ते...(पुढे सुरू!) भाग ३

सटक's picture
सटक in जनातलं, मनातलं
1 Mar 2016 - 4:27 am

भाग १
भाग २

निस्तेज डोळ्याच्या सवितेला काही सुचत नव्हते..आल्यापासून तिने फक्त २ लोटे पाणी रिचवले होते. तोंडातून एक शब्दही फुटला नव्हता. राघवला परशुरामशास्त्र्यांकडे येणार्‍या लोकांच्या स्थितीची कल्पना असल्याने तो शांतपणे स्वतःच्या आसनावर बसून होता. सवितेची नजर ठरत नव्हती एका ठिकाणी. अत्यंत कृश असलेली सविता कोणत्या तरी आत्यंतिक तणावाखाली आहे हे तर उघडच होते. फिक्कट, निस्तेज, कधीकाळी आनंदी असेल अशी शंकाही न येणारी सविता कुठले तरी अनामिक भय वागवित होती. तिच्या सर्व अस्तित्वावर त्याच्या खुणा राघवाच्या साध्या नजरेला सुद्धा दिसत होत्या...
सकाळची साधना आटोपून परशुरामशास्त्री बाहेर आले.. त्यांना बघताक्षणीच सवितेच्या चेहर्‍यावर एक मंद हसू फुलले. परशुरामशास्त्र्यांचा प्रभावच तसा होता!
"बोल मुली, का आली आहेस इथे?" त्यांनी अत्यंत मायेनी विचारले.
"अं.....माझे नाव सविता...!" ती अडखळत म्हणाली. परशुरामशास्त्र्यांनी मान डोलावली. तिला शब्दांची जुळवाजुळव करावी लागत होती हे स्पष्ट दिसतच होते. परशुरामशास्त्री थांबले. एखाद्या वैद्यकाप्रमाणे, रुग्णाची व्यथा त्याच्याच तोंडून ऐकावी असे शास्त्र्यांचे मत होते. ते कधीही कुणाला दुसरा प्रश्न विचारत नसत.
बराच वेळ गेला..."अं.....माझे नाव सविता...!" ती पुन्हा अडखळत म्हणाली. तिला काहीतरी अत्यंत महत्वाचे सांगायचे होते पण शब्द फुटत नव्हते...की आठवत नव्हते? की माहित नव्हते? की अजूनच काहीतरी होते? तिला भोवंड येऊ लागली होती..ती पडणार इतक्यात चपळाईने उठून राघवाने तिला परत बसते केले...ती असहाय्यपणे सगळीकडे बघत होती. प्रकार काहीतरी वेगळा आहे हे शास्त्र्यांच्या ध्यानात आले. त्यांनी आपल्या पिशवीतून अर्घंटीची मुळी काढली. कुण्या इतराच्या हातात फक्त एक विषारी मूळ असलेली ही वनस्पती, परशुरामशास्त्र्यांच्या हाती मात्र शुद्धकाचे काम करीत असे. त्यांनी ती मुळी किंचित ओली करून सविता बसलेल्या ठिकाणाभोवती एक रिंगण केले..थोडेसे रक्तचंदन रिंगणाच्या परीघाला स्पर्शवल्यावर ते पुन्हा आसनावर जाऊन बसले. येवढ्या एका छोट्याश्या कृतीने त्यांनी तिच्याभोवतीचा अवकाश थोड्या वेळापुरता मोकळा केला होता.
"बोल मुली.." परशुरामशास्त्री गंभीरपणे म्हणाले.
"माझे नाव सविता..मी रुसाळ्याच्या पाटलांची सून. रुसाळे इथून तसे लांबच आहे. मी कालपासून निघाले तेव्हा आज पोहोचले आहे.." सविता भराभर बोलू लागली. परशुरामशास्त्र्यांचा चेहरा काळजीने बदलला होता. रूसाळ्याहून फार तर फार ३ तासांच्या अंतरावर असलेल्या ससाळ्यात पोचायला तिला दीड दिवस लागला होता!
"आमचे गाव खूप छान आहे. माझे नुकतेच, ६ महिन्यांपूर्वी विशालराव पाटलांशी लग्न झाले. सगळे खूप छान होते, पण...." ती थबकली! परशुरामशास्त्री लक्ष देऊन ऐकू लागले..."आमच्या गावात न......."
ह्या एका अक्षरातच जे व्हायचे ते झाले होते...सवितेचा चेहरा भेसूर, अमानवी, हिंस्त्र झाला होता!! राघावाच्या मानेवरचा केस अन केस उभा राहिला होता...त्याच्या चेहर्‍यावर आश्चर्याबरोबरच त्या वर्तुळात जायची तीव्र इच्छा निर्माण झालेली दिसत होती. परशुरामशास्त्र्यांच्या ते वेळीच लक्षात आले नसते तर त्याने तसे केलेही असते. सांप्रत परशुरामशास्त्र्यांनी त्याच्या खांद्यावर आपला हात ठेवला. राघव चुळबुळत शांत बसला.
तिकडे सविता मात्र हिंस्त्र लालसर डोळ्यांनी सर्वत्र बघत होती. आपल्या आजूबाजूच्या अवकाशाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होते.
ते आलं होतं....!!
त्यांच्या संरक्षित अवकाशाच्या सीमेला धडक मारायला ते तयार होणार इतक्यात, "सविता..!" असे ओरडून परशुरामशास्त्र्यांनी एक वेगळाच शब्द उच्चारला..आपल्या वर्णमालेत अस्तित्वातच नसलेल्या त्या शब्दाचे सामर्थ्य येवढे होते की तत्काळ सविता आणि राघव निश्चेष्ट झाले होते.
परशुरामशास्त्र्यांनी राघवाला सावध केले...राघवाला काय झाले ह्याची अंधुक कल्पना आल्यमुळे तो अपराधी चेहर्‍याने मान खाली घालून उभा होता. त्यांनी त्याच्या पाठीवर हलकेच थाप दिली..."राघवा..आत्ता थोडक्यात बचावलो खरे! येवढ्यात प्रकरण येवढे पुढे जाईल असे मलाही वाटले नव्हते! जा...डॉक्टरांना घेऊन ये. हिला त्यांना दाखवायला हवे. त्यावरूनही खूपशा गोष्टी कळतील..." परशुरामशास्त्री म्हणाले. राघव निघून गेला.
असे होते तर....त्याला नुसतेच रक्त नको होते...तो संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या अंतरात स्वतःचा एक अंश ठेवत होता. ह्या अंशामुळेच ती व्यक्ती चलन वलन करण्यास सक्षम रहात असली पाहिजे. (सवितेचे पूर्वसंचितच मोठे असल्याने तिला इथे, परशुरामशास्त्र्यांकडे आणवले गेले होते!) जेवढा अंश त्या व्यक्तीत ठेवता येईल तेवढा त्या व्यक्तीवरील अंमल जास्ती! आणि शेवटी, देगल्यासारख्या समर्थ मांत्रिकाचे रक्त वापरून हे सगळे अंश एकत्र करून त्याला, ह्या मितीत चंचूप्रवेश हवा होता, कायमचा!! हा वर्णसंकर होऊ देणे म्हणजे विश्वाच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे होते! देगल्याच्या सूडाचे केवळ निमित्त करून देगल्या त्याला हवे ते मिळवून द्यायला तयार झाला होता! परशुरामशास्त्र्यांचा चेहरा एखद्या पाषाणासारखा कठीण झाला... सूडासाठी अंध झालेल्या आणि सर्व जगाचा घास मूर्तीमंत क्रौर्याला, काळ्या शक्तीच्या त्या अनभिषिक्त सम्राटाला द्यायला निघालेल्या देगल्याबद्दलचा त्यांचा राग त्यांच्या चेहर्‍यावर गोठला होता! स्वत्वाची होळी करूनही हे रोखायलाच हवे होते! शेवटी त्यांच्या परीक्षेची वेला येऊन ठेपली होती! हे कळल्यावर मात्र परशुरामशास्त्री शांत झाले! ते तयार होते.....नरांजोशी दोन हात करायला!

परशुरामशास्त्र्यांच्या अपेक्षेप्रमाणेच डॉक्टरांनी सांगितले की सविताच्या अंगात जिवंत रहायला पुरेसे रक्तही नव्हते! डॉक्टरांना सविताच्या काळजी घेण्याच्या सूचना देताना त्यांनी तिच्या खोलीतला अवकाश भारून घेण्याची काळजी घेतली. सविता आता रूसाळ्यात फक्त अंतिम लढाईच्या दिवशी परत येणार होती. तोपर्यंत तिने थोडे बरे होऊन आपले बळ वाढवायचे होते. पण तिच्यातल्या त्या अंशाला पूर्णाशी संपर्क साधू न देणेही महत्वाचे होते. त्याची सर्व काळजी घेऊन परशुरामशास्त्री निघाले....

राघव दरवाजात त्यांची वाट पाहात होता. "राघवा, हा लढा तुझा नव्हे, तू येथेच थांबलेला बरा! येणारा काळ किती आणि कोणती संकटे घेऊन येइल ह्याची कल्पना करणे अवघड आहे! तू येथेच रहा, गुरुजींच्या समाधीची व्यवस्था बघ!" असे त्यांनी म्हणताना राघवाच्या डोळ्यातूंन घळाघळ अश्रू वाहू लागले होते! "स्वामी, हा देह गुरुजीनी तुमच्या बरोबर रहायला सांगितले तेव्हाच तुम्हाला अर्पण झाला, आता तुम्ही त्याचे जसे कराल तसे मला मंजूर आहे...तुम्हांवर संकट येणार असेल तर मी काय कामाचा? मी आत्ताच माझा मार्ग निवडायला मोकळा आहे!" राघव शांतपणे म्हणाला. परशुरामशास्त्र्यंच्या मुखावर स्मिताची एक लकेर उमटली! "बरं, बरं!! ठीक आहे, रहा माझ्याबरोबरच! तू माझे ऐकणार थोडाच?" असे म्हणून परशुरामशास्त्री निघाले...त्यांच्यामागोमाग राघवही!

क्रमशः

हे ठिकाण

प्रतिक्रिया

वाचतोय. छान रंगवले आहे.

शिल्पा नाईक's picture

1 Mar 2016 - 10:14 am | शिल्पा नाईक

मस्त आहे. धारपांची आठवण आली.

नाखु's picture

1 Mar 2016 - 10:20 am | नाखु

थोडे मोठे भाग टाकणे आणि अर्थात लवकरही.

धारप कथा प्रेमी नाखु

माझ्या आळसाला थोडे challenging आहे अजून मोठे लिहिणे! ;) पण ह्या भागात संपवेनच...कितीही मोठे झाले तरी! विस्तृत लिहिणार्‍यांबद्द्ल आदर वाढला आहे येव्हढेसेच लिहून!

राजाभाउ's picture

1 Mar 2016 - 10:43 am | राजाभाउ

मस्त. पुभाप्र.

एक एकटा एकटाच's picture

1 Mar 2016 - 2:49 pm | एक एकटा एकटाच

चांगली चाललीय

उगा काहितरीच's picture

1 Mar 2016 - 2:55 pm | उगा काहितरीच

पुभाप्र ...

अद्द्या's picture

1 Mar 2016 - 7:08 pm | अद्द्या

समर्थ आणि अप्पा आठवत आहेत सारखे.

लवकर टाका पुढचा भाग .

धन्यवाद! हा पिंड नारायण धारपांवरच पोसलेला आहे!! :-)

सस्नेह's picture

2 Mar 2016 - 3:19 pm | सस्नेह

नारायण धारपांची आठवण येणे अपरिहार्य आहे...

किचेन's picture

3 Mar 2016 - 8:04 am | किचेन

पु ले प्र