घर क्रमांक – १३/८ भाग -२

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
2 Jun 2016 - 8:20 pm

घर क्रमांक – १३/८ भाग - १

घर क्रमांक – १३/८ भाग -२

प्रणवने दार उघडले. तो अगदी निवांत दिसत होता.

‘‘काहीच नाही साहेब ! मी मस्त आहे’’ तो म्हणाला.

‘‘हंऽऽऽऽ मी निराश होत म्हणालो. ‘‘तू काहीच पाहिले नाहीस ? ऐकले नाहीस? निश्चित ?’’

‘‘साहेब मला काहीतरी विचित्र आवाज ऐकू आला पण ते सोडल्यास बाकी काही नाही’’

‘‘आवाज ? कसला आवाज?’’

‘‘ कोणीतरी माझ्या मागे चालतय असा आवाज. एक दोनदा कोणी तरी कानात काहीतरी कुजबुजतय असाही आवाज ऐकू आला असे वाटले पण त्यानंतर काही नाही.’’

‘‘तुला बिलकुल भीती वाटली नाही ?’’

‘‘कणभरही नाही साहेब ! त्याच्याकडे मी अभिमानाने पाहिले. हा माणूस संकटात मला एकट्याला कधीच सोडून जाणार नाही याची मला खात्री वाटली.

आम्ही त्या घराच्या बैठकीच्या प्रशस्त खोलीत होतो. मुख्य दरवाजा आता बंद होता. मी माझे लक्ष वाघ्याकडे वळवले. तो नेहमीप्रमाणे माझ्या पुढे पळत घरात घुसला होता पण आता त्याला दरवाजातून बाहेर जायचे होते. कसलातेरी विचित्र आवाज काढत तो पाय घासत दरवाजापाशी घुटमळत होता. दरवाजा ओरबाडत होता. त्याला मस्तकावर थोडे थोपटल्यावर तो शांत झाला व आमच्या मागून घरात फिरु लागला. पण त्याची ती पुढे पुढे जायची गडबड बंद झाली. माझ्या पायात घुटमळत तो दबकत चालत होता. आम्ही प्रथम तळमजला तपासला. स्वयंपाकघर, एक कार्यालय, व विशेषत: सगळी फडताळं. त्यातील एका फडताळात कोळ्याच्या जाळ्यामधून, एका कप्यात दोन तीन वाईनच्या बाटल्याही दिसत होत्या. एकंदरीत त्यांना गेल्या कित्येक वर्षात कोणी हातही लावलेला दिसत नव्हता. ‘बहुतेक पिशाच्चांना वाईन आवडत नसावी.’ मी मनात म्हटले. अजून काही विशेष आम्हाला तरी दिसले नाही. मागे एक छोटे परस होते व त्याला चांगल्या उंच भिंतीचे कुंपण होते. परसातील फरशी दमट होती व त्याच्यावर आमच्या पावलांचे फिकट ठसे उमटत होते.

...आणि त्याच वेळी माझ्या समोरच एक विचित्र गोष्ट घडली. माझ्या समोर फरशीवर अचानक एक पाउल उमटले. तापलेल्या फरशीवर एखादे पाऊल उमटावे व उष्णतेने त्याची वाफ व्हावी असे काहीतरी झाले. मी थांबलो. प्रणवच्या बाहीला झटका देत त्याला थांबवले व त्या ठशाकडे बोट दाखवले. फार फिक्कट होते पाऊल पण त्याचा आकार कळत होता. एखाद्या लहान मुलाच्या अनवाणी पायाचा ठसा असावा तसे ते उमटले होते. तेवढ्यात त्याच्याच बाजूला थोडे पुढे दुसरे पाऊल उमटले. हा प्रकार आम्ही कुंपणाच्या भिंतीपर्यंत पोहोचेपर्यंत चालू होता. परत येताना मात्र काही झाले नाही. आम्ही हॉलमधील पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर आलो. वरच्या मजल्यावर एकात जेवणाचे टेबल होते तर एकात बसायच्या काही खुर्च्या व एक चौरंगासमान टेबल. त्याच्या मागे अजून एक खोली होती. याखेरीज अजून एक छोटी खोली त्या मजल्याच्या कोपऱ्यात होती. सगळे कसे स्तब्द्ध होते. मग आम्ही परत खाली हॉलमधे आलो. मी एका खुर्चीवर बसलो समोरच्या टेबलावर प्रणवने एक मेणबत्ती लावली होती ज्याच्या प्रकाशात आमच्या सवल्या भिंतीवर डोलत होत्या.

‘‘लाईट नाहीत का येथे ?’’ मी विचारले.

‘‘नाही. पण मिटरची रिकामी जागा मात्र दिसली साहेब !’’ मी त्याला खोलीचा दरवाजा बंद करायला सांगितला. तो ते बंद करायला वळला आणि तेवढ्यात माझ्या समोरची खुर्ची आवाज न करता सरकली व माझ्यापासून थोड्या अंतरावर येऊन पडली.

‘‘ अरे व्वा ही जरा बरी जादू आहे ! ’’ मी हसत म्हणालो. वाघ्याने खाली मान घातली व तो खालच्या आवाजात रडल्यासारखा गुरगुरला. प्रणवने पाठमोरा असल्याने त्या खुर्चीची ती हालचाल पाहिली नव्हती. तो वाघ्याला शांत करण्याचा प्रयत्न करु लागला. तेवढ्यात मला त्या खुर्चीवर एक निळसर, धुरकट मानवी आकृती असल्याचा भास झाला. भासच होता का ? अर्थात भासच असणार. अशा वेळी होणाऱ्या मनाचे खेळ तसे मला परिचीत होते. वाघ्या आता शांत झाला.

‘‘प्रणव ही खुर्ची परत तेथे भिंतीला टेकवून ठेव बरं !’’ मी त्याला म्हणालो.

‘‘ काय साहेब ?’’ प्रणव गर्रकन मागे वळून म्हणाला.

‘‘काय रे ?’’

‘‘ मला खांद्यावर काहीतरी लागले. या इथे.’’

‘‘नाही रे बाबा...पण येथे हातचलाखी करणारे आहेत हे निश्चित. त्यांनी आपल्याला घाबरबविण्याचे अजून प्रयोग करण्याआधी आपण त्यांना पकडणार आहोत हेही निश्चित आहे.’’ मी म्हणालो.

आम्ही त्या खोलीत फार काळ थांबलो नाही. एकतर त्या खोलीच्या भिंतींवर ओल आली होती व त्याचा एक प्रकारचा कुबट वास त्या खोलीत पसरला होता. ऐन उन्हाळ्यात त्या खोलीच्या भिंती गार पडल्या होत्या. ‘ओल आली होती ना, त्यामुळे असेल’ मी मनाशी म्हटले. आम्ही वरच्या मजल्यावरच्या खोलीत गेलो. जाण्याअगोदर आम्ही सर्व खोल्यांना कड्या घातल्या, ती काळजी मी प्रत्येक ठिकाणी घेतोच. प्रणवने माझ्यासाठी जी खोली तयार केली होती ती त्या मजल्यावरची सगळ्यात चांगली व मोठी असावी. रस्त्यावर उघडणाऱ्या दोन मोठ्या खिडक्या होत्या आणि त्याच्या बाजूच्या भिंतीत एक दरवाजा होता. त्या दरवाजापलिकडे प्रणवने स्वत:ची सोय केली होती. एका कोपऱ्यात ब्रिटीशकालीन मच्छरदाणी अडकविण्यासाठी लाकडी चौकट असलेला पलंग. या पलंगाने त्या खोलीतील बरीच जागा अडवली होती. त्याच्या खोलीत एक छोटा सोफा होता. आणि मुख्य म्हणजे या खोलीला तो एकच दरवाजा होता जो माझ्या खोलीत उघडत होता. खोलीत भिंतीतील दोन कपाटे होती मातकट रंगाची. आम्ही ती कपाटे तपासली पण त्यात हॅगर आडकवायच्या हुकखेरीज काहीही नव्हते. त्यानंतर आम्ही भिंतींवर थापा मारुन पाहिल्या की त्या कुठे पोकळ तर नाहीत ? ही तपासणी झाल्यावर आम्ही थोडी विश्रांती घेतली व मी एक सिगार पेटविली व प्रणव बरोबर उरलेल्या तपासणीच्या कामाला लागलो. या मजल्यावरील जिन्याच्या चौकात अजून एक दरवाजा दिसत होता.

‘‘ साहेब मी जेव्हा आलो तेव्हा इतर दरवाजांबरोबर याचीही कडी काढली होती व तो उघडला होता. आता हा आतून कोणी लावला असेल तर....’’

त्याचे वाक्य संपण्याआधीच तो दरवाजा आपोआप हळूच उघडला गेला. आम्ही दोघांनी चमकून एकमेकांकडे पाहिले. आमच्या दोघांच्याही मनात एकच विचार चमकून गेला असणार, ‘‘ कोणीतरी आत सापडेल !’’

मी पटकन आत घुसलो व माझ्या मागून माझा नोकर. त्या मोकळ्या खोलीत फार काही सामान नव्हते. काही रिकामी खोकी व पुडकी एका कोपऱ्यात पडली होती. त्या खोलीला एकच खिडकी होती आणि तिची दारे बंद होती. आत किंवा बाहेर जाण्यासाठी दुसर कुठलाही मार्ग नव्हता. जमिनीवर गालिचाही नव्हता की त्याच्या खाली काही दरवाजा असेल. खोली जुनाट वाटत होती. काही ठिकाणी वाळवीही लागलेली दिसली. भिंतीवर रंगाचे पोपडे होते तर काही ठिकाणी दुरुस्ती केल्याची चिन्हे. थोडक्यात या खोलीत कोणी रहात असेल याची सुतराम शक्यता नव्हती. तेवढ्यात ज्या दरवाजाने आम्ही आत आलो तो दरवाजा हळूच बंद झाला. आम्ही आता कोंडले गेलो होतो असे म्हणायला हरकत नाही.

आयुष्यात प्रथमच माझ्या अंगावर सरसरुन काटा आला. मी अर्थातच तो जाणवू दिला नाही. पण प्रणववर या सगळ्याचा काही परिणाम झालेला दिसला नाही.

‘‘साहेब तो दरवाजा मी माझ्या एका लाथेत उघडीन... काळजी करु नका.’’ प्रणव म्हणाला. माझ्या अंगावर आलेला काटा याला समजला की काय ! मी मनात म्हटले.

‘‘अरे पहिल्यांदा हाताने तरी उघडून बघ’’ मी मनावरचे दडपण झुगारुन प्रणला म्हणालो. ‘‘तोपर्यंत मी खिडक्या उघडतो.’’

त्या खिडक्या मागच्या परसात उघडत होत्या. खिडकीखाली सरळसोट भिंतच होती. कसलाही आधार नव्हता. खिडकीबाहेर उतरणारा माणूस सरळ मागच्या परसातील फरसबंदी अंगणातच कोसळला असता. प्रणव तोपर्यंत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. त्याने वळून माझ्याकडे ते दार तोडण्याची परवानगी मागितली. त्यावेळी मला त्याच्या धैर्याचे कौतुक वाटले हे कबुल केलेच पाहिजे. या असल्या कामात असा साथीदार मिळण्यास नशीबच लागते. मी त्याला ते दार तोडण्यास परवानगी दिली.

प्रणव तसा तगडा गडी होता. पण त्याने सर्वताकदीनिशी घतलेल्या लाथांनी तो दरवाजा थोडाही थरथरला नाही. धापा टाकत तो बाजूला झाला व मी प्रयत्न करुन पाहिला, पण छे ! मी दमल्यावर माझ्या मनाचा ताबा त्या विचित्र भितीने घेतला. कुठल्यातरी, कोणाच्यातरी उच्छ्वासाने ती खोली भरुन गेली. त्या विषारी हवेने मला गुदमरुन टाकले. आम्ही दमून बसल्यावर तो दरवाजा जसा बंद झाला, तसाच परत हळूच उघडला. आम्ही पटकन त्या जिन्याच्या चौकात आलो. आम्ही दोघांनीही ते एकदमच पाहिले. माणसाच्या आकाराचा एक उजेडाचा गोळा, ज्याला काही आकार उकार नव्हता आमच्या समोरुन जिन्यावरुन उतरुन गेला. मी त्या प्रकाशाच्या मागे धावलो. माझ्या मागून प्रणवही आला. त्या प्रकाशाने अचानक उजवी बाजू पकडली व एका पोटमाळ्यात शिरला. मीही त्याच्यामागे त्या खोलीत घुसलो. त्याचवेळी त्या प्रकाशाचा एक छोटा पण अत्यंत तेजस्वी असा गोळा झाला व तो कोपऱ्यातील पलंगावर विराजमान झाला. क्षणभर तेथे थांबून तो नाहीसा झाला.

आम्ही त्या पलंगाची कसून तपासणी केली. नोकरांसाठी असते तशी चारपाई होती ती. तिच्याच शेजारी उजव्या बाजूला एक ड्रॉवर असलेले जूने कपाट होते. एखाद्या इंग्रजी चित्रपटात असते तसे. त्याच्या वर एक विटलेला रेशमी रुमाल पडला होता. त्यात एक सुई अजूनही तशीच होती. त्या रुमालावर धूळ साठलेली दिसली. बहुधा तो त्या घर सांभाळणाऱ्या म्हाताऱ्या बाईचा असावा आणि ही तिचीच खोली असावी. तो ड्रॉवर उघडण्याची मला तीव्र इच्छा झाली. त्यात काही बायकांचे कपडे व किरकोळ गोष्टी होत्या. तेवढ्यात माझे लक्ष त्यातील दोन कागदांवर पडली. ती दोन पत्रे होती व एकमेकांना एका पिवळ्या रेशीमधाग्यांनी बांधलेली होती. मी ती ताब्यात घेतली. मला इतर काही महत्वाचे आढळले नाही. त्या प्रकाशाच्या गोळ्यानेही काही परत दर्शन दिले नाही. पण आम्ही बाहेर जाण्यासाठी वळलो मात्र आम्हाला आमच्या मागे पायरव ऐकू आला. कोणीतरी पाय घासत आमच्यामागे येत असल्यासारखा. आम्ही उरलेल्या खोल्यातून फिरलो (एकूण चार) पण जे काही ते होते ते आमच्या मागून मागून फिरत होते. बाकी काहीच दिसत नव्हते. फक्त पाऊलांचा आवाज. मी माझ्या हातात ती पत्रं धरली होती आणि कोणीतरी हळुवारपणे ती पत्रं माझ्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न करत असल्याचे मला जाणवले. मी ती तशीच हातात घट्ट पकडल्यावर मात्र तो प्रयत्न थांबला. कदाचित ती फाटतील अशी भीती वाटली असावी...

आम्ही ज्या खोलीत झोपण्याची सोय केली होती त्या खोलीत परत आलो आणि माझ्या लक्षात आले की आमचा कुत्रा आमच्या बरोबर नव्हता. मला ती पत्रे वाचण्याची उत्सुकता वाटल्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
‘‘असेल कुठेतरी ! येईल

’’ मी मनात म्हटले. प्रणव त्याने आणलेली हत्यारे त्याच्या पिशवीतून काढून टेबलावर नीट मांडत होता. तेवढ्यात वाघ्या आला. तो जरा विचित्र वागत होता हे मात्र खरे. प्रणवने त्याच्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आणि मी त्या पत्रांकडे...

पत्रातील मजकूर फार काही मोठा नव्हता आणि त्या पत्रांवर तारीखही लिहिली होती. साधारणत: ३०-३५ वर्षापूर्वीची असावी. प्रेमपत्र होती ती. एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीला लिहिलेली आणि एखाद्या पतीने त्याच्या तरुण पत्नीस लिहिलेली. पत्रामधे त्यांनी एकत्र केलेल्या प्रवासाचा उल्लेख होता. पत्रातील भाषा रांगडी व अशुद्ध होती. बहुधा पत्रलेखकाचे फारसे शिक्षण झालेले नसावे. खलाशी असावा बहुतेक. लेखनात भरपूर चुका होत्या आणि भाषाही थोडीफार पुरषी अहंकाराने भरलेली. कुठल्यातरी रहस्याचाही वारंवार उल्लेख होता. चोरट्या प्रेमाचा नाही तर एखाद्या गुन्ह्याबद्दलचा. एक वाक्य होते, ‘‘ आपण एकमेकांना सांभाळून घेतले पाहिजे. जर इतरांना सगळे समजले तर आपली काय अवस्था होईल ते मी सांगायला नको’’ ‘‘रात्री तुझ्या खोलीत कोणाला झोपू देऊ नकोस. तुला झोपेत बडबडण्याची सवय आहे माहीत आहे ना ?’’ ‘‘ जे झाले ते झाले आणि जर थडग्यातून कोणी उठून बाहेर आले तरच जगाला काय झाले आहे हे कळेल याची खात्री बाळग.’’ ही ओळ अधोरेखीत करुन त्याच्याखाली चांगल्या अक्षरात लिहिले होत ‘‘त्यांना माहीत झाले आहे’’ हे अक्षर बाईचे वाटत होते. पत्राच्या शेवटी त्याच बायकी अक्षरात लिहिले होते, ‘‘दाभोळच्या समुद्रात बेपत्ता. ४ जून. त्याच दिवशी ज्या दिवशी....’’

मी पत्रे खाली ठेवली आणि त्यातील मजकुरावर विचार करु लागलो. मला खरी भिती होती ती माझ्या स्वत:च्याच विचारांची. माझे मनोधैर्य खच्ची करण्याची ताकद या विचारात होती म्हणूनच मी पुरेशी काळजी घेत होतो. आता पुढे येणारी रात्र काय काय चमत्कार दाखविणार आहे कोणास ठाऊक. मी चिंता दूर सारली व पत्रे टेबलावर ठेवून ‘‘परमेश्र्वराचे उगमस्थान’’ हातात घेतले. रात्री साडे अकरापर्यंत मी निवांत वाचत होतो. मग मी कपडे बदलून पलंगावर आडवा झालो. प्रणवलाही जागे राहण्यास सांगून त्याच्या खोलीत जायला सांगितले. मधला दरवाजा उघडा ठेवायला सांगितले. माझ्या पलंगाशेजारील टेबलावर मी दोन मेणबत्या लावल्या व त्याच्या शेजारीच हत्यारांच्या येथे हातातील घड्याळ काढून ठेवले व परत पुस्तक हातात घेतले. खाली एका जुन्यापुराण्या जाजमावर वाघ्या झोपला होता. त्याला पाहून मी जरा निवांत झालो. वीस एक मिनिटे झाली असतील तोच माझ्या गालाला थंडगार वाऱ्याचा स्पर्ष झाला. मला वाटले कुठलातरी दरवाजा उघडा राहिला असेल पण खोलीचे एक सोडून सगळे दरवाजे बंद होते. मी मेणबत्त्यांकडे पाहिले एखाद्या हवेच्या झोतात थरथरावी तशी त्याची ज्योत फडफडत होती. त्याच वेळी माझे घड्याळ हळुहळु सरकत सरकत खाली पडले व जमिनीवर पडण्याआधीच नाहीसे झाले. मी पटकन उठलो व माझे रिव्हॉल्वर हातात घेतले. ते हरवून मला चालणार नव्हते. मी सगळीकडे नीट नजर फिरवली पण माझ्या घड्याळाचा पत्ता नव्हता. तेवढ्यात माझ्या पलंगावरच्या फळीवर कोणीतरी तीनदा ट्कटक केली. अगदी मोठ्यांदा.

‘‘साहेब तुम्ही बोलावलत का ?

’’नाही पण झोपू नकोस, तयार, होशियार रहा’’

इकडे वाघ्या उठून बसला. त्याचे कान वेगाने पुढे मागे हलत होते. तो माझ्याकडे विचित्र दृष्टीने एकटक बघत होता. तो हळुहळु उठला. त्याच्या अंगावरचे सगळे केस ताठ झाले. त्याच नजरेने माझ्याकडे पहात तो गुरगरू लागला. माझ्याकडे त्याच्याकडे पहायला वेळ नव्हता. तेवढ्यात प्रणव त्याच्या खोलीतून बाहेर आला. माणसाचा चेहरा भीतीने भयंकर होतो असे म्हणतात. तो कसा हे मी आज पहात होतो. अतीशय भयंकर. तो मला रस्त्यात भेटला असता तर मी त्याला ओळखलेच नसते. त्याने एका ढांगेतच मला ढकलुन ओलांडले व जोरात ओरडला. पण त्याच्या घशातून आवाज फुटत नव्हता. माझ्या कानावर फक्त कुजबुजण्याचा आवाज आला.

‘‘पळा ! पळा ते माझ्या मागे लागलेय !’’

त्याने पळत दरवाजा गाठला, तो जोरात खेचला व बाहेर पळाला. मीही त्याच्यामागे त्याला हाका मारत गेलो. पण माझ्याकडे न बघता, माझे न ऐकता तो काहीच उड्यात तो जिना उतरुन गेला. थोड्याच वेळात पुढच्या दाराचा उघडण्याचा व बंद झाल्याचा आवाज झाला.

त्या झपाटलेल्या घरात मी आता एकटाच राहिलो...एकटाच....

क्रमश:...

जयंत कुलकर्णी.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

2 Jun 2016 - 8:25 pm | आदूबाळ

वाचिंग...

स्पा's picture

2 Jun 2016 - 8:35 pm | स्पा

बाबो, मजबुत टरकलिये

जेपी's picture

2 Jun 2016 - 8:42 pm | जेपी

उत्सुकता वाढलीय ..
पुढील भाग लवकर टाका

आयशप्पथ, ह्याला म्हणतेय असली भयकथा.
येउद्या जयंतराव. भीती आहेच थ्रिल पण जाणवतेय.

जव्हेरगंज's picture

2 Jun 2016 - 9:24 pm | जव्हेरगंज

जाम खतरा !!!

यशोधरा's picture

2 Jun 2016 - 9:26 pm | यशोधरा

सॉलीड!!

दा विन्ची's picture

2 Jun 2016 - 10:18 pm | दा विन्ची

खतरनाक. पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

2 Jun 2016 - 10:35 pm | मुक्त विहारि

पण ते क्रमशः आडवे आले..

पुभालटा.

एस's picture

2 Jun 2016 - 11:19 pm | एस

पुभाप्र.

प्रचेतस's picture

2 Jun 2016 - 11:48 pm | प्रचेतस

काय अफाट स्टोरीटेलिंग आहे. निव्वळ भन्नाट.
टिपिकल भयकथांपासून अगदी वेगळी.

प्रशांत's picture

3 Jun 2016 - 12:41 pm | प्रशांत

भन्नाट...

बोका-ए-आझम's picture

2 Jun 2016 - 11:54 pm | बोका-ए-आझम

जबरदस्त! पुभाप्र!

कपिलमुनी's picture

3 Jun 2016 - 12:31 am | कपिलमुनी

पुभाप्र

कानडाऊ योगेशु's picture

3 Jun 2016 - 12:41 am | कानडाऊ योगेशु

सॉलिट्ट! रात्री बारा वाजता घरी एकटा असताना वाचतोय. लाईट ऑन ठेवुनच झोपावे लागणार असे दिसतेय!

खटपट्या's picture

3 Jun 2016 - 12:47 am | खटपट्या

बाबौ,

पुभाप्र..

अरे बाप रे !! दुसरा भाग लगेच टाकला म्हणुन खुप धन्यवाद.

आनन्दा's picture

3 Jun 2016 - 12:55 am | आनन्दा

थ्रिलिन्ग..

रमेश भिडे's picture

3 Jun 2016 - 1:00 am | रमेश भिडे

शेवटचा भाग येईपर्यंत...

tushargugale's picture

3 Jun 2016 - 1:22 am | tushargugale

सुंदर

जयंत कुलकर्णी's picture

3 Jun 2016 - 10:13 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

अनिरुद्ध प्रभू's picture

3 Jun 2016 - 10:18 am | अनिरुद्ध प्रभू

अगदी भयकथा कशी असावी याचा उत्तम उदाहरण...
वाह! जयन्त काका,
पुभाप्र...

लवकर टाका..प्लिज

मृत्युन्जय's picture

3 Jun 2016 - 10:53 am | मृत्युन्जय

पुभाप्र. इतकेच लिहितो. अजुन किती भाग उरलेत?

प्रकाश घाटपांडे's picture

3 Jun 2016 - 10:55 am | प्रकाश घाटपांडे

डे़ंजर दिसतय. वाचताना भीती वाटायला लागलि

सुबक ठेंगणी's picture

3 Jun 2016 - 10:55 am | सुबक ठेंगणी

जबरदस्त भयकथा आहे.
मला वाटतं की त्या "मी" चा भूतांवरचा अविश्वास, हे जे कोण करतंय त्याला नक्कीच पकडू शकू असा त्याला वाटणारा विश्वास, जिवंत माणसांनी लिहिलेली पत्रं यामुळे गूढ अधिकंच दाट झालंय आणि "हे" जग आणि "ते" जग ह्यातली सीमा धूसर झालिये...मी चा जागी स्वतःला कल्पून थरार अनुभवते आहे.

नाखु's picture

3 Jun 2016 - 11:17 am | नाखु

इतकेच म्हणतो...

दिवाभीत नाखु

पैसा's picture

3 Jun 2016 - 12:14 pm | पैसा

घाबरवणारे आहे सगळे

माफ करा, जयंतकाका पण हा भाग बराच कृत्रिम ओढून ताणल्यागत वाटला. भय मुळीच नाही जाणवले.
भय हे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट, धूसरता किंवा सूचकतेत असते. इथे सगळ्या घडामोडी नाटकाच्या स्टेजवर घडल्यासारख्या समोर स्पष्ट घडत असल्यामुळे थरार गेला आहे.
तरीही वाचतेय...

मला तरी तसे काही वाटली नाही. उलट ही भयकथा सर्वसामान्य भयकथांपेक्षा वेगळी आहे. एकाच वेळी श्रद्धा-अंधश्रद्धेचा झगडा चालू आहे. सर्व काही समोर दिसत असूनही त्यातला थरार जाणवतो आहे.

जयंत कुलकर्णी's picture

3 Jun 2016 - 3:03 pm | जयंत कुलकर्णी

अरे माफी कशासाठी. तुम्हाला जे वाटले ते तुम्ही लिहिले. खरे तर हा लेखनविषय माझा नाही. तरी पण म्हटलं बघुया लिहून.... :-) :-)

सस्नेह's picture

3 Jun 2016 - 3:05 pm | सस्नेह

:)

इशा१२३'s picture

3 Jun 2016 - 3:07 pm | इशा१२३

बापरे!!
पुभाप्र...

इशा१२३'s picture

3 Jun 2016 - 3:07 pm | इशा१२३

बापरे!!
पुभाप्र...

किसन शिंदे's picture

3 Jun 2016 - 3:17 pm | किसन शिंदे

भन्नाट चाललीये कथा. पुभाप्र

विटेकर's picture

3 Jun 2016 - 5:27 pm | विटेकर

काटा आला अंगावर !
जरा पटापटा भाग टाकाल का ?

चैतू's picture

3 Jun 2016 - 6:07 pm | चैतू

लवकर येउ द्या पुढचे भाग...

निशाचर's picture

3 Jun 2016 - 8:51 pm | निशाचर

मस्त लिहिलंय!

सानिकास्वप्निल's picture

4 Jun 2016 - 1:53 pm | सानिकास्वप्निल

दोन्ही भाग वाचले.
जबरदस्त भयकथा, काटा आला अंगावर.

पद्मावति's picture

4 Jun 2016 - 4:07 pm | पद्मावति

मस्तं!!! पु.भा.प्र.

सविता००१'s picture

4 Jun 2016 - 5:25 pm | सविता००१

जबरी....
पुभाप्र

बापरे.उगाचच वाचायला घेतली.आता भिती वाटणार :(आणि पुढचे वाचायचा मोह सुटणार नाही.झपाटले कथेने!

Maharani's picture

7 Jun 2016 - 11:54 pm | Maharani

Jabarat.....

साहेब..'s picture

8 Jun 2016 - 11:24 am | साहेब..

दोन्ही भाग वाचले.

साहेब..'s picture

8 Jun 2016 - 11:26 am | साहेब..

तिसरा भाग आला आहे.