मीना (पुस्तक परिचय)

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
15 Dec 2015 - 4:03 pm

काबूलमध्ये रहात असताना तिथल्या स्त्रियांच्या स्थितीविषयी विश्वसनीय माहिती जाणून घेण्यासाठी एक उत्तम संकेतस्थळ मला सापडलं होतं: ते होतं www.rawa.org. ‘रावा’ हा शब्द ‘Revolutionary Association of Women of Afghanistan’ या संघटनेच्या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरांना घेऊन बनवलेला शब्द. (स्थानिक भाषेतलं नाव आहे: Jamiat-E-Inqalabi Zanan-E-Afghanistan). या संकेतस्थळावर एक महत्त्वाचं वाक्य लक्ष वेधून घेत. “जर तुम्ही स्वातंत्र्यप्रेमी असाल, आणि मूलत्त्ववाद्यांच्या विरोधात असाल, तर तुम्ही ‘रावा’सोबत आहात! आम्हाला समर्थन द्या आणि मदत करा.” (If you are freedom-loving and anti-fundamentalist, you are with RAWA. Support and help us.)

शांती, स्वातंत्र्य, लोकशाही आणि स्त्रियांचे हक्क यासाठी १९७७ पासून काम करणारी ‘रावा’ ही अफगाणिस्तानमधली एक जुनी सामाजिक-राजकीय संघटना आहे. ही संघटना अफगाण स्त्रियांनी स्थापन केली असून ती आजही अफगाण स्त्रियाच चालवतात. ‘रावा’वरच्या माहितीतून अफगाण स्त्रियांचा दृष्टिकोन, त्यांचा संघर्ष आणि त्या भविष्याचा घेत असलेला वेध असं बरंच काही कळतं. ही वेबसाईट सात-आठ भाषांत आहे, त्यावरून ‘रावा’चे हितचिंतक जगभर पसरले आहेत असं दिसतं. अफगाणिस्तानसारख्या सतत संघर्ष चालू असलेल्या देशात मुळात कोणी स्त्रियांचं संघटन करावं हेच अवघड; ही संघटना इतक्या अडचणींतून वाटचाल करत आणि उद्दिष्टांपासून न ढळता ३८ वर्ष काम करत असावी हा तर चमत्कार मानावा लागेल. हा चमत्कार जिने घडवून आणला ती आहे ‘मीना’, ‘रावा’ची संस्थापक. हिचा परिचय संकेतस्थळावर आहे, पण तो अगदी थोडक्यात आहे. मीनाविषयी अधिक जाणून घेण्याच्या प्रयत्नात मी असताना “मीना” हे पुस्तक हातात आलं.

Meena: Heroin of Afghanistan या (लेखिका – Melody Ermachild Chavias) २००३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद शोभा आणि दिलीप चित्रे यांनी केला असून २००८ मध्ये ‘राजहंस प्रकाशन’ने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. (माझ्याकडे २००९ ची दुसरी आवृत्ती आहे.)

१९७५ च्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या (आणि त्याला जोडून महिला दशकाच्या) निमित्ताने स्त्रियांच्या हक्कांविषयी आणि त्यांची स्थिती सुधारण्याविषयी जगभरात मंथन घडून आलं. समाजाच्या स्त्रीविषयक धारणा बदलण्याचे आव्हान भारतातल्या स्त्री चळवळीच्याही समोर होतं – आजही आहे. या प्रवासातला अफगाणिस्तानमधला संदर्भ लक्षात घेतल्याविना मीनाचं काम किती क्रांतिकारी होतं हे समजणं अवघड आहे.

जुलै १९७३ मध्ये राजा झाहीर शाह (१९३३-१९७३) याची ४० वर्षांची राजवट संपुष्टात आणली गेली आणि रशियाधार्जिणं सरकार दाऊद खानच्या नेतृत्वाखाली स्थापन झालं. झाहिर शाहच्या कारकिर्दीत मुलींच्या शिक्षणाला आणि सहशिक्षणालाही प्रोत्साहन होतं. स्त्रिया नोकरी करत होत्या आणि अगदी रेडिओवरह निवेदन करत होत्या, एअर होस्टेस होत्या, टेलिफोन ऑपरेटर होत्या. या स्त्रिया बुरखा वापरत नव्हत्या. पण शरिया कायद्यांनुसार स्त्रीचं अस्तित्व नगण्य होतं जे मीनाला बोचत होतं. काबूलमधल्या ‘मलालाय’ (Malalai) शाळेत संवेदनशील मीनाला तिच्या आंतरिक ऊर्जेला योग्य दिशा देणा-या शिक्षिका भेटल्या. मीना स्वतंत्रपणे विचार करू लागली, स्त्रियांच्या हक्कांचा विचार करू लागली.

१९५६ (२७ फेब्रुवारी) साली काबूलमध्ये जन्मलेली मीना १९७५ मध्ये काबूल विद्यापीठात शिकत होती. काबूल विद्यापीठात मार्क्स, इस्लाम, अफगाण संस्कृती अशा अनेक विषयांवर चर्चा होत असतं. पण हळूहळू चित्र बदलत गेलं, विद्यापीठातलं वातावरण गढूळ झालं. १९७६ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी (म्हणजे तिथल्या सामाजिक संकेताच्या मानाने काहीसा उशिराच) तिचा विवाह फैजशी झाला. शिक्षण पूर्ण करायला संमती आणि एकपत्नीव्रताचं वचन अशा मीनाच्या वेगळ्या अटी मान्य करणारा आणि प्रत्यक्षात त्यानुसार जगणारा फैज हे देखील एक वेगळंच रसायन होतं.

दाऊद खानच्या कम्युनिस्ट विचारसरणीशी जवळीक असण्याला विरोध करत अफगाणिस्तानमध्ये मूलतत्त्ववाद वाढू लागला. नवं आणि जुनं यात रस्सीखेच होऊ लागली. त्या काळात स्त्रियांसाठी वेगळी संघटना निर्माण करण्याचा मीनाने निश्चय केला आणि ती कामाला लागली. त्यावेळी ती नुकतीच विशी ओलांडलेली एक नवविवाहित तरूणी होती. तिच्याकडं ना पैसा होता, ना अनुभव. पण मीनाच्या सहृदयतेने, चिकाटीने आणि अथक परिश्रमांनी अनेक अफगाण स्त्रिया लोकशाही, शांती आणि स्त्रियांचे हक्क यासाठी लढायला तयार झाल्या.

ओळखीच्या एकेका स्त्रीला भेटून मीनाने चाचपणी सुरू केली. १९७७ मध्ये ‘रावा’ची स्थापना झाली. पोलीस आणि मूलतत्त्ववादी या दोन्ही गटांकडून मीनाला आणि तिच्या कामाला धोका होता. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळापासून ‘सुरक्षिततेसाठी गुप्तता’ हा ‘रावा’चा मंत्र राहिला. एखादीला धमकी देऊन पोलिसांनी ‘रावा’ची पाळंमुळं खणून काढू नयेत यासाठी ही दक्षता आवश्यक होती. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीतही ‘रावा’ समूळ नष्ट करणं ना सरकारला जमलं ना मूलतत्त्ववाद्यांना - याचं सगळं श्रेय मीनाच्या दूरदृष्टीला आहे.

मीनाने आणि तिच्या असंख्य ज्ञात आणि अज्ञात सहका-यांनी जे काम केलं ते वाचताना इतकं धाडस, इतकी ताकद, इतकी अचल ध्येयनिष्ठा, इतकी संवेदना या स्त्रियांना कुठून मिळाली असेल याचं नवल वाटत राहतं.

‘रावा’च्या स्थापनेपूर्वी स्त्रियांनी अशी त-हेने संघटित होण्याची अफगाणिस्तानच्या ज्ञात इतिहासात तरी नोंद नाही. घरात आणि घराबाहेर – कुठलंच वातावरण अनुकूल नसताना मीना आणि ‘रावा’ने जे काम केलं ते थक्क करणारं आहे. छोट्या गटांत चर्चा करणं, एकमेकींना मदत करणं, साक्षरता वर्ग चालवणं अशा उपक्रमांतून ‘रावा’ बळकट होत गेली. ‘रावा’च्या सदस्यांची परीक्षा पाहणारे अनेक प्रसंग आले आणि त्यातून अफगाण स्त्रिया तावून सुलाखून निघाल्या. राजकीय क्षितिजावर जेंव्हा जेंव्हा बदल झाले तेंव्हा त्याची अपरिमित झळ स्त्रियांना बसली. अफगाणिस्तानच्या राजकीय घडामोडींचा आढावा इथं घेणं शक्य नाही. पण १९७८ ते २००१ या काळात अफगाणिस्तानमध्ये दाऊद, तराकी, अमीन, बबरक कारमल, किश्तमंद, नजिबुल्ला अहमदझाई, तालिबान, रब्बानी इतके वेगवेगळे सत्ताधीश आले. प्रत्येक वेळी रक्तपात झाला, लाखो लोक विनाचौकशी तुरुंगात टाकले गेले, मारले गेले, देश सोडून गेले. प्रत्येक बदलासोबत स्त्रियांभोवतीच्या भिंती अधिक जवळ आल्या, त्यांची घुसमट वाढत गेली. त्यांचं जगणं कठीण होत गेलं.

पण या प्रत्येक वळणावर ‘रावा’ अधिकाधिक मजबूत झाली, तिचं कार्य विस्तारत गेलं. स्त्रियांना मदत करण्यात ‘रावा’ने कधी मागंपुढं पाहिलं नाही. तुरुंगातल्या कैद्यांची सुटका व्हावी यासाठी म्हणून स्त्रिया तुरूंगासमोर जमत. त्यांच्यावर होणा-या अत्याचाराची माहिती ‘रावा’ पत्रक काढून जाहीर करत असे आणि पोलीस मागावर असताना ठिकठिकाणी या पत्रकांचे वाटप करत असे. ‘रावा’ने ‘पयाम-ई-झान’ नावाचं मासिक चालवलं – स्त्रीकेंद्री असणारं अफगाणिस्तानमधलं हे पहिलं मासिक होतं. घराची कधी झडती होईल ते सांगता येत नसे – अशा परिस्थितीत मासिक काढणं हे एक धाडसाचं कार्य होतं. सोविएत राजवटीच्या क्रूर कहाण्या जगासमोर आणण्यात मीनाने फार मोलाची भूमिका बजावली. मूलतत्त्ववादाचा धोकाही तिला त्या काळी दिसत होता, तो तिने स्पष्टपणे सांगितलाही होता, पण जगाने त्याकडं लक्ष दिलं नाही.

१९८२ मध्ये अफगाणिस्तान सरकारने मीनाला अटक करण्याची घोषणा केली. देशात काम करणं अशक्य झाल्यावर मीनाने पाकिस्तानमधून (जिथं लाखो अफगाण निर्वासित कसेबसे जगत होते) काम चालू ठेवलं. प्राण पणाला लावत तिने आणि तिच्या सहका-यांनी अनेकदा पाक-अफगाण सीमा ओलांडली; उदरनिर्वाहासाठी शिवणकाम केलं; अनाथ मुला-मुलींना घर आणि शिक्षण दिलं; निर्वासितांसाठी साक्षरता वर्ग चालवले; मलालाय इस्पितळ उभं केलं आणि चालवलं.

मीनाच्या हालचालींबद्दल गुप्तता बाळगूनही घात झालाच. ४ फेब्रुवारी १९८७ रोजी क्वेट्टा (पाकिस्तान) मधून मीना नाहीशी झाली. तिची हत्त्या करण्यात आल्याचं उघड झालं. ‘रावा’च्या सदस्यांवर आकाश कोसळलं. पण तरीही रडत न बसता, न घाबरता त्यांनी काम पुढं चालू ठेवलं. दुर्दैवाने अफगाण स्त्रियांना अजूनही बराच प्रवास करायचा आहे.

अफगाण स्त्रियांसमोर ‘चांगलं’ आणि ‘वाईट’ प्रशासन असा पर्याय कधीच नव्हता; पर्याय होते ‘कमी वाईट’ आणि ‘जास्त वाईट’ इतकाच. मुजाहिद्दीन तालिबानच्या विरोधात लढले खरे पण अफगाण स्त्रियांसाठी ते दोघेही तितकेच क्रूर होते. किंबहुना २००१ नंतरच्या अफगाणिस्तानच्या पुनर्रचनेत वारलॉर्ड्स पुन्हा एकदा सत्तेचे वाटेकरी झाल्याने ‘आपला संघर्ष अद्याप संपलेला नाही’ अशी ‘रावा’ची आणि अफगाण स्त्रियांची खात्रीच पटली आहे.

मीना आणि ‘रावा’च्या हालचाली लपूनछपून चालत असल्याने (ती त्यांची अपरिहार्यता होती) मीनाबद्दल फार माहिती मिळणं अवघड होतं. पोलीस छाप्याचे संकेत मिळताच अनेकदा ‘रावा’च्या कार्यकर्त्यांना कागदपत्रं नष्ट करावी लागत, शक्यतो कसलाही पुरावा मागे राहू नये याची त्या सदैव दक्षता घेत. देशात सत्तेवर कोणीही असो, मीना त्यांना नकोच होती. त्यामुळे मीनाच्या जगण्याबद्दल पुरेशी माहिती नव्हती.

२००१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर Melody Chavias पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जाऊन मीनाच्या अनेक सहका-यांना भेटली. त्यातून हे पुस्तक तयार झालं. इतर सर्वसामान्य चरित्रांत कथानायिकेची/नायकाची जितकी सविस्तर माहिती आपल्याला मिळते, तशी या पुस्तकात मिळत नाही. पण परिस्थितीचा संदर्भ ध्यानी घेता, लेखिकेला ‘अफगाणिस्तान बाहेरच्या जगाला मीनाची आणि अफगाण स्त्रियांच्या संघर्षाची ओळख करून देणं’ यात पुरेसं यश लाभलं आहे असं नक्की म्हणता येईल.

मूळ पुस्तक मी वाचलं नसल्याने अनुवादाच्या गुणवत्तेबदद्ल मला काही सांगता येणार नाही. पण मराठी पुस्तकातल्या काही ढोबळ चुका टाळता आल्या असत्या. पुस्तकात अनेक ठिकाणी इंग्रजी शब्द आहेत. परकीय भाषांतल्या शब्दांचे उच्चार चुकीचे होऊ नयेत यासाठी ही काळजी घेणं समजू शकतं. पण उदाहरणार्थ Parcham, Babrak Karmal, Khalq, Aid Projects, Reforms .. यातले काही शब्द देवनागरीतही लिहीता आले असते आणि काहींना रूढ पर्यायी मराठी शब्द आहेत. यातले बरेचसे शब्द कॅपिटल अक्षरांत लिहिल्याने माझ्या जास्त डोळ्यांवर आले असावेत कदाचित. दारी (दरी), करझाय (करझाई) असेही शब्द आहेत. नकाशात पाकिस्तानमधली क्वेट्टा आणि पेशावर शहरं कुठं आहेत हे दाखवलं असतं तर मीनाचे सीमारेषा ओलांडण्याचे प्रवास किती कठीण होते हे वाचकांना समजायला आणखी थोडी मदत झाली असती. ‘काबूल’ न लिहिता ‘काबुल’ लिहिलं गेलं आहे.

पुस्तकातल्या तपशीलाच्या काही किरकोळ चुकाही सहज नजरेस आल्या. ‘रावा’च्या संकेतस्थळावर मीनाचा जन्म २७ फेब्रुवारी १९५६ ला झाल्याचा उल्लेख आहे तर पुस्तकात मीना १९५७ साली जन्मल्याचा उल्लेख आहे. मीना ४ फेब्रुवारी १९८७ नाहीशी झाली (आणि तिची हत्त्या झाली), पण पुस्तकात पान १३३ वर ही घटना १४ फेब्रुवारीला झाल्याचे म्हटले आहे. हा कदाचित फक्त टंकनदोष असावा. शिवाय पुस्तकाचा मुख्य उद्देश मीनाचे जीवितकार्य समजावे हा आहे.

मीनाची ही अत्यंत प्रेरणादायी जीवनकहाणी आपण जरूर वाचावी आणि इतरांपर्यंतही अवश्य पोचवावी.

मीना
मीना: अफगाण मुक्तीचा आक्रोश
लेखिका: Melody Ermachild Chavias
अनुवाद: शोभा चित्रे / दिलीप वि. चित्रे
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत: १५०/ - रूपये

इतिहाससमाजजीवनमानशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

15 Dec 2015 - 4:57 pm | वेल्लाभट

एक्सलंट माहिती !
वाचनीय वाटतंय पुस्तक.

अफगाण स्त्रीयांच्या परिस्थितीचं एक जिवंत चित्र ख़लीद होसेनी च्या 'अ थाउजंड स्प्लेंडिड सन्स' मधे ही उभं राहतं.

आतिवास's picture

16 Dec 2015 - 10:34 am | आतिवास

तुम्ही सांगितलेलं पुस्तक वाचण्यासाठी नोंद करून घेत आहे.

खस्ता खात जीवावर उदार होऊन काम करणे हे खरोखर अद्वितीय आहे.
असे बरेच अनसंग हीरोज असतात. सर्वच परिस्थिती विपरीत असतानाही ध्येया पासून विचलीत न होता काम करत रहाणे हे खरोखरच अवघड काम आहे.
मीनाच्या जिद्दीला सलाम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Dec 2015 - 10:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

आतिवास's picture

16 Dec 2015 - 10:36 am | आतिवास

तुम्ही व्यक्त केलेल्या भावनेशी सहमत आहे.

विजुभाऊ's picture

15 Dec 2015 - 5:02 pm | विजुभाऊ

असेच एक उदाहरण "थ्री कप्स ऑफ टी" या पुस्तकात.
https://en.wikipedia.org/wiki/Three_Cups_of_Tea
https://en.wikipedia.org/wiki/Three_Cups_of_Tea

आतिवास's picture

15 Dec 2015 - 6:50 pm | आतिवास

दुव्यासाठी आभार.

पुस्तक ओळख आवडली..वाचण्यात येईल.

अवांतरा बद्दल क्षमस्व-
या विषयाच्या जवळ जाणार एक पुस्तक नुकतच वाचण्यात आल.आवडल

---
काबूल ब्युटी स्कुल: ले-डेबोरा रॉड्रिग्ज:- मराठी अनुवाद -उषा तांबे

काबूल ब्युटी स्कूलविषयी मी एक डॉक्युमेंटरी पाहिली होती. पुस्तक अद्याप वाचलं नाही.
त्या पुस्तकाचा परिचय तुम्ही इथ लिहावा अशी विनंती.

उत्तम पुस्तकपरिचय. तुम्ही प्रत्यक्ष तिथल्या अस्थिर व धोकादायक परिस्थितीचा अनुभव घेतला असल्याने तुमच्या लिखाणातली कळकळ पोचते.

प्रचेतस's picture

15 Dec 2015 - 10:42 pm | प्रचेतस

+१

हेच म्हणतो.

रुस्तम's picture

16 Dec 2015 - 10:57 am | रुस्तम

बाडीस

जातवेद's picture

16 Dec 2015 - 11:06 am | जातवेद

+१

बोका-ए-आझम's picture

15 Dec 2015 - 5:41 pm | बोका-ए-आझम

नक्कीच मिळवून वाचेन. अफगाणिस्तानसारख्या सतत संघर्ष पाचवीला पुजलेल्या देशात अशा प्रकारची चळवळ उभारणं अाणि ती जिवंत ठेवणं म्हणजे किती कठीण काम!

अजया's picture

15 Dec 2015 - 6:55 pm | अजया

पुस्तक नक्की वाचणार.स्त्रियांना अफगाणिस्तानसारख्या देशात संघटित करुन एवढे काम करणे म्हणजे जीवाशी खेळ.हे माहित असूनही त्यांच्यासाठी झटणार्या मीनाला सलाम.

विशाखा पाटील's picture

15 Dec 2015 - 6:59 pm | विशाखा पाटील

उत्तम परिचय. नक्की वाचेन.

प्रीत-मोहर's picture

15 Dec 2015 - 8:06 pm | प्रीत-मोहर

नक्की वाचेन

पैसा's picture

15 Dec 2015 - 8:35 pm | पैसा

मीनाबद्दल वाचून अंगावर काटा आला. असल्या भयानक परिस्थितीत लढायचं धैर्य कुठून येत असेल? असंही वाटतंय, की पाकिस्तानपेक्षा ती भारतात आली असती तर कदाचित अशी वयाच्या ३० व्या वर्षी मरून गेली नसती. भारतातून तिला काहीतरी मदत नक्की झाली असती.

अफगाणिस्तान सरकारने मीनाच्या अटकेची घोषणा केल्यावर विमानाने ती भारतात येऊ शकली नसतीच. शिवाय अफगाण निर्वासित मोठ्या संख्येने पाकिस्तानमध्ये होते आणि मीनाचं काम त्यांच्यासोबत असल्याने ती पाकिस्तानात जाणं स्वाभाविक होतं. अफगाण-पाक सीमारेषा १४०० किलोमीटर लांबीची असून लोक अनेक वेगवेगळ्या मार्गांनी पायी ये-जा करू शकतात. मीनाने अनेकदा वेषांतर करून या मार्गाने प्रवास केले. एक प्रवास तिने भारतातूनही केला आहे - तो पुस्तकात नक्की वाचा.

पद्मावति's picture

15 Dec 2015 - 10:09 pm | पद्मावति

सुंदर ओळख. हे पुस्तक नक्की वाचणार.

एक एकटा एकटाच's picture

15 Dec 2015 - 10:51 pm | एक एकटा एकटाच

हम्म्म्म

आता तर वाचायलाच हवं

भुमी's picture

16 Dec 2015 - 2:37 pm | भुमी

उत्तम पुस्तक परिचय

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Dec 2015 - 4:49 pm | बिपिन कार्यकर्ते

सलाम!

मन्जिरि's picture

17 Dec 2015 - 1:32 pm | मन्जिरि

वाचणारच

पिलीयन रायडर's picture

17 Dec 2015 - 2:16 pm | पिलीयन रायडर

उत्तम पुस्तक परिचय. नक्की वाचेन.

जीवावर उदार होऊन इतकं महत्वाचं काम करणार्‍या मीनाला सलाम!!

आतिवास's picture

18 Dec 2015 - 12:47 pm | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

तुडतुडी's picture

23 Dec 2015 - 2:29 pm | तुडतुडी

hats ऑफ to मीना

मितान's picture

23 Dec 2015 - 3:45 pm | मितान

चांगला पुस्तक परिचय.
नक्की वाचणार.