टाईमपास २ - बकवास फुल्ल टू

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
4 May 2015 - 10:17 pm

जवळपास २० वर्षांपूर्वीची माझी शोकांतिका सांगतो. देवाच्या दयेने (मार्कांच्या बाबतीत आम्ही अगदीच कंगाल होतो) एका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आम्हाला प्रवेश मिळाला. दिल खुश हो गया. महाविद्यालय सुरू होण्याची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली तसे तसे आमचे निरागस मन कल्पनेच्या उंच उंच आकाशात एखाद्या मोरपीसासारखे तरंगू लागले. ऐन तारुण्याचे दिवस ते. आणि हिंदी सिनेमातल्या तारुण्यसुलभ प्रेमाविष्कारावर पोसलेले आमचे कोवळे मन ते! निष्पाप होते. महाविद्यालयात जायचे म्हणजे 'फूल और कांटे' मधल्या अजय देवगणसारखे जायचे आणि तिथल्या सुंदर मुलींवर अशी छाप पाडायची की पुढची चार वर्षे दिल बाग बाग झाला पाहिजे अशी गुलाबी स्वप्ने डोळ्यांमध्ये साठवत आम्ही महाविद्यालयात प्रवेश करते झालो. आमचे मन पुढच्या चार वर्षांची स्वप्ने रंगवू लागले. जिकडे तिकडे चोहीकडे सुंदर मुलींचे रमणीय ताटवे फुललेले आहेत. कुणाचे डोळे काळेभोर, कुणाचे निळसर, कुणाचे फिक्कट तपकिरी. कुणी उंच तर कुणी सुबक ठेंगणे. अभियंता होणे म्हणजे काय आणि त्यासाठी काय काय दिव्य पार पाडावे लागणार आहेत हे तेव्हा गावीही नव्हते. अशाच धुंद अवस्थेत मी माझ्या वर्गात शिरलो. आमचा देह बघून क्षणभर वर्गातल्या विद्यार्थ्यांचा प्राध्यापक आले असाच समज झाला. मी एका बाकावर जाऊन बसल्यावर सगळ्यांना कळले की हा देखील आपल्यासारखा विद्यार्थीच आहे. मी सगळीकडे पाहिले. दोन-तीन मुली एका कोपर्‍यात बसलेल्या होत्या. त्यांना बघून माझ्या स्वप्नांचे इमले धडाधड कोसळले. महाविद्यालयात एक फेरफटका मारल्यानंतर आणि भविष्यकालीन मित्रांबरोबर या विषयी गहन चर्चा केल्यानंतर तिथल्या वैराण वाळवंटाचा अंदाज आला. एका छोट्या गावातल्या केवळ तीन प्राथमिक शाखा असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात हिरवळ असणार तरी कशी असा रोकडा सवाल सगळे एकमेकांना विचारू लागले. मला हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून आम्ही ताबडतोब बाहेरच्या टपरीवर गेलो आणि तिथल्या चहाच्या पेल्यात आमचे दु:ख बुडवून प्राशन करून टाकले. पुढची चार वर्षे आम्ही त्या वाळवंटातच राहिलो. अपेक्षाभंग जितका मोठा तितके दु:ख मोठे!

नाही ओअ‍ॅसिस, नाही हिरवळ; काय वर्णावी मनाची होरपळ!!
अभियांत्रिकी म्हणजे पेल्या पेल्यात रिचवलेली मनातील मळमळ!!!

परवा अशाच जीवघेण्या अपेक्षाभंगाचं दु:ख मला पुन्हा पचवावं लागलं. आणि या जीवघेण्या अपेक्षाभंगाचं नाव होतं 'टाईमपास २'! 'टाईमपास २' साठी मी काय आटापिटा केला म्हणून सांगू. रवी जाधव, पहिल्या 'टाईमपास'ची पुण्याई, प्रिया बापट, भाऊ कदम, वैभव मांगले अशी सयुक्तिक कारणांची जंत्री पुरेशी होती. 'नीलायम'च्या काठोकाठ भरलेल्या प्रेक्षागृहात घामाने निथळत मी आमच्या जागा शोधल्या आणि स्थानापन्न झालो. सुरुवात तर झकास झाली. रवी जाधवांवर भरोसा होताच. 'नटरंग', 'बीपी', 'बालगंधर्व', 'टीपी' अशा चित्रपटांचा कुशल दिग्दर्शक काहीतरी मस्तच देणार ही खात्री होती. सुरुवातीचं निवेदन (दगडू भाभामध्ये नोकरीला लागला...वगैरे) खुसखुशीत होतं. मी कपाळावरून वाहणार्‍या घामाकडे दुर्लक्ष केले. तरुण दगडूच्या सत्काराने चित्रपटाची सुरुवात झाली. दोन-पाच मिनिटे संपली असतील आणि मनात शंकेची पाल चुकचुकली. चित्रपट गंडतोय की काय अशी शंका आली. अर्ध्या तासानंतर चित्रपट गंडॅक्स होणार हे जवळपास निश्चित झाले. मध्यंतरापूर्वीच मी बायकोजवळ 'घरी जाऊ'चं तुणतुणं वाजवायला सुरुवात केली.

आई-बाबा आणि साई बाबांची शप्पथ घेऊन सांगतो; मध्यंतरानंतर माझं डोकं भयंकर ठणकायला लागलं. समोरचा पडदा जाळून टाकावा आणि शांतपणे घरी जाऊन झोपावे असे क्रूर विचार मनात येऊ लागले. चित्रपट रटाळ असण्याचे जर काही एकक नसेल तर खुशाल 'टाईमपास २' हे एकक म्हणून स्वीकारावे अशी माझी नम्र सूचना आहे. म्हणजे 'बाबुरावला पकडा' हा {२ 'टाईमपास २'} आहे असे म्हटले म्हणजे आपोआपच त्याचा दर्जा लक्षात येईल. 'कमिंग सून' हा {४ 'टाईमपास २'}आहे असे म्हटले की संपलंच सगळं! फार निबंध लिहिण्याची गरज नाही. 'टाईमपास २' एकक वापरून रटाळपणा मोजला की प्रश्न मिटला.

'टाईमपास २' मध्ये असे काय आहे? सगळ्यात महत्वाचे म्हणजे 'टाईमपास २' रवी जाधवांनी अजिबात मनापासून बनवलेला नाही. 'टाईमपास' त्यांनी अगदी 'दिल से' बनवला होता. भट्टी मस्त जमून आली होती. 'टाईमपास'मध्ये आसपास अगदी सहज आढळणारी आणि वारंवार घडणारी गोष्ट असल्याने ती मनाला भिडली. विरोधाभासामुळे विनोद खुलला. 'टाईमपास २' मध्ये रवी जाधव नेमके प्राण फुंकायचे विसरले. रवी जाधवांनी 'टाईमपास २' मध्ये गणित आणलं आणि चित्रपट फसला. गणित कसलं? एकाच वेळेस विविध प्रकारच्या प्रेक्षकांना खुश करण्याचं गणित! आणि या निसरड्या जमिनीवर चित्रपट घसरून आपटला.

दगडू एक यशस्वी आणि श्रीमंत संगीत व्यावसायिक असतो. कसा काय? अचानक तो एवढा श्रीमंत कसा काय होतो? याचं नेमकं उत्तर सापडतच नाही. तो दगडू असल्याने त्याचं वागणं बोलणं गावरानच आहे. त्याचा सत्कार समारंभ का घडवून आणला जातो हे नीटसं कळत नाही. तिथे सगळेच शर्यत लावल्यासारखे अचकट विचकट हावभाव करून बिनबुडाचे संवाद म्हणतात. बरं ते एक वेळ ठीक आहे पण लगेच तिथे कर्णकर्कश्श आवाजात एक अतिशय भयंकर गाणे सुरू होते. सगळे नाचायला लागतात. तिथूनच चित्रपटाची चड्डी सुटायला सुरुवात होते. दोन-तीन माकडचाळे करणारे मित्र नसतील तर चित्रपटाच्या बिनडोक नायकाला महत्व कसे येईल? 'टाईमपास २'मध्येही अशी तीन जवळजवळ माकडेच आहेत. संदीप पाठकने असली फालतू भूमिका करावी हे खरोखर आश्चर्य आहे. ही तीन माकडे दगडूचं सगळं ऐकतात. स्वतःचं आयुष्य सोडून ते दगडूला वाहून घेतात. मग ठरल्याप्रमाणे रात्रीच्या वेळेस एका होडक्यावर बसून दारू ढोसणं आलं; दगडूचे दु:खाचे कंटाळवाणे कढ आले; आणि माकडत्रयीचे निरर्थक चाळे आले! मग लहानपणाचा दगडू येऊन तरूण दगडूला सल्ले देऊ लागतो.

दगडू आपण भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये शास्त्रज्ञ आहे असे सांगून प्राजूच्या वडिलांच्या (लेले) कोकणातल्या घरात प्रवेश मिळवतो. लाल मातीत अणुचाचणी चांगली होते म्हणून जमीन शोधायला आलोय असं कारण तो लेलेंना सांगतो आणि इतकी वर्षे मुंबईत राहिलेल्या आणि भाभामध्येच नोकरी केलेल्या लेलेंना ते लगेच पटतं. त्याआधी घासून घासून गुळगुळीत झालेली दगडू आणि प्राजूच्या गाड्यांची थोडक्यात टळलेली टक्कर दाखवलेली आहे. तिथे अर्थातच ते एकमेकांना ओळखत नाहीत. लेले ताबडतोब दगडूचं लग्न प्राजूशी ठरवून मोकळे होतात. ते दगडूला अर्थातच ओळखत नाहीत. मग त्याच्यासोबतच ते ही खुशखबर प्राजूला देण्यासाठी मुंबईला येतात. इकडे प्राजू नटराज स्टुडिओमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये ज्युनिअर डान्सर म्हणून नृत्य करत असते. लेले चिडतात. प्राजू त्यांना 'तुम्हाला कळणार नाही' असे सांगून असले काम स्वीकारण्यामागचे कारण सांगत नाही. नंतर दगडूला प्राजू असले काम करण्यामागचे 'मला एक अनुभव घ्यायचा होता' असे हास्यास्पद कारण सांगते. आणि दगडच असल्याने दगडूला ते कारण पटते आणि दोघांचे प्रेम मागील पानावरून पुढे चालू होते. दगडू आणि प्राजूची भेट कशी होते? शुटिंगच्या दरम्यान दगडू प्राजूचा गैरफायदा घेऊ पाहणार्‍या दिग्दर्शकाला मारतो आणि तिथे धुंवाधार मारामारी करतो. मग प्राजू त्याच्या कानशीलात भडकावते. तिथे दगडू बेंबीचा देठ तुटेल इतक्या भयंकर आवाजात "अरे हिला काय माहिती आपन कोन हाये ते. आपन आपन हाये." वगैरे भंपक आणि कंटाळवाणे संवाद म्हणतो आणि प्राजूला त्याची ओळख पटते.

एवढे निरर्थक रामायण घडूनदेखील प्राजू आणि दगडूचे लग्न ठरते कारण लेलेंना दगडूची खरी ओळख अजूनही कळलेली नसते. खरा 'दग्गड' खरं म्हणजे लेलेच वाटायला लागतो. दगडूची खरी ओळख लेलेंना कळल्यावर काय होईल याचा विचार कुणीच करत नाही. प्राजू अगदी आनंदात लग्नाच्या तयारीत स्वतःला झोकून देते. लेले मग दगडूला भेटायला त्याच्या ऑफीसमध्ये जातात. दगडूच्या आलिशान ऑफीसमध्ये दगडू सगळे कपडे काढून तो दगडू असल्याचे लेलेंसमोर जाहीर करतो. आता यासाठी सगळे कपडे उतरवण्याची काय गरज असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण रवी जाधवांना तो पडत नाही. ओळख करून देण्याची ही पद्धत जर प्रत्यक्षात आली तर काय होईल या विचारानेच मनाचा थरकाप उडतो. तर असो. दगडूच्या या अशा जगावेगळ्या ओळखपरेडीमुळे लेले संतापून निघून जातात.

दगडू आणि प्राजू एकमेकांना सुखेनैव भेटतच असतात. दगडू आपण काय काय केले याची यादी प्राजूला वाचून दाखवतो. त्यांनी ज्या बर्फवाल्याकडून बर्फाचा गोळा खाल्लेला असतो, दगडूने त्याला फ्रीज घेऊन दिलेला असतो. अजून कुणा-कुणाला त्याने काय काय घेऊन दिलेले असते. प्राजू कृतकृत्य होते. गुणाचा गो बाई माझा दगडू असा भाव तिच्या चेहर्‍यावर येतो.

नंतर लेले प्राजूचं लग्न गावातल्या एका फोटोग्राफरशी ठरवतात. या फोटोग्राफरइतकी ओव्हरॅक्टिंग करणारा अभिनेता अजून जन्माला यायचा असेल. अतिशय बालिश पद्धतीने रडणे याखेरीज हा नग दुसरं काहीच करत नाही. तो पडद्यावर आला की माझं डोकं दुखणं दुप्पट होत होतं. इकडे दगडू एका अतिलठ्ठ मुलीशी लग्न ठरवतो. का? माहित नाही. दगडूची तीन माकडे प्राजूला तिच्या मांडवातून दगडूच्या मांडवात घेऊन येतात आणि प्राजू दगडूचं अपहरण करते. त्याच्या मुसक्या बांधून ती त्याला आपल्या मांडवात घेऊन येते. तिथे एक भयंकर ड्रामा घडतो आणि लेले दगडू-प्राजूच्या लग्नाला परवानगी देतात आणि आपण सुटकेचा नि:श्वास टाकतो!

'टाईमपास २' हा इतर कुठल्याही इतर रटाळ मराठी चित्रपटाइतकाच रटाळ आणि डोकं उठवणारा चित्रपट आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. रवी जाधवांनी सगळा मसाला एकत्र करून एक मस्त भेळ तयार करण्याचा प्रयत्न केलाय खरा पण मसाल्याचं प्रमाण चुकल्याने आणि चिवडा शिळा असल्याने भेळ पुरती फसलेली आहे. पिटातल्या प्रेक्षकांसाठी दगडूचे संवाद, सगळ्या पात्रांचे अर्थहीन अंगविक्षेप, सोनाली कुळकर्णीचे भडक गाणे, दगडूने केलेली देमार मारामारी, वगैरे मसाला ठासून भरलेला आहे. जाणकार प्रेक्षकांसाठी उगीच लेलेंचे शुद्ध संवाद, मध्येच "काटा रुते कुणाला..." वगैरे सारखे गाणे, कोकणातला साधेपणा, वगैरे घुसवलेला आहे. शिवाय डोळे ओले करणारा बाप-मुलगा, बाप-मुलगी, भाऊ-बहीण, मित्र-माकडं छाप मेलोड्रामा ठायी ठायी पेरलेला आहेच. आणि हे 'गणित' साधण्याच्या नादात जाधव चित्रपटात प्राण फुंकण्याचे विसरले.

चित्रपटाची पटकथा अतिशय बाळबोध आणि हास्यास्पद आहे. पहिला 'टाईमपास' इतका सहज जमून आला असतांना दुसर्‍या 'टाईमपास'ची अतार्किक कथा चित्रपटाला बेचव करते. ठोकळेबाज प्रसंग आणि बेजान संवाद चित्रपटाच्या रटाळपणात भरच घालतात. कित्येक प्रसंग (किंबहुना संपूर्ण चित्रपटच) अगदीच उथळ आणि रसहीन आहेत.

प्रियदर्शन जाधवने अतिशय भडक आणि आक्रस्ताळा अभिनय केला आहे. प्रिया बापट छान दिसली आहे पण तिच्या व्यक्तिरेखेला काही आगापीछा नसल्याने कित्येक प्रसंगांमध्ये ती जाम गोंधळल्यासारखी वाटते. वैभव मांगलेंनी आरडाओरडा जरा जास्तच केला आहे. भाऊ कदम एक-दोन प्रसंगांमध्ये जान आणतात. बाकी ती तीन माकडं म्हणजे डोक्याला ताप! शेवटी अचानक संपदा कुळकर्णी, उदय सबनीस वगैरे दिसतात. ते मधूनच कसे काय उगवतात कोण जाणे. 'बीपी'मधला 'वहिणी वहिणी' करणारा मुलगा इथे शेवटच्या लग्नाच्या प्रसंगात ओझरता दिसतो. ठिगळ लावल्यासारखे प्रसंग सलगतेमध्ये बाधा आणतात. संकलन अतिशय वाईट आहे.

गाणी फक्त कर्णकर्कश्श आहेत. याव्यतिरिक्त गाण्यांविषयी दुसरे काहीच लिहिता येणार नाही. कथा-पटकथाच फसल्याने दिग्दर्शकाला फारशी चमक दाखवता आलेली नाही.

एकुणात काय तर 'टाईमपास २' हा चित्रपट डोके उठवतो हे नक्की. नीलायम टॉकीजला य चित्रपटाचे तिकिट चक्क ब्लॅकमध्ये मिळत होते. साठ रुपयाचे तिकिट एकशे पन्नास रुपयांना! अपेक्षा खूप वाढल्याने चित्रपटाला मिळाणारा हा प्रतिसाद साहजिक आहे. पिटातल्या प्रेक्षकांमुळे हा चित्रपट कदाचित बर्‍यापैकी चालेल देखील आणि मोठा गल्लादेखील कमावेल; पण रवी जाधवसारख्या कसलेल्या दिग्दर्शकाने असा चित्रपट बनवणे हा एक मोठा अपेक्षाभंग आहे हे ही खरेच!

असो. चित्रपट आणि पक्वान्न यात हेच तर साम्य असते. सतत हुकुमी यश दोघातही मिळवणे दुरापास्त असते. रवी जाधव एक हुशार दिग्दर्शक आहेत. त्यांचा पुढचा चित्रपट नक्कीच चांगला असेल अशी अपेक्षा करू या.

चित्रपटप्रतिभा

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

9 May 2015 - 11:33 pm | अत्रुप्त आत्मा

मी फक्त टुकार चित्रपटांबद्दल बोलतोय.. सगळ्या जाहिरात होणार्‍या चित्रपटांबद्दल नाही. जे मी म्हणलेलोच नाही,ते आपणहून माझ्या तोंडी घालू नका हो!..

असो...आमचाही समज आहेच!

मुळात मराठी चित्रपट जाहिरातच करत नाहीत ,हीच माझी तक्रार आहे. फारच कमी चित्रपट जाहिरात करतात, हवा करतात, लोकांना त्या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढेल असे करतात . कित्येक चित्रपट हे चांगले असून आले कधी आणि गेले कधी हेच कळत नाही . मला पूर्ण खात्री आहे कि जर FANDREY च्या मागे झी नसती आणि त्याचे मार्केटिंग झाले नसते तर तो चित्रपट कोणी पहिलाहि नसता . So आजचा जमाना हा marketing चा आहे आणि ते करणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे चित्रपटाचे खूप मार्केटिंग केले म्हणून त्याला नावे ठेवणे मला पटत नाही .

कायपण म्हणा - बाजी आवडला मला. पोस्टर बॉइज पण.