"ती - ४"

खटपट्या's picture
खटपट्या in जनातलं, मनातलं
26 Jul 2015 - 8:48 pm

"ती - १"
"ती - २"
"ती - ३"

मलाही प्रचंड झोप येत होती पण खड्यांमुळे गाडी उडत असल्यामुळे मला झोपता येत नव्हते. जेव्हा जेव्हा मी डुलकीमधून बाहेर येत असे तेव्हा तेव्हा मी नेहाकडे पहात असे. नेहा दिवसभराच्या धावपळीने थकून गाढ झोपली होती. झोपेत सुंदर माणूस अजून सुंदर दिसते. लहान बाळे सुद्धा झोपेत खूप गोड आणि निष्पाप दिसतात. नेहाचा चेहरा अगदी निरागस होता. होतीच ती निरागस. तिला पाहताना मला कोणी पहात नाहीना याची मी काळजी घेत होतो. गाडी इंदापूरच्या आजूबाजूला एका चांगल्या हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणासाठी थांबली. ड्रायवर ने सर्वाना उतरून जेऊन घेण्याची विनंती केली. मी अतुलला उठवू लागलो पण तो काही उठायचे नाव घेईना. नेहा जागी झाली. तीसुद्धा तिच्या मैत्रीणीना उठवण्याचा प्रयत्न करत होती त्यातील फक्त एकजण उठली आणि काही खायची इच्छा नाही म्हणून परत झोपली. मी पुढे जाउन आईला काही खायचे आहे का विचारले पण तिनेही फक्त चहा पिण्याची इच्छा दाखवली. ती सुद्धा गाडीत आणून देणार असशील तर. परत मागे येउन मी अतुल उठतोय का बघितले पण माझ्या रिकाम्या झालेल्या जागेचा फायदा घेऊन तो आडवा झाला होता. नेहा जागी होऊन बसली होती आणि तिला खाली उतरायचे होते पण बहुतेक सोबत शोधत होती. बाकीचे नातेवाइक ग्रुपने बाहेर पडले. शेवटी मी मनाची तयारी करून नेहाला विचारले, "नेहा तुझी हरकत नसेल तर माझ्याबरोबर चहा नाश्ता करायला खाली येऊ शकतेस"

"हो मला खाली यायचेच आहे" जास्त आढेवेढे न घेता ती माझ्याबरोबर यायला तयार झाली. मी पहिल्यांदाच कोण्या मुलीबरोबर असा चहा प्यायला जात होतो. काय बोलावे कसे बोलावे माहीत नव्हते. नेहा पुढे आणि मी मागे असे आम्ही बसमधून उतरू लागलो. आईच्या जागेजवळून पुढे जाताना आईने माझ्याकडे आश्चर्य आणि प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मी काही घडलेच नाही असे दाखवून नेहाबरोबर खाली उतरलो. आई मात्र परत परत आम्हा दोघांकडे पहात होती. ड्रायव्हरने बऱ्यापैकी पॉश हॉटेलसमोर गाडी थांबवल्यामुळे काही लोक संकोचाने आत जात होते. नेहा आणि मी कोपर्यातले टेबल पाहून बसलो. हॉटेलमधील प्रत्येक माणूस नेहाकडे पहात होते. नेहा मला म्हणाली, "तू बस, मी फ्रेश होऊन येते"

"हो चालेल" मीही लगेच ही संधी साधून बाथरूममध्ये जाऊन लगेच तोंडावर पाणी मारून केस नीटनेटके करून जागेवर येउन बसलो. थोड्याच वेळात नेहा फ्रेश होऊन आली. आता तर ती अजूनच सुंदर दिसत होती. गाडीत मिळालेल्या झोपेमुळे तिचा चेहरा आता टवटवीत दिसत होता.
"काय घेणार नेहा तू"
"अरे मी फक्त चहा घेणार आहे"
"का गं ? भूक नाही लागली"
"नाही मी प्रवासात खाणं टाळते, तुला काय हवं असेल तर मागव."
"नाही मी पण फक्त चहाच घेणार आहे" मी दोन चहाची ओर्डर दिली.

नेहाकडे टकामका बघणाऱ्यांचा मला प्रचंड राग येत होता पण मी काहीच करू शकत नव्हतो. नेहाला बहुतेक या सगळ्याची सवय होती.
"कोणत्या शाळेत आहेस तू नोकरीला" काहीतरी विचारायचे म्हणून विचारले.
"घराजवळच आहे, शारदा विद्यालय"
"कोणता विषय शिकवतेस?"
"इतिहास"
"माझापण इतिहास विषय आवडीचा आहे" (नसला तरी आता आवड निर्माण करावी लागणार.)
"ओके, तुझे काय सुरु आहे?"
"आताच एक नवीन नोकरी लागलीय. मजा येतेय काम करताना."
"तू इजीनीअरिंग केलेयस ना?"
"हो, पण सद्या बाजारात बरेच जण आहेत. त्यामुळे स्पर्धा खूप आहे."
"ओके"
"तुला किती वर्ष झाली या शाळेत?"
"चार वर्षे झाली, डी एड कोलेज मधून माझे सिलेक्शन झाले"
"ओके" (होणारच, तुला बघून कोणीही सिलेक्ट करणारच) गावी दर वर्षी जातेस?"
"हो, मे महिन्याच्या सुटीत जाते"
"ओके, बाकी विजयचे कसे चालले आहे?"
"त्याचा बिजनेस ठीक चालला आहे"
"ओके, मग तू आणि विजय दोघेच मुंबईत असता का?"
"नाही, बरोबर सुशीला आत्याही असते ना" (सुशीला आत्या तिची सख्खी आत्या, माझी आई तिची लांबची आत्या)
"ओह, सुशीला आत्या, कशी आहे ती?"
"बरी आहे"
"ओके मग सुशीला आत्याची फॅमिली?"
"अरे तीने लग्न कुठे केलंय, आजारपणामुळे ! आणि आता करणारही नाही"
"ओह असे आहे तर"
"हम्म ती हॉस्पिटल मध्ये नर्स म्हणून काम करते"
"ओके"

तेवढ्यात अतुल धुमकेतूसारखा येउन माझ्या बाजूला बसला आणि म्हणाला, "काय रे? मला उठवले नाहीस?"
"अरे मी तुला उठवायचा किती प्रयत्न केला. पण तू गाढ झोपला होतास." मी
"अच्छा? नक्की उठवायचा प्रयत्न केलात? की तुम्हा दोघांना इथे यायचे होते म्हणून न उठवता आलात?" अतूल
आता मात्र माझा पारा चढला, " अरे अतुल, काय वाटेल ते बोलतोयस तू? नेहा तू तरी सांग."
नेहा म्हणाली, "अरे त्याने तुला उठवायचा बराच प्रयत्न केला." तिलाही काय बोलावे कळत नव्हते.
"ओके ओके बाबानो, मी झोपलो होतो बस?" असे म्हणून अतूल ने सारवासारवी करायचा प्रयत्न केला.
मस्तपैकी गप्पा चालल्या असताना हा अतूल कुठून मध्ये तडमडला काय माहीत. मला एकदम संकोचल्या सारखे वाटायला लागले. नेहाही बावरली. शेवटी कोंडी फोडण्यासाठी मीच म्हणालो "चला, निघूया आपण?"
"अरे चहा तरी संपवूदे मला?" अतूल

यावर कोणीच काही न बोलता आम्ही अतुल ची चहा संपण्याची वाट पाहू लागलो. हा अतुल मला कधीतरी मला गोत्यात आणणार होता. नेहाला वाटले असेल की हा सगळा माझाच प्लान होता की काय. अतुलचा चहा संपताच पैसे चुकते करून आम्ही निघालो. अतुल थोडा पुढे गेला ते पाहून नेहा मला म्हणाली, "संदीप, तू अतुलचे मनावर घेऊ नकोस, तो नेहमी मस्करी करत असतो." मी फक्त मान हलवली आणि मोठा सुस्कारा टाकला. नेहा किती समंजस होती. दुसरी एखादी मुलगी असती तर गैरसमजूत करून घेतली असती. एका अर्थी हा अतुल माझ्या मनातलेच बोलला होता. मलाही नेहाबरोबर एकट्याला चहा प्यायला जायचेच होते. पण जे काही झाले ते काही मी मुद्दामून घडवून आणले नव्हते. आणि नेहा म्हणाली तो मस्करी करतोय म्हणजे तिला ही मस्करी वाटली? म्हणजे ती अशी मस्करीची अपेक्षा करत होती? मोठेपणी सुद्धा? का तिला लहानपणीचे आठवत होते? काय कळायला मार्ग नव्हता. म्हणजे उद्या मी जर मी हिला बोललो की तू मला आवडतेस तरी ही मस्करी समजणार? माझी या जन्मी तरी तिला प्रपोज करण्याची हिंमत होणार नाही. म्हणजे मी कोणत्याही गोष्टीत तिची बरोबरी करत नव्हतो. स्वभाव, दिसणे, समय सूचकता, मॅच्युरिटी, जबाबदारी सर्वच बाबतीत ती माझ्यापेक्षा कैकपटीने सरस होती. अर्थात हे सर्व अवलोकन गेल्या दोन तीन तासातील होते. अतुल मी आणि ती आम्ही गाडीत येउन बसलो. तेवढ्यात समोरून आईनी हाक मारली. पुढे गेलो तर आईने विचारले "माझी चहा कुठेय?"

"विसरलो" मी
"विसरला? वाटलंच!"
"म्हणजे?"
"काही नाही, पटकन घेऊन ये"
मी पटकन खाली उतरलो आणि हॉटेलकडे धावलो. पण आई असे का म्हणाली? मी नेहाबरोबर चहासाठी गेलेलं तिला आवडलं नाही? पटकन प्लास्टिकच्या कपातून मी चहा घेऊन आईला आणून दिला. परत प्रवास सुरु झाला. अतुल आता डोळे टकटकीत उघडे ठेऊन शून्यात नजर लाऊन बसला होता. विचार करत होता की झोपेची वाट बघत होता? की त्याने केलेल्या तथाकथीत मस्करीचा त्याला पश्चाताप होत होता? नेहा मात्र चहा पिउन एवढी ताजीतवानी झाली होती की आता रात्रभर झोपणार नाही असं वाटत होतं. परत ती डोळ्यांच्या कडांमधून माझ्याकडे बघत असल्याचा मला भास होत होता. माझा वेळ आता खिडकीतून बाहेर आणि नेहाकडे बघण्यात जात होता. तेवढ्यात ड्रायवर ने गाडीतील दिवे मालवले. काळोखात मी आता नेहाला पाहू शकत नव्हतो. पण तेवढ्यात ड्रायवरने गाडीत असलेल्या विसिआरवर अर्धवट राहिलेला साजन चित्रपट पुन्हा चालू केला. आणि गाणे सुरु झाले

मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है, पर सामने जब तुम आती हो, कुछभी कहनेसे डरता है, मेरे साजन, ओ मेरे साजन…

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

26 Jul 2015 - 8:59 pm | श्रीरंग_जोशी

अप्रतिम रंगत चालली आहे कथा. अगदी डोळ्यापुढे सर्व घडत आहे असे वाचताना वाटत राहते.

पुढच्या भागात कथानायक अतुल या पात्राला कोपच्यात घेऊन खर्चापानी देईल की काय अशी शक्यता वाटत आहे ;-) .

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2015 - 9:38 pm | टवाळ कार्टा

कैच्याकै दारुगोळा ठ्ठास्सून्न भरलेला आहे या लेखात....काडी टाकायचा अनावर मोह झालाय पण जौदे....मोहावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आज :)

खटपट्या's picture

26 Jul 2015 - 9:47 pm | खटपट्या

टाकाना काडी !
काडीच्या निमित्ताने कथेत काही चांगले बदल करता आले तर चांगलंच आहे,

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2015 - 10:05 pm | टवाळ कार्टा

नक्को....मिपावर इस्त्रीपुरुश समान्ता नै

प्यारे१'s picture

26 Jul 2015 - 10:24 pm | प्यारे१

शांत काडीधारी टका शांत!
;)

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2015 - 10:37 pm | टवाळ कार्टा

खिक्क....मला शांती आवडते

नाखु's picture

27 Jul 2015 - 10:11 am | नाखु

"टकाशांती" असं काही आहे काय ??? बुवांन विचारावे लागणार !!!

मलेल्या (विचारू का नको या विचाराने)
माझ्या (आणि समस्त वाचकांच्या)
मित्राची (अर्थात खटपट्या कथा नायकाची)

प्रेमळ विचारणा.

कथा पुढे सरकतेय सहज.पोषक संवाद आणि त्यातून आपोआपच एकेक पात्र उभे राहते आहे.

ओहो! प्लॅन चांगला होता बरं का. :-)

प्यारे१'s picture

26 Jul 2015 - 10:27 pm | प्यारे१

चहाला उतरलेले आले का सगळे????
काकूंचा चहा प्यायचा रहायलाय्? काळजी नको! लोक येताहेत अजून सावकाश होऊ दे.

हळू हळू पुढे जाऊ दे रे गाड़ी, येतील पटापट.

सिरुसेरि's picture

26 Jul 2015 - 10:43 pm | सिरुसेरि

ओके ओके. असे वाटते की इंटरव्ह्यू चालू आहे .

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Jul 2015 - 11:18 pm | माम्लेदारचा पन्खा

पण आमच्या सरावलेल्या डोळ्यांना हे वर्णन कधीकधी दुसर्‍या वळणावर जाईल की काय असं वाटतंय ! ! भाषा अजून खुलवा........

दुसर्‍या वळणावर म्हणजे कुठे ?

भाव थोडा अजून आला तर दुग्धशर्करा योग !!

खटपट्या's picture

27 Jul 2015 - 1:55 pm | खटपट्या

ओके

जुइ's picture

26 Jul 2015 - 11:20 pm | जुइ

सरळ सहजपणे कथा पुढे सरकत आहे.

पद्मावति's picture

27 Jul 2015 - 12:11 am | पद्मावति

कथा छान आकार घेतेय.

रातराणी's picture

27 Jul 2015 - 12:04 pm | रातराणी

छान. अजून मोठे भाग लिहा. काही परिच्छेद मोठे झालेत. छोटे टाकले तर छान वाटेल. पण लिहण्याची शैली सहज आहे. त्यामुळे गोष्ट आवडतेय.

हेमन्त वाघे's picture

30 Oct 2015 - 1:17 am | हेमन्त वाघे

उत्सुकता वाढली होती .. पुढच ... शेवटचा भाग केव्हा येणार ?