सड़ला वाटाना

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जनातलं, मनातलं
7 Aug 2015 - 5:30 pm

त गोठ असि आय का आपल्या सप्पाइच्याच् स्यारेत सबज्जन एकमेकाइले चिड़वतेत. पोट्टे पोट्टिइनले चिड़वतेत अना पोट्टया पोट्टयाइले. नवी त काई बात नसे न बाप्पा. माह्या गोऱ्याले चार पाय अना तुह्या गोरा लंगडत जाय असा त काई नियम नसे. पर कई कई आंगभर होऊन जाते अना मंग सेकावाची बारी येउन जाते.

आमच्या वर्गात एक भाजीवालीची पोट्टी बी सिकत होती. मंगरवार बाजार भरे तं तेती या मायलेकी भेद्रा,वांगा, वाटाना विकाले बसत. कोनी पोटापान्याले चोरीचकारी करते तं कोई नोकरिपानी करते. गरीब मानुस मेहनतीचे खाउन राह्यले होते. आता लाहानसा गाव मनला त सबज्जन एकमेकाइले ओरखत राह्यतेत. बाजारातून भाजीपाला घेवाले गेला त तुमाले काई कोनाले कटाप करता एलच असा नाइ राहे. त आमच्या वर्गातल्या एका पोट्टयाच्या मायनं घेतले असतीन इच्या दुकानाचे वाटाने. निंगुन गेले असतीन दोन-तीन दाने इल्लीवाले, सड़लेसुडले. एकेक वाटाना निसून निसून कोनी पाह्यते का तं गा? तं पोट्टयाची माय त्याले मनते का सोन्या कसा माल विकते तुह्या वरगातलि पोट्टी? वाटाने सड़ले निंगुन रायले न गा! झाला, राजानं पुसलन नाक त परजा मंते सेम्बडा राजा! दुसऱ्या दिवसी पुऱ्या वर्गात बात फैललि अना तिचा नाव पडला ' सड़ला वाटाना'. या पोट्टयाले आमि मनु 'तुरतुऱ्या'. बोलाचालाले तुरतुऱ्या होताच तसा. मग ते पोट्टी वर्गात आली का पोट्टे चिल्लावत, " एss वाटानाssए... सड़ला वाटानाsssए...." नवा नवा काई आला त त्याचा माहोल राह्यते २-४ दिवस. नव्याचे दिवस नउ अना पापड पड़ले मऊ. कोनी तसा जास्त ध्यान नाइ देये. ते बी हलक्यानं घेउन राह्यलि होती. बाकी पोट्टे बी ठन्डे पड़ले. पर हां त तुरतुऱ्या होता. याचा आपला चिडवना चालूच. ते वरगात घुसलि का मंगाच्या बेंचावरुन चिरक्यान् आवाज काहाड़े, "एss वाटानाssए... सड़ला वाटानाsssए...." पानी डोसकीच्या वर जाऊन राह्यला होता. गरीब मानसाच्या धंद्यापान्यावरुन कोनी चिडवल त कितीक सहन करल? तिनं पाह्य पाह्य पाह्यलन अना भाऊ एका रोजी तिले मौक़ा भेटला. आमि आपले क्रिकेट खेलत होतो ग्राउंडवर. हां वर्गाच्या जवरच्या बॉउंडरिवर उभा होता. तिनं आपली चप्पल धरलन हातात अना धावून गेली त्याच्या आंगावर. तो आपला बिलकुल बेमालूम घुसला होता खेलात. तिनं धरलन त्याचा कालर अना सूत सूत सुताई चालू केलन. असा एकदम गनिमि काव्यानं हमला होऊन गेला तं त्याले तं काही सुधरलीच नोहोती. बिलकुल हक्काबक्का!! पुराच बुजाड़ला न!! फाटली त्याची. कसाबसा त्यानं आपला कालर सोडवलन तिच्या पकड़ीतून अना धावत सुटला ग्राउंडवर. आमि पोट्टे बी सब खेलना बंद करून मजा पावाले बसलो. पर ते पोट्टी बी काई कम नवती. गावातली गरीबाची मेहनतमजदूरी करनेवाली पोट्टी. नाजुकसाजुक नोहोती. अस्सी धावली त्याच्या मंगा मंगा नंग्याच पायानं अना त्याले वापस धरलन.

काई काई पोट्टे कसे रायतेत, तोंडानं साजरे गांडीनं हागरे, तसाचं हाबी होता. याले काई सुचे नाइ कसा वाचावाचा आपन मनुन! पैले तं तिलेच मनु लागला, " अवो सोड़ न वो माले, सोड़ न वो. तुले आता नाई चिडवाचि न वो. अवो सोड न." पर ते काई आइकावाचा नाव नाइ घेये. तिची सुताई चालूच. याच्या मनिल्याची एक गुंडी तुटून गेलति. याचा चेहरा भेदऱ्यावानि लालबुन् होऊन गेलता. मंग हा आपल्या जिगरी दोस्ताकड पलटला. द्वापरयुगात दुरपदीची इज्जत दूस्यासन लुटुन राह्यला होता तई तिनं किसनाले हाकललन होतन. तो बी आलता घाईघाईनं. पर हे तं कलयुग आए. एति दुरपदीच दूस्यासनाले उलटी झोड़पून राह्यलि होती अना दूस्यासन दूरयोधनाले बोलवुन राह्यला होता. तं यानं आपल्या दोस्ताले हाकलना चालु केलन, " अबे वाचव न बे माले. वाचव ना बे केस्या... अबे प्लीज बे... अबे माह्य संगी होस् न बे तू... अबे केस्या वाचव न बे.." तो जोराजोरात चिल्लावुन राह्यला होता. आता त्या बिल्डिंगातल्या चारि वर्गातले पोट्टेपोट्टी जमा होऊन मज्या पावून राह्यले होते. केस्या बी बाजुलेच उभा होता. तो मंते का भाऊ कोनाले सौक चडला एति मार खावाचा! तो मरो आपल्या मौतीनं. अना असा बोलून तो बी हासत हासत मज्या पावून राह्यला.

आखीरमंदी ते पोट्टीच मारून मारून थकली अना त्याले आजाद केलन. "आता परत माले चिडवलास तं याद ठेव. हेडमास्टराच्या आफिसात नेवुन पिटीन!" तुरतुऱ्या बिचारा, " हव न मातामाय, आता नाइ मनावाची तुले काई." मनुनस्यानी उगामुगा कालर ठीकठाक करून वर्गाकडे येऊ लागला. आमि सबजन सपरीत होतो. त्यानं आपले बाल ठीकठाक केले, शर्टिंग केलन, केस्याकडे एक घन पाह्यलन, मंग आमच्याकड़े पाह्यलन अना बोलला, " अबे पोट्टी होती मनुन काई नाइ केलो..नाइ तं पायलन असतन तिनं मजा! " आमि गाल्यातल्या गालात हसून रायलो होतो. गिरे तो बी टांग ऊपर! पर जावाची ते इज्जत गेली होतीच. बून्द से गई वो हौद से आती नहीं. सडला वाटानाच्या सुताईनं एक झालता. पोट्टीहिनले तारनहार भेटून् गेलता. त्याइचि बी हिम्मत वाहाडली. कोनी पोट्टे चिडवत असतीन त आपल्याले उगामुगा रावाचि ज़रूरत नसे, आपन बी पलटवार करू सकतो हे त्याइच्या ध्यानात आला. पुडचा पूरा वर्स सन्नाटा होता. सियार लड़ा शेरसे तो शेर डरे भेड़ से. कोनी कोनाले चिड़वाचा नाव नाइ घेये. मनावाले स्यांती होति पर वरगातालि मजा चाल्ली गेली होती.

बिनामज्याक मस्तीची स्यारा राह्यते का त गा भाऊ? असाच चालढकल करूनस्यानी सातव्या वरगात गेलो. चारपाच दिवसात माहीत पडला का सड़ला वाटाना स्यारा सोडून चाल्ली गेली होती. दोन दिवसाबाद मंगाच्या बेंचवरुन चिरक्यान आवाज आला, " एsss डिझेsssल......"

इतिहासअनुभव

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Aug 2015 - 6:16 pm | कैलासवासी सोन्याबापु

लैच ख़ास हो!!! सब्बन पोट्याई म्हावरे मारले म्हणजे इज्जतीचा पुराच् भाजीपाला न हो!!! सायच्या म्हणा इतके भिन करतात काय पोरीले!!!

पैसा's picture

7 Aug 2015 - 6:37 pm | पैसा

लै भारी किस्सा! सांगायची श्टाईल पण एकदम झक्कास! इतक्या सगळ्या म्हणी वाचून तर जाम मज्जा आली! =))

बहुगुणी's picture

7 Aug 2015 - 8:50 pm | बहुगुणी

किस्स्याची ष्टाईल, म्हणी...वा रे वा! धमाल मजा आली वाचायला :-)

प्यारे१'s picture

7 Aug 2015 - 7:52 pm | प्यारे१

हाहाहाहा.
___/\___.

लै गोड आहे रे ही भाषा. आवडली स्टाइल. म्हणी तर एकाहून एक सरस.
(प्रगो चं द्रष्टेपण दिसून आलं. :P
त्यानं चिडवलं नसतं तं तू ल्हिली असती का बे गोस्ट? ;) )

स्वामी संकेतानंद's picture

8 Aug 2015 - 8:05 am | स्वामी संकेतानंद

नाही नाही. इथे प्रगोचा संबंध नाही. ही गोष्ट लिहून इथे टाकायचे आधीच ठरले होते. :D

टवाळ कार्टा's picture

7 Aug 2015 - 7:55 pm | टवाळ कार्टा

भारी :)

पद्मावति's picture

7 Aug 2015 - 8:05 pm | पद्मावति

मस्त....
खूप मजा आली कथा वाचून. काय छान मजेदार लिहिलय.

हे खल्लास आहे!

एस's picture

8 Aug 2015 - 1:32 am | एस

सियार लड़ा शेरसे तो शेर डरे भेड़ से

क्या बात है! एकच नंबर.

श्रीरंग_जोशी's picture

8 Aug 2015 - 1:59 am | श्रीरंग_जोशी

बाप्पा बाप्पा, भल्लीच खास गोष्ट लिवली हाय ना हो.
काय सांगू तुमाले, नीरं डोयाईसमोर चित्र उभं रायलं नं.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Aug 2015 - 6:38 am | अत्रुप्त आत्मा

म्हणी..महान आन स्वामिज्जी अतिमहान! :-D __/\__ :-D

रातराणी's picture

8 Aug 2015 - 8:15 am | रातराणी

अगागा बरा धुतला! असच धुवाय पायजे आगाऊ पोत्ताय्ले

नाखु's picture

8 Aug 2015 - 9:22 am | नाखु

जबर$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$दस्त.

मौका देखा और चौका मारा !!!!!

कथानायीकेला आणी तुम्हाला सलाम!

तुषार काळभोर's picture

8 Aug 2015 - 10:12 am | तुषार काळभोर

--- "डिझेल"

नीलमोहर's picture

8 Aug 2015 - 10:16 am | नीलमोहर

हसून हसून डोळ्यांतून पाणी आलं की ओ,
भारीच

राघवेंद्र's picture

8 Aug 2015 - 4:37 pm | राघवेंद्र

मस्त लिहीले आहे.

चिनार's picture

8 Aug 2015 - 5:17 pm | चिनार

जबराट !!!
एक नम्बर !

जवा मले इचारन्यात आल्त "मंग भटइ न भेदराचि भाजि खात काय"

प्रीत-मोहर's picture

8 Aug 2015 - 6:46 pm | प्रीत-मोहर

__/\__

gogglya's picture

10 Aug 2015 - 5:22 pm | gogglya

आता पुढील भाग येऊ द्या - 'डीझेल'

नाव आडनाव's picture

10 Aug 2015 - 5:34 pm | नाव आडनाव

:)

अंतु बर्वा's picture

11 Aug 2015 - 1:11 am | अंतु बर्वा

काय लिवलय राजेहो... झकास!

स्पंदना's picture

11 Aug 2015 - 5:22 am | स्पंदना

हान तेज्या मारी!!
भले बहाद्दर पोर कामाट्याची!! हान हानला!

मस्त भाषा, थोडी समजते थोडी नाही, पण वाचाविशी वाटते. एकूण गोष्ट समजली आनी काय पायजे?

जुइ's picture

11 Aug 2015 - 8:57 am | जुइ

एकदम फर्मास कथा लिहिली आहे!

विशाल कुलकर्णी's picture

11 Aug 2015 - 9:37 am | विशाल कुलकर्णी

झक्कास बे स्वाम्या. लै भारी राव !

मुक्त विहारि's picture

11 Aug 2015 - 10:21 am | मुक्त विहारि

झक्कास

अजया's picture

11 Aug 2015 - 11:23 am | अजया

मजा आली वाचताना!

मीता's picture

11 Aug 2015 - 11:57 am | मीता

एक नम्बर !

होबासराव's picture

11 Aug 2015 - 12:03 pm | होबासराव

त्या सड़ला मधला जो च्या खालि टींब आहे तो मो़जी शैलि ची आठवण करुन देतो

संजय पाटिल's picture

12 Aug 2015 - 2:01 pm | संजय पाटिल

मस्त.. वाचायला मजा आली.

बबन ताम्बे's picture

12 Aug 2015 - 6:01 pm | बबन ताम्बे

आवडला.

गुलाम's picture

13 Aug 2015 - 3:10 am | गुलाम

कं लिवलंय!!!!

संदीप डांगे's picture

13 Aug 2015 - 3:24 am | संदीप डांगे

खतरा लेयेलं बावा तुमी...
फकत ते टैट्ल जरसंक हुकलं राजेहो. वर्हाळीत 'सळ्ला वटाना' म्हंते बॉ.

स्वामी संकेतानंद's picture

13 Aug 2015 - 4:00 am | स्वामी संकेतानंद

ही झाड़ीबोलि आहे. आमच्यात ळ नसतो. ळ ऐवजी र असतो किंवा सड़क चा ड़ असतो. मी तोच वापरलाय. ड खाली नुक्ता आहे प्रत्येक जागी.

संदीप डांगे's picture

13 Aug 2015 - 4:36 am | संदीप डांगे

असंय का... :-)

मी झाडीबोली प्रत्यक्ष ऐकली नाही पण इथे वाचून अमरावती ते नागपूर पट्ट्यातली बोली वाटली. वर्हाडीत अन् झाडीत फार फरक नाहीये असं वाटतंय, मामुली ५-१० टक्के.