला तशी ती भिंतीवरची छाया हलू लागली. त्या तोकड्या प्रकाशात मला दिसले की ते दोघे त्यांच्या मधे उभ्या ठकलेल्या त्या छायेच्या ताब्यात गेले. त्याच क्षणी त्या स्त्रीच्या पोलक्यातून रक्ताची चिळकांडी उडाली. त्या माणसाचा आकार त्याच्या तलवारीच्या पात्यावर भार टाकून उभा होता. थोड्याच वेळात त्याच्या चुणीदार कपड्यातून रक्त ठिपकू लागले.... तेवढ्यात त्या मधल्या छायेने त्या दोघांनाही गिळून टाकले. त्यांचा आता मागमुसही नव्हता. परत एकदा तशाच वेगवेगळ्या आकाराच्या रंगाच्या ठिणग्या काजव्यांसारख्या इकडे तिकडे उडू लागल्या.. त्यांची संख्या अगणित झाली.

आता या नाटकात भाग घेण्यासाठी त्या कपाटाचे दार उघडून एक म्हातारी बाई बाहेर आली. तिच्या हातात दोन पत्र होती. तीच जी मला सापडली होती व नंतर गायब झाली होती. तिच्या मागे मला पावलांचा आवाज झाला. मागे कोणीतरी बोलते आहे आणि तिला ते ऐकायचे आहे अशा अविर्भावात ती वळली. तिने ती पत्रे उघडली आणि बहुतेक वाचण्यास घेतली.

तिच्या खांद्यावरुन मला एक भयंकर चेहरा दिसला. एका बुडालेल्या माणसाचा पाण्याने फुगलेला चेहरा, लिबलिबीत. त्याच्या चेहऱ्यावर माशांनी तोडलेल्या लचक्यांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्याच्या केसातून पाणी ठिपकत होते व त्या केसांत शेवाळ्याचा गुंता झाला होता. तिच्या पायाशी एखादे प्रेत पडावे तसा एक आकार पडला होता व त्याच्या शेजारीच एक मुलगी लपली होती. तिची गालफाडे वर आली होती जणू काही कुठल्यातरी दुष्काळातून उठून आली होती. तिचा चेहरा भयभीत व डोळ्यात भीतीचे सावट मला दिसले.

त्या म्हातारीकडे बघत असतानाच तिच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा झाल्या व त्याची जागा एका तरुण चेहऱ्याने घेतली. या स्त्रिचे डोळे गारगोटीसारखे निर्जिव व क्रूर वाटत होते. हे सगळे होत असताना त्या भिंतीवरील छायेने परत हालचाल सुरु केली व या पात्रांवर आपली काळी छाया पांघरली. आता त्या खोलीत त्या भिंतीवरील काळी त्या काळ्या छायेशिवाय कोणीच उरले नव्हते. माझे डोळे तिच्यावर रोखले होते. परत एकदा त्या छायेतून कोणीतरी माझ्याकडे पहाते आहे असा मला भास झाला. अभद्र, विखारी एखाद्या विषारी सर्पाची दृष्टी ! परत ठिणग्यांचा खेळ सुरु झाला. त्यांचा प्रकाश चंद्राच्या प्रकाशात मिसळला. पाहता पाहत त्यांचा आकार चेंडूंएवढा झाला व एखादे अंडे फुटावे तशा त्या फुटल्या व आतून वळवळणाऱ्या रक्तहीन आळ्यांचा पाऊस पडला व वातावरण त्यांनी भरुन गेले. इतक्या बिभत्स, घाणेरड्या आळ्या की मी त्यांचे वर्णनही करु शकत नाही. जिवशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनी मायक्रोस्कोपखाली वळवळणाऱ्या आळ्या नजरेसमोर आणाव्यात म्हणजे त्यांना थोडीतरी कल्पना येईल. प्रत्येक आळी वेगळी होती व त्यांच्या हालचालींमधेही कमालीचा गोंधळ होता. इंग्रजीमधे त्याला केऑस का काय म्हणातात.... त्या तशाच घोंघावत माझ्या भोवती वळवळत होत्या. माझ्या आपसूकपणे पुढे झालेल्या हातावर त्या चढत होता. आधेमधे मला स्पर्ष जाणवत होता पण तो त्या आळ्यांचा नाही. कोणीतरी माझ्या अंगावरुन हात फिरवत होते. मधेच माझा गळाही आवळला गेला. माझे अवसान अजूनही गळाले नव्हते. मी एकदा का घाबरलो तर माझ्या शरीरावर माझा ताबा राहणार नाही याची मला खात्री होती. मी माझी सर्व ताकद माझ्या मनावर केंद्रीत केली. मोठ्या कष्टाने मी माझी दृष्टी त्या भयानक डोळ्यांवरुन हटविली. अभद्र, विखारी एखाद्या विषारी सर्पाची दृष्टी ! आता मला ते स्पष्ट दिसत होते. वाईट शक्तिचा वावर माझ्या भोवती होता आणि माझ्या मनावर ताबा मिळविण्याचा त्या शक्तीचा आटोकाट प्रयत्न चालला होता.

एखाद्या शेकोटी भोवतालचे वातावरण जसे उबदार होते तसे खोलीतील उदास वातावरण आता हळुहळु बदलू लागले. त्या आळ्यांचाही रंग हळुहळु बदलू लागला. ती खोली परत एकदा हादरली. परत माझ्या पलंगाच्या मागील फळीवर तीनदा टकटक झाले व त्याच क्षणी त्या काळोख्या छायेने सगळे गिळांकृत केले. जणू काही त्या काळ्या छायेतूनच या सगळ्यांचा जन्म झाला होता व तेथेच ते सगळे अंतर्धान पावले.

ते विषारी वातावरण जसे निवळले तशी ती छाया पूर्णपणे नाहिशी झाली. आक्रसलेल्या मेणबत्तीच्या ज्योती परत प्रकाश फेकू लागल्या. सगळी खोली परत एकदा निरोगी दिसू लागली. दोन्हीही दरवाजे अजुनही बंद होते. कोपऱ्यात माझा कुत्रा निपचीत पडला होता. मी त्याला हाक मारली पण त्याने काहीच हालचाल केली नाही. मी जवळ गेल्यावर माझ्या लक्षात आली तो बिचारा मेला होता. त्याची जीभ बाहेर लोंबत होती व डोळे बाहेर आले होते. त्याच्या तोंडाभोवती फेसही जमा झाला होता. मी त्याला माझ्या कवेत घेतले. त्याच्या मृत्युसाठी मी स्वत:ला दुषणे दिली. माझ्या अत्यंत आवडत्या प्राण्याच्या मृत्युने मला धक्कच बसला. मोठ्याने रडावे असे मला वाटू लागले पण मी भावनांना आवर घातला. मला वाटते तो भीतीनेच मृत्युमुखी पडला असावा. पण जेव्हा मला त्याची मान मोडलेली आढळली तेव्हा मात्र मी हादरलो. त्या अंधारातच कोणीतरी हे अमानुष कृत्य आटोपले असावे का ? यात माझ्यासारख्या हाडामाणसाच्या माणसाचा हात असावा का ? शंकेला जागा आहे..! सांगता येणार नाही. मी फक्त जे घडले तेच सांगू शकतो. वाचकांनी काय काढायचा तो निष्कर्ष काढावा.

दुसरे आश्चर्य म्हणजे माझे घड्याळ परत जागेवर आले होते. पण ज्या क्षणी ते टेबलावरुन नाहिसे झाले त्याच वेळी ते बंद पडले. आत्ता तरी ते तीच वेळ दाखवित असावे. पडल्यावर बरीच घड्याळे अशी बंद पडतात हेही खरे आहे. काय असावे ? सांगता येत नाही.

उरलेल्या रात्री मात्र काहीच घडले नाही. थोड्याच वेळात फटफटले पण मी त्या घराबाहेर पडलो नाही. थोड्याच वेळात सकाळ झाली आणि मी ते घर सोडण्यापूर्वी ज्या खोलीत प्रणव आणि मी कोंडले गेलो होतो त्या खोलीत गेलो. का कोणास ठावूक, जे काही घडले त्याचे मुळ त्याच खोलीत असावे असे मला सारखे वाटत होते. सूर्याच्या प्रकाशात ती खोली उजळून निघाली होती पण काल रात्रीचा त्या खोलीतील माझा अनुभव अजूनही माझ्या मनात ताजा होता. त्या तेथे मी अर्धा मिनिटही थांबू शकलो नाही. मी जिना उतरुन खाली आलो तेव्हाही मला कोणीतरी मला सोडायला खाली येतय असा भास झाला. मी पुढचा दरवाजा उघडून बाहेर रस्त्यावर पाऊल टाकले आणि कोणीतरी छद्मी हास्य केल्याचाही मला भास झाला.... मी सरळ घरी गेलो. माझा नोकर माझी घरी वाट पहात असेल असे मला वाटले पण तो घरी आलाच नव्हता. पुढे तीन दिवस त्याचा पत्ताच नव्हता. नंतर मला त्याचे पत्र मिळाले जे नागपूरहून आले होते.

‘‘....... साहेब मला क्षमा करा. अर्थात ती मागण्याचा हक्क मी गमावलाय याची मला कल्पना आहे. पण मी जे पाहिले ते तुम्ही पाहिले असते तर कदाचित तुम्ही मला क्षमा कराल. देव करो आणि तुम्हाला असले काही पहायला न लागो. मला वाटते या धक्क्यातून सावरण्यास मला बराच काळ लागेल. आणि असल्या कामात तुम्हाला मदत करण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी नागपूरला माझ्या चुलत भावाकडे जात आहे. तो मला दुबईला पाठविण्याचा प्रयत्न करणार आहे. जर आपल्याला मला आत्तापर्यंत केलेल्या कामाचे काही पैसे द्यायचे असतील तर ते माझ्या मित्राकडे पोहोचते करावेत. त्याला माझा पत्ता माहीत नाही हे कृपया लक्षात घेणे.
आपला,.....’’
पुढे ता.क. मधे परत परत क्षमा याचना होती.

प्रणवच्या पळपुटेपणामुळे कदाचित वाचकांचा असा गैरसमज होण्याचा संभव आहे की त्याला दुबईला जायचे असल्यामुळेच त्याने हे सगळे नाटक केले पण ज्या घटना घडल्या त्याचे उत्तर एवढे सोपे नाही. असो. मी माझ्या तत्वावर अजुनही ठाम आहे. संध्याकाळी मी परत त्या घराकडे गेलो. मला माझ्या राहिलेल्या काही गोष्टी व मुख्य म्हणजे माझ्या कुत्र्याचे शव परत आणायचे होते, या वेळेला मात्र काही घडले नाही. पण तो जिना चढताना आणि उतरताना माझ्या मागे कोण्याच्या तरी पावलांच्या आवाजाचा भास मात्र झालाच. ते काम झाल्यावर मी जहागिरदारांकडे गेलो. नशिबाने ते घरीच होते. मी त्यांच्या घराची चावी त्यांच्या स्वाधीन केली व काय घडले हे त्यांना सांगणार तेवढ्यात त्यांनी मला बोलण्यापासून रोखले व विनम्रपणे त्यात त्यांना काडीइतकाही रस नसल्याचे सांगितले.

शेवटी मी त्यांना त्या दोन पत्रांबद्दल बळेबळेच सांगितले. त्यातील मजकूर सांगितला व ती रहस्यमयरित्या कशी अदृष्य झाली तेही सांगितले.

"जहागिरदार, जी बाई त्या घरात वारली, तिला लिहिलेली ती पत्रे असावीत असे मला वाटते. तिच्या पुर्वायुष्याबद्दल तुम्हाला काही माहीती आहे का? जेणेकरुन त्या पत्रातील रहस्याचा उलगडा होईल ?’’
ते ऐकल्यावर जगागिरदार दचकले. थोडावेळ विचार करुन ते म्हणाले,

‘‘ मला तिच्या पुर्वायुष्याबद्दल थोडीफार माहीती आहे. ते कुटुंब आमच्या ओळखीचे होते हे मी तुम्हाला सांगितलेच होते. पण तुमच्यामुळे माझ्या काही आठवणी जागा झाल्या आहेत. मी जरा चौकशी करुन सांगतो. पण त्या बाईचा त्या घरात मृत्यु होण्याआधीपासून ते घर झपाटलेले आहे हे लक्षात घ्या. तुम्ही हसताय ! मी काही चुकीचे बोललो का ? काय म्हणता ?’’

‘‘जर आपण या सगळ्याच्या मुळापर्यंत गेलो तर या सगळ्यामागे कुठलातरी मनुष्यप्राणी आहे याचा उलगडा आपल्याला निश्चितच होईल.’’

‘‘ काय म्हणता ? हे एवढे सगळे रामायण घडल्यावरही तुम्ही असे म्हणता म्हणजे कमालच आहे. मग ही काय भोंदुगिरी म्हणायची की काय ?’’

‘‘ सामान्यत: ज्याला भोंदुगिरी म्हणातात ती भोंदुगिरी म्हणत नाही मी. समजा मी गाढ झोपेत गेलो. अशी झोप की तुम्ही मला त्यातून उठवू शकत नाही आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ लागलो, जी मी जागेपणीही देऊ शकत नाही तर काय होईल ? उदा. तुमच्या खिशात किती पैसे आहेत, तुमच्या मनात काय विचार चालले आहेत तर त्याला भॉदुगिरी म्हणता येईल का? नाही कदाचित तुम्ही त्याला अमानवी म्हणाल. कदाचित कोणीतरी मोहिनीशास्त्राने काही अंतरावरुन माझ्या मनावर ताबा मिळवला असेल व तो माझ्याकडून ही उत्तरे वदवून घेत असेल....काय माहीत !’’

‘‘तुम्ही म्हणता ते एकवेळ कबुल केले तरी तो माणूस खुर्च्या इ. हलवू शकेल का? दुरुन दारे बंद करु शकेल का ?’’

‘‘सध्या जे मेस्मेरिझमचे प्रयोग चालतात त्यात हे असले काही होऊ शकत नाही मान्य! पण कदाचित प्राचिन काळापासून चालत आलेल्या काळ्या जादूत, जारणविद्येत ही ताकद असू शकेल. ही विद्या कदाचित वस्तूंवर चालविली जातही असेल कल्पना नाही. पण तसे होत असेल तर ते निसर्गाच्या विरुद्ध नाही. ती शक्ती फक्त दुर्मिळ व भयंकर तपश्र्चर्येने काही लोक प्राप्त करु शकतात. ज्यांना तुम्ही मांत्रिक म्हणता. ही शक्ती आत्म्यांवर किंवा भुतपिशाच्चांवर चालते की नाही यावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. त्यावर आत्ता मी काही मतप्रदर्शन करणे योग्य नाही. पण ती शक्ती अमानवी आहे असे मी तरी म्हणणार नाही. जे निसर्गाच्या विरुद्ध नाही ते अमानवी कसे असू शकेल ? सामान्य लोक आत्मा आणि भुतयोनीतील मनुष्य यांच्यात गल्लत करतात. ते एक नाहीत. भुतयोनीतील मेलेल्या माणसाच्या शरीराच्या स्वरुपाला भुत म्हणतात. आत्मा नव्हे. ही भुते जेव्हा प्रकट होतात तेव्हा त्यांच्यातील गुणदोष सामान्य माणसांसारखेच या जगात प्रकट होतात. कथा कादंबऱ्यातील वर्णनांपेक्षा ते खूपच सामान्य असतात. मी मग त्यांना याबाबतीतील माझी मते समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यांना काय व किती समजले देवाला माहिती. ‘‘मेंदूची ताकद प्रचंड असते. सडका मेंदू येथे या जगात आपल्या मनावर ताबा मिळवून विध्वंस घडवून आणू शकतो. जसे माझ्या कुत्र्याला त्यांनी ठार मारले. मी जर त्या पाशवी शक्तीचा मुकाबला केला नसता तर माझीही तीच अवस्था झाली असती.

‘‘काय? त्यांनी तुमच्या कुत्र्याला ठार मारले ? हे मात्र भयानक आहे. त्या घरात उंदीर, घुशी, मांजरे का जात नाहीत याचा आता उलगडा होतोय !

‘‘प्राण्यांना असल्या प्रकाराची नेहमीच पहिल्यांदा चाहुल लागते. ते त्यांच्यात उपजतच असते. पण ते त्या शक्तिशी मुकाबला करु शकत नाहीत. जो माणूस त्याची बुद्धी पणाला लाऊन करु शकतो. पण तुम्हाला पटतय का मी काय म्हणतो आहे ते ?’’ मी विचारले.

‘‘थोडेफार समजतय ! आणि खरे सांगू का? भुताखेतांवर एकदम विश्वास ठेवण्यापेक्षा मी कितीही विचित्र स्पष्टीकरणावर विश्वास ठेवणे पसंत करेन. पण ते जाऊदेत. आता या घराचे काय करू मी ?’’

‘‘मी सांगतो ना काय करायचे ते ! माझे अंतर्मन मला सांगते आहे की या सगळ्याची सुरवात त्या छोट्या खोलीतून होते. ज्या खोलीत काहीच नाही ना, तीच ! मी तुमच्या जागी असतो तर ती खोली पाडून टाकली असती. नव्हे माझा तुम्हाला तोच सल्ला असेल. तशीही ती खोली त्या बंगल्याला बाहेरुनच जोडली आहे. ती पाडली तर त्या इमारतीला काहीही होणार नाही.’’

‘‘ आणि मी तसे केले तर....?’’

‘‘त्यांचा या जगाशी होणारा संपर्क तुटेल. एखादी टेलिफोनची तार कापल्या सारखा... मला इतकी खात्री आहे की मीही ती खोली उतरविण्यासाठी लागला तर तुम्हाला हातभार लावीन..’’

‘‘नाही ! नाही ! त्याची काही गरज नाही. परमेश्वराच्या कृपेने तेवढी वेळ माझ्यावर आली नाही अजून. मी तुमच्याशी परत संपर्क करेन... आपण जे काही माझ्यासाठे केले आहे त्यासाठी आपले आभार कसे मानावेत ते कळत नाही..’’

बरेच दिवस जहागिरदारांचा काहीच निरोप आला नाही..
पण दोन आठवड्यांनी त्यांचे एक पत्र मात्र मला आले....

क्रमश:

जयंत कुलकर्णी.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

वगिश's picture

4 Jun 2016 - 11:08 pm | वगिश

बाबो

एस's picture

4 Jun 2016 - 11:16 pm | एस

वाचतोय. पुभाप्र.

प्रीत-मोहर's picture

5 Jun 2016 - 7:34 am | प्रीत-मोहर

इंटरेस्टिंग...
पुभालटा

प्रचेतस's picture

5 Jun 2016 - 10:10 am | प्रचेतस

भन्नाट.
पुभाप्र.

जव्हेरगंज's picture

5 Jun 2016 - 11:53 am | जव्हेरगंज

मस्त चाललीय!
उत्कंठा वाढलीय!

सानिकास्वप्निल's picture

5 Jun 2016 - 1:26 pm | सानिकास्वप्निल

थरारक!!
वाचतेय.

नमकिन's picture

5 Jun 2016 - 7:23 pm | नमकिन

मुक्या प्राण्याचा.

किसन शिंदे's picture

5 Jun 2016 - 7:48 pm | किसन शिंदे

जबरदस्त वर्णन! लवकर टाका पुढचा भाग.

कौशी's picture

5 Jun 2016 - 7:58 pm | कौशी

मस्त लिहिलंय..

कानडाऊ योगेशु's picture

5 Jun 2016 - 8:03 pm | कानडाऊ योगेशु

आत्तापर्यंत मी जे पाहिले आहे किंवा अनुभवले आहे तसल्या घटनांबद्दल लिहितांना बरेच लेखक ते सत्य आहे असे म्हणून मोकळे होतात. पण याच्यामागे कुठल्यातरी जिवंत शक्तीची आवश्यकता असतेच हे ते विसरतात.
....
....
पण तेथेही जिवंत माणसे असावीच लागतात. म्हणून या घरात जे अमानवी प्रकार घडले किंवा घडणार आहेत ते सगळे घडण्यासाठी एखादे जिवंत माध्यम तेथे उपस्थित असण्याची गरज आहे.
....
....
एखादा शास्त्रज्ञ एखादा धोकादायक प्रयोग करताना जसा एकाग्र असतो तशीच अवस्था माझीही झाली होती. थोडीशी विचारांची तंद्रीच लागली होती मला....

वरील पूर्ण परिच्छेदच एक उत्कृष्ठ तत्वज्ञान आहे. मला फार आवडला हा विचार.!

राजाभाउ's picture

6 Jun 2016 - 7:18 pm | राजाभाउ

+१
असेच म्हणतो.

पद्मावति's picture

6 Jun 2016 - 3:39 pm | पद्मावति

खूपच थरारक!
वाचतेय.

नाखु's picture

6 Jun 2016 - 4:29 pm | नाखु

थरारक

अबोली२१५'s picture

6 Jun 2016 - 5:54 pm | अबोली२१५

Hats off....काही paragraph खूप कठीण आहेत अनुवादासाठी पण तुम्ही खूप सोप्पे केलेत
इंग्लिश मधून वाचताना काही भाग माझ्या डोक्यावरून गेले होते.

अमानवी शक्तीच्या दृष्य स्वरुपाबद्दल

विशेषतः हा भाग

एकदम मस्त. अमानवी शक्ती , भुत या बाबतचे एकदम वेगळे तत्वज्ञान

विशाखा राऊत's picture

6 Jun 2016 - 7:57 pm | विशाखा राऊत

एकदम जबरदस्त.. वाचतेय

यशोधरा's picture

7 Jun 2016 - 7:08 am | यशोधरा

थरारक!

सविता००१'s picture

7 Jun 2016 - 8:04 am | सविता००१

जबरदस्त

अजया's picture

7 Jun 2016 - 6:11 pm | अजया

पुभालटा.

Maharani's picture

8 Jun 2016 - 12:18 am | Maharani

Pubhapra

रात्री झोपतांना सगळे दिवे मालवल्यानंतर हे कथानक आठवले तर भीतीने गाळण उडणार हे नक्की.

किंवा

रात्री मध्येच पाणी पिण्यासाठी उठलो. किचनमध्ये एका भिंतीवर लावलेलेले घड्याळ टिक टिक करतेय. रात्रीचे अडीच वाजले आहेत. सगळीकडे भयाण शांतता आहे. फक्त घड्याळाची टिक टिक ऐकू येतेय. आजूबाजूच्या इमारती काळोखात बुडाल्या आहेत. रस्त्यावरच्या दिव्यांचा थोडा उजेड दिसतोय. खिडकीतून दिसणारा रस्ता संपूर्णपणे निर्मनुष्य आहे. माठातून पाणी काढून मी दोन घोट पितो आणि सहजच माझे हॉलकडे लक्ष जाते. सोफ्यावर कथेत वर्णन केल्याप्रमाणे चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेली एक म्हातारी स्त्री माझ्याकडे नजर रोखून बघत बसलीये. मला ठसका लागतो. पुन्हा माझी सोफ्याकडे नजर जाते. सोफा मोकळा आहे. कुणीच नाही. मी कसाबसा पेला माठावर ठेवतो आणि बेडरूमकडे धाव घेतो. तेवढ्यात एक वृद्ध स्त्री बेसिनजवळ उभी असल्याचे दिसते. माझी भीतीने बोबडी वळते. मी खाली कोसळतो.

आज रात्री झोपल्यानंतर हा विचार डोक्यात आणून बघा. किंवा मध्येच जाग आली तर आठवून बघा. मज्जा येईल. :-) आणि उद्या सांगा कुणा कुणाला हा विचार आला आणि कोण कोण खरोखर घाबरले. :-)

कथा भन्नाट आहे. वाचतांना अगदी अंगावर शहारा येतो.

पुढील भाग लवकर टाका प्लीज.

काय हे!! कथेपेक्षापण हे भयानक आहे!!
तो अजय देवगण आणि उर्मिला मातोंडकरचा सिनेमा आहे न त्यात असंच दृश्य आहे एक!!
बाकी कथा १नंबर सुरू आहे, पुढचा भाग लवकर टाका.

आज रात्री हा विचार येणार नक्की! :-) काय वाटलं नक्की शेअर करा...

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2016 - 2:14 pm | टवाळ कार्टा

भन्नाट आहे

जयंत कुलकर्णी's picture

10 Jun 2016 - 12:47 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

किसन शिंदे's picture

10 Jun 2016 - 1:56 pm | किसन शिंदे

पुढील भाग कधी?