दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांची निवड
कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, कृषिजगताला भेडसावणार्या समस्यांची मराठी साहित्यविश्वासोबत सांगड घालण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यक्षेत्राकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी २० आणि २१ फ़ेब्रुवारी २०१६ ला नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दोन दिवसाचे दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.
या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक माजी प्राचार्य रा.रं. उर्फ़ रावसाहेब बोराडे भूषविणार असून संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार श्री सुरेश द्वादशीवार यांचे हस्ते संपन्न होईल. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी आमदार व शेतकरी नेते अॅड. वामनराव चटप यांनी जबाबदारी स्वीकारली असून उद्घाटन सत्राला एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरूप धारण केले आहे परंतू प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फ़ारसा उहापोह आणि उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाही. अगदी साहित्यक्षेत्र सुद्धा याप्रश्नाकडे गंभीरतेने पाहत आहे आढळून येत नाही. गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात लक्षावधी शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले आढळत नाही. शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे, शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांची चाचपणी करून जाणिवा समृद्ध करणारे पुस्तक मराठी साहित्यविश्वात उपलब्ध नसणे ही बाब मराठी साहित्यक्षेत्राचे खुजेपण दर्शविणारी आहे.
साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.
दोन दिवस चालणार्या या संमेलनात आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण, मराठी साहित्यावर शेतकरी चळवळीचा प्रभाव, शेतकरी आत्महत्या : कारणे व उपाय, शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून, शेतीसाहित्यातील ग्रामीण स्त्रीचे स्थान, चालू दशकातली शेतकरी कविता, शेतीच्या मुक्तीसाठी मार्शल प्लॅनची गरज अशा विविध विषयावरील एकूण ७ परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक मा. बाबाराव मुसळे, डॉ शेषराव मोहिते, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, संजय पानसे, शेतकरी नेते रवी देवांग, गुणवंत पाटील, सरोज काशीकर, प्रज्ञा बापट, शैलजा देशपांडे, गीता खांदेभराड, कडुआप्पा पाटील, संजय कोले, शेतीविषयाचे गाढे अभ्यासक डॉ दिलीप बिरुटे, प्रा. डॉ. डी.एन राऊत, गोविंद जोशी अजित नरदे, अनिल घनवट इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत.
नवसाहित्यिकांना शेतकरी आत्महत्यांच्या दाहक वास्तवाची जाणीव व्हावी म्हणून “शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून” हा विशेष परिसंवाद ठेवण्यात आला असून परिसंवादात विदर्भातील ज्येष्ठ, व्यासंगी व अनुभवी पत्रकार भाग घेणार आहेत. हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे.
संमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रा. ज्ञानेश वाकुडकर भूषवतील. या संमेलनात शरद जोशी विशेषांक, प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रह व गंगाधर मुटे लिखित नागपुरी तडका या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. रात्री १०.०० वाजता नवनाथ पवार लिखित, स्वप्नील शिंदे दिग्दर्शित व स्वप्न, पुणे व्दारा निर्मित तुला कसला नवरा हवा ही एकांकिका सादर केली जाईल.
या संमेलनात महाराष्ट्रासोबतच देश-विदेशातील १००० पेक्षा जास्त मराठी भाषिक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होतील, असा मला विश्वास आहे.
गंगाधर मुटे
कार्याध्यक्ष
दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
27 Nov 2015 - 5:49 pm | कलंत्री
कल्पना खरोखरच छान आहे. शुभेच्छा.
शुल्काबद्दल लिहिलेले दिसत नाही, परगावच्या लोकांबद्दल काही सोय होईल का?
27 Nov 2015 - 9:13 pm | गंगाधर मुटे
शुल्काबद्दल नंतर माहिती मिळेलच. मात्र शुल्क २५०/- च्या आतच असेल.
दोन दिवस जेवणाची, फराळ, चहाची व्यवस्था असेल.
मुक्कमाची व्यवस्था कॉमन हॉल स्वरुपाची असेल.
27 Nov 2015 - 9:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मूटे साहेबांची मेहनत असते आणि हे संमेलन घडून येतं. पहिल्या संमेलनाला साक्षीदार होतो, दुस-या साहित्य संमेलनात वक्ता म्हणून उपस्थित राहणारच आहे. फक्त मी शेतीविषयाचा गाढा अभ्यासक नाही पण शेती चळवळ आणि मराठी साहित्यावर त्याचा प्रभाव याबाबत माझी काही भूमिका आहे त्याबद्ल मी विचार मांडेन. सहभागी करून घेतल्याबद्दल आभार ( ऐनवेळी मी काही कामं लागू नये म्हणजे झालं. )
गंगाधर मुटे यांना शुभेच्छा !
-दिलीप बिरुटे
27 Nov 2015 - 9:20 pm | गंगाधर मुटे
शेतीविषयाचा गाढा अभ्यासक
हे विधान
शेतीसाहित्याचा गाढा अभ्यासक असे हवे. थोडी टाईप चूक झाली.
मी शेतीविषयाचा गाढा अभ्यासक नाही, असे तुम्हाला वाटते पण मला वेगळे वाटते, तुमचा अभ्यास मला माहिताय म्हणून तर १२ कोटी जनतेतून मी तुम्हाला आवर्जून बोलावतो.
मागील वर्षी तुम्ही विषय सक्षमपणे हाताळून विषयाला न्याय दिला होता.
27 Nov 2015 - 9:46 pm | प्रसाद गोडबोले
शुभेच्छा !
- शेती न करणारा
प्रगो
28 Nov 2015 - 12:22 pm | Ram ram
Mute saheb tumche akramak,satyvar adharit likhan mala khup avadte. Kripya tumcha phone number dya.
28 Nov 2015 - 12:23 pm | Ram ram
Mute saheb tumche akramak,satyvar adharit likhan mala khup avadte. Kripya tumcha phone number dya.
28 Nov 2015 - 12:23 pm | Ram ram
Mute saheb tumche akramak,satyvar adharit likhan mala khup avadte. Kripya tumcha phone number dya.
2 Dec 2015 - 10:11 pm | गंगाधर मुटे
धन्यवाद साहेब
ranmewa@gmail.com वर आपण आपला मोबाईल नं कळवावा. मी तुम्हाला sms करेन.
3 Dec 2015 - 9:59 am | माहितगार
शेतकरी साहित्य संमेलनाची कल्पना चांगली आहे. जवळपास सात परिसंवादांची यादी दिसते आहे. साहित्यसंमेलनाचा भर इतर साहित्य संमेलनांप्रमाणे ललितसाहित्यावर अधिक दिसतो आहे. यादी वाचून खालील विषय पुढील शेती साहित्य संमेलनातून करणे उपयूक्त ठरू शकेल का ते पहावे असे सुचवावेसे वाटते
* शेती आणि शेती अर्थव्यवस्थासाठी माहिती आणि ज्ञान
* मोबाईल, आंतरजाल आणि इतर आधूनिक माहिती तत्रंज्ञानाचा वापर
* वनस्पती शास्त्र, शेती, वाणीज्य विषयक अभ्यासकांचा खासकरून विद्यार्थी वर्गाचा रोल
8 Dec 2015 - 7:06 am | गंगाधर मुटे
धन्यवाद माहितगारजी.