आधीचा भाग
जेव्हा तपास करणार्या अधिकार्यांना फ्लॉइड वेल्सची जबानी समजली तेव्हा त्यांनी डिक हिकॉकच्या कुटुंबाचा पत्ता शोधला. खुनाबद्दल काही न बोलता डिकने खोटे चेक लिहिले आहेत आणि प्यारोलचे नियम तोडले आहेत म्हणुन चौकशी करत आहोत असे सांगितले. १४ व १५ नोव्हेंबरला तो काय करत होता हे विचारले. डिकने असे सांगितले होते की तो पेरीसोबत पेरीच्या बहिणीकडे गेला होता. पेरीच्या बापाने काही पैसे पेरीला देण्याकरता बहिणीकडे दिले होते ते आणायला. हे अर्थातच खोटे होते. पण पोलिसांना खात्री पटली की आपल्याला हवे असलेले गुन्हेगार हेच.
यथावकाश ती अपराधी जोडी मेक्सिकोला कंटाळून पुन्हा अमेरिकेत आली. लास वेगास मध्ये मुक्कामी असताना पकडली गेली . कबुलीजबाब फार कटकट न करता दिला. काही दिवसात खटला सुरु होऊन त्या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. ती अमलात यायला अनेक वर्षे गेली. १९६५ साली दोघे फासावर लटकले.
ह्या सगळ्या प्रकरणाची अत्यंत सखोल हकीकत ट्रूमन कपोटने आपल्या पुस्तकात लिहिली आहे. त्यात बळी पडलेले लोक, गुन्हेगार, तपास करणारे पोलिस इतकेच काय हे गुन्हेगार कोठडीत असताना त्यांची काळजी घेणारे लोक, पेरी व डिकच्या बरोबर काम करणारे त्यांचे पूर्वीचे सहकारी, सगळ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांची व्यक्तिचित्रे वर्णन केली आहेत. घटनाक्रम समजून तो व्यवस्थित उलगडून दाखवला आहे. शेवटी वाटते की हे दोघे अत्यंत क्रूरपणे वागले, मानवतेला पायदळी तुडवून त्यांनी अत्यंत वाईट कृत्य केले पण त्यांना असे वाईट बनवण्यात समाजाचाही हातभार लागला आहे. पेरीसारखा हुशार माणूस त्याच्यावर झालेल्या अत्याचारामुळे खराब झाला. त्या काळात गुन्हेगाराची मानसिक स्थिती वगैरे फार अभ्यासली जात नसे. ह्या लोकांचीही मानसोपचारतज्ञांनी तपासणी केली पण तिथल्या कायद्याप्रमाणे हो किंवा नाही असे दोनच पर्याय उपलब्ध होते. मधल्या छटा समजावायचा आणि ते समजून घेण्याचा कायदा नव्हता. पण ह्या लेखकाच्या अभ्यासू लेखनामुळे ते पैलूही व्यवस्थित दिसतात.
खुद्द तो तपास करणारा एक पोलिस अधिकारी फाशीच्या दिवशी त्या कोठडीत होता. तेव्हा त्यालाही विशेषत: पेरीबद्दल वाईट वाटलेच. डिक हा त्याच्या मते एक खुशालचेंडू माणूस पण पेरी तसा नव्हता. परिस्थितीने त्याची अशी वाट लावली होती. आणि त्यामुळे तो एक गुन्हेगार बनला.
एकंदरीत ही एक अविस्मरणीय कादंबरी आहे ह्यात शंका नाही. वाचली नसेल तर जरूर वाचा.
प्रतिक्रिया
28 Jan 2016 - 5:22 pm | यशोधरा
तीनही भाग आवडले. पुस्तक शोधण्यात येईल.
28 Jan 2016 - 11:40 pm | एस
+१
29 Jan 2016 - 11:26 am | प्रदीप
ओळख. धन्यवाद.