देगल्याच्या बापाला काळी विद्या वश होती!
जारण-मारण, मूठ-करणी, वशीकरण, भानामती, स्मशानविद्या...सगळे येत होते त्याला. हाताशी चार दोन पिशाच्चेही होती. सतत तांबारलेल्या डोळ्यानी आणि दारूचा दर्प असणार्या तोंडानी वावरणारा देगल्याचा बाप बगलुआईचा भक्त होता.
जागल्याच्या ताब्यात अख्खे रुसाळे होते!
रुसाळे गाव तसे सधन! गावाचे नाव रुसाळे कसे पडले ह्याचीही एक गंमत होती, गावची देवी येजाई म्हसोबावर रुसून दूर एका तळ्यापाशी जाऊन राहिल्याची आख्यायिका होती. रूसलेल्या देवीचा गाव म्हणून हे रूसाळे! देवीच्या तळ्याला सगळे जाईची कोंड म्हणत. तिथे येजाईचे मंदिर होते. सणा वाराला तिथे उत्सव होत, जत्रा भरत.
जागल्या मात्र जेव्हापासून गावात आला होता...गावाची रया गेली होती! जागल्या त्याला जेव्हा वाटेल तेव्हा आणि ज्याला वाटेल त्याला त्याचे लक्ष्य करत असे. त्याला कुणाकडेही काही उत्तर नव्हते. जागल्या रुसाळ्याचा अनभिषिक्त सम्राट होता. त्याला जीवाची खंडणी दिल्याशिवाय झाडे पानेसुद्धा जगू शकत नसत! आपल्या साधनेसाठी बळी देणे, कुमारिकांचे अपहरण करून त्यांना शाक्त साधनेत दासी म्हणून वापरणे हे जागल्याचे नेहमीचे खेळ. त्याच्या साधने बरोबरच त्याचा अंमल जास्तीच तीव्र होऊ लागला होता. आणि यामुळेच तो रामशास्त्र्यांच्या नजरेत आणला गेला..
रामशास्त्री जेव्हा गावात आले, तेव्हा सगळ्यांनी त्यांच्याकडे फार आशेनी पहायला सुरुवात केली. रामशास्त्री प्रसन्न व्यक्तीमत्वाचे, नम्र, सात्विक, आणि तपःपूत. जेथे जातील तेथला आसमंत दैवी चैतन्याने भारून जाई. फार मोठ्या तंत्रमार्गाचे अधिकारी असलेले रामशस्त्री तसे दाखवत मात्र नसत. जागल्याचे सामर्थ्य ओळखल्यामुळेच ते रूसाळ्यात आले होते, त्याच्याशी दोन हात करायला. पण त्याआधी गावातल्या लोकांच्या मनात त्याची असलेली दहशत संपवणे महत्वाचे होते. रामशास्त्र्यांनी गावात आल्या आल्या देवीचा बंद पडलेला उत्सव पुन्हा सुरू केला. कीर्तनकार, साधू महंत ह्यांचा गावात राबता सुरू केला, आश्रम उघडला. वैदिक शिक्षण सुरू झाले..
जागल्या चिडला नसता तरच नवल. त्याने पहिलाच प्रयोग रामशस्त्र्यांवर मूठ मारण्याचा केला. पण रामशास्त्री कच्चे नव्हते. त्यांनी ती मूठ दक्षिणेला माळावर उतरवली..त्या मंत्रात येवढी ताकद होती की तिथे जमीन दुभंगली...त्यातून मोठमोठ्या शिळा वर आल्या, छोटा भूकंपच आला..
रामशास्त्र्यांनी मात्र प्रतिहल्ला केला नाही. त्यांनी त्यांचे कार्य चालू ठेवले..काही दिवसातच जागल्याचा दुसरा घाव आला..त्याने त्याच्याकडचे एक पिशाच्च सोडून गावच्या एका अश्राप मुलीला धरले...मग मात्र रामशास्त्र्यांचा नाईलाज झाला. रामशस्त्री त्या मुलीला घेऊन जागल्याच्या ठाण्यावर गेले..पुढचे कुणालाच धड माहिती नाही पण जागल्या आणि त्याचे ठाणे, दोन्ही उद्ध्वस्त झाले.
देगल्याला मात्र रामशास्त्र्यांनी काही केले नाही. त्याला आश्रमात ठेवले. पण अशा घराण्यांचे संस्कार पिढ्यानपिढ्या चालत आलेले असतात. पूर्वसंचिताशिवाय कुठल्याच शक्ती साधकाची निवड करत नाहीत! देगल्याही वेगळा नव्हता. तो शेवटचा रामशास्त्र्यांना भेटला तेव्हा म्हणाला... मी माझ्या बापाचा बदला घेईन! रामशास्त्री म्हणाले, मुला, खुशाल जा..पण हे ध्यानात ठेव, मांगल्याचा अमंगळावर नेहमीच जय होत असतो...ती जगन्नियंत्याची इच्छा आहे! तुझा बदला ही माझी लढाई असेल, नसेल पण विजय शेवटी आमचाच होईल!
देगल्याची पावले भिंगरी लागल्यासारखी फिरत होती..त्याची वाममार्गातली गती इतकी आश्चर्यकारक होती की त्याला त्याच्या बापाला येणार्या सर्व विद्या १५ व्या वर्षीच अवगत होत्या! पण त्याला रामशास्त्र्यांचे सामर्थ्य माहिती होते...अजून... अजून...त्याची सामर्थ्याची भूक संपतच नव्हती. त्यातच त्याने अफ्रिकन काळ्या जादूविषयी ऐकले, त्याचे कुतुहल चाळवले होते... देगल्या अफ्रिकेला गेला. काळ्या विद्येला अनुयायांची कमतरता कधीच नसते..देगल्यालाही तसे साथीदार भेटत गेले..त्याची विद्या तेथील साध्या प्रयोगांपेक्षा जास्ती प्रगत तर होतीच पण जास्ती सुसुत्रही होती. तो काहीसा निराश होऊ लागला.
आपल्या एका कॅप्लाटा मित्राकडे तो राहिला असताना मात्र त्याला अचानक एक जीवघेण्या प्रयोगाची, एका निराळ्याच मितीची ओळख झाली. अत्यंत घातक अशी ही जादू ज्याला अवगत झाली तो मात्र ह्या विश्वावर राज्य करेल अशी सामर्थ्यवान होती ती..
सर्वच मितींत ईश्वराने चांगले आणि वाईट ह्यांची समसमान वाटणी केली नव्हती..काही मिती अत्यंत सुष्ट तर काही अत्यंत दुष्ट अशाही होत्या! त्यांचे नियम, वहिवाटा आणि साध्येही वेगळी होती..रक्त हा ह्या मितींना जोडणारा महत्वाचा दुवा! आपले बरेच रक्त गाळून देगल्याने त्या मितीतल्या वाटा महिती करून घेतल्या होत्या...
आता तो तयार होता...अंतिम युद्धाला ज्यात रामशास्त्र्यांची हार निश्चित होती!!
अस्सं!! परशुरामशास्त्री स्वतःशीच उद्गारले! त्यांच्या अतःचक्षूंना दिसलेली ही सारी कहाणी म्हणजे त्यांना तयारीसाठी दिलेली हाकच होती!
म्हणजे लढा साधासुधा नव्हता! त्यांनी आपल्या गुरूंना वंदन केले. गुरूंच्या पवित्र चरणांच्या सान्निद्ध्यातून निघून एका निर्घृण, नृशंस लढ्यासाठी त्यांना बाहेर पडणे भाग होते. परशुरामशास्त्र्यांची प्रत्येक बाहेरची वारी त्यांची शेवटचीच असे समजून ते त्यांच्या गुरुस्थानाची व्यवस्था लावून जात असत. त्यांच्या बरोबर त्यांचा विश्वासू सेवक राघव असे.
राघवा, तयारी करा...बोलावणे येईल हो कधीही! असे त्याला सांगून परशुरामशास्त्री त्यांना ह्यावेळी लागणारे जिन्नस गोळा करायला रानात निघून गेले!
क्रमशः
प्रतिक्रिया
25 Feb 2016 - 10:01 pm | एस
पुभाप्र.
25 Feb 2016 - 10:02 pm | प्रचेतस
कथा मस्त रंगतेय.
पुभाप्र
25 Feb 2016 - 10:03 pm | विजय पुरोहित
बाब्बौ...
खतरनाक...
25 Feb 2016 - 10:07 pm | जेपी
मस्त..
पुभाप्र..
26 Feb 2016 - 1:54 pm | सिरुसेरि
नारायण धारप यांचा "समर्थ" आठवला .
26 Feb 2016 - 4:07 pm | नाखु
समर्थपणे तोललेली कथा..
26 Feb 2016 - 7:13 pm | सटक
धन्यवाद! लिहिणे वस्सूल झाले आहे! पुढचे नाही प्रकाशित झाले तरी चालेल!
26 Feb 2016 - 2:14 pm | राजाभाउ
खतरनाक. पुभाप्र
26 Feb 2016 - 3:41 pm | नन्दादीप
मस्त रंगतेय.....
26 Feb 2016 - 6:35 pm | उगा काहितरीच
मस्त मस्त! पुभाप्र ...
(एक सूचना : भागाच्या सुरूवातीला मागील भागाची लिंक दिल्यास नवीन वाचकाला मदत होईल .)
26 Feb 2016 - 7:15 pm | सटक
हो! यापुढे करतो! तोपर्यंत संपादक मंडळाला विनंती करतो..
27 Feb 2016 - 7:37 am | एक एकटा एकटाच
चांगलीय