काळाच्या दोरीला बांधत
अजून एका शतकाची गाठ
स्वतःशीच हसला तो पाषाणाचा पुतळा
पाषाणाचीच दाढी कुरवाळत मनातल्या मनात
अजून किती जगशील तू?
तुझी ही स्तब्ध पावले थकतील आधी
की काळाची?
अन् मग संवेदना बधीर करत
भिनेल ते विष हळूहळू
सर्वांगात?
जीर्ण देहावरच्या कातळी सुरकुत्या
साक्ष देती कशा आजही
कैक पावसाळ्यांच्या
अन् तख्तपालटांच्या!
त्याच्या नश्वर देहाची ही भव्य आठवण
पेरते का रे आजही तेच विचार
तुझ्याकडे कधीकधी वळणार्या
नजरांमध्ये?
की विझते आजही धुमसती
संघर्षाची धुनी
तुझ्या स्फूर्तीने?
आलाय वाटतं जवळ
तुझ्या निष्प्राण अस्तित्त्वाचा शेवट
ते पहा,
मदांध विजयोन्मादानं भरून गेलंय
कधीच ओसाड पडलेलं हे शहर
येताहेत तुझ्याच दिशेने
काही पावले ओळखीची
हो, तुलाच संपवायला
पुन्हा एकदा
अरे, हे काय?
का रे बाळांनो असे थबकलात किंचितसे?
की तुमच्याही दृष्टीत
नकळत जन्मलेत विचार?
बरं, जरा जपून घाला हं घाव
लागेल एखादा अवचित उडालेला टवका
दगडी ओठांवर उमललं
एक प्रेमळ स्मितहास्य.
पायांवर पडू लागलेले
घणांचे घाव
त्याला जाणवत नव्हते आज
बधीर मनांचे खेळ पाहत
तो पुन्हा गढून गेला
अखेरच्या तत्त्वचिंतनात
त्या स्थितप्रज्ञासारखाच...
प्रतिक्रिया
2 Sep 2015 - 12:28 am | स्रुजा
वाह !
2 Sep 2015 - 12:37 am | रातराणी
सहज सुंदर !
2 Sep 2015 - 12:48 am | पद्मावति
वाह! सुरेख.
2 Sep 2015 - 1:16 am | उगा काहितरीच
वाह...
2 Sep 2015 - 1:25 am | यशोधरा
क्या बात!
2 Sep 2015 - 1:33 am | प्यारे१
आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारी तरीही स्वतन्त्र कविता.
-प्र(गल्भ) ले चा फ्यान
खुज्या नेतृत्वाच्या खुज्या कार्यकर्त्यांचे खुजे हात
नाही होऊ शकत विचारांच्या गळ्याला नख लावण्या इतपत उंच
होतो मग सुरु खालच्याच् पातळीवर पायांशी टवके काढायचा डाव
पाहतात पोखरु पायालाच वेगवेगळ्या मार्गांनी अन करु पाहतात उध्वस्त सच्चेपणाला नि खऱ्या विचारांना
नसतेच कधी उंची विचारांची जी करु शकेल निर्माण काही
करायचं काय मग? तोडायचं,फोडायचं,जाळायचं नि फाडायचं
नसतं ठाऊक कधीच यांना, नसते कधी पोचही
फोडून एखादा पर्वत बनतो सुन्दर रास्ता
अन तोडून दगड बनते सुन्दर मूर्तीही
जाळून झळाळतं सोनं अन फाडून अंधारपडदा येतो सूर्य उदयाला
करु दे फोडायचा प्रयत्न, लागेल हाती शून्य
बनून स्थितप्रज्ञ शांत, होईल जीवन धन्य!
2 Sep 2015 - 2:09 am | बहुगुणी
समयोचितही!
(प्यारे१: तुमचं मुक्तकही आवडलं.)
2 Sep 2015 - 10:20 am | खेडूत
+१ !!
2 Sep 2015 - 1:16 pm | प्यारे१
धन्यवाद. खरं श्रेय प्र ले चं.
2 Sep 2015 - 6:52 am | प्रचेतस
सुरेख.
2 Sep 2015 - 6:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी मस्तं.
2 Sep 2015 - 9:42 am | नाखु
जरा दादांना आवताण पाठवा बरं मौक्तीक्मणी उधळायला !!!
2 Sep 2015 - 9:47 am | मांत्रिक
सुंदर! समर्पक! मर्मभेदी!
2 Sep 2015 - 10:44 am | नीलमोहर
कवितेला अजून एका विषयाचा संदर्भ येतोय.
आयसिसने चालवलेल्या विध्वंसातील एखाद्या कलाकृतीचं मनोगत वाटतंय.
त्यांच्यातही नवे विचार जन्मले तर ??
काश ऐसा हो..
2 Sep 2015 - 10:52 am | मांत्रिक
व्वा! छानच संदर्भ जोडलात! तसंही पाहता येईल!
2 Sep 2015 - 2:41 pm | अन्या दातार
अगदी हेच टंकायला आलो होतो.
2 Sep 2015 - 10:54 am | सस्नेह
मूर्तिभंजकांची अन संस्कृतीभंजकांची मानसिकता एकच असावी बहुधा.
2 Sep 2015 - 9:07 pm | कवितानागेश
अति तरल!
2 Sep 2015 - 11:10 am | नाव आडनाव
.
2 Sep 2015 - 11:44 am | बबन ताम्बे
.
2 Sep 2015 - 2:16 pm | बोका-ए-आझम
का कुणास ठाऊक पण साॅक्रेटिसचं मनोगत वाटलं.
2 Sep 2015 - 7:48 pm | मदनबाण
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Halke Gaadi Haako... { Folk Fusion by Neeraj Arya's Kabir Cafe - Official Video }
1 Jun 2017 - 12:25 am | एस
सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. काल जशी सुचली तशी टंकून प्रकाशित केल्याने कवितेत काही तृटी राहिल्या असण्याची शक्यता आहे. तरी त्यांकडे दुर्लक्ष करावे ही विनंती.
कवितेची प्रेरणा खफवर कालच्या चर्चेत सहज ओघाने आलेला एक शब्द ठरला. शीर्षक त्यावरूनच घेतले आहे. काही वाचकांनी कवितेच्या आशयाच्या प्रेरणास्थानांची उकल नेमकेपणाने केली आहे त्याबद्दल त्यांचे खास आभार. त्यामुळे कवितेतला आशय, काही 'जागा', वळणे हे सर्व कवितेच्या वाचकांपर्यंत पोहोचते.
प्यारे१ ह्यांनी आशयाची मांडणी अजूनच सुंदररित्या करून दाखवली आहे. हे फार आवडले.
इसिस एकामागोमाग एक असे पुरातन अवशेष उध्वस्त करत सुटली आहे. मानवी संस्कृतीच्या या ऐतिहासिक खाणाखुणा केवळ काही मूठभर मूलतत्त्ववाद्यांच्या आंधळ्या अभिनिवेशामुळे कायमच्या नष्ट होत चालल्या आहेत. केवळ इसिसच नव्हे, तर विवेकवादाला आंधळा विरोध करणार्या, बलप्रयोगाने समाजाची विवेकाशी असणारी नाळ तोडू पाहणार्या कैक प्रवृत्ती आज जगात सर्वत्रच उदयास येत आहेत. पूर्वी त्या नव्हत्या आणि तेव्हा त्यांनी काही उच्छाद मांडला नाही असे नाही. पण आज त्यांच्या वाढत्या मुजोरीला पायबंद घालण्याची क्षमता असणार्या शक्तीही हातावर हात ठेवून स्वस्थ बसलेल्या पाहून अंतःकरण व्यथित होणार नाही तर काय?
सॉक्रेटिसचा एक काल्पनिक पुतळा ह्या कवितेत मांडलाय. 'सूर्य पाहिलेली माणसे' आता समाजात दुर्मिळ होत चालली आहेत. आपण निदान एक पणती तरी जपून ठेवूयात!
पुन्हा एकदा सर्वच वाचक-प्रतिसादकांना धन्यवाद.
- एस
6 Sep 2015 - 6:31 pm | पैसा
_/\_