टू वॉक ऑर टू जॉग; दॅट इज द क्वेश्चन. चालावं की धावावं हा सवाल आहे. हा सवाल अनेकांना पडतो. मग हा सवाल ते अनेकांना विचारतात. आणि शेवटी आपल्या सोयीनुसार, इच्छेनुसार, इच्छेच्या तीव्रतेनुसार याचं उत्तर आपल्यापुरतं निश्चित करून या सवालावर पडदा टाकतात.
या दोन्हींकडे तटस्थपणे बघितलं की आपल्याला कळतं की अधिक फायदेशीर काय आहे. तरीही व्यक्तीची इच्छा, शारिरिक कुवत, असलेला वेळ, इत्यादी गोष्टीही बघाव्या लागतात. याची सुरुवात कधी, कशी होते ते बघू. उमेदीच्या वयात म्हणजे २० ते ३० वर्षे या काळात बहुतेक जण व्यायाम, आरोग्य या विषयाकडे लक्ष देतात. प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो, पण देतात साधारणपणे. मग ३० नंतर व्याप वाढतात, फावला वेळ (व्यायाम या वेळात करायची गोष्ट आहे का हा मुद्दा वेगळा आहे) मिळेनासा होतो, ताणतणाव इत्यादी जाणवायला लागतात आणि आरोग्याकडे दुर्लक्ष व्हायला सुरुवात होते. ती थेट ४०-५० च्या आसपास गुडघ्यात किंवा पाठीत कळ येईपर्यंत होत रहाते. जे २०-३० च्या काळात आरोग्याकडे लक्ष देत नाहीत त्यांना ही कळ कदाचित आगोदर येत असावी. पण हे दोनही पंथीय मग 'आता काहीतरी करायला हवं' असं म्हणून वेगवेगळे मार्ग चोखंदळायला लागतात. कुणी आरशात स्वतःला न्याहाळून वगैरे जिमचे उंबरे ओलांडतात, कुणी सायकल घेतात, कुणी 'योगा सर्वात बेस्ट' म्हणत कमी श्रमाचा पर्याय असल्यासारखा योगासनांचा क्लास लावतात, कुणी टेलिब्रँड्स ची मशिनं घरी आणतात, किंवा कुणी स्पोर्ट्स शूज विकत घेतात.
हे स्पोर्ट्स शूज वाले मग संभ्रमात पडतात. चालावं, की धावावं. सर्वसाधारण कल सोप्पा पर्याय निवडण्याकडे असतो. त्यात 'चालणं हा सर्वात छान व्यायाम', 'अमके आजोबा बघ रोज २ किमी चालतातच नेमाने', 'मी रोज जातो चालायला, तूही ये' अशा प्रेरणा देणारे लोक भेटले की मग चालायला जायचं फिक्स होतं, आणि सुरूवात होते. काहीजण बागेत आल्यासारखे, काही मोबाईल बघायला तेवढा एकच वेळ असल्यासारखे, काही अंगात आल्यासारखे, काही एखाद्या संमेलनाला आल्यासारखे (आल्या गेल्याला हात करत, बोलत) आसपासच्या जॉगिंग ट्रॅक्सच्या गर्दीत भर टाकायला सुरुवात करतात.
जे हा सोपा पर्याय निवडत नाहीत, किंवा थोडेफार चिकित्सक असतात ते जॉगिंग करू लागतात. जवळपासच्या म्यारेथॉन्स ला नावं वगैरे देतात. जीपीएस वाली अॅप घेतात आणि इतके किमी इतक्या वेळात, इतक्या कॅलरी वगैरे स्टेटस पोस्ट करायला लागतात. असो. तटस्थपणे बघायचं आहे तेंव्हा आकडेवारीकडे बघणं ईष्ट होईल.
या दोन व्यायामांचा तुलनात्मक अभ्यास करू. चालणे व धावणे. एक ६५ किलो वजनाची व्यक्ती जर ३० मिनिटे हे व्यायाम करत असेल तर त्या व्यायामाचा काय प्रभाव पडेल?
चालणे -
धावणे -
आकडेवारीवरून हे स्पष्ट आहे की अतिशय संथ गतीनेही, किंबहुना चालण्याइतक्याच गतीने जरी तुम्ही धावलात, तरीही चालण्यापेक्षा जास्त उर्जा तुमचं शरीर खर्च करतं. आकड्यातच सांगायचं झालं तर अडीच पट जास्त.
याचं मुख्य कारण म्हणजे चालण्यापेक्षा धावताना शरीरातले अधिक स्नायू कार्यान्वित होतात त्यामुळे निश्चितच धावण्यासाठी अधिक शक्ती लागते.
धावताना तुमच्या ह्रदयाचे ठोके अधिक गतीने पडतात, त्यामुळे धावणं हा चालण्यापेक्षा श्रेष्ठ कार्डियो वर्काउट आहे. हाय इन्टेन्सिटी इन्टर्वल ट्रेनिंगने तुम्ही याची परिणामकारकता अधिक वाढवू शकता.
धावण्याने तुमची पचनक्रिया सुधारते. फोर्ब्स, न्यू यॉर्क टाईम्स ने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार धावून आलेल्या माणसांनी त्यांनी बर्न केलेल्या कॅलरीजपेक्षा २०० कॅलरीज कमी कन्झ्यूम केल्या (जेवणात), उलट चालून आलेल्यांनी ५० कॅलरी जास्त कंझ्यूम केल्या.
एका अभ्यासानुसार फास्ट चालण्याने म्हणजेच ब्रिस्क वॉकिंग केल्याने गुडघे, टाच यांना दुखापत होण्याचा अधिक संभव असतो. उलटपक्षी, धावताना पायातले सगळे सांधे काम करत असल्याने दुखापतीचा संभव कमी असतो. मध्यम गतीने चालणं या तुलनेत सुरक्षित असतं.
अतिरिक्त धावल्यानेही सांध्यांची प्रमाणाबाहेर झीज होऊ शकते परंतु योग्य आहाराने हे धोके कमी करता येतात.
मुळात चालणं ही शरीरासाठी एक सामान्य क्रिया असून त्याला 'व्यायाम' म्हणण्याइतका ताण त्याने शरीरावर पडत नाही. म्हणून नियमितपणे चालून वजन कमी करण्याची योजना आखणा-यांनी ते 'बिरबलाची खिचडी' शिजवत आहेत हे लक्षात घ्यावं. वजनात कमी वेळात, परिणामकारक, आणि शाश्वत घट जर हवी असेल तर धावण्याचा तुमच्या व्यायामात समावेश हवाच. वजन कमी होण्याबरोबरच शरीर आकारबद्ध होणे, स्नायूंची ताकद वाढणे, रक्तप्रवाह सुधारणे इत्यादी अनेक फायदे धावल्याने तुम्हाला मिळतात. तेंव्हा टू जॉग ऑर टू वॉक याचं उत्तर मी तरी टू जॉग असं देईन. शक्य तितकं हळू धावा; पण धावा, यथाशक्ती धावा. इट्स फार बेटर दॅन वॉकिंग. हा सल्ला मी सर्व वयोगटातल्या व्यक्तींना देईन. अर्थात, तुम्हाला कुठलीही वैद्यकीय हरकत नसल्यास. शिवाय, धावण्याची पद्धत, वापरातले शूज, ज्यावर धावता तो सरफेस या गोष्टीही खूप काळजीपूर्वक बघायला हव्यात.
याशिवाय, स्टेपिंग, सायकलिंग, स्किपिंग हे व्यायामही उत्तम कार्डियो व्यायामांमधे मोडतात. पण सवाल जॉगिंग की वॉकिंग होता म्हणून त्या दोघांबद्दलच भाष्य केलं.
प्रतिक्रिया
7 Jan 2016 - 3:41 pm | सूड
या दोन्हीपेक्षा स्विमिंग करावं असं मत झालं आहे. :)
7 Jan 2016 - 4:13 pm | स्पा
लालेलाल
7 Jan 2016 - 3:43 pm | भुमन्यु
लेख आणि तुलना आवडली. आजपर्यंत चालणे हे पळण्यापेक्षा चांगले असंच ऐकत आलो आहे. असो जाणकार प्रकाश टाकतीलच.
7 Jan 2016 - 3:47 pm | एस
उत्तम माहिती!
7 Jan 2016 - 3:53 pm | पद्मावति
लेख आवडला.
डांबरी रस्त्यावर, जॉगिंग ट्रॅक्स, खासकरून इनडोर जॉगिंग ट्रॅक्सवर धावण्यापेक्षा, वाळून ( सी बीच) वर धावणे चांगले असे ऐकलंय. पायांवर कमी भार येतो. दुखापतीची शक्यता कमी.
7 Jan 2016 - 4:00 pm | वेल्लाभट
हो. सॉफ्ट/मृदू सरफेस अधिक उत्तम. उदाहरणार्थ, माती, गवत.
7 Jan 2016 - 4:13 pm | स्पा
मस्त ओका काका
असेच धावत राहा
शुभेच्छा !!!
7 Jan 2016 - 4:22 pm | शान्तिप्रिय
धावणे सुरु करण्यास हरकत नाही.
चालणे नेहमी होतेच. पण त्याने वजन घटवण्यास फारशी मदत होत नाही हे मी पण
अनुभवले आहे.
7 Jan 2016 - 5:09 pm | उगा काहितरीच
मो.क.गांधी यांच्यासारखं चाललं तर ?
13 Jan 2016 - 6:53 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
करवंद खुजलिवालांसारख्या मोकसमविचार्यांसारखे चाललात तरी हरकत नाही,
12 Jan 2016 - 2:38 pm | वेल्लाभट
प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद :) जरूर धावा पटलं असेल तर.
12 Jan 2016 - 2:54 pm | कविता१९७८
सध्या टू वॉक ऑर टू जॉग पेक्षा हाउ टु वेक अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर वॉक असा गहन प्रश्नय पडतोय मला.
12 Jan 2016 - 2:56 pm | कविता१९७८
सकाळी ५ च्या गजर ला अजुन पाच मिनिटांनी उठते असे ठरवले की पाच मिनिटात ७ वाजतात आणि मग २ मिनिटात ८ वाजत आहेत.
12 Jan 2016 - 3:04 pm | बेकार तरुण
मी गेले २ वर्ष नियमित पळत आहे, मला तरि अनेक फायदे झाले आहेत, तब्येतीच्या कुरबुरी तर बंद झाल्याच (वजन कमी होणे, सर्दी खोकला तत्सम आजार पण अजिबात बंद). पण दुसरा फायदा म्हणजे, दिवसभर खूप प्रसन्न वाटत मला.
सकाळी लवकर उठण्यासाठी स्लीप टाईम नावाच अॅप वापरून बघा, एक वेगळ्याच टोनचा गजर वाजतो, आणि मला तरि जाग येते.
12 Jan 2016 - 3:05 pm | कविता१९७८
ओके , स्लीप टाईम इंस्टॉल करते
12 Jan 2016 - 3:13 pm | सूड
मला काहीही झालं तरी उठायलाच हवंय असं ठरवलंत तर नक्की फरक पडेल, एरवी कितीही अॅप्स इन्स्टॉल करा. मनाने एकदा ठरवलं उठायचं नाही की मग नाही!! कशासाठी पळायचं ठरवताय ते टार्गेट गजर झाल्याझाल्या डोक्यात आलं पाहिजे असं काही करता येतं का बघा.
12 Jan 2016 - 3:50 pm | वेल्लाभट
अॅग्रीड सूड
12 Jan 2016 - 8:05 pm | चतुरंग
दुसर्या दिवसाची सुरुवात रात्रीने होते - म्हणजे तुम्हाला आवश्यक ती झोप पूर्ण मिळणे गरजेचे आहे. रात्री योग्य वेळी झोपा.
गजर लावताना आणखीन एक काळजी - ज्या वेळेला उठायचे आहे त्याच वेळेचा गजर लावा - म्हणजे साडेपाचला उठणार असलात तर त्याच वेळेचा, बर्याचदा सव्वापाचचा लावू मग उठूच पंधरा मिनिटात असे होते आणि ती शेवटली पंधरा मिनिटे गाढ झोपेतून आपण ओरबाडून स्वतःला जागे करतो आणि तिथेच सगळे गणित चुकते. करुन बघा. नक्कीच फायदा होईल! शुभेच्छा!
12 Jan 2016 - 4:40 pm | पैसा
चला पळा सगळ्यांनी!
12 Jan 2016 - 8:56 pm | उपाशी बोका
या दोन्हीपेक्षा स्विमिंग हा उत्तम व्यायाम आहे. पोहायला जाणे शक्य नसेल तर जिने वर-खाली चढणे/उतरणे हा जास्त चांगला व्यायाम आहे.
13 Jan 2016 - 7:28 am | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद...