ही कथा संपूर्ण /अति काल्पनिक आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.
-----------------------------------------------------------------------
मे महिन्याची सुटटी पडली की मामाचा गाव हे ठरलेलं, तसा माझा स्वतःचा गाव हा मामाच्या गावापेक्षाही हिरवागार आणि शांत. माझ्या स्वतःच्या गावात लोकवस्ती अत्यंत कमी त्यामुळे शांतता जास्त. कदाचित लोकवस्ती अत्यंत कमी असल्यामुळेच हिरवाई जास्त होती. आमचं गाव म्हणजे मोठ्या गावाकडे जाणार्या एसटीचा थांबा. ओहळाच्या कडेकडेने असलेली मोजून बारा घरे. दोन घरांच्या मधे जी काही जागा होती तिथे नारळ आणि पोफळ (सुपारी). कधी कधी असं वाटायचं की नारळी आणि पोफळीच्या बागेमधे थोडी थोडी जागा करुन आमची घरं घुसवली आहेत. ही नारळाची आणि पोफळाची झाडं इतकी दाट की सूर्यप्रकाश आमच्या अंगणात कधी पोहचतच नसे. ब-याच जणांनी आपापले खळं (अंगण) सिमेंटच्या पत्र्यांनी अच्छादून घेतले होते. मला मात्र मोकळे अंगण आवडत असे.ओल्या सुपा-या सुकवायला कधी कधी उन्हाची जागा शोधावी लागायची. अशा या भारलेल्या वातावरणात कधी कंटाळा येत नसे आला तर मी लता मंगेशकरची मराठी गाणी लाऊन वातावरण प्रफुल्लित करत असे. नुकताच पाउस पडून गेला असेल तर "मोगरा फुलला" हे माझं फेवरीट गाणं लावत असे. या गाण्याच्या सुरवातीला जी कोणी बासरी वाजवली आहे त्याच्यावर मी जीव ओवाळून टाकायला तयार आहे. या सारखेच अजून एक फेवरीट गाणे होते सूमन कल्याणपूर यांचे "केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर" ही अशी गाणी ऐकत सकाळ निघून गेली की दुपारी मस्त जेऊन निवांत "आज कल पाव जमीपर नही पडते मेरे, बोलो देखा है कभी तुमने मुझे उडते हुये" अशी गाणी ऐकत दुपार घालवायचो. मला कधी माझ्या गावी ग्रुपने जायला आवडत नसे, त्यासाठी माझे आजोळ...
मामाच्या गाव मात्र याच्या अगदी उलट. प्रचंड लोकवस्ती, गावात अगदी कमी झाडे. सदासर्वकाळ घर माणसांनी भरलेले. मे महिन्यात २५/३० मुलांचा गोंधळ असायचा. गावातील नवीन खेळांची ओळख व्हायची. गावातील वयस्कर येताजाता विचारत असत "कोणाचा रे तू?" मग सर्व सांगावे लागे. रात्री घरी आल्यावर थट्टा मस्करी. मग मावश्या आणि बाकीचे चिडवत असत, "बरे झाले, मामाला जावई मिळाला". त्या वयात काहीच कळत नसे काय बोलतायत. नंतर थोड्या दिवसांनी माहीत झाले की मामाच्या मुलीशी लग्न करु शकतो म्हणून हे लोक जोड्या लावायचे काम करतायत. आम्हीही हसण्यावारी न्यायचो आणि आमच्या खेळात परत रमायचो. तरीही काही चिवट माणसे त्याही पुढे जाऊन, "हा मोठीसाठी बरा आहे, आणि हा धाकटीसाठी बरा आहे." अशी शेरेबाजी चालूच ठेवत असत.
मे महिना संपून घरी आलो की आम्ही दोनतीन आठवडे त्या रम्य आठवणीत जगत असू. पण एकदा शाळा सूरू झाली की नवीन पुस्तके, वह्या, शाळेचा गणवेष यात गावच्या आठवणी मागे पडत असत. मी पाचवी ते दहावी सतत पाच वर्षे मे महिन्याची सुटी गावी घालवली. त्यामुळे काही उपद्व्यापी चुलत मामांनी माझी जोडी "ती"च्याशी लाऊन टाकली. जाता येता ते "ती"च्या आईलाही चिडवू लागले, "गे बाय, तुझा जावय बाकी बॅटींग चांगली करता हा"!
नववी दहावीत हे जरा अति होऊ लागले त्यामुळे आणि मे महिन्यातील बाकीच्या शिबिरांमधे भाग घेऊ लागल्यामुळे मग माझे मामाच्या गावी जाणे येणे कमी होउ लागले. थांबलेच म्हणाना. माझ्या स्वत:च्या गावातील शांतपणा मला आवडायला लागला. त्यात माझ्या स्वतःच्या गावी आंबे, फणस मुबलक त्यामुळे जास्तीत जास्त काळ मी तिकडे काढू लागलो.
कालांतराने दहावी झाली, महाविद्यालयीन जीवन सुरु झाले तसे मनातल्या मनात मी माझी जोडी ब-याचजणींशी लाऊ लागलो. मनातल्या मनात जोड्या लावायला कोणाची भीती आलीय. आपला अभ्यास करायचा मस्तपैकी आणि फावल्या वेळात वर्गात, वाचनालयात मस्तपैकी अँगल लाऊन बसायचे. हा माझा आवडता छंद. या अँगल लावण्यात आपण एकदम पटाईत. या अँगल लावायच्या उद्योगामुळे मुलीही अँगल लाउन असतात हे माहीत पडले. साला कधी कधी जळफळाट व्हायचा. पण नंतर मग गीतेतील वचने आठवून गपगुमान आपल्या मनाची समजूत घालून घरी यायचे. "जो तेरा है ही नही..." वगैरे. हीच गीतेतील वचने मग मी माझ्या काही "एकतर्फीवीर" मित्रांना ऐकवत असे.
मी कितीही एकतर्फी जोड्या लावत असलो तरी मनाच्या एका कोप-यात "ती" होतीच. कधी कधी "ती"ची आठवण यायची, कुठे असेल, काय करत असेल. जशी मला तिची आठवण येते तशी तिला माझी येत असेल का? कधी आप्तातल्या लग्नाला गेलो की नजर तिला शोधायची. पण कधीच नजरेला पडली नाही. तशी ती गावीच राहिल्यामुळे कोणाच्या लग्नाला मुंबईला येण्याची शक्यता कमीच होती. तरी वेडं मन लग्नाच्या गर्दीत "ती"ला शोधत रहायचं.
आठवण आली की रोज यायची, नाहीतर मग वर्ष सहा महिने असेच निघून जायचे. मला माझे शाळेतील आणि जिथे रहायचो तिथले बालमित्र अजूनही आठवतात. पण मी जशी त्यांची आठवण काढतो तसे ते माझी आठवण काढत असतील का माहीत नाही. कधी कधी बरेच दिवस एखाद्या मित्राला शोधत असतो, भेटलो की चांगल्या गप्पा हाणू असा बेत असतो, पण प्रत्यक्षात जेव्हा असा एखादा मित्र भेटतो तेव्हा फारच रूक्ष वागतो. लहानपणीचा जानीदोस्त हाच का? असा संशय येतो. आजुबाजूच्या परिस्थितीमुळे माणसांच्या स्वभावामधे बदल होत असतात पण काहींचं व्यक्तिमत्व एवढं बदलून जातं की विचारु नका. असो.
असाच विचार मला "ती"ची आठवण आली की करायचो. अजूनही ती तशीच असेल का? अल्लड, खेळकर, सुंदर. समोर आल्यावर मला ओळखेल का? की माझ्याशी रुक्ष वागून काही घडलेच नाही असे दाखवून निघून जाईल?
एक दिवस उनाडक्या करुन संध्याकाळी घरी आल्यावर कळले की "ती"चा भाऊ घरी येउन लग्नाची पत्रिका देउन गेला.
क्रमशः
प्रतिक्रिया
18 Jul 2015 - 9:50 am | ऋतुराज चित्रे
कधी कधी बरेच दीवस एखाद्या मीत्राला शोधत असतो, भेटलो की चांगल्या गप्पा हाणू असा बेत असतो, पण प्रत्यक्षात जेव्हा असा एखादा मीत्र भेटतो तेव्हा फारच रूक्ष वागतो. लहानपणीचा जानीदोस्त हाच का ? असा संशय येतो.
खरंय अगदी. थोडा वेळ पोक्तपणा सोडल्याने काय बिघडते अशा लोकांचे. अशा जिवलग मित्रांना पुन्हा भेटण्याची इच्छाच होत नाही.
18 Jul 2015 - 10:30 am | एक एकटा एकटाच
चांगलय.
पुढचे भाग पटापट येऊ द्यात.
पुढील लिखाणास शुभेच्छा.
18 Jul 2015 - 10:31 am | पैसा
मस्त सुरुवात आहे!
18 Jul 2015 - 10:35 am | अजया
सुरुवात वाचुन पुढच्या भागाची उत्सुकता वाढलीये.पुभालटा.
18 Jul 2015 - 10:38 am | जेपी
चांगली सुरुवात..
पुभाप्र.
18 Jul 2015 - 11:58 am | सभ्य माणुस
छान लेखन केलय. माझीही अशी एक "ती" होती. मलाही "ती"ची आठवन यायला लागलीय आता.
18 Jul 2015 - 12:27 pm | खटपट्या
जरूर लीहा तीच्याबद्दल...
18 Jul 2015 - 12:49 pm | प्यारे१
सुरुवात मस्त झालीये!
पुढच्या खटपटीसाठी शुभेच्छा!
18 Jul 2015 - 1:07 pm | टवाळ कार्टा
पुभाप्र
18 Jul 2015 - 1:09 pm | एस
वा! मस्त सुरूवात! पुभाप्र.
18 Jul 2015 - 1:27 pm | सुबोध खरे
छान लिहिलंय.
कधी कधी वाटतं आपली पण अशी "ती" असायला पाहिजे होती. म्हणजे तिच्या आठवणी काढत झुरत बसायला कदाचित मजा आली असती.
20 Jul 2015 - 1:08 am | धनावडे
नको हो खुप त्रास होतो जिवाला
18 Jul 2015 - 3:15 pm | बोका-ए-आझम
अशा ब-याच होत्या. त्यामुळे 'ती'ची आठवण म्हणजे किमान ८-९ जणींची आठवण आहे. पुभाप्र!
18 Jul 2015 - 3:35 pm | पद्मावति
पहिलाच भाग इतका छान झालाय की पुढचे भाग रंगणार आहेत हे नक्की.
...ही ही ही....हे एकदम मस्तं.
18 Jul 2015 - 3:59 pm | मी-सौरभ
पु.भा. प्र.
18 Jul 2015 - 4:00 pm | सोंड्या
जोड्या जुळवा आणी चिडवा या एकमेव कारणामुळे मामाच्या घरी जाणं नकोस व्हायचं
18 Jul 2015 - 4:10 pm | उगा काहितरीच
नशिबवान आहात ! आमच्या "ही" च्या लग्नाला १ वर्ष झालं पण :-( येते कधी कधी आठवण , जाऊद्या तो विषय :-( :-( :'( :'(
18 Jul 2015 - 4:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
छान! :)
18 Jul 2015 - 6:18 pm | कविता१९७८
छानय लेखन
18 Jul 2015 - 7:03 pm | सानिकास्वप्निल
छान सुरुवात झालिये.
वाचतेय.
19 Jul 2015 - 6:46 am | जुइ
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.
19 Jul 2015 - 7:27 am | सविता००१
पुभाप्र
19 Jul 2015 - 7:34 am | श्रीरंग_जोशी
वाढत्या वयातल्या आठवणी छान रंगवल्या आहेत.
कथेच्या पहिल्या भागात उत्तम वातावरण निर्मिती झाली आहे.
पुभाप्र.
19 Jul 2015 - 11:47 am | खटपट्या
लेखातील सुधारणांबद्दल व्यनी केला आहे.
सर्व प्रतिसादकांचे आभार...
19 Jul 2015 - 11:56 am | सौन्दर्य
अजून किती जातीत/पोट जातीत मामाची मुलगी लग्नासाठी चालते, हे कोणी सांगितल्यास ज्ञानात भर पडेल. मनाची उलाघाल चांगली रंगवलीय.
19 Jul 2015 - 5:12 pm | खटपट्या
मला वाटतं महाराष्ट्रात सर्वच जातींमधे मामाच्या मूलीबरोबर लग्न करु शकतो...
(जातीपाती मानत नसलेला, खटपट्या)
19 Jul 2015 - 12:07 pm | मदनबाण
या अँगल लावण्यात आपण एकदम पटाइत. या अँगल लावायच्या उद्योगामुळे मुलीही अँगल लाउन असतात हे माहीत पडले.
हा.हा.हा... पाखरांचा लागलेला अँगल {आपल्या } लक्षात आला आहे, हे ज्या क्षणी पाखरांना कळते त्याच क्षणी पटकन नजर वळवण्यात पाखरे तरबेज असतात, बर्याचदा हा अँगल नजरेच्या कोपर्यातुन लावलेला आढळुन येतो. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरी का साजन, साजन की गोरी... :- आखिरी रास्ता
20 Jul 2015 - 12:16 pm | नाखु
यातली आपली निरिक्षण शक्ती आपल्या "नामा"धिनाला अगदी सार्थ करते. " नेत्र बाणा"ची भाषा आपल्या सारख्या दर्दीच सांगू शकेल.
हघ्य हे वे सां न ल.
नाखुस
मूळ अवांतर पु भा प्र.
20 Jul 2015 - 1:11 pm | खटपट्या
हम्म कळले... :)
20 Jul 2015 - 2:12 am | तुमचा अभिषेक
छान लिहिलेय...
च्यायला आमच्या नशीबात मामाची मावशीची मुलगीही नव्हती ..
20 Jul 2015 - 3:52 am | स्वाती२
छान सुरुवात!
21 Jul 2015 - 12:28 am | अत्रुप्त आत्मा
लेखन आवडले.
21 Jul 2015 - 12:29 am | अत्रुप्त आत्मा
लेखन आवडले.
22 Jul 2015 - 6:22 pm | snehal salunkhe
खुप मस्त लिहीलंय...आवडलं.