आज दुसर्या भागाला सुरवात करण्याआधी श्री.गावडे आणि श्री. मारवा यांचे आभार मानतो. एका विषयाकडे निरनिराळ्या दृष्टीने पहातांना पूर्वासूरींनी काय सांगितले आहे हे पहाणे उपयुक्त असते. ( श्री.गावडे यांच्यासाठी " महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर " असे जनाबाई म्हणते व नामदेवांना " ज्ञानदेव मीच आहे " असे श्री. विठ्ठलच सांगतात. तेव्हा हरीदासांची कथा असे म्हणून ते सोडून देऊ नका) श्री. आनंदा यांच्या प्रश्नाला उत्तर देणे अवघड आहे कारण मी नास्तिक आहे असे म्हटले तर ते विचारणार की तुमचा देवावर विश्वास नाही की वेदांवर ? मी विज्ञानवादी आहे की नाही यावर काहीही म्हटले की ते विचारणार विज्ञान याची व्याख्या काय? पूर्वी ज्याला विज्ञान म्हणता ते की हल्ली आपण ज्याला विज्ञान म्हणतो ते ? तेव्हा काही न बोलता त्यांना काय विचारावयाचे आहे ते प्रथम ऐकणेच योग्य. असो.
आजच्या भागात आपल्याला गुरूभक्ती कशी रुजली असावी याचा विचार करावयाचा आहे. प्रथम एक सोपे उदाहरण घेऊ. एकलव्याला द्रोणाचार्यांकडून धनुर्विद्या शिकावयाची होती. पण गुरूने त्याला शिष्य करून घेण्यास नकार दिला. आता काय करावयाचे ? दुसरा गुरू शोधणे हा एक मार्ग. पण तो एकलव्याला मान्य नव्हता. त्याने द्रोणाचार्यांचा एक पुतळा केला आता हेच आपले गुरूजी व हेच आपल्याला विद्या देणार या धृढभावनेने अभ्यासास सुरवात केली. याची परिणती अशी झाली की द्रोणाचार्यांचा पट्टशिष्य अर्जुन याला प्रश्न पडला की हा म्हणतो की "द्रोणाचार्य माझे गुरू " व हा तर धनुर्विद्येत आपल्यापेक्षा सरस; म्हणजे आचार्यांनी याला आपल्या नकळत विद्या दिली काय ? त्याने एकांत्तात द्रोणांना तसे विचारलेही. बुचकळ्यात पडलेले द्रोण त्याला घेऊन एकलव्याकडे गेले. तेथे त्याने द्रोणांचा पुतळा दाखवून हे माझे गुरू असे सांगितले आणि विनातक्रार गुरूदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा तोडूनही दिला. आपल्याला प्राणप्रिय असलेली विद्या गुरूने सांगितले म्हणून स्वत: नष्ट केली ! इथे आपण कोडे सोडवण्याकडे पहिले पाऊल टाकतो. गुरूवर तुमची इतकी धृढ भक्ती असेल तरच तुम्हाला विद्या मिळेल. आत्मविद्येच्या बाबतीत तर याला पर्यायच नाही. म्हणूनच कबीर नि:संदेह गुरू आणि गोविंद यांच्यात गुरू निवडतो. निळोबारायांना स्वप्नात भेटलेले तुकाराम गुरू म्हणून पुरतात.
म्हणजे गुरूचा शोध या धृढभावनेतच शोधला पाहिजे. इतिहासात जाण्याचे आधी मला दिसलेला पहिला फरक हा पौर्वात्य व पाश्चिमात्य जनमानसातच आहे. भारत, चीन वा जपान घ्या. या मातीतच ही भावना निसर्गत:च रुजलेली दिसते. मग ते मुलाचे आईवडील, कुटुंबीय यांवरील , पत्नीची पतीवरील प्रेम असो वा कराटे शिकवणार्या गुरूवरील निष्ठा. इथे "स्व" हा नेहमीच दुय्यम आहे. तुलनेकरिता एक उदाहरण म्हणून ग्रीसमधील नावाजलेली साक्रेटीस-प्लेटो ही जोडी घ्या. फरक लगेच जाणवतो. ही पार्श्वभूमी ध्यानात घेऊन आता वेदकाळात चला.
त्यावेळी लेखनकला ज्ञात नव्हती. यज्ञात करावयाचे विधी व म्हणावयाचे मंत्र जो यांत जाणकार आहे त्याच्याकडूनच शिकले पाहिजेत. तुमचा यज्ञावर विश्वास असेल तर तेव्हढाच हे शिकवणार्यावर पाहिजे. लेखनकला ज्ञात झाल्यावरही फरक पडला नाही. अजूनही उच्चार गुरूमुखातूनच शिकावे लागणार. तेव्हा गुरूचरणाशी बसणे आलेच. असा गुरू तुमच्याकडून काहीही अपेक्षा न ठेवता हे ज्ञान देत असेल तर तुमची निष्टा वाढणारच. त्यातही तुम्ही २४ तास त्याच्या सान्निध्यात रहाता म्हटल्यावर गुरूची महती खोलवर रुजणारच. शिष्य दक्षिणा देत पण ते बहुतांशी शिष्यावरच सोडलेले असे. ( गुरूने दक्षिणा मागितलेली ३-४ उदाहरणे आहेत, मजेशीर आहेत, पाहिजे असेल तर शरदबुवांना विचारा, सांगतीलही) तेव्हा शिष्य गुरूचे हे ऋण जन्मभर विसरत नसत.
जरा पुढे उपनिषदकालात आलात तरी ही परंपरा चालू राहिलेली दिसते. खरे म्हणजे वेदांवर परमभक्ती वगैरे या ऋषींनी भिरकावून दिली होती. वेदांना "फुटक्या नौका" म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. पण आता " मृत्यूनंतर स्वर्गातील सुखे " सारखी फुटकळ उद्दिष्टे समोर नव्हती आता गाठ होती "ब्रह्म" सारख्या तरल,धुसर कल्पनेशी. प्रखर विद्वानालाही प्रथम आपल्यापेक्षाही श्रेष्ठ ज्ञात्याकडे जाऊन आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उकल करून गरजेचे होते. म्हणून कबंधिन-कात्यायनादि पाच आचार्य पिप्पलादांकडे हातात समिधा घेऊन शिष्यभावाने आपापले प्रश्न विचारावयास गेले व त्यांनी संगितले म्हणून त्यांच्या आश्रमात एक वर्ष शिष्यासारखे राहून मग आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवली. या सगळ्यात काही हजार वर्षे गेली. आता ही गुरुभक्ती रुजावयास सुरवात झाली म्हणावयास हरकत नाही.
मग आला बुद्ध काल. स्वत: बुद्ध मला कोणी गुरू नव्हता; मी स्वत: सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवली असे म्हणतो. पण त्याच्या निर्वाणानंतर ही परिस्थिती बदलली. बौद्धांत गुरूभक्ती रुजली, इतकी रुजली की पुढे त्यांनी प्रत्येक तथागताला एकेक वज्राचार्य गुरू म्हणून दिला. बौद्ध सिद्धांनी गुरूमहिमा वाढवला. तिलोपा हा सिद्ध म्हणतो "परमतत्व हे महापंडितांनाही अगम्य, अगोचर असून गुरूकृपेवाचून ते प्राप्त होणारच नाही."
आता नाथसंप्रदायाकडे जाऊ. इथे गुरूभक्तीची परमसीमा दिसून येते. गुरूला ईश्वराहूनही श्रेष्ठ स्थान आहे. पंथाची सुरवात झाली शिवापासून. पण प्रत्येक शिष्य आपला गुरू प्रथम वंदितो. ग्रंथाच्या सुरवातीला गणेशवंदना करतात पण ज्ञानेश्वर प्रथम "ब्रह्म"ची सर्व विशेषणे गुरू निवृतीनाथांना लावून त्यांना वंदन करतात व दुसर्या ओवीत शिवशंभूला ! गुरूभक्ती इतकी टोकाची की "निगुरा" गुरू नसलेला, त्याला मोक्ष मिळणे शक्यच नाही ही ठाम समजूत. मुक्ताबाईसारखी चिमुरडीसुद्धा नामदेवांसारख्या भक्तश्रेष्ठाची " हा निगुरा, याला कुठला मोक्ष ? " अशी छि:थू करण्यास डरत नाही ! नाथ संप्रदायाची ही निष्ठा कबीरानेही उचलली आहे महाराष्ट्रातील संतांनी हे लोण ज्ञानेश्वरांकडून घेतले.
काही हजार वर्षांचा हा आढावा. सर्व भारतभर सर्व पंथांनी याला मान्यता दिली. पौर्वात्य मनोरचनेने गुरूमहात्म्य स्विकारले विसाव्या शतकापासून यात मोठे बदल झाले. कलाक्षेत्र सोडले तर गुरूभक्ती जवळजवळ नाहीशीच झालेली दिसते. एक मह्त्वाचे कारण समाजाने पैसे टाकून शिक्षण मिळवणे हा व्यवहार मान्य केला.. गुरू-शिष्यात "व्यवहार" महत्वाचा झाला, एकदा हे मान्य केले की मग भक्ती नाहिशी होणार हे ओळीनेच आले. असो. कालाय तस्मै नम:
आता माझे मत. गतकालात सर्वांनी गुरूभक्ती कां स्विकारली असावी ? जगातील सर्वात पुरातन दर्शन "तंत्र". तंत्रावरील लेखात आपण पाहिले आहे की जगातील सर्व ,हो, सर्व लोकांनी एक अज्ञात शएक्ती असते व काही लोक विशिष्ट पद्धतीने ती वश करू शकतात हे मान्य केले होते. अशी माणसे सर्वसामान्यांपेक्षा श्रेष्ठ व त्यांना योग्य तो मोठेपणा दिला पाहिजे, त्यांची भक्ती केली पाहिजे हे स्विकारले होते. आपल्याला येत नाही, कळत नाही, असे काही या लोकांकडे आहे म्हटल्यावर त्यांच्यावर भीतीतून उत्पन्न झालेली भक्ती निर्माण होणारच. गुरू म्हणजे ज्ञानी, सात्विक, निर्लोभी मांत्रिकच. आपण मनापासून गुरूभक्ती स्विकारली. विसाव्या शतकापासून "तंत्रा"तील फोलपणा ध्यानात आल्यावर हे "गुरूत्व" नाहिसे होणे स्वाभाविकच आहे. आजही थोडीथोडी गुरूभक्ती आढळून येते पण ती जास्त डोळस असते. आजही मी डॉ. रा. चिं. ढेरे यांना गुरूस्थानी मानतो. त्यांना एकदाही न भेटता .त्यांची विद्वत्ता, त्यांनी आपल्या क्षेत्रात मिळवलेले स्थान, त्याकरिता त्यांनी केलेले कष्ट इ.गोष्टीचा विचार करून मला ते गुरूच वाटतात.
शरद
.
.
प्रतिक्रिया
31 Jan 2016 - 4:46 pm | यशोधरा
फार सुरेख विवेचन. धन्यवाद.
31 Jan 2016 - 5:41 pm | संदीप डांगे
खरंच खूपच जबरदस्त पद्धतीने व्यवस्थित सांगितले. _/\_
31 Jan 2016 - 7:12 pm | मोगा
छान
31 Jan 2016 - 7:12 pm | मोगा
छान
31 Jan 2016 - 11:06 pm | सतिश गावडे
तुम्ही म्हणता तर नाही सोडून देत. आता स्वतः श्री. विठ्ठलानेच सांगितलं म्हटल्यावर ते खरंच असणार :)
असो. हा ही भाग छान लिहीला आहे तुम्ही. तुमच्याकडून आमच्या अपेक्षा वाढल्या असून आता सांप्रत काळातील ढोंगी गुरुंबद्दलही एखादा लेख येऊ दया.
1 Feb 2016 - 9:40 am | प्रचेतस
अत्यंत सुरेख विवेचन.
बौद्ध आणि जैनांतीलही गुरुपरंपरेचा अजून थोडा आढावा घ्यावयास हवा होता.
1 Feb 2016 - 10:28 am | आनन्दा
मला यासंदर्भात काही प्रश्न पडतात..
१. अत्यंत कठोर (दृढनिश्चयी किंवा स्थितप्रज्ञ असलेले हे महात्मे गुरू किंवा देवाचा विषय निघाल्यावर अचानक इतके हळवे का होतात?
मला हा प्रश्न कलाक्षेत्राबद्दल तर नाहीच कारण आपण त्याचे उत्तत वर दिलेले आहे, त्यांचा तेव्हढा सहवास असतो. परंतु अध्यात्मिक क्षेत्राविषयी मात्र हा प्रश्न आहे.
गुरूंचे फक्त स्वप्नात, ते देखील एकदाक दर्शन झालेले तुकाराम महाराज, गुरूंनी देह ठेवल्यावर त्यांच्या केवळ आठवणीने डोळ्यांतून पाणी वाहू लागणारे विवेकानंद किंवा भारतात होऊन गेलेल्या काही पुरातन आचार्यांबद्दल मला हे प्रश्न आहेत.
तसे पहायला गेले तर यांना त्यांच्या गुरूंचा विशेष सहवास मिलालेला नाही, पण तरीदेखील त्यांची गुरूभक्ती ही अनेक साधकांना पथदर्शक ठरली. यामागे केवळ वाचन, संस्कार किंवा विचार यांपेक्षा काहीतरी वेगळे कारण असावे असे मला वाटते.
बाकी माझे या क्षेत्रांतले वाचन किंवा ज्ञान हे सतीश सर किंवा तुमच्याईतकेदेखील नाही, पण अतींद्रिय शक्तींबद्दल मात्र मला ठाम विश्वास आहे, आणि म्हणूनच मला असे बर्याच वेळेस वाटते की तुकाराम महाराजांमध्ये एका रात्रीत एव्हढा बदल करण्याईतके त्या गुरूंनी नेकमे काय केले होते.. किंवा निवृत्तीनाथांना एकदम जगद्गुरूपदी नेवून बसवण्यासरखे गहिनीनाथांनी त्या २-३ दिवसांमध्ये नेमके काय केले?
याचे उत्तर शोधणे वाटते तितके सोपे नाही, पण आपण जसा विचार करतो तश्या रासायनिक अभिक्रिया अचानक एखाद्याच्या मेंदूत होत असतील आणि अचानक त्या माणसाला एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल एव्हढे प्रेम वाटायला लागेल असे काही मला वाटत नाही.
1 Feb 2016 - 9:45 pm | संदीप डांगे
रिकाम्या जागा भरल्यावरच मोजता येतात. त्यात अचानक असं काही नसतं. लव अॅट फर्स्ट साईट काय असतं?
1 Feb 2016 - 10:05 pm | आनन्दा
रिकाम्या जागा हे बरोबरच. आणि लव्ह अॅट फर्स्ट साईट हे उत्तर तर मला यावर अपेक्षितच आहे. पण हा बहुपदरी प्रश्न आहे. यासाठी असलेली सर्वमान्य थिअरी काय आहे याबद्दल लेखकाचे मत वाचायला आवडेल.
उदा. एखादा माणूस आपल्या गुरूंना ४ वर्षांपासून ओळखत असतो. परंतु एका रात्रीत त्याला अचानक काहीतरी स्वप्न पडते. आणि त्याला त्याच्या गुरूंबद्दल अचानक अनावर प्रेम वाटू लागते. याला तर फर्स्ट साईट म्हणू शकत नाही.
दुसरा विषय यामध्ये असा आहे, अनेक ठिकाणी असे देखील वाचले आहे की हा अनुभव आपण घेत असलेल्या शारिरिक आकर्षण जन्य प्रेमापेक्षा फारच वेगळा असतो. मला हा प्रश्न कायम पडतो.. आपल्याला आअपल्या आई, बाबा भाऊ वगैरेंबद्दल नेहमीच प्रेम असते, पण त्याला सहवास असतो, किंवा जनुकीय साधर्म्याचा धागा असतो. परंतु सवस्वी अपरिचित व्यक्तींबद्दल तसे काहीही कारण केवळ काही सेकंदांच्या किंवा शून्य सहवासातूनदेखील एव्हढे तीव्र प्रेम कसे काय होऊ शकते? द्विरुक्तीचा मोह टाळतो, वरचे तुकाराम महराजांचे उदाहरण पहावे.
मी जेव्हढ्यांचे अनुभव वाचले/ऐकले आहेत त्यांमध्ये हा टर्निंग पॉईंट काही क्षणांचा असतो. कालपर्यंत विरोधक असलेले लोक अचानक भक्त होतात. यामध्ये केवळ मानसिक व्यवहार असेल असे म्हणणे मला धारिष्ट्याचे वाटते किंवा अगदी घाईघाईत काढलेला निष्कर्ष वाटतो. अगदी आपण याला संमोहन म्हटले तरी देखील ते पण पॅरासायकॉलोजीमध्येच येते.
मला हा बर्याच काळापासून पडलेला प्रश्न आहे. इतरदेखील काही गोष्टी आहेत, पण ते अवांतर होईल इथे म्हणून लिहीत नाही. जमल्यास एखादा लेखच टाकेन नंतर.
4 Feb 2016 - 7:00 pm | मम्बाजी सर्वज्ञ
एखाद्या व्यक्तीला, किवा शक्तीला, वृत्तीला, मग ती सांत असो वा अनंत - सर्वतः शरण जाणे हा एक विरोधाभास नाही का? विशेषतः दिलेले स्पष्टीकरण असे गूढ आणि 'सामान्य' बुद्धीला अनाकलनीय असते तेव्हा? हा स्वतःचा आणि स्वतःत असलेल्या 'त्याच्या' रूपाचा अपमान नाही का?
विशेषतः 'अज्ञात' आणि 'अदृश्य' या दोन गोष्टींबद्दल मला फार कुतूहल आहे. जर ते 'अज्ञात' आहे तर मग कुणाला तरी ते 'वश' झाले आणि बहुतेकांना नाही, असे कसे काय? तीच गोष्ट दृश्य-अदृश्य ची.
आज मानवी आयुष्यातल्या ९९% गोष्टी भौतिकी, गणिती आणि शास्त्रीय आधारांवर चालतात, प्रत्येक गोष्टी मागचा कार्यकारण भाव शोधला जातो, घडलेल्या घटनेचे विश्लेषण केले जाते. इतकी वर्षे यु एफ ओ बद्दल ऐकतोय, देव दानावान्बद्दल ऐकतोय पण यातली एकही गोष्ट डोळ्यांना दिसत नाही. पण एरोनोतिक्स च्या आधारावर उडणारे विमान नुसते दिसत नाही तर त्यात बसून अनुभव पण घेत येतो. असे असताना अथांग 'मृगजळाच्या' मागे धावणे चुकीचे नाही का?
माफ करा, मला तुम्हाला 'च्यालेंज' करायचे नाही, पण जी उत्तरे आत्ता पर्यंत सापडली नाहीत ती देणाऱ्या लोकांविषयी मला कमालीचे कुतूहल आहे, जसे वर्गातल्या ढ मुलांना पहिली येणारी कार्टी नक्की काय खातात-पितात तसे....
कृपया 'दाभोलकर' आणि 'कलबुर्गी' विषयावर घसरू नका. मला समाज सुधारणेबद्दल बोलायचे नाही. पण स्वतःचा देव स्वतःच्या घरापुरता मर्यादित ठेवला तर बरेच नको असलेले प्रश्न डोकी वर काढणारच नाहीत असे वाटत नाही का?