समाप्त...

अर्थहीन's picture
अर्थहीन in जनातलं, मनातलं
24 Aug 2015 - 1:26 pm

---------------------समाप्त-----------------------
दोघं नव्वीत गेलेत. ती त्याच्याच शाळेत जाते.
तो सायकलवर- ती चालत.
तिचे वडील साखर कारखान्याच्या गव्हानीत जीव धोक्यात घालून कोयत्याने ऊसाच्या मोळया तोडायचं काम करतात. दिवसाला 50 रुपये.
---म्हणून ती शाळेत चालत जाते.
त्याचे वडील त्याच कारखान्यात अकाउंट ऑफिसमधे बऱ्याच पगारावर आहेत.
---म्हणून तो शाळेत सायकलवर जाऊ शकतो.
ही पूर्ण गोष्ट -म्हटलं तर खुप टिपिकल आहे.
म्हटलं तर घायाळी.

तिला
तो
कमाल आवडतो.
पण तिचा चेहरा खुप तेलकट आहे. काळ्या रंगावरचा तेलकट चेहरा खुप विचित्र दिसतो. चिपचिपा. केस रिबिनीत कितीही नीट बांधले तरी कुरळे असल्याने विस्कटलेले दिसतात. एकच गणवेश. तो ती रोज धुऊन-धुऊन घालत असते. (वर्गातल्या दुसऱ्या मुलींचे इस्त्रीच्या घड्यांचे गणवेश पाहुन तिला आत काटा टोचल्यासारखं होतं.) वर्गातही ती तीन-तीन विषयात नापास असते. छडया खायला पुढं केलेला हात कधी मागे घेत नाही. ना डोळ्यात कधी पाणी,पश्चाताप असतो.

तिला तो आवडतो.
हे त्याला अजिबात माहिती नाही.
तो वर्गात हुशार आहे.

तिच्या नावाचा, रंगाचा, ढ पणाचा, विचित्र दिसण्याचा, चिपचिप्या चेहरयाचा उपयोग-- मुलांमधे फ़क्त कोणालातरी हेटाळणी करत चिडवण्यासाठी होतो. म्हणजे समजा गण्याला चिडवायचं असेन तर पोरं म्हणतील, गण्या बघ सुषमा तुझ्याकडच बघतीय लका! किती मरतीय तुझ्यावर ती. दिकी लका लाईन तिला, त्या काळीनं तरी दुसरं कुणाकडं बघायचं. असं म्हणून मग उरली पोरं खदाखदा हसतील. अन गण्या ते तिच्या नावाने चिडवुण घेतल्याचं शेण हिस्क्याने अंगावरनं ढकलुन त्या हसण्यात मिसळून जाईल.
'त्याच्याकडं' लाजुन- कुणाला न दिसता चोरून डोळ्याच्या कोपरयातनं बघताना तिचे डोळे खुप आशावलेले दिसायचे. त्याचं नाव निघालं तरी ही एकट्यात टिपिकल गोरीमोरी व्हायची. पण (काही मूलं-मुली खरंच इतकी सुंदर, हुशार असतात की बाकीची मूलं-मुली मनातल्या मनात स्वतःलाच त्यांच्यासमोर नाकारुन घेतात. ) हितं हेच भान तिलाही होतं. पण तरीही ती खुप आशाळभुत होती. तिच्या वाट्याला चांदण्या नाहीत, त्यांच्या कडेचा अंधार मात्र मुबलक आहे- हे तिच्या ढ मनालाही माहीत होतं . खऱ्या प्रेमासोबतच तिच्या डोळ्यात वय-सुलभ निरागस वासनेची तिरीपही उठायची. पण त्याला नककी वासनाच् म्हणता येईल का? हे कोणालाच नीट सांगता आलं नसतं. तिलाही नाही. इतर मूली सुंदर/म्हणजे/ गोरया हुशार --पूजाला 'तो' च्या नावाने चिड़वायच्या -तेव्हा तिला पूजाचा राग कधीच यायचा नाही. फ़क्त ह्रदय पिळवटुन जाईल इतका तिच्या पसरट डोळ्यात पूजा बद्दलचा हेवा साठलेला असायचा. एवढं असूनही तिला कधी तिच्या गरीबीचा, त्या चिपचिप्या तेलकट चेहरयाचा, गुंता झाल्या कुरळया केसांचा, किंवा आपल्या ढ असण्याचा राग यायचा नाही. ते सगळंच तिनं स्वीकारलं होतं.
'स्वीकारण्यात' खुप मोठी ताकद असते.

(शेवटी शेवटी शाळा संपताना- त्याला
तिच्या पाहण्याचा फिक्कट अर्थ,अंदाज लागला होता. आपण तिला प्रमाणाबाहेर आवडतो. आपण तिचे होणार नाही- हे माहीत असून आपण तिला आवडतो. ती सतत आपल्याकडे पाहत असते हे त्याला जाणवलं होतं. पण दोन मिनीट उद्याचा विचार करून तो तिथंच वर्गाच्या व्हरांडयात तिला तिच्या विचारासकट मनातल्या मनात झटकुन टाकून निघुन गेला होता. )
नंतर दहावी झाली, सगळे जिकडे-तिकडे गेले. याचा नंबर मुंबईला इंजीनियरंगला लागला. मग कंपनीत पुष्कळश्या पगाराचा जॉब. मग लग्न होऊन भारतीय सुंदर (म्हणजे गोरी) बायको मिळवून हा सुखी झाला.

ती इकडे दहावीत दोनदा नापास झाली. वडलांनी 50-100 पाहुण्यात (गावाकडे लावतात तसं) हातभर मंडपात तिचं वीस हजार हुंडा दिऊन 17 व्या वर्षी लग्न लाऊन दिलं. 18 व्या वर्षीच तिला पहिली मुलगी झाली. हाल-हाल व्हायचे त्या गरीबीत तिचे. म्हशी-शेळीची झाडलोट करण्यात दिवस जायचे. ती आता त्याला संपूर्ण विसरून गेली होती. त्याला मात्र तिचं हे काहीच माहीत नव्हतं. माहीत असन्याचं कारणही नव्हतं.
मात्र कधी रस्त्यावर चालताना कोणी तेलकट चेहरयाची मुलगी दिसली की तो दुर्मीळ कासावीस होऊन जायचा. आपल्याला आपली काहीच चुक नसतानाही नेमकं का अपराधी वाटायचं हेही त्याला समजायचं नाही.

तिला पुढच्या दोन्ही बाळातपणात मुलीच झाल्या. यावरून नवरया-सासुकडून खुप मारहाण व्हायची. एकदा दोनदा वडलांनीच तिला त्या नरकात 'गाव काय म्हणल' या तकलादु आर्ग्युमेंटवर सासरी नेऊन सोडलेलं. तिला सगळं आधार तुटल्यासारखं झालं.
---------------------------------------------------------

तो परवा बायको सहित कार घेऊन मुंबईवरुन गावाकडे सुट्टीला गेलेला. बरयाच दिवसातून.
तिथं तिसऱ्या दिवशी गावच्या घराच्या मोठ्या सुंदर बेडरूम मधे रात्री उशिरा तो घरी आला. 11 च्या आसपास.
सगळे झोपले होते. सीमा अजुन याची वाट पाहत जागीच होती. त्याचे डोळे फिक्कट लाल झालेले.
सगळे झोपले होते. बाहेर गुडुप अंधार. डोळे गडद लाल झालेले. सीमा आज खुप मूड मधे होती. त्याची आवडती ब्लॅक ब्रा तिने अंगात सजवलेली. आधीच गोरी -त्यात पावडर सेंट लावून आशेने वाट पाहत बसली होती. बाहेर गडद अंधार. सगळे आपापलल्या खोलीत शांत झोपी गेलेले. याचे डोळे गडद लाल झालेले. बेडरूममधे येऊन एका असहय तंद्रीत त्याने सीमाला घट्ट जवळ ओढलं. पावडरच्या चेहरया वरुन सावकाश हात फिरवला. ती लाजत त्याला टेकुन उभी राहिली.
त्याने तोंडावरुन दाबून हात फिरवला.
ती सावकाश ओरडली- "पावडर पुसेन ना माझी राजा". तिच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं.
त्याने अजुन जोरात हात फिरवला. पावडर पुसली. तिला दुखलं. अजुन जोरात. सलग. आता वेड्यासारखं तो तिच्या चेहरयावरचा पावडरचा शेवटचा कणनकण पुसून टाकत होता. त्याच्या लाल डोळ्यात रंगहीन पाणी साचलेलं. सीमा अवाक होती. हा असा का करतोय. बेसिनचा नळ चालु करून पाण्याने तो तिचा नॅचरल गोरा रंग सुद्धा खरडायचा प्रयत्न करत होता. चेहरा रडवेला न करताही तो आतून आक्रोशत होता.
शेजारच्या तेलाच्या बाटलीतनं ओंजळभर तेल घेऊन तो सीमाच्या -आता थोड्याश्या काळ्या पडलेल्या- तोंडावर चोळायला लागला. सगळा चेहरा तेलकट चिपचिपा करून गेला. शेवटी थकुन बेडवर पडला. तिचं पूर्ण तोंड तेलाने माखलेलं. त्याने शेवटी तशाच -स्तब्ध -आतून फुटल्या चेहरयाने तिला जवळ ओढलं. घट्ट. तिचा श्वास कोंडेल एवढी घट्ट मिठी मारून तिचा तो तेलकट चेहरा छातीजवळ ओढून तो तसाच मनात हमसत रात्री झोपी गेला.
रात्रभर "सीमा-सुषमाच्या" काळ्या तेलकट चेहरया वरचा तो तेलाचा वास त्याच्या बेडरूमभर घुमत होता...............

हे सगळं घडलं. रात्री 11 च्या आसपास.

---एक तास आधी रोडवर कित्येक वर्षानी भेटलेल्या त्याच्या गावातल्या मित्रासोबतचा त्याचा संवाद...
सुरुवातीची सगळी फॉर्मेलिटी झाल्यावर जुन्यापैकी शाळेतलं कोण कुठं असतं असा विषय चाललेला.
बोलत-बोलत केतन त्याला म्हटला अरे ती सुषमा आठवते का?? आपण काळी म्हणून चिड़वायचो ती?? अरे तिने गेल्या माहिन्यात पेटवून घेतलं. 97 टक्के भाजलेली. जागेवर कोळसा झाली. सासरी माहेरी दोन्हीकडे तिला खुप त्रास वगैरे........

पुढचं ऐकायला तो थांबला नाही.

--------
तिथुनच तो 11 वाजता गावच्या आपल्या सुंदर मोठ्या बेडरूम मधे सीमा कड़े आलेला.........
---समाप्त---

----------------------------------------------------
सुष्माला 3 मूली आहेत.....
.............रंगाने आईवर गेलेल्या...

कथालेखअनुभव

प्रतिक्रिया

एस's picture

24 Aug 2015 - 2:11 pm | एस

अस्वस्थ करणारं...

'फुल मेनी अ जेम ऑफ प्युअरेस्ट रे सिरीन
द डार्क अनफॅदम्ड केव्हज् ऑफ ओशन बेअर
फुल मेनी अ फ्लॉवर इज बॉर्न टू ब्लश अनसीन
अ‍ॅण्ड वेस्ट्स इट्स स्वीटनेस ऑन द डेझर्ट एअर...'

- थॉमस ग्रे.

अर्थहीन's picture

25 Aug 2015 - 12:33 pm | अर्थहीन

खुप चान कविता...

खटपट्या's picture

24 Aug 2015 - 2:28 pm | खटपट्या

जबरदस्त राव !!

अर्थहीन's picture

25 Aug 2015 - 2:37 pm | अर्थहीन

धन्यवाद... :-)

काय म्हणावे हेच कळत नाही. बाकी भारतीय सुंदर = गोरी हे मात्र १००% सत्य आहे.

अर्थहीन's picture

25 Aug 2015 - 11:18 am | अर्थहीन

धन्यवाद... :-)

मांत्रिक's picture

24 Aug 2015 - 4:36 pm | मांत्रिक

खूप अस्वस्थ करणारं, काळजाला आतपर्यंत चिरत जाणारं लिहिलंय! विषण्ण केलं अगदी! :(

अर्थहीन's picture

25 Aug 2015 - 11:18 am | अर्थहीन

धन्यवाद... :-)

एक एकटा एकटाच's picture

24 Aug 2015 - 10:34 pm | एक एकटा एकटाच

खरच काय प्रतिक्रया देऊ समजत नाहिए.
पण ही कथा कमीत कमी दोन दिवस तरी डोक्यातून जाणार नाही. हे नक्की

अर्थहीन's picture

25 Aug 2015 - 11:17 am | अर्थहीन

धन्यवाद... :-)

दमामि's picture

24 Aug 2015 - 10:43 pm | दमामि

..........

अर्थहीन's picture

25 Aug 2015 - 11:16 am | अर्थहीन

धन्यवाद... :-)

स्पंदना's picture

25 Aug 2015 - 10:09 am | स्पंदना

हं!

अर्थहीन's picture

25 Aug 2015 - 11:16 am | अर्थहीन

धन्यवाद... :-)

हे असं काही फार कमी वाचायला मिळतं.

मनापासून धन्यवाद.

अर्थहीन's picture

25 Aug 2015 - 11:39 am | अर्थहीन

धन्यवाद... :-)

नीलमोहर's picture

25 Aug 2015 - 11:31 am | नीलमोहर

चेष्टा करणारे करून विसरून जातात, पण ज्याची चेष्टा होते त्यांच्या मनावर कायमस्वरूपी ओरखडे उठतात. त्या न्यूनगंडाच्या छायेतून ते कदाचित आयुष्यभरही बाहेर पडू शकत नाहीत
अस्वस्थ करणारं पण छान लिखाण..

अर्थहीन's picture

26 Aug 2015 - 11:08 am | अर्थहीन

अशेच काही ओरखडे प्रत्येकजण आपल्या ह्रदयावर साठवून असतो... कोणालाही न सांगता... त्या ओरखडयाना बोलतं करायचा हा प्रयत्न होता...

प्यारे१'s picture

25 Aug 2015 - 11:42 am | प्यारे१

काळे मनातून आपण असतो खरंतर.
(काळ्या रंगाला वाईट दुष्ट चं लेबल लावलं तर...)
फँड्री आठवला काहीसा!

बॅटमॅन's picture

25 Aug 2015 - 5:13 pm | बॅटमॅन

................

अर्थहीन's picture

25 Aug 2015 - 6:16 pm | अर्थहीन

:-)

जेपी's picture

25 Aug 2015 - 6:39 pm | जेपी

...

स्वामी संकेतानंद's picture

25 Aug 2015 - 7:29 pm | स्वामी संकेतानंद

फार अस्वस्थ करणारे!
मी अनेकदा विचार करायचो, अजूनही करतो. आमच्या वर्गातल्या अतिसामान्य मुली,ह्या अशा सुषमासारख्याच होत्या, ज्यांना कुणी मुलगा भाव देत नसत, त्यांना कसे वाटत असावे नेमके?
अकरावीचा एक दिवस आठवला. वर्गातली हुशार मुलेमुली घोळक्यात बसून हास्यविनोदात रंगले आहेत(ज्यात एक मीदेखील असायचो) आणि त्या सामान्य मुली आमच्याकडे बघत आहेत. पैकी एकीच्या चेहर्यावरचे भाव फार बोलके होते. तिची नजर काळजाला चरे पाडत गेली. त्यानंतर मी त्याही मुलींशी हायहेल्लो, काय चालले आहे वगैरे जुजबी का होईना, पण अधेमधे बोलू लागलो. ते पुरेसे नसेलही कदाचित, पण त्यांना बरे वाटायचे हे लक्षात येत होते.
तुमच्या कथेमुळे हे सगळे आठवले.

अर्थहीन's picture

25 Aug 2015 - 9:34 pm | अर्थहीन

Itka vait vatata...

नाखु's picture

26 Aug 2015 - 5:55 pm | नाखु

नाही तर नातेवाईकांमध्येही काही असे असतात कुणी त्यांच्याशी आवर्जून बोलत नाही ( ते तुसडे,माणूस घाणे वगैरे नसतानाही) फक्त स्वमग्न आणि कायम ओशाळवाणे भाव असलेले (आर्थीक आणि परिस्थीतीने आलेले, जास्ती करून एकल प्रवासी). मी अश्यांशी आवर्जून बोलतो त्याचे बर्याच जणांना नवल्+कुतूहल वाटते पण ते या लोकांशी बोलायला येत नाहीत हे ही खरे.

माधुरी विनायक's picture

26 Aug 2015 - 4:30 pm | माधुरी विनायक

शब्दांकन आवडलं पण कथा वास्तववादी असूनही अशा वास्तवाचं वाईट वाटलं.

अर्थहीन's picture

26 Aug 2015 - 5:46 pm | अर्थहीन

हे लिहितानाही मला तितकाच वाईट वाटत होता...

यशोधरा's picture

26 Aug 2015 - 5:53 pm | यशोधरा

त्रास.

मीता's picture

26 Aug 2015 - 6:07 pm | मीता

:(

जे.पी.मॉर्गन's picture

26 Aug 2015 - 6:34 pm | जे.पी.मॉर्गन

लै भारी लिवलंय !

जे.पी.

अभ्या..'s picture

27 Aug 2015 - 5:11 pm | अभ्या..

जबरद्स्त.
अप्रतिम लेखन आहे.
शाळेत अगदीच दुर्लक्षित नसलो तरी गोर्‍या गोमट्या मुलांना कार्यक्रमात पुढे पुढे केले जायचे. ते कसंतरीच वाटायचे. त्यातल्या त्यात शेटजीटाईपची पुत्ररत्ने 'अरे अमुकशेटचा मुलगा ना तू, ते साडी शोरुम वाले' अशी खास ओळख मास्तरांकडून मिळवायचे, विज्ञान प्रदर्शन म्हणजे तर एक फार्स असायचा. दरवर्शीचे ठरलेले फिक्स मॉडेल अन प्रोजेक्ट त्या त्या गोमट्या मुलांना नाव लावून मिरवायला मिळायचे. आठवले सगळे.

अर्थहीन's picture

28 Aug 2015 - 10:42 am | अर्थहीन

Aata te aathvla ki raag yeto khup...

नूतन सावंत's picture

28 Aug 2015 - 11:30 am | नूतन सावंत

सुरेख लिहिलयत.

सुबोध खरे's picture

28 Aug 2015 - 11:51 am | सुबोध खरे

दुसरी बाजू --
मी शाळेत आणी कॉलेजात हुशार मुलात गणला जात असे.दिसतो कसा हे कट्ट्यांच्या वृतान्तातील फोटो मध्ये पाहू शकता. तेंव्हा मी शांत आणी तसा अबोलच होतो. त्यामुळे वर्गात काही मुली माझ्याकडे "लक्ष" ठेवून असत हे मला कळत असे.जे मला कळले नाही ते इतर मित्र चिडवून जाणवून देत असत. पण मी त्याबद्दल काहीच केले नाही.त्यातील काही सामान्य होत्या काही चांगल्या होत्या. आमच्या घरी वडिलांनी सांगितलेले होते तुम्ही मुलगी पसंत करून आणलीत तरी चालेल पण ती हिमतीची पाहिजे. शक्यतो परधर्मातील टाळा कारण त्यासाठी लागणारी तडजोड फार जास्त असते. परंतु मला तशी कोणतीच मुलगी पसंत पडली नाही. असो. पुढे लष्करात २३ वर्षे काढली आणी निवृत्त होऊन बाहेर पडलो. यानंतर चेपू चालू झाले आणी त्यात अशा काही( लक्ष ठेवणाऱ्या) मुलींचे "मैत्री" करण्याचे संदेश आले. मी मैत्रीहि केली. काही मुलींचे फोनही आले. काही मुलींशी भेटही झाली. परंतु मुळात मी चेपुवर फारस नसतोच. त्याबद्दल मला कोणत्याही भावना नाहीत. मुळात मी कुणालाही जवळ येऊ दिले नव्हते किंवा तसे काही दर्शविलेही नव्हते. तेंव्हा हि लोकांना दाखवायला आपल्याला गर्ल फ्रेंड असावी असे मला कधी वाटलेहि नव्हते. त्यामुळे असा हृदयावर कोणताच ओरखडा नाही.
गम्मत म्हणजे या सर्व गोष्टी मी बायकोलाही सांगितल्या आहेत.( मात्र आपले प्रेम व्हावे आणी प्रेम विवाह व्हावा अशी दोघांची एक इच्छा मात्र राहून गेली )

अर्थहीन's picture

29 Aug 2015 - 9:13 pm | अर्थहीन

Yaat ajun ek view aahe... Seema la kaay vaatla asen??

रातराणी's picture

29 Aug 2015 - 7:31 pm | रातराणी

:(

अर्थहीन's picture

30 Aug 2015 - 10:43 pm | अर्थहीन

Khup dhanyvaad...

नाव आडनाव's picture

29 Aug 2015 - 9:16 pm | नाव आडनाव

.

पैसा's picture

29 Aug 2015 - 10:29 pm | पैसा

खूप अस्वस्थ करणारं.

बोका-ए-आझम's picture

29 Aug 2015 - 11:03 pm | बोका-ए-आझम

करणारी कथा. छानच.

फारएन्ड's picture

30 Aug 2015 - 2:24 am | फारएन्ड

जबरी लिहीले आहे.

आदूबाळ's picture

30 Aug 2015 - 4:08 am | आदूबाळ

ये बात!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

31 Aug 2015 - 9:50 pm | निनाद मुक्काम प...

अश्या प्रसंगावर आधारीत एक शेर कॉलेज च्या टायमाला आम्ही नेहमी म्हणायचो
हम जिसे चाहे , वो चाहे किसी और को
खुदा करे ,वो जिसे चाहे ,वो चाहे किसी और को

तस्मात
तुझ्या खुशीत माझी खुशी नाही आहे तसले भपंक प्रकार दिव्य प्रेम सदरात फिल्मी पटकथामंध्ये कथा कादंबऱ्यांच्या मध्ये असतात वास्तविक जीवन दुष्ट आहे
आपल्याला कोण आवडते त्यापेक्षा आपण कोणाला आवडतो ह्याला जास्त महत्व द्यावे अशी एक त्यावेळी विचारसरणी अस्तित्वात होती.
भारतात प्रेम करायचे नक्की वय कोणते ह्याबद्दल अनेक समज गैरसमज आहेत
जात धर्म सामाजिक स्थिती पाहून डोळस पणे प्रेम करायचे म्हणजे एक प्रकारचा व्यवहार करायचा म्हंटला तरी तो शालेय ,महाविद्यालयीन कि नोकरी लागल्यावर की लग्न झाल्यावर
पुढे ४० मध्ये बेचव आयुष्यात काहीतरी थ्रिल असावे म्हणून करायचे ह्या बद्दल अनेकांचा संभ्रम असतो , प्रेम न करता ठरवून विवाह करून पुढे सहवासातून प्रेम ह्या कल्पनेवर आपली कुटुंब व्यवस्था टिकून आहे
अर्थात सहवासातून प्रेम ही संकल्पना ज्या काळात निर्माण झाली त्या काळात पुरुष प्रधान संस्कृतीत संसारात तडजोडीचा मक्ता हा स्त्रियांच्या कडे दिला जायचा त्याग ममत्व करुन दया अशी साखर पेरणी केली जायची
मी फार पूर्वी ठरवले आहे मला माझ्या गत काळात ज्या ज्या मुली स्त्रिया कधीकाळी आवडायच्या आज त्या चेपू च्या निमित्ताने माझ्या संपर्कात आहेत आम्ही चांगले मित्र आहोत एकमेकांच्या वाढत्या परिवाराशी मुलांची कौतुक करतो माझ्या भारत भेटीत त्यांना भेटतो तेव्हा ज्यांना मी कधी पूर्वी सांगू शकलो नव्हतो की तू मला आवडायची ते मी आता आवर्जून सांगतो , मरताना मनात कोणता सल राहायला नको
अर्थात ते सांगणे हे मनातील भावना व्यक्त करणे एवढाच उद्देश असतो
ह्या गाण्यावर माझा विश्वास आहे

मयुरा गुप्ते's picture

1 Sep 2015 - 2:58 am | मयुरा गुप्ते

हे दुष्टचक्र कधी संपणार आहे कोणास ठाउक..
समाजाने ठरवलेल्या सौंदर्याच्या वेड्या कल्पनांना अजुन किती बळी हवेत्...
विषण्ण झालं मन.

--मयुरा.

अर्थहीन's picture

1 Sep 2015 - 6:39 pm | अर्थहीन

Tula Seema ch man varnan karta yeil kaay??

अर्धवटराव's picture

1 Sep 2015 - 3:56 am | अर्धवटराव

सर्वच पदरांना दु:खांत असलेली.
त्याचं बोचरं, हळवं मन सर्वात जास्त भावलं.

सामान्यांच्या, खास करुन स्त्रियांच्या दु:खाचा परिपाक म्हणुन आपल्याकडे श्रीकृष्णाच्या कथा जनमानसात फार भिनल्या असाव्या काय?

पु.लं.ची भक्ती याच कारणाने आमच्यात उतरली. एरवी कोण न्याय देतो अतिसामान्यांना.

चित्रगुप्त's picture

1 Sep 2015 - 7:37 am | चित्रगुप्त

क्वचितच वाचायला मिळते, असे हे लिखाण उत्तमच आहे.
परंतु का कुणास ठाऊक, फक्त आणखी एक वाक्य यथायोग्य जागी टाकायला पाहिजे होते असे वाटून गेले.
त्या वाक्यातून असा अर्थ ध्वनित व्हावा, की पूर्वी कधीतरी त्याला क्षणिक का होईना, तिच्या विषयी एक सुप्त आकर्षण वाटून गेले होते...

अभय म्हात्रे's picture

1 Sep 2015 - 7:44 am | अभय म्हात्रे

मनाला खूप अस्वस्थ करणारी कथा.

अजया's picture

1 Sep 2015 - 8:02 am | अजया

:(

गवि's picture

1 Sep 2015 - 1:00 pm | गवि

उत्तम लेखन.

अर्थात केवळ करुणा, सहानुभूति, अपराधी भावना, तिच्या वाईट परिस्थितीचा विचार आणि त्यातून तिची सुटका करण्याचा उद्देश इत्यादिंपैकी एखाद्या दृष्टिकोनातून समोरच्या एका व्यक्तीचा स्वीकार करणं हेही अन्यायकारकच.

लिखाण सुंदरच पण वास्तव मात्र चटका लावणारे... !

अजूनही साधी मैत्री करण्यासाठी रंग, जात आणि आर्थिक परिस्थितीचे निकष लावले जातात हे त्रिवार सत्य आहे हे परत अधोरेखित झाले.

आमच्या शाळेतही अशीच सुषमा होती… आजही कधीतरी ती रस्त्यावर येता- जाता दिसते. घरच्या काही परिस्थितीमुळे लग्न न करू शकलेली….
१२ वी झाल्यामुळे जेमतेम नोकरी आणि आजारी असेलेली आई यांना सांभाळत जगत आहे.
शाळेतील एक शिक्षिका तिची फी भरत होत्या हे आम्हाला नंतर समजले.